Skip to main content

‘होमबाउंड’ - वैश्विक आशय आणि प्रांतीय तपशील

मुंबईसारख्या शहरात वाढलेल्यांकडून अनेकदा म्हटलं जातं की आम्ही जातपात मानत नाही, (कारण) आम्हाला ती जाणवत नाही. असं म्हणण्यात तांत्रिकदृष्ट्या गैर काही नाही पण यात ते एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, ते म्हणजे ती न जाणवणाऱ्या समाजाचा भाग असणं हा देखील एक प्रिविलेजच आहे. समाजाची उतरंड ही काही जणांच्या किती अंगावर येऊ शकतं हे ‘होमबाऊंड’ पहाताना त्रास होईलशा पद्धतीने लक्षात येतं. चंदन कुमार (विशाल जेथवा) आणि मोहम्मद शोहेब अली (इशान खत्तर) यांनी कोविडकाळात केलेला प्रवास हा जरी इथल्या मुख्य कथानकाचा भाग असला तरी माझ्या मते ‘होमबाउंड’चा पूर्वार्ध आपण केवळ सेटअपचं लेबल लावून बाजूला ठेवू शकत नाही. हे दोन्ही भाग चित्रपटासाठी एकसारख्या वजनाचे आहेत.

चित्रपटाचा बराच काळ आपल्याला दबून राहिलेली एक सुप्त दहशत जाणवत रहाते. चंदन कुमार पोलीस भरतीचा निकाल विचारायला सरकारी ऑफिसात जातो तो प्रसंग या दृष्टीने पाहण्यासारखा आहे. अतिशय लहान प्रसंगात, कुठेही आक्रस्ताळेपणा न करता यातून जे सांगितलं जातं त्यातल्या सुप्त द्वेषाचे पडसाद जातपात मानत नाही असं म्हणणाऱ्या शहरी समाजातही उमटलेले मी पाहिले आहेत.

चित्रपटाच्या उत्तरार्धाची झळ या ना त्या पातळीवर आणि या ना त्या मार्गाने आपल्यातल्या प्रत्येकापर्यंत पोचलेली आहे. तरी तिथेही सर्वांमध्ये समानता नव्हतीच. शहरांमधून आपापल्या गावांकडे मैलोनमैल तंगडतोड करत गेलेल्या कामगारांच्या कहाण्या आपण ऐकल्या आहेत. पण त्यांचा संघर्ष इथे आपण प्रत्यक्षात पाहतो आणि त्यामागच्या वेदना आपल्यातल्या प्रत्येकाला स्पर्श करणारच आहेत. चित्रपटाच्या या भागातल्या अनेक प्रतिमा आपल्या डोळ्यांपुढे मुक्काम ठोकून राहणाऱ्या आहेत. ट्रकमधून तीन जणांच्या कुटुंबाला उतरवल्यावर टपावरून पाहणाऱ्या चंदन आणि मोहम्मदवर सरकत आलेली सावली, दोघांना पाणी देणाऱ्या बाईचे ( कथेत आधी संदर्भ असलेले आणि पुढेही संदर्भ येणारे ) अनवाणी पाय, चंदनच्या आईचं अंधारात वाट पाहणं, निर्मनुष्य लॅन्डस्केपमधे दोघांचं चालत राहणं, अशी अनेक उदाहरणं देता येतील.

मुख्य दोन पात्र साकारणारे जेथवा आणि खत्तर, सुधा भारती हा थोडा लहान रोल असलेली पण लक्षात राहणारी जान्हवी कपूर, यांच्याबरोबर अतिशय खास काम आहे ते चंदनच्या आईची भूमिका करणाऱ्या शालिनी वत्स यांचं. काही दिवसांपूर्वी 'साबर बोंडं' चित्रपटातही जयश्री जगतापने केलेली आईची भूमिका आवडली होती. आता हीदेखील.

Homebound (2025) Neeraj Ghaywan

‘होमबाउंड’ हा चित्रपट ऑस्करसाठी अत्यंत योग्य कॅन्डीडेट आहे असं तो पाहून वाटतं. वैश्विक आशय आणि प्रांतीय तपशील, हा जागतिक सिनेमाचा गुण इथे अगदीच खरा आहे. जगभरात असं कोण आहे ज्यांना कोविड काळाने हादरवून सोडलं नाही? असं कोण आहे ज्याच्यावर त्यातल्या कहाण्या खोल परिणाम करणार नाहीत? त्यामुळे ही कथा प्रत्येकापर्यंत पोचेल हे नक्कीच, आणि तरीही ती फार स्पेसिफिकली एका देशातली, समाजाच्या एका वर्गातली आहे, जी तिला वैशिष्ट्यपूर्ण बनवते. चित्रपटाच्या आशयाच्या, नीरज घेवानने केलेल्या सादरीकरणाच्या आणि अनेक उत्तम परफॅार्मन्सेसच्या जोडीला इथे धर्मा प्रॅाडक्शन्सची ताकद, आणि सर्व ज्युरी सभासदांना चित्रपटाची नोंद घ्यायला भाग पाडणारं एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर मार्टिन स्कोर्सेसी हे नाव, या गोष्टी पाहिल्या तर कदाचित आपण या वर्षी या पुरस्काराच्या फार जवळ आलोय असं म्हणता येईल. आता काय होतंय ते पाहू.

मी काल पाहिला त्या शोला फार गर्दी नव्हती. वर एक जोडी शेजारून गेली त्यातला मुलगा आपल्या मैत्रिणीला म्हणाला ‘तुम्हारी वजह से मुझे ये सडीयल फिल्म देखनी पडी.’ चटकन ऐकून याचा धक्का बसला, पण फार काळ नाही. सिनेमा न कळणारा, त्याला सोपी गणितं लावणारा समाजाचा एक वर्ग असतोच. वुडी ॲलन म्हणाला होता, ‘ इफ माय फिल्म्स डोन्ट शो प्रॅाफिट, आय नो आय’म डुईंग समथिंग राईट.’

नीरज घेवान इज डुईंग समथिंग राईट. मग ते कोणाला आवडो वा न आवडो.