"असेन मी नसेन मी" नाटक : एक दृष्टिक्षेप
काल आमच्या गावात संदेश कुलकर्णी लिखित, दिग्दर्शित "असेन मी, नसेन मी" ह्या नाटकाचा प्रयोग होता. तो बघण्याचा योग मला आला. नाटक मला आवडलं. माझ्या वकूबाप्रमाणे त्याबद्दल थोडं लिहावं असं नेहमीप्रमाणे वाटलं. ते करतो आहे.
एका आईच्या वृद्धत्वाच्या एका विशिष्ट टप्प्यावर तिचं कणाकणाने वाढत गेलेलं मानसिक आजारपण. कणाकणानं तिची वास्तवावरची सैल होत गेलेली पकड. तिची मुलगी, बहीण, आणि घरातल्या कामाच्या "मावशी" ह्यांच्याबरोबर तिचं हळुहळू बदलत गेलेलं नातं. विशेष करून मुलीबरोबरच्या नात्यामधली घालमेल. एकमेकांना खूप जपणार्या आणि तरीसुद्धा रेशीमधागे काचणार्या संबंधांचा एक तुकडा - म्हणजे हे नाटक.
हे नाटक घटनाप्रधान नाही. नाटकांना प्लॉट अपेक्षित असतो. तो इथे आहे. पण "ह्या घटनेमागे नेमकं असंच का? कुणाच्या कसल्या हेतूंमुळे पुढे काय घडलं? त्यापुढे नक्की काय घडणार?" अशा प्रकारच्या घटना ह्यात नाहीत. एका वृद्ध व्यक्तीच्या शेवटच्या वर्षामधे घडलेल्या घटना, त्यात त्या व्यक्तीचं बदललेलं आंतरिक जग, त्या व्यक्तीच्या जवळच्या अगदी थोडक्या नातेसंबंधांमधे झालेले बदल. त्या वर्षापुरताचा "ग्राफ". ज्या अन्य तीन व्यक्तीरेखा आहेत त्यांना जवळजवळ एकसारखा न्यायही मिळाला आहे; त्या व्यक्तिरेखा सशक्त, रंगीबेरंगी, हंसूआसूंचा झोपाळा पुढे मागे सतत करणार्याच आहेत.
थोडक्यात, हे नाटक एक "कॅरॅक्टर स्टडी" आहे. रोमहर्षक म्हणा, चटपटीत म्हणा, असं ते नाही. त्यात भरपूर गमतीजमती आहेत, पण हास्यरसाचा धबधबा नाही. मात्र लेखकाचा शब्द वापरायचा तर ते खोलवरचं "गहिरं" आहे. आई, मुलगी, बहिणी-बहिणी आणि आपल्या घरी मदतीला येणार्या मावशी अशा जोमदार, जगण्यातल्या गमतीजमतीनी प्रेक्षकांच्या चेहर्यावर हसूं खेळतं ठेवतील अशा व्यक्ती यात आहेत.
मात्र या स्त्रीपात्रांबरोबर एक स्टेजवर न आलेलं पुरुष पात्रही आहेच. या "रोहन"बरोबर तुम्ही आम्ही एनाराय फारच जास्त आयडेंटीफाय होतो. हे नाटक अमेरिकेत - भारताइतकंच - उत्तम रीतीने प्रेक्षकांना अपील होईल ह्यामागे अर्थातच "रोहन" अँगल आहे. आणि अमेरिकेत बसलेल्या प्रत्येकाच्या मनाला तो अँगल स्पर्श करून गेलेला असणार आहे.
नाटकाचा दर्जेदारपणा, अभिनय, संगीत, प्रकाश, नेपथ्य ह्यामधे एक प्रकारचा ठहराव आहे. ठहराव म्हणजे संथपणा, कंटाळवाणेपणा नाही. पण इमोशनल वजन पेलण्याकरता आवश्यक ती गती. इथे मला आमच्या लाडक्या खयाल गायकीची मेटाफोर योजणं आवश्यक आहे. विलंबित लयीत आमचं खयाल गाणं सुरू होतं. सुरवातीच्या अनेक आवर्तनांमधे गाण्याचा मूड प्रस्थापित होतो. साथीदार कितीही कसलेले असले तरी सुरवातीला एकमेकांना अंदाज देतात घेतात. आणि मग सूर-तालात जमलेली "बंदिश" हळुहळू रागदर्शन घडवताना त्यातले ताणेबाणे, चढाव उतार येतात. हळुहळू गाडी स्पीड पकडते. आणि , मग मध्यलयीतल्या द्रुत तानांमधे रागामधल्या निराळ्याच जंक्शनला गाडी जाते.
असो. हा ठहराव प्रेक्षकांना सांगतो की ही रोलर कोस्टर राईड नाही. अथांग नदीच्या पात्रावरच्या नौकेतून दोन घटका तुम्हाला नेतो आहे. दोन्ही अंकांच्या सुरवातीला सुमारे २ मिनिटं अंधारात फक्त संगीत वाजत होतं. आठवतंय का? नाटकाचं स्वरूप, त्याचा आशय हे ज्याला त्याला कमीजास्त प्रमाणात आवडेल. पण नाटकाला त्यांनी दिलेली ट्रीटमेंट - त्यातून प्रेक्षक आणि माझ्यासारखे शिकाऊ रंगकर्मी - त्यांना शिकण्यासारखं पुष्कळ आहे.
नीना कुलकर्णी, अमृता सुभाष, शुभांगी गोखले आणि लेखक-दिग्दर्शक संदेश कुलकर्णी - चारही घटकांना जवळजवळ एकसारखं महत्त्व मिळणं हे या नाटकाचं एक महत्त्वाचं अंग. सर्व अभिनेत्रींना खूप उत्तम वाव आहे. नीनाबाईंनी जणु आपला सर्व अनुभव पणाला लावून मुख्य भूमिका केली. अमृता ह्यांनी मुलीचं फ्रस्ट्रेशन, स्वतःच्या आयुष्यातल्या, करीयरमधल्या, संसारामधल्या संकटांना सामोरं होत असताना आईच्या मानसिक पडझडीमुळे विदिर्ण होताना आणि मग शेवटी आई-मुलगी हा रोल रिव्हर्स करताना उत्तम कामगिरी केली. आणि शुभांगी गोखले यांनी तर दोन्ही अंकामधे केवळ वैभव सूर्यवंशी स्टाईल टोलेजंग फटकेबाजी केलेली आहे.
संदेश कुलकर्णी यांचं एक विशेष : मला असं वाटलं त्यांना बाईचं मन छान कळतं. माझ्यामते ही काँप्लिमेंट त्यांना नक्की आवडेल.
२०२० साली आलेला, अँथनी हॉपकिन्सने केलेल्या अप्रतिम भूमिकेने खोलवरचा ठसा उमटवलेला The Father नावाचा सिनेमा मला अपरिहार्यपणे आठवला. त्यातही बाप नि मुलगी यांच्यातले ताणेबाणे, उलाघाल आहेच. मात्र एक आहे. The Father हा अनुभव अधिक अंगावर येणारा आहे. त्यातलं एखाद्या डिमेन्शियाग्रस्त व्यक्तीचं हळुहळू विरळ होत जाणारं जग.... एका क्षणी तो मुलीला म्हणतो "I am losing my leaves, the branches, the wind and the rain." ते शहारे आणणारं आहे. सिनेमाच्या माध्यमातून "आता एक दिसतंय तर नंतर काहीतरी भलतंच वाटतंय" असं सतत बदलत गेलेलं त्याचं जगाचं आकलन हा अनुभव कमालीचा परिणामकारक होता. त्यामानाने, "असेन मी नसेन मी" हे त्यातल्या प्रोटॅगॉनिस्टसारख्याच सौम्य व्यक्तीमत्वाचं आहे. एखादी ज्योत हळुहळू मंद होत जावी तसं.
तीनही अभिनेत्री, नाटककार, दिग्दर्शक आणि इतर सर्वं अंगे हाताळणार्या टीमचं मनःपूर्वक अभिनंदन. आमच्या गावातच नव्हे तर आख्ख्या अमेरिकेमधे हे नाटक अरेंज करणारे आमचे स्थानिक मित्र प्रमोद पाटील आणि त्यांची संस्था Five Dimensions ह्यांचे अनेक आभार आणि त्यांना शाबासकी.
अमेरिकेतल्या एनाराय वर्गाला हे नाटक आवडेलच. पण एक स्वतंत्र कलाकृती म्हणूनही तिचं नक्कीच श्रेय आहे.
