द यीरलिंग: दोन अनुवाद, एक तुलना

द यीरलिंग: दोन अनुवाद, एक तुलना

- हेमंत कर्णिक

.
कुणीतरी म्हटलं आहे, कवितेची सार्थ समीक्षा म्हणजे दुसरी कविताच होय. ललितकृतीच्या भाषांतराच्या बाबतीत - विशेषतः ते भाषांतर देश, काल, संस्कृती ओलांडून जाणारं असेल तेव्हा - त्याच चालीवर म्हणता येईल. की भाषांतराची गणना कौशल्यात न करता कलेत व्हायला हवी. ललितकृतीच्या भाषांतरात दोन टोकाच्या भूमिका घेता येतात. एक म्हणजे, मूळ कलाकृतीतला भाव अधिक महत्त्वाचा असल्याकारणाने, तो भाव नेमका पकडण्याकरिता इथले सांस्कृतिक संदर्भ आणि भाषिक वाक्प्रचार यांचा सढळ वापर करणे. उलट बाजूने असंही म्हणता येतं की मूळ कलाकृती ज्या सांस्कृतिक चौकटीत घडली, त्या चौकटीच्या जाणिवेविना कलाकृतीचा आस्वाद शक्य नाही आणि म्हणून तिथले सांस्कृतिक संकेत आणि भाषिक वळणं तशीच राखण्याचा प्रयत्न करणे.

महाराष्ट्राला लांबलचक समुद्रकिनारा असूनही प्रमाण मराठीत समुद्रावरची भाषा नाही. इंग्रजीत ज्याप्रमाणे fathom, sight, navigate, anchor, aboard, above या संज्ञा सर्वसाधारण भाषेत प्रचलित आहेत, तशा मराठीत नाहीत. आधुनिक मराठीच्या बाबतीत शेती आणि ग्रामीण जीवनाला, 'गावकुसाबाहेरच्या', भटक्यांच्या जीवनालासुद्धा प्रमाणभाषेत कमी स्थान आहे. या कारणामुळे प्रमाण भाषेला अपरिचित असणाऱ्या जीवनाविषयीच्या साहित्याचा अंतर्भाव वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये केला जातो. जसं ग्रामीण साहित्य, दलित साहित्य वगैरे. हे असले कप्पे त्या साहित्याविषयी काही सांगत नाहीत; मराठी प्रमाणभाषा तोकडी, कुपोषित आहे, असं मात्र नक्की सांगतात. मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांच्या 'द यीरलिंग' या कादंबरीत निसर्गवर्णन आहे, कृषिव्यवहारांचं वर्णन आहे आणि कादंबरीतले संवाद अमेरिकेत त्या काळी, त्या जागी बोलल्या जाणाऱ्या भाषेत आहेत. ती भाषा रांगडी, खऱ्या अर्थाने 'ग्राम्य' आहे. मराठीत भाषांतर करताना जर कृषिजीवनातील नेमके प्रतिशब्द शोधून वापरले, तर शहरी वाचकाला अडखळायला होईल. त्याच्या आस्वादात बाधा येईल आणि थोडीबहुत तडजोड करून शहरी जीवनाला जवळचे असे शब्द वापरले, तर वाचताना अडणार नाही, पण आशय मार खाण्याची शक्यता वाढेल.

कुठल्याही भाषेची एखादी बोली तिच्या प्रमाण रूपापेक्षा कसकशी वेगळी असते, यातून केवळ तिचं सौंदर्यच दिसतं असं नाही तर तिची आशयक्षमतासुद्धा व्यक्‍त होत असते. भाषांतरात हे आणणं दुरापास्त. मात्र, इथल्या एखाद्या समांतर सांस्कृतिक, भौगोलिक प्रदेशाची बोलीभाषा वापरून ही त्रुटी काही अंशी भरून काढणं शक्य आहे. परंतु, ज्या कारणामुळे मराठीची प्रमाणभाषा कुपोषित राहिली आहे, त्य़ाच कारणामुळे या बाबतीतही ती मार खाते! ग्रामीण जगण्याचा आतून परिचय असणाऱ्यांनी इंग्रजी (वा अन्य भाषेतील) तसल्या कलाकृतींची भाषांतरं केलेली दिसत नाहीत. गो. नी. दांडेकरांना महाराष्ट्रातल्या कोकणापासून विदर्भापर्यंत अनेक बोलीभाषा अवगत होत्या आणि त्यांच्या या सामर्थ्याचं दर्शन त्यांच्या 'प्रादेशिक', तसंच 'इतिहासकालीन' कादंबऱ्यांमधून होतं. पण त्यांचा इंग्रजी वाचनाशी कमी संबंध होता आणि त्यांनी भाषांतरं केली नाहीत. अजूनही स्थिती फारशी बदललेली नसावी. जेव्हा बदलेल, तेव्हा भाषांतराच्या वाटेने मराठीला भरीव समृद्धी प्राप्‍त होईल. भा. रा, भागवतांनी 'द यीरलिंग'चं भाषांतर 'हरिण बालक' या नावाने केलं आहे. राम पटवर्धनांनी केलेल्या दुसऱ्या भाषांतराचं नाव आहे 'पाडस'. भागवत आणि पटवर्धन यांची भाषांतरं अर्थातच वरील चर्चेतील त्रुटींपासून मुक्‍त नाहीत, हे उघड आहे; पण मूळ कादंबरीचा निसर्गवर्णनापलीकडे जाणारा आशय या दोघांनी कसा पकडला आहे, हे बघणं शक्य आहे.

माझ्या माहितीनुसार भा. रा. भागवतांनी जी जी भाषांतरं केली, त्या सगळ्यांना संक्षिप्‍त रूपही दिलं आहे. म्हणजे, मूळ कृतीतला कोणता भाग घ्यायचा आणि कोणता गाळायचा, हा निर्णय त्यांनी वेळोवेळी घेतला आहे. तुलना करताना भागवतांनी घेतलेल्या भागाचाच विचार करावा लागेल; त्याचबरोबर भागवतांनी काय गाळलं, याच्याकडेही पाहावं लागेल. आपण दोन्ही करू.

मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांची ही कादंबरी ज्योडी नावाच्या एका मुलाबद्दल आहे. या एप्रिलपासून पुढच्या एप्रिलपर्यंतचा वर्षभराचा काळ तिने व्यापला आहे. एका वर्षात ज्योडी बालपण कसं ओलांडतो, याचं निसर्गाच्या पार्श्वभूमीवरचं, एका हरणाच्या पिल्लाच्या माध्यमातून रंगवलेलं चित्र त्यात आहे. जे घडतं, ते निसर्गचक्रानुसार घडतं. जे तपशील येतात, ते शेती, जंगल आणि ज्योडी बॅक्स्टर आणि त्याचे आईवडील राहत असतात, त्या भागाचा भूगोल यांच्याशी संबंधित आहेत. थोडा संदर्भ काही मैलांवर राहणाऱ्या फॉरेस्टर कुटुंबाचा आणि क्वचित इतर माणसांचा येतो. कादंबरी बारीक बारीक तपशील तरलपणे टिपत संथगतीने सरकते आणि आपोआपच तिला 'एपिक'चं - भव्य, उदात्त गाथेचं - स्वरूप प्राप्‍त होतं.

भागवत जेव्हा याला संक्षिप्‍त रूप देतात, तेव्हा ते त्या जीवनाचं सार पकडू जातात. एक पुरुष आणि एक स्त्री मिळून फारशा प्रेमळ नसलेल्या निसर्गाशी झगडत, जुळवून घेत आयुष्य रेटत असताना त्यांना उशिरा झालेल्या आणि त्यामुळे वयाने अगदी कोवळ्या असलेल्या मुलाचं काय होतं, याचं यथार्थ चित्रण ते करू बघतात. पण लांबी कमी करताना आपोआपच त्यातला एपिकचा भाव लोपतो. कहाणी ज्योडी आणि त्याने पाळलेल्या फ्लॅग, या हरणाच्या पिल्लाची राहते. कहाणी संवेदनशीलता गमावत नाही; पण त्या तरल अनुभवाचं कोंदण विशाल राहत नाही. उदाहरणार्थ, 'यीरलिंग'मधल्या पहिल्या प्रकरणात ज्योडीची आई घरात भरपूर काम करते; ज्योडीलासुद्धा घरात, शेतात भरपूर काम असतं, पण त्याला जंगलात हुंदडण्याची ओढ जास्त असते, ज्योडीच्या बापाला तर असल्या कामांबरोबर दूर बाजारातही जावं लागतं, असा सगळा पट येतो. ज्योडीला भुलवणाऱ्या निसर्गशोभेचं वर्णन येतं. एप्रिल महिन्यातल्या वसंतागमनाचं कौतुक येतं आणि या तीन माणसांबरोबर घोडा, कुत्रे, गाय, अशा जनावरांची ओळखही होते. शिवाय ज्योडीला जंगलात रकून, खारी, हरीण अशा प्राण्यांचे पाऊलठसे दिसतात आणि प्राण्यांचा वावर तिथे नित्याचा आहे, हे वाचकाला समजतं. पुन्हा हे वर्णन त्रयस्थपणे येत नाही; वयस्क आईवडील सोडता अन्य सोबत, संगत नसलेल्या आणि एकटेपणावर निसर्गातच उत्तर शोधणाऱ्या ज्योडीच्या नजरेतून येतं. मिनिटं आणि तास नव्हे, तर ऋतूंना अनुसरणाऱ्या कालगणनेप्रमाणे निवेदन संथपणे पुढे सरकतं आणि हा नैसर्गिक सुशांत निवांतपणा वाचकाच्या जाणिवेत रुजावा म्हणून चांगले साडेचार हजारांपेक्षा जास्त शब्द पहिल्या प्रकरणातच खर्ची होतात. पटवर्धनांचं 'पाडस' यासाठी असेच साडेचार हजार शब्द घेतं. आणि भागवत हा पसारा पंचवीसशे शब्दांमध्ये आटपतात. परिणामी आपल्याला ज्योडीचं कुटुंब, घर आणि परिसर या सगळ्याची ओळख जरी होत असली, तरी काळ आणि अवकाश यांचा भव्य पट लाभत नाही.

इंग्रजी आणि मराठी चलनात एक मोठा फरक म्हणजे इंग्रजीत आदरार्थी अनेकवचन नाही. मग ज्योडी किंवा ज्योडीची आई ओरी, हे ज्योडीच्या बापाला मराठी भाषांतरात अरे-तुरे करतील, की अहो-जाहो? पटवर्धन 'अरे-तुरे'च्या बाजूने आहेत; तर भागवतांच्या काळातल्या सर्वसाधारण मराठी वाचकाला 'नॉर्मल' वाटावं म्हणून भागवतांनी 'अहो-जाहो'चा निर्णय घेतला असावा. यात पटवर्धनांची बाजू थोडी जड होते, याचं एक कारण बॅक्स्टर कुटुंबीयांचा रांगडेपणा. त्यांची राहणी आणि भाषा शिष्टाचार पाळणारी नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे ज्योडीच्या बापाला 'पेनी' असं संबोधलं जातं कारण तो लहानखुरा, हडकुळा आहे. त्याला अरे-तुरे करणं जास्त नैसर्गिक ठरतं. पार जंगलातल्या मोकळ्या जागेवर घर आणि शिवार घडवून, तिथे जगण्यासाठी अपार कष्ट करणाऱ्या कुटुंबातल्या मुलाची गोष्ट सांगताना नागर मराठी मध्यमवर्गीय संवेदनेशी जवळीक राखणं बरोबर वाटत नाही. ज्योडी - पेनी किंवा पेनी - ओरी यांच्या नात्यात आदर जाणवला तरी अंतर जाणवत नाही; जे नागर मराठी मध्यमवर्गीय मुलगा आणि त्याचे वडील यांच्या नात्यात असतं.

भागवतांनी मराठी वाचकाचा विचार करून भाषेचा बाज सांभाळला आहे, हे प्रतिपादन टिकणारं नाही. त्यांची भाषा अनेकदा कृत्रिम होते. कष्टकरी जीवन जगणाऱ्याच्या वा सर्वसाधारण मराठी वाचकाच्या तोंडी येणार नाही, असे शब्दप्रयोग ते करतात. उदाहरणार्थ, 'Howdy, Mr Forrester. Proud to see you.' याचं भाषांतर ते "काय मि. फॉरेस्टर! कसं काय? तुमची भेट झाल्यामुळे धन्य वाटलं." असं करतात. पटवर्धन "कसं काय मिस्टर फॉरेस्टर! तुम्हांला बघून फार आनंद वाटला." असं करतात. अमेरिकेतल्या काही भागात glad to see you न म्हणता proud to see you म्हणण्याची रीत आहे / होती, हे भागवतांना माहीत नसेल, असं कसं असेल? स्टाइनबेकच्या 'Grapes of Wrath' मध्ये हा proud प्रकार सर्रास सापडतो. पुढे फॉरेस्टर म्हातारा "माझ्या मुलांपुढे उपजीविकेचे दुसरे मार्ग ..." असं म्हणतो. नंतर रागावलेला ज्योडी बापाला "तुम्ही मला दिलेला शब्द मोडलात ... मला तुमचा तिरस्कार वाटतो. मला आशा आहे की तुम्ही एकदाचे मराल! मला तुमचं दर्शनसुद्धा नको!" असे शब्द वापरतो. ही कोणाच्याही तोंडची बोलीभाषा नाही. हे निर्विकारपणे केलेलं भाषांतर आहे. भागवतांसारख्या गोष्टीत सहज रंग भरणाऱ्या निवेदकाकडून असं का व्हावं समजत नाही. संभाषणात अशा त्रुटी असल्यावर निवेदनात त्या असणारच. Penny Baxter lay awake beside the vast sleeping bulk of his wife. याचं भाषांतर पटवर्धन संवेदनशीलतेने 'गाढ झोपलेल्या आपल्या आडमाप बायकोच्या शेजारी पेनी बॅक्स्टर पडला होता,' असं करतात. बॅक्स्टर कुटुंबीयांच्या, एकूण कादंबरीतल्या निवेदनाच्या भाषिक सुराशी प्रामाणिक न राहता, 'आपल्या निद्रिस्त पत्नीच्या प्रशस्त देहाजवळ पेनी बॅक्स्टर जागाच होता' असं भागवत म्हणतात. 'गाढ झोपलेल्या' आणि 'आडमाप' या शब्दांच्या समोर 'निद्रिस्त' आणि 'प्रशस्त देहाच्या' या रचना यांत्रिक वाटतात.

भागवत आणि पटवर्धन यांच्यात एका पिढीचं अंतर आहे का? की भागवतांच्या काळी मराठीला अनौपचारिकतेचा नसलेला स्पर्श पटवर्धनांच्या वेळी झाला होता? पण असं म्हणून भागवतांच्या भाषेतील पुस्तकी, छापील शब्दकळेचा खुलासा होत नाही. 'ज्योडीला वाटले, काय आश्चर्याची, अविश्वसनीय गोष्ट ही!' हे कसं खपवून घ्यायचं? यात मूळ रचनेचा अर्थ अवश्य आला असेल; आशयापासून मात्र हे भाषांतर लांब आहे.

पाचशेपेक्षा जास्त पानांच्या पुस्तकातल्या फक्‍त पहिल्या परिच्छेदामध्ये आलेल्या काही संज्ञांचं मराठीकरण पटवर्धन आणि भागवत यांनी कसं केलं आहे, हे पाहूया.

पटवर्धन भागवत
floor पायाखालची लाकडी तक्‍तपोशी जमीन
corn shucks shrub तुसांनी मक्याच्या बोथ्यांचा ब्रश
Glen घळ दरड
hoe कुदळ टिकाव
clearing वाडी पटांगण

यावरून लक्षात येतं की पटवर्धनांनी सरलता साधण्यासाठी स्वातंत्र्य घेतलं आहे; याउलट भागवत प्रतिशब्द वापरत आहेत. यातील विरोध असा की शब्दाला शब्द वापरणारे भागवत मूळ सांस्कृतिक आशय पकडत नाहीत!

एकूण, लहान मुलांसाठी रसाळ भाषांतर करणारे आणि भाषांतर करताना भरपूर स्वातंत्र्य घेणारे भा. रा. भागवत या अभिजात कादंबरीच्या बाबतीत अवघडलेले आहेत. ते ना धड मोकळी, सहज, स्थळ-काळाला अनुरूप शब्दयोजना करतात, ना मूळ इंग्रजी वाक्प्रचार जसेच्या तसे मराठीत आणू पाहतात. यात आणखी वाईट गोष्ट म्हणजे, 'पाडस' हे संवेदनशील, अस्सल मराठी संज्ञांनी समृद्ध असं दुसरं भाषांतर उपलब्ध असल्यामुळे भागवतांच्या त्रुटी डोळ्यात चटकन भरतात.

***
संपादकीय टिपण:

१. 'पाडस'चे मुखपृष्ठचित्रः ऋषिकेश यांच्याकडून. लेखातील इतर चित्रे जालावरून घेतली आहेत.
२. प्रमाणलेखनाच्या नियमानुसार 'हरीण बालक' हा शब्द बरोबर आहे. पण पुस्तकाच्या नावात 'हरिण बालक' असल्यामुळे ते कायम राखले आहे.

***
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

लेख पटला, भागवतांनी केलेलं भाषांतर वाचलं नाही तरीही मुद्दा पोहोचला.

'टाईपसेटिंग' गंमतीशीर आहे. भागवतांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ डाव्या बाजूला आणि पटवर्धनांच्या पुस्तकाचं उजव्या बाजूला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख पोचला. लेखातील मुद्दे पटण्यायोग्यच आहेत आणि तपशीलात व सोदाहरण मांडले आहे. मस्त!

पण त्रोटक वाटला. अजुन लिहायला हवे होते. भा.रा.च्या अनुवादापुढे पटवर्धनांचा अनुवाद सरस आहे यात वाद नाहीच. पण केवळ शब्दाला प्रतिशब्द देणे याशिवाय इतरही काही बाबी भागवतांच्या लेखनात - या कादंबरीपुरत्या - कमी पडतात. जसे भवताल दाखवताना त्यांनी जो भाग वगळलाय तो पटवर्धन इतका बेमालूम पकडतात की ज्योडी एक कथेतील पात्र न रहाता, एका पार्श्वभुमीसकट आणि आपल्या भवतालाचा एक भाग म्हणून समोर येतो, तर भागवतांच्या अनुवादात तो आणि भवताल हे दोन तट अनेकदा पडतात नी ज्योडीच्या नजरेतून भवताल असे निवेदन भासु लागते.

--

भागवतांच्या अनुवादातील संवाद तत्कालीन लोकांना अधिक "सोवळे" वाटतात हे मात्र माझ्या घरातील काही वयाने जेष्ठ वाचकांनी मला सांगितले आहे. Wink त्याबाबतीत तुमच्या लेखातील तुलना अचुक आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगदी अगदी! आधी 'पाडस' वाचलं, 'हरिण बालक' नंतर मिळालं. ते वाचताना भागवतांबद्दलची भक्ती पहिल्यांदा ओसरली. नंतर लॉरा इंगाल्स वाइल्डरच्या पुस्तकांची त्यांनी केलेली भाषांतरं आणि 'हाजीबाबाच्या गोष्टी' वाचून भारा पुन्हा (जवळजवळ!) पूर्वपदी पोचले, ते निराळं. पण या पुस्तकाचं भाषांतर गंडलंच आहे. 'पाडस' नसतं, तर ते जाणवलंही नसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अनेक रुपांतरित, भाषांतरित, आधारित कादंबर्‍या या मुळात परदेशी कथेवर आधारित आहेत याचीच कणभरही जाणीव न होऊ देता लिहिणार्‍या भारांकडून या पुस्तकाबाबत असं का झालं असावं? नेमकी कोणत्या काळात केली ही कादंबरी भाषांतरित? सुरुवातीचा काळ असेल का? शीर्षकापासूनच कृत्रिम भाषांतर जाणवणारी ही कादंबरी दिसते. प्रकाशकांची किंवा अन्य कोणाची "हुबेहूब भाषांतरच हवं, स्वैर रुपांतर नको" अशी मागणी असेल का? तशी अपेक्षा अनेकांची असते असं ऐकलं आहे.

खजिन्याच्या बेटावर संजू राजू, जयदीपची जंगलयात्रा आणि तत्सम खजिनाकथा परदेशी कथानकांवरुनच घेतलेल्या आहेत ना? तसं असेल तर तिथे तर पूर्ण भारतीयीकरण केलंय आणि ते उत्कृष्टच झालंय. धूमकेतूच्या शेपटावरची कथा आणि मुक्काम पोस्ट शेंडेनक्षत्र हेही चांगले जमून आलेले अनुवाद वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख त्रोटक नाही वाटला मला परंतु इतका आवडला की अधिकाधिक विधाने आणि पूरक उदाहरणे सामोरी यावीत, येत रहावीत असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0