Skip to main content

स्थानिक आणि उपऱ्या


तिर्री आमच्याकडे आली तेव्हा तिचं वय असेल १०-११ महिने. आमच्या घराच्या आधीच्या मालकांच्या मुलीला ती रस्त्यात सापडली होती. तिला तिर्रीला ठेवून घ्यायचं होतं, पण तिर्रीचं आणि तिच्या कुत्र्याचं काही जमेना. तिर्री तेव्हा पोटुशी होती. तिच्या पोरांना लगेच घरं सापडली. पण तिर्री मोठी असल्यामुळे तिला सहज घर सापडेना. माझ्या मांजरगप्पा ऐकून मलाच विचारलं की आम्ही तिला ठेवून घेऊ का? तेव्हा मी दिवाळी अंकाच्या कामात अडकले होते. दोनेक आठवड्यांत ते काम संपल्यावर तिर्री आमच्या घरी आली. तेव्हा तिचं नाव मिसी होतं. 

मी तिचं नाव ठेवलं चंद्रिका. हेच नाव का याला काही अर्थ नाही. कुठल्याही तरुण मांजरांचे चित्रविचित्र प्रकार ज्यांनी बघितलेले असतील त्यांना lunatic हे विशेषण समजेल. त्यावरून ही झाली चंद्रिका. यथावकाश तिला डॉक्टरकडे नेलं; तिच्या मानेत बारकी चिप बसवली; मुख्य म्हणजे तिचं गर्भाशय वगैरे काढून टाकलं. मनीच्या खानेसुमारीची ओळ काही वाचली वगैरे नाही. तिची पोरं आधीच घरोघरी पोहोचलेली होती. घरी आल्यावर पहिले एक-दोन दिवस ती करुण आवाज काढून पोरांना शोधतही होती.

 

तिर्री घरचीच झाली, तरी तिर्री व्हायला थोडा वेळ लागला. तीरासारखी धावत सुटते म्हणून तिर्री हे मागाहून डकवलेलं स्पष्टीकरण आहे. तिसरी म्हणूनही ती तिर्री नाही, कारण ती पहिली आहे. वह जहां खडी होती हय, वहां से लाईन शुरू होती हय. एकदा फोनवर बोलताना मी तिला बुधी म्हणायला लागले, तेव्हा ज्याच्याशी बोलत होते त्या मित्राचा धीर खचला. "तू तिला काय म्हणायचं ते म्हण, मी तिला तिर्रीच म्हणणार!" तिच्या अनेक नावांमध्ये तिर्री हेच नाव सगळ्यांत जास्त वापरलं गेलं आहे.

 

मध्ये काही वर्षं गेली; तिर्रीचं खाणं हळूहळू कमी झालं. तिला बाहेर खायला मिळत असेल, अशी एक थियरी होती. ती मला फार पटली नाही. तिचं वजन जागच्याजागी असतं आणि तब्येतीबद्दल चिंता करण्याची वेळ आलेली नाही, हे डॉक्टरकडे गेल्यावर कळलंच. मात्र आपली मांजर आपल्यासारखीच मध्यमवयीन झालेली आहे, हे आम्ही मान्य केलं. ती आता वयानं आमच्यापेक्षा मोठी आहे, म्हणून छबूताई.

 

गेल्या उन्हाळ्यात आणखी एक मांजर आणायची अशी कल्पना आमच्या दोघांच्याही डोक्यात आली. कदाचित बऱ्या अर्ध्याच्या डोक्यात आधी आली असेल. त्याच्या मित्राच्या घराच्या आसपास एक गर्भार आणि भटकी मांजर होती. तिच्या पिल्लांना घरं शोधायची वेळ आली की आपण दोन घरी आणू, असं ठरलं. तो एकच पिल्लू आणायचं असं म्हणत होता, पण एकाला एक दोन असलेली बरी, यावर मी सहमती मिळवली. पण ती मांजर आणि पिल्लं सापडली नाहीत. मग फेसबुकवर आमच्या सोसायटील्या एकीची पोस्ट बघितली. एक अगदी बारकुड्या मांजरीचा फोटो, आणि ही दारात आलेली होती. पण तिला शोधेस्तोवर ती गायब झाली होती. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा सापडली. रविवारी संध्याकाळी मी तिला घेऊन इमर्जन्सी ॲनिमल हॉस्पिटलात पोहोचले. एवीतेवी ती तिकडची पिल्लं आणणारच होतो, तर हिलाच का नाही घरी आणायचं! हॉस्पिटलात पोहोचेस्तोवर तिनं एकदा उलटी करून झाली, आणि मी तिचं नाव ठरवून झालं. किरण. 

 

यथावकाश किरण ⇾ किरू ⇾ कद्दू ⇾ (आणि ही बारकुडी कसली कद्दू म्हणून) कद्दूकश इथपर्यंत आम्ही दोघं पोहोचलो. तसं आम्ही किरणवरून करडी हेसुद्धा नाव काढलं. करडी आणि तिर्रीचं नाव … तुरटी! तुम्हांला कुठला शब्द आठवला हे माहिताय मला! 

 

टरकलेली तिर्रीहॉस्पिटलात समजलं, कद्दू वयस्कर मांजर आहे. ती पिल्लू नव्हती, खूप खंगलेली होती. बहुतेक खूप भूक लागली म्हणून मदत शोधत आली असणार. तिथला डॉक्टर तिला तिथेच दयामरण देण्याबद्दल बोलायला लागला, तेव्हा मात्र मी त्याला दम दिला. "हिचा नंबर येईस्तोवर दीड तास लागला तुला. असल्या घाईगडबडीत असले सल्ले देऊ नयेत, वगैरे गोष्टी तुम्हांला शिकवत नाहीत का?" एकीकडे काही शेजाऱ्यांशी मेसेजेस सुरू होते. तीन-चार शेजारणी आणि मी मिळून तिला पकडून डॉक्टरकडे आणलं होतं. एक म्हणाली की ती अशा सापडलेल्या कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या एका रेस्क्यू ग्रूपचं काम करते. ते कधीकधी मांजरांचीही काळजी घेतात. "सध्या कद्दूला त्यांची मांजर बनवू. तुला तुझ्याकडे ती ठेवायची आहे हे उत्तमच. यथावकाश तू तिला दत्तक घे." 

 

कद्दी भलतीच गोड मांजर निघाली. तिलाही त्या छोट्या खोक्यात डांबून, गाडीत घालून डॉक्टरकडे न्यायला लागायचं, आणि ती फक्त तेवढ्याच गोष्टीची तक्रार करायची. ती आली तेव्हा या दोन्ही मांजरींना वेगळं ठेवण्यासाठी मी वेगळ्या बेडरूममध्ये, दरवाजा बंद करून कद्दूबरोबर झोपायला लागले. एकदम भारतीय पद्धतीनं, जमिनीवर गादी टाकून. सुरुवातीला काही दिवस मी माझं बस्तान त्याच खोलीत हलवलं. रात्री मी आडवी होऊन वाचायचे, तेव्हा ती शेजारी, तिच्या अंथरुणावर असायची. मी दिवा बंद केला की माझ्या छातीवर येऊन बसायची; आणि मग थोड्या वेळानं पुन्हा आपल्या अंथरुणावर झोपायची. सकाळी उठून मी कामाला लागले की ती टेबलावर चढून बसायची. मग हळूहळू माझ्या मांडीत बसायला शिकली. बरा अर्धा सकाळी उठून स्वयंपाकघरात गेला की कद्दी तिथे हजर व्हायची. तो तिला चीजचे बारके तुकडे द्यायचा; ती कधी खायची, कधी टाकून द्यायची. कद्दूचं वजन एवढं कमी होतं की तो तिला उचलायला घाबरायचा. माया दाखवण्याची भारतीय पद्धत म्हणून तो तिला खायला द्यायचा, असा सायकोअनालिसिस मला तिर्रीनं सांगितला.

 

लवकरच टेक्सासातला भयभीषण उन्हाळा संपला; हळूहळू तिर्री आणि कद्दू एकमेकींना दिसायला लागल्या. तिर्रीनं तिच्या सवयीनुसार आधी कद्दूवर रागावून ‘हा’ करून झालं; बरा अर्धा त्याला हिसणं (to hiss) म्हणतो. कद्दूनं तिर्रीकडे साफ दुर्लक्ष केलं. ट्रोलांकडे दुर्लक्ष करायचं असतं, याचा एवढा सुंदर डेमो कुठेही मिळणार नाही. कद्दी दुर्लक्ष करायची म्हणून तिर्री तिलाच घाबरायला लागली! मी आणि कद्दू आता माझ्या नेहमीच्या ऑफिसात, खालच्या मजल्यावर बसायला लागलो. मी काम करताना अधूनमधून कद्दू डेस्कवर यायची. तेव्हा माझा कॉल सुरू असेल तर मी व्हिडिओ सुरू करून लोकांना कद्दू दाखवायचे. कद्दू आणि मी स्थिरावलो.

 

कद्दूचं व्हेटकडे जाणं सुरू होतंच. महिन्याभरातच तिला नवा शोध लागला. व्हेटकडे जाऊन आल्यावर ती आमच्या दिवाणावर चढून झोपायची. तिचं वजनही ३०० ग्रॅमनं वाढलं. तिच्या मूळच्या १.९ किलो वजनाच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय होती.

 

करडी बसकुरावर आणि टरकलेली तिर्रीहिवाळ्यात कद्दीसाठी आम्ही एक गरम होणारं उशीसारखं इलेक्ट्रिक बसकूर आणलं. ती दिवसभर तिथेच बसायची. मीच तिला कधीकधी उचलून मांडीवर घेऊन बसायचे. थोडा वेळ लाड करवून घेऊन मग ती पुन्हा तिच्या बसकुरावर पसरायची. तिच्यासाठी एक खोकाही आणला होता; त्याच्या आत लपून ती झोपायची. त्या खोलीतून जाताना तिर्री कायम पळत सुटायची. ते बघून माझी फार करमणूक व्हायची. कद्दूचं वजन तिर्रीच्या अर्धंही नव्हतं, आणि ती कद्दूला घाबरायची.

 

आता कद्दू वरच्या मजल्यावर येणं कमी झालं. तिचं व्हेटकडे जाणं सुरूच होतं. कधी दोन महिन्यांनी जायचं होतं म्हणून; कधी पोट बिघडलं म्हणून; एकदा ती दिवसभर खोक्यातून बाहेर यायला तयारच नव्हती, म्हणून मी खोक्याचं झाकण वरून उघडून तिला उचललं तर तिच्या मानेवर जखम दिसली. आम्ही घरात नसताना तिर्रीनं तिच्यावर हल्ला केला असेल, अशी आधी मला शंका आली. पण ही जखम बरीच चिघळलेली दिसली. तिला कदाचित त्वचेचा कॅन्सर असेल, अशी शंका व्हेटनं व्यक्त केली. पांढरा रंग आणि खूप काळ बाहेर असण्यामुळे मांजरांनाही कॅन्सर होतो.

 

मार्चच्या सुरुवातीला बाहेर पुन्हा रानफुलं फुलली. सुंदर हवा होती. बरा अर्धा आठवडाभर ट्रिपला गेला होता. कद्दूचं बिघडलेलं पोट सुधारत नव्हतं. मी तिला पुन्हा व्हेटकडे घेऊन गेले. "ती आता आठवडाभरसुद्धा जगेल असं वाटत नाही," व्हेट म्हणाली. बरा अर्धा परत यायला आणखी चार दिवस बाकी होते. व्हेटनं तिला बी१२चं इंजेक्शन दिलं. आम्ही दोघी घरी आलो. तो परत आला तेव्हा मी त्याला हे सांगितलं; तोवर तिचं पोट थोडं बरं झालं होतं.

 

मार्चच्या शेवटी, जेनिफर, शेजारी राहणारी मैत्रीण तिचं घर सोडून मॅसाच्युसेट्समध्ये परत जाणार होती. ती जायच्या दिवशी सकाळी मी तिला मेसेज केला, तेव्हा तिनं तिच्या बेला कुत्रीला आणखी दोन तासांनी दयामरण देणार आहेत असं सांगितलं. ‘मी ठीक आहे, आत्ता मला कुणाशीही काही बोलायचं नाहीये’, हा तिचा मेसेज न वाचताच मी तिच्याकडे गेले. कुत्रीच्या आणि मैत्रिणीच्या गळ्यात पडून रडले. घरी आले तेव्हा कद्दूला नीट चालताही येत नव्हतं हे दिसायला लागलं. तिचं पोट सतत बिघडलेलं असायचं. तिचे पाय, पावलं स्वच्छ ठेवणंही तिला जमत नव्हतं. तिचे विधी झाले की मी तिची पाय, पावलं सगळं पुसून काढायचे. तेही तिला आवडायचं नाही. 

 

एप्रिलच्या सुरुवातीचा एक ऊबदार दिवस आम्ही निवडला. दुपारी हवा गरम झाली तेव्हा मी तिला उचलून बाहेर सोप्यावर बसले. तिला उन्हात बसवलं. तिला बरं वाटायचं तेव्हा ती अशी उन्हात बसायची. दुपारी घरी एक व्हेट आली. बऱ्या अर्ध्याला रडताना मी पहिल्यांदाच बघितलं. त्यानं बघितलेला पहिला मृत्यू. मला त्याच्याबद्दल असूया वाटली. 

 

कद्दूला आम्ही एक जुन्या, धुवट ओढणीवर झोपवायचो. तिला त्या ओढणीत गुंडाळलं. मी तोंडानं म्हणाले, "ही कद्दू नाही, हे तिचं शरीर आहे." पुठ्ठ्याच्या खोक्यात तिचं शरीर ठेवलं. दोन दिवस आधी आम्ही मागीलदारी खड्डा खणला होता. कद्दूचं शरीर तिथे पुरलं. तिथे एक कॅटनिपचं रोप लावलं. ते चांगलंच वाढलं आणि तिर्री तिथेच पडीक असायची.

 

अजूनही मी सकाळी लवकर उठते; बरा अर्धा सकाळी साडेदहा-अकरा वाजता उठून कॉफी करायला येतो. मी तेव्हा स्वयंपाकघरात जाते. आम्ही कुणी स्वयंपाकघरात जाऊन फ्रिज उघडला की कद्दी तिथे वसुली एजंटसारखी हजर व्हायची. तो मला "तू कद्दू करतेस", म्हणतो. मी मोठ्यानं ‘कद्दूकश’ म्हणून हाक मारते. आम्ही दोन घोट कॉफी एकत्र पितो आणि कामाला लागतो. जेनिफर मॅसॅच्युसेट्सला गेल्यानंतर काही आठवड्यांनंतर मला म्हणाली होती, "मला अजूनही बेला कुत्रीची आठवण येते; पण दुःख इतक्या लवकर सुसह्य होईल असं वाटलं नव्हतं." मी तिला उत्तर पाठवलं, "She was a good friend." 

 

बरा अर्धा आणि मी अधूनमधून "कद्दी गोड मांजर होती", असं एकमेकांना सहज म्हणून जातो. कद्दूला जेव्हा स्वतःची काळजी घेता येणं अशक्य झालं तेव्हा ती मदत शोधत आली असेल; ती आयुष्यभर मानानं जगली; तिला मरणही सन्मानाचं मिळालं.

 

*

 

काही महिन्यांनी भटक्या कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या या मैत्रिणीनं आणखी एका मांजरीबद्दल कळवलं. लिलीला कॅन्सर झाला होता. तिला घर होतं, पण त्या घरी नवं मूल आलं आणि त्या मुलाला मांजरांची ॲलर्जी होती. मग लिलीची रवानगी शेल्टरमध्ये झाली. आम्ही लिलीला घरी आणलं. लिली दिसायला अगदी तुरटीसारखीच होती. लांबून पटकन बघितलं तर कोण-कोण हे समजायचं नाही. 

 

शेल्टरमध्ये तिच्यासाठी फॉर्म वगैरे भरले. त्यात त्यांनी सुचवलं होतं की प्राण्यांची नावं बदलू नका. आम्ही तिला घेऊन बाहेर आलो तेवढ्यात पावसाची सर आली. मी लिलीचं नाव ठेवलं भागाबाई.बऱ्या अर्ध्याला हे नाव आवडलं नसावं. काही दिवसांतच मी तिला (उगाच) गायत्री म्हणाले, तर त्यानं तेच नाव पकडलं. ती गायत्री. गायत्री आणि तिर्री समोरासमोर आल्यावर तुरटी तिच्यावर हिसली. गायत्रीही काही कमी नव्हती. तुरटीची पळता भुई थोडी झाली! तशी तेव्हा हवाही छान होती; तुरटी बहुतेकसा वेळ घराबाहेरच असायची.

मांजर मारामारी

दुसऱ्याच आठवड्यात मी घरातल्या ऑफिसात बसून काम करत होते. रस्त्यावरून काही ओळखीचे कुत्रे त्यांच्या माणसांबरोबर जात होते. मी त्या सगळ्यांना हाय करायला बाहेर गेले, तर समोर तिर्री. ते कुत्रे तिच्या दिशेला येत होते, म्हणून मी तिला उचलून हातात घेतली. तर माझ्या हातावर मोठ्ठा बोचकारा काढून तुरटी पसार झाली. तुरटीला मी बरेचदा ‘पुण्याची मैना’ म्हणते (कारण तिचाही ‘पदर डोईवर येईना’); तिलाही ‘पूर्वीचं पुणं राहिलं नाही’, म्हणायची चांगली सोय होती.

 

आम्ही खायला बसलो की गायत्री कुत्र्यासारखी येऊन खायला मागायची. तिला चीज आवडतं असा शोध लागला. त्यातही बरा अर्धा पार्मेजान चीजचे शेव्हिंग्ज आणतो; रंध्यावर चीजचा तुकडा घासून ते काढतात, तसलं. एक दिवस तो तिला चीज दाखवत होता, ती ‘ॲ’ असा ऱ्हस्व आवाज तोंडातून काढत होती; मग तो तिला चीज देत होता. त्याचा व्हिडिओ काढण्यापेक्षा ते बघणंच मला श्रेयस्कर वाटलं.

एक दिवस वरवर काही कारण दिसत नसताना गायत्री धावत जाऊन सोफ्याखाली लपली. आधी आम्हांला वाटलं की तिर्री लांब बसली होती, ती तिच्यावर हल्ला करणार का काय! गायत्री घाबरली होती. तिला नेहमीच्या व्हेटकडे नेलं. तिच्या फुफ्फुसांमध्ये पाणी झालं होतं. गायत्री आमच्याकडे तीन आठवडे एक दिवस राहिली. ती गेल्यावर तिच्या पायाचा ठसा त्यांनी आम्हांला दिला. मी तो कधीकधी बुकमार्क म्हणून वापरते. 

 

पार्मेजान चीजच्या त्या शेव्हिंग्जना आता आम्ही ‘गायत्री चीज’ म्हणतो. मधूनच तिच्यासारखं ऱ्हस्व ‘ॲ’ करतो आणि पुन्हा कामाला लागतो.

 

*

 

बशस्विनी लाड मला पहिल्यांदा दिसली तेव्हा बऱ्या अर्ध्यानं त्याची अगडबंब दुर्बीण बाहेर काढली होती. त्याचा एक मित्र आणि मित्राचा मुलगा असे दोघे दुर्बीणीतून गोष्टी बघण्यासाठी आले होते. दुर्बीण आणि ग्रहतारे वगळता बाकी सगळ्या गोष्टींकडे माझं लक्ष होतं. मला लांब, रस्त्याच्या दिव्याखालच्या उजेडात हालचाल दिसली. जवळ जाऊन बघितलं तर एक पिवळी मांजर होती. तेव्हा ती मांजर बोका आहे का भाटी हेही माहीत नव्हतं; आणि तिला 'ती मांजर' म्हणण्यात माझा स्त्रीवाद नव्हता; मराठीत मांजर स्त्रीलिंगी असते म्हणून ती मांजर.

 

त्यानंतर बरेचदा ती दिसायला लागली. बरेच दिवस तिला नाव ठेवायचं मी टाळलं होतं. भावनिक गुंतवणूक नको! कद्दूच्या जागी लावलेल्या कॅटनिपमध्ये मला दोन पट्टे सापडले. जवळच राहणाऱ्या यनेटशी बोलताना समजलं की ते पट्टे त्यांच्या ब्लॉसमचे होते. यथावकाश यनेटनं त्या पट्ट्यांचा नाद सोडून दिला. जेव्हा आमची पुरेशी ओळख झाली, आणि ती उड्या मारूनमारून पायाला डोकं घासायला लागली, तेव्हा मी ब्लॉसमला ‘बशी’ म्हणायला सुरुवात केली. आता कद्दूच्या कॅटनिपवर बशी दिसायची, तिर्रीची तिथून हकालपट्टी झालेली असणार किंवा तिनं स्वतःचंच ‘चले जाव’ केलेलं असणार.

 

एकदा यनेट बोलताबोलता म्हणाली की, तिचा शेजारी हलकट इसम आहे. तो तिच्या कुत्र्यांना आणि मांजरांना घाबरवतो. म्हणून बशी घरी फारशी येत नाही. आता माझा बांध फुटला. मी बऱ्या अर्ध्यालाही सूचना करून ठेवली, बशी दिसली की तिला खायला घालायचं. मात्र तिला खाऊ देताना शेजारच्या घराच्या सोप्यात खाऊ द्यायचा, कारण मग टेरिटरीवरून मांजरांची भांडणं नकोत.

ते काही फार टिकलं नाही. बशीला आमच्या घरी यायचं होतं. एप्रिल-मेमध्ये खूप पाऊस पडला आणि नेमकी पावसाच्या वेळी बशी घराजवळ होती. मग मी तिला घरी आणायचे. यनेटशी बोलणं झालं; आणि मी तिला घरीच आणलं. आता तिचं नामकरण क्रमप्राप्त झालं. घरी आणल्यावर दुसऱ्याच दिवशी बशी रात्री माझ्या अंगावर झोपायला लागली.

 

ब्लॉसम ⇾ बशी ⇾ बसंती ⇾ बशस्विनी ⇾ बशस्विनी लाड अशी तिची नावं आली. बशीचं बशस्विनी बऱ्या अर्धानं केलं; मला यासाठी त्याच्याबद्दल रास्त अभिमान वाटतो.

 

झाडावर मांजरबशी योग्य घरी गेली असती तर टिकटॉक आणि इन्स्टा-स्टार झाली असती. बरा अर्धा तिला रोज पेटवायचा. मांजरी पेटलेल्या बघितल्या आहेत का कधी तुम्ही? एकदा त्यानं तिला पेटवलं आणि घरातल्या वृक्षावर चढवलं. मग ती आपली आपणच चढायला लागली. आणखी एक नवीन प्रकार तिचा तिनंच सुरू केला. तिर्री खायला आली की भांडणं टाळण्यासाठी मी तिला माझ्या ऑफिसमध्ये कोंडून ठेवायचे. तिथे याची सुरुवात झाली. ती स्वतःला प्रदक्षिणा मारायची. मला गुरू सापडली!

 

तिच्या घरी तीन कुत्रे होते. बसंती कुत्तों के सामने नाचणं टाळण्यासाठी आमच्याकडे आली; हे शेपूट नाव ठेवून झाल्यानंतर आलं. बशी घरी आल्यावर दुसऱ्याच दिवशी माझ्या अंगावर येऊन झोपली. बशी आणि तिर्रीची भांडणं सुरुवातीला होतील; मग एकमेकींची सवय होईल, असा आमचा होरा होता. बहुतेकदा तो खराच ठरायचा, पण साधारण आठवड्यातून एकदा काही तरी बिनसायचं. तिर्रीनं आधी बशीवर हिसून झालं; पण बशी पडली तरणीताठी. तिर्रीच्या डोक्यावर कायम खपल्या लागायच्या. दोनेक महिने हे असं चाललं. एका संध्याकाळी आम्ही दोघे जेवायला एका मित्राकडे गेलो होतो. दोनेक तासांनी माझी चुळबूळ सुरू झाली. या दोघींची भांडणं तर झाली नसतील ना! आम्ही बशीला परत यनेटकडे सोपवायचं ठरवलं.

 

आपण म्हणालो म्हणून मांजरं थोडीच ते ऐकतात! मांजरं म्हणजे काय कुत्रे असतात का!! बशीला सोडलं त्या दिवशी ती परत आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी हजर झाली. मी तिला मांजरांच्या डब्यात भरलं आणि घरी नेऊन सोडलं. ती पुन्हा थोड्या वेळानं हजर झाली. हा दिनक्रमच झाला.

 

तिला सोडायला जाताना कधी रस्त्यात दिसणारा अगदी हळूहळू चालणारा, वयस्कर कुत्रा दिसायचा. गेल्या वर्षीपर्यंत तो अगदी नीट चालताना दिसत होता. बशी आणि तिर्रीचं भांडण झालं की तिर्रीच्या डोक्यावर, अंगावर खपल्या सापडायच्या. तरुण थी तिर्री तेव्हा तिनं तिच्या ८-१० पट वजन असणाऱ्या बाळकुत्र्याला दम दिला होता. आता ती बशी दिसली की लपायची. दिवसभर ती गॅरेजमध्ये कुठे तरी कोपऱ्यात जाऊन, लपून झोपायची. तिर्री घरी आली तेव्हा मी सहज पाच किलोमीटर धावून, दिवसभर आरामात सगळी कामं करायचे; आता मी धावणं बंद केलं आहे.

 

बशीला रोज सोडून येण्याला मी डेली डिपोर्टिंग ड्यूटी असं नाव दिलं – ती (व्हिजा न घेता) आवारात आलेली दिसली की तिला खोक्यात भरून परत तिच्या घरी सोडून यायचं. सकाळी मी उठले की ती खिडकीत हजर! तिला खोक्यात भरायचं; तिच्यासाठी वाटीत खाऊ आणि आमची दोघींची पदयात्रा तिच्या घरी. तिच्या घरी कुणी असलं की बेल वाजवून तिला घरी सोडायचे. दोन-चारदातर असं झालं की मी तिला सोडलं. दारात यनेट होती; आम्ही गप्पा मारल्या. मी परत आले तर मी घरी पोहोचायच्या आधी बशी तिथे हजर. तिला खरंच कुत्र्यांसमोर नाचायचं नव्हतं!

 

बशीला एक दिवस सकाळी सोडून मी घरी आले; बलोपासना केली आणि आंघोळीला जाणार तर बशी परत हजर! बघितलं तर बशी कुणाकडे तरी टक लावून बघत होती. तिला हाक मारली, तर ती पळून जायला लागली. ती बशी नव्हतीच! पिवळ्या रंगाची दुसरी मांजर होती. तीही तरणीच असावी. जशी ती मांजर हलली, तशी दुसऱ्या टोकाहून बशी जोरदार धावा बोलत आली. दुसरी मांजर पसार झालेली होती. तिर्री ह्या सगळ्या प्रकारांत कुठे होती कोण जाणे!

 

यनेट आणि अलेहांद्रोला प्राण्यांना वाचवून घरी आणायला आवडतं. त्यांना ते खायला-प्यायला घालतात. पण कुणा प्राण्याला अधिक काही वाढीव गरज असेल तर ते कमी पडतात. ऑफिसातली एक मैत्रीण, कमिल, मागे सांगत होती, तिनं तिच्या भाच्याला वाढवलं आहे. उजव्या, स्त्रीद्वेष्ट्या जो रोगन वगैरे लोकांच्या पॉडकास्टी ऐकून तोही गर्भपाताला विरोध करत होता. "बायका म्हणे गर्भपात गर्भनिरोधकासारख्या वापरतात!" ती म्हणाली, हे ऐकून माझं डोकंच तापलं. "तुला काही कल्पना आहे का गर्भपात करायचा तरी बाईच्या शरीराला काय दिव्यं सहन करावी लागतात ते! आणि ते नकोसं मूल जन्माला आल्यावर त्याचं काय? तू pro-life नाहीस, तू pro-birth आहेस!" गमतीत मी यनेटला आणि अलेहांद्रोला pro-rescue म्हणते; ते pro-care नाहीत. त्या दोघांची तुलना मी अशा लोकांशी केल्याचं त्यांना समजू नये म्हणून मी ह्या लेखाची लिंक माझ्या फेसबुकवरून पोस्ट न करण्याचा विचार करत्ये. कुणी शेजाऱ्यांनी हे एआय वापरून भाषांतर करून वाचलं तर काय घ्या! चांगले, उदारमतवादी लोक आहेत यनेट आणि अलेहांद्रो.

 

सर्वपित्री अमावस्येला मी यनेटला म्हणाले, "ती तुमच्या घरी अधिक टिकण्यासाठी तिचे थोडे लाड करता आले तर पाहा. तिला आवडतं; तिनं किंचित तक्रार केली तरी त्याकडे दुर्लक्ष करून लाड करा. तिच्याकडे लक्ष दिलेलं तिला हवं असतं." थोड्या वेळात बशीला परत सोडलं. अलेहांद्रोनं दरवाजा उघडला; चक्क चक्क त्यानं तिला हातात घेतली. मी त्याच्या दुसऱ्या हातात तिला आवडणाऱ्या वेट फूडचा डबा दिला. मग बशी दिसलीच नाही. चार दिवस वाट बघितली आणि यनेटला मेसेज पाठवला. यनेट म्हणाली, तिला नवीन घर मिळालेलं आहे.

लगेच मी यनेटला म्हणाले, "त्यांना बशीसाठी काही मदत लागली तर मला कळव. किंवा माझा नंबरच दे त्यांना. तिच्या लशीकरणाचे रेकॉर्ड पाठवते मी लवकरच." दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एका पिशवीत तिची औषधं आणि तिला आवडणाऱ्या ट्रीटचा मोठा डबा मी यनेटच्या दारात ठेवून दिला.

 

ट्रंपच्या राजवटीत एका देशातून अमेरिकेत व्हिजाशिवाय आलेल्या लोकांना भलत्याच तिसऱ्या देशात सोडायची धोरणं गेल्या वर्षी राबवली जात होती. या देशांना त्या बदल्यात अमेरिका काही मदतही करत होती. "सरकारला हे इमिग्रंट लोक आलेले चालत नाहीत; पण ते नागरिकांना हवे असतात", असं बशीबाई आणि तिर्रीच्या संबंधांचं वर्णन मध्यंतरी बऱ्या अर्ध्यानं केलं. आता अमेरिकी मध्यावधी निवडणुकांचे निकाल काय वेगळं सांगत आहेत!

 

बशी येईनाशी झाल्यापासून तिर्री घरात, बाहेर कुठेही बिनघोर पसरलेली दिसते. तिच्या डोक्यावरच्या खपल्या पडून आता पुन्हा ती मऊशार झालेली आहे. तिर्रीला हाक मारताना माझ्या तोंडात अधूनमधून बशीबाईचं नाव येतं.

 

अवांतर : बशीबाईवर प्रेम न करणं अशक्य आहे! ही बशीबाई.

बशीबाई प्रदक्षिणा