Skip to main content

आरती

3 minutes




आरती
===


राजीव उपाध्ये

 

रात्र काळ्या मखमली वस्त्रासारखी पृथ्वीवर पसरली होती. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या वाटेवर राजा चालत होता, खांद्यावरचा मृतदेह वाऱ्याच्या झुळुकीबरोबर हेलकावे खात होता. दूर एखादी चिता अजून धगधगत होती आणि तिच्या राखाडी श्वासातून लालसर निखारे चमकत होते.

तेव्हा मृतदेहातून वेताळाचा उपरोधिक आवाज उमटला, “राजन, आजची गोष्ट एका अशा दरवाज्याची आहे, जो इतका जुना झाला होता की लोकांनी त्याला दरवाजा समजणेच सोडून दिले होते; त्याला ते नियती समजू लागले होते.”

शहराच्या मध्यभागी ते प्राचीन मंदिर उभे होते. शेकडो वर्षे त्याने माणसांचे सुख-दुःख, जन्म-मृत्यू पाहिले होते, पण सोबतच माणसाचा अहंकारही जपला होता. त्या मंदिरात एक प्रथा होती—एका विशिष्ट प्रार्थनेत केवळ पुरुषांनाच प्रवेश होता. राजाच्या कन्येने सुरुवातीला भाबडे प्रश्न विचारले. “राज्याच्या कल्याणाची प्रार्थना सर्वांसाठी का नाही? आशीर्वाद सर्वांचे, मग प्रार्थना काहींचीच का?” तिचे प्रश्न हवेत विरून गेले, कारण सत्ता आणि परंपरेला प्रश्नांची उत्तरे द्यायची सवय नसते.

मग तिने प्रश्न विचारणे थांबवले आणि एक असा निर्णय घेतला, ज्याने परंपरेचा पायाच हादरवला. पुढील पौर्णिमेला ती मंदिरात जाणार होती—गर्भगृहात नाही, प्रार्थनेच्या मंडपात नाही, तर थेट उंबरठ्यापाशी. “मी आत येऊ शकत नसेन,” ती ठामपणे म्हणाली, “तर निदान जगाने मला बाहेर उभे राहिलेले तरी पाहावे!”

हा निर्णय शहरभर वाऱ्यासारखा पसरला. बाजारात, विहिरींवर, धान्याच्या दुकानांत अन् मंदिराच्या पायऱ्यांवर चर्चा पेटल्या. काहींना ती मर्यादा पाळणारी वाटली, तर काहींना मर्यादा ढकलणारी. पौर्णिमेच्या पहाटे मंदिरासमोर स्त्रियांचा जमाव जमला. त्यांनी फुले आणली, रांगोळ्या काढल्या. कोणी आरडाओरड केली नाही, पण त्यांची शांत उपस्थितीच व्यवस्थेच्या तोंडावर मारलेली चपराक होती.

राजकन्या उंबरठ्यापाशी जाऊन थांबली. एक पाऊल पुढे टाकले असते तर ती प्रार्थनेच्या जागेत गेली असती आणि नियम मोडल्याचा आक्षेप आला असता; एक पाऊल मागे घेतली असते तर ती पराभूत झाली असती. तिने दोन्ही केले नाही. ती फक्त तिथे उभी राहिली. कारण काही वेळा जग बदलण्यासाठी पुढे जायचे नसते, तर केवळ मागे हटायचे नसते!

आत वृद्ध  पुरोहिताचा चेहरा संतापाने कठोर झाला. “म्हणूनच या गोष्टी वाढू द्यायच्या नसतात... अशा चर्चा तात्काळ थांबवायला हव्यात!” जवळ उभा तरुण पुरोहित शांतपणे म्हणाला, “ही चर्चा नाही, ही उत्तराची वाट पाहणे आहे.”

“तुला वाटते ती बरोबर आहे?” वयस्क पुरोहिताने फडाकारले.

“मला एवढेच दिसते की लोक तिच्याकडे पाहत आहेत,” तरुण पुरोहिताने उंबरठ्याकडे पाहत उत्तर दिले, “आणि जे एकदा उघड्या डोळ्यांनी दिसू लागते, ते थांबवणे नंतर  अवघड बनत जाते.”

त्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रार्थना झाली, घंटा वाजल्या, मंत्र घुमले. नियम मोडला गेला नाही, पण मंदिराच्या परंपरेची अदृष्य भिंत मात्र ढासळली होती. आत मंत्रांचा गजर चालू होता आणि बाहेर लोक चर्चा झोडत होते.  काहींना ती राजकन्या परंपरा मोडणारी वाटली, तर काहींना दार उघडणारी. दोन्ही बाजूंनी दृश्य एकच पाहिले, पण त्यांच्या नीतिमत्तेचे अर्थ वेगळे होते.

परंपरा लोकांना एकत्र बांधतात, की काही लोकांना कायमचे उंबरठ्याबाहेर ठेवण्याचे साधन बनतात? स्थैर्य आणि उपेक्षेतील खदखद एकाच दोरीने किती काळ बांधून ठेवणार?

वेताळ उपहासाने हसला, “राजन, सांग! तुझ्या कन्येने नियम मोडला नाही, आत घुसण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त उंबरठ्यापाशी उभे राहून व्यवस्थेच्या तोंडावर एक टोकदार प्रश्न फेकला. तरीही संपूर्ण राज्य अस्वस्थ झाले! मग दोष तिचा, की त्या प्रथेचा जिने तिला जन्मापासून बाहेर ढकलले? आणि जी परंपरा शांततेच्या नावाखाली काही लोकांना कायमचे बेघर करते, ती खरोखर शांतता असते की केवळ दडपून ठेवलेला विद्रोह?”

रा्जा म्हणाला, "परंपरा कालसुसंगत आणि सर्वसमावेशक असेल तर समाजात स्थैर्य निर्माण करते अन्यथा असंतोष... "

राजाचे उत्तर ऐकून वेताळ खूष झाला, पण राजाचा मौनभंग झाल्याने प्रेतासह झाडावर जाऊन लोंबकळू लागला.

Node read time
3 minutes