इतिहासातील विनोद

संकल्पना

इतिहासातील विनोद

- शैलेन

इतिहास आणि विनोद म्हटले, की सर्वप्रथम रामदासांची 'टवाळा आवडे विनोद' उक्ती आठवते. खरे तर रामदासांनी हे जिथे म्हणले आहे तो पूर्ण संदर्भ पाहिला तर तो 'टवाळां आवडे विनोद। उन्मत्तास नाना छंद। तामसास अप्रमाद। गोड वाटे॥' असा आहे. म्हणजे कोणास कशात गोडी वाटते इतक्यापुरतेच सांगण्याचा त्यांचा हेतू आहे. सबब, विनोद आवडणारे सगळेच टवाळ असतात असा अर्थ त्यातून निघत नाही, आणि असे काही त्यांना म्हणायचे नव्हते हे स्पष्ट होते. असे असूनही आपण या उक्तिविशेषाला एक वेगळाच अर्थ चिकटवतो, जो त्याचा मूळ अर्थ नाही. अर्थात, या उक्तीचे असे उपयोजन करणे हाच एक मोठा विनोद ठरतो! पण या विनोदाला भलेभले लोक फशी पडले आहेत. तसे पाहता, दिवाळी अंक आणि इतिहासातील विनोद या विषयाची सांगड घालणारा हा पहिलाच लेख नाही. थोर इतिहास संशोधक य. न. केळकर यांनी 'मराठी इतिहासातील विनोदी प्रसंग' असा एक लेख १९६१च्या 'श्रीयुत' नामक दिवाळी अंकात लिहिला होता. तो त्यांच्या 'मराठेशाहीतील वेचक वेधक' या छोटेखानी पुस्तकात संकलित केलेला आहे. पण त्यांनीही त्यांच्या लेखाची सुरुवात रामदासांच्या वचनानेच केली आहे, आणि वेगवेगळ्या ऐतिहासिक साधनांत 'विशेष विनोदी असे काही लेखन आढळत नाही' कारण 'विनोद म्हणजे टवाळी इतकाच अर्थ तेव्हा अभिप्रेत होता' असेही म्हणले आहे!

केळकर यांचे हे विधान इतिहास या विषयाला काहीसे अन्यायकारक आहे. वास्तविक पाहता विनोदी म्हणून मुद्दाम असे वाङ्‌मय जन्माला घालावे अशी काही परिस्थिती ऐतिहासिक काळात नसली, तरी अगदी पूर्वीपासून 'काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम्' असेही म्हटलेले आपल्याला परिचित आहे. तेव्हा विनोदात वेळ घालवणे हे टवाळीचे नाही, तर बुद्धिमत्तेचे लक्षण मानले जात असल्याची परंपरासुद्धा बरीच जुनी असणार हेही ओघाने म्हणावे लागते. तमाशा, लळित, भारुड, गोंधळ वगैरे बहुजनवर्गीय कलाप्रकारांत तर विनोद निश्चित असे, आणि तसा तो संस्कृत नाटकांत वगैरेही होता. म्हणजे साधनांतून विनोदी म्हणून विवक्षितरीत्या नोंदला गेला नसला, तरी इतिहासातल्या विनोदावर आपल्याला दृष्टिक्षेप टाकणे सहज शक्य आहे. विनोदाचे तात्कालिक आणि चिरकालिक असे दोन प्रकार असतात. तात्कालिक विनोद हा कालसापेक्ष असतो. एखादी गोष्ट, वाक्प्रचार किंवा कृती अमुक एका काळात लोकांना विनोदी वाटली, तरी सार्वकालिक दृष्ट्या ती तशी वाटेल, किंवा वाटावी असे नाही. अलीकडच्या 'पोलिटिकल करेक्टनेस'च्या काळात तर इतिहासकाळात चालून जात असलेले अनेक विनोद त्याज्य ठरले आहेत. अंगकाठी, लिंगभाव, जातीसंस्था वगैरे बाबींवर विनोद करणे आता आपण शिष्टसंमत समजत नाही. पण ऐतिहासिक काळात यांपैकी काही अंगे विनोदाचा स्थायीभाव होती.

चिरकालिक विनोदाचे मात्र असे नसते. तो सगळ्याच कालखंडातल्या लोकांना 'अपील' होऊ शकतो. महाराष्ट्रापुरते बघायचे झाले, तर अशा उत्कृष्ट विनोदांची प्राचीन उदाहरणे आपल्याला 'गाथा सप्तशती'मध्ये आढळतात. नवरा-बायकोचे कडाक्याचे भांडण झाले असता, "बाई गं, आता पुरे" म्हणून नवऱ्याने बायकोला ओणवे होऊन नमस्कार केला – पण त्यांच्या लहान मुलाला वाटले, की वडील आपल्याला घोडा-घोडा खेळायला आमंत्रण देत आहेत, म्हणून तो धावतधावत येऊन आपल्या ओणव्या बापाच्या पाठीवर स्वार झाला! ही अचानक झालेली विनोदी क्रिया बघून त्या रागावलेल्या स्त्रीचा रागही पळून गेला आणि ते सगळे कुटुंबच हास्यात विलीन झाले. सहजसाध्या कौटुंबिक विनोदाचे उदाहरण म्हणून ही गाथा निश्चितच उल्लेखनीय आहे. हा झाला कृतिनिष्ठ विनोद, पण सातवाहन काळातलेच भाषिक विनोदाचे चांगले उदाहरण म्हणजे सातवाहन राजाच्या संस्कृत-अज्ञानाची कथा, जी बृहत्कथा या प्राचीन ग्रंथाच्या निर्मितीस कारणीभूत झाली. सातवाहन राजा आणि त्याच्या राण्या पाण्यात अवगाहनलीला करण्यात रममाण झाल्या असताना राजा राणीच्या अंगावर पाणी उडवू लागला. तेव्हा राणी त्याला म्हणाली "मोदकैः परिताडय माम्" – राजाचे संस्कृत कच्चे असल्याने त्याला पहिल्या शब्दातला संधी कळला नाही, आणि त्याला वाटले, आपली राणी आपल्याकडे 'मला मोदकांनी मार'' असा आगळावेगळा हट्ट धरते आहे. सबब त्याने मुदपाकखान्यातून बरेचसे मोदक मागवले. राणीला हा प्रकार उमगला तेव्हा तिला हसू आवरेना! तिने राजाची खूप थट्टा केली. त्या थट्टेने शरमिंदा होत राजाने व्याकरण शिकायचा चंग बांधला आणि त्यातूनच त्याला गुणाढ्य या पंडिताबद्दल माहिती मिळाली.

अतिशयोक्ती हे प्राचीन विनोदाचे एक मुख्य अंग होते. भारहूतच्या स्तुपाच्या कठड्यावर आपल्याला अशाच एका प्राचीन विनोदी कथेचे चित्रण केलेले दिसते. एका राजाच्या नाकात माशी जाते आणि ती काही केल्या बाहेर येत नाही, म्हणून राजा हैराण होतो. त्याला सल्ला द्यायला येतात ती माकडे! माशी बाहेर काढायला ती राजाच्या नाकात एक चिमटा खुपसतात आणि तो एका दोरखंडाला बांधतात. हा दोरखंड एक हत्ती ओढतो – पण तरीही ती माशी काही राजाच्या नाकाबाहेर निघत नाही! 'मुंगी व्याली शिंगी झाली' अशासारख्या अतिशयोक्तीचेच हे उदाहरण म्हणावे लागेल. याच भारहूतच्या शिल्पांत चित्रण केले गेलेले यक्ष हेही आपल्याला काही चिरपरिचित विनोदी हावभाव करताना दिसतात. काहींनी जीभ बाहेर काढली आहे, तर काहींनी नाक फेंदारले आहे. हे यक्ष म्हणजे वरकरणी विनोदी वाटले, तरी तसे धोकादायकच असत. ते क्षेत्रपाल असत, आणि त्यांची ठाणी ते कसोशीने राखत. त्यांच्या क्षेत्राला – मग ते शेत असो, वृक्ष असो, वा जलाशय असो – ओलांडायचे किंवा त्याचा वापर करायचा, तर त्यांना आधी प्रसन्न करावे लागे. त्यासाठी बली काढावे लागत, किंवा त्यांनी घातलेल्या अटींची पूर्तता करावी लागे. यक्ष अनेकदा कूटप्रश्न विचारत आणि त्याची समाधानकारक उत्तरे न दिल्यास प्रसंगी लोकांचा जीवही घेत (म्हणजे अर्थातच लोकांची तशी समजूत होती!) या यक्षांच्या चित्रणात आणि कथांत आपल्याला अनेक वेळा ज्याला आता आपण डार्क ह्युमर म्हणू अशा प्रकारच्या विनोदाची उदाहरणे दिसतात. भीती आणि विनोद यांच्या सीमेवर येणारी अभिव्यक्ती हे यक्षांच्या कथांचे आणि चित्रणाचे महत्त्वाचे अंग होते.

साक्षात अत्र्यांनी ज्यांना विनोदचिंतामणी म्हटले त्या 'चिमणराव'कर्त्या चिं. वि. जोशांनी त्यांच्या लेखनाच्या संकलित पुस्तकाला (ज्याचे नाव 'हास्यचिंतामणी' आहे) एक उत्कृष्ट प्रस्तावना लिहिली आहे. त्यात त्यांनी विनोद या साहित्यप्रकाराचे उत्तम परिशीलन केले आहे, आणि विनोदाचे बुद्धिनिष्ठ, प्रसंगनिष्ठ, कृतिनिष्ठ, भावनिष्ठ, स्वभावनिष्ठ, तसेच भाषिक, कायिक, शाब्दिक असे विनोदप्रकार आणि ते साधायच्या अतिशयोक्ती, उनोक्ती, अन्योक्ती, व्याजोक्ती, वक्रोक्ती वगैरे पद्धती यांचे उत्तम वर्णन केले आहे. या लेखात त्यांनी विनोद, हास्य आणि हास्यभावना यांच्यातल्या परस्परसंबंधाचा आढावा घेऊन विनोदामुळे निर्माण होणारे हास्य हे भावनेच्या दृष्टीने इतर प्रकारे निर्माण होणाऱ्या साहजिक हास्यापेक्षा कसे वेगळे असते, हेही समजावून सांगितले आहे. त्यांच्या या वर्गीकरणानुसार पाहिले, तर इतिहासातल्या अनेक बाबींमध्ये यातील प्रत्येक प्रकारचे विनोद कुठे ना कुठे तरी घडलेले आपल्याला दिसतील. संस्कृत वाङ्‌मयात वारंवार येणाऱ्या शाब्दिक कसरती या आपल्याला परिचित असतात. किंबहुना त्यांचेच 'औषध न लगे मजला'सारखे मराठी रूपही आपण शालेय भाषा-व्याकरणात शिकत असतो. हा विनोद तरल आणि बौद्धिक अंगाने आस्वादायचा असतो. जोशांच्या लेखात त्यांनी 'तमाखुपत्रं राजेन्द्र भज माऽज्ञानदायकम्' आणि 'तमाखुपत्रं राजेन्द्र भज मा ज्ञानदायकम्' या ओळींतून केवळ एका अवग्रहामुळे कसे मनोरंजक अर्थांतर होऊ शकते त्याचा मासला दिला आहे. पहिल्या वाक्याचा अर्थ 'हे राजेन्द्रा, अज्ञानदायक अशा तंबाखूचे सेवन करू नकोस' असा होतो, तर दुसऱ्याचा 'हे राजेंद्रा, लक्ष्मी आणि ज्ञान देणाऱ्या अशा त्या मूषकवाहनाचे स्मरण कर' असा होतो. पुढे पेशवाईच्या काळातही अशा चमत्कृतिपूर्ण शाब्दिक कसरती करून बुद्धीची चमक दाखवणारा विनोद पंडित कवी वगैरे लोक कसा निर्माण करत याचे वर्णन य. न. केळकरांच्या लेखात आपल्याला आढळते.

पण अनेकदा अशा बौद्धिक पायावर आधारित विनोदापेक्षा ढोबळ आणि काहीसा ओबडधोबड असलेला विनोद आपल्याला इतिहासात अधिक दिसतो. वर म्हणल्याप्रमाणे या विनोदांपैकी अनेक विनोद आज आपण ग्राह्य मानणार नाही, पण त्यामुळे त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आपण नाकारू शकत नाही. अंगकाठीवरून किंवा लिंगभाव अथवा लैंगिकता यांतवरून होणारे विनोद हे आपल्याला इतिहासात प्रामुख्याने दिसतात. वेडेवाकडे अंग, किंवा एखादे अंगभूत व्यंग असणे ही विनोदनिर्मितीसाठी आवश्यक अशी बाब होती. बुटके, कुरळ्या केसांचे, लठ्ठ, वेडेवाकडे हातपाय असणारे 'अष्टावक्रा'सारखे लोक हे अनेकदा विनोदाचे विषय झालेले दिसतात. राजेलोकांचे मनोरंजन करणे हे त्यांच्यापैकी काही भाग्यवानांचे काम असे. अशा काही लोकांचे चित्रण आपल्याला शिल्पकलेत, किंवा नाण्यांसारख्या वस्तूंवर - जिथे व्यक्तिचित्रणाला वाव असतो - तिथे बऱ्याच वेळा झालेले दिसते. गुप्त सम्राट चंद्र गुप्त किंवा समुद्र गुप्त यांच्या नाण्यांवर असे लोक चित्रित केलेले आहेत. राजांच्या मस्तकावर छत्र धरणे, किंवा राजदंड उचलून धरणे अशी कामे ते करत. अशाच लोकांचे 'मिथ्यकथे'त झालेले रूपांतर आपल्याला शंकराच्या 'गण'वर्गात झालेल्या चित्रणाद्वारे अनेक शिल्पांत दिसते. हे गण म्हणजे पूर्वाकालिक व्रात्य, खोड्याळ अशा यक्षांचेच एक रूप होते. सर्वसाधारणपणे गण हे बुटके, स्थूल असे दाखवले जात. त्यांच्या चावटपणाचे चित्रण करणारी अनेक शिल्पे उपलब्ध आहेत. घारापुरी (एलिफंटा) किंवा वेरूळ अशा ठिकाणी आढळणारा एक शिल्पपट म्हणजे शिव-पार्वती यांच्या सारीपाट खेळाचे चित्रण करणारा. या कथेत शिव नंदीला, स्वतःच्या वाहनाला, पणाला लावून हरतो आणि नंदीला पार्वतीला शरण जावे लागते असा भाग येतो. हा भाग या शिल्पाच्या पीठावर म्हणजे शिव-पार्वतीच्या आसनाच्या खाली दाखवलेला असतो. नंदी पार्वतीकडे जात असताना शिवाचे गण त्याची चेष्टा करतात. काही त्या बिचाऱ्याची शेपटी पिरगाळतात, तर काही त्याच्या अंगाखांद्यावर चढून त्याला भंडावून सोडतात. वेरुळच्या शिल्पपटात एवढ्यानेच भागले नाही, म्हणून आपल्या हातांनी स्वतःचेच कुल्ले फाकवून नंदीवर पादणारा एक चावट गणही चित्रित केला आहे!

लैंगिकता आणि तिच्याबद्दलची दांभिक भावना हा काही शिल्पांमधून विनोदाचा विवक्षित विषय म्हणून चित्रित केलेला आपल्याला दिसतो. खजुराहोची शृंगारिक शिल्पे सगळ्यांच्या परिचयाची आहेतच. संभोगाच्या नाना तऱ्हा, मुखमैथुन, प्राणीमैथुनासारखे 'निषिद्ध' प्रकार वगैरेंच्या चित्रणाने ती ओतप्रोत भरलेली आहेत. यांपैकी काही शिल्पपटांत संभोगरत जोडप्यांच्या आजूबाजूला संन्यासी दाखवले आहेत. ते या जोडप्यांच्या क्रीडांमुळे उत्तेजित होऊन हस्तमैथुन करताना दाखवले आहेत – आणि त्यातही विशेष बाब म्हणजे त्यांच्यातले अनेक हे जैन यती असल्याचे सूचित केले गेले आहे! माणसाच्या स्वभावनिष्ठ आसक्तीवर ही शिल्पे विनोदरूपी प्रकाश टाकतात, आणि त्यातही हे सर्वसंगपरित्यागाबद्दल अत्यंत आग्रही असलेल्या धर्माचे अनुयायी असल्याचे दाखवून इथे दोन प्रकारे विनोद साधला गेला आहे. अशाच प्रकारे लोभी ब्राह्मणांचे चित्रण केलेलेही अन्यत्र असलेल्या शिल्पाकृतींतून दिसते. विवक्षित जातींचे असे स्टीरीयोटायपिंग करून साधलेला विनोद आता आपल्याला पचणे आणि पटणे जड वाटते, पण पूर्वाधुनिक काळात हे विनोदाचे महत्त्वाचे अंग होते हे विसरून चालणार नाही. कामभावनेचा अतिरेक हाही विनोदाच्या निर्मितीचा एक घटक मानला जाई. अतिशय मोठे लिंग असणारा पुरुष आणि स्वतःच्या योनीत बोटे घालून ती फाकवून दाखवणाऱ्या स्त्रिया या अशाच विनोदाचे अंग म्हणून दक्षिणेतल्या अनेक मंदिर-शिल्पांत आपल्याला दिसतात. लायकी नसतानाही स्वतःच्या फायद्यासाठी संधीसाधूपणे मोठ्यांचे अनुकरण करणे अशासारख्या क्रियेतून विनोदनिर्मिती होते. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे महाबलीपुरम इथल्या सुप्रसिद्ध 'गंगावतरण' शिल्पपटात दाखवलेला बोकेसंन्याशी! हे बिडालस्वामी मोठ्या उत्साहाने त्यांच्या थोडे वरतीच कोरलेल्या तपासक्त ऋषींची हुबेहूब नक्कल करून दाखवत आहेत, आणि त्यांचा भक्तगण आहे उंदरांचा समुदाय – म्हणजे या मांजराच्या तपाची परिणती काय होणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात काही संदेह उरूच नये. या शिल्पाचे अवलोकन करताना आपल्या चेहऱ्यावर हास्याची रेघ आल्याशिवाय राहत नाही, आणि तशीच ती बाराशे वर्षांपूर्वी हे शिल्प पहिल्यांदा कोरले गेले, तेव्हाच्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरही येत असणार, यात शंका नाही.

लिंगभाव आणि त्याविषयीची संदिग्धता हा विषय विनोदी म्हणताना आता आपली जीभ खटकेल, पण ऐतिहासिक काळात हे विनोदनिर्मितीचे प्रमुख साधन होते. त्यातही पुरुष असून 'स्त्रैण' वागणाऱ्या व्यक्ती ह्या अशा विनोदाच्या केंद्रभागी असत. अर्जुनाने पत्करलेले 'बृहन्नळा' रूप हे या प्रकारचे आहे. तिच्या नावातच 'मोठ्या लिंगाची' असल्याचा ध्वनी आहे, पण प्रत्यक्षात ती आहे एक खच्ची केलेली, स्त्री-पुरुषभावाच्या पलीकडे गेलेली अशी व्यक्ती. चतुर्भाणी या संस्कृत ग्रंथात नपुंसिका नावाचे असेच एक पात्र आपल्याला भेटते. इथे नपुंसक या सहसा स्त्री-पुरुषभावाच्या पलीकडच्या समजल्या जाणाऱ्या संज्ञेचे मुद्दाम केलेले स्त्रीलिंगी रूप मनोरंजक आहे. ही नपुंसिका म्हणजे उघडच स्त्रैण असा पुरुष आहे, आणि त्याचे काम इतर पुरुषांना 'वेगळे'च असे सुख मिळवून देण्याचे आहे. ती राजाला तिच्यासोबत ठेवलेल्या संबंधांचे वेगळेपण विषद करून सांगताना म्हणते, "हे राजा, तुला माझ्याशी संबंध ठेवण्यात अनेक फायदे आहेत. मला गर्भधारणा होऊ शकत नसल्याने वारसांच्या युद्धाच्या चिंतेपासून तू दूर रहाशील. माझे चुंबन तू अधिक उत्कटतेने घेऊ शकतोस, कारण आपल्यामध्ये स्तनांचा अडथळा नाही!" हे संभाषण एका परीने अशा संबंधांचे एक्झॉटिक रूपही दाखवत असल्याने वरकरणी विनोदी वाटले तरी तसे नाही. त्या मागे लिंगभावजन्य रतिवृत्तीचा एक पूर्वाधुनिक आविष्कार आपल्याला दिसून येतो.

प्रसंगनिष्ठ विनोद आपल्याला इतिहासात ठायीठायी आढळतील. ऐतिहासिक चुटके आणि कथावाङ्‌मय हे असे विनोद करणऱ्या चतुर पात्रांनी भरलेले आहे. बिरबल किंवा मुल्ला नसरुद्दिनसारख्या ऐतिहासिक व्यक्ती, तसेच 'पंचतंत्रा'सारख्या कथेत येणारी काल्पनिक पात्रे आणि प्राणिसृष्टीत मानवी सृष्टीचे प्रतिनिधित्व करणारे सिंह राजा, कोल्हा प्रधान वगैरे विशेष हे या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. दिवेघाटात बैलांच्या शिंगांना पलिते बांधून शिवाजीने मोठे सैन्य चालून येत असल्याचा आभास निर्माण केला आणि सुलतानी सैन्याची हबेलंडी उडवली, हे चातुर्याचे उदाहरण आहेच, पण हा प्रसंग एका प्रकारे विनोदीही आहे. य. न. केळकरांच्या उपरोक्त लेखात त्यांनी अशा विनोदाची आणखी उदाहरणे दिली आहेत. पटवर्धन सरदारांपैकी पुरुषोत्तम दाजी हे अशा विनोदांबद्दल प्रसिद्ध होते. त्यांनी मुद्दाम नाना फडणीसांच्या घेतलेल्या फिरक्या 'ऐतिहासिक लेखसंग्रह' या वासुदेवशास्त्री खरे यांनी संपादित केलेल्या कागदपत्रांत आल्या आहेत. नाना प्रकृतीने अतिशय धीरगंभीर होते. कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या चेहऱ्यावरची माशीही हलत नसे! किंबहुना, नानांना हसवून दाखवतो अशी पैज घेतलेल्या एका हरदासी माणसाला त्यांनी अजिबात न हसता जेरीस आणले होते. त्यांना हसवायचे सगळे प्रकार करून तो थकला आणि अखेरीस, त्याने नानांसमोर गुडघे टेकून, तोंडाजवळ मूठ नेऊन, "आता हसता, की बोंब मारू?" असे चारचौघांत विचारले, तेव्हा कुठे नानांना हसू फुटले अशीही एक कथा आहे! तर अशा नानांची 'खेचायची' ती पुरुषोत्तम दाजींनीच. त्यांनी एकदा नानांना मेजवानीला बोलावले आणि मिरचीचे सार त्यांच्या पानात वाढले! "शुद्ध भगवतीची पूड वस्त्रगाळ करून" त्याचे सार केले, चांदीच्या पात्रात घालून वाढप्याकडे दिले आणि सांगितले की, नानांच्या पानात अंमळ जास्तच वाढावे. तसे त्याने वाढले. बिचाऱ्या नानांना याची काय कल्पना? त्यांनी पाची बोटे वाटीत बुडवून जोरदार भुरका मारला! त्यांची प्रकृतीही तोळामासा – त्यांची त्या जहाल तिखटाने चांगलीच पंचाईत झाली. त्यांनी दाजींकडे तक्रार केली, तर दाजींनी त्यावर "हे आचारी असेच तिखट आम्हालाही खायला घालतात, आणि जुने नोकर आहेत त्यामुळे त्यांना हाकलताही येत नाही" असे भलतेच पुराण लावले. "त्या बिचाऱ्यांना कशाला बोल लावता? तुम्ही पाहुण्यांना बोलावून अशी थट्टा उडवता हे आमच्या कानावर आले होतेच, त्याची प्रचीती आली. आता दही-लोणी तरी मागवा" असे नाना म्हणाले. मग त्या उपचारांनी त्यांचे तोंड शांत झाल्यावर जेवणे पुढे चालू झाली. पण दाजींचे मन अद्याप भरले नव्हते. त्यांना नानांची आणखी थट्टा करायची होती! त्यांनी त्यांच्या एका शागीर्द गवयाला सांगून ठेवले होते की जेवणे होत असताना मी तुला खूण करेन, तेव्हा तू कडकडाटी आवाजात एक श्लोक नानांच्या पानामागे उभा राहून म्हण. त्यांनी तशी खूण केली आणि गायकाने असा काही श्लोक दणकावला की, नाना दचकले, घाबरेघुबरे झाले आणि इकडेतिकडे पाहू लागले. "दाजी, अहो काय हे - मांडव उडाला!" असे ते दाजींना म्हणाले, पण दाजींनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून आपल्या पदरच्या गायकाची "वा, काय थोर आवाज आहे" आणि तो किती उत्तम गातो असे म्हणून स्तुतीच चालवली. हेच दाजी कुठे घुशीच्या शेपटीला पलिते बांधून लष्कराच्या छावणीत सोड, तर कुठे डोहाळजेवणाच्या आहेरात चिंचा म्हणून खेकड्याचे आकडे पाठव, असे पोरकट विनोदही करताना आपल्याला आढळतात.

शाब्दिक कसरतींतून विनोदनिर्मिती करणे हा पेशवाईतल्या पंडित कवींचा आवडता छंद होता. नाना फडणीसांच्या हाती कारभार गेल्यावर साहजिकच त्यांच्या विश्वासातल्या माणसांना बरे दिवस आले. त्यांची अभिवृद्धी अनेकांच्या डोळ्यांत सलू लागली आणि त्यांच्यासारखीच नानांची कृपादृष्टी आपल्यावरही वळावी अशी अनेकांना इच्छा होऊ लागली. खाशा व्यक्तींचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या बुद्धीची चुणूक त्यांना दाखवून देणे हा होता आणि त्यासाठी कोटिप्रचुर काव्ये कामाला येत. एका राजहंस नावाच्या ब्राह्मणाने नानांचे लक्ष वेधण्यासाठी म्हणून असे काव्य करून नानांना सादर केले –
भानूदयी निजसुरा भट तो होय जागा
असुनी बावळा न्याय तो करी बजा गा
शालूसमान मिळतो फडक्यास मान
मी राजहंस फुटक्या कवडीसमान
इथे भानूदय या शब्दावर श्लेष आहे – सकाळ झाली असता हा एक अर्थ, आणि भानू हे नानांचे आडनावही होते, सबब भानूंचा उदय म्हणजे नानांचा उदय असाही अर्थ. तर असा हा उदय झाला असता 'निजसुरा' म्हणजे सतत झोपा काढणारा भट, तोही जागा झाला. ही झाली नानांचे खास मर्जीतले कारभारी धोंडो बल्लाळ निजसुरे यांच्या आडनावावरची कोटी. दुसऱ्या ओळीतला 'बावळा बजा' म्हणजे बजाबा बावळे, हे नानांच्या पक्षातले आणि पुण्याचे न्यायाधीशपद भूषवत. तिसऱ्या ओळीतले 'फडके' म्हणजे हरिपंत हे पेशवाईतले ज्येष्ठ सरदार. इतक्या सगळ्यांना नानांच्या कृपेमुळे उत्तम दिवस आले आहेत, आणि मी 'राजहंस' असूनही माझी किंमत मात्र फुटक्या कवडीइतकीच राहिली आहे असा विलाप या राजहंस उपनावाच्या ब्राह्मणाने केला आहे! नानांवर या कोटिक्रमाचा काय परिणाम झाला, आणि राजहंसाचे भाग्य उजाडले की नाही, याची दखल मात्र इतिहासात घेतलेली नाही.

ऐतिहासिक साधने किंवा प्रसंग यांच्यातून दिसणाऱ्या विनोदाप्रमाणेच इतिहासाच्या अभ्यासातून निर्माण होणारे विनोद, हेही या विषयाच्या कक्षेत घ्यायला हरकत नसावी. असे विनोद निर्माण करायला कारणीभूत असतात ते इतिहासअभ्यासक आणि त्यांच्या विवक्षित अभ्यासाच्या पद्धती. अर्थातच, अनेकदा ते बिचारे त्यांचे संशोधन पराकोटीच्या गांभीर्याने सादर करत असतात, आणि आपण प्रस्तुत करतो आहो ते तथ्य किंवा त्याच्या मागची पद्धती ही अनेकांना विनोदी वाटेल यांची त्यांना आशंकाही नसते! ऐतिहासिक साधने अभ्यासणे ही एक प्रकारची कलाही आहे, आणि तिच्याशी पुरती ओळख न होता, साधनांवर पक्का हात न बसता काही करायला गेले तर त्यातून भलतीच तथ्ये बाहेर पडू शकतात. उदाहरणार्थ, मोडी लिपीत लिहिलेली काही काही अक्षरे सारखीच दिसतात (राजवाड्यांनी अशा अक्षरांची एक यादीच दिली आहे), त्यात ल आणि क या अक्षरांचा गोंधळ विशेष होतो. लो आणि के हे अनेकदा सारखे दिसतात. 'त्या समयी बाजीरावसाहेबांबरोबर दोनशे लोक होते' असे वाक्य 'दोनशे केक होते' असेही वाचले जाऊ शकते! त्यामुळे केक या पदार्थाचे नाविन्य नष्ट होऊन पाश्चात्त्यांनी या खाद्यप्रकाराबद्दल गमजा मारायचे कारण नाही, आमचे पेशवेही वेळपरत्वे दोनदोनशे केक जवळ बाळगत, असाही निष्कर्ष कोणी काढू शकतो, हे गो. नी. दांडेकरांनी त्यांच्या एका लेखात वर्णिलेले आहे. पण हा झाला प्रत्यक्ष न घडलेला विनोद. अशा प्रकारे भलतेच अन्वयार्थ लावून प्रत्यक्ष निष्कर्ष काढले गेल्याची आणि ते प्रसिद्ध केल्याची उदाहरणेही सापडतील. इतिहासाचार्य राजवाड्यांच्या उमेदीच्या काळात म्हणजे १९००-१९२०च्या सुमारास त्यांना व्युत्पत्तिशास्त्राच्या भुताने पछाडले होते. 'नामादी शब्दव्युत्पत्ती कोश' असा एक कोशच त्यांनी रचला आणि त्यात यच्चयावत् गावांची, माणसांची नावे वगैरे ही संस्कृत शब्दांपासून कशी व्युत्पादिता येतात याच्यावर त्यांनी अनेक पाने खर्ची घातली. आज पहायला गेले तर हा पूर्ण कोश आपल्याला विनोदी वाटतो. किंबहुना, याच पद्धतीचा अतिरेक करून पु. ना. ओकांसारख्या व्यक्तीने जगभर हिंदू धर्म कसा पसरला होता किंवा भारतीय इतिहास लेखनात 'खिंडारे' कशी पडली आहेत, यासंबंधी केलेले लिखाणही आपण अनेकदा विनोदीच समजत असतो. राजवाड्यांच्या अशा लेखनाची खिल्ली त्यांच्या समकालीनांनीही उडवली आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर या महाराष्ट्रातील विनोदी लेखनाच्या आद्य महर्षींनी त्यांच्या एका पात्राच्या तोंडी 'पूर्वी घोडा आणि कुत्रा हे दोनच प्राणी अस्तित्त्वात होते. कारण 'श्व' म्हणजे कुत्रा आणि 'अ-श्व' म्हणजे जो 'श्व' नाही तो, घोडा' असे वाक्य घातले आहे, ते या पद्धतीची थट्टा करणारे आहे. पुढे पुलंनी त्यांच्या 'राघूनानांची कन्येस पत्रे'मध्ये अण्णूराव शेषराव मोगलगिद्दीकर या भारदस्त नावाच्या इतिहाससंशोधकाची निर्मिती करून, किंवा नागूतात्या आढ्ये आणि बाबूकाका खरे यांच्यासारखे इतिहासअभ्यासक रंगवून अशा प्रमाणशरण इतिहाससंशोधनपद्धतीवर पुष्कळच विनोदनिर्मिती केली आहे.

इतिहाससंशोधकांची वागणूक, तीतून दिसणारा तऱ्हेवाईकपणा हेही समाजातल्या इतरेजनांच्या दृष्टीने विनोदाचे विषय ठरतात. मग कोणी गाढवावर बसून इतिहाससंशोधन करायला जाई, कोणी रस्त्यातून चालताना कोटाच्या खिशात भजी ठेवून ती खातखात जाई, कोणी मोडक्या रेफ्रिजरेटरचा वापर कपाट म्हणून करतो आणि त्यात कपडे ठेवतो, अशा प्रकारच्या कथा जन्म घेतात. याचबरोबर इतिहाससंशोधकांतले परस्पर संबंध किंवा त्यांचे विवक्षित पूर्वग्रह यांचे प्रतिबिंब पडूनही त्यांच्या लेखनात अभावित विनोद निर्माण होतो. राजवाडे हे तर जात, धर्म, प्रांत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पूर्वग्रहांनी आणि अभिनिवेशांनी पछाडलेले - शेजवलकरांनी त्यांना विकारी संशोधकांच्या पंक्तीत बसवले आहे - त्यांच्या लेखनात असे विनोद अनेकदा दिसतात. रामदास आणि ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांचे ऐतिहासिक कर्तृत्व समान मानण्याची आगळीक ब्रह्मेंद्रस्वामींचे चरित्रकार द. ब. पारसनीस यांच्याकडून झाली, आणि राजवाडे खवळले! त्यांनी या दोन व्यक्तींत काय काय फरक होते त्यांची एक यादीच सादर केली. त्या यादीत 'रामदास हे मराठी साहित्याचे उस्ताद आहेत, तर ब्रह्मेंद्राचा एकही ग्रंथ प्रसिद्ध नाही' इथपासून 'रामदास केवळ लंगोटी नेसे, तर ब्रह्मेंद्र झगा आणि पुरभय्यी टोपी परिधान करी' इथपर्यंत मुद्दे राजवाड्यांनी मांडले आहेत. सर्वांत कळस म्हणजे 'रामदासाच्या शिवाजीने सुंदर यवनी मातुःश्री म्हणून परत पाठवली, तर यवनी ठेवणारा बाजीराव हा ब्रह्मेंद्राचा पट्टशिष्य होता' हेसुद्धा राजवाडे 'फरक' म्हणून नोंदवतात! राघोबादादाविषयी राजवाड्यांचे मत चांगले असणे शक्यच नव्हते. त्याचे एक पत्र प्रसिद्ध करताना त्यावरच्या शिक्क्याने त्यांचे लक्ष वेधले. त्या पत्राखाली त्यांनी मुद्दाम टीप घातली आहे – "हा रघुनाथरावाचा शिक्का. याला बारा वर्तुळे आहेत. बिचाऱ्याचे सगळेच अलौकिक!"

इतिहास कसा लिहावा किंवा लिहिला गेला याचाही एक इतिहास असतो. या अभ्यासप्रणालीकडे आताशा बौद्धिक किंवा बुद्धिवादी इतिहासलेखनाच्या अभ्यासाचे एक प्रमुख अंग म्हणून बऱ्याच इतिहाससंशोधकांचे लक्ष जाऊ लागले आहे. पूर्वकालीन इतिहास-अभ्यासकांचा पत्रव्यवहार, त्यांचे परस्परसंबंध हे अभ्यासून त्यांनी जी तथ्ये मांडली, जो अभ्यास केला, त्याच्या मागची बौद्धिक परंपरा अभ्यासणे, त्यांची संशोधक म्हणून असलेली बलस्थाने ही कौशल्य, सहकार्य, ईर्षा, व्यावसायिक हितसंबंध वगैरेंच्या ताण्याबाण्यांतून कशी घडत गेली यांचा अभ्यास करणे हे या शाखेचे आवडते विषय आहेत. अशा पत्रव्यवहारांतून या संशोधकांची एक वेगळीच बाजू आपल्याला दिसते. त्यात मूलतः विनोदी असे काही नसले, तरी अनेकदा या संबंधांचे प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य उत्पन्न करते. राजवाडे यांची काही पत्रे, चिठ्ठ्या त्यांच्या 'समग्र वाङ्‌मया'त छापलेली आहेत. त्यात त्यांच्या वैयक्तिक दृष्टीकोनातून त्यांच्यापेक्षा ज्युनिअर असलेले दत्तोपंत पोतदार, किंवा खंडेराव मेहेंदळे यांच्यासारख्या लोकांबद्दल त्यांची काय मते होती, 'इतिहास संशोधन मंडळा'सारख्या संस्थेमध्ये काय राजकारणे चालायची वगैरे बाबींचा मजेदार आढावा घेता येतो. एका ठिकाणी "पोतदाराला म्हणावे, चार्गटपणा पुरे!" असे राजवाडे स्पष्ट ठणकावतात! पुणेरी इतिहाससंशोधकांचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रसिद्ध बंगाली इतिहासकार सर जदुनाथ सरकार. सरकारांनी मुघली साधनांवर अवाजवी भर देऊन केलेले लिखाण राजवाड्यांसारख्या पुणेरी पठडीतल्या महाराष्ट्राभिमानी लेखकांना मानवण्यासारखे नव्हतेच, आणि त्यातून सरकारांनी मराठ्यांच्या इतिहासपुरुषांना एकेरी नावांनी संबोधणे वगैरे घोडचुकाही करून ठेवलेल्या. अशा बाबतींमुळे सरकारांविषयी पुरेपूर आकस पुण्यातल्या संशोधकांच्या मनात उत्पन्न झाला असल्यास नवल नाही. सरकारांनी आपल्या काही चुका सुधारल्या, तरीही हा आकस कायमच राहिला. त्यातून सरकारांना एक 'घरचा भेदी' मिळाला तो म्हणजे गो. स. उपाख्य नानासाहेब सरदेसाई! हे पुणेरी असले तरी इतर संशोधकांपेक्षा बरेच मवाळ, मितभाषी, आणि चाकोरीबद्ध प्रवृत्तीचे गृहस्थ. सबब सरदेसायांवरही या आकसाची छाया पडली. अलीकडेच दीपेश चक्रवर्ती या अमेरिकास्थित इतिहास-अभ्यासकांनी सरकार आणि सरदेसाई या दोघांच्या संशोधक म्हणून असलेल्या कर्तृत्वाचा आढावा घेणारे एक पुस्तक लिहिले आहे. त्यात या आकसापायी सरकारांना कायकाय दिव्ये करावी लागली त्यांचे वर्णन करणारी त्यांनी सरदेसायांना लिहिलेली काही पत्रे उद्धृत केली आहेत. ती आता आपल्याला बरीच विनोदी वाटतील! त्यांपैकी एकात सरकारांनी सरदेसायांना लिहिले आहे (विषय संशोधनानिमित्त प्रवासाला जायचा आहे, आणि हे शब्दशः भाषांतर नाही, परंतु मथितार्थ असा आहे) – 'गेल्या वेळी तुम्ही तुमच्या पुणेरी मित्रांना आपल्या सफरीची वार्ता दिलीत आणि त्यांनी आपले काम केले! तुमचा स्वभाव पाहता तुम्हांला तुमच्या लोकांच्या वागण्यातल्या खाचाखोचा कळत नाहीत आणि तुम्ही सरळपणे त्यांच्याकडे आपले बेत बोलून जाता. त्यामुळे आपल्या कामात खोडे घालण्याचे काम मात्र ते लोक करतात. आता आपण जाणार आहोत याची वाच्यता त्यांच्यापैकी कोणाकडे करू नका. किंबहुना, आपण लाहोरला जात असू, तर त्यांना आपण मद्रासला चाललो आहोत असे सांगा!' हे वाचून आता आपल्याला मजा वाटते, पण अशा प्रसंगांतून या लोकांचे एक वेगळेच स्वभावदर्शन आपल्याला होते हेही तितकेच खरे आहे.

उपसंहार म्हणून आपण पुन्हा एकदा य. न. केळकरांच्या विधानाकडे वळू. "इतिहासात विनोद हा अभावानेच आढळतो" हे त्यांचे विधान वर दिलेल्या तपशिलांवरून बरेचसे खोटे ठरते. हे तपशील स्पष्टपणे असे दर्शवतात की, इतिहासाला विनोदाचे वावडे नाही. साधने, त्यांचे परिष्करण, आणि उपयोजन अशा तीनही अंगांनी इतिहासातला विनोद आपल्याला अभ्यासता येतो. लिखित साधनांव्यतिरिक्त दृश्यसाधनांतही विनोदाची पखरण सर्वच काळांत झालेली आपल्याला दिसते. विनोद हा काही वेळा आस्वादकाच्या भूमिकेवरही ठरत असतो, आणि तसे बघायला जावे तर इतिहासात ठिकठिकाणी आपल्याला विनोद आढळतो, ही वस्तुस्थिती आहे.

. संपादकीय नोंद : बृहत्कथा गुणाढ्यानं रचली.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

मी जर नाना असतो, तर राजहंसावर उपकार सोडाच, त्यास शंभर फटक्यांची शिक्षा देता झालो असतो.
शिंचा प्रसन्न करावयास येतो आणि मुदलात वृत्तातच चूक करतो म्हणजे काय?

पहिल्या ओळीत 'तो' जास्त झालाय. दुसरी पूर्ण गंडलेली आहे. तिसरी आणि चौथी बरोबर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वृत्तासाठी हिंसा करणारे मुनीवर लोक आजूबाजूला असल्यामुळे कवितेचं नुकसान होतंय का, असा लेख पुढच्या अंकात हवा.

आता लेख वाचताना जाणवतंय, लेखात शिल्पांची चित्रं हवी होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वृत्ताची हिंसा झाल्याने कवितेची हिंसा आधीच झालेली आहे. ही राजहंसाची चूक वाटत नाही. लेखकाने उद्धृत करताना चूक केली असावी किंवा जिथून उद्धृत केेले तिथेच चूक झालेली असावी. मात्र ह्या सगळ्या प्रकरणात संपादक मात्र डुलक्या घेत होते हे स्पष्टच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपादकांचं काम डुलक्या काढणंच असतं. दिवाळीच्या दिवशी विसरू नका हे तुम्ही! Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फार भारी लेख आहे!

इतिहासातल्या विनोदी / अतर्क्य घटना हाही यातला भाग होऊ शकला असता. उदा० नाना फडणवीस शौचास जातो सांगून पकडायला आलेल्या लोकांच्या तावडीतून पळून गेला होता ना? पहिल्या अँग्लो-अफगाण युद्धातही ब्रिटिश सैन्याच्या शरणागतीचा असाच काहीसा विनोदी प्रसंग फ्रेजरच्या 'फ्लॅशमॅन' पुस्तकात नोंदवला आहे.

अवांतर : वरचे राजहंसद्वेष्टे ओळखीचे वाटत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

फडणविसाची ही घटना माहिती नव्हती. अतर्क्य घटना म्हटल्यास फडणविसाचीच दुसरी एक घटना क्वालिफाय होईल:

पानिपत झाल्यावर मराठ्यांची पुरती दैना झाली होती. अनेकजण गुलाम झाले, काही निसटून आले, वगैरे वगैरे. तर नाना नेसत्या लंगोटीनिशी निसटला होता. अंगावर बाकी कुठलेही वस्त्रपात्र काहीही नव्हते. रस्त्याकडेला झाडाआड लपला होता. अब्दालीचे चारपाच किझलबाश सरदार कत्तली करायला किंवा गुलाम न्यायला म्हणून परिसर धुंडाळत होते. एकाने नानाला पकडले आणि तो त्याचे डोके उडवणार इतक्यात दुसऱ्या एका म्हाताऱ्या किझलबाशाने म्हटले, "अरे हा तर अगोदरच मेलेला आहे. याला कशाला मारतो? सोड!" आणि नाना अशा तऱ्हेने वाचला. ॲण्ड टु थिंक की पुढे चाळीस वर्षे मराठेशाही टिकण्यात या एका माणसाने इतके भरीव योगदान दिले....

वैसे तो नेपोलियनबद्दलही एक गोष्ट अतर्क्यच वाटते. आपल्या सैन्याचे नेतृत्व करण्यात तो नेहमीच आघाडीवर असायचा. एकदम आघाडीवर फुल फायरिंग इ. चालायचे. असे असूनही त्याला कधी जखम इ. झाल्याचे ऐकिवात नाही. महदाश्चर्यच म्हटले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त लेख. मज़ा आया. कीटकाच्या नावाच्या नाएकाचा किस्साही लिहायला हरकत नव्हती. पुन्हा कधीतरी. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0