भागवत आजोबांची पगडी घातलेला इंग्लिश फाफे

भागवत आजोबांची पगडी घातलेला इंग्लिश फाफे

- मेघना भुस्कुटे

.


तेजस मोडक आणि प्रसन्न धांदरफळे. बन्याच्या इंग्रजीतल्या आणि 'अपडेटेड्‍ ' अवताराचे जनक.
त्या दोघांच्या व्यावसायिक कामांचा तपशील पाहिलात, तर चित्रपटांसाठी गीतलेखन करण्यापासून ते ग्राफिक नॉवेलपर्यंत आणि कॅरेक्टर डिजायनिंगपासून कलाविभागापर्यंत अनेक 'सुरस आणि झगमगीत ' क्षेत्रांतली कामगिरी दिसेल. पण ते आहेत मात्र फास्टर फेणेचे - आणि पर्यायानं भा. रा. भागवतांचे - हाडाचे चाहते. 'प्रतापगडावर फास्टर फेणे ' या कादंबरीचा तेजसनं इंग्रजीत कालानुवाद केला आहे आणि त्यासाठी प्रसन्ननं चित्रं रेखाटली आहेत. त्यांच्याशी त्याबद्दल गप्पा मारायला म्हणून आम्ही बसलो आणि फाफेपासून सुरुवात करून 'गेम ऑफ थ्रोन्स ', 'शरलॉक ', 'हार्डी बॉईज ', फाफेवर लिहिता येतीलश्या फॅनफिक्स, हॅरी पॉटर, भागवतांच्या व्यक्तिरेखा आणि सिनेमा यांच्यातल्या रंगीन शक्यता… अशा गप्पा वाहत गेल्या. त्यांतला, तूर्तास आपल्याला ज्या भाषांतराबद्दल बोलायचं आहे, त्याबद्दलचा हा तुकडा -
***

.
फास्टर फेणे इंग्रजीत का न्यावासा वाटला?

तेजस: फीबस नावाची कंपनी आहे. त्यात आम्ही काम करत होतो. प्रसन्न आणि मी दोघेही. 'फीबस'ला भारतीय भाषांमधल्या बालसाहित्यामध्ये रस आहे. फक्त मराठीच नाही, इतरही. तर त्यांनी फास्टर फेणेवर केलेल्या दृश्य माध्यमातल्या कामाचे कॉपीराइट्स विकत घेतले. त्यासाठी त्यांना फास्टर फेणेचं इंग्रजीत भाषांतर करणारं कुणीतरी हवं होतं. त्यांनी मला विचारलं. फास्टर फेणेबद्दल प्रेम तर काय, होतंच ना! तू फास्टर फेणेची पुस्तकं बघितलीस, तर त्या सगळ्या पुस्तकांत फाफेच्या साहसांच्या लहान-लहान गोष्टी आहेत. पूर्ण लांबीच्या कादंबऱ्या अशा ४ आहेत फक्त. त्यातली 'गुलमर्गचे गूढ' -

प्रसन्न: 'गुलमर्गचे गूढ'! त्यावर तर आजही सिनेमा होऊ शकतो. अजूनही ती सिच्युएशन व्हॅलिड आहे की!

तेजस: होय, होय. करू आपण कधीतरी! तर ती आणि 'प्रतापगडावर फास्टर फेणे' या दोन कादंबऱ्या माझ्या फार आवडत्या. त्यात 'प्रतापगड'ला किल्ल्याची पार्श्वभूमीही आहे. अगदी थोड्या कालावधीत ती गोष्ट घडते. मस्त वेग आहे तिला. म्हणून ती निवडली.
.
यात प्रसन्नच्या चित्रांचा समावेश कसा झाला?

प्रसन्न: खरं तर त्यांना फास्टर फेणेवर अॅनिमेशन फिल्म करायची होती - अजूनही करायची आहे. त्या फिल्मसाठी मी फास्टर फेणेची स्केचेस्‌ करत होतो. त्यामुळे माझा त्या प्रोजेक्टमध्ये सहज शिरकाव झाला!
.
राम वाईरकरांच्या चित्रांना हात घालताना भीती नाही वाटली?

प्रसन्न: (हसतो.) नाही. भीती नाही वाटली. कारण आपलेपणा होता. फाफेचं ते सुप्रसिद्ध स्केच इतकं ओळखीचं आहे… की भीती नाही वाटली.
.
नि भाषांतर करताना? स्वत: भारा निष्णात भाषांतरकार. त्यांच्याच पुस्तकाचं भाषांतर करायचं म्हणजे...

तेजस: नाही गं… भागवतांबद्दल तसं नाही वाटत. लहान मूल अगदी सहज आजोबांची पगडी खेळायला घेईल. त्या आजोबांनी ती पगडी घालून किती प्रचंड महत्त्वाचं, थोर काम केलंय, हे त्या मुलाला माहीत असेलही कदाचित. पण त्याला काही त्याचं दडपण यायचं नाही. त्याच्याकरता ती 'त्याच्या आजोबांची पगडी' असेल फक्त. तसंच आहे ते. भागवतांच्या सगळ्या लिखाणाचाच तो गुण आहे. ते एकदम असे गळ्यात हात टाकून 'ऐक ना.. मी काय म्हणतो-' असं दोस्तासारखं काहीतरी सांगताहेत, असंच वाटतं. त्यांची भीती नाही वाटत!

प्रसन्न: एक्झॅक्टली! तसंच बन्याच्या चित्रांचं. ती चित्रं एस्टॅब्लिश झालेली आहेत. ज्यांनी फाफे वाचलेला नसतो, असे लोकही त्याचं चित्र बघून अचूक ओळखतात, 'हा तर फास्टर फेणे!', अशी त्या चित्रांची पुण्याई आहे. त्यामुळे वाईरकरांच्या चित्रांशी माझ्या चित्रांची तुलना वगैरे मी करणार नाही. कारण ती होऊच शकत नाही. ते गुरुस्थानी आहेत नि राहतील. पण मला फास्टर फेणेला माझ्या पद्धतीत चितारून बघायला मात्र खूपच आवडलं असतं. मग मी विचार करायला लागलो, आज-आत्ताचा बन्या कसा असेल? आता हे रेखाटनकाराच्या कामाशी परिचय नसलेल्या साध्या वाचकाला कदाचित कळणार नाही. पण अशा काही गोष्टी असतात, ज्या एकदा नक्की केल्या, की त्या त्या व्यक्तिरेखेचा एक ढाचा तयार होतो. मग तो वापरून सगळी टीम त्या कॅरेक्टरला सजवू शकते. कॅरेक्टर तेच राहतं, पण तिला तिच्या अश्या वेगवेगळ्या हालचाली, हावभाव देणं सोपं होतं.

त्यासाठी मी बन्याचे डिफायनिंग फीचर्स शोधायला लागलो. एक तर त्याचे ते केस. त्यांचा भांग वगैरे पडणं शक्यच नाही. त्या मुलाला त्याच्यासाठी वेळ कुठला आलाय! तो सारखा कुठेतरी पळत निघालेला असतो. त्यामुळे काही केस डोळ्यांवर आलेले आणि काही केस उभे. त्याचं ते धारदार नाक. हुशार आहे तो. ते दाखवायचं, तर नाक धारदार हवंच. 'तुडतुडीत आणि किडकिडीत तंगड्या' हे विशेषण तर भागवतांनी अनेकवार वापरलेलं आहे. त्यामुळे त्याच्या त्या तंगड्या. आणि लुकलुकते डोळे. 'भोकरासारखी नजर' असं भागवत म्हणतात. फास्टर फेणे आहे तो! त्याला आपल्या सगळ्यांच्या आधी तपशील टिपायचे असतात, नो वंडर, त्याचे डोळे असे भोकरासारखे आहेत!

हे सगळं हळूहळू तयार होत गेलं. मग त्याचा तो चौकड्यांचा शर्ट. तो तर बदलायचा नाही. कारण फाफे म्हणजे चौकड्यांचा शर्ट हे समीकरण ठरलेलं. बरं, पण इन शर्ट आणि हाफ पॅंट आत्ताचा मुलगा घालेल? नाही घालणार. बरं, त्यातून त्याची ती कायम कशाच्या तरी मागे पळत सुटायची घाई आणि वेगही नाही दिसणार. मग काय करायचं? मग त्याला एक टीशर्ट दिला. आणि त्यावर चढवला चौकड्यांचा शर्ट. म्हणजे इन करायचा प्रश्न नाही. ते दिसेलही मॉडर्न. आणि बन्या पळताना त्याचा शर्ट असा मस्त मागे उडेल, म्हणजे त्याचा वेगही दिसेल. ते ठरलं. मग त्याला कॅन्व्हासचे शूज दिले आणि थ्रीफोर्थ जीन्स दिल्या. मग बन्या 'सापडला' मला!

तशीच माली. ती 'प्रतापगडा'च्या गोष्टीत नाहीये. पण मी माली रेखाटली होती. कितीतरी गोष्टींमध्ये आहे ती. कितीतरी गोष्टींतली रहस्य तिच्यामुळे सुटलेली आहेत. स्मार्ट मुलगी आहे ती. बन्याला झापायला कमी करायची नाही! ती तर हवीच होती. तिच्या वेण्या ठेवल्या मी. पण त्या मॉडर्न केल्या. भागवतांची माली स्कर्ट घालायची. तिला मी डंगरीज दिल्या. मग ती बरोब्बर दिसायला लागली! तसंच सुभाषचं कॅरेक्टर करायचं होतं. आधीच तो गुटगुटीत बाळ आहे. पण मी त्याला अजून थोऽडं बाळसं दिलं! त्याला गोलमटोल केलं. कारण त्याच्यातला नि बन्यामधला कॉन्ट्रास्ट ठळक दिसायला हवा होता. मस्त झाली होती या कॅरेक्टर्सची अॅनिमेशन फिल्म. काळा घोडा फेस्टिवलला पुस्तकाचं प्रकाशन झालं, तेव्हा ती दाखवली होती. तेव्हा मुलांचा आणि मोठ्यांचाही मस्त प्रतिसाद मिळाला होता.
.
पेंग्विननं केलं आहे ना भाषांतरित पुस्तकाचं प्रकाशन? कसा प्रतिसाद मिळाला त्याला?

तेजस: मस्त - मस्त प्रतिसाद मिळाला. शमीन पदम्सी म्हणून समीक्षिका आहेत. इंग्रजीतलं बालसाहित्य हा त्यांचा विषय. त्यांनी फार कौतुक केलं पुस्तकाचं. इंटरनेटवर इतरत्रही लिहून आलं इंग्रजीत. मराठी माध्यमांनी मात्र फार काही भाव नाही दिला! खरं म्हणजे पेंग्विननं केलंय प्रकाशन. असंच कुण्या साध्यासुध्या प्रकाशकानं नाही केलेलं. पण 'सकाळ'मध्ये एक छोटी सिंगल कॉलम बातमी काय ती आली! पण वाचकांचा प्रतिसाद मात्र मस्त मिळाला.
.
भाषांतरकार म्हणूनही भागवत थोर आहेत. तुला खरंच दडपण नाही आलं?

तेजस: नाही, तुला म्हटलं ना, भागवत म्हणजे एकदम दोस्तच आहेत. त्यांचं दडपण नाही येत. त्यांचा फोटो बघितलायस तू? तस्सेच लुकलुकते डोळे, मिश्किल हसू, अस्ताव्यस्त केस. ते स्वत:च बन्या आहेत. (प्रसन्न खूश होऊन मान डोलावतो.) त्यांची भीतीबिती नाही वाटली. आणि हे नुसतं भाषांतर नाही. हा फाफेचा कालानुवाद आहे. आजच्या काळात तीच गोष्ट घडली तर काय होईल, असं डोक्यात ठेवून केलेलं भाषांतर आहे. बीबीसीचं 'शरलॉक' पाहिलंयस का तू? त्यातला शरलॉक कसा एकविसाव्या शतकात अवतरलाय, तसं मला फाफेचं करायचं होतं. त्यामुळे ते अवघड. त्यात भाषांतर. ते कधीही ट्रिकीच असतं. शब्दाला अचूक प्रतिशब्द मिळतोच असं नाही. तसंच वाक्यरचना, वाक्प्रचार - हे सगळं एका भाषेतून दुसऱ्या भाषेत नेताना त्यातलं काहीतरी निसटून जातंच. याचं मला भान होतं. माझा आग्रह इतकाच होता, की 'हे भाषांतर आहे' असं वाचणाऱ्याला वाटता कामा नये. त्या आग्रहाला दाद मिळाली. 'आपण भाषांतर वाचतो आहोत, असं वाटतच नाही' असा प्रतिसाद मला अनेक जणांनी दिला.
.
तू मराठी माध्यमात शिकला आहेस का?

तेजस: अं, नाही. (चेहऱ्यावर गंमतीदार अपराधी भाव!) मी कॉन्वेंटमध्ये शिकलो. अगदी पारंपरिक पद्धतीचं कॉन्वेंट. ज्या शाळेत आपापसांत मराठीत बोलायलाही बंदी असते, असं कॉन्वेंट. पण माझा मराठीशी संबंध नव्हता असं मात्र नाही. मी इंग्रजी बालसाहित्यही भरपूर वाचलं आहे आणि भागवतांचा फास्टर फेणेही फार आवडीनं, मनापासून वाचला आहे.
.
काही संकल्पना असतात किंवा वातावरण असतं, ज्यांचं भाषांतर शक्य नसतं. भाषांतर होईलही कदाचित, पण त्यानं वाचकाच्या मनात तयार होणारे लागेबांधे? उदाहरणार्थ 'प्रतापगडावर...'मध्ये शिवाजी महाराजांचे उल्लेख आहेत. 'शिवाजी' म्हटलं की वाचणारा माणूस मराठी असेल, तर त्याच्या डोक्यात आपोआप एक आदर, आपलेपणा, भारावलेपणा येतोच. तो काही इंग्रजी वाचकाच्या डोक्यात येणार नाही. अशा अडचणींचं काय केलंस?

तेजस: अशा गोष्टींकरता मी चक्क पार्श्वभूमी तयार करणारा मजकूर लिहिला. तू इंग्रजी आणि मराठी दोन्ही पुस्तकं शेजारी ठेवून वाचली असशील तर तुझ्या लक्षात आलं असेल, मी तसे बदल खूप केले आहेत. नुसता फास्टर फेणेचा काळ बदलणं, इतकंच नाही केलेलं. काही तपशील बदलले. काही मजकूर घातला. मूळच्या गोष्टीत सुर्वे सरांच्या लक्षात येतं की अशी अशी गडबड झालीय. पण मला फास्टर फेणेचं हीरोपण एस्टॅब्लिश व्हायला हवं होतं. आपली गोष्ट वेगळी. 'बन्या...' असं म्हटलं की आपण लग्गेच गोष्टीत खेचलो जातो. आपल्याकरता बन्याचं कॅरेक्टर एस्टॅब्लिश झालेलं आहे. हा पोरगा भारी आहे, हा आता काहीतरी बघणार आणि कशाच्या तरी मागे धावणार, हे आपल्याला माहीत असतं. पण हे अमराठी वाचकाला कुठून कळेल? त्याच्याकरता मला बन्यानं लगेचच्या लगेच हीरो व्हायला हवं होतं. म्हणून मी तसा बदल केला. शेवटही मी थोडा वाढवला आहे.
.
याला कुणी हरकत नाही घेतली?

तेजस: एकतर कॉपीराइट्स घेतले होते, त्यामुळे तो प्रश्न नव्हता. शिवाय हे थेट, जसंच्या तसं भाषांतर नाही, हेही एक आहे. काही लोक असे होते, ज्यांनी म्हटलं की काळ तोच ठेवणार असाल, तर आणि तरच या प्रोजेक्टमध्ये काम करायला आवडेल. (हा प्रोजेक्ट म्हणजे, 'फीबस'कडून येऊ घातलेली अॅनिमेशन सिरीज. काळा घोडा फेस्टिवलमध्ये ज्यातला थोडा भाग दाखवला गेला, ती. ती अजूनही अडकूनच आहे.) त्यांना फाफेचा काळ बदलणं मान्य नव्हतं. त्यांना फाफे म्हणजे तोच सायकलवाला, तुडतुडीत मुलगा - ७० च्या दशकातला, असंच हवं होतं. ते बदलणं म्हणजे काहीतरी अब्रह्मण्यम्‌ असं त्यांना वाटत होतं. पण मजा म्हणजे, खुद्द भागवतांच्या कुटुंबीयांकडून मला - आम्हांला फार छान प्रतिसाद मिळाला. स्वत: लीलाताई - लीलावती भागवत - प्रकाशन समारंभाला तर आल्याच होत्या. त्यांनी खूप कौतुक केलं. शिवाय रवीन्द्र भागवत - भा. रा. भागवतांचे चिरंजीव - त्यांनाही हे रूपांतर फार आवडलं. त्यांनी सांगितलेली एक आठवण फार मजेशीर आहे. भागवतांना त्यांच्या तरुणपणी म्हणे कुण्या ज्योतिषानं सांगितलं होतं, 'तुम्हांला प्रसिद्धी मिळेल, लोकांचं प्रेम मिळेल. पण तुमच्या हयातीत जितकं मिळेल, त्याहून जास्त प्रेम तुम्ही गेल्यानंतर मिळेल.' आता पेंग्विनसारख्या प्रकाशकांनी नव्या युगातला फास्टर फेणे इंग्रजी भाषेतून आणल्यामुळे तो महाराष्ट्राच्या बाहेर, अगदी परदेशातही गेला. अॅनिमेशन सिरीज आणि सिनेमा अशा दोन्ही गोष्टीही फीबसकडे प्रस्तावाधीन आहेत. या सगळ्यामुळे त्या भाकिताची आठवण होऊन त्यांना मजा वाटली.
.
कथेत अजून काही फेरफार करायच्या सूचना आल्या प्रकाशकांकडून?

प्रसन्न: अगं, मूळचा प्रस्ताव अॅनिमेशन फिल्मचा होता. तिथून सुरुवात झाली. तर त्या सिरीजसाठी फास्टर फेणेला काहीतरी सुपर पॉवर द्यावी असा कंपनीचा आग्रह होता! अॅनिमेशन करायचं तर असं काहीतरी हवंच म्हणे. नाहीतर तुम्ही सरळ शूट करून फिल्मच करा. त्यात जे दाखवता येणार नाही, ते दाखवायचं असेल तर अॅनिमेशन करायचं, असं एक म्हणणं असतं. पण आम्ही उडालोच. फास्टर फेणे आणि सुपर पॉवर? शक्यच नाही.

तेजस: हो ना! तो अगदी तुमच्या-आमच्यासारखा मुलगा आहे. तो काही थोरबिर नाही. तो स्मार्ट आहे. पण अभ्यासू वगैरे नाही. सुपरपॉवर असलेला तर अजिबात नाही. वाचकाला तो लग्गेच 'आपला' वाटतो, त्याच्यातच त्याचं अपील आहे. सुपरपॉवर देऊन कसं चालेल! सांगायला काय, लोक काहीही सांगतात. त्याला म्हणे 'एक सायकल द्या. आपल्याकडे त्या अमुक सायकलवाल्यांची स्पॉन्सरशिप आहे. तर आपण मग त्यांची सायकल त्याला देऊ.' आता बन्या झाला, तरी त्याच्या सायकलचा ब्रॅण्ड आधीच एस्टॅब्लिश्ड आहे. बरं, ब्रॅण्ड बदलला समजू आपण. पण शाळेच्या ट्रिपसोबत सायकल? तीही प्रतापगडावर! अरे, अशी कशी देऊ प्रतापगडावर सायकल? तिची गरज नको का?
.
हे अगदी जातिवंत लेखकाला सिनेमावाले 'दोन गाणी घाला, एक बागेतला सीन...' असं सांगतात, तसं वाटतंय!

तेजस: (हसतो.) हो, अगदी - अगदी तस्संच आहे हे!
.
तुला तुझ्या लहानपणीचे वाचक आणि हल्लीचे वाचक यांच्यात काही फरक जाणवतो?

तेजस: नाही गं. वाचणारे लोक अजूनही तसेच वाचतात. 'हल्ली लोक वाचत नाहीत' वगैरे रडगाण्यात काही अर्थ नाही. आता हॅरी पॉटर काय लहान पुस्तक आहे का? हे एवढाल्ले खंड आहेत. पण पोरं वाचतात की. प्रकाशनाच्या वेळी तर रात्री जागून, रांगा लावून ती पुस्तक त्यांनी हौसेनं खरेदी केली नि वाचली. मुलांना आवडणा‍ऱ्या गोष्टी दिल्या, तर ती वाचतातच.
.
अजून काय भाषांतरित करायला आवडेल तुला इंग्रजीतून मराठीत?

तेजस: मला 'हार्डी बॉइज' खूप आवडतं. मला त्याचं भाषांतर करायला आवडेल. पण भाषांतराची प्रक्रिया खूप वेळखाऊ असते. त्याला पूर्ण अटेन्शन द्यावं लागतं. मी सध्या एका ग्राफिक नॉव्हेलवर काम करतो आहे. स्वतंत्र प्रोजेक्ट आहे तो.
.
प्रसन्नही आहे का त्यात?

प्रसन्न: नाही, तो त्याचा स्वतंत्र प्रोजेक्ट आहे. तो शिक्षणानंही रेखाटनकार आहे! भाषांतर, गाणी लिहिणं हे त्याचे छंद. त्याचं खरं काम रेखाटनाचं आहे.
.
या भाषांतरात नेमक्या कोणत्या प्रसंगांसाठी चित्रं काढावीत, हे तुम्ही कसं ठरवलंत?

प्रसन्न: एक तर अमुक एका पानानंतर एक चित्र यायला हवं, असं एक तांत्रिक बंधन असतं. ते मुख्य होतं. आणि दुसरं म्हणजे भागवतांची भाषा. काय बोलकी भाषा आहे त्यांची. याच पुस्तकात 'ती फट बोलली' असं एक वाक्य आहे. त्या भाषेच्या तर प्रेमात होतो मी. तेजस त्याचं भाषांतर कसं करेल अशी उत्सुकता होती. त्यानं ते मस्त केलंच आहे; पण त्या प्रसंगाभोवती चित्र असायलाच हवं, असं मला वाटत होतं. अंधारातला तो साधू मला काढायचाच होता.

मस्त झालं आहे ते चित्र.

.
भविष्यात काय करायचे प्लॅन्स आहेत?

प्रसन्न: फास्टर फेणेवर तर इतकं काम करता येईल... 'गुलमर्गचे गूढ' मला फार आवडणारी गोष्ट आहे. नि अजूनही गुलमर्गमधलं वातावरण शांत कुठे आहे? ती गोष्ट वर्तमानात आणणं अगदी सोपं आहे. त्यांच्या छोट्या गोष्टीही मस्त आहेत. आम्हीच त्यांच्या छोट्या गोष्टींवर एक कॉमिक स्ट्रिपही केली होती. लहान मुलांचं पान असतं ना वर्तमानपत्रातलं, त्या एका पानावर एक पूर्ण गोष्ट. अशा ४-५ गोष्टी केल्या होत्या. तशा कितीतरी करायच्या आहेत. खरं तर ती अॅनिमेशन सिरीज बाहेर यायला हवी आहे. फार मस्त काम झालं आहे ते. ते लोकांपर्यंत पोचायला पाहिजे खरं तर.

तेजस: मला कुतूहल आहे ते असं, की फास्टर फेणे मोठा झाल्यावर काय करत असेल? साधारण तिशी-बत्तिशीतला फास्टर फेणे कसा असेल, त्याबद्दल मला जाम उत्सुकता आहे. त्याचे ट्रेट्स तर तसेच असतील. कुठलं तरी अॅडव्हेंचर खुणावत असेलच त्याला. मला त्याची गोष्ट लिहायला आवडेल खूप. बघू…
.
गप्पा झाल्यापासून अंक निघेपर्यंतच्या काळात या फॅनफिकसाठी तेजसला बराच मस्का लावला. त्याच्या भावी ग्राफिक नॉवेलच्या कामात बुडालेला असल्यामुळे त्यानं अजिबात आग्रहाला दाद दिली नाही, ते सोडा. पण त्याच्या डोक्यात तरुण फाफेनं मूळ धरावं, इतका आग्रह करण्याची खबरदारी मी माझ्याकडून घेतलीय. कुणास ठाऊक, त्याची पुढची कादंबरी तरुण फाफेच्या साहसावर बेतलेली असायची नि त्यात प्रसन्नची रेखाटनं दिसायची… आशा सोडू नये!

***
मुलाखत / शब्दांकन : मेघना भुस्कुटे, स्नेहल नागोरी
सर्व चित्रे: प्रसन्न धांदरफळे; संस्करण : अमुक

***
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

वा वा! फाफेचा (रेखाटनातनं दिसलेला) नवा अवतार आवडला. अ‍ॅनिमेशन पाह्यला आवडेल की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चलो, अच्छे दिन आ गये फाफे के भी. ऐकून छान वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तेजस: मला कुतूहल आहे ते असं, की फास्टर फेणे मोठा झाल्यावर काय करत असेल? साधारण तिशी-बत्तिशीतला फास्टर फेणे कसा असेल, त्याबद्दल मला जाम उत्सुकता आहे.

परफेक्ट! नेमकं हेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.