(भिकार छायाचित्रण+रसग्रहण - एक आव्हान)
या स्पर्धेला विषयाचे कोणतेही बंधन नाही. ते चित्र कसलेही असू शकेल. छायाचित्रच हवं असं नाही, हाताने कागदावर किंवा कंप्यूटरवर (डिजिटल आर्ट) काढलेलं चित्रही चालेल. माणसाचेच, वस्तूचेच, प्राण्याचेच हवे असे नाही. हे छायाचित्र फोकस्ड असावेच, योग्य प्रकारे एक्स्पोज्ड असावेच, स्थिर असावे (फोटो काढताना कॅमेरा हललेला चालेल) असेही नाही. हे छायाचित्र उदात्त विचार, मानवी भावनांचे कंगोरे, मानवी जीनवाचा अर्थ सांगणारं शक्यतोवर नसावं अशी अपेक्षा आहे. पण अपवादात्मक परिस्थितीत पुरेसं स्पष्टीकरण दिल्यास अशा प्रकारच्या चित्रांचा समावेश होऊ शकतो. उदाहरणार्थ: ऐसी अक्षरेचे सदस्य 'न'वी बाजू यांनी काढलेले एक चित्र, मी पाहीलेला सूरयोदय, दिले होते आणि त्याचे स्पष्टीकरण स्वतः चित्रकार आणि राजेश घासकडवी या दोघांनीही दिलेले होते. (दुवा )
स्पर्धेचे नियम पुढील प्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले चित्र आणि/किंवा छायाचित्रच स्पर्धेच्या काळात प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधीत इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही
२. एका सदस्याला स्पर्धेसाठी जास्तीत जास्त ३ चित्रे/छायाचित्रे प्रकाशित करता येतील. तीनाहून अधिक चित्रे-छायाचित्रे दिल्यास शेवटची तीन स्पर्धेत मोजली जातील.
३. ज्या चित्र आणि छायाचित्राबरोबर सदर कलाकृती सर्वात भिकार का आहे याचं कोणतंही स्पष्टीकरण स्पर्धकाकडून नसेल ती कलाकृती स्पर्धेतून बाद समजली जाईल.
४. धाग्यात आलेल्या चित्र-छायाचित्रांच्या भिकार अथवा चांगलं असण्याचं स्पष्टीकरण ऐसी अक्षरेचे सर्व सदस्य देऊ शकतात. स्पर्धेच्या निर्णयावर याच परिणाम होईल.
५. दोन प्रकारचे विजेते स्पर्धेत घोषित करण्यात येतीलः
गट क - चित्र-छायाचित्र + त्याच्या भिकारपणाचे स्पष्टीकरण. (कलाकार)
गट स - धाग्यात आलेल्या चित्र-छायाचित्रांचे फक्त स्पष्टीकरण देणारे (समीक्षक)
६. इतर स्पर्धकांच्या कलाकृतींना मागे खेचणार्या प्रतिसादांचं स्वागत आहे.
७. स्पर्धेसाठी हा धागा पुढचे दोन आठवडे खुला असेल. प्रत्येक गटात फक्त एकच एंट्री आल्यास धागा अप्रकाशित होणार नाही; स्पर्धेचा कालावधी वाढवून मिळेल.
८. सदर स्पर्धा नियमितपणे भरवण्याची कोणतीही जबाबदारी धागाप्रवर्तक घेत नाही.
९. आव्हानदातीला पुढे-पुढे करण्याची सवय असली तरीही स्वतःची चित्रे स्पर्धेत उतरवायची आहेत; त्यामुळे आव्हानदाती परीक्षक गट क ची परीक्षक निश्चित नसेल.
१०. स्पर्धकांनी परीक्षकांना लालूच दाखवू नये म्हणून परीक्षकांची निवड इतक्यात केली जाणार नाही. यथावकाश धागा संपादित करून परीक्षक कोण हे कळवण्यात येईल.
चला तर मग! कोणत्याही प्रकारची भिकार, फसलेली चित्रे-छायाचित्रे आणि त्यांच्या भिकारपणाची, फसण्याबद्दलची समीक्षा येऊदेत!
नवी सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपण काढलेले फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
फोटो अपलोड करताना, अपलोड करणार्यांनी जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून डिलीट करावा. कृपया याची नोंद घ्यावी.
अत्यंत सुंदर
मी या चित्राला 'द राइज ऍंड द फॉल ऑफ द अमेरिकन स्टॉक मार्केट' असं नाव देईन. आसपासच्या समाजवादी अंधःकारात स्टॉक मार्केटची एक तळपती ठिणगी दिसते - मानवजातीला आशा देणारी. चित्राच्या केंद्रस्थानी असलेला झगझगीत प्रकाश आहे नव्वदीतल्या दैदिप्यमान चढाचा. मग २००१ मध्ये एक दणका मिळालेला दिसतो - मेलेल्याला शेवटचं मारल्याप्रमाणे टेररिस्टांनी विमानं ट्रेड सेंटरमध्ये घुसवून डॉट कॉम बबलचे शेवटचे बारीक बुडबुडे फोडले - त्याचा. तरीही काही काळ दुर्दम्य आशावादाच्या बळावर ते पुन्हा चढलं आणि २००८ मध्ये त्याहूनही अधिक आपटलं. या प्रवासाचं हे चित्रण आहे.
गंमत म्हणजे ऐशी वर्षांपूर्वीचं स्टॉक मार्केटही याच चित्रात लपलेलं आहे- रोअरिंग ट्वेंटीजचा झगझगीत प्रकाश आणि त्यानंतर ग्रेट डिप्रेशनचा अंधःकार...
इतक्या सुंदर फोटोचा 'भिकार छायाचित्र' स्पर्धेत भाग घेण्यासाठी वापर करणं यातही अदिती यांची कल्पकताच दिसते. स्टॉक मार्केटप्रमाणेच जनतेची अभिरुचीही रसातळाला गेली आहे, असंच त्यांना सुचवायचं आहे.
माजी बी येक येंट्री
हा फोटो खरं तर एंट्री म्हणून नाही, पण या स्पर्धेत एंट्री देण्यासाठी म्हणून काढलेला होता. हा काढताना मी एका टेबलाच्या पृष्ठभागावर फोकस न करता फोटो काढला. दुर्दैवाने हा प्रयत्न फसला. टेबलावर पडलेल्या दिव्याचं प्रतिबिंब त्यात आलं, आणि एकंदरीत परिणाम सूर्यास्तासारखा आला.
या फोटोची किती पातळ्यांवर गल्लत आहे ते सांगणं कठीण आहे. नुसती काळीपांढरी कॉंपोझिशन आहे. धड कशावरच फोकस नाही. धूसरता जी आली आहे ती काहीतरी लपवणारी गहन धूसरता असण्याऐवजी चष्मा काढला पण चष्म्यावरचे डाग डोळ्यासमोरच राहिले तर जसं दिसेल तशी आहे. विषय काय तर काही नाही, एक कसलातरी पट्टा. तृतियांशांचा नियम फाट्यावर मारलेला आहे. हा फोटो पाहिल्यावर पटकन पान उलटून पुढे जावंसं वाटतं यातच या फोटोच्या भिकारपणाचं रहस्य दडलेलं आहे. काहीच व्यक्तिमत्व नसलेली, धूसर, मठ्ठ फोटो.
तेव्हा ताई, माई, अक्का, विचार करा पक्का आणि याच फोटोला द्या तुमच्या मताचा शिक्का.
दुसरा फोटो हा पहिल्या फोटोपेक्षा अधिक भंकस आहे असा माझा दावा आहे. पहिल्या फोटोचं वर्णन तर लागू पडतंच, शिवाय ओव्हरएक्स्पोज झाल्यामुळे त्यातला अर्थहीन भंकसपणा अधिक बटबटीत झाला आहे.
पहिल्या फोटोत भासणार्या
पहिल्या फोटोत भासणार्या माध्यान्हीच्या तळपत्या सूर्याप्रमाणे चमकणारे राजेश घासकडवी यांनी या स्पर्धेसाठी म्हणून खास फोटो काढले याच कारणसाठी हे फोटो बाद मानावेत अशी विनंती आहे. न ठरवता भिकार फोटो काढता येणं एवढंही कठीण काम नाही. विशेषतः मोबाईलमधे कॅमेरे वगैरे असताना.
-१ असहमत
राजेश घासकडवी यांनी या स्पर्धेसाठी म्हणून खास फोटो काढले याच कारणसाठी हे फोटो बाद मानावेत अशी विनंती आहे.
राजेश घासकडवी हे व्यक्तिमत्वच 'बाद' असल्याने वरची विनंती अमान्य करण्यात यावी. मूळात ते फटु घासूंनी काढल्याचा कुठलाही पुरावा आढळलेला नाही म्हणून ते बाद करावेत असे मात्र म्हणता येईल.
मला फायरफॉक्समध्येच हे दिसत
मला फायरफॉक्समध्येच हे दिसत आहेत. आयइ ९ मध्ये दिसायला त्रास होऊ नये म्हणून मी त्याती विड्थ आणि हाइटची फिल्ड्स देखील काढली आहेत. तुम्हाला खालील लिंकांवर दिसतात का?
https://lh3.googleusercontent.com/-YrJ893xx4m8/UAOFm3Ym5vI/AAAAAAAABmw/…
https://lh4.googleusercontent.com/-JRF_SqJCtI0/UAOFnb89U2I/AAAAAAAABm4/…
https://lh5.googleusercontent.com/-nSsqZl-d05I/UAOFn3XorTI/AAAAAAAABnA/…
आता दिसले फटू बाकी साध्या
आता दिसले फटू
बाकी साध्या गुत्यात केलेल्या हेलनच्या नाचात घासकडवीना जर कलात्मकता दिसू शकते (आठवा मुंगळा वगैरे) तर छायाचित्रात ती कलात्मकता ओसंडून वाहतेय अस आमच मत आहे
पहिला फोटो पाहून भा रा तांबेच्या मावळत्या दिनकरा ओळी आठवल्या
बाकीचे फोटो हे नवदृश्यचित्रकलेचे प्रतिक आहेत त्यात एक गूढता आहे जे काय आहे ते फक्त जाणिवा नेणिवा समृध्द असल्यानानच कळेल म्हणजे काय ते विचारु नये
फोटोत एक प्रकारच ऊदासपण सौदर्य ठासून भरलय
तद्वत घासकडवीँचे फोटो स्पर्धेसाठि अपात्र ठरतात
'शॉरट सरकीट मूळे लागलेली आग!!!' (आमची एण्ट्री + स्पष्टीकरण)
छायाचित्रच हवं असं नाही, हाताने कागदावर किंवा कंप्यूटरवर (डिजिटल आर्ट) काढलेलं चित्रही चालेल.
हे म्हटल्यावर... भोगा आता आपल्या कर्माची फळे!!! ही घ्या आमची एण्ट्री.
(ज्या गोष्टीत चांगला हात बसलेला आहे, तीच चांगली करावी, नाही काय? उगाच जमत नाही तर भिकार का होईना, पण फोटॉग्रफीच्या फंदात तरी कशाला पडा?)
३. ज्या चित्र आणि छायाचित्राबरोबर सदर कलाकृती सर्वात भिकार का आहे याचं कोणतंही स्पष्टीकरण स्पर्धकाकडून नसेल ती कलाकृती स्पर्धेतून बाद समजली जाईल.
नुसती कलाकृती देऊन पुरत नाही? स्पष्टीकरण पण पाहिजे? कलाकृती आमची आहे, म्हटल्यावर आणखी स्पष्टीकरण ते काय हवे?
ठीक आहे. कलाकार भिकार, विषय भिकार, शिवाय सादरीकरणही भिकार म्हटल्यावर, यातून नेमके काय बाहेर पडेल अशी आपली अपेक्षा होती? इतके सगळे भिकार घटक एकत्र आल्यावर त्यातून जगातल्या सर्वात भिकार चित्राखेरीज इतर काही बाहेर पडणे शक्य तरी आहे काय? आणखी काय स्पष्टीकरण हवे? यातून काय मोनालिसा निपजेल असे आपल्याला वाटले होते काय?
स्पष्टीकरण कसले मागता? उलट, हे जगातले सर्वात भिकार चित्र का नाही - जगात याहून भिकार असे काय असू शकते - याची कारणे तुम्हीच द्या. जगात याहून भिकार कलाकृती असू शकत नाही, हा कलाकाराने दिलेला शब्द आहे. मानायचा, तर माना, नाहीतर पुराव्यानिशी खोटा पाडून दाखवा! (हे कलाकाराचे च्यालेंज आहे. अर्थात, नाही उचललेत - किंवा कलाकाराचा दावा नाही मानलात - तरी कलाकाराचे त्याने काहीच बिघडत नाही म्हणा! कलाकाराला काय, तो उत्तरोत्तर अशीच एकाहून एक भिकार चित्रे काढत जाईल. स्पर्धेसाठी नाही, 'कलेसाठी कला' म्हणून. ते 'निरासक्त कलाप्रेम' की काय ते यालाच म्हणतात, नाही काय?)
(अवांतर: त्या 'मोनालिसा' काढणार्यानेही त्याचे कोणतेही स्पष्टीकरण आजतागायत दिलेले नाही. त्याचीही एण्ट्री बाद ठरवणार काय? किंबहुना, जगातल्या सर्वात थोर कलाकृतींचे जनक आपल्या कृतींचे स्पष्टीकरण कधीही देत नाहीत, अशी जनरीत आहे. जगातल्या सर्वात भिकार कलाकृतींच्या कर्त्यांनीही ती पाळली, तर नेमके बिघडले कोठे? 'I don't owe the world an explanation' असे व्यक्तिगत धोरण ठेवण्याचा अधिकार आम्हालाच तेवढा का नसावा?)
विश्लेषण
कलाकार भिकार, विषय भिकार, शिवाय सादरीकरणही भिकार
हा तर आपला विनय झाला. या लेखातच उल्लेखलेल्या 'मी पाहिलेला सूरयोदय' या चित्राने रसिकांना किती प्रभावित केलं होतं हे सर्वज्ञातच आहे. त्यामुळे तुम्ही 'न'वनिर्मितीचे पाईक, आव्हां गार्द वगैरे समजले जाता हे तुम्हालाही ठाऊक असेल. तेव्हा पहिला मुद्दा सहजच निकालात निघतो.
विषयाबद्दल बोलायचं झालं तर वरवर बघता हे चित्र शॉर्टसर्किटमुळे लागणाऱ्या आगीचं आहे. त्यातही तुम्ही अभियांत्रिकी चिह्नसमूह वापरून सादरीकरणाला एक 'न'वीन पैलू दिलेला आहे. बॅटरी आहे, तिला जोडलेल्या वायर्स आहेत, त्यांमध्ये कुठचाही रेझिस्टन्स न लावल्यामुळे शॉर्टसर्किट होतं हे एखादा शेंबडा प्रथमवर्षअभियांत्रिकीविद्यार्थीही सहज सांगू शकेल. पण या चिह्नांना एक सखोल अर्थ आहे. तो म्हणजे विद्युतमंडलात रेझिस्टन्स हा ज्याप्रमाणे भारवाहनाचं काम करतो त्याप्रमाणे समाजजीवनात निरनिराळ्या परंपरांचे खांब हे सामाजिक रोषाचं अवरोधन करत असतात. समाजप्रवाह या दाबाखालीही चालू रहावा यासाठी आवश्यक असतात. पण जेव्हा कोणी व्यवस्था अन्याय्य, पोकळ, खोट्या, कृत्रिम रूढी-परंपरांचे खांब वापरून जनतेचं शोषण करते तेव्हा कधी ना कधी त्यांना तो दाब असह्य होतो. ते कोसळतात. आणि मग ते वापरून त्या उष्णतेवर स्वतःची पोळी भाजून घेणारांना जनतेच्या क्षोभाच्या भडक्याला सामोरं जावं लागतं.
पण इतक्या सहज गवसणाऱ्या अर्थावर समाधान मानायला लागले तर ते 'न'वी बाजू चे चहाते कसले? या आकृतीबंधात अजूनही खूप शोधता येतं. नीट बघितलं की या चित्रात वापरलेला सर्किटचा पंचकोन एखाद्या आडव्या पेनाच्या निबसारखा दिसतो. मग नवीनच अर्थाचा उलगडा होतो. बॅटरीचं 'पोटेन्शियल' हा अर्थ जुळून येतो. ज्या लेखनात असं 'पोटेन्शियल' असतं ते योग्य ठिकाणी प्रकाशित (लाल तारा) झालं की जनतेत क्रांतीचा वणवा फैलावतो. वरतीच सांगितलेले सर्व अर्थ - प्रस्थापित, अवरोध, जनतेचा रोष लागू होतातच. पण त्यामागचा कार्यकारणभाव म्हणजे तलवारीपेक्षा श्रेष्ठ असलेली लेखणी व ती धरणाऱ्या विचारवंतांचे विचार - हे कळतं.
इतक्या मिनिमलिस्टिक फराट्यांतून इतके अर्थ सांगणाऱ्या 'न'वी बाजूंचा मी इतकी सुंदर कलाकृती दाखवल्याबद्दल आजन्म ऋणी आहे.
रामायणातला एक प्रसंग.
राम आणि लक्ष्मण हरणापाठी गेलेले आहेत आणि सीतेला घेऊन रावण पळून गेला आहे तेव्हाची ही झोपडी.
आता हे चित्र भिकार का आहे? एखाद्या चित्रकाराने रामायणातला एखादा प्रसंग हुबेहुब, किंवा त्याच्या/तिच्या दृष्टीला तो प्रसंग जसा दिसतो किंवा स्वतःचं त्याबद्दल असणारं इंटरप्रिटेशन मांडलं असतं. प्रसंग म्हटला की त्यात माणसं असणं अपेक्षित आहे. गोळे आणि वाकड्या रेषा काढायचा कंटाळा असल्यामुळे या चित्रात माणसं नाहीत. बरं ही जी झोपडी आहे, ती सुद्धा 'न'वी बाजू यांच्या मागच्या चित्रात बघून काढली आहे आणि धड रंगवलेलीही नाही. यातलं झाड अगदीच कृत्रिम झाडाचीही विकृत आवृत्ती वाटते. झाड आणि झोपडीच्या मधली रेष लक्ष्मणरेषा आहे हे सांगितल्याशिवाय समजणारही नाही. सबब इथे चित्रकाराकडे ना कलात्मक दृष्टी आहे, ना दृष्टीकोन आहे, ना काही सांगण्यासारखं नवं आहे, ना हातात/माऊसमधे कला आहे, ना उपलब्ध सॉफ्टवर्सचा वापर करण्याइतपत अक्कल. सबब हे चित्र साफ भिकार आहे.
(थोडा भूतकाळः हे एक रिक्रिएशन, पुनर्निर्मिती आहे. चित्र काढण्याची सक्ती केली की काय होऊ शकतं याचं एक भिकार उदाहरण.
आमच्या शाळेत विज्ञान, चित्रकला, रामायण कसल्याही स्पर्धा असायच्या आणि त्या सक्तीच्या असायच्या. विज्ञानावर माझं प्रेम होतं त्यामुळे निदान तक्रार नसायची. रामायणावर त्या वयात (यत्ता सातवी) अगदीच राग नव्हता पण चित्रकलेवर चिक्कार राग होता. रामायणाच्या परीक्षेमुळे उगाच तेच-तेच पुन्हा वाचायला, रटायला आणि लिहायला लागतं याचा राग होताच. तर एकदा सक्तीच्या चित्रकला स्पर्धेत एक विषय दिला होता 'रामायणातील एक प्रसंग'. तिथे हे वर काढलं आहे असलंच चित्र काढलं, वर ती नोट लिहीली "राम आणि लक्ष्मण हरणापाठी गेलेले आहेत आणि सीतेला घेऊन रावण पळून गेला आहे तेव्हाची ही झोपडी." आणि गावभर सायकल फिरवून घरी आले. आई शप्पत सांगते, समस्त जनतेसमोर ओरडा (बहुदा मारही) खाऊनही (सहाध्यायींकडून कूल पॉईंट्स मिळाल्यामुळे) वाईट न वाटण्याची ती पहिलीच वेळ. आमची सुरूवात तिथूनच झाली म्हणायला हरकत नाही. )
अवांतरः या चित्राचा भूतकाळ मीच सांगितल्यामुळे इतर कोणी याच गोष्टीचा उपयोग करून माझं चित्र स्पर्धेतून खाली खेचायचा प्रयत्न केल्यास ते फाऊल समजावं. उगाच कोवळ्या मुलांवर अत्याचार वगैरे बडबड करून बायाबापड्यांच्या आणि बापभावांच्या डोळ्यातून पाणी काढूनही या चित्राचं महत्त्व सांगू नये. असल्या अत्याचारांमुळेच माझी कातडी जाडी व्हायला सुरूवात झाली. किंवा बंडखोरी, क्रांती वगैरे कारणंही सांगू नयेत. थोडी स्वतःची बुद्धी वापरावी.
आमचीही एक एन्ट्री
कोणे एके काळी आमच्या तीर्थरुपानी चित्रकला शिकवण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता. अर्थात तेव्हाच्या आणि आजच्या स्थितीत फारसा फरक नाही पडलेला नाही हे यावरून पुरेस स्पष्ट होतेच.
माझ्या ऑफिसातल्या सहकार्यानी याला अनिल कपूर, प्रशांत दामले अशी नावे दिली. क्रित्येक जणांना ते स्वताचे चित्र वाटले. यातच हे किती भिकार आहे हे दिसतय कारण ज्या व्यक्तीच काढल चित्र काढल होत ते नाव सोडून वेगळीच नाव आली. म्हणून मलाच पहिला नंबर द्यावा ही मागणी मी करत आहे
ब्याटम्यानचा शिनुमा पहाताना
ब्याटम्यानचा शिनुमा पहाताना अमेरिकेतल्या कोलोर्याडो राज्यात, एकाला प्रेक्षकांवर गोळ्या झाडण्याची दुर्बुद्धी झाली. त्यात १२ लोकांचा बळी गेला. त्या सर्वांना श्रद्धांजली.
परा याने काढलेले प्रस्तुत चित्र हे फक्त त्यांच्याच मनाची स्थिती दाखवते असं नाही तर असे अनेक सिनेमे पहाताना डुलक्या काढणार्या माझ्यासारख्या लोकांचेही हे सार्थ वर्णन आहे. जोर नामक एक सिनेमा आम्ही बघायच्या आधी उजव्या हाताची मूठ वरच्या दिशेने झाडीत "जोर, जोर" असे बोलत होतो. सिनेमा बघितल्यानंतर हीच मूठ समोरच्या दिशेला झाडीत "झोड झोड" असे बोलत होतो. चित्रपटाचा परिणाम अपेक्षित असतो एक, आणि होतो भलताच. अशा वेळेस चित्रपटाच्या दिग्दर्शकाचीही अवस्था श्री. परा यांच्या चित्राप्रमाणेच होते.
त्यातून परा यांची ही कलाकृती ओरिगिनल नाही. जवळजवळ हजार वर्षांपूर्वी, आजचा जो महाराष्ट्र ओळखला जातो तिथे काही भावंडे एकत्र रहात असत. त्यांना उद्देशून एक धागा श्री. चांगदेव यांनी टाकला. तो धागाही असाच होता, त्याला प्रतिसाद म्हणून मात्र या मुलांपैकी द्वितीय क्रमांकाच्या मुलाने मात्र मेगाबायटी प्रतिसाद लिहीला; जो आजही मराठी लोकांमधे आपुलकीने वाचला जातो. त्या धाग्याची ही अस्सल प्रत आहे.
किंबहुना म्हणूनच श्री. प.रा. यांचे चित्र भिकार नसून अस्सल मराठी परंपरेचा एक नमुना आहेच, शिवाय आधुनिकोत्तर कलाप्रेमी आणि कलाकारांच्या मनाची अवस्थाही आहे. हे चित्र भिकार नव्हे.
8)
स्थळ पुणे सातारा रोड,मला इथे त्या ब्रीजच्या(आम्ही त्याला दरीपूल म्हणतो) खांबांचा फोटो काढायचा होता (हे आठवायला पण बराच वेळ लागलाय)ते फोटो मध्ये शोधले तरच दिसतील .
या फोटो मध्ये गाडीच्या डेष्बोर्ड आणि त्या रोडच्या कठड्याचे ३ असे भयानक रिफ़्लेक्षन आलेले आहेत ,
संपूर्ण विषय सोडून भलतेच दिसत आहे, सबब भिकार फोटो म्हणून मान्यता मिळावी
भिकार नाही तर काय म्हणणार !!!!!
१. फोटो काढण्याआधीचा क्यामेरयाचा वार्मअप
२. आम्ही गावाकडे फिरायला गेलो असताना बरेच फोटो काढून झाले आणि रिक्षात बसायच्या आधी कॅमेरा बंद करायचा तितक्यात हा फोटो क्लिक झाला. काढून टाकायचा होता बरे झाले आता कामाला आला.
३. घरी परतत असताना आमच्या गावात देखील चांद्रयान उतरले होते कि काय अशी शंका येऊन काढलेला हा फोटो.
नबा, तुमच्या वतीने अ.या. ला मार्मिक दिली !
नबा, तुमच्या वतीने अ.या. ला मार्मिक दिली ! मला नाचीजला श्रेणी द्यायची क्षमता दिली आहे आणि तुम्हाला नाही याने खिन्नता आली आहे पण त्याचबरोबर तुमच्या कामी आलो याचाही आनंद आहे. आता त्या ३_१४ने नाहीतर 'कडव्याने माझीपण श्रेणीप्रदान सुविधा काढून नाही घेतली म्हणजे मिळवली. आणि त्यात परत तुम्हीसुद्धा "हा आगाउपणा करायला तुम्हाला कोणी सांगितलं?" म्हणून ४-५ तळटीपा घालून खमंग प्रतिसाद द्याल ही पण शक्यता आहे. खऱ्याची दुनिया नाही राहीली साहेब!
.
\ i m g src="https://drive.google.com/uc?id=19aF0VmMLyICs2m-EM_EHfvqOs_mj6Nxv" alt="NIFTYReturns" \/>
इमेज टॅग मध्ये नेमेके काय चुकते ते कळत नाही. गुगल फोटो, गुगल ड्राईव्ह ची लिंक चालत का नाही. नेमकं सिक्रेट काय आहे?
याचा काही उपयोग होतो का पाहा
याचा काही उपयोग होतो का पाहा -
Embed Image from Google Drive html
Step 1: Open the image on Google Drive.
Step 2: Select the three dots on the top right corner.
Step 3: Choose “Open in new window.”
Step 4: In the new window, select the three dots again.
Step 5: Click on Embed Item.
Step 6: Choose the src URL from the HTML code.
How to Use the Embed Link
Step 1: Click on the detailed layout.
Step 2: Choose “Edit Layout.”
Step 3: Select the Embed widget.
Step 4: Pick from field if the embed URL is in the base, or select from URL to paste directly into Stacker.
Step 5: Provide a title.
Step 6: Set the embed height.
.
ही कलाकृती व्यक्तिगत चित्रसंग्रहात उलटी टांगून ठेवण्यासाठी हवी आहे.
दुर्दैवाने ही कलाकृती टांगण्याकरिता उलटी (पक्षी: upside down) करण्याचा कोठलाही मार्ग तूर्तास माझ्याजवळ उपलब्ध नाही. तरी कृपया ही कलाकृती सुलटीच ठेवून, स्वतःस उलटे टांगून तिच्याकडे बघून जमते का ते पाहावे, एवढेच अत्यंत विनम्रपणे सुचवू इच्छितो.
मूळ चित्र विक्रीसाठी उपलब्ध आहे काय?
मूळ चित्र फुकटातसुद्धा कोणी घेईल असे न वाटल्याकारणाने, विक्रीचा विचार तूर्तास केलेला नाही. सबब, मूळ चित्र विक्रीसाठी उपलब्ध नाही.
मात्र, आपली इच्छा असल्यास प्रस्तुत चित्र आपण फुकटात अवश्य उचलावे. दुर्दैवाने, चित्र प्रकाशित केल्यानंतर मूळ साचा त्वरित नष्ट केलेला असल्याकारणाने, चित्राची मूळ प्रत माझ्याजवळ इतःपर उपलब्ध नाही. मात्र, चित्र या संकेतस्थळावरून उतरवून घेणे शक्य असल्यास आपण तसे केल्यास मला कोणताही प्रत्यवाय असणार नाही. (किंबहुना, प्रस्तुत चित्र आपणास इतके आवडले असल्यास, एकावर एक फुकट तत्त्वावर अशी आणखीही चित्रे बनवून ती येथे डकवून आपल्या पुण्यस्मृतीस अर्पण करू शकतो. आपले स्मरण हे पुण्यावह आहे, हे येथे गृहीत धरलेले आहे.)
कळावे.
…
‘तुमच्या’त त्याला काय म्हणतात, नक्की कल्पना नाही. ‘आमच्या’त त्याला ‘रकून’ म्हणतात.
मूलतः, रस्त्यावर गाडीखाली येऊन मरणे या एकमेव प्रयोजनाकरिता विधात्याने जन्माला घातलेला प्राणी!
आजच संध्याकाळी गाठ पडली. जिना चढून डेकवर आला होता. डेकवर पक्षीखाद्य ठेवले आहे, त्याच्या वासावर आला असावा, असा अंदाज आहे.
चालायचेच.
बायकोला विचारले, अखेरीस!
एक बाझिल दिसतंय.
बरोबर. (आमच्यात त्याला ‘तुळस’ म्हणतात.)
उजव्या बाजूला वेल आहे, ती कसली आहे?
ती एक कहाणी आहे.
फारा महिन्यांपूर्वी, आमच्याकडे घरातली (वर्षानुवर्षे डब्यांतून पडून राहिलेली) कडधान्ये वापरून संपवून टाकण्याची मोहीम निघाली होती. (आमचे स्वयंपाकघर तुलनेने बरेच लहान आहे, त्यामुळे storage space is at a premium. त्यामुळे, वापरात नसलेल्या धान्यांचे नुसते जागा अडवून बसलेले डबे वर्षानुवर्षे ठेवणे परवडत नाही – उपयुक्त वस्तूंना जागा उरत नाही मग. तर ते एक असो.) त्यामुळे, एका बाउलात मूग, दुसऱ्या बाउलात मटकी, तिसऱ्यात चवळी, वगैरे वगैरे करून एकसमयावच्छेदेकरून भिजत ठेवायची, आणि जसजसे मोड येत जातील, त्याप्रमाणे आज मटकी, उद्या चवळी, परवा मूग, अशा उसळी करीत जायच्या, असे कडधान्यसप्ताह चालले होते.
याला फारशी अडचण आली नाही. मात्र, एका डब्यात बाबा आदमच्या जमान्यात ‘पटेल ब्रदर्स’, ‘अपना बज़ार’, ‘श्रीजी कॅश अँड कॅरी’, किंवा तत्सम दुकानातून आणून ठेवलेले (आणि त्यानंतर आयुष्यात न वापरलेले) कसलेतरी पांढरेफटक (रंगूनी? चूभूद्याघ्या.) वाल पडून होते, त्यांनी मात्र त्रास दिला. बोले तो, (तपशील आता नेमके आठवत नाहीत, परंतु) कितीही दिवस भिजवून ठेवले, तरी (१) मोड येईनात, (२) सडका वास मारू लागले, आणि (३) आतून हिरवा रंग दाखवू लागले. त्यानंतर जालशोध घेतला असता, तो आतून हिरवा रंग बोले तो ते वाल यापुढे खाऊ नयेत, अन्यथा मंडळ परिणामांस जबाबदार राहणार नाही, असे शुभवर्तमान कळल्याचे अंधुकसे आठवते.
तर कहाणी थोडक्यात आटोपती घ्यायची तर, (१) ते भिजवलेले वाल फेकून द्यावेत, आणि (२) डब्यातले उरलेले (कोरडे) वाल फेकून द्यावेत, असे दोन निर्णय एकमताने झाले. त्यांची अंमलबजावणी करताना मात्र, एका कुंडीत नुसतीच माती पडून होती, त्यात ‘पुढेमागे काय होईल (किंवा न होईल) ते पाहून घेऊ’-तत्त्वावर ते भिजवलेले वाल मी फेकून दिले. (डब्यातले कोरडे वाल मात्र कचऱ्यात फेकून दिले. कोठल्याही गोष्टीचे अति करू नये!)
तर, सांगण्याचा मतलब, ती फोफावलेली वेल म्हणजे आम्ही मातीत फेकून दिलेल्या त्या सडलेल्या वालबियांचा आविष्कार आहे. म्हणजे, ते ‘पुण्यस्मरणां’तून नाहीतर ‘श्रद्धांजली’ वगैरेंतून लिहितात, नाही का, की ‘दादांनु, तुम्ही एक बी लावलेत, त्याचा केवढा मोठा वृक्ष/केवढी मोठी वेल फोफावली आहे, पाहा!’, अगदी तस्से आम्हाला कोणीही (जिवंतपणी) ऐकवावे!
तर, अशी ही आमची कचऱ्यातून कला! या कलाकृतीस आम्ही (‘कडव्या वालां’च्या धर्तीवर) ‘सडके वाल’ म्हणतो.
(गंमत म्हणजे, ते वाडगाभर सडके वाल मातीत फेकून दिल्यानंतर, ‘नेकी कर, कुए में डाल’ तत्त्वास अनुसरून आम्ही त्याबद्दल विसरूनही गेलो होतो. आता जर तुम्ही कुतूहल दाखविले नसते, तर आम्ही बायकोला त्याबद्दल विचारले नसते, आणि बायकोने आमच्या कर्तृत्वाची आम्हाला आठवण करून दिली नसती. निदान या कारणाकरिता तरी तुमचे आभार मला मानलेच पाहिजेत. थँक्यू व्हेरी मच!)
रस्त्यातून चालताना आकाशात
रस्त्यातून चालताना आकाशात चंद्र दिसला. पुरेसं झूम लेन्स नसताना फोटो काढला, ज्याच्या फोटो काढायचा तो चंद्र सुरूवातीला फोटोच्या मध्यभागी होता. अगदी धनंजयला रटाळ वाटतो तसाच. फोटो काढताना एक्स्पोजरही फार जास्त दिलं गेलं. स्टँड नव्हता त्यामुळे कॅमेरा हलला आणि आकाशात मारलेले फरांटे दिसत आहेत. सबब हा फोटो डिलीट करण्यालायकीचाच आणि तद्दन भिकार आहे. अगदीच वाया जाऊ नये म्हणून इथे एक धागा सुरू केला.