"मॉलप्रॅक्टिसेस अँड द शो": थिएटर ऑफ द ग्रोटेस्क
"मॉलप्रॅक्टिसेस अँड द शो: थिएटर ऑफ द ग्रोटेस्क"
अलिकडे पुण्यामधे "द बॉक्स" ह्या "इंटिमेट" म्हणता येईल अशा थिएटरमधे "मॉलप्रॅक्टिसेस अँड द शो" ह्या नावाचं नाटक पहायला मिळालं. दिग्दर्शक : अतुल पेठे.

सुमारे तास-सव्वातास चालणार्या ह्या नाटकात एकच पात्र आहे. ते ऋजुता सोमण ह्यांनी केलेलं आहे. ऋजुता ह्या एक कथ्थक नर्तिका आहेत आणि रोहिणीताई भाटे ह्यांच्या त्या शिष्य असल्याचं मागाहून कळलं. नाटकामधे संवाद नाहीत. क्वचित काही शब्द आहेत. नाटकाचा अवकाश नृत्यमय आहे. परंतु नृत्य हा त्यातला महत्त्वाचा घटक असला तरी, नाटकाची प्रकृती एकपात्री नाटक अशी मला करावीशी वाटते.
जवळजवळ संवाद नसलेल्या, एकपात्री असलेल्या, नृत्याचा महत्त्वाचा, केंद्रीय वापर असलेल्या ह्या नाटकात संगीताचं - मग त्याला पार्श्वसंगीत म्हणा किंवा काही - स्थान अनन्यसाधारण असणं अपरिहार्य होतं. ते आहेच.
उमेश वारभुवन नावाचे तालवादक हा रोल अदा करतात आणि अतुल पेठे ह्या संगीतामधे महत्त्वाची साथ देतात. Cajón (उच्चारी कहोन) नावाचं वाद्य उमेश वाजवतात. एखाद्या बॉक्स प्रमाणे दिसणारं हे वाद्य. त्यावरच बसायचं आणि ताल धरायचा. नाटकभर वेगवेगळे ताल, त्या मुख्य तालाच्या अनुषंगाने येणारे पूरक, अर्थवाही नाद मुख्यवादकाच्या जोडीने निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम खुद्द पेठे करतात.
पूर्ण नाटकभर एकच पात्र. तिला संवाद जवळजवळ नाहीत. सुरवातीला रोजच्या जीवनातल्या साध्याशा वाटणार्या गोष्टींच्या वातावरणातून एक नर्तिका जेव्हा तिच्या स्वतःच्या नृत्याच्या स्पेसमधे जाते, तसतसं तिच्या कलेच्या आणि जीवनात येत गेलेल्या अनुभवांमधे हा सतत बदलत राहाणारा ताल अर्थवाही साथ करत राहातो.
नाटकाचा आशय : उत्तम दर्ज्याची कामगिरी करणार्या नर्तिकेला आलेला एक भयप्रद, थरकाप उडवणारा लैंगिक अनुभव, तिच्या वैयक्तिक प्रायव्हसीवर झालेलं अतिक्रमण, तिच्या वैयक्तिक डिग्निटीच्या उडलेल्या ठिकर्या, तिची निघालेली लक्तरं, toxic masculinity चा तिला आलेला अनुभव, त्यातून तिच्या शरीरामनावर झालेल्या जखमा. आणि मग, त्यातून होणार्या वेदना आणि मनावर झालेले खोलवरचे परिणाम हे सहन करण्यापलिकडे गेल्यावर, त्याच व्यक्तीने त्या भयप्रद घटनेला आणि त्यामागच्या न संपेलशा वाटणार्या काळरात्रीला एक मार्केटेबल प्रोडक्ट बनवून मार्केटमधे उभं करणं ह्यामागची भीषणता - असं नाटकाचं स्वरूप.
नाटकाची संकल्पना, त्याचं संगीत, दिग्दर्शन, आयोजन, संयोजन जे काही म्हणाल त्यात इतर लोक आहेतच पण हे नाटक ऋजुता सोमण ह्यांच्या परफॉर्मन्सचं आहे हे वेगळं सांगायला नको.
नृत्य लालित्यपूर्ण, सुकोमल, असतं, त्यातला सौंदर्यानुभव हा त्या कलेचे संकेत सांभाळून त्या संकेतांच्या अवकाशात आपण घेतो हा नित्याचा अनुभव.
नाटकामधे सुरवातीच्या भागामधे नृत्याचा वापर हा असा, लालित्यपूर्ण, सुखद, कन्व्हेन्शनल इस्थेटिक्सच्या अवकाशामधे होतो. मात्र जेव्हा नृत्य करणारं जे इन्स्ट्रुमेंट आहे - ती नर्तिका - त्या इन्स्ट्रुमेंटच्या तारा जेव्हा छिन्नभिन्न होतात तेव्हा त्यातून निर्माण होणारं नृत्यही त्या बीभत्सरसामधे नाहून येतं.
उत्तम दर्ज्याच्या कलाकृतींचं वर्णन करताना "इमर्सिव्ह एक्स्पीरियन्स" असा शब्दप्रयोग बर्याचदा केला जातो. हिंदुस्तानी संगीतात उस्ताद अमीर खान ह्यांचं गाणं इमर्सिव्ह मानतात. ४५ मिनिटं ते खयाल गाणं गातात तेव्हा ऐकणारे त्यात डुंबून गेलेले असतात. गायकाप्रमाणे श्रोत्याचीही तंद्री लागेल असं काहीतरी. "मॉलप्रॅक्टिसेस" असाच इमर्सिव्ह एक्स्पीरियन्स आहे. मात्र ज्या रसामधे आपल्याला डुंबायचं तो रस नाही कसलं तरी अक्राळविक्राळ रसायन आहे. एरवी लालित्य आणि सौंदर्याचं दर्शन घडवणारी ही कला आपल्याला क्रौर्याची काळरात्र दाखवते.

आयनेस्को, पिरांदेलो, सार्त्र वगैरे लोकांनी ६०च्या दशकामधे वापरलेलं "थिएटर ऑफ द अॅबसर्ड" मराठी प्रेक्षकांना ठाऊक आहे. जीवन हे "असंगत" आहे. जीवनाची संगती लागत नाही. जीवनाचं थंड, भावनाविरहित, कंटाळवाणं स्वरूप मांडताना त्यातला काळा विनोद ६०च्या दशकामधल्या ह्या प्रकारच्या नाटकांमधे येतो.
"मॉलप्रॅक्टिसेस" ह्या नाटकाला मला "थिएटर ऑफ द ग्रोटेस्क" ह्या कॅटेगरीमधे नोंदवावं वाटतं. "थिएटर ऑफ द अॅबसर्ड" म्हणजे असंगतता असेल तर "ग्रोटेस्क" म्हणजे विकृती, बीभत्सता, पराकोटीची भयप्रदता असं म्हणता येईल.
ऑलिंपिकमधे सुवर्णपदक मिळालेल्या अमेरिकेच्या जिमनॅस्ट मुलींना काही वर्ष त्यांच्या ट्रेनिंग टीममधल्या लॅरी नासर नावाच्या डॉक्टरच्या हातून लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागलं. एक दोन नाही तर तब्बल वीसेक वर्षं हे शोषण चालू होतं. कितीतरी मुली - त्यातल्या अनेक ऑलिंपिक मेडलविजेत्या - त्यातून गेल्या. जेव्हा ही केस प्रकाशात आली तेव्हा वाचणार्याची पहिली प्रतिक्रिया "मला ओकारी येतेय" अशी होती.
जर का वाचणार्याला असा आतडी पिळवटून बाहेर येतील असा अनुभव येत असेल तर जी व्यक्ती अशा भीषण अनुभवातून जाते त्या अनुभवाचं स्वरूप बीभत्स असणार. आणि जेव्हा अशी व्यक्तिरेखा आपल्या ह्या अनुभवाला मार्केटेबल प्रोडक्ट म्हणून विकताना दाखवलं जातं तेव्हा ते पाहाणार्याला "केवळ एक व्यक्ती म्हणूनच नाही तर ही सगळी नवभांडवलाधारित व्यवस्था, ह्या शतकाच्या ह्या ठिकाणी येऊन पोचलेली मानवी संस्कृतीच अशी पराकोटीची विकृत आहे" हा अनुभव घ्यावा लागतो.

अतुल पेठे आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून ही संकल्पना उभी केली. त्यात जे मांडायचं ते थीम, आणि त्याचं संगीतनृत्यप्रकाशध्वनियोजना इत्यादिसहितचं सादरीकरण हे एकजीव झालेले घटक आहेत. त्या सर्वांचं अभिनंदन.
ऋजुता सोमण ह्यांच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत. एखाद्या माणसाच्या कामगिरीचं आपल्याला कौतुक वाटतं. एखाद्याची कामगिरी अचाट, अफाट वाटते. उत्तुंग वाटते. एखाद्याची पुन्हापुन्हा मोहवणारी, मंत्रवलेली वाटते. सोमणांची ह्यातली कामगिरी भयप्रद आहे. एखाद्या सतारीमधे अतितार सप्तकामधले सूर अतिदीर्घकाळ वाजवल्यावर - ते कितीही सौंदर्ययुक्त, कलेच्या सर्वात वरच्या टोकावरचे असले तरी आता तारा तुटतील का, अशी भीती वाटते तसे होतात. तेच इथे झालेलं आहे.
ह्या नाटकाचे प्रयोग ह्या टीमने थांबवणं, ते पुण्यापलिकडे न करणं वगैरे गोष्टी मला समजलेल्या नाहीत. त्या मला पटत नाहीत. पण ते विषय कलाबाह्य आणि माझा कसलाही अधिकार नसलेले आहेत. त्याबद्दल मी बोलत नाही.
नाटक परिणामकारक झालेलं आहे. ज्या उद्देशाने ते करायला घेतलं असावं तो उद्देश सफल झालेला आहे असं मला वाटतं.
(छायाचित्रे : पेठे ह्यांच्या टाईमलाईनवरून घेतली आहेत)