भारतीय अभिजात भाषा - राजकारण्यांचा खेळ

आजपर्यंत भारत सरकारने तमिळ (२००४), संस्कृत (२००५), कन्नड आणि तेलुगु (२००८) अशा चार भाषांना अधिकृत रीत्या ’अभिजात भाषा असा दर्जा दिलेला आहे. (पैकी कन्नडच्या बाबतीतील निर्णयास आह्वान देणारा अर्ज मद्रास उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याने त्या भाषेबाबतचा निर्णय अमलात आलेला नाही.) मराठीलाहि असा दर्जा मिळावा अशी मागणी सुरू झालेली आहे. अद्यापि तिने जनमानसामध्ये मूळ धरल्याचे जाणवत नाही पण मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करून एखाद्या पक्षाने तिचा पाठपुरावा करण्यास प्रारंभ केला तर ती मागणीहि ऐरणीवर येऊ शकेल इतका ’मसाला’ तिच्यामध्ये निश्चित आहे.

ही वा ती भाषा ’अभिजात’ असल्याचे सरकारी पातळीवर घोषित करण्याचा सरकारला अधिकार आहे काय, असल्यास कोणत्या घटनाकलमाखाली वा कायद्याखाली आणि तसे करण्यामुळे ती भाषा बोलणार्‍या जनतेला निश्चित काय लाभ होतो काय अशी चर्चा ह्यपुढे केली आहे.

सर्वप्रथम ’अभिजात भाषा’ म्हणजे काय ह्याकडे नजर टाकू. पाश्चात्य संस्कृतीत जुनी ग्रीक आणि लॅटिन ह्या दोन भाषांना सर्वानुमताने ’अभिजात भाषा’ (Classical languages) असे मानले जाते. Classical Tripos in Cambridge, reading classics at Oxford ह्या सर्वपरिचित इंग्रजी शब्दांमागे हाच अर्थ आहे. ह्या दोन भाषांना ’अभिजात भाषा’ मानणे हा केवळ विद्वन्मान्यतेचा भाग आहे. त्यासाठी कोठल्याहि देशाच्या शासनापुढे कोणीहि अर्जी केलेली नाही आणि कोणत्याहि सरकारने हे काम आपणहून अंगावर घेतलेले नाही. विरुद्ध बाजूस फ्रेंच, जर्मन, इंग्लिश इत्यादि सध्याच्या समृद्ध भाषांपैकी कोणाच्याहि अभिमान्याने आमची भाषा ’अभिजात’ आहे असे जाहीर करावे असे मागणे आपल्या देशाच्या सरकारपुढे मांडलेले नाही.

अशाच विद्वन्मान्यतेवर आधारून भारतातील संस्कृत भाषा हीहि ’अभिजात’ भाषा मानली जाते आणि त्यास जगभर मान्यता आहे.

आता वस्तुस्थिति अशी आहे की भारतातीलच तमिळ ही भाषाहि स्वतःच्या प्राचीन वाङ्मयामुळे संस्कृतइतकीच संपन्न, इतकीच जुनी भाषा आहे. असे असताहि तिला ’अभिजात’ असे कोणी मानत नाही ही गोष्ट तामिळनाडूच्या DMK गटाला डाचत असावी. ह्यावर योग्य उपाय म्हणजे तमिळचेहि महत्त्व सर्व जगाच्या नजरेस आणून तिच्याबाबत योग्य आदर निर्माण करणे आणि जेणेकरून जगातील, वा विशेषतः भारतातील अधिकाधिक लोक तमिळ शिकतील असे वातावरण निर्माण करणे. पण हा मार्ग खूप लांबचा झाला. तो चोखाळण्याऐवजी DMK गटाने आपली राजकीय शक्ति त्यासाठी वापरायचे ठरविले, त्यासाठी योग्य ते fielding लावले आणि संधि येताच तिचा वापर करून केन्द्र सरकारकडून तमिळ भाषा ’अभिजात’ असल्याची घोषणा करविली. हे कसे झाले ते पाहू.

डॉ. जॉर्ज हार्ट हे कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कली येथे १९७५ सालापासून तमिळ विभागाचे प्रमुख आहेत. तमिळप्रमाणेच संस्कृतमध्येहि त्यांचा गाढा व्यासंग आहे. प्रा. मराइमलाइ ह्यांनी डॉ.हार्ट ह्यांना अशी विनन्ति केली की तमिळ भाषा अभिजात आहे किंवा कसे ह्यावर डॉ.हार्ट ह्यांनी मत व्यक्त करावे. तदनुसार डॉ.हार्ट ह्यांनी ११ एप्रिल २००० ह्यादिवशी आपले खालील प्रदीर्घ मत दिले. ते विद्यापीठाच्या संस्थळावर http://tamil.berkeley.edu/tamil-chair/letter-on-tamil-as-a-classical-lan... येथे उपलब्ध आहे आणि मी ते येथे खाली दर्शवीत आहे.


डॉ.हार्ट ह्यांनी आपले मत नोंदविताना तमिळला अभिजात भाषा का म्हणावे ह्याबद्दल काही मार्गदर्शक तत्त्वे दिग्दर्शित केली आहेत. त्यापलीकडे जाऊन इतर भारतीय भाषांच्या पाठिराख्यांकडून अशाच मागण्या निर्माण होतील हे ओळखून त्या अन्य भाषा ’अभिजात’ असे का म्हणता येणार नाहीत हेहि नोंदवून ठेवले आहे. राजकारणावर एक डोळा ठेवून हा सिद्धसाधक प्रकार केला गेला आहे हे मला तरी स्पष्ट दिसते.

२००४ साली ह्या प्रकरणाचा नवी गति मिळाली. त्या वर्षीच्या निवडणुकीनंतरचे UPA (United Progressive Alliance) ज्या पक्षांच्या पाठिंब्यावर उभे होते त्यामध्ये DMK हाहि पक्ष होता. आपल्या पाठिंब्याची किंमत म्हणून त्यांनी Common Minimum Program चा भाग अशा ज्या मागण्य़ा मांडल्या होत्या त्यांमध्ये तमिळ भाषेला ’अभिजात’ भाषा असे केन्द्र सरकारने घोषित करावे हीहि एक मागणी होती.

सत्तेवर आल्यावर केन्द्राने हा प्रश्न सल्ल्यासाठी साहित्य अकादमीच्या समितीपुढे ठेवला. एकाच भाषेला असा दर्जा देणे युक्त ठरणार नाही, असे करण्याची आवश्यकताच नाही, ह्यामुळे चुकीचा पायंडा पडेल असे अनेक आक्षेप समितीने सरकारपुढे ठेवले. अखेरीस समितीने तमिळबद्दल काहीच स्पष्ट मत दिले नाही पण एखादी भाषा ’अभिजात’ असे घोषित करण्यापूर्वी कोणत्या कसोटया लावल्या जाव्यात ते घालून दिले. त्या कसोट्या अशा:
१) ती भाषा १५०० ते २००० वर्षांहून जुनी असावी आणि इतके जुने वाङ्मय त्या भाषेत असावे.
२) मौल्यवान् वारसा असे म्हणता यावे इतके प्राचीन वाङ्मय त्या भाषेत असावे.
३) त्या भाषेला स्वतन्त्र आणि दुसर्‍या भाषेवर अवलंबून नसलेली वाङ्मयीन परंपरा असावी.
४) जुनी भाषा आणि तिची नंतरची रूपे ह्यांमध्ये अंतर असावे.
(पहा Classic case of politics of language, The Telegraph, April 28, 2004.
http://www.telegraphindia.com/1040928/asp/frontpage/story_3813391.asp )

ह्यानंतर केन्द्र सरकारने १७ सप्टेंबर २००४ ह्या दिवशी तमिळ भाषा ’अभिजात’ असल्याचे घोषित केले. पहा http://www.hindu.com/2004/09/18/stories/2004091806530100.htm

येथे विशेष लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की ही वा ती भाषा ’अभिजात’ आहे असे ठरविण्याचा कोणताच अधिकार केन्द्र सरकारकडे घटनेनुसार वा कायद्यानुसार नाही आणि कोणत्याहि सरकारी घोषणेमध्ये अशा अधिकाराचा स्पष्ट उल्लेख नाही. ही घोषणा Constitutional decree खाली केली जात आहे एव्हढा मोघम उल्लेख काय तो कोठेकोठे दिसून येतो. घटनेच्या ३४१ व्या कलमानुसार हिंदी भाषा समृद्ध करण्यासाठी प्रामुख्याने संस्कृतचा आधार घेण्यात यावा इतकाच संस्कृतचा विशेष उल्लेख आहे. ह्या पलीकडे जाऊन कोठल्याच भाषेला कसलाच वेगळा दर्जा घटनेने दर्शविलेला नाही.

ह्यानंतर अशी परिस्थिति निर्माण झाली की तमिळ भाषा ’अभिजात’ घोषित झाली पण मूळ अभिजात भाषा संस्कृतचे काय? हा अन्तर्विरोध दूर करण्यासाठी केन्द्राने संस्कृतलाहि हा दर्जा २७ ऑक्टोबर २००५ ह्या दिवशी घोषित केला. तसे करतांना भाषा २००० ते १५०० वर्षे जुनी असल्याची अट सैल करून ती १५०० वरच आणली. पहा http://www.hindu.com/2005/10/28/stories/2005102809281200.htm

कालान्तराने २००८ मध्ये कन्नड आणि तेलुगु ह्याहि भाषा अभिजात असल्याचे केन्द्राने घोषित केले, यद्यपि कन्नडचा हा दर्जा त्याविरुद्ध मद्रास उच्च न्यायालयापुढे प्रलंबित असलेला अर्ज निकालात निघेपर्यंत स्थगित आहे. पहा http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=44340
http://asiantribune.com/node/22180 आणि
http://www.thehindu.com/news/national/article75642.ece

अपेक्षेनुसार आता मराठीचे पाठीराखेहि मराठी ही अभिजात भाषा म्हणून घोषित केली जावी अशी मागणी करू लागले आहेत आणि त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. पहा http://news.in.msn.com/national/article.aspx?cp-documentid=5334470. शिवसेनेनेहि आपले वजन ह्या मागणीमागे टाकले आहे. पहा http://www.dnaindia.com/mumbai/report_give-marathi-classical-language-ta...

क्रमाक्रमाने बंगाली, हिन्दी आणि अन्य भाषाहि हीच मागणी करतील आणि त्यांच्यापुढे गुढघे टेकण्याशिवाय प्रत्यवाय राहणार नाही. अरबी आणि फारसीचे पाठीराखे सज्जच आहेत.

अशा रीतीने ह्या गरीब देशात डझन-दीड डझन ’अभिजात’ भाषा असल्याचे मनोरंजक चित्र जगापुढे उभे राहील. ”आम्ही दरिद्री असलो म्हणून काय झाले, आमची भाषा तरी ’अभिजात’ आहे" असे त्या त्या भाषा बोलणारे लोक जगाला गर्वाने सांगू शकतील. राजकारणी लोकांनाहि आपण काही भरीव कार्य केल्याचे समाधान मिळेल.

’बोलाचीच कढी, बोलाचाच भात...’

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4.6
Your rating: None Average: 4.6 (5 votes)

'बोलाचीच कढी, बोलाचाच भात' येथे हे लिखाण संपते. पूर्ण लिखाण दोनदा का उमटले आहे आणि मी काय चुकीचे केले हे मला कळत नाही.

संपादकांना विनन्ति की पुनरुक्तीचा भाग काढता आल्यास काढून टाकावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिजात भाषा जाहीर केल्यामुळे त्या भाषिकांचा आणि/किंवा राजकारण्यांचा काय अराजकीय फायदा होतो? या अशा जाहीर फतव्यांचा (decree) भारताबाहेर काय परिणाम होतो?

लेख संपादित केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भाषा अभिजात आहे की नाही याइतकेच महत्त्वाचे आहे ते ती प्रवाही आणि जिवंत ठेवणे! भाषेला असा विशिष्ट दर्जा दिल्याने तिचा व्यवहारात वापर वाढणार असेल (निदान 'आम्ही बघा अभिजात भाषा बोलत आहोत्/लिहित आहोत' अशा अभिमानाने) तर जास्तीत जास्त भाषांना 'अभिजात' म्हणणे भले ठरावे. तसंही शब्दांची उंची व्यक्त करणारा व्यवहार आम्हाला करता येत नाही तेव्हा आम्ही शब्दच खाली आणून ठेवतो (जसे शिक्षण 'महर्षी' आता खूप आहेत भोवताली) ही आमची पद्धत आहे - त्यामुळे इथंही तेच घडणे अपेक्षित आहे.

पण एखादी भाषा 'अभिजात' आहे की नाही हे ठरवण्याच्या कसोटया विचार करायला लावणा-या आहेत. जसे, वाङ्मय निर्माण करुन ते टिकवून ठेवण्याच्या समाजाच्या क्षमतेचा संबंध त्या समाजाची सत्ता (राजकीय्, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक इत्यादी) दर्शवते का? एखादी गोष्ट 'मौल्यवान' आहे की नाही हे ठरवणारे लोक कोण असतात? भाषा ही आदानप्रदानाने घडत जाते असे दिसते. अशा वेळी दुस-या भाषेहून पूर्ण स्वतंत्र अशी एखादी भाषा खरोखर असू शकेल का? जुनी भाषा आणि तिची नंतरची रुपे यात अंतर पडलेले नाही अशी जगात एक तरी भाषा आहे का? वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विषय खूप रंजक अाहे. चर्चेला माझ्या परीने चालना द्यावी म्हणून काही मुद्दे (विस्कळितपणे का होईना पण) मांडतो.

१) ती भाषा १५०० ते २००० वर्षांहून जुनी असावी आणि इतके जुने वाङ्मय त्या भाषेत असावे.
४) जुनी भाषा आणि तिची नंतरची रूपे ह्यांमध्ये अंतर असावे.

मुद्दा क्र. (१) वरून:
अाता उदाहरणार्थ ऋग्वेद अंदाजे इ.स. पूर्व १५०० च्या अासपासचा अाहे, तर (बाणभट्टाची) 'कादंबरी' इ.स. ६५० च्या अासपासची अाहे. याचा अर्थ बाणभट्टासाठीदेखील वेद दोन हजार वर्षं जुने होते. तेव्हा वैदिक संस्कृत अाणि बाणभट्ट, दण्डी यांचं संस्कृत या दोन वेगवेगळ्या अभिजात भाषा अाहेत असं मानायचं का? मी असं ऐकलेलं अाहे की या 'दोन्ही' भाषांत अंतर इतकं अाहे, की 'दशकुमारचरित' किंवा 'कादंबरी'चा ज्यांचा अभ्यास अाहे, त्यांना त्या बळावर ऋग्वेदाचा किंवा अथर्ववेदाचा अर्थ लावता येईलच असं नाही. हे खरं का? (मला स्वत:ला संस्कृत येत नसल्यामुळे जास्त माहितगार माणसाचं मत ऐकायला अावडेल.)

मुद्दा क्र. (४) वरून:
जिला Old English म्हणतात ती भाषा माझ्या समजुतीप्रमाणे classics मध्ये गणली जाते. ती अाधुनिक इंग्रजीपेक्षा खूपच वेगळी अाहे; उदाहरणार्थ Beowulf ही (internet वर अनेक ठिकाणी उपलब्ध असलेली) दीर्घकविता वाचण्याचा प्रयत्न केला तर 'काहीही कळत नाही, तेव्हा याला इंग्रजी का म्हणायचं?' अशीच पहिली प्रतिक्रिया होते. तमिळबद्दल काय परिस्थिती अाहे? म्हणजे जिला अभिजात तमिळ म्हणतात ती अाजघडीला मद्रासमध्ये राहणाऱ्या दुकानदाराला कळते का? (मला स्वत:ला तमिळदेखील येत नसल्यामुळे जास्त माहितगार माणसाचं मत ऐकायला अावडेल.) जर कळत नसेल तर हा दुकानदार त्याच्या बायकोशी बोलतो ती तमिळ अाणि अभिजात तमिळ यांना एकाच नावाने संबोधणं हे एका अर्थी फसवं अाहे. कारण स्वत:ची मातृभाषा 'अभिजात' असल्याचा अभिमान अाहे, पण प्रत्यक्षात त्यातलं अभिजात वाङ्मय कळत मात्र नाही, असं होण्यात काही हशिल नाही.

Disclaimer: एखादी भाषा सरकारी पातळीवरून 'अभिजात' ठरवणं यात मला व्यक्तिश: काही तथ्य दिसत नाही. पण निदान या निर्णयाचं निमित्त होऊन का होईना, अासपासच्या अनेक रंजक बाबींची चर्चा होऊ शकते. अशा चर्चेत मात्र मला रस अाहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

जयदीप चिपलकट्टींच्या दोनांपैकी एका मुद्द्याला मी थोडे उत्तर देऊ शकतो.

मला वाटते आज आपण 'अभिजात संस्कृत' म्हणतो ती भाषा म्हणजे पाणिनीने नियमित केलेली आणि कालिदास-भवभूति-बाणासारख्यांच्या कृतींमधून दिसणारी भाषाच होय. आपल्याकडे शाळा-कॉलेजपातळीवर हीच शिकविली जाते आणि संस्कृतची कमीअधिक जाण असणार्‍यांना हीच भाषा कळते. वेदामधील भाषा हिच्याहून वेगळी असून हिचेच ते तिच्याहून प्राचीन असे रूप आहे. त्या रूपाचा विशेष अभ्यास केल्याशिवाय सर्वसामान्य संस्कृत शिकलेल्याला वेदांची भाषा पूर्णतः आकळत नाही, त्याला केवळ तिच्या अर्थाचा ढोबळ अंदाज येतो.

तमिळबद्दल मला निश्चित काही सांगता येत नाही पण मराठीशी तुलना करून काही तर्क करता येतो. गेली आठ-नऊशे वर्षे तरी मराठी भाषा वापरात आहे तरीहि ज्ञानेश्वरीची, महानुभावांची, इतकेच काय रामदासांची मराठी आजच्या मराठीसारखी नाही हे आपणास जाणवते. ज्ञानेश्वरीतील मराठीचाहि आपल्याला आजच्या चालू मराठीत अनुवाद करून सांगावा लागतो तेव्हाच तो सर्वसामान्य मराठी भाषिकाला कळतो. असा आणि इतकाच फरक जर जुन्या आणि नव्या तमिळमध्ये असला तर केवळ फरक आहे म्हणून जुने आणि चालू तमिळ ह्या अलग भाषा आहेत असे म्हणता येणार नाही. हा फरक निश्चित किती आहे हे कोणी तमिळ जाणणाराच सांगू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीसं अवांतर:
एखादी भाषा बदलत जाण्याचा वेग वेगवेगळ्या कालखंडांत फार वेगवेगळा असू शकतो असा मला संशय अाहे. उदाहरणार्थ, इंग्रजीचे हे तीन नमुने:
(१) शेक्सपियरचं 'हॅम्लेट' (१६०३)
(२) स्विफ्टचं 'गलिवर्स ट्रॅवल्स' (१७३० च्या अासपास)
(३) कालचा 'न्यू यॉर्क टाईम्स'

(१) अाणि (२) मध्ये जितका काळ गेलेला अाहे, त्यापेक्षा (२) अाणि (३) मध्ये जास्त गेलेला अाहे. पण निदान मला तरी (१) अाणि (२) मधल्या फरकापेक्षा (२) अाणि (३) मधला फरक पुष्कळच कमी वाटतो. (हे मत मी केवळ दोन नमुन्यांवरूनच बनवलेलं अाहे असं नाही. स्विफ्टऐवजी फील्डिंग वापरला तरी चालेल.) अाता या माझ्या 'वाटण्याला' काही वस्तुनिष्ठ पुरावा देता येईल का हे मला माहित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

छपाईच्या शोधामुळे भाषेमधे फरक पडण्याचा वेग कमी झाला आहे असं याचं एक स्पष्टीकरण देता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा विचार माझ्या डोक्यात अाला नव्हता, पण यात नक्कीच तथ्य वाटतं. (युरोपात छपाई सुरू झाली ती शेक्सपियर जन्माला येण्याच्या शंभरेक वर्षं अाधीपासून. तेव्हा छपाईच्या 'शोधा'पेक्षाही छापील साहित्य स्वस्त होऊन त्याचा प्रसार सोपा होणं हे कारण असावं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

एखादी भाषा अभिजात आहे का? या प्रश्नावर कित्येक चर्चा झडल्या आहेत. माझे काही प्रश्न आहेत त्यांना इथे नक्की उत्तरे मिळतील असे वाटते:
१. भाषा अभिजात असण्यासाठी ती सध्या व्यावहारिक दृष्ट्या जिवंत असणे ही कसोटी अस्णे गरजेचे वाटते का? कारण त्या आता उपयोगातच येत नसतील, त्यात नवी शब्द निर्मिती, साहित्य निर्मिती होत नसेल तर त्याला अभिजात म्हणण्याऐवजी 'पुरातन' भाषा म्हणणे योग्य ठरेल का?
२. भाषेला स्वतःची लिपी असणे हा अभिजाततेचा निकष असु शकेल का - असावा असे वाटते का? यामागचा माझा तर्क असा: एखादी भाषा ही आधी बोलीभाषा असते. जेव्हा तिचा प्रसार होतो तेव्हा इतरांना शिकवण्यासाठी त्याचे व्याकरण नियम तयार केले जातात. आपले म्हणणे इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हळूहळू एक संकेतिक लिपी तयार होते. 'बाहेरून' आलेली लिपी त्या भाषेतील सार्‍या ध्वनींला न्याय देऊच शकेल असे नाहि. उदा. देवनागरी लिपी सारे इंग्रजी उच्चार लिहु शकत नाहि (उदा. the हा दि/द यांच्या मधला आहे), मल्याळी भाषेत 'अतिर्‍हस्व' स्वर आहे व तो मल्याळी लिपीत लिहिता येतो, देवनागरीत नव्हे; तमिळ मधे एकाहुन अधिक प्रकारचे 'ळ' आहेत. थोडक्यात लिपी ही भाषेची 'ओरीजिनॅलिटी' व स्वातंत्र्य दाखवण्यासाठी महत्त्वाची असते. जर भाषा ही 'अभिजात' असेल तर तिला इतर निकषांसोबतच स्वतःचे शब्द, स्वतःचे ध्वनी व ते एकमेकांपर्यंत लिखित रुपात पाठवण्यासाठी ते ध्वनी दर्शवण्यासाठी विषिष्ट खुणा असणे- म्हणजेच लिपी - असावी असे माझे तरी मत आहे.

अजूनही प्रश्न आहेत पण ते चर्चेच्या ओघात विचारेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असेही काही अस्तित्त्वात असते याची कल्पना नव्हती. धन्यवाद माहितीबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेले ५० वर्षे बघतेय, आपल्या भाषा हळुहळु गढूळ होत चालल्या आहेत. मराठी असो वा हिंदी वा तेलुगु.... भाषेत बदल हवेतच, भाषा प्रवाहीच हवी असे काहीजण आता नाक वरून सांगतील. पण आपल्या भाषांची अवस्था काय आहे? नवी पिढी बोलताना अर्धे इंग्रजी वापरणार,थोड्या हिंदीच्या कुबड्या.
तामिळ,कन्नड,तेलुगु भाषिक बोलताना हिंदी,इंग्रजी किती वापरतात? त्यांनाही हिंदी,इंग्रजीच्या कुबड्या घ्यायची गरज भासते का?
गेल्या ५० वर्षात आंतर्राष्ट्रीय असे म्हणता येईल असे किती साहित्य भारतिय भाषांत तयार झाले?
रमाबाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा जुना धागा वर आणण्याचे कारण असे की पुढील सकाळ, १० जुलै २०१४ मधील वृत्त जरा उशीरानेच माझ्या आत्ता वाचनात आले आणि वर धाग्यात उल्लेखिलेल्या मार्गानेच आपली वाटचाल चालू आहे ह्याला दुजोरा मिळाला. धाग्यात उल्लेखिलेल्या व्यतिरिक्त आता मल्याळम आणि उडिया ह्याहि भाषा आता 'अभिजात' ठरल्या आहेत. साहजिकच मराठीला आणि उर्वरित सर्वच भारतीय भाषांना हा coveted दर्जा लवकरच प्राप्त होणार ह्यात शंका नाही. मधल्या काळात मोठया शहरांतील सुशिक्षित मराठी तरुणांना रोजच्या भाजीबाजाराला पुरेशा मराठीपलीकडे मराठी लिहितावाचता येत नाही ह्या भकास वस्तुस्थितीकडे कोणाचेच ध्यान दिसत नाही!

अशा रीतीने ह्या गरीब देशात डझन-दीड डझन ’अभिजात’ भाषा असल्याचे मनोरंजक चित्र जगापुढे उभे राहील. ”आम्ही दरिद्री असलो म्हणून काय झाले, आमची भाषा तरी ’अभिजात’ आहे" असे त्या त्या भाषा बोलणारे लोक जगाला गर्वाने सांगू शकतील. राजकारणी लोकांनाहि आपण काही भरीव कार्य केल्याचे समाधान मिळेल.

’बोलाचीच कढी, बोलाचाच भात...’

सकाळ, १० जुलै २०१४ येथील बातमी अशी आहे.

<पुणे - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी केंद्रातील नव्या सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. मागील सरकारच्या तुलनेने एक पाऊल पुढे टाकत मराठी भाषेचा प्रलंबित अहवाल पडताळणीसाठी साहित्य अकादमीकडेही पाठवला आहे. त्यामुळे या विषयावर लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

मागील सरकारने निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मल्याळम आणि उडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला; पण मराठी भाषेचा अहवाल आठ महिने प्रलंबित ठेवला. लोकसभा निवडणुकीनंतर आलेल्या नव्या सरकारने पहिल्या पंधरा दिवसांतच मराठी भाषेच्या अहवालाकडे सकारात्मकतेने पाहत तो साहित्य अकादमीकडे पाठवला. त्यावर अकादमीमधील तज्ज्ञ समिती आपले म्हणणे सरकारकडे सादर करेल. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात याबाबत घोषणा होऊ शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘मराठीला हा दर्जा मिळावा, यासाठी अभिजात भाषा समितीने प्रथम मराठी व इंग्रजी भाषेतील अहवाल राज्य सरकारकडे पाठवले. ते अहवाल राज्य सरकारने जुलै व नोव्हेंबर 2013 मध्ये केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाकडे पाठविले. याबाबत विचार होत असेल, तर ती निश्‍चितच आनंदाची घटना आहे. तज्ज्ञ समितीला योग्य पडताळणी करता यावी, ठरलेले निकष पूर्ण करता यावेत म्हणून आम्ही अहवालासोबत आवश्‍यक पुरावेही दिलेले आहेत. त्यामुळे इतरांप्रमाणेच आम्हाला पुढील निर्णयाची उत्सुकता आहे,‘‘ असे भाषा समितीचे समन्वयक व अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी सांगितले.

या भाषांना मिळाला दर्जा
केंद्र सरकारने आजवर तमिळ (2004), संस्कृत (2005), तेलुगू , कन्नड (2008), मल्याळम, उडिया (2014) या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे अनेक मराठी अभ्यासकांचे, वाचकांचे मराठी भाषेला हा दर्जा कधी मिळणार, याकडे लक्ष लागलेले आहे.> (सकाळ, १० जुलै २०१४)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय सहमत!

काही मूर्खांची पोटे भरतील इतके वगळता यातून शष्प काही निष्पन्न होणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं