विश्वाचे आर्त - भाग १६ - जीएमओ एक तोंडओळख

जनुकीय बदल केलेले जीव - जीएमओ (जेनेटिकली मॉडिफाइड ऑर्गॅनिझम्स) यांच्याबद्दल सध्या बराच वादंग आहे. जीएमओ खाद्यांवर बंदी आणा ते जीएमओ खाद्यांमुळे प्रचंड फायदा आहे अशा गोष्टी कर्कश शब्दांत मांडल्या जातात. हा वाद, त्याचे परिणाम आणि त्यांचं भविष्य समजून घेण्यासाठी त्यामागचं विज्ञान आधी समजून घ्यायला हवं. नाहीतर आपल्याला त्याविषयी मिळणाऱ्या साउंडबाइट्स, टीव्हीवर होणाऱ्या गरमागरम चर्चा आणि वादविवाद यांतून गैरसमजच वाढण्याची शक्यता आहे. तांत्रिक भाषा न वापरता, त्यामागचा उद्देश आणि तंत्रं समजावून देण्याचा हा एक प्रयत्न आहे.

गेल्या काही लेखांत आपण उत्क्रांतीविषयी विचार केला. नैसर्गिक निवडीतून होणारी उत्क्रांती ही गेली तीन अब्ज वर्ष सतत चालू असलेली प्रक्रिया आहे. उत्क्रांतीचा मूळ गाभा असा की काळानुसार प्रजाती बदलतात - जे गुणधर्म त्या विशिष्ट प्रजातीतल्या प्राण्यांना तग धरायला मदत करतात ते गुणधर्म स्थिरावतात, वाढतात आणि जे गुणधर्म उपयुक्त नसतात ते नाहीसे होतात. काही प्रजातींपासून या गुणधर्मांत बदल झालेल्या नवीन प्रजाती निर्माण होतात. हे चक्र अव्याहतपणे चालू राहिल्यानेच आज निसर्गात इतक्या विविध प्रजाती दिसतात. पण प्रश्न असा आहे की या प्रजाती बदलतात कशा? त्याचं थोडक्यात उत्तर असं आहे की प्रत्येक प्राण्यात त्याचा स्वतंत्र असा डीएनए असतो. हा काही गुणसूत्रांमध्ये (क्रोमोझोम्समध्ये) विभागला गेलेला असतो. म्हणजे माणसाच्या डीएनएत गुणसूत्रांच्या तेवीस जोड्या असतात - प्रत्येक जोडीत एक आईकडून आलेला आणि एक वडिलांकडून आलेला असतो. हे एका अर्थाने 'माणूस कसा बनवावा?' याच्या कृतीचं पुस्तक असतं - तेवीस भागांत विभागलेलं. त्यातल्या प्रत्येक गुणसूत्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी प्रथिनं कशी तयार करायची याची कृती असते. ही विशिष्ट काळी वाचली जाऊन, त्यानुसार वेगवेगळे पदार्थ तयार होऊन त्यातून माणूस बनतो. ही प्रक्रिया प्रचंड क्लिष्ट आणि थक्क करणारी आहे. त्याविषयी कधीतरी स्वतंत्र लेख लिहिणं योग्य ठरेल. मात्र आत्ता जीएमओ म्हणजे काय हे समजावून घेण्यासाठी इतकंच पुरेसं आहे.

या गुणसूत्रांचे, विशिष्ट प्रथिनं निर्माण करण्याची कृती देणारे भाग म्हणजे जीन्स किंवा जनुकं. आपण गेल्या लेखात पाहिलं की त्यातली काही जनुकं प्रभावी तर काही अप्रभावी असतात. प्रभावी जनुक आईकडून किंवा वडिलांकडून आलं तरी मुलामध्ये ते दिसतं. मात्र अप्रभावी जनुकाचा परिणाम दिसण्यासाठी ते दोन्ही पालकांकडून आलेलं असलं पाहिजे. भाताची लागवड करताना उंच रोपाचं जनुक हे प्रभावी ठरतं. त्यामुळे उंच झाडं जास्त तयार होतात. मात्र जेव्हा भरपूर तांदूळ निर्माण करणारी इतर जनुकं असतात तेव्हा मात्र या उंचीचा गैरफायदा होतो. त्या वजनाने पिकं मान टाकतात. मग काय करायचं? एक मार्ग असा आहे की काहीही करायचं नाही, आणि जे पीक येईल ते 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' या न्यायाने स्वीकारायचं. जर त्यातून पीक कमी येण्याने कोट्यवधी माणसं मरणार असतील, तर मरू देत. आपण कोण आलो निसर्गाच्या नियमांत ढवळाढवळ करणारे?

दुसरा मार्ग असा आहे की ठीक आहे, जर मला जास्त पीक हवं असेल तर जेव्हा मला कमी उंचीची जनुकं दोन्ही पालकांपासून आलेलं झाड सापडेल तेव्हा मी त्याच झाडापासून लागवड करेन. इतर अधिक उंचीची झाडं मारून टाकेन किंवा पुढे वाढवणार नाही. ही अनैसर्गिक किंवा मानवीय निवड झाली. या संकरित बियाणांच्या प्रयोगात आपण नैसर्गिकरीत्याच दोन जनुकांची जोडणी करतो. म्हणजे अधिक पीक देणारी उंच जात आणि कमी उंचीची जात एकत्र करतो. आणि नंतर उंची देणारी जनुकं असलेली झाडं नष्ट करतो. या संकरातून प्रत्यक्ष जनुकीय बदल आपण करत नाही - ते नैसर्गिकरीत्याच होतं. मात्र आपण निवड करून विशिष्ट जात जगवतो, आणि इतर जगू देत नाही. यात आपण नैतिकदृष्ट्या काही चुकीचं करतो आहोत अशी आपल्याला शंकाच येत नाही. कारण आपण फक्त विशिष्ट बिया पेरल्या, त्यातून उगवलं त्यातलं काही निवडलं आणि त्या बिया पुन्हा पेरल्या. त्यातून उत्तम पीक येतं म्हणून जगभर पसरवल्या. हरितक्रांती घडवताना हेच केलं गेलं. अशी निवड करून आपल्याला हवे ते गुणधर्म असलेलं बियाणं तयार करणं ही वेळखाऊ पद्धत आहे. अनेक प्रयोग करावे लागतात. त्यातले नव्व्याण्णव टक्क्यांहून अधिक बाद करावे लागतात. काळजीपूर्वक निवड करावी लागते, तेव्हा कुठे हाताला हव्या त्या गुणधर्मांचं मिश्रण असलेलं बी सापडतं.

पण याऐवजी जर आपल्याला जास्त किफायतशीर पर्याय उपलब्ध असेल तर? तो समजावून घेण्यासाठी आपल्याला गुणसूत्रांचा विचार करायला लागेल. तांदळाचं रोप बनवण्यासाठी असणारी गुणसुत्रांच्या कृतीची पुस्तकं आहेत. प्रत्येक तांदळाच्या जातीत ती किंचित वेगवेगळी आहेत. जेव्हा आपण संकरित बियाणं तयार करतो, तेव्हा या कृतींचं मिश्रण असलेलं बियाणं बनवतो. म्हणजे नव्या जातीत या पुस्तकांच्या पानांपैकी काही एका जातीतली तर काही दुसऱ्या जातीतली आली असतील. हे मिश्रण योग्य तसं होईलच अशी खात्री नसते, म्हणून अनेक वेळा प्रयोग करून योग्य मिश्रण व्हायची वाट बघावी लागते. त्याऐवजी जर आपल्या एका पुस्तकांतली योग्य पानं दुसऱ्या पुस्तकांत घालता आली तर? म्हणजे एका जातीच्या बियाणाचा डिएनए घेऊन त्यात योग्य ठिकाणी योग्य ती जनुकं घातली आणि तीच पेरली तर? याचा फायदा उघड आहे. हजारो प्रयोग करून काहीतरी हाती लागण्याऐवजी नेमके प्रयोग करून तोच परिणाम साधता येतो. याच प्रक्रियेला जेनेटिक मॉडिफिकेशन म्हणतात आणि त्यातून तयार होणाऱ्या नवीन प्रजातीला जेनेटिकली मॉडिफाइड ऑर्गॅनिझम किंवा जीएमओ म्हणतात.

एका अर्थाने हे तंत्रज्ञान न वापरताही बियाणांमध्ये जनुकीय बदल घडवणं हे पूर्वापारपासून चालू आहे. नियंत्रित संकरातून, आणि निवडीतून कुत्र्यांमध्ये इतकं प्रचंड वैविध्य निर्माण केलं गेलं ते जनुकीय बदलांतूनच. फक्त फरक इतकाच की कुठचा गुणधर्म कसा वेगळा काढायचा याबाबतीत डोळसपणा नव्हता. अंधारात चाचपडत जायचं, जर पुढे पोचलो तर तिथून सुरूवात करायची आणि धडपडत हळूहळू पुढे जायचं अशी पद्धत होती. मार्ग तोच. शेवट तोच. मात्र पद्धत नैसर्गिक म्हणावी अशीच होती. जीएमओ तयार करताना डोळसपणा अधिक आहे. पुन्हा मार्ग तोच, शेवट तोच. पण पद्धत मात्र अनैसर्गिक वाटते कारण आपण प्रत्यक्ष जनुकांची पुस्तकं उघडून, ती वाचून त्यातली पानं निवडण्याचा अधिकार आपल्या हातात घेतो. हे अनेकांना निसर्गाच्या किंवा पर्यायाने देवाच्या अखत्यारीत ढवळाढवळ करण्यासारखं वाटतं.

एकंदरीत देवाच्या अखत्यारीतल्या गोष्टींमध्ये मानवाने ढवळाढवळ करणं याला कायमच विरोध होत आलेला आहे. पोप फ्रान्सिसने नुकतंच इन व्हिट्रो फर्टिलायझेशनबाबत विधान केलं "वैज्ञानिक प्रगतीतून मूल निर्माण करून त्याकडे देवाची देणगी म्हणून पाहाण्याऐवजी आपण एक अधिकार म्हणून पाहातो आहोत.... हे सर्वनिर्मात्या देवाविरुद्ध पाप आहे". गंमत अशी आहे की १९७८ साली जेव्हा पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली तेव्हाच्या कार्डिनल आल्बिनो लुचियानीने - नंतर लवकरच जो पोप जॉन पॉल १ झाला त्याने - 'त्या बिचाऱ्या आईवडिलांना फक्त एक मूल हवं होतं' अशा समजूतदार शब्दात त्या घटनेची बोळवण केली होती. पण टेस्ट ट्यूब बेबी म्हणा, क्लोनिंग म्हणा किंवा जीएमओ पिकं म्हणा - हे काहीतरी अनैसर्गिक प्रकरण आहे अशी अनेकांची संभावना होते. अशा अनैसर्गिक, मानवी ढवळाढवळीच्या कृतींना विकृती म्हणणं, आणि त्यातून काहीतरी राक्षसी तयार होईल अशी भीती बाळगणंही दिसून येतं. प्रत्यक्षात नैसर्गिक प्रक्रियांना समजावून घेऊन त्यातल्या काही प्रयोगशाळेत घडवून आणणं हेच या सर्वांत अंतर्भूत आहे.

म्हणून जीएमओ सरसकट चांगलंच का? अर्थातच नाही. जीएमओ तंत्रज्ञानाचा फायदा असा आहे की जनुकांचं आरोपण करताना ते दोन जीव सारख्याच जातीचे असले पाहिजेत अशी अडचण नाही. म्हणजे भातावर पडणाऱ्या एखाद्या कीडीचा प्रतिबंध करणारे रेणू तयार करणारं जनुक जर डासांमध्ये सापडलं तर ते तिथून उचलून भाताच्या गुणसूत्रांमध्ये बसवता येतं. यातून तयार होणारे जीव हे संपूर्णपणे नवीन, आत्तापर्यंत न दिसलेले असतात. याचा अर्थ असा नाही की माणसाला खाणारा भात तयार होईल. तो भात हा भातच असतो, फक्त त्या किडीच्या बाबतीत त्याची प्रतिकारशक्ती अधिक असते. या प्रचंड क्षमतेपोटी जनमानसात एकंदरीतच जीएमओ या प्रकाराबद्दल धास्ती आहे. विशिष्ट प्रमाणात ती योग्यही आहे. तयार होणाऱ्या धान्यात काही अनपेक्षित मारक घटक तर नाहीत ना, याची मोठ्या प्रमाणावर खात्री करून घ्यावी लागते. आणि यासाठी काही चांगल्या चाचण्या असतात, त्या केल्याही जातात. पण कुठच्याच चाचणीबाबत शंभर टक्के खात्री नसते. कदाचित पंचवीस वर्षांनी काहीतरी वाईट परिणाम दिसला तर? या भीतीला उत्तर देणं कठीण असतं.

मात्र सध्या 'जीएमओ वाइट' विरुद्ध 'जीएमओ उत्तम' असे दोन तट पडलेले दिसतात. त्यात पहिल्या गटातले अनेक लोक असे असतात ज्यांचा जीएमओला नैतिक दृष्टिकोनातून विरोध असतो, किंवा जो विरोध असतो त्यात 'आपण निसर्गाच्या मामल्यात ढवळाढवळ करतो आहोत, अशी ढवळाढवळ करणं धोकादायक आहे.' हा एक घटक असतो. हा संपूर्णपणे पायाहीन आहे. कारण केवळ ढवळाढवळ केल्यामुळे निसर्गाचा कोप वगैरे होत नाही. तसं असतं तर 'वस्तू गुरुत्वाकर्षणाने खाली येतात' या नियमाविरुद्ध वर जाणाऱ्या लिफ्ट वापरणंही धोकादायक ठरलं असतं. निसर्ग अमुक करा अमुक करू नका असं सांगत नाही. निसर्ग केवळ असतो. त्यातून नैसर्गिक प्रक्रियांनी काही पदार्थ, जीव तयार होतात. त्यातल्याच काही प्रक्रिया नियंत्रित करून अधिक सुयोग्य जीव आपण निर्माण करू शकतो. कुठच्याही तंत्रज्ञानाप्रमाणे आपण ते कुठच्या हेतूने आणि किती काळजीपूर्वक वापरतो त्यावरून त्यातून तयार होणाऱ्या गोष्टी साधक किंवा बाधक ठरतात. त्यामुळे सरसकट 'जीएमओ वाईट' असं म्हणणं आततायी ठरतं.

मी मराठी लाइव्हमध्ये पूर्वप्रकाशित

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

Smile

मागच्या लेखातच १३० दाण्यांमधून काय उगवून येणार याची कल्पना आली होती; पण पुन्हा तोच वाद नको म्हणून प्रतिसाद स्वसंपादित केला होता.
असो. मुख्य भीतीचा उल्लेख नेहमीप्रमाणे टाळला आहे पण जाऊद्या; फार कंटाळा आला आहे.

ही निव्वळ तोंडओळख आहे. इ = एमसी स्क्वेअर या सूत्रातून अणुकेंद्रकातून ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे एवढंच सांगणं आहे इथे. त्या तंत्रज्ञानातून अणुभट्ट्या निर्माण करून अमर्याद ऊर्जा मिळवता येते, तसाच अणुबॉंबही करता येतो. पण हे पुढचे मुद्दे झाले.

जीएमओ अन्न सुरक्षित आहे का? is gmo safe असा प्रश्न गूगलला विचारल्यावर मला लेखांची यादी मिळाली. यातले बहुतांश लेख 'जीएमओ सुरक्षित आहे' असं ठासून सांगतात. हा लेख एक केस स्टडी मांडतो - पंधरा वर्षं हवाईयन पपई लोकांनी खाल्ली, तीन देशांतल्या सरकारी संस्थांनी वेगवेगळे प्रयोग करून सुरक्षितता तपासून पाहिली तरीही ती 'जीएमओ' आहे म्हणून जीएमओविरोधी कार्यकर्त्यांनी त्याविरुद्ध कशी ओरड केली हे दाखवून देतो.

असो. सुरक्षिततेविषयी चर्चा करता येईलच. पण त्याआधी किती जीएमओ खाद्य किती लोकांनी खाल्लेलं आहे आणि त्यातून किती वाईट परिणाम दिसून आलेले आहेत हे तपासून पाहाणं महत्त्वाचं आहे.

जीएमोवरील आक्षेप फक्त सुरक्षेच्या बाबतीत आहेत असं तुम्हाला खरंच वाटतं का? पाणी व्यवस्थापन, आर्थिक भार, त्यामुळे जैवविविधता नष्ट होणं, त्यामुळे जमिनींच्या कसावर होणारा परिणाम आदी अनेक मुद्दे यात आहेतच, त्याहून महत्त्वाचा नैतिक मुद्दा अन्न उत्पादनावर एखाद्या कंपनीचा 'प्रताधिकार' असण्यावर आहे. (या सगळ्याचा तुमच्यी लेखमालेशी थेट संबंध नाही. प या पिकांना नक्की विरोध कशामुळे होतोय यात या कारणंचे त्याचे उल्लेखही नसावेत हे दुर्दैवी आहे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुख्य भीतीचा उल्लेख नेहमीप्रमाणे टाळला आहे पण जाऊद्या; फार कंटाळा आला आहे.

+१००

त्यात पहिल्या गटातले अनेक लोक असे असतात ज्यांचा जीएमओला नैतिक दृष्टिकोनातून विरोध असतो, किंवा जो विरोध असतो त्यात 'आपण निसर्गाच्या मामल्यात ढवळाढवळ करतो आहोत, अशी ढवळाढवळ करणं धोकादायक आहे.' हा एक घटक असतो.

यात केवळ 'सोप्या' विरोधकांचा काय तो प्रतिवाद केला आहे. आणि असेच विरोधक बहुसंख्य असल्याचे भासवले आहे (तसा थेट दावाही नाही).
असो.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जीएमओ बद्दल भीती वगैरे अजिबात वाटत नाही. उलट जास्तं विटामिन असलेलं केळं शास्त्रज्ञांनी तयार केलं वगैरे बातम्या वाचून हे आपल्याला कधी मिळणार असं वाटतं.
सध्या काही केसेसमध्ये जी बियाणं आपण अमुक कीडीपासून संरक्षण देऊ अशी जाहिरात करतात त्याच कीडीला बळी पडतायत अस दिसतय. सध्याचा आरडाओरडा हा जीएमो चांगल का वाईट हा प्रश्न नसून जीएमओ नावाखाली होणारी फसवाफसवी हा आहे.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

'या तंत्रज्ञानाचे तोटे मांडलेले नाहीत' असा आक्षेप ऋषिकेश आणि नगरीनिरंजन यांनी घेतलेला आहे. तो बऱ्यापैकी रास्त आहे. कारण या लेखाचं स्वरूपच मर्यादित आहे. तंत्रज्ञान म्हणून नवीन संकरित जाती निर्माण करण्याची आधीची पद्धत आणि आधुनिक पद्धत यात काय फरक आहे याची तोंडओळख व्हावी हाच हेतू आहे. मला वाटतं आक्षेप काय आहेत हे सांगण्यासाठी एक नवीन लेख यावा. वर घेतलेले आक्षेप आणि त्यांचे तपशील, त्याबद्दलची दोन्ही बाजूंची मतं व या तंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या नव्या शक्यता व मर्यादा यावर त्यात चर्चा असावी. पण तूर्तास मी फक्त त्यांची नोंद करतो.

१. जीएमओ अन्न खाण्यासाठी सुरक्षित नाही - मला वाटतं हा आक्षेप निकालात निघतो आहे. आत्तापर्यंत कोट्यवधी गुरांनी, डुकरांनी आणि माणसांनी जीएमओ अन्न खाल्लेलं आहे. त्याचे वाईट परिणाम पुरेसे दिसत नाहीत. मात्र तरीही त्यांना फ्रॅंकेनफूड म्हणून संभावलं जातं आणि अनेकांच्या मनात तशी प्रतिमा आहे.

२. जीएमओ बियाणांवर प्रताधिकार असतो - अर्थातच. जीएमओ बियाणांचा दर्जा वेगवेगळ्या कारणांसाठी अधिक चांगला असतो असं शेतकऱ्यांचं मत पडतं. जास्त उत्पादन, कीटकनाशकांच्या वापराची गरज कमी पडणं, विशिष्ट परिस्थितीला तोंड देऊ शकणारी पिकं या सगळ्यापोटी शेतकऱ्यांना त्या बियाणांसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. अनेक शेतकरी ते आपणहून मोजतात, बिनजीएमओ पर्याय उपलब्ध असूनही. या विषयी एक सुंदर लेख वाचण्यात आला.

३. जीएमओ पिकांना अधिक पाणी लागतं - याबाबतीत मला पुरेशी माहिती नाही. दर एकरी जास्त पाणी लागतं की दर टनाला जास्त पाणी लागतं? याबद्दलचे काही अभ्यास कोणी मला देऊ शकेल काय?

४. जीएमओ पिकांमुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होतो - एकाच प्रकारचं पीक लावलं तर जैववैविध्य कमी होतं असं म्हणणं आहे, एवढंच मला माहीत आहे. पण तो परिणाम आणि जगभर आयआर८ ची लागवड केल्याने जो परिणाम झाला तसाच, की आणखीन वेगळा काही?

५. शेजारच्या शेतांतली पिकं बिघडतात - हेही ऐकलेलं आहे, मात्र त्याचा परिणाम किती गंभीर हे मला निश्चित माहीत नाही. इथे मला मदत लागेल थोडी.

६. इतर काही?