एल एल एम
मी आणि प्रकाश त्याला आम्ही पक्या म्हणतो जिवा भावाचे मैतर. माणसाचे सावलीशी जे नाते तेच आमचे पण, कधी तो सावली तर कधी मी सावली.
पक्या म्हणजे आडमाप माणूस, आम्ही दोघेही कसेबसे. कसेबसे जगणारे, आमचे सगळे कसेबसे. कशीबशी परीक्षा पास करणारे. कशीबशी पदवी मिळवली. नोकरी धरसोड करत अखेर एका ठिकाणी बूड स्थिरावले.
पण तरीही पक्या आडमाप. धावती ट्रेन पकडायची, धावत्या ट्रेन मधून उतरायचे. हात सोडून सायकल चालवायची स्लो सायकलिंग ची रेस! जिकायची. पक्याने सतत आठ दिवस सायकल चालवायचा विक्रम केला होता. मग आम्ही त्याचा सत्कार केला होता, हा त्याचा विक्रम गिनीच्या पुस्तकात लिहिला गेला. तो आता इजिप्तच्या कोणातरी तरुणाने मोडला होता.
एकदा आम्ही मॉलच्या समोरच्या पब्लिक बाकावर उन खात बसलो असताना,
“प्रभ्या, तुझा विश्वास बसणार नाही, म्हणशील हा लागला फेकायला, मी आज त्या कोपऱ्या वरच्या चिंचेच्या झाडावर...”
“भूत आहे ना? माहित आहे. त्यात नवीन काही नाही. दुसरे काहीतरी सांग.”
“बघ तू ऐकून पण घेत नाहीस,”
“सॉरी, पक्या सांग , काय सांगायचे आहे ते बिंधास सांग.”
“ऐक आणि मला मधेच टोकू नकोस. आज दुपारी मी त्या चिंचेच्या झाडाच्या बुंध्यावर लाल रंगाची पेटी बघितली. त्यावर लिहिले होते ५,४५ pm. pm म्हणजे संध्याकाळी ना?”
“pmचा अजून एक अर्थ आहे. पण ५,४५ pm म्हणजे संध्याकाळचे पावणे सहा.”
“ओके. मी त्या पेटीचा फोटो घेतला आणि गुगल सर्ध मारला. पूर्वीच्या काळी म्हणे लोक एकमेकांना लेटर लिहित असत आणि तसल्या पेटीत टाकत. मग ती पत्रे आपोआप ज्याला लिहिले असेल त्याला म्हणे मिळत असे. प्रभ्या , मी काय म्हनातो उद्या आपण त्या पेटीवर नजर लावून बसू, बघू काय होते पावणे सहा वाजता”
"आणि उद्या आपण ताजा पेपर त्या पेटीत टाकू आणि बघू काय होते ते.”
दुसऱ्या दिवशी पक्या आणि मी पत्राच्या पेटीसमोरच्या रस्त्याच्या दुसऱ्या साईडला बेंच वर बसलो. पावणे सहा वाजायला आले होते. बरोबर पावणे सहा वाजता खाकी ड्रेस केलेला एक जण सायकलवरून आला, वातावरण रहस्यमय झाले होते, आता हा काय करतो ह्याकडे आमचे ल्क्ष! त्याने किल्ल्यांचा जुडगा काढला. आणि एक किल्ली लावून पेटीचे दार उगडले.
“पक्या, हा तर चोर साहे.”
“थांब, हा त्यांचाच माणूस आहे. प्रभ्या, इतकी घाई कामाची नाही,”
जेव्हा त्याच्या हातात आम्ही पेटीत टाकलेले सकाळचे वर्तमानपत्र आले त्याच्या कपाळावर सुक्ष्म आठी उमटली. घडी करून तो पेपर त्याने कोटाच्या आतल्या खिशात ठेवला. बाकी लेटर खाकी पोत्यात टाकून पोत्याचा गळा आवळला, सायकलवर टांग मारून चालता झाला.
चिंचेच्या झाडामागे खोपटवजा लाल रंगाचे ऑफिस होते.
“पक्या, कालपर्यंत ही पेटीही नव्हती, हे ऑफिस नव्हते. त्या खोपटात काही रहस्य दडले असेल. चल आपण तिथेच जाऊन बघू.”
खोपटात एका टेबलाच्या मागे दयाळू मायाळू माणूस बसला होता. समोरच्या बाजूला एक तरुणी अगाथा ख्रिस्ती वाचण्यात मग्न होती. तरुणीने साडी नेसली होती, केसात फुले माळली होती.
“हेलो मॅडम, बाहेर हवा किती छान पडली आहे नाही?” आम्ही ब्रिटीश सुरवात केली.
“तुम्हाला काय हवा आहे?” तरुणीने आमची हवाच काढून टाकली.
“एव्हढेच कि ती बाहेर जी लाल पेटी लावली आहे ती तुम्हीच लावली आहे का?”
“हो, तुम्हाला काही ऑबजेक्शन?”
“नाही नाही, आम्हाला फक्त हे कसे होते ते समजून घ्यायचे होते.”
“ते शाळेत शिकवले नाहीये का? काय तरी बाई एकेक. हे पहा हे पोस्ट कार्ड माझ्याकडून विकत घ्यायचे. इकसे ज्याला पाठवायचे त्याचे नाव, पत्ता, गावं राज्य, देश असे लिहायचे, क्या बाजूला मजकूर लिहायचा, वर श्री किंवा गणेश प्रसन्न असे लिहायचे. इकडे तारीख लिहायची. मग बाहेरच्या लाल पेटीत टाकायचे.”
“कुठला प्रोटोकोल म्हणायचा? नाव गाव राज्य देश कंट्री चा मग आपोआप आय पी होतो काय?”
“?” ती. “ते मला माहित नाही. आम्ही अडवान्स्ड एल् एल् एम् वापरतो. जुन्या एल् एल् एम् मध्ये पुढचा फक्त एकच शब्द गेस केला जात होता. आता तसं नाही, आता एक शब्द लिहिला कि पुढचा सारा मजकूर एल् एल् एम् ला समजतो. जणू एल् एल् एम् आपल्या मनात शिरून आपल्या मनात जे विचार आहेत ते कागदावर उतरवते. आता खरं तर तुम्हाला पत्ताही लिहायची गरज नाही. एल् एल् एम् ला सगळं समजते.”
आम्ही भारावून गेलो होतो.
“मानवी इतिहासत अनेक युगं होऊन गेली. अश्म युग लोखंड युग ताम्र युग ... सध्या आपण अर्ली यंत्र युगात आहोत.”
“ओके समजलं. मला एक दहा पोस्ट कार्ड द्या,”
तिने पोस्ट कार्ड दिली आणि म्हणाली, “लेट द मशीन बी विथ यू.”
“अँड विथ यू टू.” पक्या उद्गारला.
पक्याला काय समजले? नंतर विचारतो. आम्ही पोस्टाच्या खोपटातून बाहेर पडलो.
“काय समजले रे तुला? तिच्या समोर खूप होशियारी करत होतास.”
“प्रभ्या आयुष्यात सुखी होण्यासाठी प्रत्येक गोष्ट समजायला पाहिजे असं थोडच आहे?”
ह्यावर मी काय बोलणार?
आम्ही तडक निधालो आणि जवळच्या हॉटेलात जाऊन चहा ऑर्डर केला, पक्याला पत्र लिहायची घाई झाली होती..
“कुणाला प्रेमपत्र लिहितोस कि काय?” मी थोडे कुत्सितपणे विचारलं.
‘बॉसला, हा पोस्टकार्ड प्रकार भारी आहे. जो पर्यंत आपण आपले नाव लिहित नाही तो पर्यंत पोस्टकार्ड कुठून आले, कुणी लिहिले ते समजणार नाही, इ मेल चे तसे नाहीये.”
पक्याने लिहायला बॉलपेन उघडले. पण त्या आधीच पोस्ट कार्ड वर मजकूर दिसायला लागला
“अरे बापरे, हे काय. ह्या तर मराठीतील प आणि भ वर्गातील शेलक्या शिव्या. माझ्या सुप्त मनात असेलही तसे पण पत्रात असे लिहायचं.आणि वर कडी म्हणजे खाली माझे नाव. आपला नम्र प्रकाश जोंधळे! हे पत्र त्याने वाचले तर उद्या मला सोलून भाजून खाईल.”
“ठीकाय. तुम्ही बरोबर प्रॉम्प्ट दिला नव्हता.” कित्येक दशलक्ष किलोमीटर वरून जेथे मशीन रहात असणार तिथून क्षीण आवाजात उत्तर आले.
आधीचा मजकूर पुसून गेला होता आणि नवीन मजकूर दिसायला लागला होता.
“हे चालेल.” पक्या म्हणाला. आता त्या पत्रात आई जसे मुलाला झापते तसे मार्दव होते. खाली लिहिले होते आपला हितैषी.एकुणात ते पत्र म्हणजे बॉसने हाता खालच्यांशी कसे वागावे ह्याचे १०१ प्रायमर होते.
पत्ता अगदी बरोबर लिहिला होता.
“Mr गजानन देशपडे.
मॅनेजर,
आत बाहेर खाते.
हाकानाका ट्रेडिंग कॉर्पोरेशन.
पीएमसी बिझिनेस हब,...”
दुसऱ्या दिवशी काय झाले ते पक्याच्या शब्दात.
“मी दुसऱ्या दिवशी ऑफिसात गेलो तो टेन्शन मधेच! म्हटलो कुठून दुर्बुद्धी झाली आणि ह्या लफड्यात अडकलो. एक आशा होती. ती अशी कि असे कार्डबोर्डचे तुकडे कोण कुरिअर पोचवतो का. कधी ऐकले नव्हते आणि पाहिले नव्हते. हा सगळा भास असणार! प्यूनने नेहमी सारखा चहा आणून टेबलावर आदळला. ठेवला असे कसे म्हणू मी. आदळलाच.. म्हणाला.
“देशपांडे साहेबाने बुलीवले आहे.”
“चहा प्यावा कि नाही हाच एक प्रश्न!”
“शेवटचा चहा. पिऊन घ्या.”
चहा तसाच ठेऊन मी साहेबाच्या केबिन मध्ये गेलो.
“या प्रकाशराव, बसा. “
मी आजूबाजूला बघितले. मी आणि साहेब ह्यांच्या शिवाय केबिन मध्ये दुसरे कोणी नव्हते, मग हा प्रकाशराव कोण?
“चहा घेणार? ह्यांच्यासाठी चहा घेऊन ये रे.”
मी कशाला कशाला असे म्हणायच्या अगुदर प्यून आला आणि म्हणाला ह्यांचा चहा झाला आहे.
“प्रकाशराव. मला एक सांगा मी तुम्हाला किंवा फॉर दॅट म्याटर इथे कुणालाही कधी फायरिंग दिले आहे?”
“सर, नाही, कधीच नाही सर.” मी साहेबाशी बोलताना वाक्याच्या सुरवातीला आणि शेवटी सर अशी उपाधी लावतो. असतात एकेकाचे संस्कार.
“नाही असे नाही, नीट आठवण करा. मी दोन वर्षांपूर्वी अठरा जुलाई ला तुम्हाला यू ब्लडी फूल असे म्हणालो होतो. मला पक्के आठवते आहे. मला त्याबद्दल तुमची क्षमा मागायची आहे.”
“सर, अठरा जुलाई नाही सर, एकवीस जुलाई. मंगळवार होता त्या दिवशी. रिमझिम पाउस पडत होता. मी तुमच्या मेहुणीला...”
“ओके ओके. तर तुम्ही मला क्षमा कराल ना?”
“मी त्याच दिबशी तुम्हाला क्षमा केली होती.”
“तर मग मी इतका मनमिळावू बॉस असताना कुणीतरी अनामिक मला मेल लिहून हाता खालच्या लोकांशी कसे वागावे ह्याचे प्रवचन देतो म्हणजे काय?”
म्हणजे त्या कार्डाची इ मेल झाली होती तर.
“सर, तर, काय.”
“प्रकाशराव, थँक यू. तुम्ही आता जा, आणि चंद्रकांतरावना आत पाठवून द्या.
म्हणजे आता चंद्याचा नंबर!”
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा जेव्हा हॉटेलमध्ये बसलो तेव्हा पक्याने हे सगळे मला सांगितले.
“प्रभ्या, तुला सांगतो ह्या पत्राचा वाचणाऱ्याच्या मनावर काहीतरी सूदिंग इफेक्ट होत असावा. कालपासून माझा बॉस महात्मा झाला आहे. प्लीज आणि , थँक यू च्या माऱ्याने जीव मेटाकुटीला आला आहे. म्हणतो कसा कि मला साहेब म्हणू नका, मला गजा म्हणा. तुमच्या आणि माझ्या डी एन ए मध्ये दोन चार अक्षरांचा फरक असेल नसेल , आपण सारे एकमेकांचे नातेवाईक आहोत. एकाच काळ्या आईचे वंशज आहोत. आता तीर्थरूपाना एक पत्र लिहितो.”
पक्याने खरच बापाला पत्र लिहिले. दुसऱ्या दिवशी पक्याने रिपोर्ट दिला कि आज बाबांनी घरी येताना पव्वा आणण्याच्या ऐवजी अमूलचे मोठे चॉकोलेट आणले आईसाठी.
पव्वा आउट चॉकोलेट इन!
आम्ही बाकावर बसून विचार करत होतो. जगाची लोकसंख्या आठशे कोटी आहे. त्या सगळ्याना आपण पत्रे पाठवली तर? कल्पना करा.
पण पक्याने उलटा सूर लावला. त्याचे म्हणणे होते आठशे कोटी महात्मा गांधी! अशा जगात. अशा जगब्यात काय मजा. जगात दोन चार मोगाम्बो, मित्सुको, हाईड, उरिया हीप, जोकर, टू फेस, मॅड हॅटर, बेन, लॉर्ड वोल्डमॉर्ट...
त्यांच्या शिवाय देवाला जाग कशी येईल.
“एक आयडिआ आहे. पक्या तू त्या एल् एल् एम् माशिनलाच का नाही लिहित?”
“ब्येस आयडिआ!”
आम्ही पत्र लिहायाला बसलो. नेहमी एल् एल् एम् पत्र लिहित असे. पण आज एल् एल् एम् ने संदेश लिहिला
“मी स्वतःला स्वतः पत्र लिहू शकत नाही. तेव्हा क्षमा करा. ह्यावेळी तुमचे पत्र तुम्हीच लिहावे.”
एल् एल् एम् असे हात झटकल्यावर आमचे पत्र आम्हालाच लीहावे लागणार.
पक्याने पत्र लिहायला सुरवात केली.
“हे महामाशिना, माशिनाधी माशिना,” अशी सुतावात करून पक्याने माउलीचे पसायदान मागितले.
हे पत्र लिहून किती वर्षे झाली?
Long Long Ago. Nobody knows How Long Ago A Letter was written.
पक्याचे आई बाबा पंचत्वात विलीन झाले. पक्या आणि मी पण आम्ही दोघे गेलो. आमच्या कित्येक पिढ्या गेल्या,.
उत्तर आले नाही. अजून वाट बघत आहोत.