चावडीवरच्या गप्पा - महाराष्ट्र की मद्यराष्ट्र

“ते घोर कलियुग का काय म्हणतात ना, त्याची प्रचीती दिली हो तुमच्या साहेबांनी, बारामतीकर!”, घारुअण्णा तिरमिरीत चावडीवर प्रवेश करत.

“ काय? आज कसला बार उडवताय घारुअण्णा?”, नारुतात्या.

“अहो, ह्या बारामतीकरांच्या साहेबांनी महाराष्ट्रात दारूचा महापूर आणून महाराष्ट्राला 'मद्यराष्ट्र' बनविण्याचा घाट घातला आहे, म्हणून म्हणालो घोर कलियुग”, घारुअण्णा भयंकर उद्विग्न होत.

“कोण म्हणतंय असं ?”, इति नारुतात्या.

“आजच्या मटातली बातमी वाचली नाही का? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी हे म्हटले आहे आणि ह्याचे सत्तापीठ बारामतीत आहे ह्याची चिंता व्यक्त केलीय.”, घारुअण्णा त्याच उद्विग्नतेत .

“काय? आज चक्क मटा ? अहो, संध्यानंद बंद होईल की हो अशाने? खी. खी.. खी... ”, इति नारुतात्या.

“डोम्बल तुमचं नारुतात्या, अहो एवढा सिरीयस विषय आणि तुम्ही दात काय काढताय?”, घारुअण्णा तणतणत.

“बरं...बरं! त्यांना म्हणावे जळजळ पोहोचली बरं का, घारुअण्णा”, इति शामराव बारामतीकर.

“अहो बारामतीकर, तुमच्या साहेबांचा ह्यात हात आहे. एवढा मोठा सामाजिक प्रश्न आणि तरीही तुम्ही साहेबांचीच बाजू कशी काय घेऊ शकता हो, ऑ? ”, घारुअण्णा अजून घुश्श्यात, “एवढा शेतीचा जाणकार माणूस पण त्यानेच सर्व कॄषीक्षेत्राची वाताहत करावी यासारखे दुर्दैव नाही ह्या देशाचे. आता नसती अवदसा सुचली आणि दारूचे परवाने देत सुटले आहेत तुमचे साहेब.”

“अहो, ह्यात नेमका मुद्दा काय ते कळेल का? म्हणजे जर हे सत्तास्थान नागपुरात असते आणि एका ड्रायव्हरला एका कंपनीचा डिरेक्टर बनवून त्याला परवाने दिले तर आपला महाराष्ट्र, मद्यराष्ट्र बनता इथे रामराज्य अवतरले असते असे म्हणायचे आहे का तुम्हाला?”, बारामतीकर बरेचसे उपरोधाने आणि किंचित रागाने.

“अहो पण साहेबांचा ह्यात 'हात' कसा काय असेल? त्यांनी तर हातातला 'हात' हळूच काढून त्यावर घड्याळ चढवले ना? खी. खी.. खी...”, नारुतात्या तेवढ्यातही आपली विनोदबुद्धी पाजळत.

“गपा हो नारुतात्या! अहो बारामतीकर, दारूने समाजाचे नुकसान होते, समाजविघातक आहे ही दारू आणि तिचा असा उदोउदो केला जावे जे काही पटत नाही!”, चिंतोपंत नागपूर विनाकारण चर्चेत आल्याने कळवळून जात.
“हा! असे म्हणा की मग काहीतरी मुद्दा घेउन, उगाच राजकीय चिखलफेक करण्यात काय आहे?”, इति बारामतीकर.

“बरं बुवा! दारूने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत, होत आहेत आणि होत राहतीलच, त्यामुळे दारू समाजविघातक आहे ह्यावर काय म्हणणे आहे तुमचे? ”, नारुतात्या सिरीयस होत.

“अहो नारुतात्या, कुठल्याही गोष्टीला तारतम्य असावे लागते की नाही, दारूचेही तसेच आहे, तारतम्य न पाळता दारू ढोसल्यास विनाश हा होणारच. पण त्यामुळे दारूवर सरसकट बंदी घालणे जरा आततायीपणाचे आणि मूर्खपणाचे लक्षण आहे, ह्यावर काय काय म्हणणे आहे तुमचे?”, बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका चर्चेत सामील होत.

“भले शाबास! बहुजनह्रदयसम्राट, देशात जनतेला खायला अन्न नाहीयेय! त्यामुळे त्यांच्या दोन वेळेच्या अन्नाची सोय बघायची की दारुचा महापूर आणायचा? गरज कशाची आहे?”, घारूअण्णा रागाने लालेलाल होत.

“अहो तसे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत देशात, नव्हे एकंदरीतच जगात, म्हणून काय बाकीचे सगळे सोडून द्यायचे का?”, भुजबळकाका शांतपणे.

“हे बघा बहुजनह्रदयसम्राट, वाईनर्‍या बांधुन कितपत समाजकल्याण साधले जाणार आहे ?”, चिंतोपंत जरा तडकून.

“गरीबाला भाकर तुकडा,शेतकर्‍याच्या मालाला रास्त भाव, समाजकल्याण हे सर्व मुद्दे बरोबर आहेत पण त्यांचा दारु बनविणे आणि न बनविणे किंवा त्यासाठी परवाने देणे ह्याच्याशी थेट संबंध जोडणे म्हणजे जरा भावनिक किंवा सेन्टीमेन्टल होते आहे, व्यावहारिक नाही. व्यावहारिक पाताळीवरुनही विचार करून बघा जरा!”, भुजबळकाका ठामपणे .

“वा रे व्यावहारिक, अहो संस्कृति नावाचा काही प्रकार आहे की नाही? आपल्या हिंदू संस्कृतीत हे बसते का?”, घारुअण्णा चिडून.

“कोणत्या संस्कृतीच्या गप्पा सांगता आहात तुम्ही घारुअण्णा? रामायण आणि महाभारतातही दारू प्राशन केल्याचे दाखले आहेत, तेही एक प्रथा म्हणून प्राशन केल्याचे.”, भुजबळकाका हिरीरेने, "आणि बहुजनांच्या संस्कृतीचा तर तो आजही भाग आहे. आदिवासी संस्कृतीमध्ये दारूचे स्थान मानाचे आहे."

“अरें देवा! विश्वेश्वरा बघ रे बाबा तुच आता. धर्मच बुडवायाचा प्रयत्न आहे हा, म्हणून तर घोर कलियुग आले आहे असे म्हणत होतो मी, ते काही खोटे नाही!”, घारुअण्णा हताश होत .

“डोंबलाचे कलीयुग! अहो लोकांनी, दारु कशी पिउ नये व कशी प्यावी, हे समजावून घेतले की झाले, त्याचीच गरज फक्त, बास्स!”, भुजबळकाका.
“अहो भुजबळकाका, हे तर दारूचे उदात्तीकरण झाले असे नाही का वाटत?”, चिंतोपंत.

“नाही चिंतोपंत, उदात्तीकरण नाही वाटत मला तरी!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, तुम्ही सुद्धा?”, घारुअण्णा आणि चिंतोपंत दोघेही चमकून.

“हो, हे वाटणे खूप सापेक्ष आहे असे मला वाटते. म्हणजे तुम्ही नेमके कसे आणि काय बघता ह्यावर ते अवलंबून आहे.”, सोकाजीनाना मंद हसत, "म्हणजे असे बघा, नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा दोन बाजू प्रत्येक गोष्टीला असतात. अगदी प्रत्येक मानवनिर्मीत आणि नैसर्गिक गोष्टीला सुद्धा. आपण त्या गोष्टीकडे कुठल्या बाजूने बघतो, म्हणजे आपली सापेक्षता काय आहे ह्यावर, काय दिसणार हे अवलंबून आहे. आता बघा, सूर्यही नैसर्गिक गोष्ट आहे पण त्यालाही एक बोचरी आणि मानवासाठी हानिकारक बाजू आहे!”

"काय बोलताय काय सोकाजीनाना, हे काही पटत नाही ब्वा!", नारुतात्या बुचकळ्यात पडून.

“सूर्याच्या उष्णतेमुळे घाम येतो आणि घामामुळे शरीराला दुर्गंध येतो तसेच काताडीचा रंग काळा पडतो ही सूर्याची एक दुसरी बाजू आहे की नाही. पण त्यामुळे आपण सूर्याला झाकून टाकण्याचा वेडेपणा करतो? तर नाही. त्यावर उपाय शोधतो. तसेच आहे, जे भुजबळकाका म्हणत आहेत ते. अहो ज्यांना ती भावते ते पितात, ज्याला जी परवडते ती तो पितो. जे तारतम्य ठेवून पितात ते त्यातला आनंद लुटतात, ज्यांना त्यातली मर्यादा कळत नाही आणि पाळता येत नाही ते बहकले जातात आणि त्याचे दुष्परिणाम तेच भोगतात. त्यावर तुम्ही आम्ही कोण संस्कृतीरक्षक बनून पोलिसिंग करणारे? ज्याचे त्याला ठरवू देत की काय करायचे ते. राहीला मुद्दा ह्यातल्या राजकारणातला, तर तुमच्यात धमक आहे ते परवाना राजकारण थांबविण्याचे? मग उगा बोंबाबोंब कशाला?"

"अहो, त्या दारुताही काहीतरी मजा असेलच की, उगाच नाही तो गालिब म्हणून गेला 'ला पिला दे साकियां, पैमाना पैमाने के बाद'. फार कशाला आपले केशवसुतही म्हणून गेलेत 'काठोकांठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळूं द्या ! ' ” सोकाजीनाना मिश्कील हसत.

“अहो घारूअण्णा असे डोळे फाडून काय बघता आहात, मी काही 'एकच प्याला' मागवणार नाहीयेय आता, चहाच हवा ब्वा आपल्याला! चला तर आपला चहा मागवा कसें!”. सोकाजीनाना हसू कायम ठेवत.

घारुअण्णांनी हसणे आवरात चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (4 votes)

प्रतिक्रिया

कॉकटेलगुर्जी सोकाजीनाना दारूबद्दल काय बोलतात याची उत्सूकता होती..अपेक्षेप्रमाणे बोल्ले.. भरूप पावलो Wink

मस्त लेखन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्तम रे सोकाजी.
'रोज थोडी घ्या' असा सल्ला ह्यांना पूर्वी डॉक्टरांनी दिला होता.रक्तदाब का काय तो कमी असल्याने घ्यायला लागायची.गुलाम अलीची गझल 'हंगामा है क्यु..' ऐकत मग प्यायची मित्रांबरोबर.
(कधीही न घेणारी)रमाबाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार च मोठा आणि कंटाळवाणा लेख आहे. विनोद करायचा एक केविलवाणा प्रयत्न

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गप्पां मधला मुद्दा महत्त्वाचा आहे. या निमित्तानी ही बातमी वाचली:
http://www.loksatta.com/maharashtra-news/dr-abhay-bang-will-fight-for-al...
या बातमीत महाराष्ट्रात इतके लिटर बियर, तितके लिटर देशी दारू प्यायली गेल्याचे आकडे दिले गेलेत. पण याचा अर्थ व्यसनाधीन लोकांमध्ये वाढ झाली आहे असं म्हणणं बरोबर आहे का?
दारूबंदी हे काही व्यसनमुक्तीचं साधन म्हणून पटत नाही. उलट त्यामुळे अनधिकृत दारू विकण्याला प्रोत्साहन मिळेल. गुजराथ मध्ये दारूबंदी आहे, त्यामुळे तो व्यसनमुक्त आहे का हे कळणं महत्त्वाचं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0