सूचना

अपग्रेडच्या कामासाठी भावेप्र शुक्रवार (७ ऑक्टोबर) ते रविवार (९ ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत ऐसी अक्षरे अनुपलब्ध असेल. काम लवकर पूर्ण झाल्यास संस्थळ आधीच सुरू होईल. तसदीबद्दल क्षमस्व.

मनुकांचा निवडक संयत आहार

संकीर्ण

मनुकांचा निवडक संयत आहार

- झंपुराव तंबुवाले

कल्पनांमध्ये जग बदलविण्याची शक्ती असते. त्यांच्यामुळे अनेकांना नाना गोष्टींचे बळ मिळते. भरकटलेल्या कल्पनांमुळे अतोनात नुकसानपण होऊ शकते. त्यामुळे कल्पनांना वाचा देणाऱ्यांवर आणि इतरांच्या कल्पना उचलून धरणाऱ्यांवर फार मोठी जबाबदारी असते. न भरकटण्याची. तारतम्य नसलेल्या अशाच (लोकांनी कल्पिलेल्या) गोष्टी आपल्याला जास्त दिसतात.

विज्ञानकथा पाहू गेलो तर या भरकटलेल्या प्रकारात मोडणारी दोन-तीन प्रकारची उदाहरणे प्रकर्षाने दिसतात.
१. कोणत्याही सिस्टीमचे पटकन हॅकिंग: परग्रहवासीयांचे अवकाशयान आले आहे, त्यात पृथ्वीवासीयांनी कधीही न पाहिलेले तंत्रज्ञान आहे. पण वेळ आली की बरोब्बर एखादा पठ्ठ्या ती हॅक करून पाडतो.
२. प्राणी भलेमोठे पण सांगाडा छोट्या प्राण्यांसारखाच: आपले शरीर काही तत्त्वांवर आधारित आहे. त्याला किती वजन पेलेल, किती हाडे लागतील वगैरे अनेक छोट्या-मोठ्या वाटणाऱ्या पण सर्वच महत्त्वाच्या बाबी. म्हणूनच कीटक, सस्तन प्राणी, आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची शरीररचना एकमेकांपेक्षा भिन्न असते. पण सिनेमा-पुस्तकांमध्ये एखादा प्राणी हजारो पटीने मोठा (किंवा छोटा) केला जाऊन मूलभूत तत्त्वे धाब्यावर बसवून आरामात हिंडतो-फिरतो.
३. परग्रहवासीयांशी शरीरसंबंध: शारीरिक संरचना मुळीसुद्धा जुळत नसली, उत्क्रांती पूर्णपणे वेगळी झाली असली तरी पृथ्वीवासी आणि परग्रहवासी केवळ संभोगच करत नाहीत तर त्यांना मुले/पिल्लेही होतात हे अनेक निकृष्ट सिनेमांमध्ये दिसते. कल्पनादारिद्र्य, दुसरं काय!

पण विज्ञानकथा कोण वाचते म्हणा? आपण सगळ्यांना जवळचा असलेला विषय घेऊ या. सगळ्यांच्या अध्यात-मध्यात येणारे अध्यात्म. लोकांना एखादी गोष्ट शक्य नाही म्हणल्यास लगेच म्हणतात, "तुला काय माहीत? असेल की कुठे तरी शक्य, कुणी पाहिलंय सगळं विश्व?" (आणि हे म्हणतात एका खगोलशास्त्रज्ञाला). त्यांना जर सांगितले की 'वेगवेगळे धर्म परस्परविरोधी गोष्टी मानतात'; तर म्हणतात, "अरे, त्यांच्यात ज्या काही समान आहेत त्या गोष्टी घ्यायच्या, त्या चांगल्याच असतात." पण मग त्या समान असलेल्या चांगुलपणाच्या गोष्टी नास्तिकपण पाळतातच ना? मग धर्माची कल्पना निर्माण करायची गरजच काय?

स्पागेटी राक्षस
Touched by His Noodly Appendage, मिकेलांजलोच्या The Creation of Adam, ह्या प्रसिद्ध चित्रावरून प्रेरणा घेत आर्न निकलास यानसननं काढलेलं स्पगेटी राक्षसाचं चित्र. साभार - विकिपीडीया

निसर्गात असलेल्या बळी तो कान पिळी या तत्त्वाप्रमाणे पुरोहितांनी स्वत:ला धर्माद्वारे बलवान करून घेतले आहे. सगळे धर्म कोणी तरी, कधी तरी बनवलेलेच आहेत. हा मुद्दा हिरिरीने मांडण्यासाठी काही लोकांनी धर्माबद्दल सामाजिक जागृतीसाठी Hinduism, Buddhism वगैरे -ism सारखा Pastafarianism या धर्माला जन्म दिला. नेदरलंड्समध्ये ह्या धर्माला कायदेशीर मान्यता आहे. न्यूझीलंडमध्ये पास्ताफेरीयन धर्मगुरू लग्न लावू शकतात. यांच्या चर्चमधील देव असतो - उडता स्पगेटी मॉन्स्टर. २००५मध्ये पहिल्यांदा हा अवतरला तो कॅन्सस स्टेट बोर्डाच्या 'इंटेलिजंट डिझाईन'ला लढा देण्यासाठी. अमेरीकेतल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या अधोगतीला अनुसरून तिथल्या एका न्यायाधीशाने हा धर्म खरा नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

पास्ताफेरियन्सचे स्वत:चे गॉस्पल आहे, धार्मिक सुट्ट्या असतात, आणि इतर धर्मांप्रमाणेच इतरही अवडंबरे आहेत. का नसावीत? या धर्माची संथा घेताना स्पगेटीची रोवळी डोक्यावर टोपीसारखी घालावी लागते. २०१७मध्ये अरिझोनातील एका पास्ताफेरीयनने आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सचा फोटो ही रोवळी डोक्यावर घालून काढला.

रोवळी लायसन्स
अॅरिझोनातला तथाकथित पहिला पास्ताफेरियन ड्रायव्हिंग लायसन्स, सौजन्य - शॉन कॉर्बेट

याच धर्तीवर २००८मध्ये केरळातही एक धर्म बनला - डिंकोइजम. त्याचे अनुयायी बालमंगलम या जुन्या मल्याळी मासिकातल्या डिंकन नामक कार्टून मूषकराजाचे अनुयायी आहेत. ही एक विवेकी चळवळ आहे. फेसबुकद्वारे त्यांचा बराच प्रसार झाला आहे. 'खऱ्या' देवांच्या अनुयायांनी त्यांना धमक्याही दिल्या आहेत.

अति होते आहे ना हे? तर हा प्रकार पाहा.

रस्त्यांवर सर्व प्रकारच्या गाड्यांचे अपघात रोजच होत असतात, रस्ता नीट नसल्यामुळे, किंवा कुणी एखादी चूक केली म्हणून. असाच एकदा एक तरुण बुलेटवरून प्रवास करताना जोधपूरच्या दक्षिणेला पालीजवळ दगावला. पंचनामा झाला, आणि पोलिसांनी ती मोटरसायकल पोलीसस्थानकावर नेली. इतर अनेक गाड्यांसारखी ती असती तर तिथेच खितपत पडून गंजली असती किंवा एखाद्याच्या घरी पोचती झाली असती. पण नाही. ती गाडी म्हणे रातोरात जिथे अपघात झाला तिथे परतली. पोलिसांनी पुन्हा स्थानकावर आणली तर ती रात्री पुन्हा परत गेलेली. रात्रीच का जायची, नेमकी अपघात झाला त्या वेळीच जायची का, जातांना कोणी प्रत्यक्ष पाहिली का वगैरे प्रश्न सुज्ञांनी विचारू नयेत. पण असा दैवी (की अमानवी?) चमत्कार झाल्यावर व्हायचे तेच होणार. त्या रॉयल एनफिल्ड बुलेटचा बुलेटबाबा झाला. पोलिसांनी हात टेकले, गाडी तिथेच सोडली आणि लोकांनी बाबाला पाऊसपाणी लागू नये म्हणून काचेचे मंदिर बांधले. त्या रस्त्याने जाणारे अनेक ट्रकचालकतर आवर्जून थांबून पूजा करतातच, पण कधीही बुलेट चालवायची शक्यता नसलेल्या अनेक बायका हळदीकुंकू वाहतात, प्रदक्षिणा घालतात, आणि आरती म्हणतात. हो, बुलेटबाबाची एक स्वतंत्र आरती आहे. बाहेर बॅंड-ताशावाले असतात, आणि २५-३० दुकाने आहेत - प्रसाद, हार-तुरे विकणारी. चालकाचे नाव ॐ बन्ना राठोड. तो दारू पिऊन बुलेट चालवत असताना मेला. फुलांबरोबर दारूच्या बाटल्यादेखील प्रसादाप्रीत्यर्थ तेथे सापडतात. नवी गाडी घेतली की तेथे मिळणारा काळा गोंडा, नजर लागू नये म्हणून, गाडीला लावायचा. २०१७मध्ये राजस्थान भेटीदरम्यान तेथे जाण्याचा योग आला. फोटो काढण्याच्या निमित्ताने आमचीही प्रदक्षिणा झाली आणि बुलेटबाबाची करुणा भाकत आम्ही पुढे गेलो.

बुलेटबाबा बुलेट बाबा
बुलेटबाबा

बिनबुडाच्या कल्पनांची निर्मिती सोप्पी असते, पण त्यांची किंमत जग मोजते. प्रगल्भ कल्पनांचे जनक कमी, त्यांचा प्रवासही खडतर. जीन्स (genes अथवा जनुके) जशी जैविक उत्क्रांतीची एकके, तशी कल्पनांची एकके मीम्स (memes अथवा मनुके). मनुकांचा प्रसार, आणि त्याद्वारे त्यांची उत्क्रांती आपणच करत असतो. चांगल्या मनुकांना जन्म देण्याच्या नाही तरी निदान कानांवर आलेले एखादे मनुक चांगले आहे, त्याचा प्रसार जाणीवपूर्वक करायला हवा ही जाणीव देण्याची प्रार्थना मी उडत्या स्पगेटी मॉन्स्टरचरणी करत, या अध्यायाची सांगता करतो.

***

लेखन संपत आले असताना डिंकोइजमबद्दल मला माहिती दिल्याबद्दल सत्यजीत कानेटकरचे आभार.
बुलेटबाबाचा परिच्छेद आणि चित्र 'जगावेगळी मुशाफिरी' (युनिक फीचर्स) २०१८ दिवाळी अंकातील 'राजस्थान - खेजरली, खिचन, आणि खूप काही' या प्रवासलेखात पूर्वप्रकाशित.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

मनुका आवडल्या.
लिपु आणि पिटबुल मधील बांगलादेशी लिपू जुन्या दारुण गाड्यांना नवे रूप देतो ते आठवलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

लेखाचा आणि
" चांगल्या मनुकांना जन्म देण्याच्या नाही तरी निदान कानांवर आलेले एखादे मनुक चांगले आहे, त्याचा प्रसार जाणीवपूर्वक करायला हवा "
चा संबंध पुरेसा उलगडला नाही.

मीम्स फारसे सिरिअसली न घेता हलकेफुलके काहीतरी - ह्या स्वरूपत बहुतांशी सोशल मिडियावर असतात.
लोकं बरेचदा "हे भारी आहे" किंवा "मलाही असंच वाटतं" किंबा "लोल" म्हणून पुढे जातात.
मग त्यात जाणीवपूर्वक प्रसार कसा करायचा?
उदाहरणार्थ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0