Skip to main content

त्सुंडोकूच्या निमित्तानं स्थलांतरित लोकांच्या नाटकांविषयी काही!


पूर्वपीठिका : पोझनान / पोझेन हे पोलंड देशाच्या पश्चिमेला असलेलं एक महत्त्वाचं शहर. हजारपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असलेलं, राजधानीचं, आणि बटाट्याच्या अनेक प्रजाती पिकवणारं शहर. भौगोलिकदृष्ट्या बर्लिन-पोझनान-वॉर्सा ही तिन्ही शहरं जवळजवळ एका रेषेवर येतात आणि पोझनान बऱ्यापैकी मध्यावर येतं.

 

आमच्या शहरात छोटी-मोठी अशी बरीच थिएटरं आहेत, तसंच अनेक सांस्कृतिक संस्था आहेत. बराक कुलतुरं (Barak Kultury) ही अशीच एक सांस्कृतिक संस्था. शहरात पूर्वी एका मैदानात काही जुन्या बराकी होत्या; त्या सैन्यासाठी वापरल्या जायच्या. नंतर तिथे विविध सांस्कृतिक संस्थांसाठी जागा देण्यात आली. या संस्थेची सुरुवात तिथे झाली असल्यानं बराक हे नाव त्यांना योग्य वाटलं. ही संस्था गेली वीस वर्षं तरी कार्यरत आहे. या संस्थेचा प्रमुख प्शेमंस्लाव्ह प्रासनोव्स्की हा मुळात इथल्या विद्यापीठाचा कल्चरल स्टडीजचा विद्यार्थी. त्यामुळे बहुसांस्कृतिकतेचं, बहुभाषिकतेचं महत्त्व त्याला चांगलं ठाऊक आहे. विविध देशांतल्या, वेगवेगळ्या संस्कृतींमधून आलेल्या लोकांना, कलाकारांना एकत्र करून काही तरी रोचक कलानिर्मिती करण्यावर ही संस्था भर देते. मी या संस्थेशी साधारण २०१९पासून संलग्न आहे. मी या संस्थेसोबत आजवर केलेल्या विविध उपक्रमांबद्दल सांगायचं तर विजयदान देथा यांच्या 'दुविधा' या कथेची पोलिश रंगावृत्ती तयार करून त्याचे काही एकपात्री प्रयोग आम्ही केले आहेत; तसंच एक-दोन राजकीय सामाजिक (न-)प्रहसनांचे प्रयोग. एका प्रोफेसरसाहेबांच्या संगीत, इतिहास, समाजकारण यावरच्या एका व्याख्यान-शृंखलेत मी काही वाद्यं वाजवून त्यांना साथ द्यायचो. खास मुलांसाठी काही पारंपरिक भारतीय गोष्टी सांगण्याचा, किंवा खरं तर त्यांच्याकडून करून घेण्याचा आमचा एक परफॉर्मन्स असे काही उपक्रम सांगता येतील.

 

वादन स्केचयुक्रेनवरील रशियन आक्रमणानंतर युक्रेन-व्हाइट रशिया या देशांमधून अनेक स्थलांतरित पोलंड देशाच्या विविध भागांत आले. आमच्याही शहरात पुष्कळ स्थलांतरित आले. त्यातले काही मुळात कलाकार म्हणून आधीपासून कार्यरत होते, तर काही लोक हौसेखातर काहीबाही करत होते. तर हळूहळू या संस्थेत असे समानशील स्थलांतरित जमा होऊन त्यांचा एक नाट्यग्रुप तयार झाला, तसंच एक क्वायर आणि लोकसंगीतवाला ग्रुप तयार झाला. काही व्हिज्युअल आर्टिस्टही आले. ओल्हा केबास ही युक्रेनच्या विद्यापीठात शिकवणारी एक नर्तकी. जगभरातच जबरदस्तीनं स्थलांतर कराव्या लागलेल्या लोकांना अनेक वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावं लागतं आणि ही परिस्थिती स्त्रिया आणि कलाकार यांच्याबाबत तर फारच निराळं रूप धारण करते. नवीन देशात आल्यावर काम शोधणं, घर शोधणं, पैसे कमावणं, स्थिरस्थावर होणं यांतच आधी त्यांची सगळी शक्ती पणाला लागते. त्यासाठी त्यांना जे पडेल ते काम करावं लागतं. कलानिर्मितीच्या कोणत्याही टप्प्यावर मनुष्य असला तरी आपल्या कलेच्या सरावापासून जबरदस्तीनं वंचित राहावं लागणं हे फार क्लेशदायी! तर ओल्हासोबत आम्ही पहिला परफॉर्मन्स केला त्याचं शीर्षक Exit. यामध्ये तिनं एक प्रकारे स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची आणि अर्थातच रशियन आक्रमणाची कहाणी प्रामुख्यानं नृत्यरूपात दाखवली. हा एक प्रकारे मल्टिमीडिया परफॉर्मन्स आहे असं म्हणता येईल. रशियन बॉम्बवर्षावामध्ये त्यांचं घर उद्ध्वस्त झाल्याचे फोटो तसंच तिच्या परिवाराचे फोटोही यात येतात. विविध राजकीय विचारसरणींमुळे एकाच कुटुंबात उभ्या राहिलेल्या भिंतींबद्दलही हा परफॉर्मन्स बोलतो. मी यात लाईव्ह संगीत देतो. त्यात प्रामुख्यानं बेस क्लॅरिनेट, झीथर आणि इतर काही वाद्यं वाजवतो. याचे प्रयोग आम्ही २०२३पासून करत आहोत. यानंतर गेल्याच वर्षी आम्ही एक नवीन परफॉर्मन्स बांधला. त्याचं पोलिश शीर्षक आहे Sploty, म्हणजे वीण (इथे गुंतागुंत). यामध्ये आम्ही युद्धजन्य परिस्थितीमुळे जबरदस्तीनं स्थलांतर करावं लागलेल्या मनुष्याच्या दृष्टीतून घर म्हणजे काय, तो घर कसा शोधतो, मायदेशातल्या उद्ध्वस्त झालेल्या घराकडे आज तो परदेशातून कशा प्रकारे पाहतो हा प्रमुख विषय होता. यातही मी संगीत करतो, पण यासोबत थोडं नृत्य आणि लाईव्ह रेखाटनंदेखील करतो. थोडक्यात मी, ओल्हा आणि प्शेमंस्लाव्ह असं त्रिकूट (आणि आमच्यासोबत उत्तम टेक्निकल साथ देणारा मित्र कामिल) गेली काही तीन-चार वर्षांपासून सोबत मजेदार काम करत आहोत.

तर या वर्षी आम्ही Tsundoku (त्सुंडोकू) अशा चमत्कारिक नावाचा एक नवीन नाट्यप्रयोग केला. त्याची भाषांतरित संहिता दिली आहेच. पुढे या प्रयोगाबद्दल काही सांगण्याचा प्रयत्न आणि त्या अनुषंगानं एकूणच नाट्य, कला, संस्कृती वगैरे वगैरे संदर्भात काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो.

**

त्सुंडोकूची किंचित फिक्शनल रोजनिशी :

 

जुलै :

१० किंवा ११ जुलै : प्शेमंस्लाव्ह (याला आपण सोयीसाठी बोलीभाषेत प्शेमेकच म्हणू यात) तर प्शेमेकचा फोन येतो. परफॉर्मन्सची एक नवीन (अंधुक किंवा अर्धीमुर्धी) कल्पना आहे. तुला कधी वेळ आहे भेटायला? भेटण्याची तारीख आणि वेळ ठरते. पुढच्या आठवड्यात भेटायला जायचं आहे.

उत्सुकता!

 

१६ जुलै : ऊन पुष्कळ आहे. दुपारी चारच्यानंतर आम्ही तिघे बराकच्या ऑफिसात भेटतो. वाढत्या उन्हाबद्दल तक्रारी करत, थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी करत मुख्य चर्चेला सुरुवात होते. मूळ कल्पनाबीज ओल्हाला सुचलेलं असतं. त्याबद्दल तिनं प्शेमेकला काही सांगितलेलं असतं, त्यांची त्यानंतर काही वेळा चर्चा झालेली असते आणि त्यावरून ती कल्पना पुढे वाढवत नेलेली असते. मला पहिल्या बैठकीत सर्व समजत नाही. पण जे काही समजलेलं असतं ते असं. त्सुनडोकू म्हणजे पुस्तकं जमा करण्याचा छंद! ही जपानी संज्ञा आहे. काही लोक अनेक प्रकारची पुस्तकं विकत घेतात आणि अधूनमधून थोडीथोडी वाचतात. ओल्हा खुद्द याच प्रकारची वाचक आहे. पण या सवयींमधून इंगित असं करायचं आहे की जगामध्ये काही लोक हे अधले-मधले असू शकतात, म्हणजे संपूर्ण वाचक नाहीत किंवा अमुक एकाच विषयातील सखोल ज्ञान असलेले नाहीत तर थोडीथोडी माहिती असणारे, कोणतीच बाजू पूर्णपणे ना घेणारे, पर्यायानं राजकीय विचारसरणीच्या संदर्भात ना पक्के डावे ना पक्के उजवे, हेच त्यांच्या स्व-ओळखीबद्दलही म्हणता येईल. काही लोक स्वतःला पूर्णपणे अमुकतमुक देशाचा अमुकतमुक नागरिक मानत नसतील तर अशा लोकांचं काय? अशा लोकांकडे प्रस्थापित व्यवस्था कशा प्रकारे पाहते, किंवा असे लोक प्रस्थापित व्यवस्थेसमोर आल्यावर त्यांच्यामध्ये कशा प्रकारे संवाद किंवा विसंवाद होऊ शकतो! आणि या निमित्तानं आपल्याला दोन्ही प्रकारच्या लोकांचे काही ओळखी-अनोळखी पदर शोधता येतील का? तर प्रयोगाची सिच्युएशन अशी की अशी एक स्थलांतरित स्त्री युद्धाच्या पार्श्वभूमीवर नवीन देशात (पोलंड) आसरा शोधते आहे. ती इमिग्रेशन ऑफिसमध्ये येते. ऑफिसर तिला अर्थातच प्रश्न विचारतो, पण ती काहीच बोलत नाही. संपूर्ण प्रयोगभर ती काहीच बोलत नाही. मला एकदम रुजेविच आठवतो, पण तरी मी अजून काहीच बोलत नाही. (तादेऊष रुजेविच हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि माझा आवडता पोलिश नाटककार.) पुढे समजतं की माझ्यासाठी यात कोणता तरी रहस्यमय रोल असणार आहे. यातही मला लाईव्ह संगीत द्यायचं आहे. त्यासाठीच्या नवनवीन कल्पना काय असू शकतील यावर विचार करून त्या कल्पना पाठवायच्या आहेत.

नाटकवाचनमुळात मला स्वतःला राजकीय प्रहसनं किंवा राजकीय टीका-टिप्पणी करणारी नाटकं फारशी आवडत नाहीत आणि समजतही नाहीत. अशा प्रकारच्या नाटकांमध्ये मी अर्थातच कामं केलेली आहेत, असे अनेक प्रयोग विविध भाषांत पाहिलेलेदेखील आहेत, त्यासंदर्भात वाचन वगैरेही केलेलं आहे, तरी तो माझा पिंड अजिबात नाही. अर्थातच जर संगीत द्यायचं असेल तर मग आपण लगेच तयार! असो! संहिता अजून तयार नाही अर्थातच, पण लिहिण्याचं काम सुरू आहे. प्रयोगाची तारीख मात्र ठरलेली. सप्टेंबरच्या Druga Próba (द्रुगा प्रुबा, म्हणजे दुसरा प्रयत्न) या स्थलांतरित लोकांच्या फेस्टिव्हलमध्ये याचा प्रयोग करायचा आहे. म्हणजे अंदाजे सप्टेंबरच्या मध्यात! हा फेस्टिव्हल गेल्या वर्षी सुरू झाला. प्शेमेक म्हणतो आहे की आणखीही काही लोक यात येतील. त्या संभाव्य कलाकारांची नावं प्शेमेक सांगतो. नवीन लोकांबरोबर काम करायला मिळेल हा एक आनंदाचा मामला!

 

एकूण सर्व ब्रीफ पूर्ण झाल्यानंतरच्या किंचित स्तब्धतेत मी पुष्कळ आनंदानं पण हलक्या आवाजात म्हणतो की मला यात रुजेविच दिसतो आहे किंवा त्याचा वास येतो आहे. यावर प्शेमेक नुसताच हसतो. यावर ओल्हाचा प्रश्नार्थक चेहरा पाहून आम्ही दोघे तिला रुजेविचबद्दल काही सांगतो. त्याचं एक पुस्तक घेऊन तुझ्या संग्रहात ठेव, म्हणजे तुझ्या त्सुनडोकूत भर पडेल असं मी तिला गमतीनं म्हणतो. या चर्चेच्या वेळी ओल्हानं तिच्याकडची काही पुस्तकं आणलेली असतात. काही पुस्तकांमध्ये अर्थातच अनेक पानांवर खुणा असतात. ती त्या त्या पुस्तकातील खुणेचे कागद उघडून त्यातले तिचे आवडते उतारे वाचते. यात पोलिश, युक्रेनियन, रशियन, इंग्लिश अशा भाषांतली पुस्तकं असतात. त्यातले काही उतारे, सुविचार प्रयोगात येऊ शकतील असं दोघेही म्हणतात. ही कल्पना मला एक तर समजत नाही किंवा फारशी आवडत नाही. पण एकूण प्रयोग कसा होईल, कसा दिसेल, त्यात काय नवीन करता येऊ शकेल याबद्दल विचार करायला मजा वाटू लागते.

 

चला! म्हणजे एकूणात बऱ्यापैकी बोरिंग चाललेल्या उन्हाळ्यात काही तरी मजेदार होणार तर!

 

घरी येऊन मी काही छोटी-मोठी वाद्यं काढतो. आधी काही वाजवून पाहतो. मग एक कल्पना सुचते. त्यात हे रहस्यमय पात्र एका छोट्या गाडीत बसून, किंवा मिरवणुकीच्या गाडीसारख्या मोठ्या चाकांच्या गाडीत बसून येतं, अशी माझी काही कल्पना होते. या गाडीत अर्थातच अनेक वाद्यं ठेवलेली आहेत. तर यात एक चमत्कारिक असं वाद्य आहे ते म्हणजे पुस्तकांचा ड्रम सेट! कल्पना मला सुचते आणि मी घरातली काही पुस्तकं एकावर एक रचून, काही मोठ्या पुस्तकांची पानं उघडी ठेवून त्यावर ड्रमस्टिकनं वाजवूनही पाहतो. काही मजेदार गोष्टी, ध्वनी त्यातून निर्माण होऊ शकतात. अर्थातच यात काही प्रॅक्टिकल प्रश्न आहेत. ते सोडवता आले तर बेष्ट! तर काही एक नवीन मजेदार कल्पना सुचल्याच्या आनंदानं आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखं होतं.

 

(दुसऱ्या दिवशी मी मेसेंजरवर या माझ्या पुस्तक ड्रम सेट कल्पनेबद्दल लिहितो आणि दोघांना त्याबद्दल विचारतो. दोघांनाही कल्पना आवडते.)

 

**

रुजेविचची आठवण निघालीच होती तर त्याची नाटकं पुन्हा वाचू या असं एक वाटतं, पण इतर काही कौटुंबिक कामांमुळे आणि इतर कार्यक्रमांच्या गडबडीत जमत नाही आणि तसा मूडही लागत नाही. तरी पुस्तकांच्या ड्रम सेटची कल्पना मला फारच आवडलेली आहे. याच आठवड्यात त्यावर आणखी प्रयोग करून काही नवीन ट्रिक, नवे ध्वनी सापडतात.

 

**

मेसेंजरवर आमच्या काही छोट्या-मोठ्या चर्चा सुरूच असतात. यात एक महत्त्वाचा विषय म्हणजे संहिता लिखाण! माझी अपेक्षा असते (एक प्रकारे पारंपरिक) की संहिता आधी तयार हवी, त्यात लेखकानं इतरांशी चर्चा न करता स्वतः ती संहिता लिहावी आणि प्शेमेक मात्र आम्हाला प्रसंग सांगून, त्याबद्दल आमच्या प्रतिक्रिया घेऊन लिहितो आहे हे मला आवडत नाही. या प्रक्रियेची सवय आहे, तरीही माझी काहीशी अपेक्षा असते, की जर असं नवीन आणि खरोखरीच इंटरेस्टिंग कल्पनाबीज मिळालं आहे तर त्यावर एका लेखकानं किंवा नाटककारानं त्याच्या पद्धतीनं संपूर्ण संहिता लिहावी आणि साहजिकपणे तोच जर दिग्दर्शक असेल तर प्रयोग बसवताना काही बारीकसारीक बदल करावेत. कारण आमच्या चर्चांमध्ये प्रत्येकाचा पिंड, दृष्टिकोण आणि मुख्य म्हणजे नाटक या संकल्पनेकडे पाहण्याची दृष्टी अगदी भिन्न असल्यानं काही एकवाक्यता दिसत नसते. अशा वेळी मी फार बोअर होतो आणि उगाच वेळ वाया चाललाय असं वाटत राहतं. तरी संहितेचा पहिला खर्डा मिळण्याची उत्सुकता असतेच!

**

 

जुलैचा शेवटचा आठवडा :

नृत्य स्केचप्रथेप्रमाणे मेसेंजरवर त्सुनडोकू समूह तयार होतो. त्यामध्ये फिलिप, डोरा, मोनिका, ओला असे लोक ॲड होतात. त्यातली डोरा मला माहीत असते. कारण दोन-तीन महिन्यांपूर्वीच तिचं चित्रप्रदर्शन पाहिलेलं असतं. डोरा, मोनिका यांची मिक्सर टीम नेपथ्य आणि वेशभूषा पाहणार असतात. प्रकाश, ध्वनी आणि इतर काही तांत्रिक गोष्टी नेहमीप्रमाणेच कामिल आणि प्शेमेक पाहणार असतात. ओला (या आमच्या प्रोजेक्टमध्ये ओला, ओल्गा किंवा ओल्हा अशा सेम टू सेम नावाच्या दोन-तीन मुली असल्यानं कधी कधी बारीक घोळ होत असत, हा एक वेगळाच मुद्दा!) ही अनुभवी चेलोवादक. तिचं वादन मी यापूर्वी एकदा किंवा दोनदा ऐकलेलं असतं. सर्व टीमची पहिली भेट होते. फिलिप या नवीन तरुण नटाला भेटून मस्त वाटतं. पहिल्या भेटीत सर्व जण वेगवेगळ्या कल्पना एकमेकांना सांगतात, चहा आणि कॉफी पितात. खरं तर जगभरात अनेक नाटक ग्रुप कधी तरी पहिल्यांदा भेटतातच. त्यांच्या या पहिल्या भेटीमध्ये बरंच नाट्य अनुभवायला मिळू शकतं. पहिल्या भेटीत संहितेची रूपरेषा वाचायला मिळते. प्शेमेकनं प्रसंगांचा आराखडा चांगला बनवला आहे असं प्रथमदर्शनी तरी मला वाटतं, पण तरी अजून त्यात पुष्कळ भर घालायला हवी असं मला वाटतं आणि चर्चेच्या ओघात मी हे कधी तरी बोलूनही दाखवतो. त्याला फिलिपची मिळालेली साथ पाहून हा नाटकाकडे कसा पाहत असावा हे मला स्पष्ट होतं आणि एकमेकांना ओळखण्याचे असे क्षण फार मजेशीर आणि आनंददायी असतात. तो त्याचे काही संवाद वाचतोदेखील. आम्ही आमचा एक प्रसंग पहिलं वाचन म्हणून बेसिक प्रकारे वाचतो. त्याची वाचनाची पद्धत, त्याची शारीर भाषा मला त्याच्या नाटकाच्या दृष्टिकोणाबद्दल आणि अनुभवाबद्दल बरंच सांगून जाते. या भेटीत मला समजतं की मला यात संगीत करायचं नाही. त्याची संपूर्ण मदार ओलावर (चेलोवादक) आहे. यानं मला थोडं वाईट वाटतं; त्या मिरवणुकीच्या गाडीवाल्या कल्पना माझ्याच मनात आणि कागदावर राहतात. पहिल्या भेटीसाठी मी काही छोटी-मोठी वाद्यं आणलेली असतात. तीदेखील मी बाहेर काढत नाही. याचा दुसरा पैलू किंवा फायदा असा, की फक्त संवादांवर, अभिनयावर लक्ष केंद्रित करता येईल.

 

यानंतर त्याच आठवड्यात एकामागोमाग एक तालमीची छोटी-मोठी सेशन असतात. प्रत्येकाची वेळ घेऊन प्शेमेक त्या तालमींचं एक वेळापत्रक मेलवर पाठवतो. कोणत्याशा तालमीआधी डोरा आम्हाला तिच्या स्टुडिओ रेसिडेन्सीमध्ये बोलावते. चेलोवादक ओला आणि ती मिळून कधी कधी तिच्या स्टुडिओवर जमतात आणि ओला चेलो वाजवते; सोबत डोरा पेंटिंग करते. तर मला आणि ओल्हाला त्या दोघी बोलावतात. मी डफ घेऊन जातो आणि मग स्टुडिओमध्ये चेलो-डफ असं काही मजेदार इम्प्रो करत त्यावर ओल्हा नृत्य करते. खुद्द तालमींच्या आधी अशी मजा!

 

सुरुवातीची सेशन छोटी असल्यानं अजून फार पकड घेत नाहीत. त्यातून संहिता अजून पक्की नसते, संवाद थोडे थोडे बदलत राहतात. पुढच्या महिन्यात मोठ्या आणि नियमित तालमी होतील तेव्हा अधिक एकसंध काम होईल.

 

ऑगस्ट - मेसेंजर-चर्चा-तालमी-तारखा-तालमीतालमीतालमी

 

१२ किंवा १४ जुलै :

 

तालमी स्केचतुकड्या-तुकड्यांत काम सुरू असल्यानं एकसलग अशी तार लागत नाही. त्यात टेक्निकल गोष्टी आल्या की सहनशीलतेच्या वेगवेगळ्या लेव्हलच्या परीक्षा आल्याच! सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तालमी करण्याची जागा बऱ्यापैकी लहान आहे आणि प्रयोगाची जागा पुष्कळ मोठी असणार आहे. आमच्या शहरात दरवर्षी माल्टा फेस्टिव्हल असतो. त्या फेस्टिव्हलचं ऑफिस म्हणजे एक मोठा हॉल, शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. हा हॉल बराच मोठा, मोकळाढाकळा म्हणावा असा आहे. आमच्या तालमी मात्र बराकच्या छोट्या ऑफिसात किंवा स्टेजवर होणार! त्यामुळे अनेक गोष्टी प्रॉक्सी प्रकारे कराव्या लागतात, किंवा आता इथे या प्रकारे हालचाली करू, पण तिथे मात्र वेगळ्या प्रकारे वावरावं लागेल, अशा सूचना दिग्दर्शक आपल्याला आणि आपणही स्वतःला देत असतो. दुसरं असं, की सध्याच्या या तालमींच्या टप्प्यात सर्वच जण एकाच वेळी हजर नसल्यानं कधी कोणी कुणाचे संवाद वाचतो आहे आणि दुसऱ्या अभिनेत्याला क्यू देतो आहे, पुन्हा ते संवादही अजून अगदी पक्के फायनल असे नाहीत, तर कधी गेल्या तालमीत अनुपस्थित असलेल्या नटाला आधी गेल्या तालमीत केलेले बदल समजावून सांगणं, ते त्याला समजून, त्याला मान्य होऊन त्यानं पुन्हा नव्यानं काम सुरू करणं, या सर्व प्रकाराला वेळ लागणं – अशी एकूण अनिश्चितपणाची, तात्पुरतेपणाची स्थिती! अशा वेळी अडकून व्हायला होतं किंवा जास्त निराश व्हायला होतं कारण झोकून देऊन काम करता येत नाही. पोहण्याची अनिवार ऊर्मी आलेली असताना काही कारणानं आपल्याला कधी कधी मुद्दाम उथळ पाण्यातच डुंबत राहावं लागावं, लाटा येत असूनही त्यावर स्वार होता येऊ नये आणि खोल पाणी अगदी हातभर अंतरावर असलं तरी त्यात जाता येऊ नये तशी काही तरी स्थिती! अशा अवस्थेत दिग्दर्शकदेखील थोडा बिचारा होतोच! अनुपस्थित लोकांवर त्याला काम करता येत नाही आणि उपस्थित लोकांवर चांगलं काम करायचं असेल तर अनुपस्थित लोकांची अनुपस्थिती अधिकच खोल जाणवते आणि त्यामुळे उपस्थित लोकांना तो तालमीचा वेळ भरून काढण्यासाठी कधी काही चमत्कारिक किंचित इर्रेलेव्हंट गोष्टी करायला लावतो. अर्थात अशा प्रकारचे अनुभव हे काही नवीन नाहीत, तरीही कधी एकदा सलग, संपूर्ण संचात आणि प्रयोगाच्या जागी तालमी होतील याची मी मनापासून वाट पाहतो आहे.

 

अधूनमधून काही रेखाटनं होत राहतात ही एक मस्त बात!

 

अवांतर : आज तालीम संध्याकाळी सव्वासहाच्या आसपास संपते. बाहेर सूर्यग्रहणाचे वेध लागलेले असतात. तालमीनंतर दमून गेलो असल्यानं मुद्दाम सूर्यग्रहण पाहण्यासाठी प्रवास करून थोडं बाहेर जाणं शक्य नाही. ओला सुचवते, की आपण इथल्या एमएम गॅलरीच्या मोठ्या बाल्कनीत जाऊन पाहण्याचा प्रयत्न करू. मग आमचं सामान, चेलो वाद्य (अर्थात केसमध्ये टाकून), आम्ही तालमीच्या जागेला लागून असलेल्या एमएम गॅलरीच्या दुसऱ्या मजल्यावर जातो. तिथे बऱ्यापैकी लोक आलेले असतात. एका छोट्या मुलाच्या हौशी आणि हुशार आईबाबांनी साध्या बुटाच्या बॉक्सपासून पिनहोल कॅमेरा बनवलेला असतो. त्यामधून आम्ही सर्व आळीपाळीनं जितकं दिसेल तितकं सूर्यग्रहण पाहतो, थोडं सूर्यमालेबद्दल वगैरे बोलतो. ओलाच्या वाद्याची भलीमोठी केस पाहून तो छोटा मुलगा उत्सुकतेनं काही प्रश्न विचारतो. ओला आणि मी त्याला चेलोबद्दल गमतीगमतीची माहिती देतो.

 

१८ ते २० किंवा २१ ऑगस्ट :

 

आता दोन-तीन प्रसंग बऱ्यापैकी बसत आले आहेत, म्हणजे त्यांचा आराखडा तरी समजला आहे नीट. त्यामुळे आधीपेक्षा जास्त मजा येत आहे, प्रवाहीपणा वाढल्यासारखा वाटतो आहे. ओला नियमितपणे तालमीची रेकॉर्डिंग करून मेसेंजरवर पाठवते आहे, त्यामुळेदेखील पुष्कळ गोष्टी सोप्या होत आहेत. अर्थात, रेकॉर्डिंगची सोय होण्यापूर्वीच्या तालमी म्हणजे तीस-चाळीस वर्षांपूर्वीच्या आणि आजच्या यात फरक आहेच. रेकॉर्डिंग पाहून आपल्या कामात सुधारणा करणं थोडं सोपं होतं किंवा त्याचे वेगळे पैलू आपल्यासमोर येतात. खेळाडू, कलाकार अशा सर्वांनाच याचा फायदा होतो. पण तरीही प्रत्यक्ष काम करताना आपलं आपल्यावर लक्ष असणं, आपल्या स्टेजवरच्या हालचाली, आवाजाचा लगाव, इतर सहकलाकारांच्या हालचालींविषयी, आवाजाविषयी असलेली जागरूकता यावर (सुदैवानं अजूनही) आपल्या स्वतःलाच काम करावं लागतं. यासंदर्भात फारसं प्रगत तंत्रज्ञान नसण्याच्या जुन्या काळातील अनेक जुने अभिनेते, गायक यांची आपल्या कामाविषयी असलेली जागरूकता, निष्ठा ही किती मोलाची गोष्ट होती हे प्रकर्षानं जाणवतं.

 

ओलाकडे सध्या असलेला चेलो जुना आहे आणि या प्रयोगात इलेक्ट्रॉनिक चेलो वापरावा की अकूस्टिक यावर बहुतेक प्रत्येक तालमीत बारीकशी चर्चा होतेच, स्वतः ओलादेखील द्विधा मनस्थितीत आहे. त्यातून तालमीच्या जागेत ज्याला आम्ही कार्टन (पुठ्ठा) साउंड म्हणतो (म्हणजे बसका) तसा येत असल्यानं प्रयोगाच्या जागेतल्या हॉलमध्ये कोणतं वाद्य योग्य होईल हा एक मोठा प्रश्न या संपूर्ण तालमीच्या काळात कायम आमच्या सोबत राहणार असं दिसतंय. आम्हां सहकलाकारांना त्या वाद्याची सवय होणं महत्त्वाचं, खासकरून नृत्य करणाऱ्या ओलासाठी.

 

सप्टेंबर - प्रयोग :

 

प्रयोग जवळ येत आहे तसतशा तालमीदेखील जोरात सुरू आहेत. पहिले तीन प्रसंग चांगले बसले असून त्याला फायनल स्वरूप आल्यानं त्यात प्रवाहीपणा येत आहे. मजा येत आहे. एका तालमीला मिहालीना (बराकीची निर्देशिका) म्हणते, "मंदार, तू जरा जास्तच चांगलं पोलिश बोलतोस. संवादांमध्ये काही वाक्यं अशी आहेत जिथे कच्चं पोलिश जास्त चांगलं वाटेल." तिचं म्हणणं बरोबर आहेच. त्या दृष्टीनं मी प्रयत्नदेखील करतो. हळूहळू ते जमू लागतं. पण हा खरोखरीच अत्यंत रोचक मामला आहे. म्हणजे एक स्थलांतरित म्हणून मनुष्य कशा प्रकारची भाषा मंचावर बोलतो, त्यानं ती भाषा कशा प्रकारे बोलली पाहिजे, त्याच्याकडून कोणत्या प्रकारच्या अपेक्षा असतात, त्याला स्वतःला या विदेशी भाषा (तीदेखील मंचावरची) बोलण्यात कोणती आव्हानं येतात आणि त्याच्या किती वेगवेगळ्या छटा असू शकतात हा फार मजेदार विषय आहे. कारण मंचावर बोलली जाणारी भाषा आणि उच्चारांचा समाजात अस्तित्वात असलेला लसावि यांचा खूप जवळचा संबंध असतो. त्यातून चांगली भाषा येत असताना मुद्दाम चुकीचा टोन लावणं हे म्हणजे बऱ्यापैकी स्वरात गाता येत असेल तर मुद्दाम बेसूर गाण्यासारखं आहे. अर्थात या ठिकाणी पुलंची आठवण येणं अनिवार्यच! कारण त्यांच्यासारखा सुरांची जाण असूनही इतकं उत्तम बेसूर गाण्याची नक्कल करू शकणारा मनुष्य कदाचित आजवर झाला नसेल! तरी या विषयावर आम्ही तालमींमध्ये पुष्कळ बोलतो. पोलिश रंगभूमीवरील मोठे मोठे नट (त्यात खासकरून होलोउबेकचा उल्लेख होतोच!), काही गायक, त्यांचे खास उच्चार, त्यांची खासियत आणि आजचं आपल्याभोवती बदलणारं उच्चारांचं जग, प्रेक्षक किंवा श्रोतावर्ग यांच्यातर्फे याचं रसास्वादन कसं होतं अशा काही घटकांवर आम्ही बोलतो. आज आपल्या मायदेशात, शहरात सर्वसाधारणपणे बोलली जाणारी भाषा आणि मंचावरची भाषा नक्की कशी असेल याबद्दल मला कुठे तरी खोलवर प्रश्न पडत राहतात. काहीच दिवसांपूर्वी रॉय (माझा १७ वर्षांचा मुलगा, चित्रकलेचा विद्यार्थी आणि फिल्मची आवड असणारा, अधूनमधून फिल्म बनवणारा!) आणि मी एक जुनी पोलिश फिल्म पाहत असताना भाषेच्या मुद्द्यावर बोललेलो असतो. खूप मागे त्याला सिंहासन चित्रपटातले काही प्रसंग दाखवत असताना जुनी मराठी, तिचे खास नाटकी ढंगाचे उच्चार याबद्दलही आमची छोटी चर्चा झालेली असते.

 

तालीम पुढे चालू राहते. चुकीच्या किंवा मजेदार उच्चार करण्याच्या काही जागा सापडतात. त्या बहुतेक सर्वांनाच चांगल्या आणि योग्य वाटतात.

 

आता माल्टा फेस्टिव्हलच्या मोठ्या हॉलमध्ये तालमी सुरू होतात. जीव भांड्यात पडतो. जिथे प्रयोग तिथेच तालमी :) एव्हाना आमच्या टीममध्ये दोन मुलींची भर पडलेली असते. येल्जव्येता आणि डोमिनिका. या दोघी इथल्या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थिनी. त्यांच्या उन्हाळी प्रॅक्टिकलच्या निमित्तानं त्या आम्हांला मदत करत असतात, पण त्यांना फिलिपच्या ऑफिसमधल्या सहकारिणींचा रोल मिळतो. यामुळे प्रयोगाचं डायनॅमिक्स (याला मराठीत काय म्हणणार हा प्रश्न मला कायम पडलेला आहे!) रंगू लागतं. दोघींना नाटकात काम करण्याचा फारसा अनुभव नसल्यानं त्यांच्या काही मजेदार शंका ऐकायला पण मजा वाटते. एव्हाना सर्वच प्रसंग बसलेले असल्यानं एकामागोमाग त्यांची तालीम करता आल्यानं आनंद वाढतो आहे. त्यामुळे एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात जाणं, दोन्ही प्रसंगांच्या तापमानानुसार स्वतःचा आवाज लावणं हे सोपं होत आहे. प्रयोग करण्यातला खरा आनंद कोणता असेल तर हा!

 

नेपथ्य आणि वेशभूषा यांची रंगसंगती छान जमते आहे. माल्टा फेस्टिव्हलचा हा हॉल गुलाबी रंगाचा असल्यानं त्यात प्रकाशयोजना करणं थोडं जिकिरीचं आहे असं सर्वांना वाटलेलं असतं, पण प्योत्र त्याच्या पद्धतीनं उत्तम रचना करून आम्हाला आश्चर्यचकित करतो. चेलोचा साउंड चांगला सापडलेला असतो. त्यातही आता टेक्निकल समस्या नसल्यानं सर्व छान छान :)

 

शनिवारी म्हणजे १२ तारखेला रंगीत तालीम. काही मोजके लोक आलेले असतात. प्रयोग एकूण चांगला होतो. प्रयोग लोकांना, प्रेक्षकांना आवडला, भावला तर आनंद असतोच, तरीही प्रत्येक प्रयोगानंतर आपल्या मनात अनेक गोष्टींचे हिशेब सुरू असतात. काय राहिलं, काय अधिक चांगलं होऊ शकेल, कोणाकडून काय घेता येईल, आपल्या काय चुका झाल्या याबद्दल मनात खल सुरू असतोच. मुद्दाम केलेले चुकीचे किंवा मजेदार पोलिश उच्चार, त्यांच्या जागा प्रेक्षकांना आवडलेल्या असतात. त्यामुळे नंतर मिहालीना मला खास शाबासकी देते. फिलिपसोबत काम करायला मजा येते. तरी अखेरच्या आमच्या नृत्यात काही बदल करावेत असं मला जाणवत राहतं. रंगीत तालमीनंतर त्याबद्दल बोलावं की नाही याबद्दल मनात द्विधा असते. ओलाकडून प्रयोगानंतर काही सूचना येतात. दिग्दर्शकदेखील काही छोट्या सूचना करतो. काही तांत्रिक गोष्टी मुख्य प्रयोगापर्यंत सुधारायच्या असतात. यासाठी अजून चार दिवस हातात आहेत. एकूण माहौल आणि रागरंग उत्साही आणि आशादायी असतो.

 

१६ तारखेचा प्रयोग :

नाटक सुरू

उन्हाळा सरत आला तरी सूर्यास्त सातनंतर होतो, त्यामुळे प्रयोगाची वेळ संध्याकाळी साडेसातची. या हॉलला लागूनच दोन बऱ्यापैकी रहदारीचे रस्ते आहेत, तसंच हॉलच्या एका बाजूला लंबगोलाकार असं भव्य मैदान आहे. इथे दरवर्षी अनेकविध जत्रा, उत्सव भरतात. सध्या उन्हाळा असल्यानं पर्यटकांची गर्दी आणि आवाज बऱ्यापैकी आहे, पण रंगीत तालमीच्या काळात पडदे हॉलचे वगैरे लावून या आवाजाचा त्रास होत नसल्याची चाचणी करून झाली आहे. मध्यंतरीच्या चार दिवसांत टेक्निकल टीमनं काही बारीकसारीक सुधारणा केलेल्या आहेत.

 

आम्ही लोक कपडे घालून तयार होतो. फिलिप त्या दिवशी जवळच्या एका शहरात सकाळी दुसऱ्याच एका नाटकाच्या तालमीसाठी गेलेला असतो. तरीही इथे तो वेळेवर हजर असतो आणि फारसा थकलेला नसतो. प्रेक्षक येतात. या प्रयोगाची रचना म्हणजे हॉलच्या दोन्ही बाजूंना खुर्च्या ठेवलेल्या असून मध्यभागी नाटक घडतं. प्रयोग चांगला रंगतो. एकूण आम्ही सर्व खूश!

 

**

 

महोत्सवातली इतर नाटकं : 

 

हा महोत्सव या वर्षी जवळजवळ आठवडाभर चालला. यात काही नाटकांचे प्रयोग, काही परफॉर्मन्स आणि काही वाचनं तसंच काही वर्कशॉप होती. गंमत म्हणजे या वर्षी वॉर्साचा एक ग्रुप त्यांचं नाटक घेऊन आला होता. मला पहिल्या दिवसाचं नाटक पाहायला मिळालं, इतर दिवशी जायला जमलं नाही. या नाटकाच्या पोलिश नावाचं थेट भाषांतर होईल “घशात अडकलेली मधमाशी!” गेल्या वर्षीच्या महोत्सवात या नाटकाचे एक 'परफॉर्मेटिव्ह रीडिंग' (सादरीकरण-वाचन) झालं होतं आणि त्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. हा परफॉर्मन्स २०२०मध्ये बेलारूसमध्ये झालेल्या व्यापक निदर्शनांवर भाष्य करतो किंवा त्याची कहाणी सांगतो. नाटकातील मुख्य पात्रानं – एका तरुण मुलीनं – या निदर्शनांमध्ये भाग घेतला आहे. त्याचा या तरुण मुलीच्या जीवनावर खोल प्रभाव पडला आहे. दिग्दर्शिका नतालिया लेवानावा मूळच्या बेलारूसच्या असून, २०२२पासून त्या पोझनान शहरात राहत आहेत. त्या एक नाट्यदिग्दर्शिका आणि शिक्षिका आहेत. या नाटकाची संहिता एका व्हाइट रशियन लेखकाच्या साहित्यावर आधारित आहे. पण त्यानं आपली ओळख गुप्त ठेवली आहे. प्रयोगाची रचना, प्रकाशयोजना मला आवडली, पण तो फारच एकसुरी होता. त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे त्यांची भाषा; म्हणजे भाषिक अभिव्यक्तीकडे केलेलं दुर्लक्ष! अर्थात मूळ संहितेचा पोलिश अनुवाद इथे प्रस्तुत होत होता आणि अभिनेत्री ही मूळ व्हाइट रशियन होती. युक्रेनियन आणि व्हाइट रशियन लोकांसाठी पोलिश भाषा फारशी अवघड नसली तरी त्यांचे उच्चार कधी कधी त्रासदायक वाटतात. दुसरी गोष्ट म्हणजे उच्चारांवर थोडं जरी काम केलं तर त्यात सुधारणा होईल. ती हे लोक जाणीवपूर्वक का करत नाहीत, या बाबतीत टाळाटाळ का करतात या प्रश्नानं माझी किंचित चिडचिड झालीच. जिथे शब्दप्रधानता आहे तिथे त्याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. एकसुरीपणा वाटण्याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे या काळातली जी बहुतांश (किंवा माझ्या अनुभवात आलेली) नाटकं किंवा प्रयोग किंवा परफॉर्मन्स मी पाहिलेले आहेत, त्यात उपहास, हलका विनोद यांचा पूर्ण अभाव असल्यासारखाच आहे. युरोपियन संदर्भात विविध युरोपियन भाषांमध्ये युद्धोत्तर (दुसरं महायुद्ध) साहित्य आणि नाटक यात अनेक वेगवेगळे प्रवाह आले; त्यात अब्सर्ड नाटकाचा प्रवाह हा एक फार महत्त्वाचा प्रवाह आहे; तसंच नेपथ्य, अभिनय, प्रकाशयोजना या आघाड्यांवरदेखील अनेक बदल झाल्याचं दिसून येतं. तर या निमित्तानं मला खरोखर असा प्रश्न पडला आहे, की युरोपियन संदर्भात युद्धोत्तर नाटकांबद्दल बोलायचं झालं तर दुसऱ्या महायुद्धानंतरच्या नाटकांमध्ये आणि आजकालच्या या नाटकांमध्ये नक्की कोणता फरक असेल आणि त्यामागची कारणं कोणती असू शकतील? पोलिश नाटकांच्या संदर्भातदेखील कम्युनिझम काळातील साहित्य, नाटकं असा एक विभाग करता येऊ शकतो. म्रोझेकसारख्या नाटककाराचं 'मायग्रंट्स' हे नाटक त्या काळातील पोलिश स्थलांतरितांच्या परिस्थितीवर प्रकाश टाकतं. अर्थात आजच्या काळात एक निरीक्षण असं आहे, की नाटक, नृत्य तसंच इतर कलाभिव्यक्ती किंवा प्रयोग करण्यात स्त्रियांचा टक्का जास्त आहे. तसंच प्रेक्षकांमध्येदेखील! त्यामुळे कदाचित या अभिव्यक्ती निराळ्या असू शकतील. असो! या निमित्तानं वेगवेगळ्या देशांतली, वेगवेगळ्या प्रकारची नाटकं, परफॉर्मन्स पाहायला मिळतात, हेही नसे थोडके!

 

रविवारी वॉर्साचा एक ग्रुप त्यांचं नाटक घेऊन आला होता. तो प्रयोग नेमका बुडला, कारण मी शहराच्या बाहेर होतो. त्या प्रयोगाबद्दल बहुतेकांकडून चांगल्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. बघू, कधी वॉर्साला गेलो तर तिकडे जाऊन पाहूयात प्रयोग!