notices
अपग्रेडच्या छोट्या कामासाठी ऐसी अक्षरे भावेप्र सोमवारी (१६ फेब्रुवारी) पहाटे ३:०० ते ४:०० या वेळात बंद असेल. तसदीबद्दल क्षमस्व.
द एग्झॅमिन्ड लाईफ -स्टीव्हन ग्रोज
साइनफेल्ड नावाची माझी एक अत्यंत आवडती मालिका आहे. त्यातल्या एका भागात एक पात्र त्याच्या डेटिंग आयुष्यातल्या एका पेचप्रसंगावर त्याच्या मित्र मैत्रिणींकडे सल्ला मागत असतं. त्याला सल्ला देत असताना त्याच्या विचित्र आणि उलटसुलट विधानांमुळे शेवटी त्याची मैत्रीण वैतागून त्याला म्हणते:
“आय डोन्ट नो व्हॉट युअर पेरेंट्स डिड टू यू!”
आपण जसे वागतो तसे का वागतो याचं श्रेय किंवा खापर आई वडिलांवर फोडता येण्याची सोय फ्रॉइडनं करून ठेवली आहे. अशाच एका फ्रॉइडच्या अनुयायाचं - स्टीव्हन ग्रोजचं - द एग्झॅमिन्ड लाईफ हे पुस्तक वाचनात आलं. ऑक्सफर्ड आणि बर्कले अशा विद्यापीठांतून शिक्षण घेतल्यानंतर ग्रोजनं मानसोपचारतज्ञ म्हणून काम सुरु केलं. त्याच्या हजारो तासांच्या समुपदेशनातून त्यानं काही वेचक उदाहरणं निवडून हे पुस्तक लिहिलं आहे. त्याच्या रुग्णांची ओळख पटणार नाही याची काळजी घेऊन आणि अतिशय मोजक्या, पण प्रभावी शब्दांत त्यानं त्यांच्या मनातले गुंते कसे आणि कुठून आले होते हे दाखवून दिलेलं आहे. या लेखनाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, ग्रोजनं अनेक ठिकाणी आपणच गोंधळलो, किंवा आपल्याला रुग्णाची चीड येऊ लागली, किंवा आपल्याला कंटाळा आला अशी प्रांजळ कबुली दिली आहे. पण तशी देताना कुठेही रुग्णाबद्दल असलेली त्याची सहभावना ढळत नाही.
एका छोट्या, सहा वर्षांच्या मुलाच्या अंगावर त्याच्या शाळेतल्या बाईंना मारल्याच्या खुणा दिसू लागल्या. त्याच्या आईला विचारता तिनं सरळ कबूल केलं की तीच त्याला कधी पट्ट्याने किंवा हातानेच मारत होती कारण तो काही केल्या ऐकायचा नाही. वर्गमित्रांना जेव्हा तो खुनाच्या धमक्या देऊ लागला तेव्हा त्याला शाळेतून काढून टाकून सुधारगृहात पाठवण्यात आलं. तिथे त्याला भेटायला स्टीव्हन जाऊ लागला. अनेक दिवस त्याच्यावर न रागावता त्याच्या धमक्या, त्याची चिडचिड, त्याचे अपशब्द स्टीव्हननं ऐकून घेतले. नंतर तो मुलगा रोज त्याच्या तोंडावर थुंकायला लागला - तेव्हा मात्र स्टिव्हनला राग येऊ लागला. असेही बरेच दिवस गेल्यानंतर त्या मुलानं एक दिवस कबुली दिली. “मला राग येतो कारण माझ्या बहिणी, माझे वर्गमित्र यांच्यापेक्षा मी डोक्यानं कमी आहे.”
त्या काळी स्पेक्ट्रमवर असलेल्या मुलांबद्दल आज झालं आहे तितकं संशोधन झालं नव्हतं. पण छोट्या मुलानं आपणच आपलं निदान करून ते मानसोपचार तज्ज्ञाला सांगावं हे वाचूनही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.
सामान्य भारतीय माणसाला मानसोपचारांबद्दल काय वाटतं मला माहिती नाही. पण मला स्वतःला वेळोवेळी माझ्या काहीश्या अवास्तव चिंतेसाठी (anxiety) म्हणून उपचार घ्यावे लागले आहेत. या प्रक्रियेतून जाताना प्रत्येक वेळी माझ्या हाताला काहीतरी नवीन लागलं आहे. त्यामुळे येऊन-जाऊन असणारी पेशंट या दृष्टिकोनातून हे पुस्तक मला फार आवडलं. जेव्हा आपण इतरांच्या गोष्टी वाचतो-ऐकतो, तेव्हा आपलं मन, त्यातून स्वतःसाठी काही उपाय सापडतो आहे का हे बघत असतं. लहानपणी मला रीडर्स डायजेस्ट वगैरे मासिकांतून येणारी वाहिनीचा सल्ला छाप सदरं वाचायला फार आवडायची. पण मानसोपचार (काउन्सेलिंग/सायकियाट्री) म्हणजे आपल्या अडचणींवर तू अमुक अमुक कर असा सल्ला मिळण्याचं ठिकाण नाही. ती त्यापेक्षा बऱ्याच सूक्ष्म पातळीवर काम करणारी प्रक्रिया आहे. एखाद्या माणसाच्या जगण्यातला एखादा गुंत्यात अडकलेला मूळ प्रश्न असतो. बहुतेकदा मानसोपचारतज्ज्ञं आधी तो शोधून काढतात आणि नंतर त्याचं उत्तर आपल्याकडूनच मिळवायचा प्रयत्न करतात.
याबद्दल मनात भीती, लाज अशा भावना नसतील आणि अशा उपचारांकडे सकारात्मकतेने बघण्याची सवय असेल तर हा स्वतःचा शोध फार काही शिकवणारा असतो. ग्रोजच्या विवेचनातून अनेकदा असं दिसतं की रुग्णाला आणि मानसोपचारतज्ज्ञाला, दोघांनाही एखादा प्रश्न सुटल्याचा किंवा सोडवल्याचा तितकाच आनंद होत असतो. आधी दिलेल्या उदाहरणातील लहान मुलगा मोठा झाल्यावरही ग्रोजला नियमित फोन करायचा. असे अनेक रुग्ण, उपचार संपल्यावरही ग्रोजची आठवण ठेवतात आणि त्याला आवर्जून फोन करतात हे तो अनेक ठिकाणी नमूद करतो.
पुस्तकातल्या काही प्रकरणांमध्ये रुग्णांच्या स्वप्नांचं विश्लेषणही आहे. मला व्यक्तिशः हे अजूनही पूर्णपणे पटवून घेता येत नाही. आपली स्वप्नं आपली मनःस्थिती दर्शवतात इतपत मला मान्य करता येतं. आपण चिंतेत असतो तेव्हा पडणाऱ्या स्वप्नांचा पोत वेगळा असतो. पण त्यांमध्ये दिवसभर घडलेल्या अनेक दैनंदिन गोष्टींचीही भेसळ असते. या पुस्तकाच्या निमित्तानं लक्षात आलं की सकाळी उठल्या उठल्या आपल्याला काय स्वप्न पडलं ही विश्लेषण म्हणून कशीही असली तरी फार गमतीची गोष्ट आहे. कुटुंबातील व्यक्तींना आपलं स्वप्न सांगणं, आणि त्यांचीही स्वप्नं ऐकणं अशी दिवसाची दिवसाची सूरूवात करायला मला आवडते. स्वप्नांचं विश्लेषण करताना नेमके निकष कसे ठरवले जातात, आणि हे किती व्यक्तिसापेक्ष आहे हे लक्षात आल्यावर जिथे काहीच अर्थ नाही तिथे काहीतरी अर्थ शोधला जाईल का अशी एक शंका येते. पण आपल्याला पडलेलं स्वप्न दुसऱ्याला सांगणं हे त्या व्यक्तीवर एक तर प्रेम किंवा विश्वास असण्याचं लक्षण आहे किंवा मग एक फारच मोठी जोखीम आहे. ते काहीही असलं तरी, आज माझ्या स्वप्नात वाघ आला होता आणि मी शाळेला जात असताना माझा वाघ पंक्चर झाला, या स्वप्नाचा कोण काय अर्थ लावणार?
या लेखनात पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत शांतपणे आपल्याबरोबर चालणारी अशी लेखकाची अथांग सहभावना आहे. ही प्रकरणं वाचताना लक्षात येऊ लागतं की मानसोपचारतज्ज्ञ खरंतर एक संपूर्णपणे अनोळखी व्यक्ती असते. तरीही काही काळाने रुग्णाचा आणि मानसोपचारतज्ज्ञाचा एक कोश निर्माण होतो. जिथे आपल्या खऱ्या भावना चूक-बरोबर अशा परिघापलीकडे व्यक्त करता येतात. समोरची व्यक्ती ना आपल्याला काय करायचं त्याबद्दल कार्यपद्धती आखून देणार आहे, ना त्यावर सतत टिप्पणी करणार आहे. असा श्रोता सगळ्यांना हवा असतो. फक्त कधीकधी आपण चुकीच्या जागी असे श्रोते शोधत असतो. एका रुग्णाची गोष्ट फारच रोचक आहे. साधारण १९८९ साली त्याला आपल्याला एचआयव्हीची लागण झालेली असू शकते, अशी शंका आली म्हणून तो ग्रोजकडे आला. चाचणी करून घेण्याचीच त्याला प्रचंड भीती वाटत होती. ग्रोजच्या समुपदेशनामुळे त्यानं ती करून घेतली आणि त्याला लागण झाली आहे हे सिद्ध झालं. त्या काळात एचआयव्ही म्हणजे एड्स आणि मृत्यू हे समीकरण पक्कं होतं कारण त्यावर काहीच औषध नव्हतं. आपण आता नक्कीच मरणार हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा तो रोज ग्रोजकडे येऊन दिलेली ५५ मिनिटं शांत झोपू लागला. आपल्याकडे समुपदेशनाला येणारा रुग्ण आपल्याशी काहीही न बोलता झोपी जातो आहे हे ग्रोजला सुरुवातीला काहीसं आश्चर्यकारक वाटलं. पण ग्रोजच्याच शब्दतात, शांततेच्यादेखील अनेक छटा असतात. काही रुग्ण शांत असतात तेव्हा त्यांच्यात आणि आपल्यात एक ताण असतो जो आपल्याला त्यांना बोलतं करण्यासाठी उद्युक्त करतो. असा कोणताही ताण या रुग्णात आणि ग्रोजमध्ये नव्हता. मग तो ५५ मिनिटं झोपी गेल्यावर ग्रोज त्याच्याकडे तो झोपलेला असताना लक्ष ठेवायचा. त्यालाही जणू आपण मरत असताना आपल्याला कुणाचीतरी सोबत असावी असंच सुचवायचं होतं. ही केस ग्रोजनं अमेरिकेत एका परिषदेत सादर केली तेव्हा तिथले काही मानसोपचारतज्ज्ञं त्याला म्हणाले की मरणाऱ्या माणसावर इतका वेळ वाया घालवण्यापेक्षा त्यानं जे जगणार आहेत त्यांच्याकडे त्याचं लक्ष केंद्रित करावं. यावर जिथे शक्य आहे तिथे जगणं आणि जिथे गरज आहे तिथे मरणही सुसह्य करणं हेच माझं काम आहे याची पुनःप्रचिती आल्याची कबुली ग्रोज देतो. नंतर या रुग्णाच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. ती वाचून ग्रोजचे विचार किती योग्य होते हे लक्षात येतं.
आपण ज्याचं पुस्तक वाचतो आहे त्याच्याबद्दल आंतरजालावर काही अजून माहिती/मुलाखती आहेत का हे शोधायला गेले तेव्हा ग्रोज आणि झिझेक यांचा एक संवाद सापडला. ज्यामध्ये (अर्थातच) झिझेक संवादाची सर्व जागा व्यापून टाकून त्या चर्चेचं एका महान दंग्यात रूपांतर करताना दिसतो. यामध्ये इतके अवांतर, विनोद, फाटे आणि विश्लेषण आहे की ग्रोजला बोलायची संधीदेखील मिळालेली नाही. तरीही ग्रोज ज्या संयमानं तिथे बसून राहतो आहे त्यावरून तो नक्कीच चांगला मानसोपचारतज्ज्ञ असेल असं वाटतं.
एका रुग्णाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर मला समुपदेशन आणि 'औषधं घेणे' या दोन्हींचा अनुभव आहे. पैकी समुपदेशन हे मला मला ज्या गोष्टी शांत असताना आपोआप सुचतात त्याच दुसऱ्याकडून एका विशिष्ट करणीमीमांसेसहीत ऐकून घ्यायच्या असं वाटतं. यामध्ये अनेक गोष्टी येतात. बऱ्याचदा आपला स्वतःशी असलेला संवादच इतका कठोर असतो की जर समुपदेशकानं, "हे तू तुझ्या जवळच्या मैत्रिणीला म्हणशील का?" असा प्रश्न केला की चटकन "अजिबात नाही" असं उत्तर येतं. इतरही अनेक पद्धतींनी या गोष्टी तज्ज्ञांच्या मध्यस्थीने मनात बिंबवून घेता येतात. पण जेव्हा एखादी व्यक्ती चिंतेने, दुःखाने संपूर्णपणे व्यापून गेलेली असते तेव्हा "चिंता करू नकोस", किंवा "आनंदी हो!" असं सांगून काहीही उपयोग नसतो. लोक हताश होऊन म्हणतात, "स्वभावाला औषध नसतं!"
पण स्वभावाला औषध असतं आणि ते घेतल्यानं बरंही वाटतं. आपल्याला औषधाची किंवा एखाद्या त्रयस्थ श्रोत्याची गरज आहे हे मात्र आपलं आपल्यालाच समजून घ्यावं लागतं. तितका प्रामाणिकपणा नसेल तर बरंही वाटणार नाही.
हे पुस्तक मी अगदी 'कव्हर टु कव्हर' दोन-तीन दिवसांतच वाचून काढलं. कारण ते वाचणंदेखील इतकं शांत करणारं होतं की पुन्हा पुन्हा त्याकडे जावंसं वाटायचं. सॉक्रेटिसच्या 'अन-एग्झॅमिन्ड लाईफ' वरून प्रेरित असलेल्या शीर्षकाला हे पुस्तक पूर्णपणे न्याय देतं. कारण जे लोक मानसोपचारतज्ज्ञांच्या दवाखान्याची पायरी चढतात ते आधीच सॉक्रेटिसच्या या मार्गावर चाललेले असतात. आणि आपण मात्र त्यांच्याबद्दल, 'मानाने कमकुवत', काहीतरी 'प्रॉब्लेम' असणारे अशी खुसफूस करत असतो. पण ग्रोजची उदाहरणं वाचून स्वतःच्या मनाकडे लक्ष देणे हा कधीकधी आयुष्य बदलून टाकणारा अनुभव असतो हे लक्षात येतं.