संपादकीय – डावं-उजवं करताना

'जगात नेमकं काय चाललंय ते मला नीट माहीत आहे, आणि जगाविषयीच्या माझ्या सिद्धांतात ते कसं बसतंय हेसुद्धा मी उलगडून दाखवतो,' असं कुणी सांगू लागलं तर तो खोटं बोलतोय हे समजून चाला. डाव्या किंवा उजव्या, कोणत्याही बाजूला विचारलं तर 'आमची' बाजू म्हणजे सत्य, संस्कृती आणि लोकशाहीची तारणहार, आणि 'समोरची' बाजू म्हणजे देश रसातळाला नेण्यासाठी टपलेली खलनायकांची टोळी, असं उत्तर येण्याची शक्यता मोठी असते. पण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या भिंती ओलांडून आपण जरा प्रत्यक्षात उतरलो, तर डाव्या किंवा उजव्या व्याख्यांचे रंग स्वस्त (चायनीज, पण डाव्या नसलेल्या!) स्टिकरसारखे सोलून निघू लागतात. त्यामुळे ह्या वर्षीच्या दिवाळी अंकाचं नियोजन करताना ठाम ठोकळेबाज उत्तरं देण्यापेक्षा उजवेपणाच्या वेगवेगळ्या बाजूंकडे लक्ष वेधायचा प्रयत्न करायचा असं आम्ही ठरवलं होतं. तो कितपत यशस्वी झाला ते अखेर वाचकांनीच ठरवायचं आहे; इथे काही गोष्टींचा केवळ उल्लेख करून ठेवला तर ते कदाचित उपयोगी ठरावं.
उदाहरणार्थ, गरिबांच्या भल्यासाठी म्हणून केलेल्या काही डाव्या धोरणांचा प्रत्यक्षात फायदा उजव्या नफेखोरांच्या खिशात कसा गेला, ते सुलक्षणा महाजन नगरनियोजनाच्या चष्म्यातून दाखवून देतात. दुसरीकडे, आधुनिक भांडवलशाही आली की जातिव्यवस्था आपोआप गळून पडेल, हा आधुनिकतावाद्यांचा भाबडा विश्वास कसा फसला हे नीरज हातेकर स्पष्ट करतात. उजव्या विचारसरणीचं खरं यश केवळ निवडणुका जिंकण्यात नसून दुधात साखर विरघळून जावी त्या प्रकारे स्वतःचा सांस्कृतिक विचार समग्र समाजात विरघळून देण्यात आहे याकडे रवि आमले लक्ष वेधून घेतात. काँग्रेसच्या काळातही लोकशाही संस्थांचं नुकसान झालं होतं हे उर्विश कोठारी स्पष्ट करतात आणि तृणमूल काँग्रेसचं व्यक्तिकेंद्री असणंही दाखवतात; एकंदरीत, निर्ढावलेल्या सिनिकल राजकारणाची बीजं जरी आधीच्या काळात रुजली, तरी ते पीक आता किती फोफावलं आहे हे ते स्पष्ट करतात. गिरीश कुबेर तर पुरोगामी म्हणवणाऱ्या कोंडाळ्यातही जो बौद्धिक दहशतवाद आणि चलाखी बोकाळली होती तिची उदाहरणं देऊन त्यांनाही अस्वस्थ करणारा आरसा दाखवतात. या सगळ्यापलीकडे, कुठल्याही देशातला किंवा काळातला फॅसिझम आतून नेमका कसा दिसतो हे समजून घ्यायचं असेल, तर उम्बेर्तो एको यांच्या गाजलेल्या निबंधाचा सोहम पिंगळीकर यांनी केलेला अनुवाद भपकेबाज भाषणं आणि सततच्या युद्धज्वरावर पोसल्या जाणाऱ्या या सनातन वृत्तीची अचूक नस पकडतो.
भारतात हे उजवेपण जेव्हा जात, जमात आणि धर्माच्या गुंत्यात उतरतं, तेव्हा चित्र अधिकच जटिल होतं. ज्या दलित आणि बहुजन समाजाला क्रांतीचा आणि समतावादी चळवळींचा समृद्ध वारसा आहे, तिथलाच तरुण आज बहुसंख्याकवादी धर्मकारणाची पालखी आपल्या खांद्यावर का वाहतोय आणि त्याच वेळी समाजमाध्यमांवर उच्चवर्णीयांच्या 'आरक्षण हटाव' मोहिमा कशा उफाळून येत आहेत, या विरोधाभासाची चिरफाड डॉ. अजिंक्य गायकवाड, शाहू पाटोळे आणि ओम बोदळे करतात. उजवे आदिवासींना संग्रहालयातल्या शोभेच्या वस्तूसारखं वागवतात, तर डावे त्यांना केवळ शोषणाचे पोस्टर-बॉय बनवतात; पण स्वतःच्या भाषेत रॅप आणि हिपहॉप गात यूट्यूबवर स्वतःचं आधुनिक दर्शन घडवणाऱ्या आजच्या आदिवासी तरुणाचं गाणं ऐकायला कुणाला सवड नाही, हा विरोधाभास प्राची वैद्य-दुबळे यांच्या लेखातून दिसतो. सद्य परिस्थितीत नक्षलवादाचं बदलतं स्वरूप एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या नजरेतून आळश्यांचा राजा यांनी घडवून आणलं आहे. स्वतःच्या धर्मातल्या सनातन्यांच्या दृष्टीने काफिर आणि बाहेरच्या बहुसंख्याक समाजाच्या नजरेत फक्त मुसलमान म्हणून अडकलेल्या विवेकी भारतीय मुस्लिमाची घुसमट हारुन शेख अत्यंत परखडपणे मांडतात. तर धर्माला सरसकट 'जाळुनी किंवा पुरूनी टाका' म्हणणाऱ्या एकारलेल्या आधुनिकतावाद्यांच्या पलीकडे जाऊन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक जगालाच धर्माची खरी निकड असल्याचं का सांगितलं होतं, याची सखोल चर्चा वैभव आबनावे करतात.
विचारसरणीची ही घुसळण केवळ संसदेच्या किंवा मतपेटीच्या दाराशी थांबत नाही; ती आपल्या शाळा-कॉलेजांत, पडद्यावर, कॅनव्हासवर आणि घराबाहेरच्या चौकातही येऊन थडकली आहे. गायत्री लेले आणि भ्रमर आपल्याला शिक्षणक्षेत्रात घेऊन जातात. कंत्राटी शिक्षकांची अस्थिरता, समाजमाध्यमांमुळे टोकाची मतं घेऊन वर्गात आलेले विद्यार्थी आणि 'आधी तुम्ही अभ्यासक्रम बदलला, आता आम्ही बदलतो' हा सूडबुद्धीचा खेळ खेळणारं पक्षीय राजकारण यांमुळे स्वतंत्रपणे प्रश्न विचारण्याची क्षमताच किती धोक्यात आली आहे हे लक्षात येईल. जेन झीचे पोवाडे गाण्याचा ह्या वर्षीचा फॅशनेबल पर्याय स्वीकारण्यापेक्षा वेगळा मार्ग आम्ही निवडला आहे हे वाचकांना सहज लक्षात यावं. त्यांच्या गाऱ्हाण्यांकडे आम्ही दुर्लक्ष मात्र अजिबात केलेलं नाही. सई केसकर यांच्या लेखात नवं शैक्षणिक धोरण, प्रवेशपरीक्षांचं अवास्तव महत्त्व आणि एकंदरीत ह्या सगळ्यामुळे शिक्षणात आलेले अडथळे विस्तारानं मांडले आहेत. सत्यजित राय यांच्या चित्रपटावरच्या दारिद्र्याचं दर्शन घडवून देशाची बदनामी केल्याच्या आरोपापासून ते आजच्या प्रचारकी चित्रपटांपर्यंतचा प्रवास गणेश मतकरी मांडतात, तर अभिजीत ताम्हणे चित्र-शिल्पकलेच्या क्षेत्रातल्या बदलांचा मागोवा घेतात. आपल्या घरांतले शांत, जिव्हाळ्याचे सण कसे कर्णकर्कश डीजे, मिरवणुका आणि आक्रमक उत्सवांच्या गर्दीत हरवून गेले आहेत, याची हुरहूर भक्ती चपळगावकर व्यक्त करतात.
ज्या वाचकांना केवळ गंभीर वैचारिक चर्वितचर्वण नको आहे, त्यांच्यासाठी खुसखुशीत खमंग फराळही अंकात आहे. मकरंद साठे यांचं नवंकोरं समकालीन नाटक आपल्या आजच्या जगण्यातल्या विसंगतींवर तिरकस प्रकाश टाकतं. सक्षम कथाकार सतीश तांबे यांचं नाटक आजच्या पालकांचे गंड आणि त्यांची मानसिकता उघडं करतं. (दोन्ही नाटकं तशी अंकाच्या विषयाशी जोडलेलीच आहेत हे नीट वाचलं तर लक्षात येईल.) याशिवाय अरुण खोपकर यांच्या प्राणीकथा, प्रसाद कुमठेकर यांची एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणारी कथा, नील यांची एआय-आधारित कथा, संजोप रावांची थरारकथा, धनंजय यांची युवाकाळातल्या आठवणींकडे घेऊन जाणारी कथा असा चमचमीत ऐवजही अंकात सापडेल. संकीर्ण विभागातले अभ्यासपूर्ण लेख, पुस्तक-परिचय या नेहमीच्या गोष्टी तर वाचालच, पण राशीभविष्य वाचायला अजिबात विसरू नका! थोडक्यात काय, तर तुम्ही उजव्या हातानं लिहिणारे असा वा डाव्या हातानं बॅटिंग करणारे, घोषणाबाजीच्या आणि ट्रोलिंगच्या पलीकडे जाऊन या वर्षीच्या भरगच्च दिवाळी अंकाचा आस्वाद घ्याल आणि तो इतरांनाही वाटाल हीच आमची इच्छा!