पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०१९
१० जानेवारीपासून पिफ सुरू होणार आहे. त्यातले काही चित्रपट मुंबईत यशवंत चित्रपट महोत्सव आणि नागपुरात ऑरेंज सिटी महोत्सवातही दाखवले जातील. त्या निमित्तानं पिफमधल्या काही निवडक चित्रपटांचा परिचय करून देण्यासाठी हा धागा.
आजच्या दिनविशेषातून : १९९१ : मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा. सोव्हिएत युनियनची अखेर.
१९८९मध्ये गोर्बाचेव्ह यांच्या क्यूबा भेटीपासून चालू होणारा 'अ ट्रान्सलेटर' 'पिफ'च्या स्पर्धा विभागात आहे. हवानामधल्या रशियन साहित्याच्या एका प्राध्यापकाच्या सुखी मध्यमवर्गीय आयुष्यात ह्या भेटीमुळे एक वादळ येतं. सोव्हिएत युनियनचा अस्त आणि त्याच्या मदतीवर अवलंबून असलेल्या कॅस्ट्रो सरकारवर येऊ घातलेलं आर्थिक अरिष्ट यांची पार्श्वभूमी चित्रपटाला आहे. कठीण परिस्थितीत आपल्यापुरतं पाहावं की आपण समाजाचं काही देणं लागतो आणि ते चुकतं करण्याची हीच वेळ आहे असं मानून जगावं, असा तिढाही चित्रपटात आहे. चित्रपट खऱ्या घटनेवर आधारित आहे. दिग्दर्शकद्वयीच्या आई-वडिलांच्या आयुष्यावर तो बेतलेला आहे.
एक क्लिप इथे पाहता येईल. ट्रेलर आणि अधिक माहितीसाठी इथे पाहा. (धागा लोड व्हायला वेळ लागू नये म्हणून एम्बेड केलेला नाही.)
ह्यापूर्वी सनडान्स, शांघाय, गोव्याचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इत्यादिंतही हा दाखवला गेला होता.
डोमेस्टिक
वैवाहिक जीवनातल्या ताणतणावाची गोष्ट जर हॉररपटाच्या वळणानं जायला लागली तर काय होईल? 'डोमेस्टिक'मध्ये सायकल रेसर नायक आपला स्टॅमिना वाढवायला आपल्या पलंगाला एक ऑक्सिजन सिलिंडर बसवून घेतो. उंचावर हवा विरळ होते तिथे आपली फुफ्फुसं आपोआप अधिक काम करू लागतात. हीच परिस्थिती तो आपल्या पलंगावर निर्माण करू पाहतो. त्याच्या पत्नीला मूल हवं आहे. दोघांची ध्येयं वेगळी आहेत. मग विचित्र गोष्टी घडू लागतात. पदार्पणातच दिग्दर्शक ॲडम सेडलकचा चित्रपट कार्लोव्ही व्हारी महोत्सवात स्पर्धा विभागात निवडला गेला आणि आता तो पिफमध्येही स्पर्धा विभागात आहे.
एकच पास
एखादाच सिनेमा पाहायचा असेल तर तसे/तसा तिकीट/पास मिळू शकते का?
पूर्ण महोत्सवाचा एकच पास मिळतो (शुल्क : ८००/- फक्त. ज्येष्ठ नागरिक / विद्यार्थी / फिल्म सोसायटी सदस्य - ६००/- फक्त). त्यात आठ दिवस कोणत्याही ठिकाणचा कोणताही खेळ पाहता येतो. स्वतंत्र खेळांची तिकिटं विकली जात नाहीत.
टू मच इन्फो...
तुम्ही एक मध्यमवयीन पुरुष आहात. तुम्हाला ओसीडी आहे. तुम्हाला मूब्ज आहेत. तुम्हाला आयुष्यात आतापर्यंत काहीही जमलेलं नाही. तुम्ही दिग्दर्शित केलेला एकमेव चित्रपट इतका कोसळला की तो कुणीच पाहिलेला नाही. हां, आता 'गे नात्झी सायबोर्ग झॉंबीज इन लव्ह' अशा नावाचा चित्रपट लोकांनी का पाहावा, अशी कुत्सित शंका कुणी काढू शकतं. तर, असा माणूस नवा चित्रपट दिग्दर्शित करायला घेतो त्याची क्रेझी विनोदी कहाणी म्हणजे 'टू मच इन्फो क्लाउडिंग ओव्हर माय हेड'. दिग्दर्शकाचं काम स्वतः दिग्दर्शकानंच केलं आहे म्हणजे हा मेटा-फिक्शन आहे (पण नाही, त्यानं ह्याआधी 'गे नात्झी सायबोर्ग झॉंबीज इन लव्ह' दिग्दर्शित केला नव्हता.)
थेसालोनिकी महोत्सवात FIPRESCI पारितोषिक मिळालेला हा चित्रपट 'पिफ'मध्ये स्पर्धा विभागात आहे.
बाजारपेठ
अर्थात डीव्हिड्या येण्यासाठी वाट बघावी लागेल.
बाजारपेठ नावाची गोष्ट इथे आड येते. काही बहुचर्चित, ऑस्करसाठी नामांकित झालेले वगैरे सिनेमे अमेरिकेत प्रदर्शित होतात, किंवा डीव्हीडी / स्ट्रीमिंग वगैरे माध्यमांतून उपलब्ध होतात. पण 'पिफ'च नव्हे, तर एकंदरीत आंतरराष्ट्रीय महोत्सवांत फिरणारे बरेचसे सिनेमे इतके सहजगत्या उपलब्ध होत नाहीत असा अनुभव आहे.
माय ओन गुड
भूकंपानं उद्ध्वस्त झालेलं एक इटालियन खेडं. सगळं गाव आता वेगळ्या ठिकाणी वसवलं गेलं आहे आणि इथे केवळ भग्नावशेष उरलेले आहेत. आणि गाव सोडायला तयार नसलेला एक माणूस. त्याला अखेर निर्वाणीचं सांगितलं जातं की भिंत बांधून गावाला बंद केलं जाणार आहे; तू मुकाट्यानं बाहेर ये किंवा पोलीस तुला घ्यायला येतील. आणि अचानक काही तरी घडू लागतं...
व्हेनिस महोत्सवात 'giornate degli autori' विभागात दाखवला गेलेला हा चित्रपट 'पिफ'मध्ये स्पर्धा विभागात आहे.
अधिक माहिती इथे
एक तुकडा इथे
स्लाय
इराणमध्ये सिनेमावर इतके निर्बंध आहेत की राजकीय टिप्पणी करणारा सिनेमा करायला अक्कल लागते. सत्तेबाहेर गेलेल्याची थट्टा करतो म्हणून कदाचित 'स्लाय' निर्माण होऊ शकला असावा. ज्याला अक्कल आहे असा अजिबात संशय वाटत नाही असा एक (पक्षी : अहमदिनेजादसारखा) माणूस कथेच्या केंद्रस्थानी आहे. आपल्या बावळटपणामुळे लोकांच्या चेष्टेचा विषय असलेला कुदरत बघता बघता लोकप्रिय होतो आणि सत्तास्थानापर्यंत पोहोचतो त्याचा हा हास्यास्पद प्रवास आहे. मीडिया कसा एखादा विषय उचलून धरते आणि अजिबात लायकी नसलेला एखादा त्यातून नायकपदाला कसा पोहोचतो त्याचाही हा प्रवास आहे.
फज्र आणि बुसानसारख्या महोत्सवात दाखवला गेलेला हा चित्रपट 'पिफ'मध्ये स्पर्धा विभागात आहे.
ट्रेलर इथे
अधिक माहिती इथे
पॉइझनस रोजेस
एखाद्या सिनेमाचा पोतच विलक्षण वाटतो. टुरिस्टांना न दिसणारे कैरोमधले लहानलहान गल्ल्याबोळ, गटारं आणि एका चामडी कमावण्याच्या कारखान्याचा पोत घेऊन 'पॉइझनस रोजेस' येतो. एका बहिणीची आणि भावाची ही गोष्ट आहे. दोघांच्या आकांक्षा वेगळ्या आहेत आणि त्यासाठी काहीही करायला ते तयार आहेत. मग प्रेमापोटीच संघर्ष निर्माण होतो. काही ठिकाणी मणि कौलच्या 'उसकी रोटी'ची आठवण येते.
रॉटरडॅम, व्हेनिस, कैरो, साओ पावलो इ. महोत्सवांत आधी दाखवला गेलेला आणि काही पारितोषिकंही मिळवलेला हा चित्रपट 'पिफ'च्या स्पर्धा विभागात आहे.
ई. मा. यू.
लिजो जोसे पेलिसेरी दिग्दर्शित 'अंगमली डायरीज' पाहिलेले आणि आवडलेले काही लोक इथे आहेत. 'ई.मा.यू.' हा त्याचा पुढचा चित्रपट गोव्याच्या चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट दिग्दर्शकाचं पारितोषिक मिळवल्यानंतर 'पिफ'मध्ये स्पर्धा विभागात आहे. ह्यातदेखील काही इरसाल, विनोदी आणि आंबटगोड नमुने आढळतील. प्रसंग तसा बाका आहे, कारण घरात बापाचा मृत्यू झाला आहे आणि बापाच्या अंत्यसंस्कारात सतराशे विघ्नं आहेत. त्यामुळे काही लोकांना सतीश आळेकरांचं 'महानिर्वाण'ही आठवेल.
ट्रेलर इथे
रेड फॅलस
स्थानिक गोष्टी सांगून वैश्विक प्रेक्षकाला भुरळ घालणं आता जगाच्या अनेक कोपऱ्यांत होत असतं. आपल्या शेजारच्या भूतानमधून आलेला 'रेड फॅलस' त्या प्रकारचा आहे. एका विधीसाठी लागणारी लाकडी लिंगं कोरण्याचा पारंपरिक व्यवसाय करणारा माणूस आणि त्याची मुलगी कथेच्या केंद्रस्थानी आहेत. परंपरेत असलेला पुरुषप्रधान संस्कृतीचा संदर्भ, मुलीचं भावविश्व आणि वयानुसार तिला होणारी लैंगिक भावना, बापाचा पारंपरिक व्यवसाय पुढे चालवण्याची परवानगी मुलीला केवळ ती स्त्री आहे म्हणून नसणं, असे अनेक संदर्भ घेत, वास्तव आणि स्वप्नाच्या सीमारेषा धूसर करत कथेतलं नाट्य उत्कट होत जातं. अभिजात सिनेमाशी परिचय असलेल्यांना रोबेर ब्रेसों ह्या फ्रेंच दिग्दर्शकाच्या 'मूशेत'ची आठवण होऊ शकेल.
बुसान महोत्सवात FIPRESCI पुरस्कार मिळाल्यानंतर आता हा चित्रपट 'पिफ'च्या स्पर्धा विभागात आहे.
क्राउडफंडिंग करून चित्रपटाची निर्मिती झाली आहे. त्यासाठी आवाहन करणारा दिग्दर्शकाचा व्हिडिओ इथे.
अर्थ
श्रीलंकेचा इतिहास गुंतागुंतीचा आणि रक्तरंजित आहे. विशकेशा चंद्रशेखरम एक मानवी हक्कांसाठी लढणारे वकील आणि सिनेदिग्दर्शक आहेत. ह्यापूर्वी त्यांचा 'फ्रांजिपनी' पहिला श्रीलंकन एलजीबीटी चित्रपट म्हणून गाजला होता. त्यांचा नवा चित्रपट 'अर्थ' एका वेगळ्या प्रश्नाभोवती फिरतो. १९८७-९० काळात पीपल्स लिबरेशन फ्रंटनं तत्कालीन सरकारच्या विरोधात अनेक हिंसक कारवाया केल्या. (भारतीय शांती सेना तिथे असण्याच्या विरोधात ते होते). नंतर सरकारनं त्यांचा बीमोड करताना प्रचंड हिंसा केली. ह्या सगळ्यात जनता भरडून निघाली. सुमारे ५०,००० सिंहली तेव्हा मेले असावेत असा अंदाज आहे. (आणि तीस वर्षांत सुमारे लाखभर तमिळ मेले असावेत ते निराळेच.) ह्यातल्या कष्टकरी जातीच्या एका तरुणाची आई आपल्या मुलाचा शोध घेते आहे. ज्या सैनिकानं तिच्या मुलाला तिच्यादेखत उचलून नेलं तो सहा वर्षांनी ओळख परेडमध्ये समोर आला असता त्याला ती ओळखते. मग कोर्टात खटला सुरू होतो. पण ह्यातली गुंतागुंत हळूहळू उलगडत जाते तेव्हा तिच्या नैतिकतेचा आणि धैर्याचा कस लागणार असतो.
हा चित्रपट 'पिफ'मध्ये स्पर्धा विभागात आहे.
ट्रेलर इथे
मॅन विथ द मॅजिक बॉक्स
डिस्टोपियन भविष्यकाळातल्या वॉर्सॉमध्ये घडणारा हा चित्रपट दोन वेगवेगळ्या काळांत घडतो, ती प्रेमकथा आहे, ऑरवेलच्या १९८४चे पडसाद त्यात आहेत आणि गोष्ट गुंतागुंतीची आहे. चित्रपटाची शैली आणि एकंदर दृश्यरूप अतिशय काळजीपूर्वक घडवलेलं आहे. मोठ्या पडद्यावर दिसायला वेधक असा हा चित्रपट कार्लोव्ही व्हारी, वॉर्सॉ, इ. चित्रपट महोत्सवांनंतर आता पिफमध्ये स्पर्धा विभागात दाखवला जाईल.
डॉनबास
युद्धभूमी भयावह असते हे खरंच, पण अनेकदा 'हे नक्की काय चाललंय?' असा प्रश्न पडावा इतपत ती अॅबसर्डही असते. रशियन आक्रमणानंतर युक्रेनचा डॉनबास हा भाग सध्या तशा स्थितीत आहे. सेर्गेई लॉझनित्सा ह्या दिग्दर्शकानं त्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. त्याची शैली 'ब्लॅक कॉमेडी' म्हणता येईल. सलग कथानकापेक्षा काही छोटे छोटे प्रसंग घेऊन त्यानं ही अॅबसर्डिटी दाखवायचा प्रयत्न केला आहे. इथे युद्धपरिस्थितीला शांती म्हटलं जातं, सत्याच्या नावाखाली प्रचार खपवला जातो आणि प्रेमाच्या नावाखाली द्वेष. अर्थात पुतिनच्या रशियात त्यावर बंदी घातलेली आहे, पण इतरत्र तो गाजतो आहे. त्यात दाखवलेलं सत्य (किंवा पोस्ट-ट्रुथ) कदाचित आपल्याही जवळचं असू शकतं. कान महोत्सवातल्या 'सर्टन रिगार्ड' विभागात त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. 'पिफ'च्या स्पर्धा विभागात त्याचा समावेश झाला आहे.
डॅम किड्स
ऐंशीच्या दशकात चिलीवर जनरल पिनोशेची हुकुमशाही राजवट होती. त्यातल्या सत्य घटनांवर आधारित 'डॅम किड्स' चित्रपटानं पिफचं उद्घाटन होणार आहे. गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्तानं 'सत्याचा शोध' या विषयाशी संबंधित काही चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत. 'डॅम किड्स' त्या विषयाशी जोडलेला आहे. चिलीवरच्या घट्ट हुकुमशाही पकडीत जनता चिरडली जात असताना एक अमेरिकन तरुण मिशनरी तिथे येतो. एका गरीब घरात त्याची राहण्याची सोय केलेली असते. हळूहळू तिथल्या लोकांशी त्याचा परिचय वाढत जातो, तसतसं तिथलं दाहक वास्तव त्याला जाणवू लागतं. हा एका पिढीचा सत्याचा शोध म्हणता येईल, कारण चिलीतले तरुणही आपलं वास्तव जाणून घेऊन ते बदलण्यासाठी प्राणपणानं लढत असतात.
माहितीसाठी
ह्या धाग्यावर मी केवळ काही निवडक चित्रपटांचा परिचय करून देतो आहे. ज्यांना महोत्सवातल्या सर्व चित्रपटांची समग्र माहिती हवी आहे त्यांना ती आता महोत्सवाच्या संकेतस्थळावर मिळेल.
नॉन-फिक्शन
ओलिव्हिए आसायास हा महत्त्वाच्या समकालीन दिग्दर्शकांपैकी एक. त्याचा ताजा चित्रपट नॉन-फिक्शन अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांभोवती फिरतो. फिक्शन म्हणजे काय आणि सत्य म्हणजे काय, लेखकाच्या जगण्याचा फिक्शनमध्ये शिरकाव कसा होतो, लोक पुस्तकं का वाचतात, आजकाल लोक काय वाचतात, वाचण्यासाठी माध्यम इ-रीडर, स्मार्टफोन, ऑडियोबुक की इतर काही, गंभीर, सखोल समीक्षेची आज सोशल मीडियावगैरेंसमोर काही गरज उरली आहे का, वाचन की वेब/टीव्ही सीरीज असे काही प्रश्न एकीकडे, तर दुसरीकडे राजकारण, प्रेमप्रकरणं, जगणं आणि एकंदर अस्तित्व! एवढ्या सगळ्या गोष्टी कवेत घेऊन त्याविषयी खुसखुशीत चित्रपट करता येईल का? हे पाहण्यासाठी आवर्जून पाहावा असा चित्रपट.
(ज्यूलिएत बिनोश पाहायला मिळेलच; शिवाय, यवतमाळ कुठे आहे हे माहीत नसणारा कुंडलकर पाहतापाहता आठवेल, हासुद्धा एक बोनस!)
व्हेनिस महोत्सवात स्पर्धा विभागात असलेला हा चित्रपट 'सत्याचा शोध' ह्या 'पिफ'च्या थीमअंतर्गत महोत्सवात समाविष्ट आहे.
बुडापेस्ट न्वार
न्वार सिनेमा हा एक रसिकप्रिय आणि लोकप्रिय प्रकार आहे. अंधारात घडणारा शैलीदार गुन्हेगारी कथेचा हा प्रकार अमेरिका-फ्रान्स ते गुरु दत्त - श्रीराम राघवन असा मोठा प्रवास करून आज एक विधा म्हणून प्रतिष्ठित आहे. 'पिफ'च्या 'कंट्री फोकस' विभागात हंगेरीमधले काही चित्रपट समाविष्ट आहेत त्यात 'बुडापेस्त न्वार' हा नात्झी काळात घडणारा देखणा न्वार चित्रपट आहे. रहस्यभेद न करता फार कथानक सांगता येणार नाही, पण एका वेश्येचा खून आणि खुन्याचा माग घेणारा डिटेक्टिव्ह असं कथानक आहे.
शॉपलिफ्टर्स
हिरोकाझू कोरीएडा हा सध्याच्या महत्त्वाच्या दिग्दर्शकांपैकी एक. त्याच्या अनेक चित्रपटांना अनेक पारितोषिकं मिळाली आहेत. ह्या वर्षी कान महोत्सवात 'गोल्डन पाम' पारितोषिक मिळालेला त्याचा 'शॉपलिफ्टर्स' पिफमध्ये आहे. भांडवलशाही व्यवस्था, कल्याणकारी राज्य, आणि ह्या सगळ्यात जे 'नॉर्मल' समजलं जातं त्यात वेगळ्या पडलेल्या काही Dysfunctional लोकांची ही गोष्ट आहे.
अधिक माहिती आणि ट्रेलर इथे
द बुचर...
काही चित्रपट त्यांच्या नावापासूनच उत्सुकता निर्माण करतात. उदा. 'द बुचर, द होअर अँड द वन-आइड मॅन' हा हंगेरियन चित्रपट. दोन महायुद्धांच्या दरम्यान घडणारं हे कथानक एक हिंसक पण देखणी प्रेमकथा आहे, एका खुनाची कथा आहे आणि एक राजकीय कथाही आहे. हंगेरियन चित्रपटांच्या विशेष विभागात ती 'पिफ'मध्ये आहे.
बार्बेरियन्सचा इतिहास
रुमेनियात सध्या जागतिक दर्जाचा सिनेमा होत आहे ह्याचं प्रात्यक्षिक दर वर्षी मिळत राहतं. 'I Do Not Care If We Go Down in History as Barbarians' अशा लांबलचक नावाच्या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक राडू जूडनं ह्या वर्षीच्या 'पिफ'मध्ये ते दाखवलं. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यूंना छळछावण्यांत पाठवण्यात जर्मनीच्या खालोखाल रुमेनिया होता. आज जेव्हा एक मुलगी त्याबद्दल शहराच्या मध्यवर्ती भागात एका सार्वजनिक सादरीकरणातून काही म्हणू पाहते तेव्हा काय काय होतं ते चित्रपटात दाखवलं आहे. व्यक्तिगत-राजकीय-ऐतिहासिक अशा अनेक गुंतागुंतीच्या पातळ्यांवर चित्रपट फिरत राहतो. आज जगभर आपापला इतिहास सोयीस्करपणे नाकारणं आणि आपल्या राष्ट्राच्या इतिहासाला केवळ महान, अभिमानास्पद आणि शूर वगैरे रंगातच पाहणं चालू आहे. अशा वेळी ह्यात कदाचित आपल्याकडच्या वातावरणाचंही प्रतिबिंब दिसलं तर ते नक्कीच हेतुपुरस्सर आहे असं समजून चालावं. चित्रपटाला कार्लोव्ही व्हारी महोत्सवात पारितोषिक मिळालेलं आहे.
मुसोलिनी परत आला तर काय होईल? ह्या कल्पनेवर आधारित 'आय ॲम बॅक' हा इटालियन चित्रपटही 'बार्बेरियन्स'प्रमाणे आपल्याच लज्जास्पद इतिहासाकडे पाहण्याचा जगभरातल्या लोकांचा आजचा दृष्टिकोन विनोदामार्फत दाखवतो.
व्हायरस ट्रॉपिकल
ॲनिमेशन फिल्म म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर पिक्सार वगैरे येतात, पण जगात खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशनपट केले जातात. 'व्हायरस ट्रॉपिकल' एका मिश्किल, चावट आणि बंडखोर मुलीची गोष्ट सांगतो. त्यासाठी वापरलेल्या प्रतिमा एखाद्या ग्राफिक नॉव्हेलसारख्या वाटू शकतील, कारण एका ग्राफिक नॉव्हेलचंच हे चित्रपटीय रूप आहे.
अधिक माहिती इथे
ट्रेलर इथे
मेकिंग ऑफ इथे
गर्ल्स ऑफ द सन
कुर्दिस्तान. आपल्या मुलाच्या शोधात हाती शस्त्र घेतलेली एक स्त्री. प्रत्यक्ष युद्धभूमीवर वावरून वार्तांकन करू पाहणारी एक फ्रेंच वार्ताहर. आणि एका दिग्दर्शिकेच्या नजरेतून युद्धातलं क्रौर्य टिपणारा चित्रपट 'गर्ल्स ऑफ द सन'. गोलशिफ्ते फरहानी ही विख्यात इराणी अभिनेत्री आणि एमान्यूएल बेर्को ही नावाजलेली फ्रेंच अभिनेत्री. दिग्दर्शिका एव्हा युसाँ. हा चित्रपट कान महोत्सवात स्पर्धा विभागात होता. टोरोंटो महोत्सव आणि ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटचा लंडन महोत्सव इथेही तो दाखवला गेला आहे.
पिफ स्पर्धा विभाग.
अधिक माहिती इथे
एक क्लिप इथे