Skip to main content

औषधांच्या जगात

अललित दिवाळी अंक २०२५ ऐसीअक्षरे

एप्रिल २३, २०२०. अमेरिकेत कोव्हिडनं थैमान घातलं होतं. दररोज कोव्हिडबद्दल, त्यावरच्या उपायांबद्दल नवनवीन माहिती समोर येत होती. तत्कालीन (आणि विद्यमान) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्या दिवशी नेहमीसारखं पत्रकारांशी बोलायला आले आणि त्यामध्ये त्यांनी अशा आशयाचं एक विधान केलं – "जर ब्लीचसारख्या सफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थामुळे एखाद्या पृष्ठभागावरचे कोव्हिडचे विषाणू मरत असतील तर माणसाच्या शरीरात ब्लीचचं इंजेक्शन देऊन बघायला हवं. कदाचित ब्लीच फुफ्फुसांत जाऊन तिथल्या कोव्हिड विषाणूंचा नायनाट करेल… “ हे ऐकून शेजारी बसलेल्या ट्रम्प प्रशासनाच्या करोनाव्हायरस प्रतिसाद समन्वयक (response coordinator) डॉक्टर डेब्रा बर्क्स यांनी मान खाली घातली! ब्रिफींगनंतर ट्रम्प यांच्यावर अनेक स्तरांतून टीकेची झोड उठली. ‘लायसॉल’सारख्या ब्लीच बनवणाऱ्या कंपन्यांना स्पष्ट करावं लागलं की कोणत्याही परिस्थितीत त्यांची उत्पादनं शरीराच्या आत वापरली जाऊ शकत नाहीत. ट्रम्प यांचे विरोधक त्यांचं हे अचाट विधान अजूनही प्रचारात त्यांच्याविरुद्ध वापरत असतात!

ब्लीच – म्हणजे सोडियम हायपोक्लोराईट – या सारखं मानवी वापरासाठी नसलेलं रसायन इंजेक्शनद्वारा फुफ्फुसांत पाठवायच्या उपायामागची हास्यास्पदता बाजूला ठेवली तर याचा अजून एका बाबतीत विचार करू या. समजा धरून चाला की ब्लीच हे खरोखरच करोना व्हायरसवरचं औषध आहे आणि ते शरीरात घ्यायला सुरक्षितही आहे. पण सफाईसाठी वापरलं जाणारं ब्लीच बाजारात सध्या शक्यतो कुठल्या स्वरूपात मिळतं? तर स्प्रेच्या. म्हणजे एका कॅनमध्ये ब्लीच वातावरणापेक्षा जास्त दाबाखाली बंद केलेलं असतं. कॅनवरचं बटण दाबलं की ते ‘एरोसोल’च्या रूपात, म्हणजे हवेत पसरणाऱ्या लहान लहान थेंबांच्या रूपात बाहेर पडतं. आता या स्वरूपात ते आपल्याला फार तर नाकात मारता येईल, पण त्याचं इंजेक्शन नक्कीच घेता येणार नाही. म्हणजे खरोखरच ट्रम्प म्हणाले तसं ब्लीचचं इंजेक्शन घ्यायचं असेल तर त्यात अन्य काही घटक मिसळून एका नवीन स्वरूपात ‘ब्लीच इंजेक्शन’ घेता येण्यासारखं ब्लीच तयार करावं लागेल. याला आम्ही औषधनिर्माणक्षेत्रात काम करणारे लोक formulation म्हणतो. कारण औषध जरी एकच असलं तरी त्याचा स्प्रेमार्फत नाकातून शरीरात होणारा प्रवेश आणि इंजेक्शनद्वारा होणारा प्रवेश या फार वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एखाद्या रोगावरचं औषध शोधून काढणं महत्त्वाचं आहेच पण ते शरीरातल्या ईप्सित स्थळी कसं पोचवायचं की जेणेकरून त्याचा अपेक्षित उपचारात्मक परिणाम (therapeutic effect) होऊ शकेल याची तजवीज (drug delivery system) शोधणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण एखादं औषध शरीरात गेल्यावर किती लवकर काम करायला सुरुवात करेल, किती वेळ परिणाम करत राहील आणि किती परिणामकारक ठरेल या गोष्टी ते औषध शरीरात शिरण्याच्या आणि गंतव्य स्थानी पोचण्याच्या पद्धतीवर, म्हणजे drug delivery system वर अवलंबून असतात. पण ही पद्धत ठरवायची कशी? तर त्यासाठी औषध कुठल्या प्रकारचं आहे, ते कुठल्या रोगासाठी दिलं जातं, आणि रुग्ण ते कोणत्या परिस्थितीत घेणार आहे (उदाहरणार्थ, घरी की हॉस्पिटलमध्ये, दररोज की काही आठवडयांतून एकदा वगैरे) अशा गोष्टींचा विचार केला जातो. 

आधुनिक औषधशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या ड्रग डिलिव्हरीच्या सर्वसाधारण मुख्य पद्धती आपल्या ओळखीच्या आहेतच – उदाहरणार्थ तोंडावाटे (गोळ्या, कॅप्सूल, सिरप), नाकावाटे (इन्हेलर, नेब्युलायझर), त्वचेवाटे (क्रीम, पॅच), इंजेक्शनवाटे, डोळ्यावाटे किंवा कानावाटे (आयड्रॉप, इअरड्रॉप), पाठीच्या मणक्यावाटे (एपिड्युरल) वगैरे, वगैरे. पण या पद्धतींबद्दल बोलायच्या आधी आपल्याला एक संकल्पना समजावून घ्यावी लागेल आणि ती म्हणजे जैवउपलब्धता किंवा bioavailability. सोप्या भाषेत सांगायचं तर bioavailability म्हणजे औषधाचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर त्याचा किती टक्के हिस्सा रक्तप्रवाहात मिसळून शेवटी ईप्सित स्थळी पोचतो तो आकडा. पेशंटला औषध दिलं जातं तेव्हा त्यातलं सगळंच औषध शरीरातल्या हव्या त्या भागात पोचतं असं नाही. तिथवर पोचेपर्यंत त्या औषधाला बाकीच्या अवयवांचा किंवा शरीरातल्या जैविक प्रणालींचा सामना करावा लागतो. त्यात त्या औषधाचं थोडं विघटन होतं आणि शेवटी त्याचा काही टक्के भागच शरीरातल्या ईप्सित स्थळी पोचतो. एखाद्या औषधाची bioavailability ज्या घटकांवरून ठरते, त्यात ते औषध कुठल्या मार्गानं दिलं गेलंय हाही एक महत्त्वाचा घटक आहे. उदाहरणार्थ, शिरेवाटे दिलं गेलेलं (intravenous) औषध लगेच रक्तात मिसळतं आणि त्याची bioavailability १००% समजली जाते. याउलट तोंडावाटे घेतलं गेलेलं औषध रक्तात मिसळण्याआधी पचनसंस्थेमधून, यकृतामधून जातं त्यामुळे तोंडावाटे दिलेल्या औषधाची bioavailability कमी असते. त्यामुळे शिरेवाटे दिल्या जाणाऱ्या औषधाइतकाच परिणाम साधण्यासाठी त्याच औषधाचा तोंडावाटे जास्त डोस द्यावा लागतो. शिवाय औषध कुठल्या मार्गानं दिलं गेलंय यावर त्याचा परिणाम किती पटकन दिसायला लागेल तेही ठरतं – म्हणूनच इमर्जन्सीमध्ये किंवा झटपट परिणाम हवा असेल तर शिरेवाटे औषध दिलं जातं; याउलट तोंडावाटे घेतलेल्या औषधाचा परिणाम दिसायला थोडा वेळ लागू शकतो. 

ड्रग डिलिव्हरी मेकॅनिझम

तर आता ड्रग डिलिव्हरीच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल थोडं बोलू या. औषध तोंडावाटे घेणे (oral delivery) हा सगळ्यांत कॉमन आणि सोयीस्कर मार्ग. गोळ्या (tablets), कॅप्सूल्स, सिरप्स, इतर द्रवरूप औषधं आपण तोंडावाटे घेतो. या मार्गानं घेतलेलं औषध अन्ननलिकेतून पोटात जातं, तिथून आतड्यांमध्ये जातं, लहान आतड्यात त्याचं काही प्रमाणात अवशोषण (absorption) होतं, तिथून ते यकृतात जातं आणि मग तिथून पुढं रक्तप्रवाहात मिसळून त्याच्या अंतिम स्थळी पोचतं. म्हणजे त्याला बराच प्रवास करावा लागतो. या मार्गाचे फायदे म्हणजे अर्थातच सुलभता, स्वस्तपणा, उपलब्धता. तसंच या मार्गानं औषध घेताना काही वेदना होत नाहीत, कुठं हॉस्पिटलमध्ये जावं लागत नाही… एकंदरीत साधासोपा मार्ग. पण याचे काही तोटेही आहेत. वर म्हटल्याप्रमाणं औषध त्याच्या घरी पोचेपर्यंत बाकीच्या ड्रग डिलिव्हरीच्या मार्गांपेक्षा बराच वेळ लागतो आणि मध्येच पचनसंस्थेतली आम्लं (ॲसिड) त्याचं विघटन करू शकतात (कमी जैवउपलब्धता) त्यामुळे बाकीच्या मार्गांपेक्षा तोंडावाटे घ्यायच्या औषधांचा जास्त डोस घ्यावा लागतो. शिवाय औषध कुठलं आहे त्याप्रमाणे खाण्यापिण्याची पथ्यं पाळावी लागतात, उदाहरणार्थ, काही औषधं त्यांचं जास्त अवशोषण व्हावं म्हणून रिकाम्या पोटी घेणं महत्त्वाचं असतं; तर काही औषधं पोटाला त्रास होऊ नये म्हणून अन्नाबरोबर घ्यायची असतात. काही औषधं घेताना दुधाचे पदार्थ टाळायचे असतात, तर काही घेताना चोथा (फायबर) असणारं अन्न खायचं नसतं. याबद्दल औषधानुसार तुमच्या डॉक्टरचा किंवा फार्मासिस्टचा सल्ला पाळणं महत्त्वाचं!

औषध घ्यायचा दुसरा मार्ग म्हणजे जिभेखाली किंवा गालामध्ये ठेवायची औषधं (sublingual or buccal delivery). छातीत दुखायला लागल्यावर दिल्या जाणाऱ्या नायट्रोग्लिसरीनच्या गोळ्या हे याचं एक उदाहरण. पण या मार्गानं घेतलेली औषधं पोटातून जात नाहीत; ती शॉर्टकट मारतात. म्हणजे काय तर तोंडातल्या लाळेमुळे ती तोंडातच विरघळतात आणि तोंडातल्या रक्तवाहिन्यांमधून लगेच रक्तप्रवाहात मिसळतात. त्यांना पचनसंस्थेमार्गे जावं लागत नसल्यानं अर्थातच त्यांचा परिणाम दिसायला लगेच सुरुवात होते (त्यामुळे इमर्जन्सीच्या परिस्थितीत त्यांचा उपयोग होतो). तसंच ही औषधं गिळायची गरज पडत नाही. अर्थात, या मार्गानं औषध देण्यासाठी त्याचं formulation लाळेत पटकन विरघळेल असं असलं पाहिजे; त्यामुळे सगळीच औषधं या मार्गानं देता येतील असं नाही. शिवाय ही औषधं घेतल्यावर तोंडाला विचित्र चव येऊ शकते किंवा तोंड कोरडं पडू शकतं. तसंच हे औषध घेतल्या-घेतल्या लगेच पाणी पिता येत नाही किंवा काही खाता येत नाही. कारण औषधाच्या रक्तातल्या अवशोषणावर खाण्यापिण्यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणजे पुन्हा एकदा डॉक्टरचा किंवा फार्मसिस्टचा सल्ला पाळणं आलंच!

श्वासाद्वारे घ्यायची औषधं (delivery through inhalation) हा ड्रग डिलिव्हरीचा अजून एक मार्ग. यात औषध तोंडावाटे, किंवा नाकावाटे घेतलेल्या श्वासातून शरीरात पोचवलं जातं. पण या मार्गानं दिलं जाणारं औषध हे इन्हेलर किंवा नेब्युलायझरच्या मदतीनं घ्यावं लागतं. इन्हेलरमार्फत शरीरात औषध पाठवण्यासाठी दाबाचा वापर केला जातो; तर नेब्युलायझर विद्युतऊर्जा वापरून द्रवस्वरूपातील औषधाचं एरोसोलमध्ये रूपांतर करतात. या मार्गानं घेतलेली औषधं श्वसनमार्गातून थेट फुप्फुसात जातात आणि तिथून पुढे रक्तात मिसळतात. दम्यासारख्या श्वसनाशी संबंधित आजारांसाठी हा मार्ग फार उपयुक्त ठरतो. तसंच औषध मुख्यतः फुफ्फुसात जमा होत असल्यानं त्याचे संपूर्ण शरीरावर होणारे परिणाम (systemic effects) मर्यादित असतात; त्यामुळे कमी डोसमध्ये काम होऊ शकतं. पण सगळीच औषधं इन्हेलर, नेब्युलायझर किंवा एरोसोलच्या स्वरूपात बनवता येतात असं नाही. शिवाय इन्हेलर किंवा नेब्युलायझर सगळीकडं घेऊन जाणं हे काही वेळा त्रासाचं ठरू शकतं. त्याची नीट साफसफाई करावी लागते. ते वापरायचं एक विशिष्ट तंत्र आत्मसात करावं लागतं. त्यामुळे अगदी लहान मुलांना किंवा वृद्ध माणसांना श्वासाद्वारे औषध घेण्यासाठी मदत लागू शकते.

शरीराचा सगळ्यात मोठा अवयव कुठला असेल? आपली त्वचा! त्वचा आपलं पूर्ण बाह्यांग झाकते आणि नुसत्या त्वचेचं वजन ३ ते ४ किलो असतं. त्यामुळे त्वचेमार्फत औषधं द्यायचे वेगवेगळे मार्गही विकसित झाले आहेत. हे मार्ग साधारणतः टॉपिकल (applied to skin) आणि ट्रान्सडर्मल (through the skin) या दोन प्रकारात मोडतात. टॉपिकल डिलिव्हरी म्हणजे त्वचेच्या वर लावली जाणारी औषधं. (ही औषधं त्वचेतून खालच्या स्तरांपर्यंत (उदाहरणार्थ, डर्मिस, हायपोडर्मिस) झिरपतात पण त्याखाली जाऊन मुख्य रक्तप्रवाहात मिसळत नाहीत. त्वचेशी संबंधित जे रोग किंवा त्रास आहेत, उदाहरणार्थ, कोरडी त्वचा, रॅश, पुरळ, इसब, त्वचेला खाज येणं, वगैरे, त्यांवर उपाय म्हणून वापरण्यात येणारी क्रीम, जेल, लोशन या प्रकारांत येतात. त्यांचा बाकीच्या शरीरावर काही परिणाम होत नाही आणि ही वापरायला सोपी असतात. पण सगळीच औषधं त्वचेला लावता येईल अशा formulation मध्ये बनवता येतील असं नसतं. (उदाहरणार्थ, असं औषध क्रीमसारखं घट्ट हवं, पाण्यासारखं पातळ असून चालणार नाही). शिवाय या औषधांचा इच्छित परिणाम हवा असेल तर त्यांचा योग्य वापर करणं गरजेचं असतं (उदाहरणार्थ, त्वचा पाण्यानं धुवून, कोरडी करून मग क्रीम लावणं).

याउलट ट्रान्सडर्मल मार्गानं दिली जाणारी औषधं त्वचेच्या कुठल्याही स्तरामध्ये न साठता थेट खाली जातात आणि रक्तप्रवाहात मिसळतात. बहुतेक वेळा या औषधांचा त्वचेतून खाली जाऊन रक्तप्रवाहात मिसळण्याचा वेग नियंत्रित केलेला असतो (controlled release), त्यामुळे शरीराला औषधाचा डोस बरेच तास (किंवा बरेच दिवस) मिळत राहतो. तोंडावाटे घेतलेल्या औषधासारखं या औषधांना पचनसंस्थेतून जावं न लागल्यानं यांची bioavailability चांगली असते आणि controlled release असल्यानं सारखेसारखे डोस घ्यावे लागत नाहीत. शिवाय ज्यांना इंजेक्शनची भीती आहे किंवा ज्यांना डॉक्टरकडं न जाता आपापलं औषध घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा मार्ग सोयीस्कर आहे. अगदी रोजची कामं करता करतासुद्धा या मार्गानं औषध घेता येतं. ज्यांना धूम्रपान सोडायचं आहे त्यांना देण्यात येणारे निकोटीन पॅच (ज्यांतून शरीराला हळूहळू निकोटीन मिळत राहतं), गंभीर वेदनेपासून (chronic pain) आराम मिळण्यासाठी वापरण्यात येणारे फेंटानिल पॅचेस, किंवा हार्मोन रिप्लेसमेंट ट्रिटमेंटसाठी वापरण्यात येणारे इस्ट्रोजेन पॅच, टेस्टेटिरॉन पॅच ही सगळी ट्रान्सडर्मल डिलिव्हरीची उदाहरणं. आधी म्हटल्याप्रमाणे त्वचा हा सर्वांत मोठा अवयव असल्यानं हे पॅच लावण्यासाठी शरीरावर बरेच पर्यायही उपलब्ध असतात. पण काहीवेळा यामुळे त्वचा लाल होणं, खाजणं असे प्रकार होऊ शकतात; आणि जी औषधं त्वचेतून खाली जाऊन रक्तात मिसळू शकतात फक्त तीच या मार्गानं दिली जाऊ शकतात.

सुया किंवा इंजेक्शनं आणि आपलं अगदी लहानपणापासून जिव्हाळ्याचं नातं असतं. आपले आईबाबा इंजेक्शनची भीती दाखवून आपल्याकडून कायकाय करवून घेतात. माझ्या परिवारातल्या एका ज्येष्ठ व्यक्तीला तर अजूनही इंजेक्शनची भीती वाटते. (कौटुंबिक स्वास्थ्य बिघडू नये म्हणून ती व्यक्ती कोण हे मी उघड करत नाही.) पण जेव्हा औषध शरीरात थेट पोचवायचं असतं तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शनं वापरून ते केलं जातं. यात तीन मुख्य उपप्रकार आहेत – शिरेवाटे (intravenous delivery ), स्नायूंवाटे (intramuscular delivery ) आणि त्वचेखालून (subcutaneous delivery).

शिरेवाटे दिलं जाणारं औषध थेट शिरेतल्या रक्तप्रवाहात मिसळत असल्यामुळे या मार्गाची bioavailability सगळ्यात जास्त म्हणजे १००% असते. यात पुन्हा दोन प्रकार सांगता येतील – शिरेवाटे दिली जाणारी इंजेक्शनं आणि शिरेवाटे दिली जाणारी इन्फ्युजनं. थोडंसंच औषध (उदाहरणार्थ, काही मिलिलिटर इतपत छोटा डोस) शरीरात पटकन पोचवायची गरज असेल तर ते शिरेतून इंजेक्शनच्या मार्फत दिलं जातं. त्याचा परिणामही लगेच दिसून येतो. याउलट जेव्हा औषध एका विशिष्ट दरानं काही मिनिटं किंवा काही तास शरीरात सोडायचं असतं तेव्हा इन्फ्युजन वापरण्यात येतं. या प्रकारात औषध योग्य त्या द्रवपदार्थाबरोबर मिसळून प्लॅस्टिकच्या पिशवीत (infusion bag) भरून नलिका, पंप, आणि सुई किंवा कॅथेटरमार्फत हळूहळू शिरेतून शरीरात सोडलं जातं. एखाद्याला रक्त देणं, प्रचंड अशक्तपणा आलेल्या किंवा अन्न पचवू न शकणाऱ्या रोग्याला सलाईनमधून इलेक्ट्रोलाईट किंवा इतर पोषक पदार्थ पुरवणं, कर्करोगाच्या रुग्णांना केमोथेरपी देणं ही सगळी शिरेवाटे दिल्या जाणाऱ्या इन्फ्युजनंची उदाहरणं.

त्वचेखाली जो चरबीचा थर असतो त्याखाली असलेल्या स्नायूंमध्ये इंजेक्शनद्वारा औषध देणं (intramuscular) हा यातला दुसरा उपप्रकार. दंड, मांडी किंवा पार्श्वभाग अशा शरीराच्या काही विशिष्ट भागांतले स्नायू यासाठी निवडले जातात. या भागांतल्या स्नायूंमध्ये रक्तनलिकांचं चांगलं जाळं असल्यानं इथं दिल्या गेलेल्या औषधाचं थोड्याच वेळात रक्तप्रवाहात अवशोषण होतं. त्यामुळे या मार्गानं दिलेल्या औषधाची bioavailability थेट शिरेवाटे दिल्या गेलेल्या औषधांपेक्षा कमी असली तरी तोंडावाटे दिल्या गेलेल्या औषधांपेक्षा बरीच जास्त असते. थेट शिरेत देता येत नाहीत अशी औषधं किंवा ज्यांचा परिणाम बराच वेळ राहणं अपेक्षित आहे अशी औषधं स्नायूंवाटे दिली जातात. पेनिसिलीन, ॲलर्जीचा तीव्र परिणाम झाल्यावर दिलं जाणारं एपिनेफ्रिन आणि वेगवेगळ्या लशी (vaccines) ही स्नायूंवाटे दिल्या जाणाऱ्या औषधांची काही उदाहरणं.

सुईद्वारे औषध द्यायचा तिसरा मार्ग म्हणजे आपल्या कातडीच्या खाली असलेल्या चरबीच्या थरामध्येच (subcutaneous) इंजेक्शन देणं. या फॅटी स्तरामध्ये रक्तनलिकांचं कमी जाळं असल्यानं इथं दिलेल्या औषधाचं अवशोषण शिरेत किंवा स्नायूत दिलेल्या औषधापेक्षा हळू होतं आणि या मार्गाची bioavailabilityसुद्धा बाकीच्या दोन इंजेक्शनांपेक्षा कमी (तरीही तोंडावाटे घेतलेल्या औषधापेक्षा जास्त) असते. त्यामुळे जी औषधं शरीरात हळूहळू मिसळणं अपेक्षित आहे अशी औषधं या मार्गानं देता येतात. कातडीच्या खाली इंजेक्शन देणं हे शिरेत किंवा स्नायूत देण्यापेक्षा सोपं असल्यानं ही इंजेक्शनं स्वतःच स्वतःलाही देता येतात. या मार्गाचं नेहमी आढळणारं उदाहरण म्हणजे इन्सुलिनचं इंजेक्शन. तसंच काही रक्त पातळ करणाऱ्या औषधांची इंजेक्शनंही या मार्गानं दिली जातात. आमच्या फार्मा क्षेत्रात एकदा का शिरेवाटे दिलं जाणारं औषध (intravenous) वितरणासाठी मंजूर झाल की काही वर्षांनी त्याच्या subcutaneous पद्धतीनं डोस देण्यासाठी नवीन आवृत्त्या बनवायचा बरेचदा प्रयत्न होतो. कारण रुग्ण स्वतःलाच त्वचेखाली घरबसल्या सहज औषधं घेऊ शकतात आणि आता विकसित झालेल्या त्वचेखालच्या ड्रग डिलिव्हरी यंत्रांमुळे एका इंजेक्शनमध्ये देता येईल त्यापेक्षा जास्त मात्रा घ्यायचेही अनेक पर्याय उपलब्ध झालेत. त्यामुळे हा मार्ग रुग्णांना जास्त सोयीस्कर पडतो.

वर सांगितलेल्या तीनही प्रकारच्या इंजेक्शनांनी औषधं द्यायचे फायदे म्हणजे पचनसंस्थेतून जायची भानगड नसल्यानं औषधाचा परिणाम लवकर दिसतो आणि औषध हव्या त्या गतीनं आणि प्रमाणात देता येतं. या मार्गाचे तोटे म्हणजे यासाठी एक तर हॉस्पिटल गाठावं लागतं किंवा औषध कसं द्यायचं हे शिकून घ्यावं लागतं. जर ती प्रक्रिया नीट झाली नाही तर वेदना होऊ शकतात, दूषित सुयांमुळे इन्फेक्शन होऊ शकतात, आणि ज्यांना सुयांची भीती आहे त्यांच्यासाठी या मार्गानं औषध घ्यायचं म्हणजे संकटच!

डोळे आणि कान हे अजून दोन अवयव आहेत ज्यांमार्फत औषधं दिली जातात (ophthalmic and optic delivery). पण ही औषधं डोळा किंवा कान याच भागांवर परिणाम करणारी असतात. बाकीच्या शरीरात ती फारशी मिसळत नाहीत आणि त्यांचे साईड इफेक्ट्सही फारसे नसतात. डोळ्याची इन्फेक्शन, ॲलर्जी, काचबिंदू, कोरडे डोळे यांच्यावरच्या उपचारांसाठी डोळ्यांत घातले जाणारे थेंब, हळूहळू औषध सोडणाऱ्या कॉन्टॅक्ट लेन्स ही डोळ्यांतून दिल्या जाणाऱ्या औषधांची उदाहरणं. कानाच्या बाहेरच्या बाजूला झालेल्या जखमांवर आणि इन्फेक्शनवर इलाज करायला कानात घातले जाणारे थेंब, बहिरेपणा किंवा अन्य गंभीर आजारांवर उपचार म्हणून कानाच्या पडद्यातून मध्यकर्णामध्ये दिलं जाणारं इंजेक्शन ही कानावाटे दिल्या जाणाऱ्या औषधांची उदाहरणं.

पाठीचा कणा हा औषध द्यायचा अजून एक मार्ग (epidural delivery). या मार्गानं दिली जाणारी औषधं वेदनांची जाणीव कमी करण्यासाठी वापरली जातात. ही औषधं रक्तप्रवाहात अतिशय कमी प्रमाणात मिसळतात. पाठीच्या कण्यातून ती त्या भागातल्या cerebrospinal fluidमध्ये जातात आणि त्यामार्फत मज्जातंतूंच्या मुळाशी पोचून वेदनेची जाणीव कमी करतात. प्रसूतीच्या वेळी दिलं जाणारं एपिड्युरल किंवा ऑपरेशनच्या आधी दिली जाणारी भूल ही या मार्गाची उदाहरणं. पण पाठीच्या कण्यात औषध देण्यासाठी खास कौशल्य लागतं आणि काही वेळा इन्फेक्शन किंवा मज्जातंतूंना इजा होऊ शकते.

आणि सगळ्यांत शेवटी ड्रग डिलिव्हरीच्या मार्गांतल्या ज्या मार्गाबद्दल आपण बोलणार आहोत तो म्हणजे रेक्टल डिलिव्हरी, म्हणजे मलाशयातून औषध देणं. पोट साफ होत नसेल तर दिल्या जाणाऱ्या एनिमाशी आपला काहीसा वेदनादायक परिचय असू शकेल! पण खरं तर इतरही काही परिस्थितींत या मार्गानं औषध देणं उपयुक्त ठरतं. जर रुग्ण तोंडावाटे औषध घेऊ शकत नसेल, रुग्णाला मळमळून औषध उलटीद्वारा पडून जाणार असेल तर हा पर्याय चांगला ठरतो. आपल्या पचनसंस्थेतल्या स्नायूंच्या समन्वित हालचालींमुळे अन्न किंवा मल पचनसंस्थेतून पुढे ढकलले जातात; पण जर एखाद्या रुग्णाच्या बाबतीत ही हालचाल नीट होत नसेल (विशेषतः अतिवृद्ध किंवा मरणासन्न रुग्ण) तर त्यांच्या बाबतीतही या मार्गानं औषध देणं फायद्याचं ठरतं. या औषधांचं अवशोषण मलाशयातल्या रक्तवाहिन्यांमध्येच होऊन ती औषधं शरीरभर पसरतात. यकृत आणि पचनसंस्थेचा अडथळा नसल्यानं यांचीही उपलब्धता चांगली असते आणि परिणामही लवकर दिसतो. तोंडावाटे औषध घेता येत नसेल तर शिरेवाटे इंजेक्शन घेणं (intravenous) हाही आपण वर पाहिलेला एक पर्याय आहे, पण त्यासाठी पेशंटला हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं. रेक्टल डिलिव्हरीसाठी रुग्ण घरी राहू शकतात आणि नर्स किंवा प्रशिक्षित व्यक्ती औषध देऊ शकतात. पण सगळीच औषधं या मार्गानं देता येतात असं नाही. शिवाय या मार्गानं औषध घेणं कटकटीचं आहे आणि औषधाचं अवशोषण कधीकधी अनियमित प्रमाणात होऊ शकतं.

तर हा होता ड्रग डिलिव्हरीच्या मुख्य पद्धतींचा थोडक्यात आढावा. औषधनिर्माणशास्त्रातल्या संशोधकांनी औषधं शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमार्फत शरीरातल्या ईप्सित स्थळी पोचवायचे अनेक मार्ग विकसित केले आहेत. औषधातला मुख्य घटक एकच असला तरी आजार कुठल्या अवस्थेला पोचला आहे; औषधाची मात्रा किती आहे, आणि रुग्णांच्या गरजा काय आहेत यांनुसार त्याच औषधाच्या वेगवेगळ्या आवृत्त्या उपलब्ध आहेत (उदाहरणार्थ, ब जीवनसत्त्वाच्या गोळ्या, कॅप्सूल, इंजेक्शनं आणि पॅच, आयबुप्रोफेनच्या गोळ्या, कॅप्सूल, जेल, द्रवरूप औषधं, स्प्रे आणि इंजेक्शनं). मग एखादं औषध घेताना आपली जबाबदारी काय असते? तर ते औषध आपण कशासाठी घेतोय, त्याचबरोबर कुठल्या स्वरूपात आणि कुठल्या मार्गानं घेतोय याची आपल्या डॉक्टर किंवा फार्मसिस्टकडून माहिती घेणं. बरेचदा अगदी सुशिक्षित लोकांमध्येही औषधनिर्माणशास्त्राबद्दल अविश्वास आणि त्या अविश्वासापोटी जन्माला आलेलं अज्ञान किंवा अर्धवट ज्ञान दिसून येतं. त्यामुळे औषधं घेताना जी काळजी घ्यायला हवी ती घेतली जात नाही. काही सोपी उदाहरणं घ्यायची झाली तर औषध घ्यायची आणि जेवायची वेळ यांचा जो ताळमेळ अपेक्षित असतो त्याकडे आपण बरेचदा दुर्लक्ष करतो. काही औषधं खाण्याच्या आधी किंवा रिकाम्या पोटी घेणं अपेक्षित असतं. कारण त्या औषधांत असे घटक असतात की त्यांचं अवशोषण रिकाम्या पोटीच चांगलं होतं. ते औषध अन्नाबरोबर घेतलं तर शरीरात नीट मिसळत नाही, त्याचा योग्य परिणाम दिसत नाही किंवा अनावश्यक साईड इफेक्टस दिसतात. तीच गोष्ट जेवणाबरोबर घ्यायच्या औषधांची. पोटात अन्न असेल तर अशा औषधांचं अवशोषण आणि परिणाम अधिक चांगला होतो. रिकाम्या पोटी अशी औषधं घेणं त्रासाचं ठरू शकतं. त्यामुळे या संदर्भातल्या सूचना पाळणं महत्त्वाचं असतं.

अजून एक उदाहरण म्हणजे वैद्यकीय सल्ल्याशिवाय आपल्याच मनानं पूर्ण गोळी घ्यायच्या ऐवजी ती तोडून घेणं. आता असं न करण्यामागे अनेक कारणं आहेत – जर ती गोळी नीट तुटली नाही, तिचा चुरा झाला किंवा छोटे तुकडे पडले; किंवा ती गोळी कॅप्सूल स्वरूपातली असेल आणि ती तोडल्यावर त्यातली पावडर अथवा जेल बाहेर सांडलं तर त्या औषधाचा चुकीचा किंवा अपुरा डोस आपल्या पोटात जाऊ शकतो. जर ती गोळी 'स्लो रिलीज' किंवा 'एक्सटेंडेड रिलीज' प्रकारातली असेल म्हणजे शरीरात गेल्यावर हळूहळू रक्तात मिसळण्यासाठी बनवली गेली असेल तर तसं व्हावं म्हणून अशा गोळ्या बनवताना त्यांच्यावर एक विशिष्ट आवरण (कोटिंग) चढवलेलं असतं. पण ती गोळी तोडून घेतली तर ती रक्तात कमी वेळात आणि जास्त प्रमाणात मिसळू शकते; आणि शरीराला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा गोळ्या कधीच तोडून घेऊ नयेत. अजून एक उदाहरण म्हणजे तोंडात ठेवून चघळायची औषधं गिळणं. गिळल्यावर औषध तोंडातल्या रक्तवाहिन्यांमधून थेट रक्तप्रवाहात मिसळण्याऐवजी पोट-आतडं-यकृत या मार्गानं मिसळणार. म्हणजे ते कमी प्रमाणात मिसळणार आणि त्याचा परिणाम दिसायला वेळही लागणार. प्रतिजैविकांचा (antibiotic) चुकीचा वापर हे अजून एक ठसठशीत उदाहरण. बऱ्याच लोकांना बरं वाटेनासं झाल की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिकं घ्यायची सवय असते. पण असं करण्यानं अनेक नको त्या गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे अँटिबायोटिकं फक्त बॅक्टेरियल इन्फेक्शन – जीवाणूंमुळे झालेले संसर्ग – बरी करतात. जर आपल्याला व्हायरल इन्फेक्शन – विषाणूजन्य संसर्ग – झालं असेल तर त्यावर अँटिबायोटिक घेणं फक्त निरुपयोगीच आहे असं नाही, तर उगाच शरीराला अँटिबायोटिकचे साईड इफेक्टस सहन करावे लागतात. यापलीकडे अँटिबायोटिकांमुळे विनाकारण शरीरातले चांगले जीवाणू मरतात. शरीरात शोषली न गेलेली अँटिबायोटिकांची मात्रा सांडपाण्यात जाते. सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे जीवाणू, जे सार्वजनिक आरोग्यासाठी हितकारक असतात, तेही मरतात. अजून एक नेहमी पाहायला मिळणारी गोष्ट म्हणजे अँटिबायोटिकांचा कोर्स सुरू होतो; थोड्या दिवसांत बरं वाटायला लागतं; आणि आपण तो कोर्स अर्धवट सोडून देतो. पण शरीरातलं सगळं इन्फेक्शन साफ होण्यासाठी कोर्स पूर्ण करणं आवश्यक असतं. नाहीतर अँटिबायोटिकांपासून वाचलेले ताकदवान जीवाणू नंतर डोकं वर काढू शकतात. म्हणजे ज्याला पूर्ण मारायचंय त्याला अर्धमेल्या अवस्थेत सोडून दिल्यासारखा हा प्रकार होतो. म्हणून अँटिबायोटिकांचा कोर्स पूर्ण करावा. अँटिबायोटिकांच्या गैरवापराचा (म्हणजे गरज नसते तेव्हा अतिवापराचा किंवा आवश्यक असतं तेव्हा कोर्स अर्धवट सोडून दिल्याचा) अजून एक परिणाम म्हणजे यातून जीवाणूंना त्यांची प्रतिकारशक्ती वाढवायची संधी मिळते आणि संसर्ग परिणामकारकरीत्या बरे करणं कठीण होऊन जातं. अशा गैरवापरांमुळे सगळ्या अँटिबायोटिकांना पुरून उरणारे 'सुपरबग' जन्माला यायचा धोका वाढतो. हे सुपरबग मानवी आरोग्यासाठी आणि आरोग्यव्यवस्थेसाठी अतिशय धोकादायक असतात. त्यामुळे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अँटिबायोटिकं घेऊ नयेत; एकदा ती घ्यायला सुरुवात केली की त्यांचा कोर्स पूर्ण करावाच.

म्हणून औषध घेताना ते कसं घ्यावं याबद्दलच्या सूचना समजावून घेणं आणि पाळणं आवश्यक असतं. अजून एक महत्त्वाचं म्हणजे याबद्दल प्रश्न असतील किंवा सल्ला हवा असेल तर तो डॉक्टर, फार्मसिस्ट किंवा एखाद्या ज्ञानी वैद्यकीय व्यावसायिकालाच विचारायचा. बाकी कुणाचंही ऐकायला जायचं नाही – मग ते व्हॉट्सॅपवर आलं असलं तरी, किंवा सल्ला देणारी व्यक्ती जगातल्या सर्वात शक्तिशाली राष्ट्राची अध्यक्ष असली तरी!