Dead Man's Hand - ७

आधीचे भाग - , , , , ,

बांद्र्याच्या न्यू गार्डन व्ह्यू सोसायटीचा वॉचमन मिथिलेशकुमार भूमिया सोसायटीच्या गेटशेजारी असलेल्या आपल्या चौकीत बसून मोबाईलवर गाणी ऐकण्यात गुंग झाला होता. अठ्ठावीस वर्षांचा मिथिलेश गेल्या दोन वर्षांपासून ही वॉचमनची नोकरी करत होता. सतत येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांमुळे आणि सोसायटीच्या इतर कामांमुळे दिवसभर धावपळ होत असली तरी नाईट शिफ्टला तसा आरामच होता, त्यामुळे तो नाईटलाच येणं पसंत करत असे. त्याचा जोडीदार असलेल्या बसंतकुमारलाही ते मान्यं होतं, कारण बसंत हा बालबच्चेवाला होता, त्यामुळे सहसा नाईटला तो नाखूश असायचा.

गाण्याचा आवाज चिरत आलेल्या कारच्या कर्कश्श् हॉर्नमुळे मिथिलेशची तंद्री भंगली. घाईघाईतच तो आपल्या चौकीतून बाहेर आला. तोपर्यंत त्या कारमधून उतरलेली दोन माणसं मुख्य गेटच्या शेजारी असलेल्या लहानशा दरवाजापाशी पोहोचलेली होती. मिथिलेशने त्यांना लगेच ओळखलं. दोघांपैकी एकजण सी विंगमध्ये सहाव्या मजल्यावर राहणारा रिझवान खान होता आणि दुसरा होता त्याचा मित्रं किरण चव्हाण! रिझवानने बहुधा भरपूर दारु ढोसलेली असावी कारण तो जवळ येताच मिथिलेशला एकदम दारुचा भपकारा आला. त्याला धड उभंही राहता येत नव्हतं. किरणने त्याला कसाबसा आधार देत आत आणलं.

"वॉचमन, याला जरा सांभाळून घरी सोडून ये! सांगत होतो इतकी पिऊ नकोस, पण याने ऐकलं तर ना!"

"तुम्ही फिकीर नका करु साब, मी यांना नीट घरी सोडेन!"

"सुन बे रिझवान, अब घर जाकर और कुछ तमाशा मत करना समझा? सीधे सो जाना! कल बात करेंगे!"

रिझवान दारुच्या नशेत काहीतरी बरळला, पण ते ऐकायला किरण तिथे होताच कुठे? तो केव्हाच गेटमधून बाहेर पडून आपल्या कारमध्ये बसून निघून गेला होता.

"चलीये खानसाब, आपको घर छोडकर आता हूं! संभलके!"

मिथिलेशने रिझवानला आपल्या हाताने आधार दिला आणि लिफ्टच्या दिशेने चालवलं. खरंतर रिझवानच्या तोंडाला येणारा दारुचा वास त्याला असह्यं झाला होता, पण शेवटी नोकरीचा प्रश्नं होता. लिफ्टने दोघे सहाव्या मजल्यावर आले. दोन - तीन वेळा किल्लीविषयी विचारल्यावर सगळे खिसे उलटेपालटे करुन अखेर रिझवानने किल्ली काढली खरी, पण त्याचा हात इतका थरथरत होता की त्याला धड लॅचलॉकही उघडता येत नव्हतं! वैतागलेल्या मिथिलेशने अखेर दार उघडून आधार देत त्याला आत आणलं आणि कसंबसं बेडरुममध्ये नेत बेडवर झोपवलं. बेडवर पडताक्षणीच रिझवान झोपेच्या अधीन झालेला पाहून फ्लॅटचं दार ओढून घेत तो बाहेर पडला आणि त्याने सुटकेचा नि:श्वास टाकला.

"इतना बर्दाश्त नहीं होता तो शराब पीते क्यों है लोग?" स्वत:शी बडबडत तो आपल्या चौकीत येवून बसला.

बरोबर त्याचवेळेस विरुद्ध बाजूला असलेल्या सोसायटीच्या भिंतीला चिकटून एक आकृती पुढे सरकत होती....

******

"हॅलो! बांद्रा पोलीस स्टेशन! हेड कॉन्स्टेबल ढाकरे बोलतोय....."

"साब...."

"कधी? ....."

"ठीक आहे! आम्ही येतो. तू तिथेच थांब! आणि कोणीही बॉडीला हात लावू नका!"

ढाकरेंनी फोन आपटला आणि घड्याळावर नजर टाकली. रात्रीचा दीड वाजला होता. 'भोसडीच्यांनो, ही काय आत्महत्या करायची वेळ आहे? सगळ्या रात्रीची वाट आमच्या!' स्वत:शीच चरफडत ढाकरे सब् इन्स्पे. मुकणेंसमोर गेले आणि त्यांना कड्क सॅल्यूट ठोकत म्हणाले,

"साहेब, अल्मेडा पार्कसमोरच्या न्यू गार्डन व्ह्यू सोसायटीतून फोन आला होता. आत्महत्येची केस आहे!"

"चला ढाकरे, निघण्याची तयारी करा, डिटेक्शनवाले कोणकोण आहेत ते बघा. मी मानकरसाहेबांना फोन करुन आलोच!"

दहा मिनिटांतच बांद्रा पोलीस स्टेशनची जीप न्यू गार्डन व्ह्यू सोसायटीच्या गेटमधून आत शिरली. एव्हाना बिल्डींगमधील रहिवाशांचा घोळका खाली जमला होताच. काहीजण आपापल्या बाल्कनीतूनही डोकावून पाहण्याचा प्रयत्नं करत होते. बिल्डींगच्या पोर्चपासून सुमारे आठ - दहा फूट अंतरावर एका तरुणाचा मृतदेह पडलेला होता. पोलीस आलेले दिसताच वॉचमनने धावतच पुढे येऊन पोलीसांना सलाम केला. सब् इन्स्पे. मुकणे, हेड कॉन्स्टेबल ढाकरे आणि आणखीन चार शिपाई खाली उतरले.

"आम्हाला फोन तू केला होतास? काय नाव तुझं? हे कसं झालं?" ढाकरेंनी वॉचमनवर सरबत्ती केली.

"माझं नाव मिथिलेशकुमार भूमिया आहे साब! रात्री दीडच्या सुमाराला जोराचा आवाज झाला म्हणून मी चौकीतून बाहेर आलो तो हे दिसलं! जन्मात असा प्रकार मी कधी पाहिला नाही साब! मी चौकीत परत आलो आणि तुम्हाला फोन केला आणि मग सोसायटीचे चेअरमन मेंडोसासाबकडे जाऊन त्यांना ही खबर दिली!"

"हा माणूस कोण आहे?" मुकणेंनी सोसायटीतल्या रहिवाशांकडे पाहत विचारलं.

"हे बी विंगमध्ये सहाव्या मजल्यावर राहणारे मि. खान आहेत. महंमद रिझवान खान!" सुमारे पन्नाशीचे मेंडोसा पुढे येत म्हणाले, "आपल्या फॅमिलीबरोबर दोन - अडीच वर्षांपासून ते इथे राहतात!"

"त्यांच्या फॅमिलीपैकी कोणी इथे आलं नाही?" मुकणे काहीसे चकीत होत म्हणाले.

"साब, खानसाबची घरवाली आपल्या मुलासह सवेरेच मुलुख गेली आहे!" वॉचमनने माहिती पुरवली, "मै खुद उनके लिये टॅक्सी लेकर आया था साब! सकाळी नऊ वाजता ते निघून गेले!"

मुकणे काही न बोलता प्रेताकडे वळले. रिझवानच्या मृतदेहाकडे पाहवत नव्हतं. उंचावरुन आपटल्यामुळे त्याचं डोकं फुटलं होतं. सर्वत्रं रक्ताचा सडा पडलेला होता. त्याच्या अंगात पांढर्‍या रंगाचा कुर्ता-पायजमा होता. निम्म्याहून अधिक कुर्ता डोक्यातून वाहणार्‍या रक्तामुळे लालेलाल झाला होता. थेट डोक्यावर आपटल्यामुळे कवटी फुटली होती. अर्ध्याहून अधिक मेंदू बाहेर आलेला दिसत होता. मुकणे आणि ढाकरें सारखे कित्येक वर्ष खात्यात काढलेले लोकही तो प्रकार पाहून हादरले होते. त्यांच्याबरोबर आलेला पोलीस फोटोग्राफर सर्व बाजूंनी बॉडीचे फोटो काढत असतानाच सोसायटीच्या गेटमधून आणखीन एक पोलीस जीप आत शिरली.

इन्स्पे. मानकर आले असावेत या अपेक्षेन मुकणेंनी वळून पाहिलं, पण मानकरांच्या ऐवजी सब् इन्स्पे. कदमना जीपमधून उतरताना पाहून ते चकीतच झाले. कदम इथे आले याचा अर्थ ही केस सीआयडीकडे जाणार हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्टं होतं. कदम जीपमधून खाली उतरत असतानाच तिसरी पोलीस जीप तिथे येऊन धडकली आणि इन्स्पे. मानकर खाली उतरले. कदमना पाहून त्यांनाही आश्चर्य वाटलं.

"कदम, तुम्ही? काय भानगड आहे?" मानकरांनी चौकशी केली.

"सर... " कदमनी थोडक्यात मानकरांना सगळ्या प्रकरणाची कल्पना दिली.

"प्रधानसाहेब स्वत: येणार आहेत?"

कदम काही उत्तर देण्यापूर्वीच रोहितची कार सोसायटीच्या आवारात शिरली होती. कार पार्क करुन मानकरांसकट सर्वांनी ठोकलेल्या सॅल्यूटचा हातानेच स्वीकार करत तो रिझवानच्या मृतदेहासमोर येऊन उभा राहीला. काही क्षण मृतदेहाचं बारकाईने निरीक्षण केल्यावर कदमांकडे वळून तो म्हणाला,

"धीरज सक्सेना पार्ट टू! एव्हरीथिंग इज एक्झॅक्टली सेम!"

"प्रधानसाहेब, हा सगळा नक्की काय प्रकार आहे?" मानकरांनी उत्सुकतेने विचारलं.

"हा प्रकार... वेल! मानकर, गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या खूनसत्रातला हा चौथा बळी आहे! तुम्हांला चार - पाच दिवसांपूर्वी लीलावती हॉस्पिटलच्या चौकात एक फेटल अ‍ॅक्सिडेंट झालेल आठवतो आहे? त्या अ‍ॅक्सिडेंटमध्ये एक्स्पायर झालेला उदय इनामदार आणि हा रिझवान हे जवळचे मित्रं होते. उदय या खूनसत्रातला तिसरा बळी होता तर हा रिझवान चौथा! याची सुरवात पवईला धीरज सक्सेनाच्या खुनापासून झाली आहे. त्याचाही असाच बिल्डींगवरुन पडून मृत्यू झाला होता. अर्थात तो खून होता हे नंतर क्लीअर झालं! आता या रिझवानचं नेमकं काय झालं हे पीएम रिपोर्टमध्ये क्लीअर होईलच, पण माझ्या अंदाजाप्रमाणे हा देखिल खून असावा!"

"एक्सक्यूज मी सर...."

रोहितने आवाजाच्या दिशेने पाहीलं. नाईटगाऊन घातलेली सुमारे तिशीची एक तरुणी पुढे आली.

"सर मायसेल्फ जेनेट सिक्वेरा! मी एफ विंगमध्ये राहते. धिस इज अ सुसाईड सर! मी मि. खानना बाल्कनीतून खाली उडी मारताना पाहिलं आहे!"

"तुम्ही पाहीलं आहे? उडी मारताना?" रोहितने चमकून तिच्याकडे पाहिलं, "कसं काय?"

"सर, मी सिक्स्थ फ्लोरला राहते. माझा फ्लॅट मि. खान यांच्या फ्लॅटच्या बरोबर समोर आहे. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि सध्या एका अमेरीकन प्रोजेक्टवर काम करते आहे. सो आय वर्क बिटवीन यूएस बिझनेस अवर्स! मी माझ्या डेस्कपाशी बसून काम करत असतानाच मला मि. खानांच्या बाल्कनीमध्ये हालचाल दिसली. सहज क्युरीऑसिटी म्हणून पाहीलं तर खान रेलिंगवर चढले होते आणि देन ही जंप्ड डाऊन! आय रॅन टू माय बाल्कनी, पण तोपर्यंत ते खाली आपटले होते. इट वॉज सो हॉरीबल सर! आय वॉज शॉक्ड!" जेनेटच्या अंगावर त्या आठवणीनेही शहारा आला.

"रिझवानने खाली उडी मारण्यापूर्वी किंवा नंतर त्याच्या फ्लॅटमध्ये किंवा बाल्कनीत आणखीन कोणी होतं?"

"येस सर!" जेनेट उत्तरली, "मी आधी म्हटल्याप्रमाणे माझ्या डोळ्यांसमोर खाननी खाली उडी मारली होती. बाल्कनीतून त्यांना खाली आपटलेलं पाहिल्यावर आय वॉज डेझ्ड फॉर अ मोमेंट.... ऑटोमॅटीकली माझी नजर पुन्हा त्याच्या बाल्कनीकडे गेली आणि आय गॉट अनदर शॉक! बाल्कनीत आणखीन कोणीतरी उभं होतं सर...."

"जस्ट अ मिनिट जेनेट, तुम्ही पाहिलंत कोण उभं होतं ते? मॅन ऑर वूमन? डिड यू सी द फेस?"

"नो सर! त्यांच्या बाल्कनीतला लाईट चालू नव्हता, त्यामुळे फेस दिसणं इम्पॉसिबलच होतं. ऑल आय कुड सी वॉज अ ह्यूमन फिगर! दॅट टू फॉर हार्डली अ कपल ऑफ मोमेंट्स, कारण ती आकृती वळली आणि बाल्कनीतून आत निघून गेली. इट वॉज देअर फॉर अ मोमेंट अ‍ॅन्ड नेक्स्ट मोमेंट इट वॉज गॉन! आय थॉट आय वॉज ड्रिमींग.... मी परत आत आले आणि फ्लॅट लॉक करुन शेजारी राहणार्‍या मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस आयझॅकबरोबर खाली आले. तोपर्यंत वॉचमनने पोलीसांना फोन केला होता आणि मि. मेंडोसांनाही इन्फॉर्म केलं होतं."

"तुम्ही खाली आलात तेव्हा कोणी पळून जाताना आढळलं?"

"नो सर! फ्लॅट लॉक करुन आणि मिस्टर - मिसेस आयझॅकबरोबर खाली उतरेपर्यंत जवळपास दहा-बारा मिनिटं गेली होती. मिनव्हाईल इफ समवन हॅव रॅन ऑफ, आय डोन्ट नो!"

"आय सी! जेनेट, हे सगळं नेमकं कधी झालं? कॅन यू टेल द टाईम?"

"बिटवीन वन फिफ्टीन अ‍ॅन्ड वन ट्वँटी सर! रात्री वन थर्टीला माझी एक ऑनलाईन मिटींग होती आणि त्यापूर्वी पंधरा मिनिटं मला रिमाईंडर आला होता. नेमक्या त्याच वेळेला मी त्याना उडी मारताना पाहीलं होतं!"

रोहित आणि कदम, दोघांनीही आपापल्या रिस्टवॉचवर नजर टाकली. रात्रीचे अडीच वाजले होते. दोघांच्याही डोक्यात एकाचवेळी तो विचार आला होता.

"कदम. ताबडईतोब कंट्रोल रुमला फोन करुन मेसेज फ्लॅश करा. बोरीवली आणि अंधेरी स्टेशनच्या एरीयात जेवढ्या म्हणून वायरलेस व्हॅन्स आहेत त्या सगळ्या स्टेशनवर पाठवा. ईस्ट अ‍ॅन्ड वेस्ट! आय अ‍ॅम शुअर ती स्वप्नाच असणार! ती डेफीनेटली किरणला फोन करेल. तिच्या फोनचं लोकेशन ताबडतोब कळलं पाहीजे. हरी अप!"

त्याचं बोलण्म जेमतेम पुरं होण्यापूर्वीच कदम आपल्या जीपकडे धावले. ते दोन पावलं जातात तोच रोहितचा मोबाईल वाजला.

"हॅलो...."

"प्रधानसाहेब, मी किरण चव्हाण बोलतो आहे! आता एक सेकंदापूर्वी मला पुन्हा ब्लँक कॉल आला होता...."

किरण पुढे काय बोलतो आहे ते न ऐकता त्याने फोन कट् केला आणि कदमांच्या पाठोपाठ तो जीपच्या दिशेने धावला. तो जीपशी पोहोचतो आहे तोपर्यंत जीपच्या ड्रायव्हरने वायरलेसवर कंट्रोलरुमशी संपर्क साधलाही होता. अवघ्या पाच-सात मिनिटांतच कंट्रोलरुमचा मेसेज जीपमधल्या वायरलेस सेटवर फ्लॅश झाला. तो मेसेज आणि त्यावर सांगण्यात आलेलं स्वप्नाच्या मोबाईलचं लोकेशन ऐकताच रोहित आणि कदम वेड्यासारखे एकमेकांकडे पाहत राहीले. दोघांनाही क्षणभर काय बोलावं तेच कळेना....

स्वप्नाचा फोन ठाण्यातल्या तीन हात नाक्यावरुन आला होता!

"ती पुन्हा निसटली सर!" कदम वैतागून म्हणाले.

"इट्स ऑलराईट कदम!" रोहित प्रसन्नपणे स्मित करत म्हणाला, "आय मस्ट से, शी इज एक्स्ट्रीमली इंटेलिजंट! धीरज आणि उदयचा खून केल्यावर तिने मुद्दाम बोरीवली स्टेशनच्या एरीयातून किरणला फोन केला. आपण तिचा मोबाईल ट्रेस करणार आणि बोरीवली स्टेशनचा एरीया कव्हर करणार याची तिला कल्पना असावी म्हणून तिने यावेळेस ठाण्याहून फोन केला आणि आपल्याला गाढवाचे कान लावले. ब्रिलीयंट! आय अ‍ॅम इम्प्रेस्ड!"

दोघं पुन्हा जेनेट आणि इतर सर्वजण उभे होते तिथे आले. या सर्व प्रकरणात आपला रोल कच्चा लिंबूचा आहे याची मानकरांना कल्पना होती. ते रोहितच्या पुढच्या सूचनेची वाट पाहत होते. रिझवानच्या मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा करण्याची त्याने मुकणेंना सूचना दिली आणि तो सोसायटीच्या वॉचमनकडे वळला.

"नाव काय तुझं?"

"मिथिलेशकुमार भूमिया साब!"

"मला सांग मिथिलेश," रिझवानच्या मृतदेहाकडे बोट दाखवत रोहितने विचारलं. "हे सगळं कसं झालं?"

"साब, रात्रीचा दीड वाजला होता. मी गेटवर चौकीत बसलो होतो. अचानक धप्प असा जोराचा आवाज झाला. मी चौकीतून बाहेर आलो तर बी विंगसमोर काहीतरी खाली पडलेलं दिसलं. मी जवळ जाऊन पाहीलं तर खानसाब तिथे पडले होते. कसमसे साब जिन्दगीमे ऐसी मौत कभी नही देखी साब! खानसाबचं डोकं फुटलं होतं! चारो तरफ खून ही खून था. ते मेले होते हे तर साफच दिसत होतं. मी माझ्या चौकीत परत आलो आणि पोलिसांना खबर दिली. मग मी मेंडोसासाबच्या घरी गेलो आणि त्यांना घेऊन खाली आलो. बादमें बाकी सब लोगभी नीचे आए थे!"

"अच्छा.... रिझवान खाली पडल्यावर तू पोलिसांना फोन केलास आणि त्यानंतर मेंडोसांना बोलवण्यासाठी त्यांच्या घरी गेलास, बरोबर? त्यानंतर तू आणि मेंडोसा खाली उतरेपर्यंत इथे कोणी आलं होतं?"

"नहीं साब! सर्वात आधी मी आणि मेंडोसासाबच आलो होतो! बाकी सर्वजण नंतर आले!"

"पोलिसांना फोन केल्यावर तू मेंडोसांना बरोबर घेऊन पुन्हा बॉडीपाशी आलास त्याला किती वेळ लागला?"

"पाच - सात मिनीटं तर नक्कीच लागली होती साब!"

"आणि तोपर्यंत मेनगेटवर कोण होतं?"

"कोणीच नव्हतं साब! मी एकटाच वॉचमन आहे नाईटला आणि इथे दुसरं गेट नाही!"

"काल रिझवान घरी कधी आला?"

"खानसाहेब नऊ - साडेनऊच्या सुमाराला घरी येत असत साब! कधीकधी मात्रं त्यांना बराच उशीर होत असे. काल रात्रीही ते असेच अकराच्या सुमाराला परत आले होते. त्यावेळी ते भरपूर प्यायलेले होते. त्यांना धड चालताही येत नव्हतं. मीच त्यांना आधार देत लिफ्टने घरी पोहोचवलं होतं!"

"याचा अर्थ तू त्याला वर घेऊन गेलास तेव्हादेखिल गेटवर कोणीही नव्हतं, बरोबर?"

मिथिलेशने होकारार्थी मान हलवली फक्तं.

"आता सांग, रिझवानला चालताही येत नव्हतं तर तो घरी कसा आला? रिक्षा का टॅक्सी?"

"गाडीने आले होते साब! त्यांचे मित्रं चव्हाणसाब त्यांना गाडीने घेऊन आले होते. खानसाबना गेटवर सोडून ते निघून गेले."

रोहितने काही न बोलता कदमांकडे पाहीलं. कदमनी त्याच्या नजरेचा अर्थ अचूक ओळखला आणि एका बाजूला जाऊन मोबाईलवर कोणाला तरी फोन केला. मिनिटभराने ते परत आले आणि त्याच्याकडे पाहून त्यांनी नकारार्थी मान हलवली. रिझवानवर लक्षं ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या सीआयडींच्या माणसाने कोणालाही मेनगेटमधून आत जाताना किंवा बाहेर पडताना पाहिलेलं नव्हतं. याचा अर्थ सरळ होता. स्वप्ना मेनगेटमधून आत न शिरता वेगळ्याच कोणत्या तरी वाटेने आत शिरली होती आणि बहुधा त्याच वाटेने बाहेर पडली होती!

कदम आणि मानकरांसह तो सहाव्या फ्लोरवर आला. रिझवानच्या फ्लॅटची एक किल्ली कायम त्याच्या शेजारी राहणार्‍या अब्दुल कयूम यांच्याघरी असते असं चेअरमन मेंडोसांकडून कळलं होतं. फ्लॅटमध्ये शिरण्यापूर्वी त्याने पॅसेजवर नजर फिरवली. प्रत्येक मजल्यावर एकूण चार फ्लॅट्स होते. पॅसेजच्या दोन्ही टोकाला एकमेकांशेजारी दोन-दोन दारं होती आणि मधोमध लिफ्ट होती. कोणत्याही दारात उभं राहील्यास लिफ्टमधून बाहेर पडणारा माणूस दिसू शकला असता. रिझवानच्या ६०१ नंबरच्या फ्लॅटशेजारीच जिना होता.

अब्दुल कयूमकडून किल्ली घेऊन मेंडोसांनी रिझवानचा फ्लॅट उघडला. पॅसेजमधून आत शिरल्यावर त्यांच्या सूचनेप्रमाणे कदमनी स्विचबोर्डवरची सर्व बटणं दाबली. त्याबरोबर पॅसेज आणि हॉल उजळून निघाला.

१५ बाय १२ चा तो हॉल सामानाने गच्च भरला होता. दोन मोठे सोफे, त्याच्या मध्ये नक्षीदार काचेचा टी-पॉय, एका बाजूला भलं मोठं लाकडी कपाट, त्याच्या शेजारी एक अ‍ॅक्वेरीयम, दुसर्‍या कोपर्‍यात डायनिंग टेबल आणि चार खुर्च्या असा सगळा जामानिमा त्या हॉलमध्ये होता. वॉलमाऊंट केलेला मोठा टी. व्ही. होता. 'या एवढ्या पसार्‍यातून हे लोक कसे वावरत असतील?' रोहितच्या मनात आलं. हॉलमधल्या टी-पॉयवर मुद्दाम दिसेल अशी एक वस्तू ठेवलेली होती. त्याकडे नजर जाताच तो क्षणभर पाहतच राहीला. आपल्याला असंच काहीतरी पाहायला मिळेल याचा त्याला थोडाफार अंदाज होताच!

इस्पिकचा एक्का!

रोहितने तो पत्ता उचलून उलटसुलट करुन पाहीला. पूर्वीच्या दोन पत्त्यांच्याच कॅटमधलाही हा पत्ता होता यात कोणतीच शंका नव्हती. तो पत्ता कदमांच्या हाती देत तो बेडरुमकडे वळला. हॉलप्रमाणेच दोन्ही बेडरुम्स आणि कीचनही सामानाने भरलेलं होतं. एका बेडरुममध्ये नमाज पढण्यासाठी खास जागा मोकळी सोडलेली आढळून येत होती. त्याच बेडरुममध्ये बाल्कनीत उघडणारा दरवाजा होता.

दार उघडून तो बाल्कनीत आला. टॉर्चच्या प्रकाशात लाईट्चं बटण शोधून त्याने लाईट लावला. त्या बाल्कनीच्या समोर दुसर्‍या विंगची बाल्कनी दिसत होती. ती जेनेटची बाल्कनी असणार हे तो समजून चुकला. ८ बाय ४ च्या त्या छोट्याशा बाल्कनीतही थोडंफार सामान पडलेलं होतं. बाल्कनीत आपल्याला फारसं काही सापडणार नाही ही त्याची अटकळ खरी ठरली होती. तो पुन्हा हॉलमध्ये परतला तेव्हा कदमनी त्या पसार्‍यात पडलेला रिझवानचा मोबाईल शोधून काढला होता. त्यांच्याशी नजरानजर होताच तो काय ते समजून चुकला....

मेसेजच्या इनबॉक्समधला मेसेज तोच असणार ....
पाठवणार्‍याचा नंबरही तोच असणार ....
आणि ज्याला पाठवण्यात आला त्याचं भवितव्यंही ठरलेलं होतं .... मृत्यू!

Game over. Your time is up – Swapna.

"कदम, इथले डिटेल फोटोग्राफ्स काढा, एकूण एक प्रिंट उचला! आतापर्यंत आपल्याला स्वप्नाची एकही प्रिंट मिळालेली नाही, मे बी धिस टाईम वी आर लकी! व्हू नोज? मी जेनेटच्या फ्लॅटमध्ये जातो आहे. तुमचं इथलं काम आवरुन घ्या!"

रोहित मानकरांसह खाली आला. सब् इन्स्पे. मुकणे रिझवानच्या मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात गर्क होते. चेअरमन मेंडोसा आणि बरेच रहिवासी अद्यापही तिथे उभे होते. जेनेट आणि तिचे शेजारी असलेले आयझॅक पती - पत्नीही तिथे हजर होते. मानकरांना त्यांचं स्टेटमेंट लिहून घेण्याची सूचना देवून पोलीस फोटोग्राफरसाह रोहित जेनेटबरोबर तिच्या फ्लॅटवर आला. जेनेटचा फ्लॅट रिझवानच्या फ्लॅटसारखाच होता, पण मोजकंच सामान असल्यामुळे प्रशस्तं भासत होता.

"जेनेट, रिझवानला खाली उडी मारताना पाहिलंत तेव्हा तुम्ही कुठे होतात?"

जेनेट त्या दोघांसह बेडरुममध्ये आली. बेडरुममध्ये डबलबेड होता आणि त्याच्या पासून काही अंतरावर खिडकीला लागूनच तिचा कॉम्प्युटर डेस्क होता. तिचा लॅपटॉप अद्यापही चालू होता. रोहित डेस्कसमोर असलेल्या तिच्या खुर्चीत बसला आणि त्याने लॅपटॉपवर काम करण्याचा पवित्रा घेत प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहीलं.

"स्लाईटली अ‍ॅक्रॉस!" रिव्हॉल्विंग चेअर किंचित वळवत जेनेट उत्तरली.

त्याने समोर नजर टाकली. रिझवानच्या फ्लॅटची बाल्कनी त्याला स्पष्टं दिसत होती. त्याने कदमना फोन लावला.

"कदम, जरा बाल्कनीत या!"

कदम बाल्कनीत आले आणि त्यांनी जेनेटच्या फ्लॅटकडे नजर टाकली तोच त्याची पुढची सूचना आली.

"बाल्कनीच्या रेलींगवर चढा! बट बी केअरफुल! डोन्ट जंप!"

जेनेटच्या खळखळून हसण्याचा आवाज फोनमधूनही कदमांच्या कानावर आला. एका हातात फोन धरुन आणि दुसर्‍या हाताने रेलिंग धरुन त्यांनी एक पाय पलिकडे टाकत 'पोझ' घेतली. बेडरुमच्या खिडकीतून त्यांच्याकडे पाहत असलेल्या जेनेटने होकारार्थी मान हलवलेली कदमना दिसली. त्याचवेळी रोहितचा आवाज आला,

"परफेक्ट कदम! नाऊ गो बॅक! टेक केअर!"

कदम पुन्हा बाल्कनीत उतरताच रोहित आणि जेनेट बाल्कनीत आले. त्याने कदमना बाल्कनीचा लाईट बंद करण्याची सूचना दिली. लाईट बंद होताच जेनेटचं म्हणणं अचूक असल्याची त्याला कल्पना आली. रात्रीच्या अंधारात तिच्या बाल्कनीतून समोरच्या बाल्कनीत उभ्या असलेल्या कदमांची फक्तं बाह्याकृतीच तेवढी दिसू शकत होती.

रोहित जेनेटसह खाली आला आणि मुकणेंना तिचं स्टेटमेंट लिहून घेण्याची सूचना देऊन त्याने पुन्हा रिझवानचा फ्लॅट गाठला. कदम अद्यापही फ्लॅटमध्येच शोध घेत होते. रिझवानच्या फ्लॅटमध्ये कदमना दोन लाख रुपयांची कॅश सापडली होती. स्वप्नाने या पैशांना हातही लावलेला दिसत नव्हता. फिंगर प्रिंट एक्सपर्ट्सना फ्लॅटमध्ये बर्‍याच प्रिंट्स सापडल्या होत्या. रिझवानचे कुटुंबीय गावाहून परतल्यावर आणि त्यांच्या प्रिंट्स घेतल्यावरच इतर प्रिंट्स तपासणं शक्यं होणार होतं. फिंगर प्रिंट एक्सपर्ट्स आणि फोटोग्राफर्सचं काम आटपलेलं होतं. सर्वजण बाहेर पडल्यावर कदमनी फ्लॅट सील केला आणि किल्ली आपल्या ताब्यात घेतली. रोहितने सर्वांना खाली पाठवून दिलं आणि कदम आणि नाईकना बरोबर घेऊन तो बिल्डींगच्या टेरेसवर आला, परंतु तासभर टेरेसवर तपास करुनही त्याच्या हाती काही लागलं नव्हतं.

तिघं पुन्हा खाली आले आणि लिफ्टमधून बाहेर पडल्यावर लिफ्टचं दार बंद करताना इतका वेळ नजरेतून सुटलेली एक गोष्टं रोहितच्या दृष्टीस पडली तसा तो एकदम चपापला. 'हे आपल्या आधीच कसं लक्षात आलं नाही?' तो स्वत:वरच चिडला.

लिफ्टच्या दाराच्या बरोबर वर एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला होआ!

"मि. मेंडोसा," कॅमेर्‍याकडे बोट दाखवत त्याने विचारलं, "हा कॅमेरा सुरु आहे?"

"येस सर! आमच्या सोसायटीच्या प्रत्येक विंगच्या वर असे कॅमेरे बसवलेले आहेत आणि ते सर्व व्यवस्थित सुरु आहेत! सोसायटीच्या मेन ऑफीसमध्ये असलेल्या कॉम्प्युटरवर हे सर्व रेकॉर्डींग स्टोअर केलं जातं! पर विंग पर अवर एक व्हिडीओ फिल्म बनते!"

"आय वॉंट टू सी दॅट! राईट नाऊ!"

मेंडोसांनी आपल्या घरुन सोसायटीच्या ऑफीसची किल्ली आणली. कदम आणि मानकरांसह रोहित त्यांच्याबरोबर ऑफीसमध्ये आला. त्याच्या सूचनेवरुन मेंडोसांनी बी विंगचं रात्री एक वाजून दहा मिनिटांपासूनचं रेकॉर्डींग सुरु केलं.

सुरवातीची नऊ मिनिटं कॅमेर्‍यात काहीही टिपलेलं नव्हतं....
मात्रं दहाव्या मिनिटाचं रेकॉर्डींग सुरु होताच रोहित एकदम अ‍ॅलर्ट झाला....
एक व्यक्ती जिन्यावरुन भराभर उतरताना, खरंतर उड्या मारत येताना दिसत होती!
जेमतेम दोन सेकंदच ती कॅमेर्‍यात कैद झाली होती!

रोहितने पुन्हा - पुन्हा ते रेकॉर्डींग रिवाईंड करुन चालवून पाहिलं. पण सुमारे वीस ते पंचवीस वेळा बारकाईने ते रेकॉर्डींग पाहिल्यावरही फारसं काही त्याच्या हाती लागलं नाही. मात्रं कॅमेर्‍यात कैद झालेली ती व्यक्ती स्वप्नाच असणार याबद्दल त्याला कोणतीच शंका नव्हती. संध्याकाळी सहा वाजल्यापासून सर्व रेकॉर्डींग आपल्या ऑफीसमध्ये पाठवून देण्याची त्याने मेंडोसांना सूचना दिली.

एव्हाना पोलीस हर्स तिथे येऊन पोहोचली होती. रोहितच्या सूचनेवरुन रिझवानचा मृतदेह डॉ. भरुचांकडे पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून देण्यात आला. खरंतर रिझवानच्या आत्महत्येची जेनेट ही आयविटनेस होती. त्याला खाली उडी मारताना तिने प्रत्यक्षं पाहिलेलं होतं, परंतु निदान या केसच्या बाबतीत तरी कोणतीही रिस्क घेण्याची रोहितची तयारी नव्हती. फारसं काही हाती लागणार नाही हे माहीत असूनही तीन हात नाक्यावर चौकशी करण्यासाठी त्याने नाईकांची रवानगी केली. त्याच्या परवानगीने मानकर आणि मुकणेही आपल्या स्टाफबरोबर बांद्रा पोलीस स्टेशनला निघून गेले.

"मि. मेंडोसा, मेनगेट सोडून सोसायटीत जाण्यायेण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे?"

"दुसरा कोणताही मार्ग नाही सर!" मेंडोसा नकारार्थी मान हलवत म्हणाले, "सोसायटीला हे एवढं एकच गेट आहे. अ‍ॅज यू मे सी सर, कंपाऊंडच्या वॉलवर धारदार टोक असलेले मेटल रॉड्स बसवलेले आहेत. त्यामुळे त्या वॉलवरुन कोणी चढून आत येणं शक्यंच नाही!"

"दुसरा मार्ग नक्कीच आहे मि. मेंडोसा!" रोहित शांत परंतु कठोर स्वरात म्हणाला, "अ‍ॅन्ड वी विल फाईन्ड इट!"

कदम आणि वॉचमनला जोडीला घेत त्याने सोसायटीला चक्कर मारण्यास सुरवात केली. तो नेमकं काय करणार आहे या उत्सुकतेने मेंडोसा आणि इतर दोघं-तिघं जणही त्याच्यामागोमाग निघाले. रिझवानवर नजर ठेवून असलेल्या सीआयडींच्या माणसाने स्वप्ना पुढच्या गेटने आत किंवा बाहेर गेलेली नाही हे कदमना खात्रीपूर्वक सांगितलं होतं. त्यामुळे ती नक्कीच दुसर्‍या कोणत्या तरी मार्गाने आत शिरली असणार याबद्दल त्याला खात्री होती. सोसायटीच्या भिंतीचं तो काळजीपूर्वक निरीक्षण करत होता. खासकरुन भिंतीवर घासटल्याच्या खुणा किंवा हाता-पायांचे किंवा बुटांचे ठसे आढळतात का याचा तो बारकाईने शोध घेत होता. मेंडोसांनी कितीही खात्री दिली तरी स्वप्ना भिंतीवर चढून आत उतरण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. अशाच भिंतीवरुन पाण्याच्या टाकीवर चढून ती कौशलच्या सोसायटीत शिरली होती हे तो विसरला नव्हता! सावकाशपणे एक एक पाऊल उचलत तो सोसायटीच्या मागच्या टोकाशी आला आणि एकदम जागीच थबकला....

कंपाऊंडच्या भिंतीला जमिनीला लागून सुमारे दोन - अडीच फूट लांबरुंद असं भगदाड पडलेलं दिसत होतं.

रोहितने सहेतुकपणे मेंडोसांकडे पाहिलं. हा प्रकार पाहून ते इतके गोंधळून गेले होते की काय बोलावं हेच त्यांना समजत नव्हतं. त्यांच्याकडे फारसं लक्षं न देता रोहित त्या भगदाडापाशी आला. त्या भगदाडातून सरळ बाहेर पडणं अशक्यं होतं, पण थोडी काळजी घेतल्यास खाली बसून रांगत - सरपटत त्यातून बाहेर पडणं अशक्यं नव्हतं. दोन्ही हाता-पायांवर रांगत तो आरामात त्या भगदाडातून बाहेर पडला. बाहेरच्या बाजूला गवत आणि झुडुपं वाढलेली असल्याने भिंतीपासून सुमारे दहा-बारा फुटांवर असलेल्या रस्त्यावरुन ते भोक दिसू शकत नव्हतं. त्या भोकाबाहेर असलेल्या मातीत स्पष्ट उमटलेला एक ठसा त्याच्या दृष्टीस पडला.

हाय हील्स टो!

ती प्रिंट पाहताच जेनेटने बाल्कनीत पाहिलेली ती आकृती म्हणजे स्वप्नाच होती याबद्दल त्याला कोणतीच शंका उरली नाही. धीरजच्या फ्लॅटच्या टेरेसमध्ये आणि कौशलच्या सोसायटीशेजारच्या बागेत चिखलात मिळालेल्या प्रिंटशी ही प्रिंट जुळणार याबद्दल त्याला खात्री होती. त्याने आजूबाजूला आणखीन शोध घेतला, पण ती प्रिंट सोडली तर त्याला बाकीचं काहीच आढळलं नाही. दोन मिनिटांनी पुन्हा त्या भगदाडातून तो आत शिरला.

"मि. मेंडोसा, धिस इज द आल्टरनेट वे इन!" तो मिस्किलपणे म्हणाला.

"वॉचमन, हे काय आहे?" मेंडोसांनी गोंधळून विचारलं, "मला याबद्दल कळलं कसं नाही?"

"आप क्या कह रहे साब? गेल्या आठवड्यातच मी आणि बसंतनी ह्या भोकातून रस्त्यावरची कुत्री आत घुसून घाण करतात म्हणून तुम्हाला आणि डिसोझासाबना सांगितलं होतं. डिसोझासाबनी ते भोक पाहिलंही होतं!"

"हं.... हं.... ठिक आहे!" मेंडोसा आठवल्यासारखं करत म्हणाले, "सॉरी सर! आजच मी ते होल बंद करुन घेतो!"

"आता काय उपयोग, बैल गेला आणि झोपा केला!" कदमना बोलल्यावाचून राहवलं नाही. मेंडोसा अधिकच ओशाळले.

रोहितने बारकाईने ते भगदाड आणि त्याच्या भोवतालची जमिन तपासून पाहिली, परंतु त्याच्या हाताला काहीच लागलं नाही. कंपाऊंडची उरलेली भिंतही त्याने काळजीपूर्वक तपासली, पण ते भगदाड वगळता त्याला कुठेही काही आढळलं नाही. अर्थात हाय हिल्सच्या टोची प्रिंट पाहिल्यावर स्वप्ना त्या मार्गानेच सोसायटीत घुसली होती याबद्दल त्याची पक्की खात्री झाली होती. आणखीन थोडीफार चौकशी करुन तो कदमांसह बाहेर पडला.

"बोला कदम, काय अंदाज आहे?"

"रिझवानच्या आत्महत्येमुळे एक क्लीअर झालं ते म्हणजे धीरज, कौशल आणि उदय यांच्या मृत्यूमागे त्याचा हात निश्चित नाही सर! पण त्याने आत्महत्या केल्यामुळे गुंतागुंत आणखीनच वाढली आहे एवढं मात्रं नक्की. त्याचा खून झाला असता तर ते फारसं अनपेक्षित नव्हतं असं म्हणता येईल. बरं धीरजप्रमाणे आत्महत्येच्या स्वरुपाआड दडलेला खून असाव तर तसंही म्हणता येणार नाही, कारण त्या जेनेटने त्याला प्रत्यक्ष खाली उडी मारताना पाहीलं आहे! ही सरळसरळ आत्महत्या आहे."

"कदम, जरा विचार करा... रिझवानची फॅमिली सकाळी उत्तर प्रदेशातल्या त्याच्या गावी जाते, रात्री रिझवान दारुने झिंगलेल्या अवस्थेत घरी येतो... स्वत: किरणच त्याला घरी आणून सोडतो, त्यानंतर दोन - अडीच तासांत रिझवान आत्महत्या करतो. तो आत्महत्या करतो तेव्हा स्वप्ना त्याच्या घरात असते आणि नंतर ती किरणला ब्लँक कॉल करते! हा सगळा सिक्वेन्स पाहिला तर रिझवानला किरणने सेटअप केलं आणि स्वप्नाने त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडलं असं वाटत नाही? आपली फॅमिली गावाला गेली आहे असं रिझवान किरणजवळ बोलला आणि त्याचा फायदा स्वप्नाने उचलला असेल तर? तिने किरणला केलेला ब्लँक कॉल हा 'जॉब डन' स्वरुपाचा अ‍ॅकनॉलेजमेंट कॉल असू शकतो. एक लक्षात घ्या, धीरज, उदय आणि रिझवान तिघांच्याही मृत्यूनंतर स्वप्नाने किरणला ब्लँक कॉल केलेला आहे, कौशलच्या मृत्यूनंतर स्वत: किरणच तिथे आल्यामुळे तसं करण्याची तिला गरजच पडली नाही!"

"पण सर, रिझवानसारखा माणूस, जो स्वत:च एक गुंड आहे, तो सुखासुखी आत्महत्या करेल आणि ते देखिल स्वप्नासारख्या एखाद्या मुलीला घाबरुन हेच मला पटत नाही! असं काय कारण असावं की त्याने आत्महत्या केली?" कदम विचार करत म्हणाले, "आणि आता पुढे काय सर? एक किरण सोडला तर इतर चौघांचा मृत्यू झाला आहे. आपल्या दृष्टीने विचार केला तर प्रत्येक केसमध्ये प्रत्यक्ष खून करणारी स्वप्ना आहे. आता हे दोघं एकमेकाला सामील असतील तर हे सगळं बंद होईल, पण या सगळ्यामागे किरण असेल आणि तो स्वप्नाकरवी हे सगळं करत असेल तर त्याच्या दृष्टीने एकमेव धोका म्हणजे....."

"स्वप्ना!" रोहित त्यांचं वाक्यं अर्ध्यात तोडत म्हणाला, "मलाही एक्झॅक्टली हीच शंका येते आहे कदम! या सगळ्या प्रकरणात किरण हाच मास्टरमाईंड असावा! स्वप्नामार्फत त्याने इतर चौघांचाही काटा काढला आहे. इफ दॅट इज द केस, स्वप्ना इज फिनीश्ड. हर गेम वुड बी ओव्हर नाऊ! फक्तं तीच किरणच्या गळ्याला फास लावू शकते आणि तो हा धोका पत्करेल असं मला वाटत नाही! आय विल नॉट बी सरप्राईज्ड इफ वी फाईंड हर बॉडी सून! माझ्या अंदाजाप्रमाणे स्वप्नाने किरणवर अ‍ॅटॅक केला आणि किरणने सेल्फ डिफेन्स करताना ती मारली गेली अशी कहाणी आपल्याला ऐकायला मिळेल. किंवा कदाचित हिट अ‍ॅन्ड रन रोड अ‍ॅक्सिडेंटमध्येही ती सापडण्याची शक्यता आहे!"

कदम क्षणभर काहीच बोलले नाहीत. त्याचं बोलणं तर्कसंगत होतं. किरण आणि स्वप्ना या दोघांनी मिळून जर हे हत्याकांड घडवून आणलं असेल तर किरणच्या दृष्टीने स्वप्ना ही कायमची टांगती तलवार राहणार होती.

"सर...." काही वेळ विचार करुन कदम म्हणाले, "आपण एकाच बाजूने विचार करतो आहोत असं वाटत नाही? किरण आणि स्वप्ना या दोघांनीच हे सगळं हत्याकांड घडवून आणलं आहे असं गृहीत धरुन आपण विचार केला तर किरण स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वप्नाचा गेम करेल हे उघड आहे! पण तसं नसलं तर? या सगळ्यामागे स्वप्ना एकटीच असेल तर?"

"अ‍ॅब्सोल्यूटली कदम! तुम्ही म्हणता तो अँगल देखिल तितकाच खरा असण्याची शक्यता आहे! किरणचा यात काहीच संबंध नसेल आणि स्वप्ना आपल्याला मिसगाईड करण्यासाठी त्याला ब्लँक कॉल करुन फ्रेम करण्याचा प्रयत्नं करत असेल हे मी मागेच तुम्हाला म्हणालो होतो. इन दॅट केस, किरणचा जीव धोक्यात आहे आणि स्वप्ना त्याच्यावर हल्ला करणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे! अ‍ॅन्ड लेट्स बी ऑनेस्ट हिअर कदम, आतापर्यंत जितक्या सहजपणे तिने चौघांना मारलं आहे आणि तितक्याच आरामात प्रत्येकवेळी ती निसटून गेली आहे, ते पाहता तिला रोखण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग काढावा लागणार आहे!"

******

घाईघाईने ब्रिज उतरुन ती स्टेशनच्या बाहेर आली आणि समोरच असलेल्या रिक्षाला तिने हात केला.

"अल्मेडा पार्क!"

सेंट थेरेसा रोडने रिक्षा चाललेली असताना तिने आपला मोबाईल काढला आणि एक नंबर डायल केला.

"स्वॅप्स, आय अ‍ॅम ऑन माय वे! पाच मिनिटांत पोहोचते आहे!"

फोन बंद केला तेव्हा कॅरोलच्या समाधानी चेहर्‍यावर मंद स्मित झळकत होतं.

******

अचानक थंडगार पाणी डोक्यावर पडलं तसा रिझवान खडबडून जागा झाला.

एक क्षणभर आपण नेमके कुठे आहोत हेच त्याला समजेना. मग हळूहळू त्याला एकेक गोष्टं आठवू लागली. आपण संध्याकाळी भाईबरोबर मोतीमहल मध्ये बसलो होतो. तिथे आपण भरपूर दारु प्यायलो होतो. नशेत आपण वाट्टेल ते बडबडत होतो, बहुतेक काहीतरी उलटसुलटही बोलून गेलो, कारण भाईने आपल्याला एक भडकवली होती .... हे सगळं अंधुक अंधुक आठवतं आहे. पण त्यानंतर काय झालं? आणि आपण आता कुठे आहोत? हं... हे तर आपलंच घर दिसतं आहे. बहुतेक भाईनेच आपल्याला हॉटेलमधून घरी आणलं असावं! पण... आता आपल्या डोक्यावर पाणी कोणी ओतलं? भाई आपल्याबरोबर थांबलेला तर नाही? एकापाठोपाठ एक हे सगळे विचार त्याच्या डोक्यात येत असतानाच....

"रिझवान...." अचानक एका मुलीचा आवाज त्याच्या कानावर आला, तसा तो नखशिखांत हादरला.

"कौन.... कौन है?" थरथरत्या आवाजात त्याने विचारलं.

"इतनी जल्दी भूल गये रिझवान?" खुनशी स्वरात त्या आवाजाने पुन्हा प्रश्नं केला, "मै वहीं हूं जिसने तुम्हारे तीन साथियोंको जहान्नममें पहुंचाया है! अब तुम्हारी बारी है! शैतान इब्लिस तुम्हारी राह देख रहा है वहां!"

अचानक एक चेहरा भुतासारखा त्याच्यासमोर प्रगटला .....
एक थंडगार पण क्रूर नजर त्याच्यावर रोखलेली होती ....
रिझवानच्या काळजाचं पाणी पाणी झालं .....

"नहीं SSS ऐसा नहीं हो सकता! या खुदा! या परवरदिगार.... "

"अब खुदा की याद आई रिझवान? मासूम लडकीयोंको बरबाद करते वक्त, उन्हे तडपता देखकर, उन्हे सिगरेट्से जलाते हुए या उनकी जान लेते वक्त कभी तुम्हारा खुदा याद नहीं आया?"

रिझवान काही बोलण्यापूर्वीच समोर दिसत असलेल्या एका चेहृयाच्या शेजारी आणखीन एक चेहरा प्रगटला ....
तो दुसरा चेहरा पाहून तर रिझवानची अधिकच बिकट अवस्था झाली ....

"पहचाना मुझे रिझवान?" त्या दुसर्‍या चेहर्‍याने बर्फाळलेल्या आवाजात प्रश्नं केला, "याद है उन दो दिनोंमें मेरे साथ क्या हुवा था? तुमने मेरे साथ वो सब किया था जो तुम्हारे इस्लाममें हराम माना जाता है! शायद तुम्हें याद हो ना हो, पर मुझे सबकुछ याद है! हर एक पल, जो मैने तडप कर गुजारा है, उन सबका हिसाब तो चुकाना होगा!"

"नहीं SS मुझे माफ कर दो!" रिझवान दोन्ही गुडघ्यांवर खाली कोसळत दीनपणे गयावया करत म्हणाला, "मै अपने मुल्क वापस लौट जाऊंगा! वापस कभी बम्बई की तरफ कदम भी नहीं बढाऊंगा! तुम्हे खुदा का वास्ता! तुम्हे तुम्हारे भगवान का वास्ता! मेरी जान बक्श दो ...."

अचानक इतका वेळ अंधारात मिसळून गेलेली एक आकृती विजेसारखी हलली.....
दुसर्‍याच क्षणी रिझवानच्या कमरेत सणसणीत लाथ बसली!
पूर्ण ताकदीने मारलेल्या त्या एकाच फटक्यासरशी रिझवानच्या डोळ्यासमोर काजवे चमकले .....
आपल्याला कोणत्याही प्रकारे दया दाखवण्यात येणार नाही हे त्याला कळून चुकलं .....

"या खुदा...."

अचानक उठून उभं राहत त्याने वेड्यासारखी दुसर्‍या बेडरुममध्ये धाव घेतली. एका झटक्यासरशी त्याने बाल्कनीचं दार उघडलं आणि रेलिंगवर चढून त्याने स्वत:ला खाली झोकून दिलं .....

त्याच्यापाठोपाठ ती आकृती बाल्कनीत पोहोचली, पण तोपर्यंत डोकं फुटलेला रिझवान तडफडून शांत झाला होता!

क्षणार्थात ती पुन्हा बेडरुममध्ये परतली. ज्या दोन चेहर्‍यांना पाहून रिझवान अर्धमेला झाला होता, ते दोन्ही चेहरे अद्यापही त्याच्या बेडरुममध्ये अधांतरी तरंगत होते. मिनिटभराने केवळ एक कार्ड मागे ठेवून ती बाहेर पडली तेव्हा मात्रं ते अदृष्यं झाले होते.

अद्याप कोणाचंही दार उघडलेलं नव्हतं. लिफ्टच्या भानगडीत न पडता जवळपास उड्या मारतच तिने जिना उतरण्यास सुरवात केली. सोसायटीतले रहिवासी हळूहळू जागे होत होते, पण नेमकं काय झालं आहे याची कोणालाच काही कल्पना नव्हती. जेमतेम दोन मिनिटांत सहा मजले उतरुन ती खाली आली. एक क्षणभर तिने बिल्डींगच्या पुढच्या भागात नजर टाकली तेव्हा त्या दिशेने धावणारा वॉचमन तिच्या दृष्टीस पडला. त्याच्या नजरेला पडणार नाही याची सावधगिरी बाळगत तिने सोसायटीच्या मागच्या टोकाला असलेल्या कंपाऊंडच्या भिंतीकडे धाव घेतली. दोन तासांपूर्वी ज्या मार्गाने ती आत शिरली होती, त्याच मार्गाने पसार होण्याचा तिचा इरादा होता. सुदैवाने अद्याप तिच्याकडे कोणाचंही लक्षं गेलं नव्हतं.

अवघ्या दोन मिनिटांत ती त्या वाटेने बाहेर पडली आणि सोसायटीच्या मागच्या गल्लीत शिरत अंधारात मिसळून गेली.

******

रोहित आपल्यासमोरचा रिझवानचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट वाचण्यात गर्क झाला होता. रिझवानचा मृत्यू डोक्यावर बसलेल्या फटक्यामुळे कवटी फुटून मेंदूला झालेल्या आघातामुळे झालेला असल्याचं डॉ. भरुचांनी पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये स्पष्ट केलं होतं. त्याच्या पोटात बर्‍याच प्रमाणात दारू आणि खाद्यपदार्थ आढळून आले होते, परंतु धीरज, कौशल आणि उदयप्रमाणे सोडीयम थिओपेन्टलचे ट्रेसेस मात्रं त्यांना कुठेही आढळून आलेले नव्हते. ही एक आत्महत्या असून खूनाची कोणतीही शक्यता डॉ. भरुचांनी साफ फेटाळून लावली होती. तो रिपोर्ट वाचत असतानाच कदम आले.

"जयहिंद सर!"

"जयहिंद! बोला कदम, काय म्हणते स्वप्ना?" त्याने मिष्किल स्वरात विचारलं.

"ती कशाला काही बोलणार आहे सर? आपल्याला धंद्याला लावते आणि गायब होते!" कदम तक्रारीच्या सुरात म्हणाले.

"रिलॅक्स कदम! एक ना एक दिवस ती आपल्याला सापडेलच! बोला, रिझवानबद्दल काय कळलं?"

"सर, काल संध्याकाळभर किरण आणि रिझवान मोती महल मध्ये बसले होते. किरण तसा नॉर्मल होता, पण रिझवान मात्रं एकामागून एक पेग ढोसत होता. दारुच्या नशेत त्याचं आणि किरणचं जोरदार भांडण झालं होतं! किरण त्याला शांत करण्याचा प्रयत्नं करत होता, पण रिझवानला दारु इतकी चढली होती की तो वाट्टेल ते बरळत होता. एका लिमीटपर्यंत किरण शांत होता सर, पण असह्य झाल्यावर त्याने रिझवानला कानफटवला! त्यानंतर रिझवान थोडावेळ गप्प झाला, पण पुन्हा त्याचा तमाशा सुरु झाल्यावर रात्री साडेदहाच्या सुमाराला किरण त्याला गाडीत घालून तिथून निघून गेला!"

"किरण आणि रिझवानचं भांडण नेमकं कशावरुन झालं होतं?"

"सर मी मोती महलच्य वेटरलाच घेऊन आलो आहे!" नाईकना खूण करत कदम म्हणाले.

"सुमारे तेवीस - चोवीस वर्षांचा आणि वेटरचे कपडे घातलेला एक तरुण पोरगा थरथरत आत आला. आजपर्यंत त्याचा कधी पोलीस स्टेशनशीही संबंध आलेला नसावा, त्यामुळे कदमनी थेट क्राईम ब्रँचमध्ये आणल्यामुळे तो विलक्षण बावरला होता. रोहितने त्याला आपादमस्तक न्याहाळलं आणि समोरच्या खुर्चीत बसण्याची खूण केली. घाबरतच अंग चोरुन तो खुर्चीत बसला.

"काय नाव तुझं?"

"जोसेफ डिकोस्टा सर!"

"तू काही गुन्हा केला आहेस? चोरी? मारामारी? खून?"

"नो! नो सर! बिलकूल नाही!" तो जोरजोराने मान हलवत पण ठाम स्वरात म्हणाला.

"अरे मग घाबरतोस कशाला? जस्ट रिलॅक्स! नाईक, जरा चहा सांगा!"

दोन मिनिटांत एका शिपायाने त्याच्यासमोर चहाचा कप आणून ठेवला. त्याने तो एका दमात पिऊन टाकला. एव्हाना तो बराच सावरला होता. त्याची सुरवातीची भीड चेपली होती. चहाचा रिकामा कप टेबलवर ठेवत त्याने रोहितकडे पाहून हलकेच स्मित केलं.

"दॅट्स बेटर! आता सांग जोसेफ, काल रात्री किरण आणि रिझवानचं भांडण कशावरुन झालं?"

"सर ते दोघंही आमच्या हॉटेलचे रेग्युलर कस्टमर्स आहेत. आठवड्यातून दोन-तीन वेळा तरी येतात. नेहमी भरपूर टीप ठेवतात सर. त्यांचा पाच जणांचा ग्रूप होता सर, पण अनफॉर्चुनेटली त्यांच्यातल्या तिघांची डेथ झाल्याने काल हे दोघंच आले होते."

"काल नेमकं काय झालं ते सांग जोसेफ!" रोहित किंचित कठोर स्वरात म्हणाला तसा जोसेफ वरमला.

"काल संध्याकाळी सातच्या सुमाराला दोघं नेहमीप्रमाणे आले आणि त्यांच्या टेबलवर बसले. मी त्यांना ड्रींक्स आणि स्टार्टर्स सर्व्ह केले. सुरवातीला तास-दीडतास सर्व काही ठीक होतं, पण मग रिझवानसरांना ड्रिंक्स जास्तं झाली तसा त्यांचा तोल सुटला. ते वाटेल तसे बडबडायला लागले. त्यांच्या इतर तीन मित्रांचा सारखा विषय काढत होते. त्या तिघांच्या आठवणींनी मध्येच मोठमोठ्याने रडले! एकदा त्या तिघांची डेथ किरणसरांमुळे झाली आणि या सगळ्याला तेच रिस्पॉन्सिबल असल्याचा त्यांनी आरोप केला. किरणसर त्यांना शांत करण्याचा खूप प्रयत्नं करत होते, पण ते ऐकत नव्हते. थोडा वेळ शांत बसल्यावर पुन्हा त्यांचा आरडा-ओरडा सुरु होत होता. एकदा तर काही कारण नसताना माझ्या अंगावरही जोरात ओरडले आणि ग्लास उगारला सर! नोकरीचा प्रश्नं म्हणून मी गप्प बसलो, नाहीतर..."

"किरणने रिझवानला मारहाण केली होती?"

"मारहाण नाही सर, पण रिझवानसर पूर्णपणे आऊट ऑफ कंट्रोल गेल्यावर आणि किरणसरांच्या फादरबद्दल उलट-सुलट बोलायला लागल्यावर त्यांनी एक कानफटात भडकावली होती. त्यानंतर रिझवानसर ताळ्यावर आले आणि थोडावेळ शांत झाले. आम्ही सर्वजण सुटकेचा नि:श्वास टाकतो आहोत तोच ते पुन्हा सुरु झाले सर! पुन्हा एकदा आपल्या मित्रांच्या आठवणींनी त्यांनी गळा काढला. मध्येच एकदा 'वो वापस आ गई है! वो किसी को नहीं बक्शेगी!' असंही बडबडत होते."

"वो किसी को नहीं बक्शेगी...." रोहित एकदम सावध झाला, "कौन किसी को नहीं बक्शेगी? कोणाचं नाव घेतलं त्याने?"

"आय हर्ड समथिंग सर.... तुमने हम सबको इसमें फसाया... ना हम प्रियाके चक्करमें... एवढंच बोलल्यावर किरणसर त्यांच्यावर जोरात 'चू SS प भोसडीके' असं जोरात ओरडले आणि त्यांना ओढत बाहेर निघून गेले ते परत आलेच नाहीत. ते आमचे नेहमीचे कस्टमर असल्याने आम्हीदेखिल बिलासाठी त्यांच्या मागे गेलो नाही. आज सकाळी त्यांचा माणूस येऊन बिल सेटल करुन गेला!"

"तुला नक्की आठवतंय रिझवानने प्रिया हेच नाव घेतलं होतं?"

"येस सर! प्रिया हेच नाव घेतलं होतं! माझ्या गर्लफ्रेंडचं नावही प्रियाच आहे, त्यामुळे माझ्या लक्षात राहिलं सर!"

"आणखीन काही सांगता येईल? एनिथिंग यू मे रिमेंबर?"

"नो सर!" जोसेफ नकारार्थी मान हलवत म्हणाला, "जेवढं पाहिलं आणि ऐकलं तेवढं सगळं तुम्हाला सांगितलं सर!"

रोहितने काही न बोलता नाईकांकडे पाहिलं तसं नाईक त्याला घेऊन बाहेर निघून गेले.

"आय वॉज शुअर ही केस कुठे ना कुठे प्रियाच्या केसशी रिलेटेड आहे! या जोसेफच्या स्टेटमेंटमुळे ते कन्फर्म झालं. रिझवानने प्रियाचा जो उल्लेख केला तो अर्थातच तिच्या खुनाचा असणार. आणि 'वो किसी को नहीं बक्शेगी' हे अर्थातच स्वप्नाबद्दल म्हणाला असणार! नाऊ दॅट कॉम्प्लीकेट्स मॅटर्स इव्हन मोअर.... रिझवानने धीरज, कौशल आणि उदय यांच्या खुनाला किरणला कशाच्या आधारावर जबाबदार धरलं? हा सगळा किरणचाच प्लॅन आहे हे त्याला कळलं होतं का? बट इन दॅट केस, तो स्वप्नाबद्दल 'वो किसी को नहीं बक्शेगी' असं का म्हणाला? स्वप्ना एकटीच हे सगळं करते आहे असं त्याला त्यातून सूचित करायचं होतं? तसं असल्यास त्या मागे मोटीव्ह काय? पैसे तर नक्कीच नाही कारण रिझवानच्या घरातल्या कॅशला तिने हातही लावलेला नाही. मग काय कारण? बदला? सूड? मी मागे म्हणालो होतो त्याप्रमाणे स्वप्नालाही रेप करण्यात आलं असेल तर ही शक्यता नाकारता येत नाही! एक मात्रं नक्की कदम, किरण आणि स्वप्ना या प्रकरणात गळ्यापर्यंत गुंतलेले आहेत. स्वप्नाने चार खून केले आहेत आणि सध्या ती फरार आहे. राहता राहिला किरण! स्वप्ना त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी आपण त्याला गाठणं आवश्यक आहे! चला.... "

"सर...." कदम घड्याळाकडे पाहत म्हणाले, "आता रात्रीचे अकरा वाजत आहेत, रिझवानच्या मृत्यूनंतर आपण सर्वत्रं नाकाबंदी केलेली आहे. किरण तर चोवीस तास अंडर सर्व्हेलन्स आहे. आज रात्री स्वप्ना त्याच्या वाटेला जाईल असं वाटत नाही सर! आणि असंही त्याचे वडील आमदार असल्याने त्याच्या घरावर अतिशय टाईट सिक्युरीटी आहे! आपण रात्री न जाता उद्या सकाळी गेलो तर? निष्कारण आमदार चव्हाणांचा रोष कशाला?"

रोहितने क्षणभरच कदमांकडे अशा काही नजरेने पाहिलं की कदमही सटपटले, पण क्षणार्धात त्याचा चेहरा निवळला.

"आय थिंक यू हॅव अ पॉईंट कदम! एक काम करा, उद्या सकाळी किरणला इथेच बोलावून घ्या!"

******

किरण चव्हाण अस्वस्थपणे रोहितच्या समोर बसला होता.

रिझवानचा मृत्यू झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी कदमनी किरणला निरोप पाठवून सीआयडी ऑफीसात बोलावून घेतलं होतं. पोलीस आपल्याकडे चौकशीला येतील याची किरणला कल्पना होती पण आपल्याला थेट क्राईम ब्रँचमध्ये जावं लागेल हे मात्रं त्याला अजिबात अपेक्षीत नव्हतं. एकापाठोपाठ एक चार मित्रांच्या मृत्यूमुळे तो चांगलाच हादरलेला होता. वरकरणी कितीही बेफिकीरपणा दाखवत असला तरी मोती महालमध्ये रिझवानबरोबर झालेलं भांडण आणि त्याच रात्री त्याने केलेली आत्महत्या किरणच्या जिव्हारी लागली होती. त्याच्या मृत्यूला आपण जबाबदार आहोत ही भावना कळत - नकळत त्याला कुरतडत होती. क्राईम ब्रँचमध्ये तो आला तेव्हा चांगलाच खचलेला दिसत होता.

"किरण, तुमच्या मित्राने - रिझवानने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली असावी? तुम्ही काही सांगू शकाल?"

"प्रधानसाहेब, खरं सांगायचं तर गेला महिनाभर जे काही सुरु आहे त्यामुळे मला काहिही कळेनासं झालं आहे," किरण खिन्नपणे म्हणाला, "सर्वात आधी धीरज गेला. त्याच्या दु:खातून आम्ही जेमतेम सावरत होतो तो कौशल गेला. लागोपाठ झालेले हे आघात कमी होते म्हणून की काय उदयचा अ‍ॅक्सिडेंट झाला आणि आता रिझवानने आत्महत्या केली. जीवाला जीव देणारे माझे लाखमोलाचे मित्रं एकापाठोपाठ एक गेले आणि मी मात्रं मागे उरलो. पाचजणांचा आमचा ग्रूप पण आता मात्रं मी एकटा पडलो आहे! खूप एकटा! विचार करुन डोकं फुटायची वेळ आली आहे की हे का आणि कसं झालं...."

किरणला पुढे बोलवेना... त्याचे डोळे पाणावले होते. तो खूप भावनावश झाला होता. कोणत्याही क्षणी तो ओक्साबोक्षी रडायला लागेल असं वाटत होतं. रोहित एक शब्दही न बोलता शांतपणे त्याच्याकडे पाहत होता. या क्षणी तो एका आमदाराचा मग्रूर आणि मुजोर मुलगा आणि संधीसाधू राजकारणी नव्हता तर मित्रांच्या आठवणींनी व्याकूळ झालेला माणूस होता. हा अभिनय नक्कीच नव्हता. त्याचा त्रागा, त्याचा दु:खावेग, अत्यंत प्रामाणिक खराखुरा होता. आपल्या मित्रांच्या अकाली मृत्यूचा जबरदस्तं आघात त्याच्यावर झालेला स्पष्टं दिसत होआ.

"किरण, परवा रात्री रिझवानने आत्महत्या केली त्याच्या आधी तुम्ही दोघं मोती महालमध्ये गेला होतात ना?"

"हो! आम्ही सर्वजण तिथे नेहमीच जात होतो."

"तिथे तुमचं दोघांचं बरंच मोठं भांडण झालं हे खरं आहे?"

"रिझवान त्या रात्री अफाट दारु प्यायला होता. दारुच्या नशेत आपण काय बरळतो आहोत याचं त्याला अजिबात भान राहीलं नव्हतं. मी त्याला शांत करण्याचा खूप प्रयत्नं केला. तेवढ्यापुरता तो शांत व्हायचा पण दोन मिनिटांनी पुन्हा सुरु. धीरज, कौशल आणि उदयच्या मृत्यूचा शॉक त्याला पचवता आला नव्हता. मध्येच मोठमोठ्याने रडत होता, मध्येच सगळ्यांना शिवीगाळ करत होता. एकदा तर तिथल्या वेटरच्या अंगावरही त्याने ग्लास उगारला होता! त्यावेळेस त्याला मी कसाबसा आवरला म्हणून, नाहीतर त्या दिवशी त्याने एकतर मार खाल्ला असता किंवा तो लॉकअपमध्ये तरी गेला असता."

"आणि तुमची मारामारी कशावरुन झाली?"

"रिझवानचा आरडाओरडा आऊट ऑफ कंट्रोल जातो आहे असं पाहिल्यावर जास्तं शोभा नको म्हणून मी त्याला 'गप्प बस' म्हणून जरा जोराने ओरडलो. काही वेळ तो गप्प बसलाही, पण पुन्हा त्याची बडबड सुरु झाली. आता तो माझ्या पार्टीच्या लोकांना आणि माझ्या पप्पांना वाट्टेल तसं बोलू लागला. माझ्यापर्यंत होतं तो पर्यंत मी फारसं लक्षं दिलं नाही. एकतर तो नशेत होता आणि कितीही झालं तरी जवळचा मित्रं होता! पण पप्पांचा अपमान मात्रं मला सहन झाला नाही. शेवटी माझा पेशन्स संपला आणि मी त्याला एक सणसणीत भडकावली! बस्स... एवढंच! आमची मारमारी वगैरे काही झाली नाही!"

"आय सी.... मग पुढे काय झालं?"

"मी त्याला वाजवल्यावर बहुतेक त्याचं डोकं ठिकाणावर आलं असावं. निदान थोडा वेळ तरी तो गप्प होता, पण थोड्यावेळाने पुन्हा त्याचा तमाशा सुरु झाला. आता मात्रं मी खरच वैतागलो होतो. इतका वेळ मी पेशन्स ठेवला होता, पण आता मात्रं तो आवरण्याच्या पलीकडे जाण्याची लक्षणं दिसत होती. मी त्याला बखोटीला धरुन ओढतच बाहेर आणला आणि गाडीत घातला. गाडीतही त्याची बडबड सुरुच होती. त्याच्या सोसायटीच्या गेटवर मी त्याला सोडला आणि त्याला घरी नेऊन सोडण्याची वॉचमनला सूचना देऊन घरी निघून गेलो. संध्याकाळभर सुरु असलेल्या त्याच्या धिंगाण्यामुळे माझंही डोकं आऊट झालं होतं. आता वाटतं मी स्वत: त्याला घरी सोडायला जायला हवं होतं आणि त्याची उतरेपर्यंत तिथेच थांबायला हवं होतं.... त्याने आणखीन बडबड केली असती, कदाचित आणखीन एखादी कानफटातही खाल्ली असती, पण निदान आत्महत्या करण्यापासून मी त्याला थांबवू शकलो असतो!"

"आय अंडरस्टँड! बाय द वे, ही प्रिया कोण?"

"प्रिया?" किरण सावध झाला, "कोण प्रिया प्रधानसाहेब?"

"तीच प्रिया, जिचं तुमच्याशी झालेल्या भांडणात रिझवानने नाव घेतलं होतं! वो किसी को नहीं बक्शेगी! आठवलं?"

किरण क्षणभर काहीच बोलला नाही. 'साल्याला किती वेळा सांगितलं होतं थोबाड बंद ठेव म्हणून तरी मोठमोठ्याने नाव घेऊन कोकलत होता. आता या इन्पेक्टरला मी काय सांगू भोसडीच्या?' मनातल्या मनात त्याने रिझवानला शिव्यांची लाखोली वाहिली.

"प्रधानसाहेब, मी आधीच म्हटल्याप्रमाणे त्याने अफाट दारु ढोसली होती आणि आपण काय बोलतो आहोत हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं." एकेक शब्दं मोजून मापून उच्चारत तो म्हणाला, "त्यामुळे तो कोणाबद्दल बोलत होता हे मी कसं सांगू शकणार?"

रोहितने त्याच्याकडे रोखून पाहिलं. तो उघड-उघड खोटं बोलतो आहे हे त्याला कळत होतं, पण स्पष्टपणे तसा आरोप करता येत नव्हता. किरणलाही ते बरोबर माहीत होतं, त्यामुळेच त्याचा चेहरा अगदी निर्विकार होता.

"त्या रात्री तुम्हाला एक ब्लँक कॉल आला होता, आठवतं?"

"हो! मी तुम्हाला फोन करुन तसं कळवलंही होतं. तुम्हीच मला तशी सूचना केली होती!"

"आय रिमेंबर इट व्हेरी वेल! उदयचा अ‍ॅक्सिडेंट झाला तेव्हाही तुम्हाला असाच ब्लँक कॉल आला होता आणि धीरजचा मृत्यू झाला त्या रात्रीही त्याच नंबरवरुन तुम्हाला ब्लँक कॉल आला होता, फक्तं कौशलच्या मृत्यूच्या वेळेसच त्या अज्ञात कॉलरने तुम्हाला कॉल केला नाही! अ‍ॅम आय राईट?"

"तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे?" किरणने सावध पवित्रा घेत विचारलं.

"व्हेरी सिंपल! तुमच्या तीन मित्रांचा मृत्यू होतो आणि दरवेळेस तुम्हाला एकाच नंबरवरुन ब्लँक कॉल येतो. फक्तं एकाच वेळेस फोन येत नाही आणि नेमके त्यावेळेस तुम्ही तुमच्या मित्राच्या घरीच असता! हा सगळा फक्त योगायोग आहे असं तुम्हाला वाटतं?"

"मला याबद्दल काहिही माहीत नाही!"

"तुम्हाला ज्या नंबरवरुन ब्लँक कॉल्स येत होते, तो नंबर कोणाचा आहे याची तुम्हाला काही कल्पना आहे?"

"नाही! जोपर्यंत समोरुन बोलणारा आपली ओळख सांगत नाही तो पर्यंत मला कसं कळणार? आणि हे तर ब्लँक कॉल्स होते."

"तुम्ही स्वप्ना देशमुख नावाच्या मुलीला ओळखता?"

किरणला हा प्रश्नं बहुतेक अपेक्षित असावा कारण तो सावध होता. त्याच्या चेहर्‍यावरची रेषही हलली नाही.

"नाही! प्रधानसाहेब, तुम्ही आधीही स्वप्ना देशमुखबद्दल विचारल्याचं मला आठवतं आहे. मी तेव्हाच तुम्हाला स्पष्टं सांगितलं होतं की मी स्वप्ना देशमुख नावाच्या कोणत्याही मुलीला ओळखत नाही. मग परत हा प्रश्नं कशासाठी?"

"किरण, तुमच्या चार मित्रांपैकी धीरज आणि कौशल यांचा स्वप्नाने खून केला आहे असा पुरावा आमच्याकडे आहे! उदयचा अपघाती मृत्यू झाला असला आणि रिझवानने आत्महत्या केली असली तरी त्यालाही स्वप्नाच जबाबदार आहे अशी आम्हाला शंका आहे. उदयचा अ‍ॅक्सिडेंट झाला त्यावेळेस स्वप्ना त्याच एरीयात होती आणि रिझवानने आत्महत्या केली असली त्या वेळेस स्वप्ना त्याच्या घरात होती. तिला रिझवानच्या घराच्या बाल्कनीत पाहिलेला आयविटनेस आमच्याकडे आहे! आणि सर्वात महत्वाचं म्हणजे," रोहित एकेक शब्दं सावकाश उच्चारत म्हणाला, "तुम्हाला ज्या नंबरवरुन ब्लँक कॉल्स आलेले आहेत तो नंबर दुसर्‍यातिसर्‍या कोणाचा नसून स्वप्नाचा आहे!"

किरण आ SS वासून त्याच्याकडे पाहत होता. आपण जे काही ऐकलं ते खरं आहे? त्या चौघांना स्वप्नाने मारलं होतं? पण... पण हे कसं शक्यं आहे? त्याच्या अंगावर सरसरुन काटा आला.... खरंच असं झालं असेल? ती परत आली असेल? त्या कल्पनेनेच त्याला धडकी भरली. 'नाही! हा प्रधान आपल्याला उगाच भीती दाखवण्याचा प्रयत्नं करतो आहे. तो भडवा रिझवान प्रियाचं नाव घेत कोकलत होता ते याला कळलंच आहे. आता स्वप्नाच्या भीतीने आपण काहीतरी भलतं-सलतं बोलून गेलो, अगदी एका शब्दाने जरी घसरलो तर तो आपल्याला अडकवल्याशिवाय राहणार नाही. हा सगळा त्याचाच प्लॅन आहे. सावध!

"मला एक कळत नाही" प्रयत्नपूर्वक चेहर्‍यावरचे भाव पुसून टाकत निर्विकारपणे त्याने विचारलं, "ही स्वप्ना कोण आहे? तिने त्या चौघांचा जीव घ्यावा असं त्यांनी तिचं काय बिघडवलं होतं? आणि तिने दरवेळी मला ब्लँक कॉल करण्याचं कारण का? मी तिला ओळखतही नाही!"

"वेल, ते फक्तं स्वप्नाच सांगू शकेल! तुम्हाला फोन करण्यामागे तुम्ही घाबरुन जावं असा तिचा हेतू असू शकतो किंवा...." रोहित त्याच्यावर नजर रोखत म्हणाला, "कदाचित तिचं पुढचं टार्गेट तुम्ही असण्याची शक्यता आहे!"

"मी?"

कितीही नाही म्हटलं तरी किरणचा थरकाप उडाला. रिझवानचे शब्दं त्याच्या कानात घुमू लागले... 'वो किसी को नहीं बक्शेगी!' हा इन्स्पेक्टर म्हणतो त्याप्रमाणे खरोखरच स्वप्नाच हे सगळं करत असली तर... त्या कल्पनेनेच त्याला एकदम घाम फुटला, पण झटक्यात त्याने स्वत:ला सावरलं.

"ती माझ्या जीवावर उठण्याचं कारणच काय? मी तरी तिचं काय घोडं मारलं आहे? आणि त्यातूनही ती माझ्यावर हल्ला करेल असं तुम्हाला वाटत असेल, तर ती पकडली जाईपर्यंत मला पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे प्रधानसाहेब!"

रोहितने थंडपणे त्याच्याकडे रोखून पाहिलं. कदम आणि नाईक तर त्याच्या पोलीस संरक्षणाच्या मागणीने उडालेच होते. या प्रकरणाचं मूळ प्रियाच्या खुनात आहे आणि कुठे ना कुठे त्यात किरण आणि स्वप्ना दोघांचाही संबंध आहे याबद्दल कोणतीच शंका नव्हती. तिने एकेक करुन इतरांना संपवेपर्यंत तो बेफिकीर होता, पण ती आपल्या जीवावर उठण्याची शक्यता आहे ही जाणीव होताच त्याने ताबडतोब पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती! एकदा का त्याला पोलीस संरक्षण देण्यात आलं की स्वप्नाने त्याच्यावर हल्ला केलाच तर एकतर ती पकडली जाणार होती किंवा पोलीसांकडून परस्पर मारली जाणार होती! किरण मात्रं सुरक्षित राहणार होता आणि त्याला असलेला एकमेव धोका कायमचा संपणार होता!

"तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन हवं असेल तर तसा फॉर्मल अ‍ॅप्लीकेशन द्या! तो इव्हॅल्युएट करुन संबंधीत पोलीस स्टेशनला पाठवण्यात येईल आणि मग पुढची अ‍ॅक्शन तिथून घेतली जाईल. यू मे गो नाऊ, पण आम्हाला कळवल्याशिवाय मुंबई सोडून बाहेर जाऊ नका! त्याने तुमच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे!"

क्षणभर... अगदी क्षणभरच किरणच्या चेहर्‍यावर रागीट छटा उमटली, पण दुसर्‍याच क्षणी निर्विकार चेहर्‍याने होकारार्थी मान हलवत तो उठला आणि निघून गेला. तो बाहेर पडल्यावर कदमनी सणसणीत शिवी हासडली.

"सर, हा किरण तर बापाच्या वरताण बेरकी निघाला!" कदम धुसफुसत म्हणाले, "आपण त्याला इन्क्वायरीसाठी बोलावलं होतं आणि उलट तोच आपल्याकडे प्रोटेक्शन मागून मोकळा झाला! यानेच त्या स्वप्नाकरवी आपल्या मित्रांना मारलं आहे सर आणि आता पोलीसांकरवी तिला उडवायला पाहतो आहे, एकदा तिचा काटा काढला की याच्यापर्यंत पोहोचण्याचे सर्व मार्गच संपले!"

"आय डोन्ट थिंक सो!" रोहित गंभीरपणे विचार करत म्हणाला, "आपलं इन्व्हेस्टीगेशन प्रियाच्या खुनामागे किरण, त्याचे मित्रं आणि स्वप्ना यांच्याकडे बोट दाखवतं आणि हे सर्वजण त्यात गुंतलेले होते याबद्दल कोणतीही शंका नाही, पण या चौघांच्या मृत्यूमध्ये मात्रं त्याचा अजिबात हात नाही! तो वरवर कितीही नॉर्मल असल्याचं दाखवत असला तरी तो मेंटली अतिशय डिस्टर्ब्ड आहे! त्या चौघांच्या मृत्यूचा त्याला खरोखरच खूप मोठा शॉक बसलेला आहे! एरवी तो अत्यंत बेरकी आणि पक्का राजकारणी असला तरीही सध्या तो मनातून अतिशय खचलेला आहे कदम!"

"किरणचा यात हात नाही याचा अर्थ... हे सगळं स्वप्ना एकटीच करते आहे?"

"अ‍ॅब्सोल्यूटली! हा सगळा खेळ तिचा एकटीचाच आहे याबद्दल आतातरी काहीच शंका नाही. वी हॅव टू बी ऑन अवर गार्ड! आपल्या दृष्टीने स्वप्नाला पकडण्यासाठी ही अखेरची संधी आहे. वन अ‍ॅन्ड ओन्ली ऑपॉर्चुनीटी! तिला गाठण्यासाठी सर्वात सिंपल मार्ग म्हणजे किरणला आमिष म्हणून वापरणं! अ‍ॅन्ड आय अ‍ॅम शुअर शी विल टेक द बेट! ती किरणवर अ‍ॅटॅक करणार, अ‍ॅन्ड दॅट विल बी अवर चान्स टू कॅच हर इन द नेट! पण मी आधीच म्हणालो त्याप्रमाणे आपल्याला अतिशय सावधगिरी बाळगावी लागणार आहे. जर तिने किरणला उडवलं आणि ती निसटली तर मात्रं पुन्हा कधीही आपल्या हाती लागणार नाही. वी विल बी डन अ‍ॅन्ड डस्टेड विथ!"

"एक कळत नाही सर," कदम विचार करत म्हणाले, "आतापर्यंत आपण किरण आणि स्वप्ना आपसात मिळालेले आहेत असं गृहीत धरलेलं होतं. स्वप्ना जर एकटीच हे सगळं करत असेल तर ती हे सगळं कसं मॅनेज करत असेल? धीरजच्या घरातून तिने पन्नास हजार उचलले होते असं मानलं तरी केवळ तेवढे पैसे इतके दिवस पुरतील का? रिझवानच्या घरी तर दोन लाखांची कॅश होती, पण तिने त्याला हातही लावलेला नाही. मग तिला छपून राहण्यासाठी आणि या सगळ्यासाठी पैसा कोण पुरवत असेल सर? तिच्या बँक अकाऊंट्समधून तर दर महिन्याला फोनच्या बिलाव्यतिरिक्त नया पैसाही काढला गेलेला नाही!"

"या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्तं स्वप्नाकडूनच मिळू शकतील कदम! एक काम करा, त्या किरणच्या मागे आपली जेवढी म्हणून माणसं आहेत, त्या सगळ्यांना किरणला क्षणभरही नजरेआड करु नका म्हणून पुन्हा एकदा अ‍ॅलर्ट करा. मला रोजच्या रोज त्याच्या प्रत्येक हालचालीचा रिपोर्ट मिळाला पाहिजे. त्याच्या घरावर, पार्टी ऑफीसवर आणि तो जिथे जिथे नेहमी जातो त्या प्रत्येक जागेवर बारीक लक्षं ठेवा. आय डोन्ट वॉन्ट अ सिंगल लूपहोल! एखादी कितीही क्षुल्लक वाटणारी चूकही आपल्याला महागात पडू शकते. सिंपली कॅन नॉट अफोर्ड एनी रिस्क व्हॉट सो एव्हर!"

कदम बाहेर जाण्यासाठी वळले तोच त्यांना कसली तरी आठवण झाली.

"स्वप्नाने मागे सोडलेल्या त्या पत्त्यांचं काय सर? किलवरचा एक्का आणि अठ्ठी आणि इस्पिकचा एक्का आणि अठ्ठी?"

"स्वप्नाने मागे ठेवलेले ते पत्ते हा सगळा खेळ तिचा एकटीचा असल्याकडेच बोट दाखवतात कदम! मी इंटरनेटवरुन त्याबद्दल इन्फॉर्मेशन काढली आहे. ही चार कार्ड्स आणि त्याबरोबर असलेलं पाचवं कार्ड हा एक सिक्वेन्स आहे, आणि शंभरापेक्षा जास्तं वर्षांपासून तो 'डेड मॅन्स हॅन्ड' म्हणून ओळखला जातो. ते पाचवं कार्ड नेमकं कोणतं आहे याबद्दल खात्रीलायक माहीती नसली तरी ते एकतर अनडिस्क्लोज्ड आहे किंवा डायमंड क्वीन, जॅक किंवा नंबर कार्ड आहे असं मानलं जातं. माझ्या अंदाजाप्रमाणे स्वप्नाच्या या मृत्यूच्या खेळात ते पाचवं कार्ड डायमंड जॅक आहे आणि तिने तो किरणसाठी ठेवला आहे!"

******

"रोहित, हा सगळा काय प्रकार सुरु आहे? चार - चार खून होतात आणि तरीही आपण खुनी पकडू शकत नाही? एक पंचवीस - सव्वीस वर्षांची मुलगी तुमच्या डोक्यावर मिर्‍या वाटत खून करत फिरते आणि तुम्हाला कुटण्यासाठी म्हणून पत्ते मागे ठेवते! आणि क्राईम ब्रँचचे एवढे हुशार लोक तिला पकडू शकत नाहीत? काय चाललंय काय?" कमिशनर मेहेंदळेंनी दुसर्‍या दिवशी सकाळी - सकाळी त्याला धारेवर धरलं.

"आमचं इन्व्हेस्टीगेशन सुरु आहे सर! धीरज आणि कौशलचा स्वप्नाने खून केला असला तरी उदयचा अ‍ॅक्सिडेंट झाला आहे आणि रिझवानने तर आत्महत्या केली आहे."

"हे लोकांना सांगण्यापुरतं ठीक आहे. फॅक्ट्स काय आहेत हे तुलाही माहीत आहे आणि मलाही! त्या किरणचं काय?"

"आम्ही किरणवर राऊंड द क्लॉक वॉच ठेवला आहे. स्वप्ना डेफीनेटली त्याच्यावर अ‍ॅटॅक करण्याचा प्रयत्नं करेल, आणि त्याच वेळेस ती रेडहँडेड पकडली जाईल. वी आर ट्रेसिंग हर फोन अ‍ॅज वेल! शी विल बी बिहाईंड द बार्स सून सर!"

"यू बेटर पुट हर देयर अ‍ॅज सून अ‍ॅज पॉसिबल! ऑलरेडी होम मिनिस्ट्रीकडून प्रेशर आहे माझ्यावर! आय नो, आपण शक्यं ती सगळी प्रिकॉशन घेवू, पण एवढं करुनही जर तिने किरणला उडवलं तर आपले हाल कुत्राही खाणार नाही हे लक्षात ठेव! आमदार चव्हाण आणि मिडीया आपल्या अब्रूची लक्तरं काढतील. कदाचित आपल्याला दोघांनाही खुर्च्या खाली कराव्या लागतील!"

"आय डोन्ट माईंड डुईंग इट इव्हन नाऊ सर, पण त्यातून उपयोग काहीच होणार नाही! इनफॅक्ट स्वप्नाला आणखीनच रान मोकळं मिळेल आणि तिला पकडण्याची उरली-सुरली आशाही नष्ट होईल!"

"रोहित, नो मोअर आर्ग्युमेंट्स! कम व्हॉट मे, ती मुलगी लॉकमध्ये दिसायला हवी. यू मे गो नाऊ!"

******

सांताक्रूजच्या बरिस्तामध्ये कोपर्‍यातल्या टेबलपाशी त्या दोघी बसल्या होत्या.

"हाऊ इज एव्हरीथिंग गोईंग ऑन?"

"सो फार सो गुड! डन विथ फोर, जस्ट वन मोअर, अ‍ॅन्ड देन डन फॉर!"

"बी केअरफुल! हाऊ इज स्वॅप्स?"

"स्वॅप्स इज् फाईन! वेटींग फॉर द लास्ट वन टू गेट ओव्हर विथ!"

******

रोहित गंभीरपणे आपल्यासमोरच्या स्क्रीनवर सुरु असलेला व्हिडीओ पाहत होता.

रिझवानच्या सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचं रेकॉर्डींग पाहताना एक अत्यंत महत्वाची गोष्टं उघड झाली होती. रिझवानने आत्महत्या केल्यावर धावत - पळत खाली उतरून पळून गेलेली ती व्यक्ती रात्री साडेअकराच्या सुमाराला बिल्डींगमध्ये शिरली होती आणि जिना चढून वर गेली होती. त्या दोन्ही फिल्म्स त्याने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्या होत्या. लॅबच्या तंत्रज्ञांनी रिझवानच्या कॅमेर्‍यातली फिल्म चौपट मोठी करण्यात यश मिळवलं होतं. इतकंच नव्हे तर सेकंदाला पंधरा फ्रेम्सच्या स्पीडने रेकॉर्ड झालेला मूळ व्हिडीओ त्यांनी सेकंदाला तीन फ्रेम इतका स्लो केला होता. त्यामुळे मुळात दोन सेकंदांसाठी कॅमेर्‍यात कैद झालेल्या त्या व्यक्तीचा दहा सेकंदांची फिल्म आता उपलब्धं झालेली होती.

रोहितने अत्यंत बारकाईने ते रेकॉर्डींग पाहिलं होतं. खासकरुन जिन्यावरुन खाली धावत येतानाचा तो व्हिडीओ त्याने एकेक फ्रेम फ्रीज करुन अत्यंत काळजीपूर्वक तपासला होता. जिन्यावरुन धावत उतरणारी ती व्यक्ती एक स्त्री होती हे स्पष्टं दिसत होतं. तिने जीन्स आणि त्यावर भला मोठा ओव्हरकोट घातला होता. ओव्हरकोटचं हूड डोक्यावरुन ओढून घेतलेलं होतं. चेहरा पूर्णपणे झाकला जाईल अशा पद्धतीने स्कार्फ गुंडाळलेला होता. रात्रीची वेळ असूनही डोळ्यावर भला मोठा गॉगल होता. पाठीवर कॉलेजचे विद्यार्थी वापरतात तशी सॅक होती. जिन्यावरुन खाली उतरुन ती लिफ्टच्या उजव्या दिशेला जात कॅमेर्‍याच्या कक्षेबाहेर गेली होती. त्याने पुन्हा - पुन्हा ते रेकॉर्डींग रिवाईंड करुन पाहीलं, पण अनेकदा प्रयत्नं करुनही तिचा चेहरा स्पष्टं दिसत नव्हता. ओव्हरकोट आणि स्कार्फ वापरुन आपला चेहरा अजिबात दिसू नये याची तिने पुरेपूर खबरदारी घेत्ली होती. अर्थात ती स्वप्नाच असणार याबद्दल त्याला कोणतीच शंका नव्हती पण तरीही त्याला काहीतरी खटकत होतं.

"साहील, जरा फ्रीज कर!" पंचवीसाव्या खेपेला व्हिडीओ पाहताना त्याने सूचना दिली, तसा साहील मेहताने व्हिडीओ पॉज केला.

"गुड! आता जरा झूम कर!”

साहीलने त्याच्या सूचनेप्रमाणे त्याने तेवढा भाग झूम केला. रोहित अत्यंत एकाग्रपणे तिचं निरीक्षण करत होता. सुमारे मिनीटभरानंतर त्याने साहीलला खूण केली तशी साहीलने ती फ्रेम प्रिंट करुन ठेवली. पुढच्या दहा मिनिटांत अशा पाच फ्रेम्स त्याने प्रिंट केल्या होत्या! त्यानंतर त्याच्या सूचनेप्रमाणे साहीलने ती जिना चढून वर जातानाचा व्हिडीओ लावला.

"फ्रीज! नाऊ झूम ऑन!"

आता मात्रं साहीलही गंभीर झाला. ज्या अर्थी तो एवढं बारकाईने निरीक्षण करतो आहे, त्या अर्थी त्याला काहीतरी क्लू लागला असावा एवढं कळण्याइतका तो हुशार होता. रोहितच्या सूचनेप्रमाणे जिना चढून वर जातानाच्याही पाच फ्रेम्स त्याने प्रिंट केल्या. पुन्हा एकदा ते दोन्ही व्हिडीओ पाहून झाल्यावर अखेर रोहितने त्याचे आभार मानले आणि ते व्हिडीओ असलेली सीडी आणि प्रिंट्स यांसह तो बाहेर पडला.

सीआयडी ऑफीसात परत येताच त्याने कदम, नाईक आणि देशपांडे तिघांनाही बोलावून घेतलं. त्याचा निरोप मिळताच ते तिघंही लगबगीने त्याच्या केबिनमध्ये आले. त्यांना समोर बसण्याची खूण करत त्याने साहीलकडून आणलेली ती सीडी त्याने आपल्या लॅपटॉपमध्ये टाकून सुरु केली. पुढच्या दहा मिनिटांत किमान दहा - पंधरा वेळा सगळे व्हिडीओ पाहून झाल्यावर कदमनी निराशेने मान हलवली.

"तिने आपला चेहरा व्यवस्थित झाकून घेतला आहे! तिची ओळख पटवणं कठीण आहे सर!"

काही न बोलता त्याने ते दहा प्रिंट्स त्यांच्यासमोर ठेवले तसे कदम अधिकच गोंधळले. ते सगळे प्रिंट्स उलटसुलट करुन पाहिल्यावरही त्यांना काही बोध होत नव्हता. देशपांडे आणि नाईक दोघांचीही अवस्था फारशी वेगळी नव्हती. त्यांच्या चेहर्‍यावरचं प्रश्नंचिन्हं पाहून त्याने रिझवानच्या केसच्या फाईलमधला आणखीन एक कागद त्यांच्यासमोर ठेवला. सोसायटीच्या कंपाऊंडच्या भिंतीला पडलेल्या भगदाडाबाहेर मातीत स्पष्ट उमटलेला हाय हील्सच्या टो चा ठसा! कदम अधिकच गडबडले. पण तो फोटो आणि त्याने साहिलकडून आणलेल्या फोटोंच्या प्रिंट्स पाहताना देशपांडे मात्रं एकदम चकीत झाल्या.

"सर हे .... " त्यांना काय बोलावं समजत नव्हतं. "तिचे बूट .... "

"एक्झॅक्टली!" तो होकारार्थी मान डोलवत म्हणाला, "जिन्यावरुन वर जाणार्‍या आणि खाली येणार्‍या मुलीच्या पायात स्पोर्ट्स शूज आहेत, पण कंपाऊंड वॉलच्या बाहेर मातीत उमटलेली प्रिंट हाय हिल्सच्या टो ची आहे!

रिझवानने सुसाईड केल्यावर, रादर आय वुड से, स्वप्नाने त्याला तसं करायला भाग पाडल्यावर, ती जिन्यावरुन धावत खाली आली आणि त्यानंतर त्या होलमधून बाहेर पडून पळून गेली. त्या होलच्या बाहेर मातीत आपल्याला हील्सची प्रिंट सापडलेली आहे. धीरजच्या बाल्कनीत आणि कौशलच्या सोसायटीच्या शेजारच्या गार्डनमध्ये सापडलेल्या प्रिंट्सशी ही प्रिंट सेंट परसेंट मॅच होते आहे. नॅचरली, या तिनही प्रिंट्स एकाच हील्सच्या सँड्लच्या आहेत. धीरज, कौशल आणि रिझवान तिघांच्याही डेडबॉडीच्या व्हिसीनीटीमध्ये ती प्रिंट सापडली आहे, आणि मोबाईल फोनच्या रेकॉर्डचा विचार केला तर त्याचवेळी स्वप्नाही तिथेच असल्याचं सिद्धं झालं आहे. फॉर शुअर, त्या प्रिंट्स तिच्याच आहेत! नाऊ द ओन्ली क्वेश्चन इज, जिन्यावरुन खाली आल्यावर आणि त्या होलमधून बाहेर पडण्यापूर्वी स्वप्नाने स्पोर्ट्स शूज बदलून हील्स का घातल्या? आणि जर तिने तसं केलं नसेल तर ....."

रोहित एकेक शब्दं सावकाशपणे उच्चारत म्हणाला.

"स्वप्ना रिझवानच्या बिल्डींगमध्ये कोणत्या मार्गाने शिरली? ती सीसीटीव्हीमध्ये कशी दिसत नाही?
आणि मोअर इम्पॉर्टंटली,
सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कॅप्चर झालेली आणि पायात स्पोर्ट्स शूज असलेली ही मुलगी कोण?"

******

क्रमशः

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सर्व भाग एकदम एकाच बैठकीत वाचले. उत्कंठावर्धक आहेत. आता या भागात कॅरल नावाच्या एका पात्राचा समावेश झाला आहे. प्रियाच्या सहकाऱ्यांपैकी असावी असे आठवतेय. तिचा काय रोल असेल? की चॅनेलच्या प्रमुखांचाही यात हात असेल? तर्काचा घोडा चौफेर उधळवू देण्यात मजा येतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे प्रिया मेलीच नाही की काय? ती आणि स्वप्ना मिळून हे करतीये असे तर नाही?
कॅरोलचा अँगल आला म्हणजे सुनेहाच्या मैत्रिणीसुद्धा स्वप्नाला सामिल आहेत असे सुद्धा शक्य आहे.
किंवा स्वप्ना अस्तित्वातच नाही, आणि प्रिया, सुनेहाच्या मैत्रीणी मिळून हे सगळे करत आहेत.
पुभालटा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

म्हणजे प्रिया मेलीच नाही की काय? ती आणि स्वप्ना मिळून हे करतीये असे तर नाही?

प्रिया मेली नाही, तर मग कुठल्याशाशा त्या बीचवर का कुठेशीक ते मढे सापडले ते कुणाचे मग?

किंवा स्वप्ना अस्तित्वातच नाही, आणि प्रिया, सुनेहाच्या मैत्रीणी मिळून हे सगळे करत आहेत.

नाही.

(कसे (आणि का), ते माहीत नाही, पण) तो रोहित आणि तो डॉ. भरुचा मिळून संगनमताने हे करत आहेत, या माझ्या मूळ थियरीशी मी कायम आहे.

(अर्थात, शेवटी कळेलच म्हणा काय ते.)
..........

दुष्काळी काम?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आठवा भाग वाचून तरी

किंवा स्वप्ना अस्तित्वातच नाही, आणि प्रिया, सुनेहाच्या मैत्रीणी मिळून हे सगळे करत आहेत.

हा माझा तर्क योग्य वाटतोय.
जबरदस्त डिटेलिंग केलयंत खरोखर..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************