इन्व्हेस्टमेन्ट बँका नक्की काय करतात?

श्री. मोदक यांच्या आर्सेलर-मित्तल वरील धाग्यात दोन्ही बाजूंच्या दिमतीला इन्व्हेस्टमेन्ट बँकर्सचा फौजफाटा होता असे म्हटले आहे. आता या इन्व्हेस्टमेन्ट बँका म्हणजे नक्की काय आणि त्या काय करतात, साध्या बँकांपेक्षा त्या कशा वेगळ्या असतात या प्रश्नांची उत्तरे या लेखातून द्यायचा प्रयत्न आहे.

कोणत्याही उद्योगाला आपला उद्योग चालवायला पैसे लागतातच. उद्योग चालवायला मालक स्वतःचे पैसे वापरू शकतात किंवा बँकेकडून किंवा अन्य कोणाकडून पैसे उधार घेऊ शकतात. यापैकी मालकांनी स्वतः उद्योगात गुंतवलेल्या पैशाला इक्विटी (equity) म्हणतात तर इतरांकडून उधार घेतलेल्या पैशांना "डेट" (debt) म्हणतात. समजा कोणा एका व्यक्तीने स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर सुरवातीच्या काळात ती व्यक्ती स्वतःचे पैसेच इक्विटी म्हणून वापरेल आणि कर्ज घ्यायला (डेट) बँकेकडे जाईल. अर्थातच बँका काहीतरी तारण ठेऊन पैसे कर्जाऊ देईल. जसा उद्योगाचा पसारा वाढेल त्याप्रमाणे एकट्या माणसाने गुंतवलेल्या पैशात ते भागायचे नाही.तेव्हा इतर कोणाला भागीदार म्हणून उद्योगात सामील केले जाईल. अर्थातच भागीदार हा थोडे तरी पैसे उद्योगात गुंतवेल आणि भागीदाराने गुंतवलेल्या पैशाच्या प्रमाणात उद्योगाचा मालकीहक्क त्या भागीदाराकडे असेल. हा भागीदारीतला उद्योग बँकेकडून पैसे उधार घेऊ शकेलच.

पण उद्योगाचा विस्तार अधिक वाढेल त्याप्रमाणे अधिक पैशाची गरज पडेल. भागीदारांची संख्या वाढविण्यावरही मर्यादा आहेत कारण प्रत्येक भागीदारावर unlimited liability असते. म्हणजेच काही कारणाने उद्योग पाहिजे तितक्या प्रमाणात पैसे मिळवू शकत नसेल तर बँकेचे कर्ज फेडायची जबाबदारी प्रत्येक भागीदारावर येऊ शकते. दुसरे म्हणजे प्रत्येक वेळी नवीन भागीदार आल्यावर किंवा सध्याचा भागीदार सोडून गेल्यानंतर परत रजिस्ट्रेशन करणे वगैरे कटकटींना सामोरे जावे लागेल. (परदेशात Limited Liability Partnership पण असतात पण माझ्या माहितीप्रमाणे भारतात तो प्रकार नाही)

या कटकटींमधून वाचण्यासाठी उद्योगाचे रूपांतर प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपनीत केले जाते.म्हणजे उद्योगाचे मालक कंपनीचे शेअरधारक बनतात. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी कमितकमी २ आणि पब्लिक लिमिटेड कंपनीसाठी कमीतकमी ७ शेअरधारक असणे गरजेचे असते.या शेअरधारकांची limited liability असते. म्हणजेच जरी कंपनी पैसे कर्जाऊ दिलेल्यांचे क्लेम पूर्ण करू शकली नाही तरी शेअरधारकांना त्याची भरपाई करावी लागत नाही. समजा मी किंगफिशर एअरलाईन्सचे शेअर घेतले असतील तर मी त्या कंपनीचा माझे शेअर आहेत तितक्या प्रमाणातला मालक झालो. तरीही कंपनीला दिलेले कर्ज वसूल करण्यासाठी बँका माझ्याकडे येऊ शकत नाहीत. एकदा कंपनी प्रायव्हेट किंवा पब्लिक लिमिटेड झाली की कायद्याच्या दृष्टीने त्या कंपनीचे त्या कंपनीच्या मालकांपेक्षा (शेअरधारकांपेक्षा) स्वतंत्र अस्तित्व असते.

प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड कंपन्यांमध्ये काही फरक आहेत. उदाहरणार्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत जास्तीतजास्त ५० शेअरधारक असू शकतात. पब्लिक लिमिटेड कंपन्यांना ते बंधन अर्थातच नाही. तसेच शेअर कोणाला आणि कसे विकता येतात यावरूनही प्रायव्हेट आणि पब्लिक लिमिटेड कंपन्यांमध्ये काही फरक आहेत.

या कंपन्यांना आपली इक्विटी वाढवायची असेल तर तीन मुख्य मार्ग आहेतः १. प्रायव्हेट इक्विटी २. Qualified Institutional Placement ३. शेअरबाजारात IPO द्वारे पैसे उचलणे. तसेच पैसे कर्जाऊ घ्यायचे असतील तर बँकेकडून पैसे कर्जाऊ घेण्याबरोबरच बाँड जारी करूनही या कंपन्या पैसे कर्जाऊ घेऊ शकतात. (या बाँडचे अनेक प्रकार असतात-- Straight bond, Floating rate bond, Convertible bond, Foreign Currency Convertible Bond इत्यादी). या कंपन्यांना पैसे उभे करायला (इक्विटी/डेट द्वारे) मदत करायला इन्व्हेस्टमेन्ट बँका असतात.

माझ्या नातेवाईकांचे महाराष्ट्रातील एका जिल्ह्याच्या ठिकाणी एक मोठा उद्योग आहे. समजा त्यांना शेअरबाजारातून पैसे उभे करायचे असतील तर त्यामध्ये काही अडचणी यायची शक्यता आहे. सर्वात महत्वाची अडचण म्हणजे सरकारी नियमांप्रमाणे शेअरबाजारात विकत असलेल्या शेअरपैकी ५०% शेअर हे सुरवातीला Financial Institutions (Mutual funds/Financial service companies सारख्या संस्थांना) विकावे लागतात.आता या संस्थांना महाराष्ट्रातील एका जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या उद्योगाविषयी (तो कितपत चांगला आहे) माहिती असायची शक्यता तशी कमीच. दुसरे म्हणजे या उद्योगाच्या मालकालाही या संस्थांविषयी माहिती असेल आणि त्यांना कधी/कुठे/कसे भेटावे याविषयी माहिती असेल असे नाही.

तेव्हा इन्व्हेस्टमेन्ट बँका या उद्योगांना आपले शेअर या संस्थांना विकायला मदत करतात. भारतात शेअरबाजार नियंत्रित करणारी संस्था आहे सेबी (Securities and Exchanges Board of India). या संस्थेच्या नियमांचे पालन करूनच कोणालाही बाजारात पैसे उचलता येतात. स्वतःचे पैसे कोणी उद्योजक वापरत असेल तर त्या पैशाचे त्याने काही केले तरी इतरांना त्याची चिंता असायची गरज नाही. पण जर सामान्य गुंतवणुकदारांकडून पैसे घ्यायचे असतील तर त्या कंपनीला आपल्या उद्योगाविषयी खूप डिटेलमध्ये माहिती सेबीला द्यावी लागते. ही माहिती देणारे document म्हणजे Red Herring Prospectus. या प्रॉस्पेक्टसमध्ये बरीच माहिती दिलेली असते. उदाहरणार्थ कंपनीचा नक्की बिझनेस काय आहे, त्या कंपनीचा इतिहास, गेल्या ३-४ वर्षांचे अकाऊंट, कंपनीवर कोणी खटले भरले आहेत का, कंपनीत गुंतवणुक केल्यास नक्की कोणते रिस्क फॅक्टर असतील इत्यादी बरीच माहिती असते. कोल इंडिया लिमिटेड या कंपनीचे Red Herring Prospectus इथे बघायला मिळेल. हे प्रॉस्पेक्टस किती मोठे असते याची कल्पना त्यावरून येईल.सेबी या Prospectus मध्ये अनेक सुधारणा सुचविते आणि हे वाचून कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य निर्णय घ्यायला लागेल ती सगळी माहिती या Prospectus मध्ये सेबी द्यायला लावते.हे Red Herring Prospectus तयार करायला इन्व्हेस्टमेन्ट बॅंका संबंधित कंपनीला मदत करतात.

इन्हेस्टमेन्ट बॅंकांचे अजून एक महत्वाचे काम म्हणजे शेअरची किंमत ठरविणे. मध्यंतरी महेश ट्युटोरिअल चालवत असलेली MT Educare कंपनी शेअरबाजारात लिस्ट झाली. त्यासंबंधी खाली दिलेल्या जाहिरातीप्रमाणे जाहिराती आपण रस्त्याच्या कडेला किंवा पेपरातून बघत असतोच.

या जाहिरातीत कंपनीच्या एका शेअरची किंमत ७४ ते ८० रूपये आहे असे म्हटले आहे.या शेअरची किंमत किती हे ठरवायला finance मधील विविध valuation techniques चा वापर केला जातो.हा फायनान्समधील थोडा advanced विषय असल्यामुळे त्याविषयी इथे लिहित नाही. इन्व्हेस्टमेन्ट बॅंका या शेअरची किंमत ठरवायला कंपनीला मदत करतात.

त्यानंतर इन्व्हेस्टमेन्ट बॅंका हे शेअर financial institutions मध्ये push करण्यासाठी विविध संस्थांच्या प्रतिनिधींना भेटतात.याला "Road show" म्हणतात.या रोड शो मध्ये इन्व्हेस्टमेन्ट बॅंकाचे प्रतिनिधी या कंपनीचा शेअर विकत घ्या अशा प्रकारची जाहिरात वित्तीय संस्थांकडे करतात.वर दिलेल्या उदाहरणात माझ्या नातेवाईकांनी समजा वित्तीय संस्थांकडे आपल्या शेअरची जाहिरात केली तर "कोण तू" आणि "कशावरून तुझा उद्योग चांगला" हे दोन प्रश्न नक्कीच उभे राहतील.इन्व्हेस्टमेन्ट बॅंका या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देतात.सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या नातेवाईकांना एकदा किंवा फारफार तर दोनदा शेअर बाजारातून पैसे उभे करावे लागतील.पण या इन्व्हेस्टमेन्ट बॅंका याच उद्योगात असतात.एका कंपनीला पैसे उभे करायला मदत केल्यावर दुसरी,तिसरी आणि इतर अनेक कंपन्यांना पैसे उभे करायला या इन्व्हेस्टमेन्ट बॅंका मदत करतात.समजा कोणत्या इन्व्हेस्टमेन्ट बॅंकेने कुठला वाईट शेअर (महागडा) मुद्दामून push केला तर त्या बॅंकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल आणि पुढच्या वेळी त्या बॅंका कोणा अन्य कंपनीच्या शेअरची जाहिरात करतील तेव्हा वित्तीय संस्था त्या बॅंकेवर विश्वास ठेवणार नाहीत.यातूनच त्या बॅंकांच्या बिझनेसवर परिणाम होईल.म्हणूनच कोणतीही चुकीची माहिती न देण्यात या इन्व्हेस्टमेन्ट बॅंकांचे हित असते.तेव्हा एखादी नावाजलेली इन्व्हेस्टमेन्ट बॅंक माझ्या नातेवाईकाच्या कंपनीच्या शेअरची जाहिरात करत आहेत यावरूनच त्या शेअरची विश्वासार्हता वाढते आणि "कोण तू" आणि "कशावरून तुझा उद्योग चांगला" या दोन्ही प्रश्नांचे उत्तर दिले जाते.

अनेकदा इन्व्हेस्टमेन्ट बॅंका complete underwriting करतात.म्हणजे त्या कंपनीचे बाजारात विकायला आलेले सगळे शेअर या बॅंका स्वत: विकत घेतात आणि ते शेअर वाढीव दराने त्या शेअर बाजारात विकतात. किंवा Best effort बेसिसमध्ये जितके शेअर विकता येतील तितके इन्व्हेस्टमेन्ट बॅंका (अर्थातच फी घेऊन) विकून देतात.

जर Qualified Institutional Placement असेल तर हे शेअर शेअरबाजारात न विकता वित्तीय संस्थांना डायरेक्ट विकायला या इन्व्हेस्टमेन्ट बॅंका संबंधित कंपनीला मदत करतात. काहीवेळा Private equity संस्थांशीही इन्व्हेस्टमेन्ट बॅंका संबंधित कंपनीची गाठ घालून देतात. (बहुतांश वेळा private equity संस्था अशा मध्यस्थाशिवाय संबंधित कंपनीशी संपर्क साधतात). त्याचप्रमाणे शेअराऐवजी बॉंड विकायचे असतील तरी हीच पध्दत थोड्याफार फरकाने अशीच चालते.

तसेच Mergers आणि Acquisitions मध्ये एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे शेअर विकत घेते.समजा "अ" कंपनी "ब" चे शेअर विकत घेत असेल तर "अ" ला ते शेअर कमितकमी किंमतीत विकत घेण्य़ात आणि "ब" ला जास्तीत जास्त किंमतीत ते विकण्यात इंटरेस्ट असतो.तेव्हा शेअरला किती किंमत मोजा हा सल्ला "अ" ला आणि कमितकमी किती किंमत घ्या हा सल्ला द्यायला "ब" ला अर्थातच वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेन्ट बॅंका असतात. (एकच बॅंक दोन्ही बाजूंची सल्लागार असू शकत नाही). आर्सेलर-मित्तलच्या गोष्टीत नेमका हा प्रकार करायला दोन्ही बाजूंच्या दिमतीला इन्व्हेस्टमेन्ट बॅंका होत्या. आता यात काय मोठेसे असे वाटू शकेल पण कंपनीच्या शेअरची किंमत ही त्या कंपनीची net worth किती यावर अवलंबून असते आणि net worth ही भविष्यात कंपनीकडे येऊ शकलेल्या cash flows वर अवलंबून असते.विशेषत: कंपनीचे assets कोळशाच्या किंवा लोखंडाच्या खाणी/ पेट्रोलियम उत्पादनाच्या विहिरी/ नैसर्गिक वायूचे साठे अशा पध्दतीच्या असतील तर त्यापासून भविष्यात किती cash flow येऊ शकेल हे projection करणे तितकेसे सोपे नसते हे लक्षात येईलच.

जगात गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅन्ले, मेरिल लिंच-बॅंक ऑफ अमेरिका, नोमूरा, क्रिडिट स्विस, बार्कलेज कॅपिटल इत्यादी अनेक इन्व्हेस्टमेन्ट बॅंका आहेत.भारतातही कोटक, आनंद राठी, एडेलवाईज यासारख्या भारतीय इन्व्हेस्टमेन्ट बॅंका आहेत.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (6 votes)

लेखाची सुरूवात वाचली. अधिक वेळ काढून शांतपणे नीट वाचते.

या विषयावर मराठीत खूप लेखन असेल असं वाटत नाही. तेव्हा अशा प्रकारच्य अधिक लेखनाची आवश्यकता वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या विषयाबद्द्ल उत्सुकता फार आहे...पण कळेल आणि थोडावेळ लक्ष खिळवून ठेवेल अशा भाषेत याबद्दल कधी वाचनात आलं नाही...एकदा वचला तुमचा लेख. थोड कळलं...आणखीन माहिती मिळवण्यासाठी चालना मिळाली.धन्यवाद.
एक प्रश्नः "श्री. मोदक यांच्या आर्सेलर-मित्तल वरील धाग्यात... " हा कोणता धागा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे हो. मी हा लेख इतरत्र आधीच लिहिला होता आणि त्या संकेतस्थळावर आर्सेलर्-मित्तल मर्जरवर एक लेख आला होता. त्या लेखाचा दुवा देत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********वि.जे.क्लिंटन**********

किचकट विषय सोप्या शब्दांत समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.

मला समजला तो भाग असा - इन्व्हेस्टमेंट बॅंकर्स हे एक प्रकारचे कन्सल्टंट कम दलाल असतात. क्ष व्यक्तींना/कंपन्यांना पैशांची गरज आहे, बाजारात काही गुंतवणुक करण्याची इच्छा असणारे य आहेत अशी परिस्थिती कायम असते. बहुतेक वेळा क्ष ची संख्या जास्त असावी. अशा वेळेला क्ष मधले दूध का दूध करणारे काही जाणकार य ना सल्ला देण्यासाठी आवश्यक असतात. य लोक त्यांचं ऐकत असल्यामुळे वेगवेगळ्या भांडवलदात्याकडे पैसे मागायला जाण्याऐवजी क्ष नासुद्धा याच सल्लागारांकडे जाणं सोपं जातं. आदर्श व्यवस्थेत इन्व्हेस्टमेंट बॅंकर्स हे बाजारातला पैसा योग्य दिशेला वळवण्यास व त्याचबरोबर खेळता ठेवतात. त्यायोगे ते मार्केट एफिशियन्सी वाढवण्यास कारणीभूत ठरतात.

आता एक प्रश्न - २००८ च्या मंदीनंतर अमेरिकेत ज्या वेगवेगळ्या गोष्टींना दोष देण्यात आला त्यापैकी एक म्हणजे - बॅंका व इन्व्हेस्टमेंट बॅंका स्वतंत्र ठेवण्याचं बंधन (ग्लास - स्टीगल ऍक्ट) ढिलं पडलं, मोकळं झालं. जर इन्व्हेस्टमेंट बॅंकेचा अर्थ वर समजल्याप्रमाणे असेल, तर इन्व्हेस्टर य हे बॅंकेत पैसे ठेवणारे ग्राहक होतात. पण त्यामुळे इतक्या प्रचंड प्रमाणात मंदी का यावी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बॅंका व इन्व्हेस्टमेंट बॅंका स्वतंत्र ठेवण्याचं बंधन (ग्लास - स्टीगल ऍक्ट) ढिलं पडलं, मोकळं झालं.

ग्लास-स्टीगल अ‍ॅक्ट रद्द केल्यामुळे conflict of interest कसे उद्भवू शकतात याविषयी गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात लिहिलेला हा लेख उपयुक्त ठरावा.

इतक्या प्रचंड प्रमाणात मंदी का यावी?

इतक्या प्रमाणात मंदी आली याचे कारण मुळातच "वेल्थ" चा नाश त्या काळात झाला.जर बँकांनी आला ग्राहक की द्या कर्ज असे धोरण स्विकारले. मग तो ग्राहक कर्ज फेडू शकेल की नाही, त्याचे तितके उत्पन्न आहे की नाही अशा फालतू गोष्टींकडे फारसे लक्ष द्यायचे नाही असे ठरविले.याची कारणे दोनः १. ते कर्ज बँकेच्या बॅलन्स शीटवर जास्त काळ राहणार नव्हतेच.ते लवकरच सी.डी.ओ च्या पुड्या करून बँकेच्या बॅलन्श शीटवरून दूर होणार होते.तेव्हा ग्राहकाने कर्ज परत केले किंवा नाही त्याचा फारसा फरक संबंधित बँकेला पडणार नव्हता. २. जागांचे भाव वाढतच असणार हा विश्वास. तेव्हा जरी कोणा ग्राहकाने कर्ज फेडले नाही तरी त्याच्या घरावर टाच आणून ते विकता येईल आणि मुळ दिलेले कर्ज नक्कीच वसूल होईल हा विश्वास होता.

तेव्हा मुळातच ज्या लोकांना कर्ज द्यायला नको होते त्यांना कर्ज दिले गेले.इतकेच नव्हे तर त्यांचे पुढे सी.डी.ओ आणि सी.डी.ओंचे सी.डी.ओ बनविले गेले.त्यातील सर्वात वरची "ट्रांच" सर्वात सुरक्षित असे समजून त्या "ट्रांच" ला रेटिंग एजन्सीकडून AAA रेटिंग आणले गेले.त्यामुळे त्यात अगदी पेन्शन फंडांनीही गुंतवणुक केली.या "ट्रांच" सुरक्षित आहेत असे समजून त्यावर ए.आय.जी सारख्या कंपन्यांनी क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप विकले.पण जेव्हा मुळातल्या ग्राहकांना कर्ज फेडणे शक्य झाले नाही तेव्हा त्यांच्या घरावर टाच आणून ती बाजारात विकली गेली.अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर घरे विक्रीस आल्यामुळे घरांच्या किंमती कोसळल्या.त्यातून दिलेल्या कर्जाचे पैसे वसूल करणे शक्य झाले नाही.झालेला तोटा सी.डी.ओ च्या माध्यमातून "ट्रांच" मध्ये गुंतवणुक केलेल्यांपर्यंत पोहोचला.अशा ट्रांच पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्यावर त्यांच्यावर विकलेल्या क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप चे पैसे देता येणे शक्य नव्हते म्हणून ए.आय्.जी ला ही दिवाळखोरी जाहिर करावी लागली.अशा पध्दतीने झालेला तोटा सर्वदूर पसरला.तसेच घर ही अत्यंत मुलभूत गोष्ट असल्यामुळे ते राहणार की जाणार हे नक्की नसताना लोकांनी इतर खरेदी, पर्यटन अशा गोष्टींवर खर्च आखडता घेतला. त्यामुळे इतर उद्योगांनाही त्याचा फटका बसला आणि मंदी सर्वदूर पसरली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********वि.जे.क्लिंटन**********

१. ते कर्ज बँकेच्या बॅलन्स शीटवर जास्त काळ राहणार नव्हतेच.ते लवकरच सी.डी.ओ च्या पुड्या करून बँकेच्या बॅलन्श शीटवरून दूर होणार होते.तेव्हा ग्राहकाने कर्ज परत केले किंवा नाही त्याचा फारसा फरक संबंधित बँकेला पडणार नव्हता.

हे काय ते नीट समजलं नाही. बँकांनी कर्जांचे विमे काढले होते आणि कर्ज बुडवल्यावर बँकांना विम्याचे पैसे मिळाले पण ए.आय.जी. सारख्या विमा कंपन्या गोत्यात आल्या इतपत समजलं. पण ही सी.डी.ओ. वगैरे समजलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सी.डी.ओ म्हणजे Collateralized Debt Obligation. याविषयी मी यापूर्वी लिहिलेला या प्रतिसादात याविषयी विस्ताराने लिहिले आहे. यात एक घोळ आहे. सबप्राईम लेंडर असे न वाचता सबप्राईम बॉरोअर असे वाचावे.तसेच या प्रतिसादात इतरही काही चुका आहेत.लेहमन ब्रदर्सने स्वतः सी.डी.ओ जारी केले असे म्हटले आहे.त्यावेळी (२००९ मध्ये) मला या सगळ्या प्रकारांची इतकी माहिती नव्हती त्यामुळे ही चूक झाली. लेहमन ब्रदर्स, Bear Stearns सारख्या संस्थांनी या सी.डी.ओ मध्ये गुंतवणूक केली होती आणि त्याचा फटका त्यांना नंतर बसला.वॉल स्ट्रीट जर्नलवरील हा दुवा उपयुक्त ठरेल.

सध्या इतकेच.हा सगळा प्रकार मला अधिक चांगल्या पध्दतीने नक्कीच समजावता येईल.वेळ मिळेल त्याप्रमाणे मी ते करेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********वि.जे.क्लिंटन**********

उत्तम लेख.. वाचतो आहे.. क्षेत्र फार परिचयाचे नसल्याने समजून घ्यायला वेळ लागेल

अवांतरः कोल इंडिया लिमिटेड या कंपनीचे Red Herring Prospectus इथे बघायला मिळेल या वाक्यातल दुवा मिसिंग आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरे हो.कोल इंडिया लिमिटेडच्या रेड हेरींग प्रॉस्पेक्टचा दुवा कामच करत नाही.तो देत आहे. दुवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********वि.जे.क्लिंटन**********

लेख आवडला.
इन्व्हेस्टमेंट बँकांची कर्तव्ये थोडक्यात आणि सुगम भाषेत सांगितली आहेत.
परंतु लेखाचे नाव 'इन्व्हेस्टमेंट बँकांची कर्तव्ये' असे हवे होते कारण त्या 'नक्की काय करतात' हे गेल्या तीन-चार वर्षात चांगलंच कळायला लागलं आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'नक्की काय करतात' हे गेल्या तीन-चार वर्षात चांगलंच कळायला लागलं आहे.
अगदी अगदी. Biggrin

लेख छान आहे. इनवेस्टमेन्ट ब्य्यांका नक्की काय करत्यात यावरही लिवा की राव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं