Skip to main content

ओंजळ

तुझ्या माझ्या सोबतीचे
क्षण अजून संपले नाही
ओंजळीत तुझ्या स्वप्ने
अजून माझी उरलीत काही

आठव ते क्षण कसे
सोबत असताना उडून जायचे
निरोप घेतल्यावर सुद्धा
काही बोलणे राहून जायचे
ओठांमध्ये तेच शब्द,
माझ्यासाठीचे उरलेत काही..१

हातात गुंफून हात त्या,
सांजा हलकेच निघून गेल्या
जाता जाता गहिऱ्या,
आठवणी मागे ठेवून गेल्या
भूतकाळातल्या असल्या तरी,
आठवणी अपूर्ण राहिल्यात काही...२

आयुष्यातून गेली नाहीस,
डोळ्यात अजून आहेस उरलेली
निरोप घेतला असलास तरी,
भेट अजून नाही सरलेली
डोळ्यात तुझ्या माझ्या वाट्याचे
अश्रू अजून उरलेत काही... ३

राव पाटील Thu, 12/10/2017 - 02:37

In reply to by सामो

माझे पहिले आंतरजालीय प्रकाशन, आणि तब्बल ६ तासांनंतर आलेली पहिली प्रतिक्रिया.. लक्षात ठेवू.

गहिरे हा शब्द फार वापरत नाहीत का? प्रमाण मराठीत 'खोलवर' असा अर्थ आहे, खान्देशात (अहिराणीत) 'खूप' अश्या अर्थाने वापरतात. काही सूचना असल्यास नक्की कळवा.

अबापट Thu, 12/10/2017 - 05:27

In reply to by राव पाटील

तब्बल सहा तासांनी प्रतिक्रिया आली ( म्हणून ?) लक्ष्यात ठेवू असे का म्हणताय हे कळले नाही . (म्हणजे प्रतिक्रिया लवकर आली की उशिरा असं वाटतंय आपल्याला

तिरशिंगराव Thu, 12/10/2017 - 09:05

In reply to by राव पाटील

ऐसीवर अशा सहजासहजी प्रतिक्रिया येत नाहीत हो. काही राजकीय, अर्थशास्त्रीय, विचारवंतीय असं काही लिहिलं तरच पिंडाला कावळा शिवतो. फिक्शनला फारसे कोणी शिवत नाहीत. त्यातून शिवलेच, तर ते लेख, कथा,कविता याच्याशी अजिबात संबंधित नसते. पिंडाला नुसते शिवून, नंतर आपापासांतल्या गप्पा असतात त्या. येतील असे अनुभव तुम्हालाही अगदी गहिरे!

राव पाटील Thu, 12/10/2017 - 09:48

In reply to by तिरशिंगराव

मी साधारण दीड ते २ वर्षांपासून नियमित पणे ऐसी, मिपा, मायबोली वाचतो. केवळ आळशीपणा खच्चून भरला असल्याने, सदस्यत्व घेतले नव्हते. त्यामुळे प्रतिक्रिया मिळविणारे लेखन कोणते, प्रतिक्रियांसाठीच केलेले लेखन कोणते ते थोडेफार समजले आहेच.

कसं आहे की, जन्म झाल्यानंतर बाळ रडलेच नाही तर मेले की काय अशी शंका येत होती. म्हणून किमान पहिल्या प्रतिसादाची प्रतीक्षा होती.