Skip to main content

ट्रॅफीक

दोन रस्ते एकमेकांना येऊन मिळतात,
तिथेच होतो भारीपैकी ट्रॅफीक

फार वर्दळ नसते सुरुवातीला
गजबजती गर्दी तर सोडाच, टोळभैरवही फिरकत नाहीत नाक्याकडे
उगाच एखादं जीव धरून राहिलेलं पिंपळाचं रोपटं
नि गंभीर होऊन गुलुगुलु बोलणारी एखादी अल्पवयीन फ्रेण्डशिप

फ्रेण्डशिप जीव धरू लागते
तसतसा नाकाही जीवही धरू लागतो
एखादी टपोरी पानाची टपरी
मोबाइल रिचार्ज मारणारा एखादा मल्टिपर्पज वाणी
नि गणपत वाण्याचे वारसदार असलेले काही फुटकळ रिक्षावाले

फ्रेण्डशिप हळूहळू सरकू लागते आतल्या गल्लीच्या लपलेल्या तोंडाकडे
तसतसे रस्ते रंगात येतात, सैलावतात
अंग ऐसपैस पसरून एकमेकांना टाळ्या देतात
तेव्हा उगवू लागतो आसमंतात ट्रॅफीक नावाचा प्राणी

चाहूल लागत नाही त्याची तशी
मांजरपावलांनी वाढू लागलेले हॉर्न्स
शाळांच्या नि हापिसाच्या वेळांना उसळणारा नि एरवी गायब होणारा जादुई धूर
कडेकडेनं नजर चुकवून उगवू लागलेली बकाली
जीव धरून राहू लागलेली एखादी भिकारीण
कचकड्याची खेळणी नि थडग्यावरची फुलं विकणारी कळकटलेली स्मार्ट पोरं

चाहूल लागते तेव्हा
रस्त्यांच्या दोस्तीचं सर्पयुगुल होऊन बसलेलं असतं
आपल्याच मस्तीत प्रणयात चूर होऊन गेलेलं...

मग होतात मागोमाग काही अपघात
येतात ट्रॅफीक सिग्नल्स
निऑन साइन्स
नि पाठोपाठ रस्ते वितात
एखाद्या फ्लायओव्हरलाही जन्म देतात

त्यांच्यातलं नातं,
वर्णनाच्याच काय,
लग्नसंस्थेच्याही परीघाच्या पलीकडे जाऊन पोचलेलं
ट्रॅफीक मात्र होतच राहतो
भारीपैकी.

***
(पूर्वप्रकाशित ;-))

.शुचि. Mon, 28/12/2015 - 20:21

तसतसे रस्ते रंगात येतात, सैलावतात
अंग ऐसपैस पसरून एकमेकांना टाळ्या देतात
तेव्हा उगवू लागतो आसमंतात ट्रॅफीक नावाचा प्राणी

मस्त.

राजेश घासकडवी Wed, 30/12/2015 - 10:31

आवडली. नात्याच्या निवांत सुरूवातीनंतर येणारा ट्रॅफिक हवाहवासा तर असतो कारण त्यांनीच त्या रस्त्याला अर्थ मिळतो. पण तो कधी नकोसा व्हायला लागतो हे समजतही नाही. एखाद्या दिवशी कोणा पक्षा, सेने, पार्टीने बंद पुकारलेला असल्याचं निमित्त होऊन अचानक त्याला पुन्हा तो निवांतपणा मिळतो. आणि भर रस्त्याच्या मध्ये डब्यात खोचलेले स्टंप उभे करून पोरं क्रिकेटबिकेट खेळतात तेव्हा त्या जुन्या ताजेपणाची, मोकळिकीची, शांततेची आठवण येते. जुन्या मुंबईचे फोटो बघताना होतं तसं असंही होतं कधी असं वाटून नॉस्टॅल्जिक व्हायला होतं.

विवेक पटाईत Sat, 02/01/2016 - 17:43

कविता आवडली. (गेल्या ३० वर्षांपासून दररोज सकाळी दीड आणि संध्याकाळी दीड तास केवळ ट्राफिक मुळे व्यर्थ जातो- वैतागलेला). उड्डाणपुले जन्माला आली तरी ट्राफिक आणखीन वाढला. माणसाच्या वाढत्या संख्ये बरोबर.
सत्यच आहे रस्ता असो कि नसो

लग्नसंस्थेच्याही परीघाच्या पलीकडे जाऊन पोचलेलं
ट्रॅफीक मात्र होतच राहतो