काही 'जपानी' अनुभव

जपान, पृथ्वीवरील एक नंदनवन! निसर्गसौंदर्याने नटलेला एक नितांत सुंदर देश. त्याहुनही महत्वाचे म्हणजे प्राचीन संस्कृती आणि सभ्यता असलेला आणि त्यांची प्रचंड निष्ठेने जोपासना करणारा एक देश. देश, समाज, देशवासीय ह्यांचे आपण काहीतरी देणे लागतो, त्यांच्यामुळेच आपण एक सुसह्य सामुदायिक जीवन जगु शकतो अशी गाढ श्रद्धा असलेले जपानी लोक.

अर्थात हे सर्व, जेव्हा जपानला गेलो त्यावेळी जाणवलेले. ह्या जपानबद्दल मला लहानपणापासून एक आदर होता. सुभाषचंद्र बोस हे माझे दैवत आणि त्या दैवताला विनाअट लष्कर उभारणीसाठी मदत करणारे एक राष्ट्र म्हणून जपानविषयी एक जिव्हाळा होता. तेवढ्यामुळेच जपानला जाण्याची एक ओढही होती. कधी जायचा योग येइल असे वाटले नव्हते पण नशिबाने जायचा योग आला, दोनदा. त्या देशाच्या एका कंपनीसाठी काही काम करून त्यांच्या ॠणातुन (सुभाषबाबूंना केलेली मदत) काही अंशी उतराई होण्याची संधी मिळाली हे माझे अहोभाग्य.

माझ्या पहिल्या दौर्‍यातल्या वास्तव्यात त्यांनी तांत्रिक विश्वात केलेल्या प्रगतीचे तोंडाचा आsss करून बघण्यातच बराच काळ गेला. जमिनीखाली सहा थरांमध्ये चालणारी (अचूक वेळेनुसार) मेट्रो रेल्वे, जमिनीखाली एक शहराप्रमाणे असलेले तोक्यो रेल्वे स्टेशन, भुकंपालाही हरविणार्‍या गगनचुंबी इमारती. हे सगळे अनुभवता अनुभवता हळूहळू त्या शहरात असणारी प्रचंड स्वच्छता जाणावू लागली. कुठेही बघावे तर टापटीप. मग त्याचे कारण शोधता शोधता जपानी लोकांचे निरीक्षण करण्याचे व्यसन लागले (हो... हो! आले लक्षात तुम्हाला काय वाटतेय ते, त्यात जपानी ललनाही आल्याच). पहिल्या दौर्‍यातले ह्या स्वच्छतेबद्दल असलेल्या जागरुकीचे आलेले काही अनुभव...

एके दिवशी सकाळी ९:०० वाजता ऑफिस गाठताना लागणार्‍या एका फुटपाथवर टाइल्स बदलायचे काम चालू होते. व्यवस्थित पिवळ्या रंगाच्या पट्ट्या लावून चौकोनी ब्लॉक तयार करून त्यात सर्व सामग्री आणि कामाची आयुधे ठेवून दोघेजण त्यांचे काम मन लावून करत होते. 'काम चालू रस्ता बंद' अशी पाटी न लागता 'तुम्हाला होणार्‍या असुविधेबद्दल क्षमस्व' असा दिलगीरी व्यक्त करणारी पाटी होती. हे सर्व बघून पुढे निघून गेलो. दुपारी जेवायला बाहेर आलो तर ती पाटी आणि पिवळ्या पट्ट्या गायब आणि तिथे सकाळी काही काम चालू असण्याचे नामोनिशाणही नव्हते. आश्चर्य वाटून गडबडीत निघून गेलो. दुसर्‍या दिवशी त्याच फुटपाथवर पुढच्या ब्लॉकमध्ये टाइल्स बदलायचे काम चालू होते. परत दुपारी एकदम चकाचक. मग ऑफिसमधल्या एका जपानी मित्राला त्याबद्दल विचारले तर तो चकित होऊन माझ्याकडे प्रश्नार्थक चेहेर्‍याने बघायला लागला व म्हणाला, 'अरे त्या दोन कर्मचार्‍यांना त्यांच्या ठरविक वेळेत संपेल इतकेच दिले जाते व ते त्याचे नियोजन करून तेवढीच जागा व्यापुन काम पुर्ण करतात. उगाच जास्त काम हाती घेतले तर रस्ता बंद होउन सर्वांचा खोळंबा नाही का होणार?'

बर्‍याच सबवे मेट्रो स्टेशनच्या भिंतींवर टाइल्स लावलेल्या आहेत, छोटे-छोटे चौकोन असलेल्या टाइल्स. एकदा एका रविवारी मेट्रो स्टेशनवर गेलो असताना दिसले की पाणी मारून त्या भिंती धुतल्या जात होत्या. भिंती धुतलेले पाणी जाण्यासाठी जिन्याच्याकडेने जागा सोडून त्यातुन पाणी पाटाच्या पाण्याप्रमाणे निचरा होऊन जाईल ह्याची सोय केलेली होती. त्यानंतर काही वयस्कर माणसे हातात कडक दातांचे ब्रश घेऊन त्या टाइल्समधील छोट्या-छोट्या चौकोनांमधील फटींमध्ये अडकलेली घाण साफ करत होते.

ह्यानंतर माझा ह्या जपान्यांविषयीचा आदर दुणावला आणि मग मी त्यांच्या सामाजिक वागणुकीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यात जाणवले ते म्हणजे त्यांना असलेला त्यांच्या देशाविषयीचा प्रचंड अभिमान. प्रचंड काम करून आपल्या देशाला उच्च स्थानावर नेऊन ठेवण्याची महत्वाकांक्षा. देशाच्या अभिमानाला धक्का लागेल असे काही झाले जर हाराकीरीच करतील अशी ही माणसे. त्याची प्रचिती आलेले हे अनुभव...

एकदा मी आणि माझा मित्र सुट्टीच्या दिवशी ऑफिसच्या कामासाठी जायला म्हणून एका सबवे स्टेशनवर तिकीट काढून गाडीची वाट बघत होतो. वाट बघत असतानाच एका सहकार्‍याचा ऑफिसातून फोन आला की ऑफिसात यायची गरज नाही. मग तिकीटाचे पैसे परत घेण्यासाठी एका तिकीटयंत्राकडे (तिकीटयंत्रात तशी सोय असते) जाऊन आम्ही दोघे खटाटोप करत होतो. त्यावेळच्या जपान दौर्‍यात मला जपानी येत नव्हते. त्यामुळे नेमके काय करायचे हे कळत नव्हते. त्या यंत्राच्या बाजुलाच एक जपानी माणुस उभा होता व आमच्याकडे बघत होता. ही जपानी माणसे तशी फार लाजाळू आणि अबोल असतात (पण त्यांचे रूप हे नामाबीरु किंवा साके प्यायल्यानंतर एकदम विरूद्ध होऊन जाते). तो बराच वेळ आमच्याकडे बघत होता मग जरा धीर करून आमच्याकडे येऊन म्हणाला, 'सॉरी मला इंग्लीश जास्त येत नाही, पण तुम्हाला काही प्रोब्लेम आहे का, काही मदत करू का?' आमची अवस्था आंधळा मागतो एक डोळा... अशी झाली. त्याला आमची समस्या सांगितल्यावर त्यानेही बरीच झगडाझगडी केली त्या मशिनशी पण त्यालाही काही जमले नाही. 'एक मिनीट', म्हणून तो गायब झाला. माझ्या बिहारी मित्राने लगेच त्याच्यावर कमेंट्स करायला सुरुवात केली. पाच सात मिनीटांनी तो आला तो एका रेल्वे कर्मचार्‍याला घेऊनच. मग त्या दोघांनी जपानीमध्ये बरीच काही बडबड केली आणि त्या यंत्रावरही बरेच काही केले. शेवटी यंत्र बिघडले आहे असे सांगुन तो रेल्वे कर्मचारी निघुन गेला. आमच्या दोघांच्या चेहेर्‍यावरील भाव बघून त्या माणसाने आमचे तिकीट कुठपर्यंतचे आहे ते विचारले. मग त्याने ते तिकीट आमच्याकडे मागितले आणि त्या तिकीटाएवढे पैसे काढून आम्हाला दिले व म्हणाला, 'तुम्हाला ह्या तिकीटाचे पैसे परत घ्यायला स्टेशनमास्तरशी बोलायला प्रोब्लेम येईल मी बघतो काय करायचे ते'. एवढे बोलून वर परत आम्हालाच त्रास झाल्याबद्दल दिलगीरी व्यक्त करत सॉरी म्हणाला. हा किस्सा २००२ सालचा आहे त्यामुळे नक्की काय प्रोब्लेम होता ते अंधुक आठवते आहे पण त्यानेच, मदत करून वर आम्हाला थॅन्क्यु म्हणायची संधी न देता, सॉरी म्हणणे हे लख्ख आठवते आहे. माझा बिहारी मित्र रडला होता त्यावेळी. त्या माणसाने आम्हाला मदत करण्यामागची भावना अशी की ह्या परदेशी लोकांचे माझ्या देशाविषयी गैरसमजानेसुद्धा मत खराब होऊ नये!

एकदा मी धाडस करून एकटाच तोक्यो स्टेशन फिरायला गेलो. ते जमिनीखालचे स्टेशन एवढे प्रचंड आहे की जणू एक शहरच वसले आहे. त्यावेळी भाषा येत नसल्यामुळे आम्ही ग्रुपमध्येच फिरायचो. पण त्यावेळी मी आता सर्व स्टेशन्स समजली ह्या आत्मविश्वासाने (फाजील) एकटाच गेलो. आणि त्या तोक्यो स्टेशनवर हरवलो. काही केल्या कुठे जायचे कळेना. एकही पाटी इंग्रजीत नाही (का म्हणून लावावी?) कोणाशी इंग्रजीत बोलायची सोय नाही. जवळ मोबाइल नाही, भयंकर घाबरून गेलेलो. इकडे तिकडे फिरता फिरता एके ठिकाणी एका दुकानात एक डेंटिस्ट चक्क त्याचा दवाखाना थाटून बसला होता. आता तो जरी डेंटिस्ट असला तरीही डॉ़क्टरच. त्यामूळे त्याला इंग्रजी येत असणार म्हणून मी भयंकर खुष झालो. त्याच्याकडे जाऊन मी, मी हरवलो आहे, मला जपानी येत नाही, मला मोन्झेन नाकाचो ह्या स्टेशनला जायचे आहे, कसे आणि कुठुन जायचे, मदत कराल तर खुप उपकार होतील अशी सरबत्ती चालू केली. त्याने सर्व शांतपणे ऐकून घेतले. मग मला हाताने थांबायची खूण करून कुठेतरी निघून गेला. आता तो एका पेशंटच्या दातातले किडे तसेच वळवळत ठेऊन गेला असल्याने परत येईल ह्याची खात्री होती. गेला असेल नकाशा आणायला असा विचार करून मी शांतपणे बसून होतो. तो डेंटिस्ट १५-२० मिनिटांनी परत आला. त्याच्याबरोबर एक माणूस होता. माझ्याजवळ आल्यावर त्या माणसाशी काहीतरी बोलून मला त्याच्या हवाली करून त्याच्या पेशंटकडे निघून गेला (मला खात्री आहे त्याने त्याच्या पेशंटबरोबरच त्याच्या दातातल्या किड्यांचीदेखिल माफी मागितली असेल दिलेल्या तसदीबद्दल). त्या नविन माणसाने माझ्याशी इंग्रजीत बोलायला सुरुवात केली व म्हणाला, 'त्या डेंटिस्टला इंग्रजी थोडे थोडे कळते पण बोलता येत नाही म्हणून तो मला घेऊन आला आहे, बोला मी आपली काय मदत करू?'

ह्या अनुभवांनंतर, ह्या देशात परत यायचे आणि यायचे ते ह्यांची भाषा शिकुनच, त्यांच्याशी संवाद साधायला, ही खुणगाठ बांधूनच परत आलो. आल्यावर पुणे विद्यापिठात जपानी शिकायला सुरूवात कली आणि नशिबाने परत जपानला जायचा योग आला.

ह्या दुसर्‍या फेरीतील अनुभव पुन्हा केव्हातरी. Smile

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

जपानी लोकांकडे मदत मागितली की ती करायला ते 'वाट्टेल ते' कष्ट घेतील पण तुम्हाला मदत करतील असे अनेकदा वाचले होतेच. तरी असे अनुभव नव्याने सुखद जाणीव करून देतात.
छान लिहिले आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान अनुभव रेखाटले आहेस ब्रिजेशा तू.
जपान्यांसारखे आचरण भारतात अमलात आणायचे म्हणजे कठिणच आहे. होय ना ?
(जपान्यांबद्दल आदर असणारी) रमाबाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्तापर्यंत इतर काही लिखाणांमधून हे वाचलं होतंच पण तरीही नवीन किस्से वाचायला आवडले.

एवढा 'आत्यंतिक' नाही पण युरोपीय लोकांचा अनुभवही खूप चांगला आहे. एखाद्या नवीन ठिकाणी आपल्याला काही सापडत नसेल, जमत नसेल तर अनेक लोक आपल्याबरोबर त्या ठिकाणापर्यंत येऊन "हे इथे आहे, हे मशीन असं वापर" अशी मदत करणारे असतात. "स्थानिक भाषा येत नाही?" असा चेहेरा करणार्‍या लोकांचीही सुरूवातीला गंमत वाटायची; "मी तुमच्यासारखी दिसत नाही हे समजत कसं नाही तुम्हाला?" असा प्रश्न सुरूवातीला पडला. नंतर लक्षात आलं, त्या लोकांना भारतीय तोंडवळ्याचे चेहेरे बघण्याची एकतर सवय असेल किंवा अजिबात xenophobia नसणार.
अशा वेळेला हमखास भारतीय शाळा-कॉलेज-विद्यापीठांमधले ग्रंथपाल किंवा ग्रंथालय कर्मचारी आठवायचे. मुलांना वाचन आणि ग्रंथालयाची आवड लागू नये याची ते परोपरीने काळजी घ्यायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चांगले अनुभव, जपानी शिकलात तर बहाद्दर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जपानी लोकांच्या टापटिपीचे आणि शिस्तप्रियतेचे किस्से सर्वांजवळ असतात. माझ्या विशेष ध्यानात आलेल्या ह्या दोन-चार गोष्टी...

जपानी लोकल गाड्यांमध्ये मुंबईसारखीच खचाखच गर्दी असते पण आत शिरण्याची/बाहेर पडण्याची आकान्ताची धडपड नसते. कारण फलाटावर एकामागे एक अशा खुणा केलेल्या असतात आणि त्या खुणांच्यावर गाडीची वाट पाहणारे एकामागोमाग एक असे शिस्तीने उभे असतात. गाडी थांबल्यावर आणि उतरणारे उतरल्यावर खुणांवर उभे असलेले एकामागोमाग एक असे नीट आत शिरतात. ह्या गाडीत जास्त गर्दी आहे म्हणून पुढच्या गाडीसाठी थांबायची इच्छा असेल तर त्याचीहि सोय आहे. पहिल्या खुणांच्या रांगेच्या शेजारी तशीच दुसरी ओळ असते. त्या ओळीवर एकामागे एक असे उभे राहायचे. पहिल्या खुणांची रांग मोकळी झाली आणि गाडी निघून गेली की की खुणांच्या दुसर्‍या रांगेतील वाट पाहणारे पहिल्या रांगेवर सरकतात!

मी जपानमध्ये 'शिनकानसेन' गाड्यांनी (बुलेट ट्रेन्स) बराच प्रवास केला. ह्या गाडयांसाठी स्वतन्त्र रूळ आणि स्टेशने आहेत आणि त्यांचा आणि साध्या गाडयांचा एकमेकांस अडथळा होत नाही. आपल्या तिकिटावर गाडी, डबा आणि सीट नंबर लिहिलेला असतो आणि डब्यांचे नंबर फलाटावर लिहिलेले असतात. गाडी आली की आपल्या डब्याचे दार बरोबर आपल्या समोर आलेले असते. धावफळ वा ढकलाढकली न करता आपण अलगद आत शिरायचे!

जपानी लोकांना जन्तुसंसर्गाची फार भीति वाटते असे दिसते. जपानकडे जाणार्‍या विमानात कित्येक जण, मुख्यत्वेकरून जपानी, नाकावर मास्क घालून प्रवास करतांना दिसतात. शहरांमधून ठिकठिकाणी तरुण लोक नाना गोष्टींच्या जाहिराती तुमच्या हातात देण्यासाठी उभे असतात. जाहिरातीबरोबर टिश्यूपेपरचे एक छोटे पाकिट हमखास मिळते!

जपानी लोकांच्या अतिरिक्त मद्यपानाच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळतात पण ह्या मद्यप्रेमाचा लाभदायक भाग असा की सर्व प्रकारची देशोदेशीची मद्ये ग्रोसरीच्या दुकानांमधून अतिस्वस्त दरात मिळतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जपानमधील रेल्वे पोलिसाञ्चे सौजन्य पाहा -
http://www.youtube.com/watch?v=33qxTMA9XTA
http://www.youtube.com/watch?v=4eeERNzIaww&feature=related

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी पुरण भरल्यासारखे लोकं भरताहेत. ROFL आपल्याकडे कसं लोकंच एकमेकांना धक्का देउ देउ गाडीत चढतात.
इतकी प्रचंड गर्दी असते तर अजुन दोन जास्तीच्या गाड्या का नाही सोडत?

बाकी बायकांसाठी वेगळे डबे नसतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी बायकांसाठी वेगळे डबे नसतात का?

नाही, त्या गर्दीतच बायकाही असतात. भारीच 'पंचाईत' व्ह्यायची अशा गर्दीच्या वेळी.

- (ही गर्दी अनुभवलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी बायकांसाठी वेगळे डबे नसतात का?

कळीचा प्रश्न विचारलात शिल्पातै तुम्ही.
इतरवेळी सभ्य, संवेदनशील वगैरे असलेले जपानी पुरुष गर्दीत भारतीय पुरुषांपेक्षा फार वेगळे नाहीत. ग्रोपिंग ही तिथली बरीच मोठी समस्या आहे. तरीही तिथे स्त्रियांसाठी वेगळी सोय अजूनही नाही.
एकूणच स्त्रियांना मिळणारी वागणूक फार काही चांगली नाही असे समजते.
असो.
जपान खूपच छान आहे खरा पण तिथे राहणे मला तरी आवडले नाही. एका डिसेंबरात तिथे असताना भल्या सकाळी आणि रात्री उशीरा रस्त्यावरून झोंबीसारखे कामावरून येणारे जाणारे एकेकटे लोक पाहून भयंकर निराश व्हायला झालं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जपानी मानसिकता ही शतकानुशकांपासून अतिघट्ट , feudal प्रकारची राहिली आहे. बर्‍याचशा पौर्वात्य म्हणता याव्यात अशा कल्पनांचा तिथे मोठा पगडा आहे. एकोणीसाव्या शतकात(१८५०च्या आसपास)राजसत्तेने झपाट्याने केलेल्या आधुनिक ज्ञानाच्या प्रसाराने वरकरणी राहणीमान बदलले, आधुनिक (कित्येक बाबतीत युरोपीय धर्तीवर) म्हणावे तसे झाले. राहणीमान पाश्चात्त्य, मूल्ये पौर्वात्य अशी त्या समाजाची बैठक आहे.
त्यांचे वक्तशीरपणा, कामसूपणा,प्रामाणिकपणा, अतुलनीय जिद्द-चिकाटी हे गुण नाण्याची एक बाजू आहे. पारंपरिक मध्य्युगीन पौर्वात्य व्यवस्थेत स्त्रियांचे दुय्यम स्थान अजूनही मनातून पूर्ण गेलेले नाही.त्या नाण्याचीच eve teasing ही दुसरी बाजू असावी.
प्रगत म्हणवल्या जाणार्‍या जपानसाठी आजही राजघराण्यातील सुनेचे शिक्षण, महत्ता, कर्तृत्व महत्वाचे नसून तिची वंशज देण्याची क्षमता, बीज टाकण्यास एक भूमी म्हणून, गर्भाशय म्हणून महत्व आहे. नाण्याची ही दुसरी बाजू.
brutal porn, हिंस्त्र-बीभत्स नी फीती, शिक्षा म्हणून लैंगिक जबरदस्ती बघायच्या झाल्यास जपान्यांना तुलना नाही असे "पोचलेल्या" गोटातून ऐकण्यात आले.

सोकाजींचा लेख उत्तम आहेच, वेळेअभावी दाद देण्यास उशीर झाला. बाकी फुरसतीत टंकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अशी कोंबून बसवलेली माणसे पुढच्या स्टेशनवर दार उघडल्यावर 'धबाक' करून बाहेर पडत नाहीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवघडच आहे पोलिसांच काम! त्या तुलनेत आपल्याकडचे प्रवासी बरेच स्वावलंबी आहेत म्हणायचं!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखात व इथे, तसेच इतरस्त्र आलेल्या अनेक प्रतिसादांतील कामसूपणा, शिस्त, स्वच्छता, टापटीप, रेल्वे स्टेशनंतील व इतर सार्वजनिक जागांतील शिस्त ह्या सर्व गोष्टी जगाच्या अनेक देशांत व शहरांतून अनुभवायास मिळतात-- माझ्याच शहरात हे सर्व काही आहेच (आणि ह्यात मी अतिशयोक्ति करत नाही आहे). पण जपानी लोकांची परकीय व्यक्तिंशी विशेष आस्थेने वागण्याची तर्‍हा मात्र खासच आहे, अगदी वेगळी व उठून दिसणारी आहे. काही वर्षांपूर्वी मी व माझ्या काही सहकार्‍यांनी हा सुखद अनुभव घेतला. टोक्योमधे आमच्या बॅगा घेऊन हातातील नकाशांवरून हॉटेल शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू होता. बरेच प्रयत्न केल्यावर शेवटी रस्त्यावरील एका गृहस्थास विचारले. रात्रीचे सात साडेसात झाले असावेत, तो त्याच्या पार्टनर स्त्रीसोबत चालला होता. आमची विचारणा होताच त्याने त्या स्त्रीस पुढे जावयास सांगितले व आम्हाला घेऊन तो हॉटेलपर्यंत सोडण्यास आला!

मात्र अनेक वर्षांपूर्वी रात्री उशिरा-- सुमारे दहाच्या सुमारास, कडक थंडीत, पहिल्यांदाच ओसाकात उतरलो होतो, व टॅक्सीने हॉतेलात जात होतो. रस्ते सुनसान होते आणि एक ब्रिजवर एक माणूस दारू पिवून लडबडत चढत होता,ते दृष्य, का कोण जाणे, अजूनही मी विसरू शकलेलो नाही. कालावकाशाने,जपानमधील अत्यंत कठीण रहाणीमानाविषयी बरेच काही माझ्या वाचनात आले, नगरीनिरंजन ह्यांनी वर्णिलेले 'झोंबीज' त्यामुळे मी समजू शकलो.

विशेष सांगण्यासारखे एकदोन जपानी अनुभव असे:

आम्ही रहात असलेल्या छोट्याश्या हॉटेलातील सेट ब्रेकफास्टमधील एक सेट माश्यांच्या एका पाककृतिचा होता!

गेल्या पाच दहा वर्षांपासून जपानी टॉयलेट सीट्स प्रगत झाल्या आहेत. दोन उल्लेखनीय बाबी: पहिली, सीट हलकीशी गरम ठेवली जाते. थंडीच्या दिवसांत हे उपयोगी आहे. दुसरे, पाण्याचा फवारा आत बसवलेला असतो. आपले काम झाल्यांवर तो वापरता येतो. (माझ्या बरोबरच्या आगाऊ ब्रिट सहकार्‍याने टॉयलेट सीटासमोर उभे राहून तो फवारा कसा चालतो, ह्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अर्थात त्याला नको तिथे अभिषेक झाला).

जपानी जेवणाबद्दल काय बोलावे! स्वर्गसुख आहे इतकेच म्हणतो. मात्र पारंपारीक आसनव्यवस्था रेस्टॉरंटच्या आश्रयदात्यांना थोडी त्रासदायक आहेच, पण त्याहीपेक्षा वेटर्सना अधिकच त्रासदायक आहे. ह्या व्यवस्थेत प्रत्येक टेबल जमिनीत आत, खोल उभे केलेले असते, त्याभोवती खंदक असतो, ज्याच्या काठावर पाहुणे पाय खंदकात खाली सोडून बसतात. हा उपद्व्याप पाहुण्यांना टेबलापाशी बसतांना व भोजन संपल्यावर उठतांना असे दोनदाच करावा लागतो. वेटर्सना मात्र टेबलावर 'सर्व्ह' करतांना बरीच कसरत करावी लागते. विशेषतः किमोनो घातलेल्या स्त्रीयांना बरेच अवघडून हे काम करावे लागते.

सर्वात मजेशीर अनुभवले ते एका साध्य (बुलेट नव्हे) रेल्वे लाईनीवर! ही रेल्वे लाईन टोक्योच्या मध्यवर्ती भागातून निघून नरीटा गावात संपत होती, म्हणजे शहरातील ज्या पाच-सहा रेल्वे लाईनी आहेत त्यातील एक ती होती. आम्ही शेवटच्या डब्यात बसलो होतो. गार्डाची केबिन व आमच्या मध्ये असलेल्या भिंतीमधे मोठी काच होती. त्यामुळे त्याच्या केबिनमधील यंत्रणा दिसत होती(लहानपणीपासूनची आगगाडीच्या इंजिनात बसायची माझी इच्छा तिथे एकार्थी सफळ झाली!), पण त्याचप्रमाणे तो काय करत आहे, तेही एकदम नीट दिसत होते.प्रत्येक स्टेशनवर तो प्लॅटफॉर्मवर उतरे, व त्याच्या टोकास असलेल्या एका साध्या पॅनेलवरील एक बटन दाबे. मग लगेच गाडीत येऊन हॉर्न वाजवे, आणि गाडी सुटे. बहुधा आता गाडी ह्या स्टेशनवरून निघाली आहे, हे सूचित करणारी ती सिग्नल- यंत्रणेशी संबंधित असलेली व्यवस्था होती. हे सारे अगदी जुनाट, प्रार्थमिक अवस्थेतील होते, पण सगळे कसे नीट चालले होती. खरे तर ती गाडी बहुधा 'बिफोर टाईम' धावत असावी. कारण मधील बर्‍याच छोट्या स्टेशनात ती बराच वेळ थांबे. गार्डमहाशय फलाटावर बराच वेळ थांबत, व नंतर वेळ होताच 'ते' बटन दाबत, व गाडीत येत. तेथील 'अनेकपदरी अनेकस्तरीय' रेल्वे लाईन्स आशर्यकारक अहेत!

मन ह्यांच्याशी मी सहमत आहे. कितीही प्रगत झाले तरी परंपरावदी असल्याने जपानी समाजात स्त्रीचे स्थान दुय्यमच आहे. वरून गोंडस दिसणारा जपानी समाज आतून अनेक ताणतणावांनी तोललेला आहे, असे बरेच माही वाचनात आले आहे. त्याविषयी अर्थात माझा काहीच प्रत्यक्ष अनुभव नाही. मन ह्यांनी जपान्यांच्या टोकाच्या बिभत्सतेचा, क्रौर्याचा उल्लेख केलेला आहे. चीनमधे जपान्यांनी जेते म्हणून बरेच अत्याचार केले असे ऐकिवात आहे. (Rape Of Nanking). कोरिया व फिलीपीनन्समधे जपान्यांनी दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी केलेल्या आक्रमणात स्त्रीयांवार अनेक अत्याचार केले होते, व अनेक स्त्रीयांना जपानी सैनिकांच्या 'दिमतीस' ठेवण्यात आले होते, त्याविषयी ह्या दोनी देशांतून आजही असंतोष वारंवार व्यक्त केला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जपानी जेवणाबद्दल काय बोलावे! स्वर्गसुख आहे इतकेच म्हणतो

लक्ष लक्ष वेळा सहमत!

उदोन, सोबा, सुशी, साशिमी (चिकन साशिमीही खाल्ली भन्नाट, हॉर्स साशिमी खायचाही प्लान होता पण जमले नाही, ते ठिकाण तोक्योपासून लांब होते)..... आह्ह्ह नुसते आठवूनच ... जाउदे... आता जाउन रस्सम भात गिळायचाय Sad

जपानमध्ये जाऊन जपानी जेवण न खाणार्‍यांबद्दल किंवा न खाऊ शकलेयांबद्दल अपार करूणा दातून येते मनात Wink

- (जपानी जेवण भयंकर आवडणारा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जपानबद्दल बाकी माहिती नाहि, पण उसगावात खाल्लेल्या जपानी अन्नावरूनही मला ते आवडले होते. तर प्रत्यक्ष निहोंगोत काय असेल या कल्पनेनेच तोंपासु

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जपानबद्दल बाकी माहिती नाहि, पण उसगावात खाल्लेल्या जपानी अन्नावरूनही मला ते आवडले होते. तर प्रत्यक्ष निहोंगोत काय असेल या कल्पनेनेच तोंपासु

निहोंगोत???

'अमेरिकेत खाल्लेले जपानी अन्न जपानी भाषेत कसे लागेल?'???

काही कळले नाही बुवा!

(अनाता वा "निहोन दे" वो इइताइ देशिता का? *** आता खून पाडण्याची पाळी माझी आहे. *** ;))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा! स्वारी.. माझी (२ मिनिटाच्या ऐसी-भेटीत कारण नसताना विचार न करता टंकण्याची - प्रतिसाद आयत्यावेळी अर्धवट बदलण्याची) चुक!
प्रत्यक्ष जपानमधे काय असेल असे वाचावे

बाकी देशिता न बोलता देश्ता बोलतात असे वाटते. इंग्रजीतून शिकताना - शिकवताना- 'जापनीज स्पेलिंग' चुकू नये (किवा श्त कसा लिहावा हे ऐन वेळी विसरू नये) म्हणून ते deshita असे लिहित-शिकवत असावेत का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!