न कळलेले

सकाळी साडेदहाच्या सुमारास कार्यालयातील माझ्या जागेपाशी आवाज ऐकू आला. हा आवाज खारींचा आहे हे आता अनुभवाने मला माहीत झाले होते. आज सकाळीच यांचा गप्पा मारायचा, इतकेच नाही तर दंगा करायचा मनसुबा दिसतोय.. हे माझ्या लक्षात आल. बाहेर व्हरांडयात एक चक्कर टाकून त्यांच काय चाललय ते पाहाव असा विचार माझ्या मनात आला अन तितक्यात टेबलावरचा फोन खणखणला. मग कामात मी गुंतले ती गुंतलेच. मी काही फार महत्त्वाच आणि सृजनात्मक काम करते अशातला भाग नाही. पण सवयीने निरर्थक कामातही माणूस अडकत जातो. पोटासाठी अनेकदा आपण अशा कामाचे गुलाम बनतो! का असे होते ते कळत नाही, पण घडते खरे तसे! मी मुकाटयाने ही बाब ’न कळलेले’ या सदरात टाकून दिली आहे.

बघताबघता दुपारचा एक वाजून गेला. जेवणाची वेळ झाली. कार्यालयाच्या दुस-या इमारतीत कन्टीन आहे. जेवायला मला नेहमीसारखा उशीर झालेला असल्याने त्यावेळी त्या अर्ध्या मिनिटांच्या रस्त्यावर मी एकटीच होते. वाटेत दोन्ही बाजूंना बरीच झाडे आहेत. तिकडे जाताना खारीचा आवाज मला अगदी जवळून ऐकू आला. काही कामे समाधानकारकपणे हातावेगळी झाल्याने आता त्यांच्याकडे लक्ष द्यायला मला थोडी फुरसत होती. मी अर्जुनाच्या तडफेने आवाजाचा वेध घ्यायचा प्रयत्न करू लागले. आधी मला काहीच दिसले नाही. पण खारीचा आवाज मात्र येतच होता, किंबहुना आता तो जरा जास्तच जोरात येत होता.

आवाजाच्या दिशेने जात जात मी एका झाडाजवळ पोहोचले. खालच्या फांद्यांपासून सुरुवात करून मी वरती नजर फिरवत होते. लक्षपूर्वक पाहिल्यावर एका फांदीवर खारीचे एक पिल्लू मला दिसले. ते एकटेच होते. मला वाटले होते तसे अनेक खारींचा हा दंगा नव्ह्ता तर! हे एकटे पिल्लू इतका आवाज का बर करत असेल?

मी झाडाच्या जवळ जाताच ते पिल्लू आणखीनच जोरात आवाज करायला लागले. त्याला पाहून घसा ताणून ओरडणा-या आणि काही वेळा रडणा-या लहान मुलांची मला आठवण झाली. हे बहुधा हरवलेले पिल्लू होते. त्याच्या आईला ते शोधत असणार असे मला आपले उगाचच वाटले - प्राण्यांच्या आणि पक्षांच्या पिल्लांना त्यांच्या वडिलांचा आधार वाटतो की नाही हे मला माहिती नाही, हा माझा नुसताच एक अंदाज! अरे बापरे! सकाळी दहा साडेदहा वाजल्यापासून म्हणजे मागचे तीन साडेतीन तास हे पिल्लू ओरडते आहे. रडते आहे. एकटेच आहे. त्याला नक्कीच आता मदतीची गरज आहे. मी परिस्थितीकडे नीट पाहिले.

ते पिल्लू एका निमुळत्या होत गेलेल्या फांदीच्या वरच्या टोकाला होते. त्याला धड वरही जाता येत नव्हते आणि परत खालीही फिरता येत नव्हते. एक दोन फुटांवर फांदी संपत होती. आत्ताही ती फांदी किंचित वाकलेली होती आणि वा-याच्या झुळुकीने हलत होती. पाय गच्च पकडून आणि शेपटीच्या साहाय्याने त्याने कशीबशी तग धरली होती. मागे वळताना स्वतःचा तोल सांभाळता येईल अशी बहुधा त्या पिल्लाला खात्री नव्हती.

खरे तर खारीच्या त्या इवल्या पिल्लाकडे पाहताना मला माझीच स्थिती आठवली. आयुष्यात जेव्हा पुढे जाण्याचा रस्ता दिसत नाही आणि मागचेही सगळे दरवाजे बंद असतात, त्यावेळी काय वाटते हे मला अनुभवाने चांगले माहिती आहे. अशा प्रसंगी कोणी मदतीला येऊ नये अशीही इच्छा मनात असते, आपले आपण निभाऊन नेऊ असा आशावाद असतो. पण कोणी श्रेयाची अपेक्षा न करता मदत केली तर त्याचे अप्रूपही असते. मला अशा अनेक क्षणांची, प्रसंगांची आठवण त्या पिल्लाकडे पाहताना आली. कदाचित म्हणूनच खारीच्या त्या पिल्लाबद्दल माझ्या मनात ’सह- अनुभूति’ ची प्रबळ भावना दाटून आली.

अशा परिस्थितीत एरवी जे घडत तेच माझेही झाले. म्हणजे एखादी समस्या फक्त हृदयापर्यंत पोचून फारसा उपयोग नसतो, ती मेंदूपर्यंतही पोचावी लागते, तरच त्यातून मार्ग काढता येतो. त्या खारीच्या पिल्लाला नेमकी कशी मदत करावी हे मला समजत नव्ह्ते. ते पिल्लू माझी मदत मागत होते का पण? एक क्षणभरच माझी नजर त्या पिल्लाच्या नजरेत मिळाली आणि पिल्लाने मागे फिरण्याचा प्रयत्न केला. तो अर्थातच यशस्वी झाला नाही. कसाबसा स्वतःचा तोल सावरत खाली पडण्यापासून त्याने स्वतःला वाचवले. आता ते पिल्लू अधिकच जोरात ओरडू लागले. त्याचे सर्वांग थरथर कापत असलेले मला दिसत होते. ते माझ्या मदतीची अपेक्षा करत होते की ते आता मला घाबरत होते हे कळायला काही मार्ग नव्हता.

मी पायांखाली साठलेल्या पाचोळ्याचा अजिबात आवाज होणार नाही याची काळजी घेत एक पाउल पुढे सरकले. मनातल्या मनात, शब्दांविना त्या पिल्लाशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करत होते. माझ्या डोळ्यांतून माझी मदतीची भावना त्या पिल्लापर्यंत पोचेल अशी माझी भाबडी आशा होती. ’सावकाश मागे फिर, घाई करू नकोस. तुला मी खाली पडू देणार नाही, माझ्या ओजळीत मी तुला झेलेन, तू पडणार नाहीस...’ असे काहीबाही मी मनोमन त्या पिल्लाला सांगण्याचा प्रयत्न करत होते. माझी सद्भावना त्या पिल्लापर्यंत पोचेल, ते सुखरूप मागे फिरेल असे मला आपले उगाचच वाटत होते.

पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. माझ्या कृतीमुळे ते पिल्लू आणखी भयभीत झाले. ते जिवाच्या आकांताने ओरडू लागले. प्राणी, पक्षी, वनस्पती अत्यंत तरलपणे आपल्याला स्वीकारल्याचा अथवा नाकारल्याचा संदेश देतात. तो सूक्ष्म असतो पण अत्यंत स्पष्टही असतो. माणसेही खरे तर या भावना आपल्याप्रर्यंत पोचवतात पण जसजसे वय वाढते तसतसे त्याकडे दुर्लक्ष करण्याइतका बेरकीपणा आपल्या सर्वांकडे येतो.

खारीच्या या पिल्लाने माझी मदत नाकारताना मलाही नाकारले होते. ते स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नव्ह्ते. मी हळूहळू मागे सरकले. कदाचित त्या पिल्लाची आई जवळच असेल आणि मी समोर असल्याने ती मदतीला येत नसेल, अशी मी स्वतःची समजूत घातली. मी मागे फिरताच पिल्लाचा कंप कमी झाला, आवाजाचा जोरही थोडा कमी झाला. मी शांतपणे त्या जागी थांबले. माझ्या श्वासाचाही आवाज येऊ नये इतकी मी स्तब्ध होते. क्षणभर मी डोळे मिटले. पण मला काही सुचेना. त्या क्षणी मी पूर्णपणे रिक्त होते. पिल्लाची गोठलेली नजर अजून माझ्यावर खिळलेली होती. त्याला माझी भीती वाटत होती हे आता मला स्वच्छ समजत होते.

मी आणखी मागे सरकले. घाई न करता वळले. विचारमग्न अवस्थेत मी कन्टिनमध्ये गेले. त्या पिल्लाला माझे जवळ असणे आश्वासक वाटण्याऐवजी भीतीदायक का वाटले असावे हे मला समजत नव्हते. त्याचा आणि एकंदरच झाल्या प्रसंगाचा अर्थ शोधत मी दोन घास कसेबसे पोटात ढकलले. काही मिनिटांतच मी परत त्या झाडापाशी होते.

आता तेथे पूर्ण शांतता होती. कसलाही आवाज नव्हता, कसलीही हालचाल नव्हती. खारीच्या पिल्लाचा मागमूसही नव्हता. फक्त ते झाड आणि मी असे दोघेच होतो. ते झाडही जणू स्वतःच्या विचारांत मग्न होते, आपण त्या गावचे नसल्याच्या थाटात ते उभे होते. काय झाले त्या पिल्लाचे? त्याची आई त्याला घेऊन गेली? की ते खाली पडले? की आकाशात हिंडणा-या एखाद्या घारीचे ते शिकार बनले? मी चहूकडे नजर टाकली. कशाचीही खूण नव्हती. काहीही वेगळे दिसत नव्हते. सगळे जणू नेहमीसारखे होते. ते पिल्लू वेदनेने तळमळत होते? की ते खेळत होते? की ते स्वतःच्याच नादात होते? मी त्या पिल्लाला तशीच सोडून गेले हे बरोबर केले? की ती टाळता येण्याजोगी चूक होती? पिल्लाला माझ्याबद्दल विश्वास वाटावा यासाठी मी नेमकी काय काळजी घ्यायला हवी होती? मी त्याला कशी मदत करायला हवी होती? आता ते आनंदात असेल का?

खरेच पाच मिनिटांपूर्वी असे एखादे खारीचे एकटे आणि हतबल पिल्लू येथे होते? की हा सारा मला झालेला भास?

आणखी एका गूढाची भर पडली आयुष्यात! सत्य मला कधीच कळणार नाही! नेमके काय घडले, ते का घडले, ते टाळता येण्याजोगे होते की नव्हते, पर्याय काही होता की नाही …. ते सारे काही असेच ’न कळलेले’ या सदरात राहणार तर आयुष्यभर!
*
पूर्वप्रसिद्धी: http://abdashabda.blogspot.in/2010/01/blog-post.html

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

सविताताई,

शब्दबद्ध केलेला कंठ रुद्ध करणारा अनुभव

लेख वाचून शेवटी आपण सारे नियतीच्या हातातले कळसूत्री बाहुले असल्याचा फील देतो.
कारण कधी कधी आपण इच्छा असली तरी वेगळे वागतो ते असे.

हलवून जाणारा अनुभव

फक्त ते झाड आणि मी असे दोघेच होतो. या वाक्यातली विषण्णता देखील जाणवली

खारीच्या पिल्लाला केवळ त्याच्या आईचीच आठवण आली असावी.
तुम्ही मदतीसाठी जवळ येत आहात हे, जंगलचा कायदा त्याने पाहिलेला असल्यामुळे, त्याच्या लक्षात आले नाही त्याबद्दल तुम्ही स्वतःकडे दोष घेण्याचे काहीच कारण नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जीवघेणा अनुभव असतो हा. तो इतक्या सहज, पण हुरहूर लावणाऱ्या शब्दांत व्यक्त झाला आहे. उत्तम लेखन.
असे न कळलेले आणखी अनुभव लिहा. वाचायचे आहेत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक थेट अनुभव अगदी योग्य शब्दांत आमच्यापर्यंत येऊन, मनाला भिडला आहे. पु.ले.शु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोजच्या जिवनात येणार्‍या प्रसंगांची सांगड मनुष्य आपल्या जीवनाशी कशी घालतो याचे एक चांगले (बहुदा नकळत?) उदाहरण वाचायला मिळाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

स्फुट आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महादेवी वर्मा यांचा 'गिल्लू' हा लेख आठवला. आम्हाला हिंदीचा तो पाठ होता. सद्गदित करणारा अनुभव आणि तितकेच चांगले शब्द. लेखन फार्फार आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

वर आलेल्या अनेक प्रतिक्रियांशी सहमत आहे. लेखन अतिशय आवडले.

दिवंगत कवयत्री, गीतलेखिका , स्तंभलेखिका शांताबाई शेळके यांच्या शैलीची आणि त्यांच्या लिखाणातल्या विचारमालिकेची आठवण झाली. "जाणता अजाणता" नावाचा एक कॉलम बाई लिहायच्या. त्यात "मागे राहिलेले हसूं" अशा अर्थाचं शीर्षक असलेला एक लेख होता. लुइस कॅरोलच्या "अ‍ॅलिस इन वंडरलँड" या कादंबरीमधे चेशायर कॅटचं वर्णन आहे. त्यात म्हणे मांजर निघून जातं पण त्याचं हसू मागे रेंगाळतं असा संदर्भ येतो. बाईंनी म्हण्टलंय की ( हे शब्द आठवणीतून लिहितो आहे. तंतोतंत बाईंचे शब्द नव्हेत.) "ही संपूर्ण कादंबरीच लहान मुलांकरता आहे असं मानलं जातं त्यापेक्षा कितीतरी अधिक मोठ्या माणसांकरता आहे. चेशायर कॅटचं हे वर्णन आज वाचताना मी तिथे थबकले. आणि मला जाणवलं की आयुष्याच्या या टप्प्यावर जी अनेकानेक प्रेमाची माणसं मला सोडून गेली ती केवळ शरीराने. त्यांचे हासभास , त्यांचे प्रेमळ स्पर्श मला अजूनही जाणवत आहेत . त्यांचं अस्तित्त्व या खोलीतच मला जाणवतं आहे. चेशायर मांजराप्रमाणॅच त्यांचंही हसू मागे राहिलं आहे"

शांताबाईंच्या या प्रकारच्या लिखाणाशी प्रस्तुत लिखाणाच्या असलेल्या साम्याची वाचकाना कल्पना यावी म्हणून वरचं लिहिलं. ही तुलना नव्हे, वाङ्मयचौर्याचा आरोप नव्हे तर एखाद्या वाचकाचं मनही वेगवेगळ्या लिखाणामधे कशी असोसिएशन्स शोधतं हेही सांगायचं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

फार त्रासदायक असते. माणसाचे पिल्लू असो की जनावराचे, असहाय्य पिल्ले पाहिली की गुदमरायला होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात है!
असे अनुभव जवळजवळ प्रत्येकाला आले असतील.. मात्र ते इतक्या नेमक्या आणि सोप्या शब्दात मांडून ती हूरहूर, कालवाकालव पोचवणे क्वचित जमते.. जियो!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सागर, श्रावण मोडक, तिरशिंगराव, Nile, नंदन, सन्जोप राव, मुक्तसुनीत, सहज , ऋषिकेश, सर्वांचे आभार प्रोत्साहनाबद्दल.

सन्जोप राव आणि मुक्तसुनीत, तुमचा मुद्दा समजला. शेवटी माझ्यासारखे प्रायोगिक लेखक अनेक गोष्टी वाचून लिहायला शिकतात. त्यामुळे जाणूनबुजून टाळले तरी अनेकदा नकळत प्रतिमा, शब्द वापरले जातात इतरांचे. तसे घडले असण्याची शक्यता नेहमीच राहणार. किंवा वेगवेगळ्या काळात, दोन वेगळ्या व्यक्ती एक प्रकारे अनुभव घेतात हेही आहेच.

माझी इथं जरा पंचाईत होते लेखाच वर्गीकरण करताना. अनुभव मांडण्याची पद्धत जरी ललित शैलीची असली तरी मूलतः तो अनुभव आहे, ललित नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक तरल अनुभव, अतिशय प्रांजळपणे मांडलेला. संकटात सापडलेल्या त्या पिलाला तुमचा मदतीचा हातदेखील नवीन संकट वाटलं. आणि नंतर काय झालं त्या पिलाचं, ही हुरहूर पोचली.

अजून असंच लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमक्या शब्दात भावना व्यक्त झालेला लेख . आणि चिंतन सुद्धा आवडले. शेवटी किती भौतिक प्रगती केली तरी असा एखादा क्षण मानवी आयुष्यातही येतोच. अगदी खरे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुभव विलक्षण आहे.

जाताजाता एक व्यावहारिक सल्ला: खारीच्याच नव्हे, तर इतर छोट्या पक्ष्या-प्राण्यांच्या पिलांच्या बाबतीत असा अनुभव आहे की अज्ञात आणि आकारानं मोठ्या असणार्‍या माणसांची त्यांना साहजिक भीती वाटते, पण ती जीवघेणी नसते. त्यामुळे त्यांना मदतीची गरज असेल तर ती खुशाल करावी. त्यांना आपली भीती वाटते आहे की नाही याची अशा वेळी चिंता करू नये. डॉक्टरांच्या इंजेक्शनला मूल घाबरतं म्हणून ते द्यायचंच नाही, असं आपण करत नाही. तसंच हे आहे. धोका नाही हे एकदा लक्षात आलं, की ही पिलं पटकन माणसाळतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

राजेश, स्नेहांकिता, आभार.
चिंतातूर जंतू, तुमचेही आभार. तुमचा सल्ला पुढील वेळी नक्की लक्षात ठेवेन. पण या प्रसंगात ते पिल्लू उंच फांदीवर असल्याने मला फार काही करणं शक्य नव्हत - मी पर्याय शोधलेही नाहीत फारसे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर अनुभव! मनाला भिडणारे लेखन केल्याबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आभार रुपाली आणि अदिति.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप सुंदर आणि हळवा अनुभव आहे. कधी कधी एका (जगाच्या दृष्टीने) साध्याश्या घटनेचा आपल्या मनावर किती परिणाम होतो याचंच हे उदाहरण आहे.

मी बंगलोरला जिथे रहायचे तिथे माझ्या घरासमोर एका रिकाम्या प्लॉटला फक्त सर्व बाजूंनी भिंती बांधून सुरक्षीत केले होते. मी सहज म्हणून बाहेर बाल्कनीत आले तर एक वासरू प्लॉटच्या अलिकडे भांबावल्या अवस्थेत ओरडत होते तर प्लॉट्च्या पलिकडे एक गाय हंबरडा फोडत होती. सहाजिकच आई-पिल्लाची ताटातूट झाली होती आणि रिकाम्या प्लॉटभोवतीच्या भिंतीमुळे ते एकमेकाला दिसत नव्हते. ते वासरू खूपच भेदरलेलं आणि घाबरलेलं होतं आणि सतत त्याच्या आईला आवाज देत होतं तर ती गाय जणू तिच्या पिलाचा आवाज आल्यावर पुन्हा हंबरून आपण जवळच आहोत असं सांगून त्या वासराला आश्वस्त करत होती. ते केविलवाणे ओरडणे ऐकून आणि बघून इकडे माझ्या जीवाची घालमेल सुरू झाली. गाय-वासराला कशी मदत करावी ते कळत नव्हतं. शेवटी आपल्या पिलाच्या आवाजाचा माग घेत-घेत ती गाय जेव्हा वळसा घालून त्या प्लॉटच्या अलिकडे आली तेव्हा माझा जीव भांड्यात पडला आणि डोळ्यात पाणी तरळलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

स्मिता, असे अनुभव आपल्याला सर्वांना वेळोवेळी येतात हे तुमच्या अनुभवावरून अधोरेखित होते आहे. तुमचा अनुभवही आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टेक्सासला असताना एकदा एकदा हृद्य प्रसंग पहाण्यात आला -
संध्यालकाळ्ची सहज खिडकीत उभी होते. लवकरच अंधार होता. सॅन अँटॉनिओमध्ये नेहमी 'ब्लु जे' पक्ष्याचे जोडपे दिसे. याचे वर्णन सर्व इंग्रजी कवितांमध्ये एक गुंड पक्षी असे वाचलेले आहे. असो.
सहज खालती नजर गेली तो एक चिऊचे पिल्लू पडलेले होते आणि त्याच्या अवती भवती निदान १० चिमण्या फक्त त्याच्याकडे पहात गोलाकार उभ्या होया. क्वचित चिवचिव पण बाकी शांतता. काय मूक सभा चालली होती काय माहीत पण पिल्लू होते मध्यस्थानी व सर्व चिमण्या त्याच्या अवतीभवती. एकही चिमणी त्या पिलाला उडायला शिकवायचा प्रयत्न करत नव्हती.
.
त्या प्रसंगाचा मी लावलेला अर्थ - पिलाला दिवसभर उडायला शिकवुन पाहीले, ते काही उडू शकले नाही. लहान असेल, त्राण नसेल. आमच्या कॉम्प्लेक्समध्ये ३ तरी टगे बोके, मांजरी मोकाट फिरत असत. तेव्हा हे पिल्लू रात्र काढण्याची आशा अक्षरक्ष: शून्य होती.
बहुतेक हे चिमण्या नीटपणे जाणत होत्या आणि शेवटचा तो अलविदा होता. काही संध्याकाळचे क्षण भरलेली ती शोकाकुल सभा होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0