तोच चंद्रमा नभात...
एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी.
नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे,
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे,
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी,
एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी.
सारे जरी ते तसेच, धुंदि आज ती कुठे,
मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे,
ती न आर्द्रता उरात, स्वप्न ते न लोचनी.
एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी.
त्या पहिल्या भेटीच्या आज लोपल्या खुणा,
वाळल्या फुलात गंध शोधतो पुन्हा,
गीत ये नसे जुळून, भंगल्या सुरातुनी,
एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी.
शांता शेळके ह्यांचे हे प्रसिद्ध भावगीत आपणा सर्वांच्या कानावरून अनेकदा गेलेले असेल. मी कोठेतरी वाचल्यावरून आठवते की हे गीत शांताबाईंना ज्या श्लोकावरून सुचले तो मूळ संस्कृत श्लोक मम्मटाने आपल्या ’काव्यप्रकाश’ ह्या अलंकारशास्त्रावरील ग्रंथामध्ये उदाहरण म्हणून वापरला आहे. ’काव्यप्रकाश’ हा ग्रंथ शान्ताबाई स.प. महाविद्यालयात बी.ए.च्या वर्गात असतांना त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये होता.
तो श्लोक असा आहे:
स्ते चोन्मीलितमालतीसुरभय: प्रौढा: कदम्बानिला:।
सा चैवास्मि तथापि तत्र सुरतव्यापारलीलाविधौ
रेवारोधसि वेतसीतरुतले चेत: समुत्कण्ठते॥
अर्थ - (नायिका सखीला सांगत आहे) माझे कौमार्यहरण करणारा प्रियकर तोच आहे, आता तशीच चैत्राची रात्र आहे, फुललेल्या मालतीपुष्पांनी सुवासित झालेले कदंबवृक्षावरून येणारे वारे तसेच आहेत आणि मीहि तीच आहे. तरीहि ह्या रेवाकाठी वेताच्या तळापाशी सुरतक्रीडेच्या कल्पनेने माझे चित्त उत्कण्ठित होत आहे.
हा श्लोक मम्मटाच्या काव्यप्रकाशात उद्धृत केला गेला आहेच, तसाच तो विश्वनाथाच्या साहित्यदर्पणामध्ये मम्मटाशी आपला मतभेद स्पष्ट करण्यासाठी विश्वनाथानेहि दाखविलेला आहे.
मात्र तो ह्या दोघांपैकी कोणाचाच नाही. शीलाभट्टारिका नावाची कोणी एक तशी अज्ञात कवयित्री ७व्या-८व्या शतकामध्ये होऊन गेली. शार्ङ्गधरपद्धति नावाच्या एका जुन्या सुभाषितसंग्रहामध्ये - Anthology - तो तिच्या नावाने दाखविला गेला आहे आणि म्हणून श्लोकाची आणि तिची स्मृति टिकून राहून मम्मटापर्यंत पोहोचली आणि तेथून ती शांताबाईंना मिळाली.
शांताबाईंनी आपल्या गीताची कल्पना जरी ह्या श्लोकातून घेतली आहे तरी गीताचा अर्थ मूळ श्लोकाच्या अर्थाच्या विरोधामध्ये आहे. श्लोकामधील नायिका ’चेत: समुत्कण्ठते’ असे सांगत आहे तर गीतातील नायक ’गीत ये नसे जुळून, भंगल्या सुरातुनी’ असे खेदाने म्हणत आहे हे लक्षणीय आहे.
७व्या-८व्या शतकातील आता स्मृतिशेष आणि जवळजवळ आणि अज्ञात शीलाभट्टारिका ह्या श्लोकाच्या रूपाने अद्यापि आपल्या आसपास आहे.
धूळपाटी
मी नुकतेच धूळपाटी हे शांता शेळक्यांचे पुस्तक घेतले आहे.
मूळची कविता स्त्रीच्या तोंडून होती, आणि ही कविता पुरुषाच्या तोंडी आहे. त्यावरून मला असं वाटलं की कदाचित शांता शेळकेंनी त्याच जोडप्यातल्या पुरुषाच्या मनातले विचार मांडले असतील. जुगलबंदीप्रमाणे एकाने काही वाजवायचं आणि दुसऱ्याने त्याच सुरावटीत आपलं वेगळेपण दाखवणारं काही वाजवायचं अशा थाटाचा हा प्रकार दिसतो.
हे बरोबर आहे. शांताबाईंनी असंच केलंय. शिवाय त्यांनी ही कविता वरील श्लोकाचे रुपांतर आहे आणि ते कसे स्फुरले यावर स्पष्ट लिहिले आहे. तो परिच्छेद लवकरच देईन. तोवर कृपया बूच मारू नये!
या कवितेचा इतिहास रोचक आहे.
या कवितेचा इतिहास रोचक आहे.
मूळची कविता स्त्रीच्या तोंडून होती, आणि ही कविता पुरुषाच्या तोंडी आहे. त्यावरून मला असं वाटलं की कदाचित शांता शेळकेंनी त्याच जोडप्यातल्या पुरुषाच्या मनातले विचार मांडले असतील. जुगलबंदीप्रमाणे एकाने काही वाजवायचं आणि दुसऱ्याने त्याच सुरावटीत आपलं वेगळेपण दाखवणारं काही वाजवायचं अशा थाटाचा हा प्रकार दिसतो.