‘त्रिगुणी’ व्यक्तिमत्त्वातून साकारलेली... ‘त्रिपुटी!’

त्रिपुटी
(सुप्रिया विनोद - अक्षर प्रकाशन - रु१००/- पृष्ठे:८८)

ज्यांना रोजच्या अन्न-पाण्याची, जगण्याची भ्रांत नसते अशा खाऊन-पिऊन सुखी कुटुंबांत सर्वसाधारणपणे शिक्षण, नोकरी-व्यवसाय, लग्न ह्या क्रमाने प्रत्येकाचं आयुष्य पुढे सरकत असतं. लग्नाच्या टप्प्यापर्यंत मुलगा-मुलगी, स्त्री-पुरूष असा भेदभाव सहसा आढळत नाही. लग्नानंतर मात्र चित्र थोडं बदलतं. मुलीचं स्त्रीत्व पुढे येऊ लागतं. शिवाय ‘लग्नानंतर मूल होणं’ हेही जणू गृहितच धरलेलं असतं, समाजाने आणि त्या जोडप्यानेही! बदलत्या जीवनमानानुसार ह्या विचारसरणीत आता हळूहळू फरक होत आहे. ‘आपल्याला मूल हवं की नको ह्याचे निर्णय-स्वातंत्र सर्वस्वी त्या जोडप्याचे आहे’ हा विचार आता रुजू लागलाय. Double Income No Kids - DINK अशी जोडपी आपल्या आसपास वावरताना आपण बघतो. पण तरीही हे प्रमाण अजून अत्यल्प आहे.

अभिनयाच्या क्षेत्रात काम करणार्‍या जोडप्याच्या बाबतीत मूल होणं-न होणं असा निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा काय होतं? निर्णय पक्का झाल्यानंतर त्याची पूर्तता करताना काय अडचणी येतात? एक... एकसे भले दो! दो... दो से भले तीन! अशी तिळ्यांची गर्भधारणा जर झाली तर? जगण्याचाच पेच निर्माण होतो का? हे जोडपं अशा परिस्थितीला कसं तोडं देतं? त्यासाठी कुणाकुणाची, कशी मदत घेतं? सुप्रिया विनोद ह्यांनी लिहिलेल्या ‘त्रिपुटी’ ह्या छोटेखानी कादंबरीत हे सारं नेमकेपणाने जाणून घेता येतं.

सुप्रिया विनोद जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स (मुंबई) च्या फाईन आर्ट्स पदवीधर. पोर्ट्रेस व म्यूरल्सचा त्यांचा विशेष अभ्यास. ‘जे आडात तेच पोहर्‍यात!’ स्वत:चे आई-वडिल व त्यांचे आई-वडिल अशा दोन पिढ्यांकडून विविध कलांचा वारसा लाभलेली ही अभिनेत्री-लेखिका-चित्रकार! शिवाय शिस्तीचं बाळकडूही आई-वडिलांकडून मिळालेलं. त्यामुळे सुप्रियाने कोणत्याही कलाविष्कारात स्वत:ला तयारीने आणि आत्मविश्वासाने पेश करणं हेही तसं स्वाभाविकच!

नाटक, अ‍ॅड-फिल्म, दूरदर्शन-मालिका अशा क्षेत्रांत काम करणार्‍या दीपक आणि जिगिषा ह्या जोडप्याने स्वत:शी केलेल्या संवादांतून दोघांची मनं आणि त्यांचं जगणं उलगडतं. त्यांची पूर्वायुष्यं, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि ज्या कारणांनी त्यांचं मानसिक स्वास्थ्य पणाला लागलंय ती सद्यपरिस्थिती त्यांच्या स्वगतांतून व्यक्त झाली आहे. एकमेकांवरील प्रेम आणि विश्वास हे त्यांचे मुख्य जीवनाधार. आपल्याला जे वाटतं ते तटस्थपणे व जसंच्या तसं सांगण्याचा सच्चेपणा दोघांतही आहे. कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता आपल्या भावनांशी प्रामणिक राहून केलेलं हे आत्मनिवेदन अस्सल आहे. त्यात प्रेम-राग-लोभ-काळजी अशा वेगवेगळ्या भावनांचं मिश्रण आहे.

अंगभूत वात्सल्याचा वर्षाव करण्याच्या गरजेपोटी स्वत:चं मूल असावसं वाटणं हे तसं स्वाभाविकच! त्यासाठी सर्वसाधारणपणे आर्थिक पातळीवर तयारी करणं हे ओघानं आलंच. ह्या प्रक्रियेत दोघांचाही सहभाग अपेक्षित असतो. स्त्री कोणत्याही क्षेत्रात वावरणारी असली तरीही तिच्या मनातील मातृत्वाची आस सर्वांत जास्त प्रबळ असते. म्हणूनच गर्भारपण-बाळंतपण-संगोपन ह्या कारणांसाठी आपल्या आवडीच्या क्षेत्रातून काही काळासाठी दूर राहण्याची तिची मानसिक तयारी आपोआपच होते. शिवाय निसर्ग-नियमांनुसार मूल जन्माला येईपर्यंत प्रत्यक्ष सहभाग फक्त स्त्रीचाच असतो.स्वतंत्रपणे जगण्याइतकं सक्षम होण्यासाठी पशु-पक्ष्यांच्या पिल्लांपेक्षा माणसांच्या मुलांना जास्त काळ लागतो. कारण ही वाढ शारीरिक, मानसिक, बौध्दिक अशा अनेक अंगांनी होणार असते. आणि ह्या टप्प्यावरच संसाराला, सहजीवनाला खर्‍या अर्थाने सुरूवात होते. परंपरेनुसार वडीलांपेक्षा आईने जास्त योगदान देणं अभिप्रेत अन अपेक्षित असतं. मुलांसाठी स्त्रीला आपल्या नोकरी-व्यवसायातून काही काळासाठी अथवा कायमस्वरूपी माघार घ्यावी लागणं, तिने आपला सर्व वेळ फक्त आपल्या लेकरासाठी देणं असा जणू अलिखित नियमच बनून जातो.

नवरा-बायको दोघंही एकाच क्षेत्रात काम करत असतील तर असा निर्णय घेऊन तो अंमलात आणणं थोडं अवघड बनू शकतं. काही काळापुरतं असेना का पण स्त्रीला तिच्या कामातून सक्तीने विराम घ्यायला लागल्याचे तिची पात्रता-योग्यता पुरेशी असूनही ज्येष्ठतेच्या निकषावर ती मागे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.‘पुरूषांसाठी सगळं कसं सोपं-स्वच्छ-साधं असतं. सगळी गुंतागुंत मात्र बायकांच्यात वाट्याला येते’ असं स्वत:च स्वत:ची समजून काढत, ‘मुलांना वाढवण्याचं नि स्वत:चं करिअर वाढण्याचं वय एकच असतं’ ह्यामुळे येणारं हताशपण मान्य करत, मुलांच्या संगोपन करताना येणार्‍या एकटेपणाला तोडं देण्याचं धैर्य स्त्रीला अंगी बाणवावंच लागतं.

माणसाने ठरवल्याप्रमाणे सारं काही घडणं म्हणजे आयुष्य? की जे घडेल त्याला धीराने सामोरे जाणे ह्यालाच आयुष्य म्हणतात? माणूस ठरवतो एक आणि घडतं काही वेगळंच! दीपक-जिगिषाच्या बाबतीत नेमकं काय घडतं? त्यांनी काय ठरवलेलं असतं आणि ठरवल्यानुसार सर्व घडतं का? जे घडतं त्याला ते कशा प्रकारे सामोरे जातात? एकमेकांना सांभाळून-समजून घेत सहजीवनाची वाटचाल ते कशी करतात. अंतिमत: आयुष्य समजून घेत त्यांना मान्य करावा लागणारा निर्णय आपल्याला अस्वस्थ का करतो?

संसारातील आर्थिक समस्या, व्यवसायात टिकून राहण्यासाठी करावी लागणारी मेहनत, अन हे सांभाळत, एकदा गर्भपात झाल्यानंतरही मूल होऊ द्यावं की नाही अशा विचारांच्या कात्रीत सापडून दोघांच्याही मनांची होत असलेली चलबिचल कादंबरीत परिणामकारकतेने व्यक्त झाली आहे. जीवन-मरणाच्या रेषेवरचा अल्लडतेकडून प्रगल्भतेकडे होणारा दोघांचा प्रवास विशेष उल्लेखनीय आहे.

सिने-नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींनी मनापासून लिहिलेली व लेखिकेची खासियत टिपणारी प्रस्तावना वाचनीय आहे. लेकीच्या ह्या पुस्तकाचं अर्थवाही मुखपृष्ठ व आतील रेखाचित्रांतून दिसणारा रत्नाकर मतकरींच्यातील चित्रकारही प्रेक्षणीय आहे.

चित्रकाराच्या कुशलतेने रेखाटलेली, लेखणीच्या कौशल्याने निरनिराळ्या स्वभाव-विशेषांनी रंगवलेली आणि अभिनेत्रीच्या सहजतेने साकारलेली व्यक्तिचित्रे-घटना-प्रसंग. सुप्रिया विनोद ह्यांच्या ‘त्रिगुणी’ व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार असणारी ही ‘त्रिपुटी’...

चित्रा राजेन्द्र जोशी.
१९.०३.२००९

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

परीक्षण वाचून पुस्तक वाचण्याची ऊत्सुकता आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

छान परिचय. कुणी लक्ष वेधल्याशिवाय माझं लक्ष जाणं अवघड या पुस्तकाकडे.
एक सुचवावसं वाटतं: शीर्षकात 'त्रिगुणी' या शब्दाला अवतरण चिन्ह नसतं तर जास्त योग्य वाटलं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगळाच विषय.. पुस्तक दिसलं की नक्की वाचेन
परिचय चांगला - नेटका- झालाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!