गंगाधर गाडगीळांचा चीनचा प्रवास

काही महिन्यापूर्वी वर्तमानपत्रातील बातमी आली होती. चीनच्या Zhejiang प्रांतातील जीनहुआ(Jinhua) गावी आणि आसपासच्या भागाला भेट देऊन, त्यांच्या सांस्कृतिक पर्यटन विषयाशी निगडीत प्रकल्पाचा एक भाग होण्याची संधी त्यांनी इच्छुकांना देवू केली होती. चीनबद्दल कोणाला कुतूहल नसते. त्यांची भाषा, लिपी, खाद्य-संस्कृती अत्यंत वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण. भरताइतकीच प्राचीन संस्कृती, तेथील बौद्ध धर्माचा प्रसार, पोलादी पडद्याआजची कम्युनिस्ट राजवट, अवाढव्य पसरेलेली चीनची भिंत. एक ना अनेक. आपल्या दिवसाची सुरवातच मुळी चहाने होते, जो चीनमधूनच आपल्याकडे ब्रिटीशांनी आणला. आपल्या बाजारात येत असलेल्या चीनी वस्तू, चीनी खाद्यपदार्थांच्या टपऱ्या, यावरून चीनचा आपल्यावर असलेला प्रभाव जाणवतो. माझ्या भारतविद्या(Indology) कोर्सचा दरम्यान बृहत्तर भारत असा विषय होता, त्यात प्राचीन काळी भारत आणि चीन मधील देवाणघेवाणीबद्दल वाचले होते. मी कधी यापूर्वी चीनला गेलेलो नसल्यामुळे आणि इतिहास, वारसा अश्या विषयांची आवड असल्यामुळे मी माझे नाव दिले होते. यथावकाश माझी निवड देखील झाली होती. पण काही कारणाना निमित्त माझे जाणे रद्द झाले. पण त्या दोन महिन्यात मी चीन बद्दल माहिती गोळा करत होतो, मीना प्रभूंचे चीनी माती पुस्तक घरात होतेच, ते परत हातात घेतले(त्यात गाडगीळांच्या ह्या पुस्तकाचा संदर्भ म्हणून उल्लेख आहे). असेच शोधता शोधता एकदा प्रसिद्ध साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांचे पुस्तक सापडले. अनंत कणेकरांनी त्यांचा रशिया सारख्या कम्युनिस्ट आणि इतर देशांचा प्रवास शब्दबद्ध केला आहे. काही दशकांपूर्वी कम्युनिस्ट देशांची प्रगती पाहून भारतातील बरेच लोक ते पाहायला जात. जसे प्रसिद्ध साहित्यिक आणि कामगार नेते अण्णाभाऊ साठे गेले. त्यांनी देखील रशिया प्रवासाचे वर्णन केले आहे. त्याच प्रमाणे प्रसिद्ध साहित्यिक गंगाधर गाडगीळ देखील चीनला जाऊन आले होते. पण ते थोडे उशिरा म्हणजे १९९१ मध्ये. म्हणजे १९८९ मध्ये तियानानमेन चौकात झालेल्या उद्रेकाच्या घटनेनंतर दोनच वर्षानंतर. त्यानिमित्ताने, त्यांनी एक छोटेखानी प्रवास वर्णन लिहिले आहे. त्याबद्दल येथे. पुस्तकाचे नाव-चीन एक अपूर्व अनुभव.

त्यांचा चीन प्रवास लेखक मंडळींच्या एका साहित्यिकांच्या शिष्टमंडळाच्या रुपाने झाला. त्यांच्या बरोवर प्रसिद्ध कन्नड लेखक एस. एल. बहिराप्पा होते असा उल्लेख आला आहे. तसेच राजस्थानी लेखक विजयदान देठा तसेच प्रसिद्ध आसामी लेखक बिरेंद्र कुमार भट्टाचार्य हेही होते. पण इतर आणखी कोण होते हे त्यांनी नमूद केले नाही.

चीनच्या भेटीत ते प्रामुख्याने चीनच्या पूर्व भागात त्यांचा प्रवास झाला. सर्वात आधी राजधानी बेजिंग. त्यानंतर शियान येथे. पुढे सुचौला गेले. शेवटी हॉंगजौ आणि शांघाय. आणि परत येताना हॉंगकॉंगला ही भेट दिली. जरी मी वर त्यांच्या प्रवासाचा कालानुक्रम दिला असला तरी, पुस्तकात कालानुक्रमाने निवेदन येत नाही. प्रस्तावनेत त्यांनी याबद्दल विवेचन केले आहे. पहिल्या प्रकरणाचे नाव पहिले वाहिले दर्शन, ज्यात त्यांनी first impression सारखी काही निरीक्षणे नमूद केली आहेत, जसे की चीन एवढा अवाढव्य देश असूनही साऱ्या देशाचे एकच घड्याळ, माओ मार्क्सवादाचा त्यांना विशेष न दिसलेला प्रभाव वगैरे. त्यानंतरचे प्रकरण बेजिंग भेटीचे आहे. भारतातून ते हॉंगकॉंगमार्गे विमानाने राजधानी बेजिंगला गेले. त्या प्रकरणात त्यांनी काही धावती निरीक्षणे नोंदविली आहेत, प्रामुख्याने स्वच्छतेबद्दलची आहेत. नंतरचे प्रकरण आहे चीनी लोकांची राहणी. त्यात आपल्याला बहुतेक माहीत असलेल्या गोष्टीचा उल्लेख आहे. तो आहे चहाचा. पाण्याऐवजी सगळे लोक कोरा चहा पीत असतात. तो सगळीकडे मोफत उपलब्ध देखील असतो. तसेच तेथे सहसा लोक दुध आहारात वापरत नाहीत हेही समजते. पण माओने चीनी लोकांची communes बनवली, त्यांना सामुदायिक जीवन जगायला लावले, आणि त्यामुळे कुटुंबव्यवस्था ढासळली. पण माओचा जमाना गेला, आणि कुटुंब हाच पुन्हा समाजजीवनाचा पायाभूत घटक झाला. विवाहसंस्थेची माहिती त्यांनी विचारली तेव्हा तेथेही हुंड्यासारखी पद्धत आहे हे त्यांना समजले. पुढच्या प्रकरणातून ते माध्यमांतून घडणारे समाजाचे दर्शन या बद्दल सांगितले आहे. पाश्चात्यांचे अनुकरण, आर्थिक सुधारणांवर भर असे त्यांना चित्र दिसले. ‘चायना डेली’ मध्ये पाकिस्तानच्या बातम्या भरपूर असत, भारताच्या मानाने. चीनमध्ये १९६६ ते १९७६ मध्ये सांस्कृतिक क्रांती(cultural revolution by gang of four) झाली, त्यात लेखकांचे, विचारवंतांचे, कलाकारांचे हाल झाले. त्याबद्दल आणि आताच्या उदार सांस्कृतिक धोरणांबद्दल त्यांना वाचायला मिळाले, जसे की सांस्कृतिक क्रांतीकाळात तियान हान(Tian Han) ह्या नाटककाराचा स्मृतीदिनाची मोठी बातमी त्यांना दिसली. Zhou Gouxing(जौ गौशिंग) या संशोधकाबद्दल, सुरुवातीला झालेला विरोध, पुढे मावळला याबद्दलही ते नमूद करतात.

त्यानंतरच्या दोन प्रकरणातून, त्यांनी बेजिंग आणि शियान, तसेच हॉंगजौ आणि शांघाय येथील साहित्यिकांच्या भेटीबद्दल लिहिले आहे. तेथील विद्यापीठे, लेखक संघटना, साहित्यिकांशी चर्चा(प्रामुख्याने सांस्कृतिक क्रांती काळात त्यांच्या छळाबद्दल) झाली. China Federation of Literary and Art Circles ने भरवलेल्या सभेत ते उपस्थित राहिले.

बेजिंगचे स्थल-वर्णन नंतरच्या दोन प्रकरणातून येते. जुने बेजिंग आणि नवीन बेजिंग असे शहराचे दोन भाग आहेत. त्यांना जोडणारा भाग म्हणजे तियानानमेन चौक, जो खूप मोठा चौक आहे. तियानान म्हणजे स्वर्गीय शांती. जुने बेजिंग म्हणजे राजवाड्यांचे, दरबार यांचे शहर. Forbidden City सुद्धा इथेच आहे. ह्या जुन्या बेजिंगचे, राजांच्या तेथील वास्तूंचे, वातावरणाचे भरपूर वर्णन आहे. ते Great Wall of China लाही भेट देऊन आले त्याचे देखील वर्णन आहे. पण नवीन बेजिंगचे काही विशेष वर्णन येत नाही. तसेच त्यांनी डॉ. कोटणीस यांची समाधी पाहिली नसावी असे दिसते. ती बेजिंग पासून १००-१२५ मैलांवर आहे असे वाचले होते. डॉ. कोटणीस हे चीन मध्ये प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या १९३८ मधील चीन-जपान युद्धाच्या वेळेस केलेल्या निस्वार्थी सेवेमुळे.

बेजिंग नंतर ते शियान येथे गेले, त्याचे वर्णन देखील दोन प्रकरणातून त्यांनी केले आहे. शियान देखील प्राचीन राजधानीचे शहर. Terracotta Army येथेच आहे. फामेनचे प्राचीन बुद्ध मंदिर त्यांनी पहिले, त्याचे वर्णन आहे. प्राचीन Silk Route येथून सुरु होतो. शियान मध्ये बुद्ध धर्माचे, बुद्ध उपासनेचे विस्मयकारी दर्शन त्यांना झाले. शियानचा वास्तव्यात त्यांना एका चीनी नाट्य-नृत्य पाहायला मिळाले, जे प्राचीन Tang राजघराण्यातील सम्राटाच्या प्रेयसीची होती. गाडगीळांना चीन मध्ये नाट्यगृहे विशेष पाहायला मिळाली नाहीत. चीनचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अक्षरचित्रकला किंवा सुलेखन-कला(calligraphy, calligraphist) जी बरीच जुनी आहे आणि ती परंपरा अजूनही जिवंत आहे. त्याच्या कलेचे दर्शन त्यांना शियान भेटी दरम्यान दयान स्तुपावर(Dayan Pagoda) झाले.

पुढची दोन प्रकरणे हॉंगजौ ह्या निसर्गरम्य गावाच्या भेटीबद्दल आहेत. हॉंगजौपासून जवळच चीनच्या Lu Xun या प्रसिद्ध साहित्यिकाच्या Shaoxing या गावी ते गेले, जो १९३६ मध्ये मरण पावला. चीन मधील त्याचे स्थान रशियातील गॉर्की सारखे आहे असे ते नमूद करतात. तो Fourth May Movement या १९१९ मधील सांस्कृतिक चळवळीचा पुरस्कर्ता होता. त्याचे स्मारक, घर, संग्रहालय इत्यादी त्यांनी पाहिले. Floating Wine Cup या अनोख्या मद्यपान सोहळ्याचा अनुभव त्यांनी घेतला. तेथे त्यांनी चहाचे संग्रहालय देखील(China National Tea Museum) पाहिले. तेथे त्यांना चहाचा इतिहास, त्याचे चीन समाजजीवनात असलेले स्थान, चहा करण्याच्या पद्धती पाहायला मिळाला, आणि वर चहा चाखायलादेखील मिळाला. पर्ल बकची The Good Earth ही चीनच्या पार्श्वभूमीवर असलेली कादंबरी मध्यंतरी वाचायला घेतली होती, त्यात पहिल्याच पानावरील प्रसंगावरून चहाचे चीनच्या समाजात असलेले महत्व अधोरेखित करते, आता ती कादंबरी आता संपवायची उत्सुकता आहे. हॉंगजौ येथील West Lake येथेदेखील गेले आणि पौर्णिमेच्या रात्रीच्या चंद्राचे प्रतिबिंब, इतर अनेक दिव्यांसोबत असलेला देखावा त्यांनी पहिला. त्यांचा प्रवासाचा शेवटचा टप्पा होता, शांघाय, त्याजवळचे सुचौ(Suzhou). शांघाय हे आधुनिक शहराचे रूप त्यांना दिसले, तसेच १९४१ फ्रेंच, इंग्रज व्यापाऱ्यांचे तेथे वर्चस्व होते, त्याच्या खाणाखुणा त्यांना दिसल्या. ब्रिटीशांनी लादलेल्या Opium War चा उल्लेख येतो. त्यांना शांघाई मधील तेव्हाचे French Club(आताचे Okura Garden Hotel) या प्रसिद्ध हॉटेलमध्ये राहायला मिळाले. त्यांनी एका स्टेडीयम मध्ये कसरतीचे(Acrobatic Shows) खेळ देखील पहिले. त्यानंतर सुचौला गेले, जे शांघायजवळचे प्राचीन शहर आहे, २५०० वर्षांचा इतिहास आहे. त्याला चीनचे, आशिया खंडाचे व्हेनिस म्हणतात, कारण तेथे असलेले कालवे. पण ते त्यांना विशेष आवडलेले दिसत नाही, कारण ते केरळचे backwaters सुंदर आहेत असे ते नोंदवतात. सुचौ मध्ये १००हून अधिक प्राचीन उद्याने आहेत, त्यातील काही त्यांनी पाहिली.

तर असे हे पुस्तक, चीनच्या प्रवासावारचे. वाचकाला चीनची, तसेच तिथल्या संस्कृतीचे, साहित्यविश्वाचे धावती भेट घडवणारे. चीनची गंगा नदी यांगत्से नदीमध्ये असलेली Three Gorges घळी त्यांनी पाहिलेली दिसत नाहीत. त्या आता नाहीत, कारण ह्या चीनने बांधलेल्या Three Gorges Dam या महाकाय धरणामुळे त्यांचे पूर्वीचे रांगडे सौदर्य आता राहिलेले नाही असे म्हणतात. मध्ये ही दिवसांपूर्वी चीनच्या त्या प्रांतातील सरकारचे काही प्रतिनिधी पुण्यात आले होते. पुणे आणि जीनहुआ शहर दोघांमध्ये मैत्री करार झालयाचे समजले. आणि हे चांगलेच झाले. चीनी भाषा देखील बरेचजण शिकत आहेत. त्या सर्वामुळे चीनभोवती असलेले गुढ वलय कमी होण्यास मदत होईल. आता मी जीनहुवा प्रकल्पाच्या पुढच्या तारखेची प्रतीक्षा करत आहे. पाहूया कसे जमते.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्त लेख.

चीनी भाषा देखील बरेचजण शिकत आहेत.

कुठे शिकता येते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

चांगली माहिती गोळा केलीत. ओस्ट्रेलियाच्या ABC चानेलवर एक मालिका चीनवरती दाखवली होती ती बहुतेक नेटवर आहे. त्यांना कोळसा ( ओस्ट्रेलियात बराच आहे) वापरायचा नाही तो चीन नेतेय. तो जाळून वीज निर्मिती करतात. सर्व दाखवलय.
तुम्हाला लवकरच संधी मिळो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0