'पेय'रिंग - कशाबरोबर काय प्यावं?
‘मीड’ अर्थात ‘माधवी’ या धाग्यावर झालेल्या चर्चेत जयदीप चिपलकट्टींनी खालीलप्रमाणे प्रतिसाद दिलेला आहे. वाईन दोनतीन दिवस का शिल्लक राहू शकते हे सांगताना ते म्हणतात...
याचं कारण असं की काही लोकांना वेगवेगळ्या मूडनुसार वेगवेगळी वाईन लागते (उदाहरणार्थ, नेमाडे वाचताना एक, गौरी देशपांडे वाचताना दुसरी, शुभंकरोति म्हणताना तिसरी इत्यादि). भलत्या वेळी भलती वाईन पिऊन ते जीवनाचा रसभंग करू इच्छित नाहीत, आणि परिणामी त्यांच्या फडताळात अनेक बाटल्या एकाच वेळेला उघडलेल्या असतात. या जीवनपद्धतीबद्दल आपल्याला काहीच सहानुभूती वाटत नाही काय?
आम्हाला या जीवनपद्धतीबद्दल सहानुभूती नाही. याचं कारण म्हणजे सहानुभूती साठी अनुभूतीची आवश्यकता असते. पण आपण जे अनुभवलं नाही, त्याबद्दल जाणून घेण्याची मात्र अपार उत्सुकता आहे. त्यामुळे अर्थातच आमच्या मनात प्रश्न उपस्थित झाला की आपल्याला जर या जीवनपद्धतीचा स्वीकार करायचा असेल तर नक्की काय काय करावं लागेल? म्हणून आम्ही वाईन प्राशनाविषयी वाचायला लागलो. तर पेयरिंग हा शब्द वाचनात आला. थोरामोठ्यांनी कुठच्या वाईनबरोबर काय खावं, कुठच्या खाण्याबरोबर कुठची वाईन घ्यावी, मुळात हे ठरवण्याचे ढोबळ नियम काय याबद्दल बरंच लिखाण करून ठेवलेलं आहे. उदाहरणार्थ ही साइट.
पाश्चात्य देशात या असल्या जीवनपद्धतींचा फार सखोल विचार केलेला दिसतो. मात्र आपल्या गरीब मायमराठीत असं काहीच लिखाण उपलब्ध नाही. त्यामुळे आपणच सगळे मिळून आपल्या परीने या जीवनपद्धतीची व्याख्या करूया.
१. नक्की कुठच्या लेखकाबरोबर कुठच्या वाईनचं किंवा दारूचं किंवा पेयाचं पेयरिंग चांगलं होईल? म्हणजे उदाहरणार्थ - ना. सी. फडक्यांच्या गुलगुलीत कादंबऱ्या वाचताना नक्कीच मंदशी रोझे वाईन प्यावी असं मला वाटतं. कदाचित बर्फ टाकायलाही हरकत नसावी.
२. लेखकांपलिकडे जाऊन, कुठच्या कलाकाराच्या कलाकृती (चित्रं, नाटक, सिनेमा, गाणं) अनुभवताना कुठची वाईन, दारू, कॉकटेल घ्यावं? उदाहरणार्थ - दीवारमधला 'मेरे पास मॉं है' टाइप डायलॉग ऐकताना मस्त झणझणीत ब्लडी मेरी असावी.
३. कशाबरोबर काय निश्चित चालणार नाही याबद्दल काही सर्वसाधारण ठोकताळे बांधता येतील का? उदाहरणार्थ - का कोण जाणे, पण मिरासदारांच्या कथा वाचताना काही स्कॉच बरोबर वाटत नाही.
४. काही असेच प्रश्न -
- जीएंच्या रूपककथा वाचताना आणि खऱ्या माणसांच्या कथा वाचताना वेगवेगळी पेयं असावीत का? असल्यास कुठची? 'आतड्याची माया' या शब्दप्रयोगाबरोबर घुटका घेण्यासाठी एखादं स्पेशल पेय बनवावं का?
- दवण्यांचं लेखन वाचताना वाईन, दारू, कॉकटेल वगैरे सोडून नुसतंच हळद घातलेलं दूध प्यावं का?
- काही पुस्तकांमध्ये वेगवेगळे भाग वाचताना वेगवेगळी पेयं घ्यावी लागतात. उदाहरणार्थ वॉर ऍंड पीस वाचताना त्यातल्या उच्चवर्गीय पार्ट्यांविषयी वाचताना शॅंपेन योग्य वाटते, खास रशियन शिकारींचं वर्णन येतं तिथे कडक व्होडका जमून येते, तर युद्धांची वर्णनं वाचताना रम घ्यावी असं वाटतं. अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का?
सह - अनुभूती
कशाबरोबर काय प्यावं? - ते इथल्या थोरामोठ्यांनी ठरवावं. त्या त्या वाईनची त्या त्या साहित्याबरोबर (म्हणजे शाब्दिक, चकणा नव्हे) जे कोणी जेव्हा जेव्हा अनुभूती घेत असतील त्यांनी तेव्हा तेव्हा आम्हा पामरांना बोलवावे. आम्हीही प्रत्येकवेळी थोडी थोडी 'सह'-अनुभूती घेऊ (अर्थातच फुकट!). मग आमच्या मनात आपोआपच त्या जीवनशैलीबद्दल बर्यापैकी सहानुभूती निर्माण होईल. क.लो.अ.
ता.क. 'नर्मदे हर' , 'हर हर नर्मदे' ला नर्मदेचे थंडगार पाणी योग्य असे कोणी उच्चभ्रू म्हणाले तरी आम्हा गरीबांना त्यात थोडेफार एथाइल हायड्रॉक्साईड मिसळलेले आवडेल.
विश्वास पाटील - चील्ड
विश्वास पाटील - चील्ड बीयर
भाउ पाद्ध्ये - रेड वाइन
लाज आणली आहे या सोकाजीने! हाच का तो सोकाजी जो निरनिराळ्या वारूणींबद्दल अभ्यासपूर्ण लिखाण करतो?
खरंतर सोकाजीकडून अपेक्षा होती ती काहीशी अशी:
कुरूंदकर वाचताना - कॅब्रेने सुव्हिन्यू, सँगिओव्हीजी
इरावती कर्वे - माल्बेक, पिनो न्वॉर
मंगला आठलेकर - मर्लो
ऐतिहासिक कादंबर्या (विश्वास पाटील, छावा, मृत्युंजय अशा कादंबर्या) - स्टेला आर्तुआ
नेमाडे - सिंगल मॉल्ट
.
.
.
आम्ही अडाणी
एकतर आम्ही या विषयात अडाणी शिवाय इथे एक बाटली परवडताना मारामार तेव्हा 'याच्या बरोबर काय प्यायचे?' हा प्रश्नच गैरलागू, किंवा 'जे उपलब्ध असेल ते' हेच सर्वसमावेशक उत्तर देणे संयुक्तिक.
नर्मदामैय्याच्या परिक्रमणाविषयी येणाऱ्या साचेबद्ध लिखाणाबरोबर नक्की काय घ्यावं?
- वैदिक साहित्य वाचताना पिण्यासाठी सोमरस किंवा गोमूत्र यापलिकडे काही पर्याय आहेत का?
हे दोन प्रश्न मनाच्या तळाला भिडले. अर्थात यात सूक्ष्म (की स्थूल?) उपहासाचा वास आला (कछुआ छाप अगरबत्ती लावा म्हणजे वास येणार नाही). पहिल्या प्रश्नात 'प्यावे' हे क्रियापद न वापरता 'घ्यावे' हे क्रियापद वापरून घेणे हे द्रव नसून घन असून शकते नि ते पेय नसून केवळ 'सेव्य' असू शकते ही शक्यता राजेशने चतुराईने शिल्लक ठेवली हे पाहून आम्ही त्याला दिलेल्या भाषिक शिक्षणाचा योग्य अभ्यास त्याने केला असल्याचे पाहून संतोष जाहला. तसेच साचेबद्ध लिखाण नि परिक्रमा वगैरे वाचून 'शांभवी एक घेणे' हा पु.ल. देशपांडे नामक पेती बूर्ज्वा लोकांनी उगाच डोक्यावर चढवून ठेवलेल्या लेखकाचा लेख आठवला.
सोमरसाबाबत बोलायचे तर सोमवल्ली नक्की कुठली हा संशयावर्तातील प्रश्न निर्माण करून कोणतेही मद्य सोमरस म्हणून क्वालिफाय होऊ शकते ही प्राचीनत्वाच्या समर्थक अर्वाचीनांनी केलेली मखलाशी आठवली.
अवांतरः 'पेय'रिंग ही वेब-रिंग प्रमाणे अनेक पेये जोडणारी (जेणेकरून हवे तेव्हा एका क्लिकमधे एकाकडून दुसर्याकडे जाणे सुलभ व्हावे) रिंग असावी असा शीर्षकावरून समज झाला. तो चुकीचा ठरल्याने अंमळ नाराज झालो.
मस्त धागा
(१) स्तोत्रे वाचताना मी "केशर/बदाम घातलेले सात्विक मसाला दूध " पीणार :) आधी नैवेद्य दाखवून मग :)
(२) मराठी कविता वाचताना - "मेलो" स्ट्रॉबेरी मिल्क्शेक चालेल
(३) इंग्रजी कविता वाचताना - चुरचुरीत , सुगंधी कॉफी बरी
(४) अॅलेक्स ग्रे ची पुस्तके (ट्रान्सफिगरेशन्स, सॅक्रिड मिरर्स), त्याच्या चित्रांचे रसग्रहण आणि त्याचा चित्रकारीतेचा प्रवास वाचताना मला स्पेशल आणि अत्यंत पौष्टीक (नरीशींग) असे काहीतरी हवे जसे - चिकन स्टॉक (कोंबडी उकळवली की वर जो रस्सा येतो तो, मीठ /मसाला न घालता. यमी!!!)
आमचे 'पेय'रिंग
वर्तमानपत्र + चहा हे एकमेव 'पेय'रिंग अनुभवले असल्याने, काय वाचताना काय प्यावे, हे सांगण्याचा अनुभव नाही.
मात्र, काय पाहताना (टिव्ही वर, गैरसमज नकोत!) वा ऐकताना काय प्यावे या बाबतीतील अनुभव सांगता येतील.
एखादी मॅच किंवा धम्माल, फुल टू चित्रपट पाहताना - बियर
सस्पेन्स किंवा थरारक युद्धपट वगैरे पाहताना - वोड्का किंवा रम
रोमॅन्टीक चित्रपट पाहताना - वाइन किंवा जिन बेस्ड कॉकटेल
मित्रमंडळींसमवेत गप्पा हाणताना - व्हिस्की
एखाद्या पार्टीहून घरी परतल्यावर (पार्टीत कमी पडली असेल तर), मंद गाणी ऐकत - ब्रॅन्डी (विशेषतः कोन्याक)
मनोरंजक धागा
चिपलकट्टींची प्रतिक्रिया वाचली तेंव्हाच असा धागा कोणी सुरु करेल तर बरे होईल असे वाटले होते. तसे आम्हाला त्यांच्या एका वेळी अनेक वाईन्स उघडून ठेवण्याच्या जीवनपद्धतीबद्द्ल फारशी सहानुभूती नाही कारण वाईनची बाटली उघडली की संपवायची अशी आमची निष्ठा आहे पण असो. मनोरंजक धागा.
ग्रेस वाचताना अॅबसेंथच घ्यावी असा सल्ला आहे.
ग्रेस वाचताना अॅबसेंथच
ग्रेस वाचताना अॅबसेंथच घ्यावी असा सल्ला आहे.
मस्त. फोटू बघूनच त्या पेयाला एका पल्याडच्या विश्वातल्या हिरव्या जादूचं वलय आहे असं वाटतं. जीएंच्या रूपककथा किंवा आरती प्रभूंच्या कवितांनाही हिचे घुटके घ्यायला हरकत नाही.
अरुण कोलटकरांच्या कवितांसाठी मी पीनो न्वार सुचवतो.
हे सगळे ठिक आहे,
पण 'कोणाच्या पैशाने प्यावे' ह्या प्रश्नाची चर्चा कुठेच दिसली नाही.
बाकी
नर्मदामैय्याच्या परिक्रमणाविषयी येणाऱ्या साचेबद्ध लिखाणाबरोबर नक्की काय घ्यावं?
- वैदिक साहित्य वाचताना पिण्यासाठी सोमरस किंवा गोमूत्र यापलिकडे काही पर्याय आहेत का?
हे प्रश्न वाचून ऐसी अक्षरेची वाटचाल हळूहळू 'मिसळप्रेमी' च्या दिशेन चालली आहे असे वाटून गेले. :) वेगळे काही देण्याच्या प्रयत्नात, पलीकडच्या घाटावरची धुणीच पुन्हा इकडे आणून धुतली तर जात नाहीयेत ना ? अर्थात घाट घाटच न राहता काही दिवसात बेसीन बनतो आणि त्याची सुरुवात आपणच केलेली असल्याने मग इतरांना दोष देखील देता येत नाही.
सुधा भीता दिवं गता...
दवण्यांचं लेखनच इतकं गोग्गोड असतं की त्यामुळे 'द्राक्षा म्लानमुखी जाता, शर्करा चाश्मताम् गता' अशी परिस्थिती उद्भवते. तेव्हा इतर कुठल्याही रसास्वादाची खरं तर गरज पडत नाही. पण पेयरिंगची खुमखुमीच असेल तर गुलाबजाम संपून उरलेल्या पाकात केलेले चिरोटेही खपले की जे रसायन उरते, ते उपयोगी पडावे.
असं लेखन वाचण्याचा सराव नसेल तर मात्र वाचनोत्तर प्रकृती पूर्वपदावर येण्यासाठी जलजीरा अथवा तत्सम तालु(परि)मार्जक पदार्थ जवळ बाळगल्यास उत्तम :)
का कोण जाणे, पण
का कोण जाणे, पण मिरासदारांच्या कथा वाचताना काही स्कॉच बरोबर वाटत नाही.
बरोबर आहे. स्कॉचसोबत वाचायचे लेखक म्हणजे वपु, अनंत सामंत, सुहास शिरवळकर… स्कॉच सोबत मराठी चित्रपट पहायचे असल्यास मला तरी वास्तुपुरुष किंवा तत्सम चित्रपट आवडतील. online मिळणारी बरीचशी चांगली मराठी नाटके (विनोदी सोडून) सुद्धा स्कॉच ला चांगली सोबत करू शकतील.
फक्त मराठी चित्रपटांबद्दल बोलायचा तर धुमधडाका, सगळीकडे बोंबाबोंब, थरथराट या कोठारे आणि पिळगावकरी चित्रपटांसाठी उत्तम पेयरिंग म्हणजे बियर! ती सुद्धा गडद कॉफी च्या रंगाची आणि कडू! :)
इतकी झोलमझाल करण्यापेक्षा
इतकी झोलमझाल करण्यापेक्षा जेव्हा जे आवडेल अन झेपेल (सगळ्या बाजुंनी) ते घ्यावं.