Skip to main content

लिओपोल्ड

3 minutes

(मनेका गांधींच्या मंत्रीपदापूर्वीच्या काळातली गोष्ट. आधारित.)

दुपारी तीनची वेळ. पबमध्ये एकही कस्टमर नव्हता. शंकरअण्णा बार काऊंटरमागे उभे राहून ग्लास पुसत होते.

पबचं दार करकरत उघडलं, पण आपल्याच तंद्रीत असलेल्या शंकरअण्णांनी लक्ष दिलं नाही. कस्टमर बारजवळ आला आणि म्हणाला,

"एक बियर. आणि चिकन बिर्याणी."

"शुअर सर" म्हणत शंकरअण्णांनी कस्टमरकडे पाहिलं, आणि त्यांच्या हातातला पाईंट ग्लास सटकून फुटला.

"तू.. तुम्ही .. चिंपांझी आहात!"

"हो. त्यात काय? माझं नाव लिओपोल्ड. मूळचा कांगोचा. जग फिरतफिरत कालच इथे आलो." कस्टमर म्हणाला. "पण ते असो. घशाला कोरड पडलीये. बियर लवकर द्या. मग बिर्याणी सावकाश येऊ द्या."

शंकरअण्णा प्रोफेशनल होते. "शुअर सर, राईट अवे. कॅश ऑर कार्ड?"

लिओपोल्डने दोन कार्डं काऊंटरवर ठेवली. "अमेक्स घेत असाल तर उत्तम. नाहीतर व्हिसा."

शंकरअण्णांनी काही न बोलता अमेक्स स्वाईप केलं, आणि टॅप उघडून बियरचा ग्लास सराईतपणे भरला. खारवलेल्या शेंगदाण्यांचं पाकीट फोडून बोलमध्ये भरलं आणि म्हणाले, "विथ अवर काॅम्प्लिमेन्ट्स!"

लिओपोल्डने मोठ्ठा घोट घेतला आणि म्हणाला, "आता बरं वाटलं. थॅंक्स!"

शंकरअण्णांचं कुतूहल जागृत झालं होतं. "तुम्ही इथे सेटल होणार का?"

"हट. मी सेटल वगैरे होत नाही. पाचसहा महिने राहणार. काम करणार. मजा करणार. मग पुढचा देश."

"ओह नाईस. काय काम करता तुम्ही?"

"मी एक्सपर्ट मेसन आहे. गवंडी. विटा असो वा दगड, माझा हातखंडा आहे. अहो हेमाडपंती बांधकामसुद्धा केलंय या हातांनी!" लिओपोल्ड अभिमानाने म्हणाला.

"अरे वा!" शंकरअण्णा म्हणाले, आणि चिकन बिर्याणी आणायला किचनमध्ये गेले.

"ही चिकन बिर्याणी. बियर रिपीट करू का?" शंकरअण्णांनी अदबीनं विचारलं.

"हो, चालेल. एनीवे आज हाफडे घेतलाय मी. फ्लॅट बघायला जायचंय," लिओपोल्ड म्हणाला.

"कुठल्या एरीयात फ्लॅट बघताय? काही कळलं तर सांगतो."

"इथे जवळच. नयानगर. तिथे नवीन शाळा बांधताहेत ना, त्याच साईटवर काम करतोय मी!" लिओपोल्डने उत्तर दिलं.
मग लिओपोल्ड पबचा रेग्युलर झाला. रोज तीनच्या आसपास यायचा. एक बियर. चिकन किंवा क्वचित पनीर बिर्याणी. आणि जनरली जेन गुडाॅलचं एखादं पुस्तक वाचत बसायचा.

असा एक महिना गेला. आणि एका संध्याकाळी पबमध्ये ऐटबाज पोशाख केलेला एक माणूस आला.

"वेलकम सर. काय घेणार?" शंकरअण्णांनी विचारलं, आणि कस्टमरने मागवलेली ब्लडी मेरी बनवून दिली. "बाय द वे, तुम्ही रिंगमास्टर आहात का?"

"हो! आणि मालकसुद्धा." कस्टमर हसून म्हणाला. "आमची सर्कस आजच इथे आलीये. जरा सेटल झालं की आठ दिवसांत खेळ सुरू करणार."

शंकरअण्णांना एकदम सुचलं. "एक विचारू का? एक अमेझिंग चिंपांझी आहे. तुम्हाला चालेल का?"

"आमच्याकडे आहे एक चिंकू चिंपांझी," रिंगमास्टर म्हणाले.

"तोच ना, फास्टर फेणेने वाचवला तो? म्हणजे तो क्यूट आहे, पण लिओपोल्डची सर नाही त्याला!"

रिंगमास्टर हसले. "ऐसी क्या खूबी है तुम्हारे लिओपोल्ड में?"

"अहो तो बोलतो! रोज बियर आणि बिर्याणी मागवतो. आणि पुस्तक वाचतो."

"तुम्ही माझी थट्टा करताय. पण यातली एकही गोष्ट खरी असेल तर आय वाॅन्ट हिम. प्रत्येक खेळाच्या रेव्हेन्यूचे वीस टक्के देईन मी! हे माझं कार्ड. आस्क हिम टू कम ॲन्ड मीट मी टूमाॅरो."

"मी उद्याच सांगतो त्याला!" शंकरअण्णा उत्साहाने म्हणाले.

दुसर्‍या दिवशी दुपारी नित्यनियमाने लिओपोल्ड आला. त्याची बियर सर्व्ह करून शंकरअण्णांनी विचारलं, "दुसरं एखादं काम मिळालं तर करणार का?"

लिओपोल्डने मान डोलावली. "अलबत! इथे कंटाळा आलाय. पण पैसे चांगले पाहिजेत."

"तो प्रश्नच नाही!" शंकरअण्णा म्हणाले. "शहरात सर्कस आलीये. मी कालच ओनरशी बोललो. त्याला तुम्हाला भेटायचंय."

"एक मिनिट!" लिओपोल्ड म्हणाला. "सर्कस? म्हणजे मोठ्या तंबूत प्रेक्षक बसतात आणि रिंगणातले खेळ बघतात तीच ना?"

"हो हो, तीच."

"आणि कलाकार कॅराव्हॅनमध्ये राहतात आणि प्राण्यांना चाकांवरच्या पिंजऱ्यात ठेवतात, तीच सर्कस?"

"हो. पण म्हणजे, तुम्ही स्टार, म्हणजे तुम्हाला ..."

"भेंजो मग त्या सर्कसला गवंडी कशाला पाहिजे?!"

(आधारित)

Node read time
3 minutes