अठ्ठी

संकल्पना

अठ्ठी

- - नंदा खरे

Post-truth हा शब्द पहिल्यांदा ऐकल्याला बहुधा तीनेक वर्षे झाली. त्यावेळी postपासून सुरू होणाऱ्या इंग्रजी शब्दांचे मराठी पर्याय मला छळत असत. जसे post-modern म्हणजे म्हणे 'उत्तराधुनिक'. माणसे दगडी हत्यारे वापरत तो काळ आता अश्मयुग म्हणून ओळखला जातो. त्यातले तीन उपविभाग पूर्वाश्मयुग, मध्याश्मयुग आणि उत्तराश्मयुग म्हणून ओळखले जातात. पूर्व पूर्वी होऊन गेलेला, मग मध्य, शेवटी उत्तर. हाच नमुना वापरायचा तर उत्तराधुनिक म्हणजे आधुनिक काळातलाच नंतरचा भाग. पण post-modernचा अर्थ तसा नाही. Post-modern म्हणजे आधुनिक काळाच्या नंतर आलेला काळ. म्हणजे खरे तर तो आधुनिकोत्तर म्हटला जायला हवा. पण बहुधा कोण्या जाड-चष्मा-छपरी-मिश्यावाल्या बुवाने उत्तराधुनिक म्हटले, आणि तो शब्द फेविकॉलसारखा घट्ट चिकटला. (एक 'कडेचा प्रकाश' उर्फ sidelight : माझा एक शाळकरी मित्र 'पुराने जमानेके modern गाने' म्हणायचा. त्याला जुनी गैर-फिल्मी गाणी अपेक्षित असत. नाहीतर जुनी आणि आधुनिक यांचे द्वंद्व सोडवावे लागले असते.)

तेव्हा post-truthचे जाड-चष्मा-छपरी-मिश्या लोक काय करतात, ते मी कुतूहलाने पाहत होतो. जरा भयचकितही होतो. पण post-truthचे झाले सत्योत्तर. उत्तरसत्य झाले नाही याने मी सुखावणार, तोच माझे पौरकाट्य (पोरकटपणा या शब्दाचे 'सुसंस्कृत' रूप) आडवे आले. सत्य+उत्तर म्हणजे सत्योत्तर. सत्ती+उत्तर म्हणजे सत्त्योत्तर. लिहिताना यांत फरक करता येतो, पण बोलताना मात्र दोन्हींचे सारखेच उत्तर येते (XXला! किती जागी उत्तरे येतात!) आणि सत्त्योत्तर म्हणजे सत्तीनंतरचे; म्हणजे अठ्ठी! दोनाऐवजी एकच जोडाक्षर असणे, सर्वांच्या ओळखीचे असणे वगैरे निकषांवर अठ्ठी हे सत्योत्तरपेक्षा जास्त सोपे आणि वांछनीय. तेव्हा माझ्या डोक्यात तरी post-truth म्हणजे अठ्ठी!

असले खेळ खेळत सुखावायला मात्र फार वेळ नव्हता. चारसहा तरुण (वये २० ते २५) मित्रमैत्रिणींनी post-truthवर एक चर्चासत्र ठेवले, ज्यात मलाही बोलायचे होते. आता औपचारिक अर्थ शोधणे आले, अठ्ठीचा. काही वर्षे संपादनपेशात काढूनही मी शब्द समजावून घेऊनच वापरतो. तर post-truthचा अर्थ निघाला: ‘Adjective relating to or denoting circumstances in which objective facts are less important than appeals to emotion and personal belief’. आपण इतके घट्ट आवळलेले रूप न वापरता जरा सोपा मराठी तर्जुमा करू.

जनमत दोन तऱ्हांनी घडते; एक वाट वस्तुनिष्ठ तथ्यांमधून जाते तर दुसरी भावना आणि वैयक्तिक श्रद्धांमधून. ज्या काळात श्रद्धा-भावना तथ्यांपेक्षा प्रभावी असतात, त्या काळांसाठी सत्योत्तर हे विशेषण वापरावे.

हे वाचले मात्र, आणि मी मनाने २००४ सालच्या लोकसभा निवडणूक निकालांच्या दिवसाकडे गेलो. संध्याकाळी रा.स्व.संघाचे प्रवक्ते (चूकभूल देणेघेणे) राम माधव यांना एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या नांगराने (मराठीत anchor) एक प्रश्न विचारला. "गेल्या निवडणुकीत तुमच्या पाल्याला भरघोस बहुमत मिळाले होते. यावेळी काय झाले?" मुळीच न डगमगता राम माधव म्हणाले "त्यावेळी आमच्याकडे राम-मंदिराचा मुद्दा होता. यावेळी तसला भावनिक, चुकलो, विचारधारेचा मुद्दा सापडला नाही!" (Then we had the Ram Mandir issue. This time we could not find an emotional, sorry, ideological issue like that.)

राम माधव द्रष्टेच म्हणायचे. पाश्चात्त्यांना सत्योत्तर सापडण्याच्या एक तप आधीच रामजींनी (की माधवजींनी?) सत्यावर अठ्ठी मारली! त्यांना त्याचवेळी नांगराने नीट प्रश्न विचारले असते; तर दाभोळकरांपासूनची हत्यामालिका, प्रसून जोशींची पदोन्नती, पुण्यप्रसून वाजपेयींची पदावनती, ब्रेग्झिट, ट्रंप-मोदी-एर्दोवान-इम्रानचे उदय, सारे काही तेव्हाच उलगडले असते. तसेही म्हणे संघीय विचारवंत वेळोवेळी भविष्यकथनात्मक शोधनिबंध लिहीत असतात आणि अंतर्गत चर्चांमधून ते सुधारून घेत असतात.

पण आपण जरी आपल्या संग्रहातल्या या नररत्नाकडे दुर्लक्ष केले असले तरी इतर जगात अठ्ठीबहाद्दर शोधले आणि तपासले जात असतातच. असा एक तपास (एक वेगळा नररत्न) युवाल नोआ हरारीने केला. बहुतेकवेळा लोक त्याचे पूर्ण नाव घेतात, ‘बाळ गंगाधर टिळक’सारखे. मी मात्र लिहिताना यूनोहं हे लघुरूप वापरणार आहे. एकीकडे त्यातून राष्ट्रसंघाचे (UNOचे) सूचन होते, तर दुसरीकडे 'शिवोहं'चे. आणि आजच्या 'तरुणाईला त्यातून Harry Potter कथांमधील 'यू नो हू' हा खलनायकही सुचू शकतो; आणि नायकांपेक्षा खलनायक जास्त मोहक असतात. (नाहीतर 'संजू' चित्रपटाचे यश कसे समजेल?) युवाल नोआ मात्र खलनायक नाही.

तर यूनोहं सांगतो, ‘अश्मयुगापासून आजवर स्वतःला बळ देणारी मिथके माणसांचे समूह घडवत आलेली आहेत.’ आता माणसांची बुद्धी विचार करण्यापेक्षा गोष्टी ऐकण्यात जास्त रमते, हे मानसशास्त्रीय मत माहीत होते. पटलेलेही होते. पण त्याचा समाज घडवायला वापर होतो, तोही अठ्ठी-वापरातून, ही मात्र यूनोहंचीच मर्मदृष्टी आहे. पण तेवढ्यावर न थांबता असा वापर करणारी तीन क्षेत्रेही यूनोहं नोंदतो : धर्म, विचारधारा आणि व्यापारातले जाहिरात हे अंग.

जसे सर्व धर्मग्रंथ, विशेषतः पुराणे, सत्योत्तरच असतात. कोणी फारच विवेकाचे भिंग वापरू लागले तर "अहो ती रूपककथा आहे" असा बचाव देता येतो. विचारधाराही सत्योत्तराचा सतत वापर करतात, विशेषतः राष्ट्रीय अस्मिता सोबत असली तर. यूनोहं या संदर्भात कम्युनिझम, फासिझम आणि उदारमतवाद (!) अशी तीन नावे घेतो. गंमत म्हणजे तो नवउदारमतवाद, उर्फ कर्मठ मुक्त बाजारपेठी भांडवलवाद, उर्फ Neoliberalism हे नाव घेत नाही! (मराठीत म्हणू "ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी". इंग्रजीत म्हणू "He knows which side his bread is buttered".)
जाहिरातक्षेत्राबद्दल तर बोलायलाही नको.

सत्योत्तरी मिथके जेव्हा सत्ता कमवायला, टिकवायला वापरली जातात तेव्हा मात्र प्रचंड धोका उद्भवतो. हिटलरचा माहिती व प्रसारणमंत्री जोसेफ गोबेल्स हा आधुनिक काळातील सर्वांत परिणामकारक प्रचारक होता, असे यूनोहं मानतो. दुसरा एक जोसेफ (स्टालिन) हाही सत्याबाबत 'चपळ' होता असे मानतो. ख्रिस्ती धर्मसत्ताही कार्यक्षम होती व आहे. बहुधा आपण भारतीय चीन, आपला (राम माधवांचा, प्रचारकांचा) रा.स्व.संघ, ओवैसी वगैरे नावे घेऊ. पण ना यूनोहं अंबानी, टाटा, अमेरिकन संरक्षणखात्याची नावे घेईल; ना आपण.

अशा अठ्ठीवापराचा धोका कसा टाळावा, यावरही यूनोहं मत देतो. त्याची पहिली युक्ती म्हणजे खरी माहिती मिळवायला महागडे स्रोत वापरावेत. दुसरे म्हणजे, महत्त्वाच्या वाटणाऱ्या मुद्द्यांबाबत मूळ तांत्रिक-वैज्ञानिक साहित्य मिळवून वाचावे!

मला दुसरी पद्धत पटते, आणि माझ्यापुरती मी ती वापरतोही. पण त्यालाही मर्यादा आहेत, आणि त्या पहिल्या पद्धतीबाबतच्याच मर्यादा आहेत! महागडे माहितीचे स्रोत सरकारी तरी असतात, नाहीतर श्रीमंत कॉर्पोरेट तरी. आणि त्यांच्या नियंत्रणाबाहेर पडून आपल्यासारख्या गरीब दुबळ्यांना खरी माहिती मिळेल, हे मलातरी अवघड वाटते. पण एकूण दिसणाऱ्या चित्राची सुसंगती सतत तपासून अठ्ठ्या सापडतात, आणि त्यांवर टाकायला नहेल्या तयार ठेवता येतात.

तेही न जमल्यास आहेच, ‘आलिया भोगासी असावे सादर / तोंडावर चादर ओढोनिया’!

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

हे थोडं कट्ट्यावरच्या गप्पांचं ओबडधोबड टिपण केल्यासारखं वाटलं. ते एक वेळ ठीकच. परंतु ते 'संकल्पनाविषयक' विभागात आणणं हे माझ्या विनोदबुद्धीपलीकडे गेलं. पौरकाट्यिक विनोदाने काही गोष्टी झोडता येतात ह्याचं उदाहरण म्हणून?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"पौरकाट्यिक" हे काय असतंय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखातून -
पण post-truthचे झाले सत्योत्तर. उत्तरसत्य झाले नाही याने मी सुखावणार, तोच माझे पौरकाट्य (पोरकटपणा या शब्दाचे 'सुसंस्कृत' रूप) आडवे आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते 'संकल्पनाविषयक' विभागात आणणं हे माझ्या विनोदबुद्धीपलीकडे गेलं.

गेल्या वर्षीची संकल्पना - पोस्ट ट्रुथ
ह्या वर्षीचा सल्ला - स्वतःला सारखंसारखं सीरियसली घेऊ नका.
गेल्या वर्षीच्या संकल्पनेला तिरकस छेद देणारा लेख; पक्षी, ऐसीला हाच सल्ला देणारा लेख. तद्वत...?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणजे ऐसीला सल्ला देणारा लेख तुम्ही शिरेसली घेतला नि मग शिरेसली न घेण्याच्या (पक्षी: विनोदी) वर्गात ढकललात! हम्म्म् , कळलं बरं, कळलं!! :P
--
खरेंचं लेखन नि बेरकी खट्याळपणा आवडतो. नि टिपणातले मुद्देही चांगलेच आहेत. फक्त सहज गप्पा मारताना आलेल्या गोष्टी आवरून कागदावर आल्या असं खरंच वाटलं. टिपण विस्तारून छान लेख झाला असता. अर्थात त्यांनाच तसं स्वरूप हवं असेल तर काही करू शकत नाही, हे आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पेपरांचे ( वर्तमानपत्रांचे) पगारी लेखक हे असले शब्द शोधून लेख पाडतात. चर्चा चालू राहणे हे त्याच्या चुलीत सतत लाकडे पडण्यासारखे असते.
अठ्ठी नंतर चूल विझत चालली तर नल्ही सारून देण्याचा लेख तयार ठेवला आहे. डोक्यावर चादर घेऊन घोरायला मोकळे.
रास्ववाल्यांना चुरगाळलेले कपडे खपत नाहीत, इस्त्रीची कडक घडी लागते. इतर भाषणठोकु विचारवंतांसारखे त्यांना इस्त्री शोधावी लागत नाही. त्यांच्याकडेच असते.
संकल्पना गेली चुलीत.
-
लेख मस्त झालाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संस्कृतातील (म्हणजे पाणिनीय व्याकरणातील) संधिनियमांनुसार सत्य + उत्तर = सत्योत्तर (सूत्र आहे, आद्गुणः),
पण सत्ती + उत्तर = सत्त्युत्तर (सूत्र आहे, इको यणचि), सत्त्योत्तर नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...‘पौरकाट्य’ हेदेखील बरोबर नव्हे; ‘पौरकट्य’ पाहिजे, असे वाटते. (नक्की नियम/सूत्र वगैरे उद्धृत करू शकणार नाही, परंतु... वृद्धी ही केवळ पहिल्या स्वराची व्हायला हवी, किंवा कसे? बोले तो, ‘पारंपारिक’ किंवा ‘सार्वजानिक’ अशी रूपे न होता ती (अनुक्रमे) ‘पारंपरिक’ आणि ‘सार्वजनिक’ अशी ज्या नियमानुसार होतात, तो नियम.)

(अतिअवांतर: (स्त्रीपुरुषांच्या सामाजिक समतेसाठी) आम्ही ज्या ‘आंतरलैंगिक विवाहां’चा जाहीर पुरस्कार करतो, एवढेच नव्हे, तर आमच्या घराण्याच्या तमाम ज्ञात इतिहासात ज्या ‘आंतरलैंगिक विवाहां’ची उज्ज्वल परंपरा असण्याबद्दल आम्ही सदोदित टिमकी वाजवितो, त्या ‘आंतरलैंगिक विवाहां’मधील ‘आंतरलैंगिक’ हे रूपदेखील याच नियमानुसार चूक आहे, असे लक्षात येते. मात्र, योग्य रूप तूर्तास माहीत नसल्याकारणाने, तूर्तास तरी ते चुकीचे रूप तसेच दामटीत राहण्याचा मानस आहे. तज्ज्ञांनी अर्थातच योग्य तो खुलासा अवश्य करावा; तो पटल्यास, आवश्यक ती सुधारणा अवश्य करण्यात येईल. आगाऊ आभार.)

(अतिअवांतर-२: पण मग, ‘मृच्छकटिक’ असे रूप कोणत्या नियमाने होते? ‘मार्च्छकटिक’ असे का होत नाही?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"भिन्नलिंगी" शब्द कसा वाटतो?

ह्या शब्दास "सार्वजनिक" मान्यताही आहे व तो वापरल्यास "पारंपरिक" अभिमानजन्य टिमकी वाजविण्यास मोकळे राहू शकाल.

पाणिनीचा शेवट कसा झाला हे लक्षात घेता त्याच्यावर जास्त भिस्त न ठेवणे श्रेयस्कर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंबानी आणि पेंटॅगॉन यांच्या पंक्तीत टाटाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!