Skip to main content

नार्सिसिस्ट

नार्सिसिस्ट
=======

-राजीव उपाध्ये

आम्ही तुझ्याशी विकृत वागलो,
हो, वागलो.
कोण म्हणतो
हा अपराध आहे?
हा शब्द आमच्या
शब्दकोशात नाही.

आम्ही जे करतो
तो आमचा स्वभावधर्म
आणि आमच्या
स्वभावाला प्रश्न विचारणं
हा तुझा उद्दामपणा.

विंचू डंख करतो
त्याच्या शेपटीतच लिहिलंय विष,
मग त्याला दोष द्यायचा?
त्याला समजावायचं?

नाही, तूच शिकायला हवं होतंस
डंख सहन करायला,
अंगात भिनत जाणार्‍या विषाला
शांतपणे पचवायला.

कारण इथे
वेदना ही तुझीच मालमत्ता आहे,
आणि आम्ही
फक्त तिचे निमित्त.

तू तुटलास?
छान!
तू ओरडलास?
अजून छान!!
आमची करमणूक केलीस...

तुझ्यात अमर्याद सहनशक्ती नाही
हीच तुझी चूक,
हीच तुझी समस्या.

तू जखमी आहेस?
मग उपचाराची गरज
तुला आहे.
तुझ्या जखमांवर,
तुझ्या आवाजावर,
तुझ्या बंडावर.
कारण या जगात
दोषी तोच असतो
जिवंत राहूनही
मूक राहू शकत नाही.

आम्ही?
आम्ही असेच राहणार
विषारी, कोडगे
आणि निर्दोष.