Skip to main content

शैक्षणिक तंत्रज्ञान 1

आम्ही अमेरिकेतले 'मागासलेले' पालक असल्यामुळे आपल्या मुलाला ६ वर्षाचा होई पर्यंत फोन, टॅबलेट वगैरे पासून दूरच ठेवलं होतं. टीव्ही कधी दाखवला, तर त्यावर वेळेचं बंधन असायचं, आणि मनामध्ये प्रचंड अपराधीपणाची भावना, कारण तिकडे स्वयंपाक करतांना मध्ये लुडबुड नको म्हणून टीव्हीचा "बेबीसिटर" लावला जायचा. काही पालक कौतुकाने 'आमचा गोटू किनई, २ वर्षाचा झाल्यापासूनच, किल्ली लावून आपला आपला फोन उघडू शकतो, आणि YouTube चा लाल त्रिकोण ओळखणं, त्याला A B C D च्या ही आधीपासून येतंय!" असे गौरवोद्गार काढू लागले, कि मला रडू यायला लागायचं, कारण, एकीकडे मी स्वयंपाका साठी, लांबच्या प्रवासा साठी, 'सोयीचं तंत्रज्ञान' वापरत च होते, पण दुसरीकडे त्याला हे तंत्रज्ञान 'शिकवणं' किंवा शिकू देणं, हे मात्र मला जमलं नव्हतं! टीव्ही लावून मी देणार, फोन उघडून मी देणार- ह्या किल्ल्या मी मुद्दाम स्वतःच्या हातातच ठेवल्या होत्या, पण त्या काढून घेण्याची 'हुशारी' माझ्या पोराला सुचत का नाही, ही नसती काळजीपण मलाच सतावत होती!!!

आणि अशा ह्या मुलाला, पहिल्या वर्गात, शाळा सुरु झाल्या झाल्याच, शाळेकडूनच Chromebook वापरण्याचा धडा मिळाला. "आई! माझं Username मी तुला सांगेन, पण पासवर्ड नाही सांगणार बरं का?" पोरगं उत्साहाने सांगत आलं, तेव्हाच माझ्या मेंदूतले दोन भाग कोणीतरी दोन वेगळ्या दिशांना खेचतंय असं वाटू लागलं! लहान मुलांचं शिक्षण, आणि त्यात तंत्रज्ञानाचा वापर, ह्या विषयी सध्या दोन, अतिशय परस्परविरोधी प्रवाह रूढ आहेत:

१. मुलांना २ वर्षांपर्यंत फोन, टॅबलेट वगैरे 'स्क्रीन' दाखवू नये. ते त्यांच्या भावनिक विकासाच्या आड येतं. एकलकोंडेपणा वाढतो. लहान मुलं अनुकरणातून, मोठ्यांशी होणाऱ्या संवादातून शिकतात, त्यामुळे टीव्ही किंवा फोनमधून मिळणाऱ्या ज्ञानाच्या एकमार्गी प्रवाहाने त्यांची सर्वांगीण प्रगती खुंटते.

२. आपल्या पालकांनी ज्या नोकऱ्या केल्या, त्या आपण करत नाही, तसेच आपल्या आजोबांच्या वेळी लागणारी कौशल्ये (skills) आपल्या पिढीसाठी अगदी निरुपयोगी ठरली. त्याच प्रमाणे, आपल्या मुलांनी २१व्या शतकात तगून राहावे असे वाटत असेल, तर त्यांना लागणारी कौशल्यं तंत्रज्ञानाशीच जोडलेली असल्यामुळे, त्यांना तंत्रज्ञान शिकवणे गरजेचे आहे.

विशेषतः भारतात माहिती-तंत्रज्ञानाने आणलेल्या सुबत्तेमुळे, तंत्रज्ञान हे सगळं चांगलंच आहे, आणि तंत्रज्ञानाशिवाय प्रगती शक्य नाही, तेव्हा तंत्रज्ञानाला पर्याय नाही, हे निर्विवाद सत्यच मानलं जाऊ लागलं आहे. अमेरिका मात्र त्यापुढे जाऊन, काहीशी अलिप्तपणे माहिती-तंत्रज्ञानाकडे बघत, चांगल्या-वाईटाचा शहानिशा करण्याच्या प्रयत्नात आहे. मी एक शिक्षिका, तसेच पालक, ह्या दुहेरी भूमिकांमधून जात असल्यामुळे ह्याविषयी माझी काही निरीक्षणे आज इथे व्यक्त करावीशी वाटताहेत.

१. तंत्रज्ञाच्या वापराने आपल्या मेंदूमध्ये घडणारे बदल आपण अजून पुरते समजून घेऊ शकलेलो नाही. आफ्रिकेत एक आदिवासी जमात, त्यांच्या अचूक 'दिशाज्ञाना' साठी प्रसिद्ध आहे. जंगलातून वाट काढण्यासाठी त्यांच्या मेंदूमध्ये दिशाज्ञान कायम कार्यरत असतं, त्यामुळे अगदी डोळे बांधून त्यांना कुठल्या खोलीत सोडलं, तरी ते घराची दिशा अचूक सांगू शकतात म्हणे! मोबाईल आल्यापासून आपल्याला एकमेकांचे दूरध्वनी क्रमांक लक्षात राहत नाहीत. तसेच ईमेल आल्यापासून 'लिहिणं' बंद झालंय! ह्या बदलांमुळे आपल्या मेंदूतल्या न वापरल्या गेलेल्या जागा 'बंद' पडत चालल्या आहेत.

उलट नवीन कौशल्य, जसे कि इंटरनेट वर कुठली माहिती कुठे मिळाली, हे लक्षात ठेवणं आजच्या पिढीसाठी जास्त महत्वाचं आहे. माझ्या पहिलीतल्या मुलाला लिहिता येणं, चांगलं अक्षर काढता येणं, हे किती महत्वाचं आहे? हे आज कोणीच सांगू शकत नाही, कारण कदाचित १५ वर्षांनी त्याला एकहि पेपर लिहून सोडवावा लागणार नाही. मात्र, हातात पेन्सिल किंवा ब्रश धरून अचूक आकार काढता येणं जर जमलं नाही, तर इतर कुठल्या जीवनोपयोगी कौशल्यांवर त्याचा परिणाम होईल, हे आज आपल्याला कळू शकत नाही, आणि केवळ काहीतरी हरवल्यावरच त्याचं अस्तित्व/महत्व जाणवलं, तर काय करणार? ही भीती उरतेच. प्लेटो म्हणाला की लेखन सुरु झाल्यावर 'स्मरणशक्ती' ची गरज उरणार नाही, तसाच हा प्रकार आहे...

२. माहिती साठवणं हे स्मरणशक्तीचं काम आहे, तर ते सहज कंप्यूटरकडे सोपवलं जाऊ शकतं... मात्र त्या माहितीचं संकलन करून, उपयोग करून नवीन कल्पना काढणं, त्या राबवणं, हे मानवी मेंदूचं काम आहे. मेंदूची शक्ती स्मरणात वाया न घालवता संकलनासाठी/निर्मितीसाठी मोकळी ठेवणं शक्य होऊ लागलंय. तंत्रज्ञानामुळे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत हा मोठा फरक पडलाय, आणि तो स्वीकारणं गरजेचं आहे.

मात्र, मूलभूत शिक्षणात, आपल्या स्मरणशक्तीतुन संकलन--> उपयोग कसा करायचा, हे न शिकवताच पुढची पायरी गाठायचा प्रयत्न करणे म्हणजे 'माकडाच्या हाती कोलीत' दिलं जातंय. विशेषतः चार ठिकाणची माहिती मिळवून तीच पुन्हा 'स्वतःच्या' निबंधात चिकटवण्याची कला नवीन पिढीने चटकन आत्मसात केलीये, पण ह्या विचारहीन Content Generation चा परिणाम खोट्या बातम्या पसरणे, मूलभूत संकल्पना स्पष्ट नसणे- अशा अधोगतीत होतो आहे. अमेरिकेत आज ह्या विचारहीन तंत्रज्ञानाचे परिणाम आज दिसतायत, जे भारतात अजून २० वर्षांनी दिसू लागतील. म्हणून नवीन शैक्षणिक तंत्रज्ञान आंधळेपणाने स्वीकारलं जायला नको, असं मला कळकळीने वाटतं.

३. मुलांना तांत्रिक 'खेळण्यांची' आवड असते. लिहायचा कंटाळा येतो, पण टाईप करायला मजा येते, तेव्हा कधी प्रोत्साहन म्हणून, तर कधी सोयीचा उपाय म्हणून, Substitution केलं जातं. शिकवतांना, किंवा शिकतांना, एका वेगळ्या माध्यमाचा वापरही वेगळ्या तऱ्हेने व्हायला हवा, हे अजून शिक्षकांनाच कळलेलं नाही, तर पोरांना कसं कळणार? Ruben Puentedura यांनी विकसित केलेल्या SAMR मॉडेल प्रमाणे, शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर केवळ 'नगास नग' पद्धतीने न करता, त्यातून मुलांना विश्लेषण, प्रकटीकरण, अन्वय काढता येणं हे अपेक्षित आहे.

४. शिक्षणाचा केवळ वेग आणि व्याप्ती वाढवतांना, खोली (depth) मात्र आपण नष्ट करत चाललो आहोत: पुलंच्या "बिगरी ते मॅट्रिक" मधल्या दामले मास्तरांना पहिली ते सहावी सगळे वर्ग शिकवता येत होते, तो काळ कधी च मागे पडला. आजकाल गणित आणि विज्ञानच नव्हे, प्रत्येक क्षेत्राची इतकी जास्त माहिती उपलब्द आहे, आणि ती मुलांच्या गळी उतरवण्याची इतकी घाई आहे, की 'सुसंगत विचार कसा करायचा' हे शिकवायला कोणाकडे वेळ उरला नाहीये. त्यातच, शैक्षणिक क्षेत्रासाठी नवीन सॉफ्टवेअर, नवीन ऍप्स बनवणाऱ्यांचा बाजार सतत त्यांचं promotion व marketing करण्यात पुढे आहे. खुद्द सर्वव्यापी गूगल सुद्धा "शाळेने आमचं सॉफ्टवेअर वापरावं" ह्यासाठी प्रयत्नशील आहे.

खोटं वाटेल, की आजची पिढी आधीच्या सगळ्यांपेक्षा जास्त वाचते-लिहिते आहे, पण ही मुलं जे वाचतात, आणि जे लिहितात- ते मात्र फार वेगळं आहे. २४० अक्षरांत बसतील इतपतच विचार, आणि सहज मिटवता येतील, अशा Snapchat वरील उक्तींमध्ये शब्दसामर्थ्य, किंवा टिळक/आगरकर/अत्र्यांप्रमाणे प्रदीर्घ मुद्देसूद मत-मांडणे शोधायला जाऊ नका, सापडणार नाही.

माहिती, आणि तंत्रज्ञान हे दोन अतिशय महत्वाचे शब्द, पण आपण त्यांच्या आहारी जाऊन शिक्षणपद्धतीची नासाडी न करता ते डोळसपणे स्वीकारले पाहिजेत असं मला वाटतं. भाग दोन/तीन मध्ये अजून विवेचन करण्याचा प्रयत्न आहे

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

चिमणराव Tue, 24/04/2018 - 05:54

शाळेत कसं आणि काय शिकवायचं याविषयी शिक्षकांना स्वातंत्र्य नसतं.
अमुकएक पद्धतीने इतके विषय शिकवणारे मोठे लोक बरोबरच असतील हे कोणी ठरवायचं?
भारतात पहिली ते एंजिनिअरिंगचे कोचिंग क्लासेसचं खूळ सत्तरीनंतर फोफावलं. तयार उत्तरं देण्याची सवय लावलेल्या पिढीची मुलंही क्लासला जाणारच. परदेशातल्या Shaum searies सारखी पुस्तकं वाचली अभ्यासली जाणार नाहीत.

डॉ नफ़ारिओ Tue, 24/04/2018 - 06:03

ऐसी अक्षरे वर नवीन आहे, काहे चुकत असल्यास सांगावे.

तंत्रज्ञानाचा एक मोठा फायदा हल्लीच मुलाच्या शाळेत लक्षात आला. त्याच्या पहिलीच्या वर्गात शिक्षिकेने ग्रेडिंग केले तेव्हा ग्रेड लेव्हल थ्री पासून बिलो ग्रेड लेव्हल अशा आकलन क्षमतेची मुलं आहेत हे समजलं. (मी एक दिवस मदत करायला जातो, त्यामुळे कोणाला कशा मदतीची गरज आहे हे फर्स्ट हॅन्ड दिसलं). एक उदाहरण म्हणून शव्द उच्चार करून वाचणे (अक्षरे साउंड आउट करून शब्द वाचणे) आणि मग सोप्या कडून कठीण साउंड कार्डचा वापर करून नवे/ माहित नसलेले शब्द वाचणे ही वाचनाच्या दृष्टीने एक महत्त्वाची क्षमता आहे. यात तंत्रज्ञान वापरून कोणाला कुठला शब्द वाचण्यात मदत हवी आहे, आणि मग तो/ त्याप्रकारचे शब्द परत परत वाचायला देऊन तो पाठ पक्का करणे हे तंत्रज्ञानाने सहज शक्य होते असं वाटलं. एका शिक्षकाला वर्गातील २४ मुलांमध्ये त्यांच्या त्यांच्या काठीण्यपातळी नुसार चॅलेंज करून त्यांच्या गतीने घेऊन जाणे, आणि जोपर्यंत येत नाही तोपर्यंत न कंटाळता ते करत राहाणे यात ते app खूपच मदत करतंय असं मला वाटलं. अर्थात वारंवार रीकॅलिबरेट करणे आणि वेगळ्या प्रकारे मदत करणे हे शिक्षकाचे काम आहेच पण ते करण्याला त्याला/ तिला जास्त वेळ मिळू शकतो.

फूलनामशिरोमणी Tue, 24/04/2018 - 07:37

In reply to by डॉ नफ़ारिओ

मला असं वाटतं, की शैक्षणिक तन्त्रद्न्यानाचा प्रयोग अधिकाधिक 'व्यक्तिसापेक्ष' शिक्षण देण्यासाठी करणे योग्यच आहे. फक्त, ह्या मुलांचं 'वर्गीकरण' करुन एकीकडे व्यक्तीसापेक्षतेचा डंका बडवायचा, आणि दुसरीकडे, त्याच ॲपमधील 'डेटा' गोळा करून, मुलांच्या 'स्कोअर वरून' शिक्षकांची "प्रगतीपुस्तकं" लिहायची, पण शिक्षक-विद्यार्थ्यांच्या 'व्यक्तीसापेक्ष-रसायनाला' गृहित धरायचे नाही, हा मला थोडा दांभिकपणा वाटतो. (विशेषकरून भाषा-शिक्षणासारख्या सापेक्ष विषयात.)

थोडक्यात, आत्ता 'आई म्हणून' लहान मुलांना तंत्रद्न्यानातुन शिकवणं हे बरोबर वाटत असलं, तरी प्राध्यापिका म्हणून तंत्रद्न्यानात वाढलेली मोठ्या मुलांची पीढी बघून भीती वाटते. हे माझे विद्यार्थी शैक्षणिक तंत्रद्न्यानाचे पहिले 'बकरे' / 'भोक्ते' आहेत. त्यांच्यावेळी हे सगळं नवीन होतं. त्यामुळे शिक्षकांनीपण तेव्हा फार डोळसपणे नवीन गोष्टी न वापरता, सगळीकडे नवीनतेचा उदोउदो होत असल्यामुळे, तोच पंथ आपोआप धरला, किंवा, बहुधा 'सोय' बघून, 'वाहत्या पाण्यात हात धुतले'. शिवाय, हे नवीन प्रकार आत्मसात नाही केले, तर आपल्यावर 'कालबाह्यतेचा' शिक्का बसेल, ही धास्ती पण होती, आणि आहेच.

कुठलीही गोष्ट 'आत्मसात' करण्यापूर्वी प्रत्येकाला, ती गोष्ट स्वत:साठी 'चालवून' बघता येण्याचं स्वातंत्र्य ही तंत्रद्न्यानाची टूम शिक्षकांना देत नाही, असं वाटतं. आणि त्यातुन आलेले अनुभवांचं 'सरसकटीकरण' केलं जातं, जसं माझ्या लेखाबद्दल होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच दुसरा भाग लिहिलाय. तो ही इथे टाकते. शिवाय, तिसरा (समारोप) पण लिहायचा आहे. बघते कसं जमतंय.

माझ्या मुलाला सुरूवातीला हे व्यक्तीसापेक्ष ॲप्स अतिशय आवडले होते. पण वर्षाच्या शेवटाला, शिक्षिकेने दिवसातला बराच वेळ आपलं काम सोयीस्कररित्या ॲप्सवर सोपवलं आहे, त्यामुळे तो (चांगला वाचक/गणीत आवडणारा असूनसुद्धा) ॲप्सला कंटाळला आहे. त्याच्यासाठी तो अभ्यासच आहे, आणि अशा प्रकारचा अभ्यासही जास्त नीरस वाटतो, कारण त्यात मित्रांचा 'सहानुभव' नाही, कि आपल्याला जे येतंय, ते वर्गासमोर मांडून त्यातुन कौतुक-प्रेरणा मिळत नाही.
तसंच, मला अतिशय आश्चर्य वाटतं याचं, की माझे विद्यार्थीपण ह्या 'तांत्रिक शिक्षणाला' कंटाळले आहेत, किंवा त्याचा दुरुपयोग करू लागले आहेत, जसे की, सबबी सांगणे.

डॉ नफ़ारिओ Tue, 24/04/2018 - 12:50

In reply to by फूलनामशिरोमणी

पण मग तो त्या app चा दोष ना? शाळेच्या सुरूवातीला भरायच्या फॉर्म मध्ये घरात इंग्रजी सोडून इतर भाषा बोलली जातेला चेक केल्याने स्टेटच्या नियमानुसार इंग्रजी लर्निंगसाठी एक स्टेटने सांगितलेल्या app वर 20 मिनिटे आठवड्यातून चार वेळा घालवणे आवश्यक आहे. त्याला ARचा वेळ त्यात घालवावा लागतो सो तो पण कंटाळला. गेल्या पेरेंट टीचर मिटींगला आम्ही तो विषय काढला तर टीचरने ते घरी केलं तर चालेल सांगितलं.
यावयात कंटाळा आला तरी एखादी गोष्ट करणे आवश्यक आहे, सो ती केली पाहिजे. त्यातून पळवाट मिळणार नाही हा संदेश त्यातून तो शिकेल असा सकारात्मक विचार आम्ही केला.
रीडिंग साठी ते जे app वापरतात ते खूप आवडते कारण एक ठराविक पुस्तके वाचून झाली पुढची लेव्हल मिळते आणि महिन्याच्या स्पिरिट असेंम्बलीत उभं राहून नाव वाचून दाखवतात.
अजूनतरी फक्त app एके app झालेलं दिसलं नाही. ते होत असेल तर नक्कीच वाईट.

-प्रणव- Tue, 24/04/2018 - 07:46

मुलांना २ वर्षांपर्यंत फोन, टॅबलेट वगैरे 'स्क्रीन' दाखवू नये. ते त्यांच्या भावनिक विकासाच्या आड येतं. एकलकोंडेपणा वाढतो

अजून काही कारणं या लेखात दिसतील
http://www.janetlansbury.com/2010/04/baby-interrupted-7-ways-to-build-y…

फूलनामशिरोमणी Tue, 24/04/2018 - 22:06

In reply to by चिमणराव

पुढे पाहून धावतांना काहीतरी मागे रहायचंच. सूद्न्य वाचकांनी क्रियाविशेषणे लागतील तशी घालुन घ्यावी. माझी आजी (म्हातारी झाल्यावर) पोस्टकार्डावर पत्र लिहितांना क्रियाविशेषणे गाळून लिहायची, जागा/श्रम वाचवायला.

२. काय सांगायचं होतं, ते कळतंय का? हा मुख्य प्रश्न आहे.

चिमणराव Tue, 24/04/2018 - 20:50

जे काम ग्रीकांनी साडेतीन हजार वर्षांपूर्वी केलं त्याला म्हणे आता ल्यापटॅापच लागतो. थेअरमचं कन्स्ट्रक्शन वगैरे.

२) शिक्षकांनीतरी आपल्या मुलांना कोचिंग क्लासला घालू नये.

फूलनामशिरोमणी Tue, 24/04/2018 - 22:15

In reply to by चिमणराव

बाहेर शिकवून डोक्याचा भुगा पडल्यावर मुलाला ॲप/शिकवणीच्या सुपूर्त करून टाकणंच मी पसंत करते.
मला गणीत शिकायला कोणी कधी मस्त ॲप दिले नाहीत, त्यामुळे मेंदूचा तो एक भाग अविकसितच राहिला.

पण क्रियाविशेषणांच्या वापराचं काही ॲप असेल, तर नक्की वापरून बघेन, आणि त्याबद्दलचे अनुभवही इथेच मांडेन. (क्रिविंसकट/किंवा क्रिविंशिवाय, हे अजून सांगता येत नाही.)

चिमणराव Wed, 25/04/2018 - 11:18

गणित शिकवतांना /शिकताना
१) अपुर्णांक - तुलना /बेरीज वजाबाकी वगैरे
२) टक्केवारी
३) दशमान पद्धती
४) परिमाणांचे लहान मोठे रुपांतर

याठिकाणी गाडी अडते. इथे प्रत्यक्ष उत्तरे काढणे महत्त्वाचे नसून ती संकल्पना समजून देण्यासाठी बराच काळ घालवावा लागतो. तिथे एप्स सपशेल आपटी खात असतील.

भूमितीमध्ये पायावर /गृहितकांवर आधारीत सिद्धांत मांडण्यासाठी ग्रीकांनी जी खटपट केली आहे ती पाहता डोळ्यांत अश्रू येतात. आनंद होतो. अरे किती तो अट्टाहास सिद्धता द्यायचा!! हो ना रे हत्तोबा?

चिमणराव Wed, 25/04/2018 - 11:24

क्रियाविशेषणांमुळे वाक्याचा अर्थ किती वाढतो कमी होतो हे चित्रांतून दाखवता येत नाही. त्यासाठी समज वाढवावी लागते.

एकूण लेखामध्ये अडचणी मांडल्याने चर्चेला वाव आहे आणि एप निर्मात्यांस दिशा मिळेल.