विश्वाचे आर्त - भाग ७ - 'अ'चेतनापासून 'स'चेतनापर्यंत

'नावात काय आहे? गुलाब कुठल्याही नावाने तितकाच सुंदर दिसेल.' असे शेक्स्पीयर म्हणून गेला आहे. पण नावांमध्ये बरेच काही असते. आपण संकल्पनांना नावे देण्यासाठी शब्द वापरतो. या शब्दांचा आपल्या विचारांवर, त्यांच्या मांडणीवर आणि त्यामुळेच आपल्याला जग कसे दिसते यावर प्रचंड परिणाम होतो. आपल्याला पडणारे प्रश्न आपण भाषेतच मांडतो, आणि त्या प्रश्नांच्या आकलनावर आणि आपल्या उत्तर शोधण्याच्या पद्धतीवर शब्दांच्या मर्यादा पडतात. त्यामुळे अनेक संकल्पना त्यांना दिलेल्या नावांच्या खोक्यांत बंदिस्त होतात. याचे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे सजीव आणि निर्जीव, किंवा सचेतन आणि अचेतन या कल्पना.

सजीवांसारख्या सुंदर, क्लिष्ट, वैविध्यपूर्ण 'रचना' शून्यातून कशा निर्माण होऊ शकतील हा सर्वांनाच प्रश्न पडतो. आणि तसा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे, कारण दगडासारख्या निर्जीव वस्तू या समजायला आणि तयार व्हायला सोप्या असतात. ज्वालामुखीचे उद्रेक, भूकंप, पाऊस-वारा या पंचमहाभूतांना आता आपण सजीव मानत नाही. त्यांतून तयार होणाऱ्या वस्तू आणि घडणारे बदल आपल्याला काहीतरी नियमांनुसार समजून घेता येतात. दगड हे अशाच सर्वसाधारण, नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात. पण निर्जीवापासून सजीव नैसर्गिक प्रक्रियेने कसे निर्माण होऊ शकतील? निर्जीव आणि सजीव हे तर परस्परविरोधी शब्द आहेत. त्यांच्या अध्येमध्ये काही नाही. वाळू निर्जीव - कुत्रा सजीव, पाणी निर्जीव - हत्ती सजीव हे इतके सरळसाधे आहे. या दोन काळ्या-पांढऱ्या कल्पनांमध्ये कुठेच राखाडी छटा नाहीत. मग अचेतनापासून सचेतन काहीतरी होईलच कसे तयार?

किंबहुना याच ध्रुवीकरणातून 'सजीव हे वेगळ्याच कुठच्यातरी पदार्थाचे बनलेले असतात' किंवा 'त्यांच्यात कार्य करणारी काही एक वेगळीच शक्ती असते' अशा प्रकारचा युक्तिवाद 'प्राणवाद' (व्हायटॅलिझम) म्हणून प्रसिद्ध होता. आता आपल्याला माहीत आहे की आपण सगळेच नैसर्गिक मूलद्रव्ये आणि रेणूंपासून बनलेलो आहोत - बहुतांशी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून. पण तरीही ही द्वैती विचारसरणी पूर्णपणे टाकून दिलेली नाही. रेने देकार्तचा द्वैतवाद - शरीर व मन हे दोन वेगवेगळे भाग आहेत असे म्हणतो. अजूनही आपण शरीर आणि आत्मा अशी विभागणी करतोच. शरीर म्हणजे अवयव आणि आत्मा हा त्यांचे नियंत्रण करणारा आपला 'स्व'. आपल्या डोळ्यासमोर असलेल्या स्वतःच्या उदाहरणामुळे सजीव हे 'स्व'ची जाणीव असलेले असतात हे कुठेतरी गृहित धरतो. त्यामुळे सजीव आणि निर्जीव यांमध्ये जमीन आस्मानाचं, न ओलांडता येणारे अंतर आहे असे आपल्याला सहज पटते. मग जड, स्थिर पदार्थापासून चालतेबोलते, श्वास घेणारे, विचार करणारे प्राणी तयार होणे शक्यच नाही असे वाटणे साहजिकच आहे. मग या कोड्याचे उत्तर शोधायचे कसे? अचेतनाच्या सपाटीपासून सचेतनाच्या कड्यावर उडी कशी मारायची? निर्जीवतेच्या निबिड काळ्या अंधारापासून सजीवतेच्या प्रकाशापर्यंत पोचायचे कसे?

याचे उत्तर शोधण्याआधी प्रथम आपण या प्रश्नाच्या मर्यादा समजून घेऊ. अचेतन आणि सचेतन हे दोन शब्द आपल्या विचारांवर बंधन घालतात. आणि जगात दिसणारी प्रत्येकच वस्तू आपल्याला या दोन खोक्यांपैकी एकात घालायला भाग पाडतात.
बदलणारी अक्षरे

या चित्रामध्ये दोन अक्षरे "अ" आणि "स" दाखवलेली आहेत. त्यातल्या मधल्या आकृती ह्या अधल्यामधल्या अवस्था आहेत. मुळातच त्या दोन अक्षरांमध्ये साम्य असल्यामुळे ही चित्रे काढणे मला तितके कठीण गेले नाही. अ च्या उजवीकडे गेलो तर पहिल्या काही दोन निश्चितपणे अ वाटतात. मधली आकृती अर्धवट अ वाटते. तसंच स पासून डावीकडे गेलो तर होते पण मधली आकृती अर्धवट स वाटते. बहुतेकांना यात तीन अ, तीन स व एक त्यामधले काहीतरी असे दिसते. (काही लोक तीन अ व चार स म्हणतील) इथे डावीकडून उजवीकडे "अ"पण हळू हळू कमी झालेले आहे व "स"पण वाढलेले आहे या क्रमिक स्वरूपात मांडल्या आहेत. जर तुम्हाला मी या आकृत्या या क्रमाने न दाखवता मधूनच उचलून एक एक करून दिली असती तर तुम्हाला हे लक्षात आला असते का? तुम्हाला हो असे खात्रीने वाटत असेल तर इतर अक्षरे झाकून फक्त डावीकडून दुसर्‍या अक्षराकडे पहा व म्हणा "हा थोडासा स आहे" (१/६ स +५/६ अ)- तुमचे मन त्याला हे बरोबर नाही असे म्हणेल. आपण प्रत्येक आकृतीसाठी आपण अ आहे का? स आहे का? या प्रश्नाची हो किंवा नाही अशी डिजिटल उत्तरे शोधतो. आणि त्यांचे दोन गठ्ठे करून ते दोन खोक्यात भरतो. या खोक्यांच्या द्वारे विचार केल्यामुळे आपल्याला हळुवार फरक दिसत नाही.

या खोक्यांमधून आपण जेव्हा सजीवांचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपल्या आसपास दिसणारे कुत्रा, मांजर, गायी, बैल, हत्ती, वनस्पती असतात. किडे-मुंग्यांनाही आपण सजीव म्हणतो. पण हे झाले आपल्या डोळ्यांसमोर दिसणाऱ्या सृष्टीबद्दल. जीवाणू सजीव आहेत का? अमीबा सजीव आहे का? अमीबा निदान एक पेशी तरी आहे - आणि आपल्याला माहीत असते की इतर सजीवही पेशींनी बनलेले असतात. मग निव्वळ काही हजार अणूंचा समूह असलेल्या विषाणूंचे काय? त्यांना आपण सजीव म्हणावे का? त्यांना सजीव म्हटले तर पंचाइत येते, कारण प्रयोगशाळेत असे विषाणू तयार केले गेले आहेत. ते जर योग्य पेशींमध्ये सोडले तर आपल्या प्रतिकृती तयार करतात - म्हणजेच सजीवांप्रमाणे कार्य करतात. मग सचेतन आणि अचेतनात नक्की फरक काय?

माणूस-कुत्रा वगैरेंसारखे बुद्धिमान जीव, किडे-मुंग्यांसारखे काहीसे यांत्रिक जीव, वनस्पतींसारखे मेंदूही नसलेले जीव, ऑक्सिजनशिवाय जगणारे जीव अशा सर्व सजीवांना सामावून घेऊ शकेल अशी नक्की व्याख्या काय? हालचाल करणे, श्वास घेणे, विचार करणे, पाहाणे या सजीवांच्या क्रिया असतात. पण यातले नक्की एक काहीतरी बोट ठेवून खात्रीने म्हणता येत नाही की हे सजीवांचे व्यवच्छेदक लक्षण. हालचाल यंत्र करतात, काही सजीव श्वासोच्छ्वास करत नाहीत, अनेक सजीवांना अवयव नसतात. पण एक गोष्ट सर्व सजीव निश्चित करतात. ती म्हणजे पुनरुत्पादन. अनुकुल परिस्थिती मिळाली तर परिसरातून कच्चा माल मिळवून आपल्यासारखीच दुसरी प्रतिकृती करण्याची क्षमता असणाऱ्यांना आपण सजीव म्हणतो. पुनरुत्पादन हेच सजीवांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

एकदा पुनरुत्पादनावर लक्ष केंद्रित केले की मग आपल्याला अचेतन आणि सचेतन यांच्यातली दरी नाहीशी करता येते. कारण या प्रकारचे 'पुनरुत्पादन' अगदी सोप्या स्वरूपात आपल्याला निर्जीवांमध्येही दिसते. उदाहरणार्थ मीठ. मीठाचा एक रेणू म्हणजे सोडियम आणि क्लोरीनचे एकमेकांना चिकटलेले अणू. जेव्हा मिठाचे द्रावण सुकते, तसतसे सोडियम आणि क्लोरीनचे पाण्यात विरघळलेले आयन एकत्र येतात. इतर तसेच आयन त्यांना चिकटत जातात. आणि हळूहळू मिठाचा स्फटिक वाढत जातो. याला अर्थातच आपण रूढ अर्थाने पुनरुत्पादन म्हणणार नाही. कारण नवीन तयार झालेली प्रतिकृती तिथेच चिकटून राहाते. आणि ती नवीन प्रतिकृती तयार करते.
म्हणजे मिठाला मेंदू आहे, आणि ते ठरवून तशा प्रतिकृती तयार करते असा अर्थ नाही. किंबहुना पुनरुत्पादनाची ही अत्यंत सोपी, जुजबी अवस्था आहे. मिठाऐवजी आपल्याला जर वेगळ्या प्रकारच्या रेणूची कल्पना करता येईल. यात, प्रतिकृती तयार झाल्यावर ती मूळ 'पालका'पासून सुटी होते. आता बाहेरचे रेणू घेऊन हे दोन्ही रेणू प्रतिकृती तयार करू शकतात. आता एकाचे दोन, दोनाचे चार असे करत संपूर्ण क्षेत्र त्याच रेणूने व्यापले जाऊ शकेल. आता काही कारणाने या रेणूंभोवती एक साधंसे कवचसदृश काही तयार झालं, तर आपल्याला पहिली जुजबी पेशी मिळेल. ही प्रक्रिया जर काही कारणाने अधिकाधिक क्लिष्ट झाली तर आपल्याला सजीव आणि निर्जीव; सचेतन आणि अचेतन अशी काळ्यापांढऱ्या स्वरूपाची विभागणी टाळून अचेतनाच्या अ पासून ते सचेतनाच्या स पर्यंत चढत्या भाजणीने जाणारी मालिका दिसेल. आणि मग आपल्याला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास होऊ शकतो ही कल्पनातरी करता येईल.

थोडक्यात, ज्या संकल्पनांचा विचार आपण "असते/नसते" अशा काळ्या पांढऱ्या स्वरूपात करतो त्या बऱ्याच वेळा मधल्या अवस्थांना नाव न दिल्याने आपण या किंवा त्या खोक्यात टाकलेल्या असतात. हे चुकीचे आहे असे नाही - कारण तशी वर्गवारी करणे उपयुक्त असते. फक्त आपण ते करतो आहोत याचे भान विसरता कामा नये. कारण जेव्हा एका स्थितीचा दुसऱ्या स्थितीत बदल होतो तेव्हा त्या मधल्या अवस्थांचाच विचार करावा लागतो. साध्या रेणूंपासून ते विचार करणाऱ्या जीवांपर्यंतचा प्रवास बघायचा असेल, तर मधल्या अवस्था महत्त्वाच्या ठरतात.

"जडतेला मना मनाचा पोत" कसा आला हे पाहायचा असेल तर... "अ"चेतनाचा "स"चेतन कसा झाला हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला हे निरुपयोगी खोके तोडून टाकले पाहिजेत व खोक्याच्या बाहेर जाऊन विचार केला पाहिजे.


(मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

फार छान मांडलंय.अजून त्या कोड्याचं उत्तर कोणीतरी गुप्त ठेवलंय आणि ते एकना एक दिवस माहित होणारच याची आम्हाला खात्री आहे.

अतिशय सोपी, सरळ आणि सुघड मराठीतली मांडणी या वैशिष्ट्यांमुळे ही मालिका अधिकाधिक आवडत चालली आहे.
आपण दिलेल्या 'अ' ते 'स' ह्या प्रवासाच्या उदाहरणामुळे विषयाचे आकलन एकदम सोपे होऊन गेले. कोणत्याही लिपीच्या विकासामध्ये अक्षरांतील बदलांचे असे विविध टप्पे प्रत्यक्ष दिसतात. ब्राह्मी लिपीत तर विशेषच. पण फरक असा की उच्चार सरसकट बदलत नाहीत. म्हणजे 'अ'चे चिह्न बदलते पण उच्चार 'स' होत नाही. तेच जर आपण रोमन आकडे घेतले तर प्रत्येक चिह्नात दुसर्‍या चिह्नाची भर घालून किंवा ते वजा करून पुढचे आकडे बनतात आणि त्यांची किंमतही बदलत जाते.
छान वाटले.

आवडला लेख. अ आणि स च उदाहरण एकदम सोपं करतं

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लेख खूप आवडला. हा मुद्दा कधी लक्षातच आलेला नव्हता.

अ-स्-तित्वाच्या प्रवासाची मांडणी आवडली.

वरवर पहाता हे स्पष्टीकरण पटतं, पण हरदासाची कथा मूळपदावर येते!

मिठाऐवजी आपल्याला जर वेगळ्या प्रकारच्या रेणूची कल्पना करता येईल. यात, प्रतिकृती तयार झाल्यावर ती मूळ 'पालका'पासून सुटी होते. आता बाहेरचे रेणू घेऊन हे दोन्ही रेणू प्रतिकृती तयार करू शकतात.

इथे गडबड झाल्येय. प्रश्न मिठाऐवजी वेगळे रेणू घेण्याचा नाहिये. तर "....मूळ 'पालका'पासून सुटी होते. आता बाहेरचे रेणू घेऊन हे दोन्ही रेणू प्रतिकृती तयार करू शकतात......" हे फार महत्वाचं आहे. ही क्षमता सचेतन कोण आणि अचेतन कोण दाखवून देते. विषाणूंसारखे किचकट बरेच रेणू असतात, प्रयोगशाळेत करता येतात. परंतु प्रजननक्षमता नसल्यामुळे अचेतन ठरतात. आणि मान्य आहे की विषाणूंपेक्षा लहान रेणू पुर्वी असतील, काळाच्या ओघात त्यांच्या खुणा जीवनसूत्रांमधे पण उरल्या नसतील पण जे काही होते ते प्रजननक्षम होते. त्यामुळे म्हणतोय की हरदासाची कथा मूळपदावर आल्येय - तुम्ही म्हणता त्याप्रमाणे

पुनरुत्पादन हेच सजीवांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

आणि हे लक्षण सतं किंवा सतं !

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

आणि हे लक्षण असतं किंवा नसतं !

हे बरोबर नाही. पुनरुत्पादनाचे अनेक भाग पाडता येतात. एक म्हणजे आपल्यासारख्या प्रतिकृती 'तयार' करणं. दुसरा महत्त्वाचा म्हणजे त्यातल्या किमान काही विलग होऊन त्यांनी अजून इतरत्र आपल्यासारख्या प्रतिकृती तयार करणं. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे किती अचूकपणे प्रतिकृती तयार होतात हा. चौथा भाग म्हणजे तयार होणाऱ्या प्रतिकृती किती काळ टिकून राहातात हा. या सर्व प्रक्रिया कमी-अधिक प्रमाणात यशस्वी होतात किंवा कमी अधिक प्रमाणात कार्यक्षम असतात. या सर्व कार्यक्षमतांचा गुणाकार म्हणून पुनरुत्पादन किती यशस्वी आहे की नाही हे ठरतं. या गुणाकाराचं स्वरूप शून्य किंवा एक असं काळंपांढरं नसून वेगवेगळ्या सिस्टिम्ससाठी कमी-अधिक आहे. त्या अर्थाने पुनरुत्पादन हे असतं किंवा नसतं असं नसून चढत्या भांजणीने जातं. आणि हे सगळं आसपासच्या वातावरणावर अवलंबून असतं. मी मिठाचं उदाहरण दिलं. आता कल्पना करा, की उन्हाळ्यात जसजसं एखाद्या डबक्यातलं पाणी आटत जातं तसतसे मिठाचे स्फटिक तयार होतात. उन-थंडीच्या प्रसरण-आकुंचनामुळे त्याचे बारीक तुकडे होतात. हे तुकडे वाऱ्याने उडून इतर डबक्यांत जातात, आणि तिथे सीड क्रिस्टल म्हणून काम करतात... आता एखाद्या ठिकाणी लावलेल्या झाडाच्या बिया पसरून कालांतराने आसपासही झाडं उगवावीत तशी आसपासच्या सर्वच डबक्यांत मिठाचे स्फटिक तयार व्हायला सुरूवात होईल. यात जर काही इतर रासायनिक अभिक्रिया होऊन डबक्यात सोडियम आणि क्लोरिनचे अणू शोषले जात असतील, किंवा दगडांतून बाहेर पडत असतील तर त्यांचं रूपांतर मिठात होईल - आणि मिठाची लोकसंख्या वाढेल. हे अर्थातच काहीशा अकार्यक्षम पुनरुत्पादनाचं उदाहरण आहे. त्यामुळे 'मिठात पुनरुत्पादन क्षमता असते किंवा नसते' असं काळंपांढरं उत्तर देता येत नाही. परिस्थितीनुरुप ती किती परिणामकारक आहे किंवा नाही हे ठरतं. आणि या सर्व कार्यक्षमता वाढवण्याची प्रक्रिया नैसर्गिक निवडीमुळे होते. मग त्यावर क्लिष्टतेचे थर चढले की आपल्याला सध्या दिसणारी जीवसृष्टी दिसते.

तुम्ही ज्या चार बाबी सांगताय त्या प्रजननक्षमतेला लागू होतात - प्रजननक्षमता आहे का नाही या शक्यतेला नव्हे.

एक म्हणजे आपल्यासारख्या प्रतिकृती 'तयार' करणं.

There you go, तयार 'करणं', तयार 'होणं' नव्हे!

दुसरा महत्त्वाचा म्हणजे त्यातल्या किमान काही विलग होऊन त्यांनी अजून इतरत्र आपल्यासारख्या प्रतिकृती तयार करणं.

ईथेही विलग होणं ही संकल्पना महत्वाची आहे.

तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे किती अचूकपणे प्रतिकृती तयार होतात हा.

मी तर म्हणेन की एकासारख्या छापाच्या मूर्ती तयार होत नाहित हेही सजीवांचं व्यवच्छेदक लक्षण आहे! अत्यंत कमी प्रमाणात असलेलं जुळ्यांचं प्रमाण सोडलं तर nature doesnt have clones. प्रजननाच्या प्रक्रियेत संततीत थोडासा बदल होणं, (हवंतर भेसळ होणं म्हणा!) हे नसतं तर ईतकं जीववैविध्य तयार झालं असतं का शंका आहे.

चौथा भाग म्हणजे तयार होणाऱ्या प्रतिकृती किती काळ टिकून राहातात हा. या सर्व प्रक्रिया कमी-अधिक प्रमाणात यशस्वी होतात किंवा कमी अधिक प्रमाणात कार्यक्षम असतात.

यामुळे आयुरमर्यादा (हा शब्द बरोबर लिहिता येत नाहिये) ठरेल.

या सर्व कार्यक्षमतांचा गुणाकार म्हणून पुनरुत्पादन किती यशस्वी आहे की नाही हे ठरतं.

ईथे परत गडबड होत्येय. प्रजननाची प्रक्रिया, कार्यक्षमतांचा गुणाकार होउन, कीती यशस्वी आहे यामुळे पुनरुत्पादन कीती हळू/भराभर होतं हे ठरेल, कींवा आत्यंतिक परीणाम म्हणजे तो सजीवच नष्ट होउन जाईल. पण मुळात हे होईल कारण तो रेणू / भाग / प्राणी पुनरुत्पादन करू शकत असल्यामुळे 'स'जीव आहे म्हणून. क्लिष्टतेच्या थरानी वेगवेगळे सजीव तयार होतील, वेगवेगळी कार्यक्षमता असलेले सजीव तयार होतील पण मुळात कुठेतरी, कुठलातरी रेणू अचेतनाचा सचेतन झाला म्हणून.

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

करणं आणि होणं यात जाणीवेचा फरक आहे. आता एका अमिबाचे दोन होतात तेव्हा तो ते करतो की ते होतात? मी दिलेल्या मिठाच्या उदाहरणात पुनरुत्पादन होतं, की मीठ ते करतं? बॅक्टेरिया एकाचे दोन होतात तेव्हा ते पुनरुत्पादन करतात की होतात?

माझा मुद्दा असा आहे की आपण ज्याला पुनरुत्पादन करणं म्हणतो, त्याचीच नैसर्गिक रूपं ज्यांना आपण अचेतन म्हणतो अशा जगातही दिसतात. अगदी सोप्या सरळसाध्या बाबतीत आपण त्याला होणं म्हणतो, आणि जेव्हा ते पुरेसं क्लिष्ट असतं तेव्हा त्याला करणं म्हणतो. याच्या अधल्यामधल्या स्थितीही आहेत. आणि अशा मधल्या स्थिती असल्या की नैसर्गिक निवडीतून तो प्रवास करता येतो.

माझा मुद्दा असा आहे की आपण ज्याला पुनरुत्पादन करणं म्हणतो, त्याचीच नैसर्गिक रूपं ज्यांना आपण अचेतन म्हणतो अशा जगातही दिसतात. अगदी सोप्या सरळसाध्या बाबतीत आपण त्याला होणं म्हणतो, आणि जेव्हा ते पुरेसं क्लिष्ट असतं तेव्हा त्याला करणं म्हणतो. याच्या अधल्यामधल्या स्थितीही आहेत.

अमिबाच का, बहुसंख्य सजीव, "चला आता संतती निर्माण करूया" या विचाराने प्रजनानाच्या मागे लागत नाहीत. नैसर्गिक प्रेरणेमुळे पुनरुत्पादनाच्या प्रक्रिया करताना, त्यात भाग घेताना यामधून संतती निर्माण होणारे याचं आकलन त्याना नसतं. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 'ते होतं'. (मी बहुसंख्य म्हणतोय कारण मानवेतरात एप्सना कदाचित याचं भान असू शकेल). पण मीठाचा स्फटिक वाढतो, त्याचे तुकडे उडून दुसरीकडे जाउन पडले तर वाढतात/वाढू शकतात हे "अचेतन जगातलं पुनरुत्पादन आहे" हे पटत नाही. ती निव्वळ वाढ आहे.


असो. आपण दोघे आपल्या मुद्द्यांवर ठाम आहोत. जरा बाकीच्या मंडळींकडून काही वेगळं ऐकायला मिळतं का बघूया ....

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

आता एका अमिबाचे दोन होतात तेव्हा तो ते करतो की ते होतात?

मला मिसळपाव यांचं म्हणणं पटतं. अमिबाचे एकाचे दोन ते त्याच्यातल्या डीएनेच्यामुळे निर्माण झालेल्या प्रेरणेमुळे होतं. मीठाचं तसं नाही. प्रत्येक मिठाचा रेणू पुनरुत्पादन करेल अशी आंतरिक उत्मी त्यात जागृत करणारा डीएने (किंवा जे काय म्हणाल ते) मीठात नसतं. तेव्हा मिठाचंही पुनरुत्पादन होतं हे म्हणणं धाडसाचं आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अमिबाच्या प्रेरणा? आंतरिक ऊर्मी? पेशीकेंद्रकाचं विभाजन होणं ही संपूर्णपणे रासायनिक अभिक्रिया आहे. तसं मनुष्यांच्या भावनांचं आरोपण करायचं झालं तर 'धनभारित कणांना ऋणभारित कणांशी एकात्मता साधून मोक्ष मिळवण्याची इच्छा असते म्हणून ते एकमेकांकडे आकर्षित होतात.' असंही म्हणता येईल. लेखातच अशा बाबतीत शब्दांच्या मर्यादा ओळखून ते योग्य पद्धतीने वापरायला हवेत असं म्हटलेलं आहे.

मुळात डीएनएचा रेणूच रेप्लिकेशनमुळे तयार झाला आहे. रेप्लिकेशन सतत चालू असते त्यातून निर्माण झालेले कोणते आकार किती स्टेबल आहेत त्यावर ते टिकणार की नाही ते ठरते. स्टेबल आकार आणखी जोडले जाऊन अधिकाधिक स्टेबल (व क्लिष्ट) आकार तयार होत जातात. उदा. अमीबा मग हायड्रा असं करत करत माणूस वगैरे.

प्राणी सचेतन असला तरी त्याचा डीएनए अचेतन असतो.

चुकीच्या जागी आली, काढून वरती टाकल्येय.

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

लेख आवडला.
मध्यंतरी एका यंत्रमानवाने स्व-जाणिवेची कसोटी पार केली त्याचा व्हिडिओ पाहात होतो. त्यात एका शास्त्रज्ञाने उत्क्रांतीसदृष प्रक्रिया वापरुन एआय कसे विकसित करता येईल त्यासंबंधीच्या प्रयोगाबद्दल माहिती देताना एक अतिशय उद्बोधक वाक्य वापरले, "Without any external motivation, replication is the natural motivation."
एकमेकांना जोडले जाऊन विविध आकार निर्माण होऊ शकतील असे वेगवेगळ्या आकाराचे ठोकळे एकत्र टाकून घुसळल्यास त्या घुसळणीत स्टेबल राहू शकतील असे विशिष्ट आकार तयार होतात व ते स्वत:ला रेप्लिकेट करतात. थोडक्यात पुनरुत्पादनाचे चेतनेवर काहीही अवलंबित्व नाही. चेतनामात्र पुनरुत्पादनातून उद्भवली आहे.
मिठाचे स्फटिक व डीएनएचे रेणू हे तितकेच निर्जीव आहेत. सजीवांमधील पुनरुत्पादनाची "प्रेरणा" ही वेगळी वा कोणी दिलेली नाही. ती पूर्ण भौतिकी गुणधर्म असून प्रत्येक कणाकणात परिस्थितीनुसार असू शकते.