बुद्धिमान असण्याचे तोटे?
हुशार माणसं अनेकदा आपल्या हुशारीविषयी अभिमान (किंवा दुराभिमान) बाळगून असतात. पण एका पुस्तकानं हुशार माणसांविषयी काही रोचक मतं मांडलेली आहेत. सातोशी कानाझावा हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकवतात. त्यांचं 'इंटेलिजन्स पॅराडॉक्स' हे पुस्तक काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झालं आहे. सर्वसाधारण अर्थानं आपण ज्याला बुद्धिमत्ता म्हणतो तिचा रोजच्या जगण्यात फारसा फायदा होत नाही, उलट तोटाच होतो असं कानाझावा यात म्हणतात. आपल्या पूर्वजांना उत्क्रांत होताना आल्या नव्हत्या अशा काही नव्या अडचणी उद्भवतात तेव्हा बुद्धिमत्ता उपयोगी पडते, हे त्यांना मान्य आहे. पण सामान्यतः माणसाला जगताना अशा अडचणी क्वचितच येतात असं ते म्हणतात. परीक्षेत चांगले मार्क मिळवणं, लठ्ठ पगाराची नोकरी मिळवणं यासाठी बुद्धिमत्ता उपयोगी पडते, पण उत्तम जोडीदार शोधणं, मुलांचं संगोपन नीट करता येणं, चांगले मित्र मिळवणं अशा गोष्टींसाठी ह्या बुद्धिमत्तेची मदत न होता उलट तो अडथळा ठरतो असं कानाझावा यांचं मत आहे. परिचित प्रश्नांपेक्षा अपरिचित प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी ठरणारी बुद्धिमत्ता तुम्हाला इतरांहून थोड्या वेगळ्या रुची आणि मूल्यं देते. त्यांचा एरवी जगताना अडथळा होतो. उदाहरणार्थ, अधिक बुद्धिमान लोक दारू, तंबाखू किंवा इतर मादक द्रव्यांचं अधिक सेवन करतात वगैरे उदाहरणं ते देतात. अशा गोष्टींपेक्षा चांगलं पालक असणं किंवा घट्ट मित्र बनवता येणं या गोष्टी जगताना अधिक महत्त्वाच्या ठरतात आणि त्यात बुद्धिमान लोक कमी पडतात असं त्यांचं म्हणणं आहे. कानाझावा यांचं मत वादग्रस्त वाटू शकेल, पण त्यांच्या पुस्तकात त्यासाठी पुरेसा डेटा आहे असं त्यांचं म्हणणं दिसतं. १५५पेक्षा अधिक आय.क्यू. असणाऱ्या ५०००हून अधिक लोकांच्या अभ्यासावर हे आधारित आहे. उत्तम करिअर, चांगला पगार, उच्च शिक्षण वगैरे असूनही लग्न आणि पालकत्व यासारख्या सामान्य माणसाला जमणाऱ्या गोष्टींत या लोकांना अपयश लाभतं. शिक्षणव्यवस्थेमधून बाहेर येणारे अनेक हुशार तज्ज्ञ आर्थिक क्षेत्राकडे आकर्षित होतात. असं असूनही सध्याचे आर्थिक घोटाळे का झाले, असा प्रश्नही आजकाल विचारला जातो आहे. बहुविधता ही कधीकधी व्यक्तिगत क्षमतेपेक्षा अधिक परिणाम साधते असं काहींचं याबद्दल म्हणणं आहे. याला ‘थवा बुद्धिमत्ता’ (Swarm Intelligence) असं म्हटलं जातं. ज्ञानी लोकांच्या जोरावर उभ्या असलेल्या काही उच्चभ्रू संस्था आपली कबर खणत आहेत अशी शक्यता यातून जाणवते.
पुस्तकाविषयी आणि ‘थवा बुद्धिमत्ता’ या संकल्पनेविषयी अधिक माहिती खालील दुव्यांवर मिळेल
http://www.huffingtonpost.co.uk/dr-raj-persaud/success-intelligence-coul...
http://www.economist.com/blogs/prospero/2012/06/quick-study-satoshi-kana...
प्रतिक्रिया
अरेरे
मग आमच्यासारख्या आय.क्यू. नसलेल्या आणि तरीही अपयशी ठरलेल्या लोकांनी काय करावं ? निदान पुढच्या जन्मात तरी चांगला आय.क्यू. मिळेल अशा आशेवर होतो आम्ही!
लोकप्रिय वाङमयातील (Popular Culture) दाखले
उदाहरणार्थ, अधिक बुद्धिमान लोक दारू, तंबाखू किंवा इतर मादक द्रव्यांचं अधिक सेवन करतात वगैरे उदाहरणं ते देतात.
शेरलॉक होम्स - डोक्याला खाद्य नसले की अफू वा तत्सम पदार्थांचा आधार घेतो..
Big Bang Theory (मालिके)तील चौकडी आपल्या वर्तुळाबाहेरील जगाशी जुळवून घेताना धडपडते..(पेनी व शास्त्रज्ञ चौकडीच्या व्यक्तिमत्वांतील विरोधाभास - academic intelligence vs. street-smartness)
रोचक
रोचक, इकोटाईम्सच्या एकाच लेखात 'अनेक' सरसकट मते मांडली आहेत, एका विदाच्या संचावरुन अमूक एक मत मांडता येणं हा सांख्यकीचा एक फायदा आहे, त्या गटात चलपदांची संख्या वाढवल्यास किंवा गटाचे आकारमान(घटक संख्या) वाढविल्यास टक्केवारी व निष्कर्ष बदलू शकतात.
हे पुस्तक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकवणार्या प्राध्यापकांनी लिहिले असल्याने त्याला असणारे महत्व(अस्सलपणा) मान्य आहे, पण त्याच्या निष्कर्षाशी पूर्ण सहमत किंवा असहमत होणे अवघड आहे,
हुशारपणाचा जगण्यातील यशाशी असलेला संबंध हा समप्रमाणातच आहे(दैव वगैरे बाजूला ठेवून), फक्त हा हुशारपणा स्थल/काल/व्यक्ति-सापेक्ष आहे, रुढ बुद्धिमत्ता मोजमापाचे तंत्र मर्यादीत घटकांमधे निर्णय देण्यासाठी योग्य आहे व त्याचा उपयोग तसाच झाला पाहिजे, तसेही यश-अपयश पण सापेक्षच आहे, त्यामुळे लेखकाने मांडलेली गृहितके लेखातील मत पुर्वग्रहदुषित असल्याचा भास करुन देतात.
मला वाटतं वरच्या चर्चेत
मला वाटतं वरच्या चर्चेत 'बुद्धीमान' या शब्दाची 'परीक्षांमध्ये चांगले मार्क मिळवणारा' अशी व्याख्या केली आहे. ती फारच मर्यादित आहे. सचिन तेंडुलकर उत्कृष्ट बॅटिंग करतो, मग त्याला तुम्ही बुद्धीमान म्हणणार नाही का? सध्याच्या आयक्यू टेस्टमध्ये त्याचा आयक्यू १५० च्या वर येईलच असं नाही. पण जागतिक दर्जाचा खेळाडू होण्यासाठी नुसतं शरीरच नाही, तर मेंदूही अफाट कार्यक्षम असावा लागतो. गणितं सोडवणं, आयक्यूच्या टेस्टमध्ये अधिक मार्क मिळवणं या जशा मेंदूच्या क्षमता आहेत, त्याचप्रमाणे गाणं म्हणणं, खेळ खेळणं याही आहेत. त्यातल्या एकीला 'बुद्धी' म्हणायचं आणि इतरांना 'कौशल्य' म्हणायचं ही गफलत आहे.
किंबहुना एकाच बाबतीत विकसित किंवा अतिविकसित झालेला मेंदू असणारे इतर बाबतीत कमकुवत असतात हे दाखवून देण्यात काही विशेष आहे असं वाटत नाही. हे काहीसं अपेक्षितच आहे.
बुद्धीचा सर्वांगीण विकास मोजण्याचा प्रयत्न कोणी करतं असं वाटत नाही. कुठची कुठची वेगवेगळी अंगं असतात याबाबतची एक ढोबळ पण उपयुक्त थिअरी म्हणजे 'विविध पैलूंची बुद्धीमत्ता'
रोचक
वरील दुव्या-दुव्यांतून क्राऊस आणि मंडळींचा निबंध सापडला :
Krause S et al.
Swarm intelligence in humans: diversity can trump ability
Animal Behaviour Volume 81, Issue 5, May 2011, Pages 941–948
काही बाबतीत विशेषज्ञतेची उणीव मोठ्या समूहाच्या सरासरीने भरून काढता येते (त्यांचा पहिला प्रयोग), तर काही बाबतीत असे होत नाही (त्यांचा दुसरा प्रयोग).
रोचक
लेखात उल्लेखलेले स्वतः अनुभवले आहे.
शोधनिबंध वाचून पहायला हवेत.
-Nile
रोचक
मूळ माहितीवजा टिपण आणि प्रतिक्रिया रोचक आहेत. दोन्ही दुवे उघडून वाचेन.
कानाझावा यांनी बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने केल्या गेलेल्या विवेचनाइतकाच, वाचनासंदर्भातला, माहिती गोळा करण्यासंदर्भातला Awareness आणि Skill-development या दोन गोष्टींच्या मधला फरकही मला नेहमी रोचक वाटत आलेला आहे.
आजूबाजूला असलेली अनेक बुद्धीमान माणसं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातलं आपलं ज्ञान अधिकाधिक अद्ययावत् करताना दिसतात आणि ही स्पृहणीय बाब आहे. परंतु बर्याचदा ही क्षेत्रं applied स्वरूपाची असतात आणि मूलभूत संशोधन किंवा अभिजात कला अशा स्वरूपाची नसतात. कामाव्यतिरिक्त केलेल्या वाचनाचं (किंवा अधिक अचूक बोलायचं तर माहिती गोळा करण्याचं ) स्वरूप, त्याची दिशा या बाबी "जगताना उपयोगी पडेल" अशा स्वरूपाच्या असताना मला अधिक जाणवतात. यामधे अर्थातच काही चूक नाही. पण वर म्हण्टल्याप्रमाणे"उत्तम जोडीदार शोधणं, मुलांचं संगोपन नीट करता येणं, चांगले मित्र मिळवणं" यांसारख्या, जगण्याचा दर्जा ठरवणार्या गोष्टी या उपयुक्ततावादी गोष्टींपेक्षा वेगळ्या ठरतात.
उपयुक्ततेच्या पलिकडचं , आपलं "भान" अधिकाधिक खोलवरचं बनेल किंवा आपलं परिप्रेक्ष्य अधिक विस्तृत बनेल अशा स्वरूपाचं ज्ञानार्जन कमी कमी होत असावं असा माझा (कुठलाही विदा हाताशी नसताना बांधलेला) प्राथमिक अंदाज आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
पटलं नाही
मला वाटतं की बुद्धीमत्तेपेक्षा तिचा वापर कसा होतो हे महत्त्वाचं आहे. अनेकदा अशी बुद्धीमान माणसं ही त्यांच्या कार्यातच अनेकदा इतकी मग्न असतात की ईतर गोष्टी त्यांच्यासाठी दुय्यम असतात. ज्याला आपण झपाटलेपण म्हणातो ते हेच. त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रालाच सर्वस्व मानलं असतं आणि म्हणूनच ते त्यांच्या कोषात असतात. अनेकदा त्यांना जाणीवही असते की आपण संसारी व्यक्ती बनु शकत नाही म्हणून ते त्या फंदातच पडत नाहीत.
शेरलॉक होम्स डोक्याला खाद्य नसेल तर तंबाखू-कोकेन घ्यायचा. तो ही अतिशय बुद्धीमान होता. तो माणूसघाणा इ.इ.वाटला तरी अनेकदा त्याची अशिलाशी वागण्याची पद्धत, मिसेस हडसनबरोबरचं त्याचं नातं ह्या गोष्टी हे सुद्धा दर्शवतात की त्याला भावना होत्या, भावनांची कदर होती..
त्यामुळे निष्कर्ष पटला नाही.
=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....
लयच भारी
एकूण 'नसून अडचण, असून खोळंबा' असा प्रकार दिसतो बुद्धीमत्ता म्हणजे.
जगाच्या (काहीशे कोटी) लोकसंख्येतील काही कोटी माणसांची (हा आकडा या लेखनात आलेला नाही; तरीही संशयाचा फायदा देऊन कोटीत ती संख्या धरली आहे) ती आयक्यू टेस्ट करून त्यातील ५००० माणसांची निवड करून त्याआधारे केलेली मांडणी लयच भारी आहे. हां... आता ही मांडणी फक्त त्या पाच हजारांना लागू होते, असे लेखकाचे म्हणणे असेल तर मी म्हणतो ते चुकीचे. पण त्या स्थितीत लेखकाच्या मांडणीच्या आधाराचे वर्णन दर्यामें खसखस असे करून ती मांडणी निकालात काढता येते. पण जगात तेवढे पाच हजार लोकच बुद्धीमान आहेत, असे लेखकाचे म्हणणे असेल तर या लेखकाची बुद्धीमत्ता ही खोळंबा करणारी आहे असे म्हणावे लागेल.
मी हल्ली माहितगाराच्या धाग्यावर लक्ष ठेवतो. करमणुकीची साधने मिळतात. ती खरोखरच उत्तम असतात. पुन्हा या करमणुकीचा स्रोत लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स वगैरे मातब्बर संस्थांतला असतो हा बोनस.
दिलासा
बुद्धीमान माणसे खाजगी आयुष्यात लौकिकार्थाने अपयशी ठरतात हा विचार दिलासा देणारा आहे. आम्ही समाजाच्या दृष्टीने अपयशी ठरलो असलो तरी आतल्या आत आम्ही खूप बुद्धीमान होतो हा विचार सरणावर थंडोसा देऊन जाईल.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
हुशार लोकांच्या
हुशार लोकांच्या विक्षिप्तपणाच्या गोष्टी अप्रसिद्ध नाहीत. न्यूटनने मांजरासाठी एक आणि पिल्लासाठी एक छोटं भोक दरवाजात पाडण्याची गोष्ट प्रसिद्ध असते. पण न्यूटनची समकालीन शास्त्रज्ञांबरोबर चिकार भांडणं होती या गोष्टीही अप्रसिद्ध नाहीत. पण त्याच्या थोड्या आधीच्या काळातल्या गॅलिलेओने मात्र 'चुका' मान्य करून आपली मुंडी चर्चच्या कचाट्यातून सोडवण्याचा शहाणपणा दाखवला होता.
हफिंग्टन पोस्टमधल्या लेखाच्या शेवटी चीन आणि इतर लोकशाही देशांची तुलना केलेली आहे ती खटकली. चीन 'बुडणं' इतर लोकशाही देशांनाही सद्यस्थितीत, निदान नजीकच्या भविष्याचा विचार करता, परवडणारं नाही. त्यामुळे ही तुलना कितपत लागू होते याबद्दल मी साशंक आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
.
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
गमतीदार.
चांगला पालक किंवा मित्र बनणे हे माणसाचा EQ कितपत चांगला आहे यावर अवलंबून नसते का? IQ मोजताना ठराविक प्रकारच्या क्षमतांची चाचणी केली जाते आणि त्यातली एकही क्षमता मित्र जोडणे अथवा संगोपन करणे यासाठी उपयोगाची नाही.
त्यामुळे जोडीदार शोधणे, मैत्री करणे आणि बालसंगोपन करणे यांचा IQ शी जोडलेला परस्परसंबंध बादरायण वाटतो (Spurious Correlation).
आजवरच्या अनुभवावरून खरोखर बुद्धिमान असणार्या लोकांपेक्षा स्वतःला (आहे त्यापेक्षा जास्त) बुद्धिमान समजणार्या लोकांबरोबर मैत्री करणे अवघड असते असे वाटते.
दिलेल्या दुव्यांपैकी दुसर्या लेखात बुद्धिमान लोक इतरांपेक्षा वेगळे असण्याचा (म्हणजे सेक्शुअल एक्स्लुझिविटी, शाकाहार) प्रयत्न करतात असे म्हटले आहे. ते मला तरी पटले नाही. इतरांपेक्षा वेगळे असण्याचा प्रयत्न करणे हे स्वतःला इतरांपेक्षा जास्त बुद्धिमान समजण्याचे लक्षण म्हणता येईल फारतर, असण्याचे नव्हे. असे समजण्याच्या स्वभावाचा उगम आधुनिक समाजात लोकांचे जास्तीतजास्त सामाजिकरण (Socialization) करण्यासाठी ठराविक वागणुकीला चांगले म्हणण्याच्या रिवाजात असावा (म्हणजे हुंदडण्याच्या वयात तासन्तास अभ्यास करणारी मुले वगैरे).
.
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
काहिसा गमतीदार आणि बराच रोचक
काहिसा गमतीदार आणि बराच रोचक चर्चाविषय! मुळ लेखन आणि प्रतिक्रीया दोन्ही आवडले!
प्रत्यक्षात माझ्या आजुबाजुच्या माणसांवरून मात्र या निष्कर्षाला अनुमोदन शक्य वाटत नाही. बहुतेकवेळा समानशीलेषु व्यसने च सख्यम् हे अधिक योग्य वाटते.
बाकी कमी बुद्धीमत्ता असणार्या माझ्यासारख्यांसाठी लेख उत्साहवर्धक ठरावा
या नगरीनिरंजन यांच्या मताशी अगदी सहमत आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बहुविध बुद्धिमत्ता
या विषयावर प्रकाश टाकणारे पालकनीतीमधील दोन लेख सुचवत आहे ..
प्रज्ञांचे सप्तक - फेब्रुवारी २००७
प्रज्ञावंत पालकत्वाकडे भावनेच्या वाटेने -
http://www.palakneeti.org/
धन्यवाद प्रियंवदा.प्रज्ञांचे
धन्यवाद प्रियंवदा.
प्रज्ञांचे सप्तक हा हॉवर्ड गार्डनर यांनी विषद केलेल्या सात प्रज्ञांची माहिती देणारा लेख वाचनीय आहे. तो लेख इथे वाचता येईल
मात्र मला "प्रज्ञावंत पालकत्वाकडे भावनेच्या वाटेने" हा लेख शोधता आला नाही. कुठे शोधता येईल ते सांगु शकाल काय? दुवा असल्यास उत्तम
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
'प्रज्ञावंत पालकत्वाकडे भावनेच्या वाटेने' - दुवा
तो लेख इथे वाचता येईल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
वा! हा लेख अधिक नेमका
वा! हा लेख अधिक नेमका आहे!
मस्तच!
स्वगतः कधी लायब्ररीत दिसताच EIP वरचे मुळातले पुस्तक वाचुन बघायला पाहिजे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!