तू झकास, मी भकास!

आमच्या वर्गात सहस्र्बुद्धे नावाचा एक मुलगा होता. नेहमी काठावर पास व्हायचा. क्वचित काठाच्या अलिकडेही घसरायचा. पण परीक्षा झाल्यावर पेपर कसे होते असं विचारलं की, त्याच्याकडून ठरलेलं उत्तर हमखास यायचं, ‘‘झकास! पेपर सोपे गेले.’’

याउलट नित्सुरे नावाची मुलगी रूमालानं डोळे टिपत भकास चेह-यानं मुसमुसायची, ‘‘मी नक्की नापास होणार. पाच मार्कसुद्धा मिळणार नाहीत.’’ रिझल्ट लागला की कळायचं की पाचच्या आत तिचा नंबर आला आहे आणि सत्तर-ऐंशी टक्के मार्क पडले आहेत.

परवा शेजारच्या लोखंडेंच्या घरी गेलो होतो. नको त्या वयात त्यांच्या श्रीमतींचा पाय घसरला होता. केळ्याच्या सालीवरून. दोन महिने प्लास्टर अधिक बेड रेस्ट. श्रीयुत चार दिवसातच वैतागले होते. मुलांनीही धुसफूस सुरू केली होती. ते पाहून श्रीमती अधिकच कावल्या होत्या. पण त्यांना पाहायला आलेल्या एका भगिनीनं वेगळाच सूर लावला, ‘‘मज्जा आहे बाई तुमची आता दोन महिने.’’

‘‘मजा? यात कसली आलीय मजा?’’ लोखंडेवहिनींनी कण्हत विचारलं.

‘‘तुम्हाला आता निवांतपणे सगळ्या टीव्ही मालिका बघायला मिळणार! काही काम नाही की धाम नाही. काही लागलं तर ऑर्डर सोडायची. दिमतीला नवरा आहे, मुलं आहेत. वस्तू समोर हजर! नाहीतर आमचं मेलं नशीबच फुटकं. रांधा, वाढा, उष्टी काढा. बाजारहाट करा. घर लावा. अख्खा दिवस संपून जातो. इतके छान छान कार्यक्रम चालू आहेत टीव्हीवर. पण एकही धडपणे पाहायला मिळत नाही.’’ ऐकणारे अवाक झाले.

या अलौकिक प्रसंगी तिथं उपस्थित असलेले आमचे सख्खे शेजारी आणि स्थानिक विद्वान प्राध्यापक विश्वासराव माझ्या कानात कुजबुजले, ‘‘आय अ‍ॅम नॉट ओके!’’

‘‘का? काय झालं? खुर्ची टोचतेय का? माझी ठीक आहे. हवं तर तुम्ही बसा माझ्या जागी.’’ मी उठलो.

‘‘बसा हो. खुर्चीचं नाही म्हणत मी. ही बोलघेवडी बाई. यू आर ओके, आय अ‍ॅम नॉट ओके.’’

‘‘तिच्यामुळे तुम्ही का नाही ओके? ओळखता तुम्ही तिला? मी नाही ओळखत. मग मी ओके कसा?’’

‘‘आपलं नाही हो म्हणत आहे हो मी. तिचा टाइप सांगितला मी. ती ‘यू आर ओके, आय अ‍ॅम नॉट ओके’ या कॅटेगरीमधली आहे. ‘तू झकास, मी भकास’ हे यांचं जीवनसूत्र असतं. त्यांना स्वत:च्या तुलनेत इतरांचं मस्त चाललंय असं वाटत असतं.’’ विश्वासरावांनी कुजबुजत उलगडा केला.

‘‘गंमतच आहे. असं का बरं? आपण गॅलरीत जाऊन बोलूया का?’’ लोखंडेवहिनींची तक्रारखोर मैत्रीण आता नवरोबाच्या वारेमाप उधळपट्टीबद्दल तावातावानं बोलत होती. तिच्या स्टिरिओफोनिक तोफखान्यापुढे प्राध्यापकांचा आवाज निष्प्रभ होत होता.

आम्ही गॅलरीत गेल्यावर विश्वासरावांनी घसा खाकरून सविस्तर फोड केली, ‘‘प्रत्येक प्रौढ माणसात तीन व्यक्तिमत्त्वं दडलेली असतात. एक लहान मूल, एक पोक्त व्यक्ती आणि एक पालक. या बाईच्या गटातल्या मंडळींचं शैशवातून प्रगल्भत्वात संपूर्णपणे रूपांतर झालेलं नसतं. हे लोक सदैव उसासे टाकत असतात. त्यातल्या भगिनींच्या मते त्यांच्या मैत्रिणींना, शेजारणींना आणि बहिणींना त्यांच्यापेक्षा शतपटीनं उत्तम नवरे मिळालेले असतात आणि मुलं जबरदस्त अभ्यासू असतात. त्यातल्या पुरुषांच्या मते त्यांचे सहकारी नशीबवान असतात आणि मित्रांचे ग्रह कायम उच्चीचे असतात. यापैकी काहींना तर भिका-याचाही हेवा वाटतो. त्याला काम न करता पैसे मिळतात म्हणून. ही मंडळी तिकिटासाठी ज्या रांगेत उभी राहतात ती डाव्या-उजव्या रांगांपेक्षा खूपच हळूहळू पुढे सरकतेय असं त्यांना मनापासून वाटतं. समाजातल्या बहुसंख्य व्यक्ती अशाच असतात.’’

‘‘आणि बाकीचे लोक?’’

‘‘काहीजण यांच्या अगदी उलट म्हणजे ‘मी झकास, तू भकास’ या वर्गात मोडतात. ते स्वत:वर खुश असतात. त्यांचा आत्मविश्वास उत्तुंग असतो. पडले तरी तंगडं वर असतं. समोरचा बावळट असं सिद्ध केलं की या मंडळींच्या दिवसाचं सार्थक होतं. अरेच्चा! बोलत काय बसलोय? कॉलेजला जायचंय आज. उशीर झाला.’’ असं म्हणून विश्वासराव लगबगीनं निघून गेले.

त्यांनी सोडलेला कीडा माझ्या डोक्यात वळवळू लागला. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये शेअर मार्केटवर तावातावानं भाष्य करणारे लोक आठवले. प्रामुख्यानं गुर्जर बंधू. त्यांनी दोन महिन्यात मुद्दल तिप्पट केलेलं असतं. खरंखोटं अंबाजी जाणे! पण ऐकणारा माझ्यासारखा झंपू आ वासून मंत्रमुग्ध होतो. कारण झंपूनं घेतलेले शेअर घाटय़ात असतात. झंपू चेहरा टाकून उतरला की त्यांचा चेहरा विजयोन्मादानं फुलतो.

असाच वात आणतात त्या आपल्यासारख्या सभ्य पुरुषांच्या धर्मपत्न्या. आपला नवरा फक्त घोडचुकाच करतो हे बायकांना लग्नाच्या पहिल्या रात्रीच समजून चुकलेलं असतं. ते तसं नसलं तरीही. त्यामुळे नवऱ्यानं बाजारातून उत्तमातली उत्तम वांगी आणली तरी बायकोला त्यात कीड असल्याचा साक्षात्कार होतो! तीच वांगी वन-बाय-वन तपासून पाहिल्यावर शेजारणीला ती थेट अस्मानातून तोडून आणल्यासारखी स्वर्गीय वाटतात आणि फिश मार्केटमधून दैवी पापलेट आणलेल्या तिच्या नवऱ्याला ती ‘कोळणीपेक्षा मासे निरखून पाहत जा’ असं सुनावते.

रविवारी सकाळी मी मुद्दाम विश्वासरावांच्या घरी गेलो. त्यांना माझी निरीक्षणं ऐकवली. आवडत्या विद्यार्थिनीला पैकीच्या पैकी गुण द्यायला मिळाल्यासारखा चेहरा फुलवून ते म्हणाले, ‘‘बरोबर! शिवाय, या लोकांमध्ये एक बेरकी पोटवर्ग असतो. त्यांना समोरच्यापेक्षा आपलं उत्तम चाललंय हे माहीत असतं. पण तसं उघडपणे बोलून दाखवत नाहीत. कारण ते समजलं तर आपल्या वैभवाला त्यांची दृष्ट लागेल अशी धास्ती वाटते. यांनी बेडरूममध्ये एअरकंडिशनर बसवला तरी आलेल्या-गेलेल्याकडे ‘आमचं काही खरं नाही आता, सर्दी पाचवीलाच पूजलेली असणार आमच्या’ अशी ते मानभावीपणे कुरकुर करतात.’’

मी मनातल्या मनात म्हणालो, ‘‘आमची शाळाभगिनी कुमारी नित्सुरे कदाचित अशा लोकांपैकी असावी.’’

विश्वासराव पुढे म्हणाले, ‘‘हे लोक परवडले पण ‘मी भकास आणि तूही भकास’ हा वर्ग महाभयंकर असतो. हे पक्के निराशावादी! जगबुडी नक्की होणार आणि तीही लवकरच अशी यांची ठाम खात्री असते. आपण मात्र सदैव शोधात असावं ते ‘मी झकास आणि तूही झकास’ या अल्पसंख्याक गटातल्या प्रसन्नचित्त बंधूभगिनींच्या. अशी एक व्यक्ती जरी रविवारी सकाळी भेटली तरी अख्खा आठवडा सुगंधी बनून जातो.’’

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हाहा मस्त. चुरचुरीत, खमंग लेख. "आय अ‍ॅम ओके , यु आर ओके" हे पुस्तक पूर्वी चाळले आहे. लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समाजातल्या व्यक्तिंच्या वेगवेगळ्या मानसिकतेवर उत्तम भाष्य!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हाहा मस्त. चुरचुरीत, खमंग लेख.

असंच म्हणतो. भकास आणि झकास हे शब्द फिट्ट आहेत.

एरिक बर्नचं 'गेम्स पीपल प्ले' वाचून भयानक प्रभावित झालो होतो. अकरावी बारावीत जेव्हा आपल्याला मनुष्यस्वभावाविषयी कळतं असं वाटायला लागलेलं असतं तशा वयात तर मला हे पुस्तक वाचून कोलित मिळाल्यासारखंच वाटलं होतं. कोणी काही बोललं की त्याचा पेरेंट बोलतो आहे की चाइल्ड वगैरे ऍनलाइज करायचो. गंमत होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेल्फ हेल्पच्या भानगडीत फारसा पडत नसल्याने ते पुस्तक वाचलेले नाही. मात्र एकूण विचार आवडला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा हा...'भकास' वादी लोकांवरचा झकास लेख ! आवडेश.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परत वाचला. खूपच आवडला.

आपला नवरा फक्त घोडचुकाच करतो हे बायकांना लग्नाच्या पहिल्या रात्रीच समजून चुकलेलं असतं.

हाण्ण तेजायला ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाची प्रकाशन तारीख कळायला हवी /प्रकाशन तारखेप्रमाणे अनुक्रमणिका उघडता येण्याचा पर्याय येऊ शकेल का?
हे भकास-झकास लेख सदाहरितच असतात म्हणा.मस्तच.या पद्धतीचे विचार असणाय्रांत पुरूष /स्त्रिया किती प्रमाण विचारले तर मी सांगेन ९५-५ टक्के .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाशन तारखेमुळे काय होइल ते कळले नाही.
लेखाचा दर्जा हा लेखकाच्या प्रतिभेवरती अवलंबून असतो आणि एकदा लेखक कळला की त्या लेखकाचे सर्व धागे उघडता येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टिकलु जी हा लेख वाचला की नाही. हा देखील विनोदी स्किट सारखाच वाटतो मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0