पार
anant_yaatree
जनुकांचा जिना सोसे
प्रसवाच्या कळा
श्रवणाच्या पार उभा
अनाहत निळा
प्रतिबिंब जाऊ पाहे
बिंबाच्याही पार
आरशाचा पारा उडे
काच आरपार
पिंपळाच्या पारापाशी
खोरणात दिवा
लावण्यास कोण येते
घोर लागे जीवा
नक्षत्रांच्या पार जाई
मिथकांचा पैस
सृजनाच्या कल्लोळात
सावरून बैस
शब्दांच्याही पार ओळ
कवितेची गेली
लुटुपुटू राजा खेळे
तरी भातुकली