'पुसी रायट' आणि पुतिनचा रशिया

रशियात व्लादिमिर पुतिन यांच्या सत्तेला विरोध करणार्‍या 'पुसी रायट' नावाच्या गटातल्या तीन महिलांना गुंडगिरी केल्याबद्दल आज दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. 'पुतिन यांच्या जुलमी एकाधिकारशाहीचं दर्शन' असं जगभर या शिक्षेचं वार्तांकन होत आहे. रशियात गेले कित्येक दिवस सरकारविरोधातल्या मोर्चांना पोलिसी बळानं रोखलं जात आहे. 'पुसी रायट'नं विरोधासाठी निवडलेलं माध्यम मात्र त्याहून वेगळं होतं. रंगीबेरंगी, बालिश म्हटले जातील असे कपडे आणि ओळख लपवण्यासाठी माकडटोप्या घालून सार्वजनिक ठिकाणी कर्कश गाणी म्हणत त्यांनी सरकारला विरोध दर्शवला. त्यामुळे माकडटोपी हेच एक सरकारविरोधाचं प्रतीक बनलं. गेल्या निवडणुकीत ख्रिश्चनांनी पुतिनना पाठिंबा द्यावा म्हणून किरिल या ख्रिस्ती धर्मप्रमुखांनी आवाहन केलं. त्यानंतर 'पुसी रायट'च्या काही मुलींनी मॉस्कोतल्या एका चर्चमध्ये एक गाणं म्हटलं. चर्चमधल्या गाण्याचं चित्रीकरण वापरून बनवलेला म्यूझिक व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध झाला आणि हांहां म्हणता लोकप्रिय झाला. पुतिनची सत्ता आवरण्यासाठी व्हर्जिन मेरीला त्यात आवाहन केलं होतं. यानंतर 'पुसी रायट'च्या तिघींना अटक झाली. त्यांच्यावरच्या खटल्याचा आज निकाल लागला. खटला ज्या पद्धतीनं चालवला गेला त्याबद्दल अनेकांना आक्षेप होता. सरकारविरोधाच्या मुद्द्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून धर्मभ्रष्ट वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला. त्यांचे भडक कपडेसुद्धा ख्रिस्ती धर्माच्या विरोधात होते असं म्हटलं गेलं. अनेकांना या अजब खटल्यावरून कम्युनिस्ट काळातल्या रशियात सरकारविरोधकांवर जे खटले चालवले जात त्यांची आठवण आली. फक्त आजच्या माध्यमस्फोटाच्या जमान्यात ते जगापासून लपवणं अशक्य झाल्यामुळे यात पुतिन सरकारची अब्रू चव्हाट्यावर आली असं पाश्चिमात्य जगात म्हटलं जात आहे.


शिक्षा झालेल्या २३, २४ आणि २९ वर्षं वयाच्या 'पुसी रायट' स्त्रिया

दुर्लक्ष करून सोडून देण्याइतकी किरकोळ गोष्ट इतक्या क्रूरपणे चिरडून टाकण्याच्या रशियन सरकारच्या खाक्यामुळेच आज ती इतक्या मोठ्या पातळीवर जगात चर्चिली जात आहे. यात 'पुसी रायट'चाच एक प्रकारे विजय झाला आहे असं मानलं जात आहे. त्यांच्या गटाचं नाव (जे अनेक आदरणीय प्रसारमाध्यमांत उच्चारतादेखील येत नाही!), माकडटोप्या अशा गोष्टींच्या मदतीनं या गटानं तरुणांना आकर्षित केलं आहे, तर खटल्यात आणि बाहेर आपली बाजू मांडताना जोसेफ ब्रॉड्स्कीसारख्या जुन्या आणि सुप्रसिद्ध रशियन बंडखोरांचे संदर्भ घेत त्यांनी बुद्धिवाद्यांना आपल्या बाजूला आणलं आहे. 'पुसी रायट' आजच्या काळातल्या माध्यमप्रवीण बंडखोर आहेत हे स्पष्ट आहे. या प्रकरणामुळे रशियात काही चांगला बदल होईल का हे काळच ठरवेल. जेमतेम मिनिटभर चर्चमध्ये नाचण्याबद्दल तीन स्त्रियांना दोन वर्षं तुरुंगात घालवायला लागणार एवढंच आज तरी नक्की आहे.

'ह्यूमन राईट्स वॉच' या संस्थेचं निवेदन
(याविषयी पुष्कळ बातम्या आंतरजालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे बातम्यांचे दुवे दिलेले नाहीत. एखादी विशेष रोचक बातमी मिळाली तर ती या धाग्यावर द्यावी.)

ताजा कलम : खटल्याच्या सुनावणीच्या ठिकाणी गेलेल्या जगप्रसिद्ध बुद्धिबळ खेळाडू आणि पुतिनविरोधक गॅरी कास्पारॉव्हला पोलिसांनी 'चावा घेतल्याबद्दल' अटक केली. अटक करताना आणि पोलीस ठाण्यात त्याला मारहाण झाली आहे असं म्हटलं जात आहे. आता त्याची पोलीस ठाण्यातून सुटका झाली आहे, पण आपल्या विरोधकांना चिरडून टाकण्याच्या पुतिन सरकारच्या उद्दाम वर्तनाचाच हा आणखी एक नमुना आहे असं म्हटलं जात आहे.

कास्पारॉव्हला पोलीस उचलून नेताना -

सर्व छायाचित्रांचे प्रताधिकार - © 2012 Guardian News and Media Limited.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

हम्म्म...
कास्पारोवला अटक करून वॅनमधून नेतानाचे फोटो पहिले... त्याला तीन पोलीस बडवत असावेत असे फोटोवरून वाटले.. ही पुसी रायटची भानगड आत्ता वाचल्यावर नीट कळाली... धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच्या माध्यमस्फोटाच्या जमान्यात ते जगापासून लपवणं अशक्य झाल्यामुळे यात पुतिन सरकारची अब्रू चव्हाट्यावर आली असं पाश्चिमात्य जगात म्हटलं जात आहे.

हे कधीतरी व्हायचंच होतं. माध्यमस्फोटामुळे जी क्रांती सध्या चालू आहे त्यामुळे इक्वेशनं बदललेली आहेत. उंदराची टोपी हिसकावली तर 'ढुम ढुम ढुमाक' करत तो गात सुटतो. आणि आजकाल तो आवाज थांबवता येत नाही. मग टोपी परत दिली तरीही राजा भिकारीच ठरतो. त्यामुळे इथून पुढे हळूहळू राज्यकर्त्यांचा जुलमीपणा कमी होईल अशी आशा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

“First they ignore you, then they laugh at you, then they fight you, then you win.” -- महात्मा गांधी.

कॅस्परॉव्हचा व्हीडीओ बीबीसीच्या संस्थळावर पाहिला. त्या बातमीत म्हटल्याप्रमाणे त्याला अटक का झाली हेच त्याला अटक करताना सांगत नव्हते. त्याला शब्दशः उचलून पोलिसांच्या गाडीत नेतानाचा हा व्हीडीओ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.