टिकली ते टिकली, पॉलिटिकली

लहानपणी मी एरवी उद्धट जरी असलो तरी देवादिकांच्या बाबतीत अतिशय हळवा होतो. माझं कुटुंब सर्वसाधारण भारतीय धार्मिक हिंदू कुटुंब जितकं कर्मठ असावं तेवढंच, ॲव्हरेज कर्मठ होतं. पण एकाच वेळेस, एका टिपिकल मठातलं देऊळ आणि गावाचं ग्रामदैवत असलेला एक सुफी दर्गा या दोन्ही देवस्थानांची पूजा आमच्या कुटुंबाकडे होती. म्हणून घरी सणावाराला, पौर्णिमा आणि एकादश्यांना नैवेद्याच्या पुरणपोळ्या आणि गुरुवारी कंदुऱ्यांच्या बोकडांचं काळीज, माना किंवा मांड्या असे दोन्ही टोकांवरचे पदार्थ घरी भरपूर असायचे. किब्ला, हलाल करताना धारदार सुरीनं स्विफ्टली बोकडाची मान कापल्यावर उडणाऱ्या लालभडक चिळकांड्या पाहतच मोठे होत होतो. घरी बऱ्याचदा मुलाणी कश्कोल घेऊन सुगंधी भात पुलाव ताणून हाणायचा. कंदुऱ्या बहुतांश वेळा हिंदूंच्याच, विशेषतः धनगरबहुल भागात धनगरांच्या असायच्या. त्यामुळे बोकडाला हळद असायचीच. त्याच्या डोक्याला कुंकुमतिलकदेखील लावायचे. (मानेवर लावला तर त्यात आणि नंतर उडणाऱ्या रक्तात फरक दिसायचा नाही :) ) देवळात मुस्लीम बायकादेखील यायच्या. त्या देवीची ओटी भरताना, पाया पडताना डोक्याला कुंकू लावायच्या नाहीत, गळ्याला लावायच्या. आणि दर्ग्यात हिंदू बायका यायच्या, त्या उदबत्त्या जळून उरलेली ग्रे पावडर विभूती फासल्यासारखी करंगळी आणि अंगठा चिकटवून उरलेल्या तीन बोटांनी कपाळाला फासायच्या. तेव्हा या गोष्टीमागची कारणं (वैज्ञानिक*) कुणीही लांबलचक फॉरवर्ड लिहून एक्सप्लेन करायच्या भानगडीत पडायचं नाही. तेव्हा दोन्ही बाजूंना एकमेकांच्या देवळादर्ग्यात जाऊ नका असं सांगणारे लोक अस्तित्वात असले तरी पहुंच के बहोत बाहेर असावेत.
मी आमच्या गावच्या आराध्य देवीकडेदेखील नियमित जायचो. यल्लमा. ही सौंदत्तीहून आमच्या गावी आली असं सांगितलं जायचं. तिचं उन्नयन कसं झालं माहीत नाही, त्या मुळातल्या सप्तमातृका वगैरे असाव्यात (सॉरी रा. चिं., तुमच्या प्रांतात लुडबुड करतोय). जमदग्नी ऋषीची बायको, रेणुका ती हीच. म्हणजे परशुरामाची आई. तोच परशुराम ज्यानं पृथ्वी २१ वेळा निःक्षत्रिय केली. एकूणच तिची स्टोरी म्हणजे तिचा नवरा, तिच्या मनात ज्याच्यामुळे पाप उत्पन्न झालं तो चित्ररथ, आणि तिचे पाच मुलगे (ज्यांच्यात परशुराम सगळ्यांत धाकटा) अशा सर्व मस्तवाल, तापट आणि अतितापट पुरुषांनी तिला दिलेली वागणूक एवढीच आहे. शेवटी तिला वरदान मिळूनही ती जमिनीतून मुंडक्यापर्यंतच वर येऊ शकली, कारण परशुरामाला तिला न पाहणं अनावर झालं! तर या यल्लमाची पूजा कोळी समाजातल्या पुजाऱ्याकडे होती. मी एकदा नवरात्रीमधल्या एका कुठल्या तरी दिवशी अगदी पहाटे पहाटे देवीकडे गेलो. आणि नुकतीच देवीची पूजा बांधून झाली होती. नवरात्र असल्यानं देवीला चांदीचा मुखवटा होता. आणि त्याच्या कपाळावर हळदीचा मळवट भरला होता. गळ्यात मणी मंगळसूत्र, दोन्ही हातांत भरगच्च हिरवा चुडा. म्हाताऱ्या शिवाप्पा पुजाऱ्यानं ओढणी की शालूसारखं एक वस्त्र देवीच्या वरच्या भागावर खुंट्यांना बांधलं. तरीही लांबून एकूण विग्रहाकडे पाहत तो म्हणाला, "काही तरी भुंडं भुंडं वाटतंय."
तर देवीच्या कपाळावर नुसता हळदीचा मळवटच होता, त्याच्या मधोमध कुंकवाचा मोठा टिळा काढायचा तो विसरला होता. मग त्यानं पाण्यात मधलं बोट बुडवून तिथली गोलाकार हळद बाजूला करून तो रेखला. कुंकवाचा तो मोठा टिळा असा माझ्या मनात तेव्हा अगदी खोलवर ठसला. आणि माझ्या आसपासच्या बायकांची भुंडी कपाळं नोटीस व्हायला लागली. माझ्या पणजीच्या कपाळावर गोंदवलं होतं, त्यामुळे ते कुंकू नसलं तरी भुंडं वाटत नव्हतं. माझी आज्जी मात्र रोज आंघोळ झाली की मेण लावून कुंकवाचा टिळा काढायची. एकदा आमच्या आजोबांनी मासे पकडून आणताना घरी देशी मधाचं रिकामं पोळंदेखील आणलं होतं. शाळेतून घरी येईपर्यंत आज्जीनं त्याचं डबीभर मेणात रूपांतर केलं, ते मला एका जादूसारखंच वाटलं. त्या मेणात काड्या खुपसायची हौस असायची. घरी दोन काकवा असल्यानं बाथरूममधल्या भिंतींना, घरातल्या खांबांना, आरशाच्या कडांना, आजूबाजूला हमखास बारीक बारीक टिकल्या चिकटवलेल्या दिसायच्या. सतत अशाच टिकल्यावाल्या, कुंकूवाल्या स्त्रियांचे चेहरे पाहून पाहून, ते सारं, आपल्या टोचलेल्या कानासारखी आणि तुळजापुरात काढलेल्या जावळासारखी अस्तित्वात असणारी रिॲलिटी असून तिला प्रश्न विचारण्याचा विचारदेखील मनात यायचा नाही. म्हणजे त्या अर्थानं ते ‘सनातन’ होतं. एखाद्या बाईच्या भुंड्या कपाळाला पाहिलं की तिचा नवरा एकतर मेला असणार किंवा ती मुसलमान असणार किंवा धर्मांतरित ख्रिश्चन असणार, असं आपसूकच डोक्यात यायचं. शेवटी माझ्या बारशाला काय गिलका करून बसलेल्या आज्या, मावशांनी किंवा आत्यांनी ‘कुणी डॉकिन्स घ्या, कुणी हिचन्स घ्या’ असं म्हणून माझ्या कानात कुरकुर केली नव्हती ना. समृद्ध अडगळीतच माझा जन्म झाला. लहानपणापासून जे डोळ्यांमार्फत मनावर उमटत गेलं, त्यातूनच अशी सौंदर्यकल्पना म्हणा किंवा धारणा म्हणा तयार झाली.
सनातनवरून आठवलं, यल्लमाच्या जत्रेमध्ये ‘सनातन सकाळ’ नावाचा एक स्टॉल लागलेला असायचा. २००२-०३पासून तो जत्रेत पर्मनंट झाला. आमचं घर यात्रेच्या ठिकाणाहून जवळच असल्यानं बऱ्याचदा त्यांची विक्रीची पुस्तकं ते आमच्या घरी ठेवून जायचे. त्या उपकाराची परतफेड म्हणून ‘मंगल’ या मायक्रोसॉफ्टच्या अतिशय भंगार दर्जाच्या फाँटमधल्या (सॉरी र. कृ. जोशीजी) पिवळ्या कागदावरच्या श्लोकपट्ट्या घरी भिंतींवर लावायला द्यायचे. ते लोक गेले की त्या पुस्तकांच्या पिशव्या आम्ही उचकटायचो. त्यातल्या विविध पुस्तकांत परात्पर गुरू, किंवा एकोणसत्तर टक्के आध्यात्मिक पातळी वगैरे जागरण (जार्गन) असायचं. पण त्यातच डोक्याला कुंकू कसं लावायचं याचं सचित्र मार्गदर्शन पाहिलेलं आठवतं. त्या चित्रांमागचा रिकामा फिकट निळा किंवा फिकट पिवळा भाग पूर्ण मोकळा असल्यानं मार्गदर्शन करणाऱ्याचे फोटो अगदी लो बजेट ॲनिमेशनसारखे उठून दिसायचे. हॉलिवूडच्या चित्रपटात एखाद्या पात्राला तुरुंगात टाकल्याचं दाखवण्यासाठी त्याचे समोर तोंड करून, डावीकडे आणि उजवीकडे तोंड करून जसे फोटो काढल्याचे कट असतात, तसे इथेदेखील. वेगवेगळ्या अँगलनं या चित्रांत तो माणूस (साधक) हातांचा विशिष्ट कोन करून कपाळाला कुंकू लावताना दिसायचा. त्या हातातून तुटक रेषा काढून आध्यात्मिक ऊर्जा कपाळातून पार घोट्यांपर्यंत (अहं!) सर्व चक्रांतून कशी फिरते हेदेखील दाखवलेलं असायचं. डावीकडून उजवीकडे प्रवाहित होणाऱ्या अशा अफाट व्हिज्युअल संस्कारांमुळे नकळत माझी आध्यात्मिक पातळी वाढतच होती.
डावे आणि उजवे हे फ्रेंच असेंब्लीमध्ये हुजूर-मजूर कुठे बसतात त्यातून तयार झालेल्या संज्ञा आहेत, असं गुगलचं AI मोड पटकन सांगतं. पुढे त्या आर्थिक अंगानंदेखील वापरल्या जायला लागल्या. म्हणजे, डावे म्हणजे साम्यवादी आणि उजवे म्हणजे भांडवलवादी. आधुनिक समकालीन भारतीय परिप्रेक्ष्यात (ऐसीचा लाडका शब्द) डावे म्हणजे आता सेक्युलर मूल्यं मानणारे, समाजवादी विचारमूल्यं असणारे पक्ष. त्यांचं म्हणणं थोडक्यात : “ये हिंदू का रक्त, ये मुस्लीम का, (ते तंबाखूसारखं हातावर मळून), बता अब इस मे हिंदू का कौनसा और मुसलमान का कौनसा”. आणि उजवे म्हणजे हिंदुत्ववादी. त्यांचं म्हणणं साध्या सोप्या शब्दांत : “दूध मांगोंगे तो खीर देंगे, काश्मीर मांगोंगे तो चीर देंगे”, “गर्वच नाही माज आहे हिंदू असल्याचा”. दोन्ही म्हणण्यांत शेवटी रक्ताचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येतो. रक्ताचा आणि कपाळावरच्या कुंकुमतिलकाचा काहीएक आदिम संबंध आहेच. अशा या सेंद्रिय विचारप्रवाहांना डाव्या-उजव्या या आर्थिक विभागणीला थेट जोडणारा एक फिनॉम नुकताच साजरा झाला. चळवळच म्हणा की. त्या चळवळीचं नाव नो टिकली नो बिझनेस. या अलीकडच्या उजव्या लोकांच्या चळवळी अशाच सृजनात्मक असतात. उदाहरणार्थ, एखाद्या नटीनं केशरी चड्डी घालून बीचवरच्या वाळूत खान आडनावांच्या म्हाताऱ्या अभिनेत्यांच्या कंबरांना कंबरा लावून ठुमकवल्या, की यांना त्यात लव्ह जिहादसारखी एक छुपी साजिश दिसते. मात्र नंतर तीच नटी पिवळी चड्डी घालून नाचायला लागली तरी, नशीब, आमच्या तालुक्यातले धनगर बांधव तिला घोंगडी नेसवायला मोर्चे काढत नाहीत की तिचे सिनेमे हाणून पाडत नाहीत. किंवा निळी चड्डी घालून नाचायला लागली की कुणा नवबौद्धाच्या भावना दुखावल्याचं एकही उदाहरण नाही.
तर सोशल मीडिया नावाच्या सांप्रतकाळातल्या माध्यमसमूहात सामूहिक शंखनाद करायची सोय असल्यानं अशा नव्या चळवळी तिथेच उगम पावतात. तर या चळवळीच्या, म्हणजेच नो टिकली नो बिझनेस चळवळीच्या उद्गात्या ताईंना आपण टिकलीताई म्हणू या. टिकलीताईंना सणासुदीला आलेल्या विविध जव्हेऱ्यांच्या जाहिराती खटकल्या. (जव्हेर ⇾ जवाहर ⇾ सर्व समस्यांचं मूळ नेहरूच!) कारण या जाहिरातींत ज्या मॉडेल असायच्या त्यांच्या कपाळाला बिंदी नसायची म्हणे. म्हणजे त्या हिंदू नसायच्या. त्यांचे चेहरेदेखील त्यामुळे खुललेले दिसायचे नाहीत. म्हणून या टिकलीताईंनी अशा जाहिराती करणाऱ्या जव्हेऱ्यांवर बहिष्कार टाकायचं ठरवलं. या जव्हेऱ्यांचा धंदा बसायला लागला, किंवा असं उजव्या लोकप्रवाहाला मनापासून वाटायला लागलं! तर अशा रीतीनं उजव्यांनीच त्यांना असा आर्थिक (योग्य शब्द भरा. उदाहरणार्थ, बांबू) लावला.
आता आपण टिकलीताईंकडे येऊ या. ही चळवळ जसजशी पसरायला लागली तसतशी बिंदीवाली बाई, टिकलीताई म्हणून बाईंची यथेच्छ चेष्टा व्हायला लागली. अर्वाचीन भारतात उत्खनन करण्यात भारतीयांचा हात कुणी धरू शकणार नाही. काही मंडळींनी बाईंच्या जुन्या फोटोंवर जाऊन बिंद्या शोधायला सुरुवात केली. तरीही बाई काही थांबायचं नाव घेईनात. दिसली जाहिरात (त्यातल्या त्यात विशेषतः दागिने आणि कपड्यांची), पहिलं लक्ष मॉडेलच्या कपाळाकडे. भुंड्या कपाळाला एक्सपोज करून, जाज्वल्य अभिमान असलेले लोक हॅशटॅग वापरून तो बिझनेसच भुंडा करायच्या कामाला लागले. निढळाच्या घामानं भिजलेला पुरोगामी महाराष्ट्र अशा रीतीनं तो घाम पुसून राष्ट्रनिर्माण करायला पुढे सरसावला.
टिकलीताईंची मात्र कमाल अडचण व्हायला लागली. टिकलीताई या मुळातच बहुगुणी असल्यानं त्यांना शिल्पकलेसोबतच साड्यांची आवड असल्यानं बाईंना विविध साड्या नेसून फोटो काढायचा छंद आहे. माणसानं नेहमी हसतमुख असावं, त्यात काही वावगं नाही. बाई असे नानाविध फोटो टाकतच असतात. सकाळी उठून चहाचा मग हातात घेतलेला म्हणा किंवा बागेत उगवलेल्या मशरूमांकडे पाहत म्हणा, बाई फोटो टाकत असतात. ही दुनियाच आता प्रतिबिंबांची आहे, त्यात अजून एकीची भर. पण आता मात्र एक अडचण अशी, की सदासर्वकाळ टिकल्या लावून वावरणं शक्यच असेल असं नाही. टिकल्या आणि बिंद्या लावूनच रात्री झोपावं हे फक्त डेली सोपमध्ये शक्य आहे. पण फोटो टाकायचा म्हटला की बिंदी हवीच. आता कुंकू हे लालच असतं असं आपलं एक शास्त्र सांगतं. पण काळानुसार साड्यांना आणि कपड्यांना मॅचिंग मॅचिंग म्हणून त्याचा रंग बदलला तरी संस्कृती लगेच काही विधवा होत नाही.
वानगीदाखल प्रत्यक्षातल्या टिकलीताईंचा एक फोटो घेतला. त्याचं थोडं विश्लेषण केलं. तो फोटो कसा होता हे कळण्यासाठी खाली दिलेला हा फोटो पाहा. ही टिकलीताई पूर्णपणे फिक्शनल आहे. हा फोटो जरासा क्रॉपदेखील केला आहे.

तर मूळ फोटोचं एक प्राथमिक पृथक्करण असं करता येईल -
१. चेहऱ्याचं क्षेत्रफळ आणि पिक्सल
मूळ फोटोचा आकार १०२१ × १५४० पिक्सल आहे. त्यात चेहरा (केसांच्या रेषेपासून हनुवटीपर्यंत) सुमारे २,६२,००० पिक्सल व्यापतो. सामान्य प्रौढ स्त्रीच्या चेहऱ्याचं समोरून दिसणारं क्षेत्रफळ सुमारे १८०–२०० चौ.से.मी. असतं; आपण १९० चौ.सें.मी. धरलं. त्यानुसार १ पिक्सल ≈ ०.२५–०.२७ मि.मी. (चेहऱ्याची लांबी ७४० पिक्सल ≈ १९-२० सें.मी., रुंदी ४५० पिक्सल ≈ १२ सें.मी.)
२. टिकलीचे पिक्सल आणि प्रत्यक्ष आकार
टिकलीचा गडद भाग फक्त ६ पिक्सल आहे (सुमारे २.५ पिक्सल व्यास). म्हणजे प्रत्यक्षात व्यास ०.६-०.७ मि.मी. आणि क्षेत्रफळ सुमारे ०.५ चौ.मि.मी. (०.००५ चौ.सें.मी.). चेहऱ्याच्या तुलनेत हा ठिपका १ छेद ३८,००० इतका लहान आहे.
३. शक्यता
बाजारातली सामान्य टिकली ४-१० मि.मी. असते; सगळ्यात लहान “डॉट” टिकलीही १.५-२ मि.मी. असते. म्हणजे या ठिपक्यापेक्षा ५ ते १६० पट मोठी. त्यामुळे ही खरी टिकली असण्याची शक्यता पूर्णपणे बाद होते. उरतात फक्त दोन शक्यता :
अ. डॉट आयलायनर, काजळ पेन्सिल किंवा बॉलपेनसारख्या अतिशय बारीक टोकाच्या साधनानं एकदाच टेकवून केलेला ठिपका;
ब. मूळ बिंदीलेस फोटो, नंतर डिजिटल एडिटिंगमध्ये फोटो खूप झूम करून, अतिशय लहान पेंट ब्रशनं काढलेला ठिपका.
पिक्सल-विश्लेषणात ठिपका गोल आहे आणि कॅमेऱ्याच्या नैसर्गिक धूसरतेइतकाच धूसर आहे, त्यामुळे या दोन शक्यतांमध्ये फरक करता येत नाही. मात्र दोन्ही बाबतीत एक गोष्ट नक्की : हा ०.६ मि.मी.चा ठिपका इतका लहान आहे की चेहऱ्यावर तो मुद्दाम लावण्यात काहीच अर्थ नाही. सामान्य आकारात पाहताना तो दिसतही नाही; फक्त चेहरा झूम केल्यावरच लक्षात येतो. एका मोठ्या डिजिटल फ्लेक्सवरच्या मॉडेलच्या टिकल्या या उजव्या लोकांच्या डोळ्यात भरल्या. म्हणजे त्या अवाढव्य असणार. त्या अजून अवाढव्य व्हाव्यात म्हणून हे लोक संबंधित धंदाच बुडवायला निघतात. पण सूक्ष्मदर्शक घेऊनसुद्धा या उजव्या लोकांच्या कपाळावरच्या टिकल्या दिसत नाहीत. म्हणजे कुछ तो गडबड है, दया.
गंमत अशी, की डाव्या लोकांनादेखील टिकल्यांची आवड दिसते. आणि अजून एक विरोधाभास असा, की या उजव्या लोकांच्या टिकल्या अशा इतक्या सूक्ष्म असताना या पुरोगामी परंपरेतल्या स्त्रियांच्या टिकल्या मात्र चांगल्या सेंटीमीटरमध्ये मोजता येतील अशा त्रिज्ज्यांच्या आहेत.
![]() |
![]() |
![]() |
|
मध्यंतरी यांतल्या काही पुरोगामी स्त्रियांना अजून एक हुक्की आली. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला कपाळावर आडवी चिरी काढून आपला सेल्फी समाजमाध्यमांवर टाकायची.

ही चिरी ‘काश्मीर मांगोंगे तो चीर देंगे’मधली नसून साधी कुंकवाची चिर/चिरी आहे. एरवी हे लोक दूध मागितलं तर शिरखुर्मा देतात इतके मायाळू असतात म्हणे. अनेकांनी या ट्रेंडवर टीकादेखील केली, की सावित्रीबाईंचं कर्तृत्व या आडव्या चिरीत बंदिस्त करू नका म्हणून. पण लोक ऐकत नसतात. त्यांना अशी चिन्हं हवीच असतात. बाकी काही नाही टिकलं तर या टिकल्या मात्र टिकतील. कारण चिन्हांशी खेळण्याचा माणसांचा फारच लाडका खेळ आहे.
तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी असं म्हणलं जातं. माझं जावळ तिथेच काढलं गेलं. मध्यंतरी तिथे देवदर्शनाला जाणं झालं. आता मी पूर्वीइतका आध्यात्मिक राहिलो नाही. यल्लमा देवीसमोर तोवरच्या किंचित आयुष्यातली सुखदुःखं सांगून भावुक होणंदेखील जसजसे मोठे झालो तसतसं पूर्णपणे कमी झालं. आता जास्त डोळसपणे सगळीकडे पाहता येतं, पण देवीची रूपं पाहिली की कुठे तरी जुना खुंटा हलवून पाहिला जातो. तिथे जास्त किमतीचा पास घेऊनही भली मोठी रांग लागलेली होती. रांगेत ठिकठिकाणी, हाऊसफुल सिंगल स्क्रीन थेटरांसमोर ब्लॅकनं तिकीट विकणारे पंटर असतात तसे काही पुरुष हळूच गाभाऱ्यापर्यंत थेट नेतो असं हळूच आवाजात सांगत फिरत होते. मध्ये मध्ये लावलेल्या स्क्रीनवरती देवीचे नित्योपचार चाललेले दिसत असतात. त्यात उघडबंब आणि अगडबंब देहांचे पुरुष भोपे देवीची वस्त्रं उतरवत, नेसवत असताना दिसतात. देवीचा मळवट भरून त्यावर ॐ, विभूतीचे पट्टे, बालाजीचा पांढरा नाम, फूल, चंद्र, सूर्य, किंवा स्वस्तिचिन्ह काढतात. या स्वस्तिकाच्या दांड्या आत वक्राकार झालेल्या असतात. हे स्वस्तिक वंशसंहार करणाऱ्या एका परदेशी हुकूमशहानंदेखील त्याचं चिन्ह म्हणून वापरलं आहे. शिवाय या वक्राकार स्वस्तिकामधून तशा स्टाईलच्या शिक्याचादेखील आभास होतो. शैव आणि वैष्णव चिन्हं आज तिच्या कपाळावर काढली जात असली तरी आणि आज शैव वैष्णवांच्यात प्रचंड हिंसक दंगलीदेखील होत नसल्या तरी इतिहासात त्या कुठे तरी झाल्या आहेतच.

या चिन्हांना संस्कृतीत विविध अर्थ संदर्भ आहेतच. संस्कृती आणि राजकारण काही वेगवेगळ्या स्वतंत्र एंटिटी नाहीत. ती चिन्हं आपण पुरोगामी, प्रतिगामी, डावी, उजवी, आडवी, उभी अशा वेगवेगळ्या कप्प्यांत विभागत असतो. शिकार-सावड करत असल्यापासून टोळ्या-टोळ्यांना चिन्हं लागली. स्त्रिया एक रिसोर्स किंवा विनिमय करण्यायोग्य वस्तू कशा झाल्या, त्याचा संशोधक मंडळी वेगवेगळ्या डोमेनअंतर्गत शोध घेत असतातच. त्या तशा झाल्या तेव्हा त्यांच्यावर मालकी हक्क सांगायला चिन्ह लागणारच. त्यासाठी कपाळाहून चांगला कॅनव्हास नसावा. नंतर त्या चिन्हांना अस्मितादेखील येऊन चिकटल्या. आणि आज टिकलीताईसारख्या स्त्रियासुद्धा या अस्मितांचं वहन समर्थपणे करत आहेत.
शिकार-सावड युगाचं जाऊ द्या. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा जमाना आला आहे. ए.आय., रोबॉटिक्स घडवण्यात जगातले अनेक स्त्रीपुरुष सारख्याच जोमानं झटत आहेत. भारतीयदेखील त्यात मागे नाहीत. अशातच ही किंचित जुनी बातमी वाचली. ‘कचऱ्या’तले पार्ट वापरून इंजिनिअरिंग कॉलेजात असलेल्या काही मुलांनी(!) हृदयाची धकधक ऐकू येईल अशी एक ह्युमनॉइड घडवली. (निष्पाप निरागस नवथर वयातली भारतीय जेन झी, पुरुष आणि त्यात इंजिनिअरिंग कॉलेजातली!) मात्र तिला साडी नेसायला आणि तिच्या कपाळावर बिंदी रेखायला ते चुकले नाहीत! जंक जिनियसच ते! गंमत म्हणजे ती म्हणे वैदिक तत्त्वांनी प्रेरित होती!!

तर एकूणात, माणसांची कपाळं, त्या कपाळांच्या आत असलेले मेंदू या दोघांवर असा चिन्हांचा जबरदस्त नाच चाललेला असतो, त्या हंटर गॅदरर स्टेजपासून आजच्या AI युगापर्यंत. त्यातून संगती विसंगती शोधायचे कळत नकळत प्रयत्न आपण करत राहतो. त्यातून कपाळमोक्ष होऊ नये हे पाहण्याची जबाबदारी आता मात्र आपापलीच.


