शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी...

लग्नमांडवातील गर्दी. बर्‍याच दिवसांनी नातेवाईक एकत्र भेटल्याने एकमेकांशी बोलण्यात, विचारपूस करण्यात सारेच गर्क. तेवढ्यात गोरेपान-उंच-टक्कल पडलेले एक गृहस्थ(!) पुढ्यात येऊन उभे राहिले. ‘काय ग, तू --- ना? कुणाकडून? मुलीकडून? मी मुलाकडून!’ आपल्याला अगं-तुगं करणारा कोण हा आगाऊ प्राणी? जरा वैतागूनच बघितलं. काही क्षण ओळखण्यात गेले. आणि नंतर मी अवाक! ‘अरे तू ---? तुझे केस कुठे गेले?’

त्यानंतर, आपण कुठे-कोणत्या समारंभासाठी आलो आहोत हे विसरून आम्ही दोघं शाळेत कधी जाऊन पोचलो ते कळलंच नाही. आठवणींची उजळणी सुरू झाली. जाणवलं, दहावीचा निकाल लागल्यानंतर गेल्या अनेक वर्षांत कुणाचा आता-पताही फारसा माहिती नाही! अगदी ‘नापता’ अवस्था!

वयवर्ष वीस ते चाळीस ह्या काळात आपण प्रत्येक जण आपापल्या जीवनमार्गात खूप गुरफटून गेलेलो असतो. मागचे सगळे कितीही आवडीचे, हवेहवेसे असले तरीही ते मागेच रहाते. आपलं बदललेलं अनुभविश्व-भावविश्व ह्यात आपण रममाण होतो. दु:खात गुरफटून जातो किंवा सुखात जगाला विसरतो. चाळीशीला खर्‍या अर्थाने जगायला सुरूवात झाल्यानंतर मनात प्रश्न उगवू लागतात. ‘कुठे होतो?’, ‘कुठे आलो?’, ‘कुठून आलो?’ ह्यात सर्वांत पहिल्यांदा आठवते शाळा...
असं का होतं? खरं म्हणजे आपल्यासाठी शाळेची निवड आपल्या आई-वडिलांनी त्यांच्या सोयीनुसार केलेली असते. सुट्ट्या वगळता दिवसांतील फक्त पाच-सहा तासच आपण शाळेत असतो अन तेही फक्त बाराच वर्षे! आणि तरीही गंमत म्हणजे तोच कालखंड आयुष्यभरासाठीचा आनंदाचा ठेवा बनतो. ही काय जादू असते? अगदी लहान वयात सर्वस्वी अनोळखी दुनियेत पहिलं पाऊल टाकण्याची सुरक्षित जागा म्हणजे शाळा! कुतुहलांनी भरलेली आपली निरागस-निष्कपट मनं-नजर ह्या नव्या दुनियेतील प्रत्येक गोष्ट आसुसून टिपत असते. आवडलेल्या गोष्टींचा सहजी स्वीकार आणि नावडत्याला थेट नकार ही ह्या वयातील खासियत! त्यामुळे सहज जुळलेली ती मैत्री-खेळ, ते राग-लोभ, ती भांडणे, ते रुसवे-फुगवे... त्या नकळत्या वयातील उत्स्फूर्तता, अवखळपणा आणि मुखवटे चढवण्यापूर्वीचे खरेखुरे चेहरे... सर्वकाही हवेहवेसे! नव्हे, तेच तर त्या वयातील जगणे!

गिरगावातील अनेक वाड्यांपैकी एक वाडी - कांदेवाडी! कांदेवाडीतील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल, शंभरहून जास्त वर्षांची, हजारो विद्यार्थ्यांना आपलीशी असलेली आमची शाळा! रविवार असूनही त्यादिवशी सकाळी दहा वाजता शाळेचा मुख्य दरवाजा उघडला. शाळेत रंगीबेरंगी पोशाखातील, पंचेचाळीशीतील ‘मुला-मुलींची’ गजबज सुरू झाली. इतक्या वर्षांनंतरही शाळेत शिरल्यावर ‘कोणत्या जिन्याने वरती जावं? मुलांच्या की मुलींच्या?’ एक प्रश्न मनात डोकावलाच. पहिल्या मजल्यावरील आमच्या ‘दहावी क’च्या वर्गात गेल्यावर तर सगळ्यांच्याच आनंदाला उधाण आलं. मुलांनी आठवणीने मुलींसाठी मागवलेले गजरे, सर्वांसाठी सरबत-पेढे ह्यांची देवाण-घेवाण करता-करता एकीकडे ‘ओळख पाहू!’ ‘बाप रे! तू!’ ‘मी ओळखलंच नाही! किती बदलला(ली) आहेस!’ अशा उद्गारांनी, हास्यलकेरींनी वातावरण फुलू लागलं. आता प्रेमाने मुलांकडून गजरा घेणार्‍या आम्ही मुली! शाळेत शिकत असताना जर त्याने असा गजरा किंवा गुलाबाचं फूल दिलं असतं तर तेव्हा आम्ही नक्की काय बरं केलं असतं?

काहींनी सहजतेने तर काहींनी थोडं प्रयत्नपूर्वक तिथल्या बाकांवर स्वत:ला ‘बसवून’ घेतलं आणि मग ‘ओळख-परेड’ सुरू झाली, कारण काहीजणांना ओळखणं खरंच अवघड झालं होतं. मुलग्यांचे दाढी-मिश्यांचे चेहरे, वाढलेली उंची, डोक्यावरून उडालेली छपरे, सुटलेली पोटे-देह. मुलींच्या दोन वेण्या जाऊन केसांचे बॉब-स्टेप कट्स, एक शेपटा-पोनीटेल आणि अर्थातच बदललेले देहाकार! प्रत्येकाने आपले नाव सांगणे अपरिहार्य होते आणि मुलींनी तर माहेर-सासर अशी दोन्ही नावे सांगणे! शिक्षण-व्यवसाय-नोकरी, बायको-नवरा-मुले, रहाण्याचं ठिकाण ही माहिती सांगता-ऐकताना एकीकडे जुन्या आठवणींना उजाळा देत पुनर्भेटीचा कार्यक्रम रंगतदार झाला. संगणीकरणाचा थेट फायदा म्हणजे परदेशी असलेले आमचे काही मित्र-मैत्रीणी त्यादिवशी ठरवून ऑनलाईन आले. त्यांच्याशी एकत्रितपणे सगळ्यांच्या थेट गप्पा झाल्या. जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेतल्या सर्वांत आवडत्या जागा फिरून आलो. खेळाच्या तासांना, मधल्या सुट्टीत जिथे मनसोक्त हुंदडलो, एन.सी.सी. च्या कवायती केल्या, त्या जागा म्हणजे पुढचं-मागचं अंगण, तिसर्‍या-चौथ्या मजल्यावरील दोन्ही गच्च्या, वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षिस-समारंभ जिथे होतात तो वागळे हॉल, सगळं जिथल्या तिथे! परंतु मागच्या अंगणातील बकुळीचे झाड गायब झालेले. एकदम धक्काच बसला! सकाळची शाळा असताना फुले गोळा करण्यासाठी लवकरात लवकर शाळेत पोचणे, थोडा जरी उशीर झाला आणि दुसरीच्या हातात जास्त फुले बघितली की वाटलेली हळहळ, फुले झाडावरून पडण्यासाठी त्याची फांदी हलवावी म्हणून शिपाई-बंधूंना लावलेली लाडी-गोडी आणि फुले पडली की ती वेचण्याकरता झालेली पळापळ! सारं काही एका क्षणात डोळ्यापुढून सरकलं आणि लक्षात आलं, समोरचं काहीच दिसेनासं झालं आहे, डोळे पाण्याने डबडबले आहेत!

शिशुवर्ग-प्राथमिक शाळा संपवून हायस्कूलमध्ये गेल्यानंतर आवड-निवड तयार होऊ लागली. शिक्षकांच्यातील वेगळेपण जाणवू लागलं. त्यांचं साधेपण, शिकवतानाच्या सवयी-लकबी, रंग-रूप. प्रत्येकाच्या निरनिराळ्या त~हा! त्यानुसार त्यांना खास नावे ठेवणे, त्यांची नक्कल करणे, त्यांना उगीचच शंका विचारून भंडावणे.आता इतक्या अठ्ठावीस वर्षांनी सर्वांना नव्याने भेटताना लक्षात आले की ते सगळे आजही मनाच्या तळाशी अगदी जस्सेच्या तस्से अलगद जपले गेले आहे, आपोआप!

कालांतराने मुलगे-मुली ह्यात जरासं अंतर पडू लागलं. मुली-मुलांनी एकमेकांशी आपणहून न बोलणे, अगदीच गरज भासली तर आडनावांनी (नावाने नव्हे!) बोलावणे, लंगडी-कबड्डीसारखे खेळ खेळताना एकमेकांवर कुरघोडी करणे, इ. त्याचप्रमाणे आपापसात गटबाजीला सुरुवात झाली. एकमेकांसाठी शेजारची जागा राखून ठेवणे, त्या जागेवर दुसर्‍या कुणाला बसू न देणे असे आमने-सामने खटकेही उडू लागले.शिवाय आमच्या शाळेतील ‘क’ वर्ग हा नेहमीच ‘अ’, ‘ब’, ‘ड’, ‘ई’ ह्या इतर वर्गांतील मुला-मुलींच्या असूयेचा विषय! त्याला आम्हां ‘क’ वर्गातील मुलांचा नाईलाज होता. कारण शाळेचा नियमच होता. त्या-त्या इयत्तेतील सर्वांत जास्त हुशार मुलांना, मार्कांच्या टक्केवारीनुसार ‘क’ तुकडी मिळत असे. त्यामुळे इतर वर्गातील मुले संधी साधून आम्हांला ‘शी’ (इंग्रजी सी) तुकडी असं चिडवत असत.त्या दिवशी हे सगळे कायमचे लुप्त होऊन गेलेले! ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील मुला-मुलींची सरमिसळ झाली. तेव्हाचे जुने गट आणि आताचे उच्च शिक्षण-श्रेष्ठ-कनिष्ठ दर्जा विसरून सगळेजण खुल्या दिलाने भेटले. मुला-मुलींनी एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारणे, वेळप्रसंगी हातावर टाळी देणे... बाप रे बाप! इतक्या वर्षांनी भेटल्यानंतर जाणवलेला केवढा मोठ्ठा बदल! चाळीस वर्षांपूर्वीची, तेव्हाची, ती निरागस ‘मुलं-मुली’ अजूनही आपल्यात जशीच्या तशी दडलेली आहेत ह्याचा साक्षात्कार घडला, अत्यानंद झाला. जे मित्र-मैत्रीणी अकाली काळाच्या पडद्याआड गेले, त्यांना श्रध्दांजली वाहिली. जी मुलं परिस्थितीवशात आपल्यात येऊ शकली नाहीत त्यांचीही आठवण आली. त्यातील काहींची पडझड शाळा संपतानाच्या वर्षांत सुरू झाल्याचं तेव्हा समजत होतं. पण भितीने त्यांच्यापासून आम्ही मुली लांबच होतो. आता मात्र त्यांची अवस्था ऐकून चांगल्याच हळहळलो, आपल्या हुशार, चांगल्या घरातील मित्रांची अशी दुरवस्था का झाली? त्याला कोण जबाबदार होतं? तेव्हाच आपण मैत्रीचा हात पुढे करून त्यांना सावरू शकलो असतो तर?

आता गिरगावही खूप बदललं आहे. जुन्या चाळींच्या जागी टोलेजंग इमारती दिसू लागल्या आहेत. पण शाळेविषयी वाटणारं प्रेम आज अठ्ठावीस वर्षांनंतरही मनात जपून ठेवलेलं आहे. चित्तवृत्तींना उजाळा देत रहाण्यासाठी सर्वांनी अधून-मधून एकत्र जमायचं, नव्याने मैत्री सुरू करायची असं आम्ही ठरवलं. इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच भेटताना करावी लागलेली फोनाफोनी, निरोपनिरोपी, जमवाजमवी-ठरवाठरवी आता काहीशी सोपी झाली आहे. संगणकामुळे, ईमेल्समुळे, फेसबुकसारख्या जाळ्यामुळे एकावेळी अनेक जणांशी झटपट आणि थेट संपर्क साधणंही सोपं झालं आहे.

शाळेच्या वास्तूत दुसरे घर समजून वावरलो. जीवनमूल्ये शिकलो. तिथेच आयुष्यातील पहिले सवंगडी भेटले. पुढच्या जीवनाचा भरभक्कम पाया घातला गेला. कधीच परत न येणारे ते दिवस भुर्रकन उडून गेले. परंतु नवीन आव्हाने पेलताना, हताश-निराश क्षणांना धैर्याने सामोरे जाताना, मनातील ताजेपणा टिकवून ठेवण्यास मदत होते त्या शाळकरी-मयूरपंखी दिवसांची, त्या अलवार आठवणींची!

इन्फर्मेशन टेक्नोलॉजीच्या क्षेत्रातील CIO100 हा अव्वल दर्जाचा, मानाचा पुरस्कार एका प्रथितयश कंपनीत CIO पदावर काम करणार्‍या आमच्या वर्गमित्राला मिळाल्याची आनंदाची बातमी समजली. पुरस्कार स्वीकारतानाचा त्याचा फोटो आणि पार्श्वभूमीवर त्याचं नाव झळकताना बघितल्यावर आमची सर्वांची मनं आनंदानं आणि अभिमानानं फुलून आली, सगळ्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यानिमित्ताने त्याची जी मुलाखत घेण्यात आली होती ती वाचली. त्याला विचारण्यात आलं होतं, ‘आजचा हा क्षण तुम्हांला कोणासोबत वाटायला आवडेल?’ तो उत्तरला, ‘माझ्या शाळेतील बालमित्रांसोबत......!’ आयुष्यातील अत्त्युच्च आनंदाच्या क्षणाला आपल्या वर्गमित्रांची आठवण येणं ह्यासारखं भाग्य दुसरं कोणतं असू शकतं?

चित्रा राजेन्द्र जोशी

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

मागे एकदा जमेल तितक्या मित्रांना जमवून आमच्याच शाळेत गेलो होतो. आमच्या वर्गात बाकांवर बसलो आणि कित्येक क्षण कोणालाही बोलवेना! तो प्रसंग आठवून आताही हळवे व्हायला होते आहे.

आता नवी इमारत तयार आहे तेव्हा आमची ती इमारत पाडणार आहेत. 'आमची शाळा' तशीच रहाणार असली तरी आमचे वर्ग, आमची इमारत असे रे काही काळाच्या उदरात गडप होणार असा विचार येताच गलबलते. आता केवळ आठवणी असतील.. असो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अशा काही भावना अजिबातच नसणार्‍या काही मोजक्या दुर्दैवी(?) जीवांमधे मी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सहमत आहे आणि 'दुर्दैवी' या शब्दाला आक्षेप आहे. गेल्या महिन्यात आमच्या कॉलेजातल्या वर्गबंधू-भगिनींचे एक गेट-टुगेदर झाले. बहुतेक वेळ 'तो हा कुठे असतो आता, ती ही काय करते आता..' या वायफळ गप्पांत गेला. मग एकमेकांना फोन नंबर, मेल अ‍ॅड्रेसेस देणे, फेसबुकवर आहेस का तू वगैरे फालतूगिरी सुरु झाली. इतका जबरदस्त कंटाळा आला की ज्याचे नाव ते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

सहमत आहे, पण येथे दोष सर्वस्वी आपला (द्वितीयपुरुषी सकृद्दर्शनी आदरार्थी अनेकवचनी) आहे.

गेलात कशाला? सांगितले कोणी होते जायला? तरीही गेलात, तर मग भोगलीत आपल्या कर्माची फळे, अजून काय? एका अर्थी बरेच झाले; पुन्हा अशी चूक तरी करणार नाहीत. (बहुधा. कारण Some people never learn असे कोणीसेसे म्हटलेलेच आहे. त्यांपैकी आपण - द्वि.पु. इ.इ. - नसलात, तर उत्तम. अर्थात असलात तरीही त्याने आपल्याला - प्रथमपुरुषी आदरार्थी एकवचनी - काय फरक पडतो म्हणा! पसंद अपनी अपनी (पुरुष, वचन वगैरेंबद्दल साशंक), वगैरे वगैरे.).

आपण (प्र.पु. आदरार्थी इ.इ.) तर बुवा आपल्या (पुन्हा प्र.पु. आदरार्थी इ.इ.) कॉलेजच्या अलम्नाय असोशिएशनशी (अशी काहीतरी भानगड अस्तित्वात असते, असे ऐकून आहे. जशी मुळात कॉलेज म्हणून काही भानगड अस्तित्वात होती, आणि त्या भानगडीशी आमचे नाव जोडलेले होते, असेही कधीकाळी ऐकून होतो, तसेच.) किंवा तत्सम बाबींशी काही संबंध ठेवण्याच्या भानगडीत कधी पडलेलो नाही बुवा. साधी गोष्ट आहे. वर्गबंधूंपैकी काय किंवा पूर्वसहकर्मींपैकी काय, ज्या मोजक्यांशी पुढेमागे संबंध टिकवावा वाटला, त्यांच्याशी तसाही चांगला संपर्क आहे. आणि तो वर्गबंधू (किंवा एकेकाळचे सहकर्मी) म्हणून नाही, तर चांगले मित्र म्हणून. कर्मधर्मसंयोगाने त्यांपैकीही बहुतजण पुढेमागे कधी हाकेच्या अंतरावर नाहीतर कधी पंचक्रोशीत येऊन टपकल्यामुळे जाणेयेणेसुद्धा असते. ज्यांच्याशी संपर्क राहिला नाही, त्यांच्याशी तो तसाही कधी खास टिकवावासा वाटला नाही, म्हणून आपसूकच तुटला (क्वचित तोडलासुद्धा), आणि अशांपैकी (क्वचित एखाददुसरा अपवाद सोडला तर) बहुतेकांशी आवर्जून पुन्हा संबंध जुळवण्यात फारसा रस नाही. (नाहीतर मुळात टिकवला नसता का?) किंवा, कदाचित मागे वळून पाहिले असता अशांपैकी बहुतेकांशी संबंध राहिला नाही आणि आज त्यांचेआपले रस्ते एकमेकांना काटत नाहीत ही इष्टापत्तीच वाटते, म्हणा ना! (च्या*चे काय एकएक नमुने होते! टळले तेच बरे झाले. त्यामुळे मरेनात का! अर्थात ही भावना उभयपक्षी असू शकते याची कल्पना आहे, पण आम्हां काय त्याचे!)

आता हे असे सगळे असताना असल्या भानगडींत कशाला हो पडतो? आपण (पुन्हा एकदा द्वि.पु. सकृद्दर्शनी आदरार्थी अनेकवचनी) अनुभव घेऊन पस्तावलात; आम्ही मुळात हे असले काहीतरी होणारच, हेच जेथे गृहीत धरून चालतो, तेथे त्या दिशेने ढुंकूनही वळून कोठले पहायला? (तेवढा त्या 'ढुंकण्या'चा अर्थ मला कोणी सांगू शकेल काय, प्लीज? मनोहर शब्द आहे, पण (कदाचित म्हणूनच) नेमका अर्थ माहीत नाही.)

(अवांतरः बाकी, 'लिंक्डइन'वर वगैरे केवळ एक जनरीत म्हणून नाव नोंदवून ठेवायचे झाले. कालौघात त्यावर दीड-दोन डझन नावे (जळमटांसारखी) जमा होतातही, पण पुढे त्यांपैकी - ज्यांच्याशी तसाही संपर्क आहे असे सोडल्यास - एकाशीही संपर्क होत असेल तर शपथ. कारणही नसते, गरजही नसते, आणि बहुतांश वेळा खराखुरा रसही (उभयपक्षी) नसतो. उगाच आपले 'कोण जाणे पुढेमागे कधीतरी कोणीतरी उपयोगी पडेल' अशी म्हणा किंवा 'आपल्याला जगात इतकेइतके लोक माहीत आहेत' अशी म्हणा, पण स्वतःचीच खुळचट समजूत करून घेण्यासाठी करायचे उद्योग, झाले! अनेकदा तर महिनोन् महिने त्या 'लिंक्ड-इन'कडे ढुंकूनही - पुन्हा ढुंकून! - पाहिले जात नाही. बाकी त्या 'फेसबुका'वर वगैरे आपला - प्र.पु. इ.इ. - विश्वास नाही.)

(अतिअवांतरः 'जळमटां'वरून आठवले. अशी जळमटांसारखी - किंवा खरे तर कोळिष्टकांसारखी - नावे गोळा होतात, म्हणून तर त्याला 'नेटवर्किंग' असे संबोधत नसावेत ना?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अदिती आणि सन्जोप रावांशी सहमत
हे रीयुनियन प्रकरण म्हणजे चमत्कारिक असतं
माझ्या शाळेच गेट टुगेदर झाल तेव्हा मला फारच कंटाळा आला.
पहिल्या अर्ध्या तास बरा गेला नंतर फेसबुक वगैरे सुरु झालं. तसही मला माझ्या शाळेबद्दल फारस ममत्व नाही. शाळेत असतानाच मैत्रिणी वगैरेपासून फटकून असल्याने जिव्हाळा वगैरे प्रश्न नव्हता. इंग्रजी वगळता सर्व टीचर्स आणि माझ्यात पहिल्यापासूनच जनरेशन गँप असल्याने त्या आघाडीवर सर्व सामसूम.
शेवटी संपल तेव्हा सुटकेचा निश्वास सोडला

काँलेजच्या रीयुनियला मात्र धमाल आली होती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

वरच्या प्रतिक्रीया रोचक वाटल्या. यामागे काय कारण असावं? असं वाटलं. की शाळेविषयी ममत्व न उरणं हा नियम असून आम्ही अपवाद आहोत?
याची काहि कारणं मला अशी वाटतातः
-- माझ्यावर्गात वर्गसंख्या कमी होती. केवळ २० मुलगे व २५ मुली. त्यामुळे फार ग्रुपिझम न झाल्याने वैयक्तीक बाँडिंग अधिक झाले असेल?
-- शाळा को-एड होती. केवळ मुलांच्या अथवा मुलींच्या शाळेत अधिक कंटाळा येत असेल का?
-- शाळेला विस्तीर्ण पटांगण होते, शिकणे आवडेल असे शिकवणारे शिक्षकगणही (शिल्लक) होते, पटांगणाच्या बाहेर शेताडी, माळरान होते जिथे टाईमपास करण्याच्या पद्धतीतील सृजनशीलता वाढीस लागत असे, अख्ख्या उपनगरात आमच्या इतकी जुनी-मोठी-प्रसिद्ध वगैरे शाळा अन्य नसल्याने शाळेबद्दल अभिमानसदृश गर्व होता या व अश्या कारणाने शाळा अधिक आवडत असेल का?
-- मित्रांशी संपर्क माझाही फारसा नाही. -गेल्या दशकात एखाद-दोनदा भेटलो असु- किंबहुना म्हणूनच शाळेच्या आठवणी अजूनही हृद्य असतील का? Wink

ज्यांना शाळेविषयी ममत्त्व राहिले नाहि - अथवा तितके राहिलेले नाही - त्यांची कारणे ऐकायला आवडतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वरच्या प्रतिक्रीया रोचक वाटल्या. यामागे काय कारण असावं? असं वाटलं. की शाळेविषयी ममत्व न उरणं हा नियम असून आम्ही अपवाद आहोत?

काहींना शाळेविषयी ममत्व असते, काहींना नसते. बस.

'नियम', 'अपवाद' वगैरेंच्या चौकटीत हे बसवायलाच हवे का? आपल्याला तर बुवा ते 'नॉर्मल', झालेच तर 'स्ट्रेट', वगैरे शब्दच पसंत नाहीत. कारण 'नियम' ठरवला, की कोणालातरी 'अपवाद' ठरवावेच लागते. 'नॉर्म' बनवला, की कोणीतरी 'अबनॉर्मल' बनतेच. त्यापेक्षा त्या भानगडीत पडायचेच कशाला? दुसर्‍या प्रकारचेही लोक असतात, एवढे समजून चालले म्हणजे झाले.

किंवा त्या भानगडीत पडायचेच झाले, तर 'दीवाना मुझ को लोग कहे, मैं समझूं जग है दीवाना' हे समजून चालावे. मामला खतम. हाय काय नि नाय काय!

शाळेविषयी ममत्व न उरणं... ज्यांना शाळेविषयी ममत्त्व राहिले नाहि...

'उरणे', राहणे' वगैरे शब्दांना तीव्र आक्षेप! यात 'मुळात ममत्त्व होते' हे गृहीतक आहे. असे गृहीत धरले जाणे मुळीच आवडलेले नाही, सबब तीव्र निषेध!

-- माझ्यावर्गात वर्गसंख्या कमी होती. केवळ २० मुलगे व २५ मुली. त्यामुळे फार ग्रुपिझम न झाल्याने वैयक्तीक बाँडिंग अधिक झाले असेल?

आमच्या शाळांत (एकाहून अधिक होत्या!) एका वर्गात सरासरी ५० ते ६० मुले असत. बरे मग? आमचे वैयक्तिक बाँडिंग झालेच तर एका वेळी फार फार तर एका हाताच्या बोटावर मोजता येण्याइतक्याहून कमी मुलांशी व्हायचे. आमची वॅलेन्सीच (मराठीतः संयुजा.) तेवढी, त्याला काय करणार? पण याचा वर्गाच्या लोकसंख्येशी काय संबंध?

-- शाळा को-एड होती. केवळ मुलांच्या अथवा मुलींच्या शाळेत अधिक कंटाळा येत असेल का?

हो आमच्या दोन्ही शाळा फक्त मुलांच्या होत्या. बरे मग? त्याने कंटाळा का यावा? आणि त्याचा ममत्वाशी काय संबंध? आमची कॉलेजे (ज्युनियर, तसेच अंडरग्रॅडही) तर कोएड होती. त्यांच्याबद्दल मग का वाटले नसावे ममत्व कधी?

-- शाळेला विस्तीर्ण पटांगण होते,

चेक. आमच्याही होते. आमच्या काळी आणि आमच्या भागात ही फारशी नवलाईची गोष्ट नव्हती. अनेक शाळांना असत.

शिकणे आवडेल असे शिकवणारे शिक्षकगणही (शिल्लक) होते

चेक. असे काही अपवाद आमच्याही वाट्याला होते. (पण त्यांच्या आठवणीने आज भडभडून वगैरे येत नाही, हेही तितकेच खरे.)

पटांगणाच्या बाहेर शेताडी, माळरान होते जिथे टाईमपास करण्याच्या पद्धतीतील सृजनशीलता वाढीस लागत असे

चेक. टाइमपास आम्हीही भरपूर केला. वर्गाबाहेरच नाही तर भर वर्गात, अगदी तास चालू असतानाही केला. नको तितक्या सृजनशीलतेसहित केला. मग? तो टाइमपास आमचा होता. त्याचा शाळेशी काय संबंध? टाइमपास करण्याचेच वय होते ते (तसे आमचे अजूनही सरलेले नाही म्हणा!), या शाळेत नसता केला तर दुसर्‍या कोठल्यातरी शाळेत केलाच असता! त्यातून शाळेबद्दल ममत्व का वाटावे?

अख्ख्या उपनगरात आमच्या इतकी जुनी-मोठी-प्रसिद्ध वगैरे शाळा अन्य नसल्याने शाळेबद्दल अभिमानसदृश गर्व होता

आमची (निदान एक तरी) शाळा लोकमान्य टिळकांनी स्थापन केली होती, मालक, काय समजलेत! पण यात आमचा काय हातभार? मग या बाबीबद्दल आम्हाला अभिमान, गर्व वगैरे नेमका काय म्हणून वाटून रहावा? किंवा केवळ या कारणास्तव ममत्व वाटावे? शंभर वर्षे होऊन गेली त्या स्थापनेला, आमच्याच तेथल्या वास्तव्यात. नाही म्हणजे, लोकमान्य होते ग्रेट, वगैरे सर्व मान्य आहे. पण आमचा नि त्यांचा असा नेमका काय संबंध आला, की आम्ही जात असलेल्या शाळेची स्थापना त्यांनी केली, म्हणून आम्हांस कृतकृत्य वाटावे? ते काय आमच्यांत ऊठबस करीत होते, की आम्हांस शिकवत होते? मग शंभर वर्षांपूर्वी आमच्या शाळेची स्थापना लोकमान्यांनी केली, की कोणा अप्रसिद्ध सोम्यागोम्याने, याने आम्हाला असा नेमका काय फरक पडावा, की जेणेकरून त्या कारणें आमच्या शाळेबद्दल आम्हांस अभिमान वाटावा, ममत्व वाटावे, वगैरे वगैरे? आमच्या लेखी ती एक घरापासून सोयिस्कर अंतरावर वसलेली शाळा होती, जीत आम्हांस प्रवेश मिळाला होता. बस. हं, आम्हांस लाभलेले काही शिक्षक आम्हांस आवडत असत, काहींबद्दल आजही आदर वाटतो, पण तो व्यक्तिगत स्वरूपाचा. त्यातून शाळेबद्दल ममत्व असे वाटत नाही, आणि शाळा लोकमान्यांनी स्थापिली होती या बाबीने त्यात भर पडण्याचा प्रश्नही उद्भवत नाही.

बरे, समजा आम्हांस आमच्या वर्गबंधूंबद्दल ममत्व वाटले जरी असते, किंवा यदाकदाचित त्या काळी तात्कालिक स्वरूपाचे असे काहीतरी वाटले जरी असले, तरी त्या काहीतरी वाटण्याचा लोकमान्यांशी - किंवा त्यांनी अठराशे ऐशीच्या इसवीत आमची शाळा स्थापन करण्याशी - तार्किक संबंध काय असावा? आम्हाला जर आमच्या वर्गबंधूंबद्दल काही तात्कालिक स्वरूपाचे वाटले असेलच, तर त्याचा संबंध आम्ही त्यांच्यासमवेत केलेल्या उपद्व्यापांशी, व्रात्यपणाशी, झालेच तर प्रसंगी त्यांच्याबरोबर देवाणघेवाण केलेल्या त्या वयास सुलभ अशा अचकटविचकट हास्यविनोदांशीही होता. लोकमान्यांचा त्या उपद्व्यापांत सहभाग थोडाच होता? की आमचे शीनियर म्हणून त्या व्रात्यपणात ते आम्हांस काही तज्ज्ञ मार्गदर्शन करत होते? मग आमच्या वर्गबंधूंबरोबरच्या आमच्या बाँडिंगचा लोकमान्यांशी - किंवा लोकमान्यांनी शाळा स्थापन करण्याशी - काय बरे संबंध?

थोडक्यात, आम्ही ममत्ववाल्या क्याटेगरीतले नाही - किंवा, काहीजण ममत्ववाल्या क्याटेगरीतले असतात, तर याउलट काहीजण ममत्ववाल्या क्याटेगरीतले नसतात - एवढे स्पष्टीकरण पुरेसे नाही काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>असं वाटलं. की शाळेविषयी ममत्व न उरणं हा नियम असून आम्ही अपवाद आहोत?

माझ्या आसपास तर नको तितकं ममत्व असणारेच फार आहेत. आप्तेष्टांसोबत पुणे-३०मध्ये जायची वेळ आली की हमखास येणारा प्रसंग म्हणजे त्यांना कुणीतरी शाळेतलं भेटतं आणि मग वर म्हटल्याप्रमाणे फुटकळ चौकशा आणि गॉसिप वगैरे.* शाळेबाबतच नव्हे, तर नॉस्टाल्जियात रमायला बर्‍याचशा लोकांना आवडतं.

शाळेबाबत ममत्व नसण्याचं माझ्यासाठी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपलं दहावी-बारावीपर्यंतचं शिक्षण अतिशय पठडीबाज आणि कंटाळवाणं आहे. बरेचसे शिक्षक सक्षम असत, तरीही परीक्षापद्धत आणि मूल्यमापन यांत पाठांतराखेरीज कशाचाही कस लागत नसे. शाळेचा निकाल १००% लावणं, अधिकाधिक मुलं चौथी-सातवीची शिष्यवृत्ती किंवा दहावीच्या गुणवत्ता यादीत झळकवणं वगैरे ध्येयांसाठी मुलांवर शाळा अपार कष्ट घेई, पण विषयाची गोडी लागणं हे त्या कष्टांमागचं ध्येय नसे अन् अर्थात तो परिणामही नसे. त्यापेक्षा अवांतर आणि गैरशिस्तीनं केलेल्या वाचनातून आवडीचे विषय खूप अधिक कळले. हेच पुढे चालू आहे हे आज शाळा-कॉलेजांमधून बाहेर पडणार्‍या मुलांशी बोलून वाटतं. सांगकाम्यासारखं न वागता (असलेलंच) डोकं चालवण्यासाठी त्यांना प्रवृत्त करून करून कंटाळा येतो. सबब असली मुलं निर्माण करणार्‍या संस्थांविषयी अजिबात ममत्व नाही.

* जाताजाता - सामाजिक अभ्यास म्हणून हे कधीकधी रोचक ठरतं - म्हणजे साठीतली आजोबामाणसं त्यांच्या वर्गातल्या कंड्या पोरींविषयीच्या गॉसिपमध्ये अजूनही बावळटसारखे रस घेतात आणि घटस्फोट किंवा बाळंतपणं किंवा तत्सम घटनांनंतर 'ति'ची कशी पार रया गेली वगैरे हळहळतात ते फार विनोदी होतं. किंवा कुणाच्यातरी शाळासोबतिणीविषयी परवाच कळलेलं गॉसिप - १९६७च्या कोयना भूकंपाच्या वेळी ती गर्भवती होती म्हणून तिचं मूल अजूनही घाबरट आहे. Smile असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

शाळेविषयीच्या ह्या सगळ्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया वाचून मनात आलं ते इतकंच... व्यक्ती तितक्या प्रकृती!
चांगले-वाईट असे कोणतेच लेबलिंग करावेसे वाटले नाही. प्रत्येकजण वेगळा-कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी आणि अर्थातच मनापासून अथवा नाईलाजाने जावे लागलेल्या शाळेविषयीचे अनुभवही वेगळेच!
त्यात चूक-बरोबर ठरवणारे आपण कोण? जसा ज्याचा-त्याचा अनुभव तशा ज्याच्या-त्याच्या प्रतिक्रिया!
मनापासून... आतून... भरभरुन अन प्रामाणिकपणे आलेल्या!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0