नैसर्गिक शेती - भाग ८

नैसर्गिक शेती हा शब्दप्रयोग अलिकडे बराच ऐकण्यात-वाचण्यात येतो. ही नेमकी काय भानगड आहे, आणि त्यातल्या तज्ञ म्हणवणाऱ्या लोकांनीही त्यात कसे वैचारिक गोंधळ घालून ठेवले आहेत, त्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा या टिपणांमधून प्रयत्न करते आहे. या मालिकेतील माहिती ही बव्हंशी माझे वडील डॉ. आनंद कर्वे यांनी गेल्या साठेक वर्षांत केलेल्या कामावर आधारित आहे.
...
अनुक्रमणिका: नैसर्गिक शेती - भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८
...

आत्तापर्यंतच्या लेखांवरून नैसर्गिक शेतीत नेमके काय घडते, हे वाचकांच्या बऱ्यापैकी लक्षात आले असेल. पण नैसर्गिक शेतीचे प्रचारक म्हणून प्रसिध्द असलेले लोक याबाबत काय म्हणतात, ते पाहू या.
पश्चिम महाराष्ट्रात नैसर्गिक शेतीचा बोलबाला सुरू झाला तो श्री. मोहन देशपांडे यांच्या ऋषि-कृषि शेतीमधून. http://rishikrishi.co.in ही त्यांची वेबसाइट आहे. या वेबसाईटनुसार शेतीची ही पध्दती वैदिक ग्रंथातील माहिती आणि वैश्विक ऊर्जेचा वापर यांवर अवलंबून आहे.
देशपांडे स्वतः गणिताचे पदवीधर होते. वेबसाइटवर त्यांच्या तंत्राची सविस्तर माहिती आहे. या तंत्रामध्ये अमृतपाणी हा महत्वाचा घटक आहे. एक एकरासाठी 200 ली अमृतपाणी बनवण्यासाठी पुढील कृती दिली आहे –
देशी गाईचे शुध्द तूप 250 ग्रॅम हे देशी गाईच्या 10 किलो ताज्या शेणात मिसळावे, त्यात 500 ग्रॅम मध मिसळून हे मिश्रण सतत ढवळत ढवळत 200 ली पाण्यात मिसळावे.
अशा या अमृतपाण्याचाच केवळ शेतात वापर करायचा आहे. पेरायचे बियाणे किंवा लावायच्या रोपांची मुळे या मिश्रणात बुडवून मग पेरणी करायची, आणि बाकी कोणतीही खते (रासायनिक किंवा सेंद्रीय) वगैरे न देता केवळ असे मिश्रण वेळोवेळी शेताला द्यायचे.
माझे वडील डॉ. आनंद कर्वे यांनी या पध्दतीचा शास्त्रीय अभ्यास करायचे ठरवले. त्यांनी एका विद्यार्थ्याला अशा प्रकारे उसाची शेती करणाऱ्यांकडून माहिती गोळा करायला सांगितले. त्यांच्या लक्षात आले, की महाराष्ट्र – कर्नाटक – तेलंगणा या भागात अक्षरशः हजारो लोक या पध्दतीने शेती करत आहेत. पण त्याचबरोबर त्यांना असेही आढळले, की वेगवेगळ्या प्रांतात लोक वेगवेगळ्या नावाने अमृतपाण्यासारखीच पण काही वेगळे घटक असलेलीही मिश्रणे वापरत आहेत. बऱ्याच ठिकाणी मधाऐवजी गुळाचे पाणी वापरले जाते. यात कदाचित मधाची किंमत जास्त असण्याचाही वाटा असू शकेल. काहींनी फार काटेकोर कृती दिलेल्या आहेत. उदा. एका कृतीनुसार मिश्रण घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेच ढवळले पाहिजे, उलट्या दिशेने ढवळले तर अपेक्षित परिणाम साधत नाही, असे नमूद केले जाते! मिश्रण बनवताना कोणती संस्कृत स्रोत्रे म्हणावी, मिश्रण बनवण्यासाठी चांगला मुहुर्त कोणता, वगैरे अनेक गोष्टी वेगवेगळ्या लोकांनी नमूद केल्या आहेत. ही सर्व मिश्रणे सुचवणारे कोणत्या ना कोणत्या प्राचीन ग्रंथाचा नाहीतर ऋषिमुनींचा हवाला देतात, आणि वैश्विक ऊर्जेचा वापर करून मातीत चैतन्य निर्माण केले जात आहे, वगैरे असे दावे करतात. देशी गायीचेच शेण, तूप, दूध, इ. घेतले पाहिजे हाही बहुतेकांचा आग्रह असतो.
डॉ. आनंद कर्वे व त्यांच्या विद्यार्थ्यानी गोळा केलेल्या सर्व मिश्रणांचा आणि कृतींचा तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नातील फरकांचाही अभ्यास केल्यावर दोन गोष्टी लक्षात आल्या.
एक म्हणजे या मिश्रणांचा शेतावर अनुकूल परिणाम निश्चितच होतो आहे.
दुसरे म्हणजे या सगळ्या मिश्रणांचा जर ल.सा.वि. काढला तर तो आहे, कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील साखर.
थोडक्यात म्हणजे देशी किंवा कोणत्याही गायीचे शेण, दूध, तूप (किंवा इतर कोणत्याही जनावराचे काहीही) न घालता, नुसती साखर किंवा गुळाचे पाणी घातले तरी पुरेसे आहे. माझ्या वडिलांनी स्वतःच्या शेतात या पध्दतीने फक्त साखर वापरून (तीही कारखान्यात बनवलेली, आयुर्वेदिक गुणधर्म असलेला गूळही नाही) अमृतपाणी वगैर वापरणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणेच चांगले उत्पन्न काढले आहे. त्यासाठी त्यांनी कधीही कोणते मुहुर्त पाहिले नाहीत, किंवा स्रोत्रेही म्हटली नाहीत.
अर्थातच अमृतपाणी आणि तत्सम मिश्रणे वापरणारे शेतकरी आपल्या जमिनीतल्या जीवाणूंना पुरेसे गोडधोड खाऊ घालून सुखी ठेवत आहेत, आणि म्हणून जीवाणूंच्या कृपेने वनस्पतींना आवश्यक ती पोषणद्रव्ये आवश्यक तितक्या प्रमाणात मिळत आहेत, हे याआधीचे लेख वाचलेल्यांच्या लक्षात आले असेलच. या साध्या तत्वाला वैदिक ज्ञान, वैश्विक ऊर्जा वगैरे शब्द वापरून एक गूढतेचे वलय प्राप्त करून दिल्याने या तंत्रांचा प्रसार करणाऱ्यांना आधुनिक ऋषित्व प्राप्त झाले आहे. अलिकडेच पद्म पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे ज्यांचे नाव साऱ्यांना माहित झाले आहे, ते श्री. सुभाष पाळेकरही याच माळेतले एक मणी आहेत. अशास्त्रीय विधाने करून देशी गायीचे शेण म्हणजे जणू काही दैवी शक्ती लाभलेला पदार्थ आहे, अशी अंधश्रध्दा ही सारी मंडळी पसरवत आहेत, पण या नाट्यातले खरे नायक साखर आणि मातीतील सूक्ष्म जीव आहेत.
नैसर्गिक शेतीमागचे विज्ञान समजून घेणे महत्वाचे का आहे? कारण त्यातून आपल्या जमिनीत आपल्याला नेमके काय केले पाहिजे, हे शेतकरी आपले आपण जाणू शकतो. शेती ही स्थिती आणि स्थानसापेक्ष असते. एका ठिकाणी जो उपाय लागू पडतो, तोच सगळीकडे लागू पडेल असे नाही, पण त्यामागचे तत्व लक्षात आले, तर त्याप्रमाणे आपल्यासाठीचा पर्याय आपण शोधू शकतो. हे न झाले, तर कशी फसगत होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मासानोबू फुकुओका या जपानी नैसर्गिक शेतकऱ्याच्या अंधभक्तीचे झालेले परिणाम.
फुकुओका यांनी त्यांची नैसर्गिक शेतीची पध्दती पुस्तक लिहून प्रसिध्द केली, आणि हे पुस्तक भाषांतरित होऊन जगभर पसरले. वन स्ट्रॉ रेव्होल्युशन हे इंग्रजी भाषांतराचे नाव आहे. फुकोओकांची पध्दत काय आहे?
शेतात जेव्हा भाताचे पीक तयार होते, तेव्हा खाचरातले पाणी काढून टाकायचे, भाताच्या फक्त लोंब्या कापून काढायच्या, आणि शेतात गव्हाचे दाणे भिरकावून द्यायचे. भाताचा पेंढा वाळेपर्यंत गहू उगवून येतो. पेंढा तसाच शेतात पसरून द्यायचा. गहू तयार होऊन त्याची कापणी झाली की लगेच पुन्हा खाचरे पाण्याने भरायची, आणि भातलागण करायची. कोणतीही खते आणि तणनाशके न वापरता या पध्दतीने फुकोओका वर्षानुवर्षे शेती करत होते.
यातून लोकांनी असा अर्थ घेतला, की शेतातले तण काढायचे नाही, का तर त्याचेच खत होणार आहे. या तत्वामागे लागून पुष्कळ शेतकऱ्यांनी आपले हात पोळून घेतले.
मुळात आपल्याकडे भात आणि गहू ही पिके एकाच शेतात घेतली जात नाहीत. त्यामुळे फुकोओका जे करत होते, त्यातून नेमके काय घडते आहे, हे समजून घेणे महत्वाचे होते. भाताच्या पेंढ्यातून मातीतल्या जीवाणूंना थोडेफार पोषण मिळत असेल, पण हा पेंढा शेतातच कुजून त्यातली पोषणमूल्ये तिथेच रहात होती. म्हणजे हा भाग बराचसा सेंद्रीय शेतीसारखा होता.
पण फुकोओकांच्या पध्दतीत आणखी एक महत्वाची गोष्ट घडत होती – त्यांची जमीन सतत आच्छादनाखाली होती. गहू शेतात उगवत असताना भाताच्या पेंढ्याचे आच्छादन होते, आणि भातशेती करताना तर जमीन पाण्याच्या आच्छादनाखाली असते. आपण ज्या धान्यांची बियाणे पेरून शेती करतो, त्या एकदल वनस्पती आहेत. ही सर्व बियाणे अंधारातही रूजून येतात. पण ज्यांना आपण तण म्हणतो, त्या सर्व द्विदल वनस्पती आहेत. या वनस्पतींच्या बीजांना सूर्यप्रकाश मिळाला तरच ती रूजून येतात. शेतात भाताची धाटे दाटपणे उभी असताना जमीन पूर्णतः आच्छादित होती. या स्थितीत गहू उगवून येऊ शकत होता, पण तणे उगवून येणे शक्य नव्हते. पेंढा वाळून विरळ होईपर्यंत गहू इतका वाढत होता की त्याची सावली आणि पेंढा यांमुळे जमिनीवरचे आच्छादन कायम रहात होते. भाताच्या पाण्याने भरलेल्या खाचरात तणे वाढण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजेच फुकोओकांच्या शेतीप्रमाणे आपण आपल्या शेतातही जमीन सतत झाकलेली कशी राहील असे पाहिले, तर आपल्यालाही तणनाशकांची गरज पडणार नाही. फुकोओकांच्या पुस्तकातून हा संदेश घेतला जाणे महत्वाचे होते. पण विज्ञान समजून न घेता केवळ कृतीचे अनुकरण करण्यामागे धावून बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला. हे अंधानुकरण किती टोकाला पोहोचले होते, याच हे एक उदाहरण. माझ्या वडिलांनी फुकोओकांच्या पध्दतीमागील वरील वैज्ञानिक सत्य विशद करणारा लेख लिहून त्यावेळच्या (1990च्या दशकातील ही गोष्ट आहे) आघाडीच्या शेतीविषयक मासिकाला पाठवला असता, फुकोओकांच्या पध्दतीचा पुरस्कार करण्याचे संपादकीय धोरण असल्यामुळे त्यांच्या पध्दतीवर टीका करणारा लेख आम्ही प्रसिध्द करणार नाही, असे उत्तर देऊन संपादकांनी तो साभार परत पाठवला होता.
थोडक्यात म्हणजे नैसर्गिक शेती वैज्ञानिक तथ्य समजून उमजून करा. त्यासाठी अशास्त्रीय दाव्यांचा आणि पुराणातल्या वानग्यांचा आधार घेण्याची काहीही गरज नाही. उलट वैज्ञानिक सत्यांकडे दुर्लक्ष करून आपण रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके, इ. च्या निर्मात्यांच्या हातात कोलित देत आहोत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

लेखमालेचा इथेच शेवट करते आहे. शेवटच्या या एका लेखाला बराच वेळ लागला, त्याबद्दल क्षमस्व. मध्येच काही महत्वाची कामे, प्रकल्पांशी संबंधित दौरे इ. आल्यामुळे एवढा खंड पडला. ज्यांनी ज्यांनी लेखांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत, आणि याही लेखावर देतील, त्या सर्वांचे आभार.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडलाच.

अमृतपाण्यामध्ये तूप मिसळून जमिनीचा/जीवाणूंचा काही फायदा होतो का? कंपोस्टात फॅट्स घालू नयेत असं जागोजागी लिहिलेलं आढळतं.

फुकुओकांच्या पद्धतीबद्दल काहीच कल्पना नव्हती. परसदारात तण वाढू नये यासाठीही ही माहिती उपयुक्त.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ज्या प्रमाणे साखरेचा उपयोग होईल तसा जीवाणूंच्या पोषणासाठी तुपाचाही उपयोग होईल. त्यासाठी ते देशी गाईचेच असण्याचीही काही गरज नाही, विदेशी गाय किंवा म्हशीच्या दुधाचे तूपही तितकेच परिणामकारक ठरेल. पण शेतजमिनीत तूप मिसळून देणे जरा अवघड आहे, साखर किंवा तत्सम पाण्यात विरघळू शकणारे पदार्थ पाण्यावाटे देणे सोपे जाते. इतर पदार्थांच्या माध्यमातून शर्करा पुरवण्यापेक्षा थेट शर्करा पुरवणे जास्त परिणामकारक ठरते, पण अर्थातच साखर काय किंवा तूप काय हे महागडे पदार्थ आहेत. आपल्याच परिसरातील कोणतीही हिरवी पाने गोळा करून त्यांचा लगदा पाण्यात मिसळून शेतात दिला तरी अपेक्षित परिणाम कमी खर्चात साधू शकतो. अर्थात परसबाग किंवा कुंड्यांसाठी साखर, तूप, इ. पर्याय वापरणे शक्य आहे.

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

लगदा म्हणजे सुका पाचोळा पाण्यात मिसळून शेतात घालायचा का? की कुजून त्याचा लगदा व्हावा लागतो? पाचोळा बारीक करायची जरूर असते का? हिरवी पाने म्हणजे झाडावरून ताजी तोडावी लागणार का? कारण सुकल्यावर ती हिरवी राहाणार नाहीत.

सुका पाचोळा घालून त्यातून जीवाणूंना खायला काही मिळत नाही. हिरवी पाने, तीही न कुजवता, घालणे महत्वाचे आहे. यासाठी झाडांची ताजी पाने किंवा कापलेले हिरवे गवत वापरता येते. मिक्सरमध्ये वाटून या पानांची चटणी करता येईल. अशा पध्दतीने बारीक करून घेतल्यास या पानांमधून किंवा गवतातून भलत्याच वनस्पती वाढणार नाहीत. लेख ७ मध्ये कोणते पदार्थ जमिनीत घालता येतील, आणि किती प्रमाणात हे दिलेले आहे. हिरव्या पानांच्या बाबतीत हे प्रमाण दर हेक्टरी दर महा फक्त ५० किलो इतके आहे. त्यामुळे अगदी आजूबाजूच्या मोठ्या झाडांची पाने खुडून घेतली तरी फार काही बिघडणार नाही. किंवा जवळपासच्या भाजीमंडईतला हिरवा कचरा (उदा. मक्याची साले, कोबीची पाने, पालेभाज्यांचा कचरा इ.) आणता आला तर सर्वात चांगले.

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

पानं सुकल्यामुळे काय फरक पडतो? पानांमधलं पाणी कमी होतं तेव्हा पानांमधल्या शर्करेचं स्वरूप बदलतं का? त्याचं पुढे काय होतं?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हिरव्या पानांमधला हिरवा भाग हा सेल्युलोजयुक्त असतो, आणि रेषा या लिग्निनयुक्त असतात. सेल्युलोजमधून जीवाणूंना पोषण मिळते. लिग्निन हे निसर्गातले प्लॅस्टिक असते, फार थोडे जीवाणू हे खाऊन तग धरू शकतात.

हिरवी पाने निसर्गात उघड्यावर सुकतात, तेव्हा त्यातले पाणीच कमी होते असे नाही, तर कोणते ना कोणते जीव त्यातील सेल्युलोजही खाऊन टाकतात. त्यामुळे पानांचा हिरवेपणा जातो, आणि मागे उरलेल्या लिग्निनचा पिवळा-तपकिरी रंगच फक्त रहातो. त्यामुळे ज्या जमिनीची सुपिकता वाढवायची आहे, तिच्यात हिरवी पाने घालायला हवी. त्या जमिनीबाहेर सुकलेली पिवळी पाने तिच्यात घातली, तर आपल्याला ज्या जीवाणूंना पोसायचे आहे, त्यांना खायला त्यात काही मिळत नाही.

अर्थात सोलर ड्रायरसारखे उपकरण वापरून जर पाने वाळवली, तर त्यातील फक्त पाणी काढून टाकले जाते. यामुळे पाने कोरडी होतील, पण त्यांचा हिरवेपणा कायम राहील. अशा पानांचा चुरा करून त्याचाही वापर करता येईल.

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

लिग्निन खाणारे जीवाणू जमिनीचा कस वाढवायला मदत करतील का? मला समजलं त्यानुसार, जीवाणूंच्या शरीरांतून इतर खनिजं झाडांना मिळतात. जीवाणूंचं आरोग्य जोपर्यंत टुणटुणीत आहे तोवर लिग्निन खाल्लं काय आणि सेल्युलोज खाल्लं काय, फरक पडू नये. हे बरोबर आहे का?

झाडांवरून जी पानं गळतात, थंडीच्या आधी त्यातल्या सेल्युलोजचं काय झालेलं असतं?

आता व्यावहारिक प्रश्न असा, सेल्युलोज कमी असलेल्या आणि लिग्निनचं प्रमाण जास्त असलेल्या ओकाच्या पानांसारख्या पानांचं काय करावं? आमच्याकडे लाईव्ह ओक नावाच्या प्रजातीची बरीच झाडं आहेत; फेब्रुवारी-मार्चमध्ये, थंडी संपताना त्यांची पानं वाळून गळतात. ही पानं लवकर कुजत नाहीत/ कंपोस्ट होत नाहीत असं वाचनात आलं; कारण लिग्निनचं प्रमाण बरंच असतं. तर त्याचं काय करता येईल?

(निसर्गातलं प्लास्टिक हे रुपक आवडलं. लगेच समजलं.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखमाला उत्तम आहे आणि वाचते आहे. काही माहिती आधी होती पण त्याचा मुळातून विचार करणे आवडले आणि काही माहिती नवीच आहे. या लेखमालेच्या निमित्ताने ही सगळी महत्वाची माहिती ऐसीवर संकलित होते आहे हे फारच उत्तम, अनेक आभार.

वा.. छानच! बरीच अनवी माहिती कळली.
ही लेखमाला संपली असे लिहिले आहे, त्याने नव्या भागाची वाट पाहणे थांबणार असले तरी या विषयातील उत्सुकता वाढीस लागली आहे.

या विषयावर वाचनासाठी चांगली पुस्तके, वेबसाईट्स वगैरे प्रतिसादात सुचवू शकलात तर ते उपयुक्त ठरेल.

==

लेखमालेबद्दल बहुत आभार!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दुर्दैवाने नैसर्गिक शेतीबाबत अशास्त्रीय आणि अंधश्रध्दा पसरवणारे लिखाणच जास्त मुबलक आहे, पण तरीही पुढील काही दिवसांत काही लेखांचे दुवे देण्याचा प्रयत्न करीन.

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

या लेखमालेच्या विषयाच्या अनुषंगाने आणखी काही माहितीसीठी डॉ.आनंद कर्वे यांच्या दोन लेखांसाठीचे दुवे देत आहे. दोन्ही लेख शैक्षणिक संदर्भ द्वैमासिकात प्रसिध्द झालेले आहेत.

http://www.sandarbhsociety.org/wp-content/uploads/2015/08/San18-Aug-Sep-...
पान 11

http://www.sandarbhsociety.org/wp-content/uploads/2015/08/San78-Oct-Nov-...
पान 36

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

आभार. वाचून पाहतो

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखमाला लिहून अतिशय उपयुक्त माहिती उपलब्ध केल्याबद्द्ल अनेक आभार. वन स्ट्रॉ रेवोल्यूशन वाचलेले आहे पण त्यातले शास्त्र ठळकपणे समोर आले नव्हते.

लेखातील खालील वाक्यात 'एकदल' आणि 'द्वीदल' यांची आदलाबदल झाली आहे अशी शंका आहे:

आपण ज्या धान्यांची बियाणे पेरून शेती करतो, त्या द्विदल वनस्पती आहेत. ही सर्व बियाणे अंधारातही रूजून येतात. पण ज्यांना आपण तण म्हणतो, त्या सर्व एकदल वनस्पती आहेत. या वनस्पतींच्या बीजांना सूर्यप्रकाश मिळाला तरच ती रूजून येतात.

चूक ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे म्हणणे बरोबर आहे, लेखात दुरूस्ती करत आहे.

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

लिग्निन पचवण्याची क्षमता मातीतल्या जीवाणूंमध्ये नाही. किंबहुना वनस्पतींसाठी हवा, पाणी, माती, असा सर्वत्र संचार असलेल्या जीवाणूंपासूनचे लिग्निन हे संरक्षक कवच आहे. त्यामुळेच वनस्पतींच्या मुळ्या आणि खोडे शाबूत रहातात.

लिग्निन जास्त असल्यामुळेच काही पाने लवकर कुजत नाहीत, किंवा कंपोस्ट करता येत नाहीत (कारण जीवाणूंना खाण्यासारखे त्यात काही नसते). अशा पानांची कोळसा पावडर करून ती जमिनीत घालता येऊ शकते. यामुळेही मातीचा कस सुधारतो, शिवाय कार्बन सिक्वेस्ट्रेशनचेही पुण्य लाभते. बायोचार या विषयावर गुगलवर भरपूर माहिती उपलब्ध आहे. बागेतल्या काडीकचऱ्यापासून कोळसा बनवण्यासाठी कोणालाही वापरता येईल अशा आम्ही विकसित केलेल्या पध्दतीसाठी व्हिडिओ लिंक देत आहे -
https://www.youtube.com/watch?v=zowFwJ_a0k0&list=PLO9IWBWSV1ah7dPoVwc5T0...

लिग्निन हे खरेच निसर्गाने बनवलेले प्लास्टिक (रासायनिक दृष्ट्या पॉलिमर) आहे. Smile

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

तुमच्या लेखांतून आणि प्रतिसादांमधून बहुमुल्य माहिती मिळाली. मनःपूर्वक धन्यवाद!

अत्यंत सुंदर आणि नेमक्या मुद्यांना धरून असलेली लेख माला. नाहीतर नैसर्गिक शेतीवर व्याखाने देऊन उदरनिर्वाह करणाऱ्या "बुवांनी" ह्या शब्दाचाही वीट आणला होता. इतके सोपे करून सांगितले तर त्यांना दुकानच बंद करावी लागतील.

योगायोगाने - अपघाताने म्हणूया मला सापडलेली एक युक्ती.

कोथरूड पुणे येथे माझ्या गच्चीवरील बागेत एक लिंबाचे झाड आहे गेली बारा वर्षे तरी. साधारण दोन घनफूट मातीत उभे आहे चारेक फुट उंच असेल. कुठल्याही खते किंवा मशागती शिवाय (काट्या मुळे त्याच्या खाली हात घालणे अशक्य आहे.)वर्षाला सरासरी शंभरच्या वर फळे देते. हमखास.

कर्वे लेखमाले नंतर लक्षात आलेली गोष्ट अशी कि लावत असतानाच मातीत एक रताळ्य च्या वेलाचा तुकडा राहिला. दर वर्षी पावसाळ्यात तो फोफावतो आणि काट्याने मुळे अर्थातच रताळी काढून घेणे अशक्य असल्याने ती मग तिथेच कुजतात. आणि bacteria ला वर्षभर अन्न मिळते.

धन्यवाद. दिलेले उदाहरणही फारच रोचक आहे!

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

उदाहरण फारच आवडले.

ह्या लेखमालेमुळे रताळ्य च्या भूमिकेच उलगडा झाला. पूर्वी जिथे शक्य तिथून रताळी काढून घेत असे - काटे नसतील तेंव्हा. आता सगळ्य बहुवर्षायू झाडांच्या खाली रताळी कुजावावीत म्हणतो. कसे?

साखर पाण्याचाही खटाटोप नको.

हे असं काही करून बघितलं पाहिजे. कारण आमच्याकडे साखर वापरली नाही तरी मुंग्यांचा बराच उपद्रव होतो. साखर वापरायची असेल तर फार जास्त लक्ष ठेवावं लागेल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दोन घनफूट मातीमध्ये ही रताळी (म्हणजे त्यातील साखर) जास्त नाही का होत? कारण लेखमालेत दिलेले मातीला उपयुक्त साखरेचे प्रमाण फार कमी आहे. आमच्या येथे मी जमिनीत रताळ्याचे डोळे लावले होते तर वेल कुंपणालगत लांबलचक फोफावला. छोटी छोटी बोटाएव्हढी रताळी धरली आणि अचानक उंदिरघुशी दिसू लागल्या. त्यांची चंगळ झाली. कुंड्यांतूनही सुरण, कोनफळ, करांदे असे कंद (सालींचे डोळे) पुरून ठेवलेले असतात. कधी रुजून वेल मोठे होतात, कधी अर्धवट वाढून मध्येच सुकतात, कधी पांढरी बुरशी येते, कधी कोवळे तुरे पहाटे मुठींएव्हढ्या पक्ष्यांच्या तुरतुरण्याने मोडतात तर कधी चिमण्या खातात. पण वेल पुन्हा पुन्हा फुटतात मात्र. फळाची आशा न धरता 'इदं न मम' असे आधीच म्हणून टाकून आम्ही कोनफळाची कोवळी लाल पाने जून हिरवी होताना पाहात बसतो.

जास्त होत नसावीत किंवा ती हळू हळू कुजत असावीत वर्षभर. त्यामुळे एकदम फार साखर उपलब्ध होत नसेल.

इतकी वर्षे हे फक्त तंत्रद्यान म्हणून निरिक्षण करत होतो. आता त्या मागील विज्ञान कळलेसे वाटतेय.

आणि, गच्चीत एकूणच पेस्ट ची अडचण कमी असते.

लेखमालेत म्हटल्याप्रमाणे जमिनीत द्यायच्या साखरेचे प्रमाण खूपच कमी आहे, तेव्हा मिळत असलेल्या सर्व रताळ्यांवर पाणी सोडण्याची गरज नाही! पण अधूनमधून रताळ्याच्या कीसाचा नैवेद्य सर्व झाडांना द्यायला काहीच हरकत नाही.

रताळ्यांमधून साखर आणि स्टार्च जीवाणूंना मिळत असावे. गच्चीत झाड आहे, आणि त्याखाली असलेल्या मातीचा इतर मातीशी संपर्क नाही. असे असूनही वर्षानुवर्षे झाड तगून आहे, आणि दोन्ही वनस्पती उत्पन्न देत आहेत - एक कायमस्वरूपी, आणि एक हंगामी. शिवाय दोन्हीतील अतिरिक्त जैवभार त्याच मातीत जातो आहे, आणि त्यातला एक भरपूर साखर आणि स्टार्चयुक्त आहे. अपघाताने नैसर्गिक शेतीेचे सुंदर उदाहरण उभे राहिले आहे, यात शंकाच नाही.

फुकट साखरेचा एक चांगला स्रोत म्हणजे उंबराची फळे. आपण ही खात नाही, पण उंबराखाली नेहमी फळांचा खच पडतो, आणि वेगवेगळे कीटक त्यांवर तुटून पडलेले दिसतात. उंबराच्या फळांतून भरपूर बायोगॅस मिळतो, हेही मी पाहिले आहे. तेव्हा ही फळे गोळा करून त्यांचा लगदा करून तोही कुंड्यातील मातीत घालून पहाता येईल.

बऱ्याच जणांनी कुंड्यांमध्ये मुंग्यांच्या उपद्रवाचा उल्लेख केला आहे. आमच्या घरच्या प्रयोगांत हा प्रश्न कधी फारसा आलेला नाही. माझ्या वडिलांच्या मते, मातीतील जीवाणूंची संख्या आणि त्यांना दिले जाणारे खाद्य यांची योग्य सांगड बसली तर काही दिवसांत मुंग्या आणि इतर कीटकांचे प्रमाण कमी होईल. पण साखर वगैरे न घालताही मुंग्या गोळा होत असतील, तर कुंडीत इतर कोणता रोग, कीटक, इ. आहेत का, पहावे लागेल. या कीटकांना खाण्यासाठीही मुंग्या गोळा होत असतील कदाचित.

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

मुंग्यांचा उपद्रव का होतोय हे शोधून काढायला वेळ लागेल. तोवर मुंग्यांना आडकाठी करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय आहे का? परसात, आवारातही अधूनमधून मुंग्यांची वारुळं दिसतात.

रताळं-लिंबू या प्रयोगाबद्दल मला एक शंका आहे -

रताळ्यातला काहीही भाग कुंडीबाहेर जात नाही, पण लिंबाच्या रुपाने काही भाग त्या इकोसिस्टमच्या बाहेर जातो. याउलट सौरऊर्जा आणि पाणी या बाहेरच्या गोष्टी आत येतात. प्रश्न असा की जीवजंतूंना खाण्यासाठी साखर मिळते ती पाणी, हवा, हरितद्रव्य, सूर्य यांच्याकडून मिळते. पण अन्य मूलद्रव्यं, जी हवा, पाण्यांतून मिळत नाहीत, लिंबाचंं झाड वापरतं, ती हळूहळू कमी होत जातील ना? लिंबाचं खाणं कमी असेल असं म्हटलं तरीही १०-२०-१०० वर्षांनी (बराच काळ लागेल तरीही) मातीतली अन्य पोषक द्रव्यं कमी होतील का? (कुंडीच्या बाहेर ही अडचण बरीच कमी होईल.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो, हळूहळू कमी होत जातील, पण ज्या इमारतीच्या गच्चीवर हे होते आहे, त्या इमारतीच्या आर्युमानापेक्षा जास्त वेळ लागेल, माती पूर्ण नापीक होऊन जायला.

अर्थातच शेतजमिनीबाबत ही चिंता करायचे कारण नाही. आपल्या पायाखाली मातीचा जो थर आहे, त्यात अजून १०,००० वर्षे कोणतेही खत न घालता शेती होत राहू शकते. आणि खालच्या लाव्हामधून नवीन खडकांची सतत निर्मिती होतच असते.

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ