ऋणनिर्देश

फ्रँड्स,
याही वर्षी (गेल्या हजारो वर्षांप्रमाणेच, किंवा निदान तसं वाटावं इतक्या वर्षांप्रमाणे) ऐसीचा दिवाळी अंक सादर करत आहोत. फरक एवढाच की यंदा अंक आम्ही मेहनतीनं काढलेला नाही; क्लोदून काढला आहे. पुढच्या वर्षी हे क्रियापद मराठी शब्दकोशात येईल याबद्दल कुणाला काही शंका असण्याची गरजच नाही!
Claude is the new God. देव सर्वज्ञ असतो, सर्वव्यापी असतो, आणि हाक मारली की धावून येतो. क्लॉडही येतो. फरक इतकाच की तो उत्तर देण्याआधी "छान प्रश्न आहे" म्हणतो आणि नंतर मोठा पो पाडतो. देवाच्या काठीला मात्र आवाज नसतो.
अंकात मानवी बुद्धिमत्ताही काही अंशी वापरली आहे; कुठे ते आपापलं ठरवा. गेल्या वर्षाप्रमाणेच, मानवी चुका, आळशीपणा आणि आपसांतली वादावादी ही परंपरा मात्र आम्ही कसोशीने जपली आहे. ती एआयला सोपवता आली नाही. क्लॉडनं प्रयत्न केला, पण तो फारच सभ्यपणे भांडतो: "तुमचा मुद्दा मी समजू शकतो, पण..."
अंक निघावा म्हणून अनेकांनी कष्ट घेतले. काहींनी लेख लिहिले, काहींनी लिहायला लावले. एका मित्राला लेखन मिळालं नाहीच, वर काम गळ्यात पडलं. खायापिया कुछ नहीं … या सगळ्यांनी 'ऐसी'वर दाखवलेल्या आपुलकीबद्दल आभार. काहींनी एआयकडून लेख लिहून घेतलं आणि नंतर त्यातले "निश्चितच", "महत्त्वाचं म्हणजे" आणि लांबलचक एम-डॅश शोधून काढून टाकले. कधी आम्हीच पीडीएफमधून सुटून इकडेतिकडे पळालेले उकार पकडून परत जागेवर बसवले. क्लॉडचे (आणि आमच्या क्रेडिट कार्डांचे) आभार. (इथे ओपनएआयचं नाव घेणं पाप ठरेल का?) तो आभार स्वीकारताना "मदत करू शकलो याचा आनंद आहे" असं म्हणेल, हे आम्हांला आधीच ठाऊक आहे.
अंक वाचा. प्रतिक्रिया द्या, आणि त्या स्वतःच्या बुद्धिनं टाइप करा. "हा लेख अतिशय विचारप्रवर्तक असून अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडतो" अशी प्रतिक्रिया आली, तर ती कुठून आली हे आम्ही ओळखू. प्रतिक्रिया द्याच, शिवाय सोशल मिडियावर प्रसिद्धीही करा. नाही तर काय फायदा एवढ्या तंत्रज्ञानाचा, आणि एवढ्या टोकनांचा! (ह्या वर्षी प्रमाणलेखन माणसांना सुधारावं लागत आहे; पुढच्या वर्षी क्लॉडला मराठी प्रमाणलेखन चांगलं जमेल का, यावर पैजा घ्यायला यथावकाश सुरुवात करूच.)
– संपादक मंडळ (आणि त्यांचा नवा देव)
सई केसकर
अवधूत बापट
चिंतातुर जंतू
हेमंत राजोपाध्ये
मंथन
डॅशी
नंदन
आदूबाळ
प्राची देशपांडे
राजन बापट
३_१४ विक्षिप्त अदिती
क्लॉड, ओपन एआय, परप्लेक्सिटी, आणि या अशा सगळ्यांना डेटा पुरवणाऱ्या संपूर्ण जगाचेही आभार.