कवि बी यांची "गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या" ही कविता आमच्या कुमारभारती पुस्तकात होती. अतिशय उच्च कविता म्हणुन ही माझ्या लक्षात रहाण्याचे कारण आईने अतिशय रसाळ शब्दात केलेले रसग्रहण. या कवितेला एक ठाशीव पार्श्वभूमी आहे जी की कवितेतून कविने उत्तम रीत्या उलगडत नेलेली आहे. बी यांच्या "चाफा बोलेना" कवितेतील अध्यात्माची डूब या कवितेतही जाणवते. किंबहुना हे अध्यात्मिक सौंदर्यच या कवितेचे काळीज आहे.
.
प्रसंग - एक गरीब घरची चिमुरडी आहे. ८-९ वर्षाची असेल आणि ती साध्या कपड्यात, कदाचित हळद-कुंकू समारंभास किंवा भोंडल्याला मैत्रिणीच्या घरी गेलेली असताना बहुतेक काहीतरी बिनसले आहे. आणि मानी मनाच्या या लहान मुलीच्या मनाला काही तरी फार लागले आहे. पण करते काय आणि कसेबसे अश्रू लपवुन, ती घरी तर आलेली आहे. पण घरात शिरताच तिचा बांध फुटला आहे आणि वडीलांना सर्व प्रसंग धुसूंमुसूं रडत, तिने सांगीतलेला आहे. कदचित ही आईवेगळी पोर आहे, कदाचित आई अंथरुणाला खिळलेली आहे काही का कारण असेना पण या बाळास समजाविण्याची जबाबदारी त्या दरीद्री पित्यावर येऊन ठेपली आहे.
.
आणि मग त्या समजूत घालण्याच्या प्रसंगामधुन ही कविता उमलत गेलेली आहे. चिमुकलीला वडील समजावतात त्यामध्ये त्यांच्या नाना युक्ती दिसून येतात तर कधी गंमती जंमतीच्या उपमा तर कधी दरीद्री बापाचे विदीर्ण हृदय दिसून येते, कधी आपल्या मुलीचे वाटणारे कौतुक समोर येते तर कधी प्रेमळ पित्याच्या अंतःकरणामधुन निघालेले आशीर्वादाचे बोल प्रकट होतात.
.
गाइ पाण्यावर काय म्हणुनी आल्या | का ग गंगायमुनाहि या मिळाल्या |
उभय पितरांच्या चित्त-चोरटीला |कोण माझ्या बोलले गोरटीला |
.
वडील गंमती गंमतीच्या उपमा देऊन तिला खेळकरपणे समजावु पहात आहेत. ते म्हणतात (मला वाटतं की गाईसारखे तुझे तेजस्वी, काळेभोर डोळे पाण्याने का बरं भरुन आले?), गालांवरुन गंगायमुना का गडे वाहू लागल्या? नाकांतून सू: सू: जे ऊष्ण वारे वहाताहेत त्यांमुळे आमच्या बछडीचे गाल म्हणजे जणू गुलाबी, लाल गोमटे काश्मीरी गुलाबच जणू सुकुन गेले आहेत. आणि मुलीच्या गालावरती रुळणारे मऊ केस म्हणजे जणू नंदनवनातील वेलीच आहेत. हे ऊष्ण वारे या वेलींना झोके देत आहेत. वडील म्हणतात - तू तर आपल्या दोन्हीकडच्या पितरांची चित्तचोरटी आहेस अशा माझ्या छबेलीला कोण करंटे ते घालून पाडून बोलले?
बरे असे गोड बोल ऐकून आता तरी हीने रडे थांबवावे ना? पण नायिकेला मैत्रिणीचे ते कटू बोलणे फारच जिव्हारी लागले आहे आणि चंद्रचांदणे, नक्षत्रमण्यांची दूडच जणू अशी तिची अश्रूमाळ अजुनी वहातच आहे. बाईंनी जमिनीवर लोळणच घेतलेली आहे. आणि मग या उत्पाताचे कारण वाचकांच्या लक्षात येते. कोणा श्रीमंत कुलीनांच्या पोरीने हिला "भिकारीण" म्हणुन चिडविले आहे.
.
विभा-विमला आपटे-प्रधानांच्या |अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या |
गौर चैत्रींची तशा सजूनि येती |रेशमाची पोलकी छिटे लेती |
तुला 'लंकेच्या पार्वती' समान |पाहुनीया, होवोनि साभिमान |
काय त्यातिल बोलली एक कोण |'अहा ! - आली ही पहा - भिकारीण |
.
मग वडील अनेक सुंदर उपमा देऊन तिला समजावायचा प्रयत्न करतात. अगं रत्ने-सोने मातीतच जन्म घेते पण तुला माहीत आहे ना की ते राजाच्या वक्षी रुळत असते, कमळ नाही का चिखलात उगवते पण वसंतरऋतुत मिरविते. मग धूळीमध्ये जन्म झाला म्हणुन का रत्ने गारगोटी बनतात, चिखलात उगवल्याने कमल का भिकारी ठरते? मग आता सांग तू दरीद्री पित्याच्या घरी जन्मलीस म्हणुन तू का भिकारीण ठरणारेस? पण त्यांना काय माहीत की बालहट्टापुढे तर्काचे काय कोणाचेही काही चालत नाही. बालहट्ट जसा उगवतो तसा आपोआपच मावळावा लागतो.
आता हेही शस्त्र फोल ठरते आहे हे पाहून वडील म्हणतात शाळेतील मुली वाचाळच असतात बाई, कोणी वेड्यासारखं कठोर बोलून जातं पण तू तर शहाणी आहेस ना, मग काय लक्ष देतेस अशा वेड्या शब्दांकडे! पण अजुनही मुलीच्या रडण्याला, अश्रूंना खळ नाही. गरीबी जे सामंजस्य शिकवते, तडजोड शिकवते, ती अजुन ही लहानशी शिकलेली नाही. हे एक प्रकारी बरे म्हणावे की वाईट - असा प्रश्नच वाचकांपुढे ऊभा रहातो.
.
मुली असती शाळेतल्या चटोर |एकमेकीला बोलती कठोर |
चित्तात काय धरायाचे |शहाण्याने ते बोल वेडप्याचे |
.
पंकसंपर्के कमळ का भिकारी |धूलिसंसर्गे रत्न का भिकारी |
सूत्रसंगे सुमहार का भिकारी |कशी तूही मग मजमुळे भिकारी |
.
वडील तिच्या उज्जवल भविष्याची आशा तिला दाखवितात. आज पासून उद्याकडे लक्ष वेधायचा प्रयत्न करतात. जशी बाल्यावस्थेत असली तरी नदी ही सागरासच जऊन मिळते तद्वत तुझ्या रुपगुणांनी तुझे नशीब उजळणार आहे. गंगा-यमुना जेथे मिळतात तेथे सरस्वती आल्याशिवाय राहील का? तसेच तुझ्यमध्ये रुप-गुणांचा संगम आहे, अशावेळी तुझे नशीब, भाग्य उजळलयाविण कसे राहील?
पण या उद्याची त्या बालिकेस पर्वा काय? आजचे बोला. आज मला परकरपोलके नाही, मोत्याची माळ नाही, मला मैत्रिणी चिडवतात.... असा हा बालहट्ट चालूच रहातो.
.
बालसरिता विधुवल्लरीसमान |नशीबाची चढतीच तव कमान |
नारीरत्ने वीर असामान्य |याच येती उदयास मुलातून |
.
भेट गंगायमुनास होय जेथे |सरस्वतीही असणार सहज तेथे |
रुपसद्गुणसंगमी तुझ्या तैसे |भाग्यनिश्चित असणार ते अपेसे |
आता वडील अजुन एक युक्ती करतात. आता तिची स्तुती करुन, तिच्याकडे काय चांगलआहे, ती कशी वैभवशालीनी आहे हे समजावतात. प्रत्येकाला आपले अपत्य हे सौंदर्याची खाणाच वाटते आणि हे वडीलही त्या नियमास अपवाद नाहीत. त्यांच्या दृष्टीतून मुलीच्या गोंडसपणाची सफर कवि बी घडवुन आणतात. अगं तुझ्या पाणीदार डोळ्यातील तेज तर पहा, हिर्या-मोत्यांचे, पाचू-माणकांचे तेज त्यापुढे फिकुटले आहे. आणि तुझी खळी तर बघ जणू पाण्याला खळे पडून त्यात चंद्रचांदणे पडावे. तू स्वतः सौंदर्याची, गोंडसपणाची, लावण्याची खाणी आहेस तुझ्यापुढे कसली ती पत्रास कृत्रिम कपडे, दागिन्यांची!
.
नेत्रगोलातून बालकिरण येती |नाच तेजाचा तव मुखी करीती |
पाच माणिक आणखी हिरा मोती |गडे नेत्रा तव लव ना तुळो येती |
.
लाट उसळोनी जळी खळे व्हावे |त्यात चंद्राचे चांदणे पडावे |
तसे गाली हासता तुझ्या व्हावे |उचंबळुनी लावण्य वर वहावे |
.
गौरकृष्णादिक वर्ण आणि |त्यांच्या छटा पातळ कोवळ्या सम वयांच्या |
सवे घेऊनी तनुवरी अद्भुतांचा |खेळ चाले लघु रंगदेवतेचा |
.
काय येथे भूषण भूषवावे |विविध वसने वा अधिक ते शोभवावे |
आणि मग अशा तिच्या सौंदर्यात तल्लीन झालेल्या कविमनाच्या वडीलांना आपल्या मुलीत पार्वती, आदिमाया न दिसावी तरच नवल. वडील अध्यात्मातील उपमा देत तिला नव्हे तर स्वतःलाच मग म्हणतात - सर्व कामनांची मुर्तिमंत रुप अशी आदिपुरुषाची जाया जी आदिमाया, तिला जसा सृष्टी घडविण्या-मोडण्याचा सोस, सृष्टीशृंगारात विलास करण्याची ओढ तशीच तर तू बाळी. तुझा हा हट्ट नवीन हट्ट का आहे! आदिमायेने नटण्यामुरडण्याचा जो हट्ट केला तोच हट्ट तूसुद्धा करते आहेस. फरक इतकाच की मूळमायेचे नटणे म्हणजे सृष्ट्यारंभ तर तुझे, चिमुरडीचे नटणे म्हणजे भरजरी परकर-पोलके. तुझा हा जगाच्या आदिपासून चालत आलेला स्वभाव त्यात बदल कसा व्हावा!
हे कडवे माझ्या मते कवितेचे हृदय आहे.आपल्या मुलीमध्ये पार्वतीचे रुप पहाणारे वडीलही धन्य आणि इतक्या सुंदर उपमेकरता त्यांची प्रेरणा बनणारी त्यांची कन्याही धन्य. केवढे हे पितृप्रेम!
.
नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध |सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध |
त्याच हौसेतून जगद्रूप लेणे |प्राप्त झाले जीवास थोर पुण्य |
विश्वभूषण सौंदर्यलालसा ही |असे मूळातचि आज नवी नाही |
.
पुढे वडीलांच्या हृदयातून कन्येकरता जी आशीर्वचने, जे आशीर्वाद निघाले ते वर्णनातीत आहेत. आदिपुरुष-आदिमाया यांच्या अध्यात्मिक चिंतनानंतर वडीलांचे मन साहजिकच भविष्यात ओढ घेते व ते विचार करु लागतात, आपली मुलगी कोण्या भाग्यवंताच्या घरी नांदेल आणि तो किती पुण्यवान असेल. या विचारातही इतकी उदात्तता आहे, आदर्शवाद आहे. कोण्या तपस्व्याच्या तपाचे फळ तू आहेस की कुणा पुण्यवंताचा स्वर्ग आहेस! कुण्या गुणवंताची कीर्ती म्हणुन तू मिरविणार आहेस का कुण्या वीरपुरषाची शक्ती होणार आहेस! दिसामासी तू मोठी होशील एक वेळ येईल मी कन्यादान करेन. कसा असेल तुझा भाग्यवान, पुण्यवान सहचर!
.
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू |विलासाची होशील मोगरी तू |
तपःसिद्धीचा "समय" तपस्व्याचा |"भोग" भाग्याचा कुणा सभाग्याचा |
.
पुण्यवंताचा "स्वर्ग" की कुणाचा |मुकुट कीर्तीचा" कुण्या गुणीजनाचा |
"यशश्री: ही वा कुण्या महात्म्याची |धार कोण्या रणधीर कट्यारीची |
दिवसमासे घडवीतसे विधाता |तुला पाहुनी असे वाटते चित्ता |
.
पण वाचक जाणतातच या लहानगीला ना हे विचार कळतात ना तिला त्यात काही गम्य आहे. आता बहुते तिचे थैमान वाढले आहे, रडे अधिकच वाढले आहे. वडील परकर-पोलके, मोत्याची माळ देत तर नाहीतच आहेत उलट काहीतरी अगम्य भाषेत बोलत आहेत, हे पाहून तिच्या हट्टाने रौद्र रुप धरण्यास सुरुवात केली आहे. : )
.
त्यामुळे वडीलही अगदी जेरीस आलेले आहेत. कोणतीही मात्रा तिच्यापुढे चालत नाहीये.त्यामुळे वडील आता खोटी का होइना वचने देऊन रडे थांबविण्यास लागले आहेत."बाई ग! आणतो तुला मखमली पोलके, मोत्यांची कुडी, केसात घालायला सुवर्णफूल सग्गळं सग्गळं आणतो पण हा प्रलय आवर, हा अश्रूंचा पूर, हा थयथयाट थांबव. : )
.
पण आशवासन दिल्यावरती मग ते स्वतःच विचारात पडतात, आश्वासन तर दिले पण पूर्ण कसे करु? आपण तर पडलो दरिद्री, करंटे आपल्या पोटी अशी गुणी, सुंदर पोर देवाने द्यावीच कशाला? कशाला हे वैभव, दरीद्री वडीलांच्या घरी? आणि ते असे स्वतःला मनातल्या मनात दूषणे देऊ लागतात. व खिन्नतेने म्हणतात "थांब देवाच्या गावास जाऊन त्याला विचारतोच की कारे बाबा, अशी चेष्टा लावलीस. का इतकी गोड-गुणी पोर आमच्यासारख्या निर्धनाच्या ओटीत घातलीस?" मुलीचा आक्रोश पाहून वडीलांना मरणप्राय दु:ख होत आहे हेच या ओळींतून दिसून येते.
.
तुला घेइन पोलके मखमलीचे |कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे |
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी |परि आवरि हा प्रलय महाभारी |
.
प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे |कोड किंचित् पुरविता न ये त्यांचे |
तदा बापाचे हृदय कसे होते |नये वदतां, अनुभवी जाणती ते |
.
देव देतो सद्गुणी बालकांना |काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना |
लांब त्याच्या गावास जाउनीया |गूढ घेतो हे त्यास पुसोनीया |
.
अशा निराशेच्या गर्तेत ते कोसळलेले आहेत आणि काय आश्चर्य मुलीचे रडे एकदम थांबते. हां हां म्हणता अवघी बालसृष्टी बदलून जाते. आता रडारडीचा, अश्रूंचा पावसाळा होता तो आता हास्याचे चांदणे पसरते. कारण काय तर तिला "गावाचे" नाव ऐकू येते. हां "गावाला जायचे" ही भाषा त्या बालिकेला चट्टकन समजते. म्हणजे एवढ्या उपमा, युक्ती, आशीर्वाद सर्व मुलीच्या कानी पडत होते.पण काहीही कळत नव्हते पण "गाव" हा शब्द चिमुरडीला बरोब्बर कळला. आपले वडील गावाला जाणार म्हणताच त्यांना घट्ट गळामिठी मारुन ती निरागस पोर म्हणते "मी पण येण्णार. मी पण येणार. कधी जायचं गावाला?" : )
हा विरोधाभास की वडील मरणाची भाषा करतात, निर्वाणीची भाषा करतात आणि काय आश्चर्य मुलीचे रडे एकदम थांबते. जे वडीलांना हवे ते साध्य होते. हे कवितेचे शिखर आहे.
.
"गावी जातो," ऐकता त्याच काली |पार बदलुनी ती बालसृष्टि गेली |
गळा घालुनि करपाश रेशमाचा | वदे "येते मी" पोर अज्ञ वाचा |