“दु:खाचा पाऊस जेव्हा घनघोर बरसला होता"

मेगन ओ'रूर्क ह्यांच्या "Good Grief” ह्या लेखाचा मराठी अनुवाद.

१९६४ सालच्या उत्तरार्धात स्विस मानसोपचारतज्ज्ञ एलिसाबेथ कुब्लर-रॉस आपल्या बागेत काम करता करता तिच्या आगामी व्याख्यानाविषयी विचार करत होती. युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील तिच्या एका वरिष्ठाने तिला वैद्यकीय विद्यार्थ्यांसमोर तिच्या पसंतीच्या विषयावर व्याख्यान देण्यास सांगितले होते. कुब्लर-रॉसला लोकांसमोर उभे राहून बोलण्याची भीती वाटे. तशात विद्यार्थी लक्ष देऊन ऐकतील असा विषय तिला सुचत नव्हता. पण बागेत पडलेली पाने गोळा करताना तिच्या मनात मृत्यूचा विचार आला. तिने लावलेली बरीचशी झाडे येणार्‍या शिशिरात मरणार आहेत हे तिच्या लक्षात आले. तीन वर्षांपूर्वी तिचे वडील स्वित्झरलॅंडमध्ये राहत्या घरी वारले होते. मृत्यूसमयी आपल्या आजूबाजूला काय चालले आहे, कोण कोण आहे ह्याची त्यांना जाणीव होती. कुब्लर-रॉसला विषय सापडला. अत्यवस्थ रुग्णांसोबत असताना अमेरिकी डॉक्टर अस्वस्थ असतात असे तिचे निरीक्षण होते. डॉक्टरांनी मृत्यूला व मरणोन्मुख माणसांना सामोरे कसे जावे ह्याविषयी बोलण्याचे तिने ठरवले.

कुब्लर-रॉसने व्याख्यानाचे दोन भाग केले. पहिल्या भागात वेगवेगळ्या संस्कृतींचा मृत्यूविषयक दृष्टिकोन तपासला. दुसऱ्या भागात ती विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी एका मृत्यूपंथाला लागलेल्या रुग्णाला वर्गात घेऊन आली. इस्पितळात तिला असाध्य ल्यूकेमियाने ग्रासलेली लिंडा नावाची षोडशा सापडली होती. लिंडाच्या आईने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन वाचकांनी लिंडाला 'गेट वेल' व 'स्वीट सिक्सटीन' शुभेच्छा-पत्रे पाठवावी असे आवाहन नुकतेच केले होते. आपली प्रकृती कधीही सुधारणार नाही हे ठाऊक असलेली लिंडा आईने केलेल्या प्रकाराने विटली होती. ती वर्गात यायला तयार झाली, येऊन आपल्या मन:स्थितीबद्दल मोकळेपणाने बोलली. कुब्लर-रॉसने पाहिले की विद्यार्थी दंग होऊन ऐकत असले तरी बेचैन होते. प्रांजलपणे बोलणार्‍या एका तरुण, सुस्वरूप, पण मरणोन्मुख मुलीला पाहून बसलेल्या धक्क्याने ते अस्वस्थ होते. त्या अस्वस्थतेचे कारण टाळण्यासाठी ते तिला तिच्या लक्षणांविषयी ढीगभर प्रश्न विचारत होते.

कुब्लर-रॉसचा चरित्रलेखक डेरेक गिल म्हणतो की ह्या घटनेनंतर लवकरच तिने शिकागो विद्यापीठाच्या मानसोपचार विभागात उप-प्राध्यापिकेची नोकरी धरली. तिला असाध्य रोगांमध्ये रुची असल्याचे शिकागो थिओलॉजिकल सेमिनरीमधील चार विद्यार्थ्यांना कळले; व मरणाऱ्या माणसांच्या गरजांचा अभ्यास करण्यासाठी मदत कराल का, अशी त्यांनी विचारणा केली. ती तयार झाली. शिकागोच्या बिलिंग्ज इस्पितळात तिने चर्चासत्रे आयोजित केली, रुग्णांच्या मुलाखती घेऊन त्यांना मरण्याविषयी काय वाटते ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ह्या मुलाखती एकदिशा पारदर्शक आरशासमोर घेतल्या जात. त्यामुळे पलीकडून विद्यार्थी पाहत असले तरी रुग्णांचा एकांत जपला जाई.

रुग्णांना आपल्या आगामी मृत्यूविषयी विचार करायला लावणाऱ्या ह्या मुलाखती, ही चर्चासत्रे इस्पितळातील तिच्या अनेक वरिष्ठांना नृशंस वाटत, रुग्णांचा गैरवापर करणारी वाटत. आपण किती आजारी आहोत हे जाणण्याची इच्छा व गरज रुग्णांना नसते अशी तेव्हाच्या डॉक्टरांची समजूत होती. सत्याऐवजी ते सौम्योक्ती वापरत, किंवा अप्रिय बातम्या रुग्णाला न सांगता केवळ त्याच्या घरच्यांना सांगत. कुब्लर-रॉसला हा भ्याडपणा वाटे, डॉक्टरांचा अमानुषपणा वाटे. रुग्ण मरणासन्न आहे हे मान्य करण्यास अनेक डॉक्टर बिचकत. मृत्यूस जणू वैद्यकशास्त्रातून जणू हद्दपार केले आहे असे तिला वाटू लागले होते.

मरणोन्मुख रुग्णांच्या अभ्यासातून ती जे शिकली त्यावर कुब्लर-रॉस एक पुस्तक लिहू लागली. ते १९६९ साली प्रकाशित झाले, व त्यानंतर लवकरच लाइफ मासिकात तिच्या एका चर्चासत्रावर लेख छापून आला. (लाइफच्या वार्ताहराने लिहिले की ह्या चर्चासत्राच्या प्रेक्षकांना धक्का बसला. रुग्ण इवाचे सौंदर्य व तिची वागणूक पाहता ती गंभीर आजारी आहे हे त्यांना खरेच वाटेना.) मरणाविषयी चर्चा सुरू केल्याबद्दल कुब्लर-रॉसला आभाराची पत्रे खोऱ्याने आली. इस्पितळाच्या व्यवस्थापनाला मात्र तो लेख, व असे मृत्यूवर लक्ष केंद्रित करणे पसंत पडले नाही. त्यांनी तिच्या कराराचे नूतनीकरण केले नाही. मात्र त्याने काही फरक पडला नाही. “ऑन डेथ अ‍ॅन्ड डाइंग" हे तिचे पुस्तक बेसुमार खपले. लवकरच तिला देशभरातील इस्पितळांतून व विद्यापीठांतून व्याख्याने देण्याची निमंत्रणे येऊ लागली.

तिचे म्हणणे असे होते की बऱ्याचदा रुग्णांना ठाऊक असते की त्यांचे मरण अटळ आहे, व हे सत्य इतरांनीही स्वीकारावे अशी त्यांची इच्छा असते. “रुग्ण आपले सर्वस्व गमावणार असतो. तो ज्यांच्यावर प्रेम करतो त्या साऱ्यांना सोडून जाणार असतो. त्याला जर त्याचे दु:ख व्यक्त करू दिले तर त्याला हे सर्व स्वीकारणे सोपे जाईल.” तिची अशी धारणा होती की मरणोन्मुख माणसे पाच टप्प्यांतून जातात: नाकबुली, राग, सौदा करणे, उदासी, आणि स्वीकृती.

हा टप्प्यांचा सिद्धांत लवकरच अमेरिकी लोकांच्या मरणाचा प्रतिमान झाला. पुढे पुढे तर दु:ख कसे व्यक्त करावे ह्याचा तो वस्तुपाठच झाला. कुब्लर-रॉसनी सुचवले की रुग्ण ज्या टप्प्यांतून जातात त्याच टप्प्यांतून त्यांचे कुटुंबीयही जातात. काही दशकांनंतर तिने "ऑन ग्रीफ अ‍ॅन्ड ग्रीविंग" (२००५) हा "ऑन डेथ अ‍ॅन्ड डाइंग"चा पुढील भाग लिहिला. त्यात ते टप्पे दु:खाला कसे लागू होतात हे तिने सविस्तर लिहिले होते. आपण दु:ख कसे करतो ह्यावर कुब्लर-रॉसचा सिद्धांत हा आज अंतिम शब्द मानला जातो. पॉप कल्चरच्या जमान्यात तो सगळीकडे दिसतो. ह्या वर्षीच्या "ग्रे'ज अ‍ॅनाटॉमी"चे सुरुवातीचे भाग ह्या पाच टप्प्यांवर आधारलेले होते. मृतांच्या आप्तेष्टांशी आपण ह्या सिद्धान्तानुसारच वागतो. २००८च्या नाताळात माझी आई वारली तेव्हा अनोळखी लोकांनीसुद्धा मी ज्यातून जाणार ते "टप्पे" माहीत करून घेण्याचा सल्ला दिला होता.

दु:खावर नियंत्रण ठेवणे शक्य असल्याचे हा सिद्धांत सुचवत असल्याने त्याला अल्पावधीत मान्यता मिळाली असावी. अडचण अशी आहे की तो बहुतांशी काल्पनिक निघाला—कारण तो पुराव्यापेक्षा किश्शांवर आधारित होता. कुब्लर-रॉसने शोक करणार्‍यांच्या भावनांचा आवाका मापला खरा, पण नव्या संशोधनानुसार दु:ख आणि शोक ठराविक टप्प्यांतून जात नाहीत. ही गुंतागुंतीची व अस्ताव्यस्त प्रक्रिया आहे—जी कदाचित कधीच संपत नाही. दु:खाविषयी मानसोपचारशास्त्रातील एक स्थायी संकल्पना अशी आहे की ते कमी करण्यासाठी लोकांना "सोडून देता" आले पाहिजे. पण निरीक्षणांतून असे दिसते की मृताशी असलेल्या आपल्या नात्याला कवटाळून राहिलेल्या शोकाकुल माणसांवर नोंद घेण्याजोगे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. (चीनमधील माणसे नित्य-नेमाने आपल्या मृत पूर्वजांशी बोलतात. अभ्यासांती असे दिसते की तिथल्या शोकग्रस्तांचा क्लेशकाल अमेरिकी शोकग्रस्तांच्या तुलनेत कमी असतो.) आपली दु:खाविषयीची समजूत किती भरकटली आहे हे कुब्लर-रॉसला स्वत:लाही आयुष्याच्या अंतिम टप्प्यात समजले. दु:खाचे टप्पे गुंतागुंतीच्या भावनांना नीट पुडक्यांमध्ये बांधण्यासाठी कधीच नव्हते असे आग्रही प्रतिपादन ती “ऑन ग्रीफ अ‍ॅन्ड ग्रीविंग"मध्ये करते. दु:खाचा अस्ताव्यस्तपणा आपल्याला अस्वस्थ करतो म्हणूनच बहुधा तिच्या ह्या विधानाकडे आपले दुर्लक्ष होते.

दु:ख सोसलेला कोणीही सांगू शकेल की ते निव्वळ उद्विग्नतेपेक्षा बरेच जटिल असते. सी.एस.लुइसची पत्नी कर्करोगाने वारल्यानंतर "अ ग्रीफ ऑब्जर्व्ड"मध्ये त्याने लिहिले, “दु:ख एवढं भीतीसारखं जाणवतं हे मला कधीच कोणी सांगितलं नाही". शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की भीतीप्रमाणेच दु:खसुद्धा शरीराने व मनाने मानसिक ताण-तणावांना दिलेल्या प्रतिक्रियांच्या स्वरूपात व्यक्त होते. शोकाकुल व्यक्तींमध्ये कॉर्टिसॉलसारख्या ताणजन्य संप्रेरकांची पातळी वाढते. रोग-प्रतिकारशक्ती कमी होते. झोपेचे वेळापत्रक कोलमडते. भूक कमी होते, छातीत धडधड होते, अगदी भासही होतात. त्यांना मृत व्यक्ती पक्ष्याच्या वा प्राण्याच्या रूपात दिसल्याचे आभास होतात. शोकाकुल व्यक्ती एखादवेळी उद्वाहकात किंवा कुत्र्याला फिरवताना मृत प्रियजनांशी प्रकट बोलताना आढळू शकते.

एरिक लिंडमन ह्या हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या मानसोपचारतज्ज्ञाने दु:खाचे पहिले पद्धतशीर सर्वेक्षण केले. एखाद्या आप्ताचे निधन झालेल्या एकशे-एक शोकाकुल रुग्णांची त्याने पाहणी केली. त्यात १९४२ साली कोकोनट ग्रोव्हच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातलगांचाही समावेश होता. लिंडमनच्या पाहणीत अपघाती मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांची टक्केवारी जरी जास्त असली तरी त्याच्या प्रमुख निष्कर्षांना इतर संशोधकांनी दुजोरा दिला आहे. तथाकथित "सामान्य" दु:खात वीस मिनिटे ते तासभर चालणारे आवर्ती कढ येत राहतात. श्वास कोंडतो, अशक्तपणा आणि, लिंडमनच्या शब्दांत, "तणाव किंवा मानसिक वेदना" जाणवतात. अस्वस्थता जाणवते, एका जागी स्थिर बसता येत नाही, रुग्ण इथे तिथे निरुद्देश फिरतो, सतत काही तरी काम शोधतो. बर्‍याच वेळा, अशा शोकाकुल माणसास मित्रांविषयी किंवा डॉक्टरांविषयी द्वेष वाटू लागतो व तो स्वत:ला त्यांच्यापासून विलग करू पाहतो. अशा रुग्णांचे वैशिष्ट्य म्हणजे ते मृताच्या तसबिरींमध्ये गढलेले असतात.

शोकाकुलांच्या अनुभवांचे लिंडमनने केलेले सविस्तर विश्लेषण अनन्यसाधारण होते. परंतु दु:खाची त्याची संकल्पना कुब्लर-रॉसहूनही काटेकोर होती. तो असे मानत असे की बहुतेक माणसांना वियोगाच्या दु:खातून बाहेर यायला चार-सहा आठवडे, व एखाद्या मानसोपचारतज्ज्ञासोबत आठ-दहा बैठका पुरतात. लिंडमनचे म्हणणे मान्य करून आजचे मानसोपचारतज्ज्ञ दु:खाचा "सामान्य" दु:ख, आणि "जटिल" किंवा "प्रदीर्घ" दु:ख असा भेद करतात. मात्र हार्वर्डमधील मानसोपचारशास्त्राची सह-प्राध्यापिका हॉली प्रिगरसन, आणि बॉस्टनच्या ब्रिगहॅम अ‍ॅन्ड विमेन्स हॉस्पिटलमधील मानसोपचारशास्त्राचा व्याख्याता पॉल मासिजिव्स्की ह्यांना असे दिसून आले की "सामान्य" दु:खही अनेकदा काही आठवडेच नव्हे नाही तर कमीत कमी दोन वर्षे टिकते. पहिल्या सहा महिन्यांत ते सर्वात जास्त असते आणि मग हळूहळू कमी होत जाते. इतर काही पाहण्यांनुसार दु:ख लाटांप्रमाणे येऊन आपले भावनिक आयुष्य व्यापून टाकते, ओसरते, पुन्हा येते. “द अदर साईड ऑफ सॅडनेस: व्हॉट द न्यू सायन्स ऑफ बिरीवमेन्ट टेल्स अस अबाउट लाइफ आफ्टर लॉस" मध्ये जॉर्ज ए. बोनान्नो म्हणतो, “शोकाकुल माणसांच्या भावनिक अनुभवांचे काही काळ निरीक्षण केल्यास त्यात विलक्षण चढउतार दिसतात.” त्याच्या मते हे आंदोलन दु:खनिर्मित तणावापासून आराम देते. १९६१ साली सि.एस. लुइसने लिहिले, “दु:ख... स्थिती नसून प्रक्रिया आहे. त्याला नकाशाची नव्हे, इतिहासाची गरज आहे".

दु:ख आवर्ती असते ह्याचा अर्थ ते विकलांग करतेच असा होत नाही. बोनान्नोच्या मते आपण दु:खास ते असते त्याहून अधिक शक्तिशाली समजतो. "सेल्फ हेल्प" पुस्तकांनी वियोगाच्या दु:खाला "प्रचंड" म्हटले तरी शोक करणे खरे तर मानवाच्या रक्तातच असते. आपल्यापैकी बऱ्याच जणांची संभावना तो "लवचिक" शोककर्ते अशी करतो. बोनान्नोने जुलिया मार्टिनेझ नावाच्या विद्यार्थिनीचे उदाहरण दिले आहे. तिचे वडील सायकल अपघातात गेले. त्या दुर्घटनेनंतर ती काही दिवस आपल्या आईपासून दुरावली. तिला नीट झोप येईना. पण लवकरच ती ह्या मन:स्थितीतून बाहेर आली. पुन्हा कॉलेजला जाऊ लागली. कधी कधी उदास व गोंधळलेली असली तरी तिला वडिलांच्या मरणाबद्दल आपल्या मित्र-मैत्रिणींशी बोलण्याची इच्छा नव्हती. काही महिन्यांत ती मूळ पदावर आली. तिची आई मात्र हट्टाने म्हणे की ती आपले दु:ख आतल्या आत दाबत आहे व तिला समुपदेशनाची आवश्यकता आहे. जुलियाला अजिबात पसंत नसूनही समुपदेशकाकडे जावे लागे.

ह्या लवचिक गटाला आपण उगाच शिक्षा करू नये असे बोनान्नोला वाटते. ज्यांची प्रिय व्यक्ती गेली आहे त्यांना कधी कधी दु:खाइतकीच सुटकेची भावना जाणवते, खास करून गेलेली व्यक्ती बराच काळ आजारी राहिली असल्यास. तिच्या मरणाने मागे राहणाऱ्यांसाठी नवे मार्ग खुले होतात. तो असे सुचवतो की कदाचित काही जणांचे गेलेल्या व्यक्तीवर खूप प्रेम असले तरी इतरांएवढा शोक करण्याची त्यांना गरज नसते.

पण ह्या लवचिकपणाबद्दल आपला दावा बोनान्नो जरा जास्तच आग्रहीपणे मांडतो. वास्तविक तो स्वत: काही लवचिकपणाचे उत्तम उदाहरण नव्हता. आपल्या पुस्तकाच्या आत्मचरित्रात्मक भागात तो लिहितो की त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जरी तो पटकन सावरला तरी काही वर्षांनंतर त्याच्या मनात त्यांच्यासाठी एक पौर्वात्य शोकविधी करण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यात तो अधिकाधिक गुंतत गेला. लवचिकपणाचा हा प्रेषित अद्याप वियोगदु:खातून बाहेर पडू शकलेला नाही ह्यातील विसंवाद उघड आहे. हे सारे पाहून दु:खाविषयीच्या सार्‍या विचारांचा सारभूत प्रश्न समोर दत्त म्हणून समोर उभा राहतो: मुळात लोकांना शोक करण्याची गरज का पडते?

एखाद्या मानवतावाद्यासाठी ह्या प्रश्नाचे उत्तर असे काहीसे असेल: कारण एक तर ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांची आपल्याला आठवण येते, आणि दुसरे म्हणजे मृत्यू अस्तित्वासंबंधी असे अतिभौतिक प्रश्न उपस्थित करतो ज्यांची स्वयंसिद्ध उत्तरे आपल्याकडे नसतात. पण रुक्ष, गद्य डॉक्टरांना अशी उत्तरे नको असतात. दु:ख केल्याने नेमके काय साधले जाते ह्याचे उत्तर त्यांना हवे असते. "मोर्निंग अ‍ॅन्ड मेलॅन्कोलिया" (१९१७) ह्या आपल्या पुस्तकात फ्रॉइड सुचवतो की शोकग्रस्ताने मृत प्रियजनांमध्ये गुंतवलेली ऊर्जा त्याला परत मिळवायची असते. नातेसंबंध जोडण्या-टिकवण्यासाठी ऊर्जा लागते आणि मानसोपचारतज्ञांच्यामते असे संबंध सोडून देण्यासाठी मानसिक कष्ट पडतात. तुम्हाला प्रिय असलेली व्यक्ती जेव्हा मरण पावते तेव्हा तुम्हाला तुमच्या जगाचा व त्यातील तुमच्या स्थानाचा पुनर्विचार करावा लागतो. मृत व्यक्तीत तुम्ही जितके गुंतलेले असता तितका त्यांचा वियोग सोसणे तुम्हाला कठीण जाते. तुमच्या वडिलांशी तुमचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे असले पण आईशी बेताचे असले तर तिच्या मृत्यूपश्चात तुम्ही कोलमडणार नाही. पण तिच्याशी जवळीक असली तर मात्र अतिशय दु:ख होईल.

१९७०च्या दशकात इंग्रज मानसोपचारतज्ज्ञ व वियोगदु:खाच्या क्षेत्रातील अग्रगण्य संशोधक कॉलिन मरे पार्क्स असे प्रतिपादन करू लागला की अस्वस्थ "शोध" हा दु:खाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. शोकमग्न माणसाची वाढलेली शारीर जाणीव, राग, व दु:ख ही अवस्था आईपासून ताटातूट झालेल्या मुलाला तिला शोधताना वाटणा‍र्‍या चिंतेप्रमाणे असते. माणसे संबंध कशी जोडतात ह्याविषयीच्या जॉन बोलबीच्या संशोधनाच्या आधाराने पार्क्स नोंद करतो की तीव्र दु:खात, तसेच मुलांना आईपासून दूर असताना वाटणार्‍या चिंतेत भीतीची भावना असते कारण ज्या आधारावर आपण अवलंबून असतो तोच नाहीसा झालेला असतो. पार्क्सने असा तर्क केला की प्रिय व्यक्तीच्या मरणोपरान्त आपण दु:खात अतार्किकपणे त्याला "शोधत" राहतो. त्या शोधात पुन्हा पुन्हा अपयश आल्यानंतर आपण हळूहळू मृत्यूपश्चात नष्ट केलेल्या जुन्या जगाच्या जागी नवे जग निर्माण करू लागतो. हा शोध, किंवा ही ओढ दु:खाच्या बहुतेक साऱ्या सद्यकालीन तपासात सापडते. २००७ साली पॉल मासिजिव्स्कीला असे दिसून आले की शोकमग्न लोकांत सर्वात प्रबळ भावना ही खिन्नता, अविश्वास, किंवा राग नसून ओढ ही असते. गेलेली व्यक्ती आपल्याला स्वर्गात पुन्हा भेटणार आहे असा विश्वासही दु:खापासून आपल्याला वाचवू शकत नाही. बोनान्नो म्हणतो त्याप्रमाणे “आपल्या प्रियजनांचे काय झाले आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे असते.”

गेल्या वर्षी नाताळात माझी आई वारल्यानंतर मी काय करू हा प्रश्न मला काही दिवस पडला होता. माझे अनेक मित्रही असेच गोंधळलेले होते. ज्यांच्या आया अजून हयात होत्या ते ह्यात बहुसंख्य होते. काहींनी फुले पाठवली पण बरेच आठवडे फोन केला नाही. काहींनी आठवड्यानंतर विरोप पाठवून माझी विचारपूस केली व काही मदत हवी आहे का हे विचारले. एका मित्राने तर माझी चौकशी करण्याआधी पंधरा मिनिटे इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. जणू काही दु:खाच्या भोवर्‍यात बुडी मारण्याआधी तो वॉर्म-अप करत होता. कर्मकांडांच्या अभावी मला भरकटल्यासारखे, परित्यक्त त्यागल्यासारखे वाटत होते. एका रात्री मी "२४" मालिकेचा एक भाग पाहिला. त्यात राष्ट्राध्यक्षेचे पात्र किती कणखर आहे ते प्रस्थापित करण्यासाठी तिच्या मुलाच्या मृत्यूविषयी खालील संवाद आहे:

सहायक: “पुत्रवियोग तुमच्या कामाच्या आड येऊ दिलेला नाही. तुमचे पती कणखर असले तरी तुमचा लवचिकपणा नाही त्यांच्यात.”
राष्ट्रपती (कडक स्वरात): “प्रश्न लवचिकपणाचा नाही. मला माझ्या मुलाची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही. पण युद्ध सुरू होणार आहे. अशा ह्या वेळी मला शोक करण्याची चैन परवडण्यासारखी नाही.“

स्वत:ला कामात झोकून दिल्यास दु:ख आणि वेदनेतून मार्ग काढता येईल ह्या अमेरिकी कल्पनाविलासाचा हा नमुना आहे. आपण जर व्यायाम करत राहिलो, चांगले, पौष्टिक अन्न खाल्ले तर कधीही आजारी पडणार नाही ह्या दिवास्वप्नासारखेच आहे हे. कुब्लर-रॉस म्हणाली ते योग्यच होते — मृत्यू टाळण्याचा प्रयत्न हाच त्याच्या मुळाशी आहे. शोक केंद्रस्थानी असलेल्या “हॅम्लेट" किंवा "कॅचर इन द राय"सारख्या साहित्यकृती वाचतानाही आपण दु:खाला ओलांडून जाऊ पाहतो. त्यातील सूत्रधार शोकाकुल असला तरी आपण त्याला जो आयुष्याचा वीट आलेला असतो तेव्हढ्यावर लक्ष केंद्रित करतो — जणू त्या दोन गोष्टींचा काही परस्परसंबंधच नाही. बोनान्नो म्हणतो की आपल्या वडिलांच्या मृत्यूचा शोक करताना त्याला स्वत:ला जाणीव करून द्यावी लागली की “एखाद्या मृत व्यक्तीशी संबंधित कोणताही विषय पाश्चात्त्यांना अस्वस्थ करतो.”

जॉन्स हॉप्किन्स इस्पितळातील मानसशास्त्रज्ञ व द्विध्रुवीय विकारतज्ज्ञ के रेडफील्ड जेमिसनच्या मते केवळ अस्वस्थच नाही तर हा विषय त्यांना अधीरही करतो. आपल्या नवऱ्याच्या निधनानंतर लिहिलेल्या “नथिंग वॉज द सेम" नावाच्या संस्मरणिकेत त्याच्या जाण्यानंतर तीन महिन्यांनी एका सहकाऱ्याशी झालेले बोलणे तिने उद्धृत केले आहे. त्या सहकार्‍याने तिला एका लेखाचे परीक्षण करायला सांगितले. दु:खात गढलेली जेमिसन चिडून म्हणाली, “माझा नवरा नुकताच वारला आहे.” ह्यावर सहकारी म्हणाला, “ तीन महिने झाले त्या गोष्टीला.” शोककर्त्यात व इतरांत एक कालिक अंतर असते. शोकमग्न माणसाच्या दृष्टिकोनातून तीन महिने काहीच नसतात. प्रिगरसन व मासिजिव्स्कीच्या संशोधनानुसार तीन महिन्यांत तर दु:ख कळस गाठते. इतरांना मात्र काही आठवड्यांहून जास्त टिकणारे दु:ख हे स्वत:चे लाड करण्यासारखे वाटते.

दु:खाचे तटस्थ, चिकित्सक वर्णन करण्याचा प्रयत्न करणारा बोनान्नोही कामात झोकून देण्याची कल्पना स्वीकारताना दिसून येतो. तो एका अशा रुग्णाचे वर्णन करतो जी "परवडेल तेव्हाच "आपल्या दु:खाला "उचंबळू" देत असे. शोक करणार्‍या अनेकांना दु:खात एक प्रकारची एकटे पडल्याची भावना जाणवते. अन्‌ इतरांना आपण कसे आहोत हे जाणून घेण्याची खरे तर इच्छा नाही हे बघून हे एकटेपण वाढते. आपण "विचारा, सांगू नका" हे धोरण स्वीकारले आहे. “कसा आहेस?" हे काळजीदर्शक विधान आहे, खराखुरा प्रश्न नव्हे हे शोक करणाऱ्यांना लवकरच कळते. दरम्यान, अमेरिकन सायकियॅट्रिक असोसिएशन आपल्या "डायॅग्नॉस्टिक अ‍ॅन्ड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेन्टल डिसॉर्डर्स “ ह्या ग्रंथाच्या पाचव्या आवृत्तीत "गुंतागुंतीचे दु:ख" (अनुवादकाची नोंद : एक विकार म्हणून) घालण्याच्या विचारात आहे. काही शोकाकुल माणसांना आपल्या कुटुंबाच्या व मित्रांच्या प्रेमाची व आधाराची इतरांहून जास्त गरज असते हे खरे. पण दु:खाला रोग किंवा विकार ठरवणे हे पाश्चिमात्य देशांत गेल्या शतकात घडलेल्या दु:खाच्या खाजगीकरणाचे — एका प्रचंड व घातक बदलाचे — लक्षण आहे.

विसाव्या शतकापर्यंत बहुतेक सर्व संस्कृतींमध्ये खाजगी दु:ख व जाहीर शोक हातात हात घालून चालत असत चालायचे. अनेक ठिकाणी, एखाद्या बाईचा नवरा वारला तर सारा गाव तिच्या दारी ताजा पाव किंवा सूप घेऊन येत असे. “द न्यू ब्लॅक: मोर्निंग, मेलॅन्कोलिया, अ‍ॅन्ड डिप्रेशन" ह्या पुस्तकात इंग्रज मानसशास्त्रज्ञ डेरियन लीडर म्हणतो की शोकास "इतर माणसांची गरज असते". एके काळी आपले कोणीतरी गेले की आपण विधींच्या चक्रात गुंतून जात असू. चीन व ग्रीससारख्या अनेक देशांत कोणी मेले की त्याच्या कुटुंबीयांचे व शेजाऱ्या-पाजाऱ्यांचे विलाप सुरू होत. मयताला स्नान घालून दर्शनासाठी ठेवत. ह्याला आयरलॅंंडमध्ये "वेक" व चीनमध्ये "शवपेटिकेत घालणे" म्हणत. अनेक संस्कृतींमध्ये शोकासाठी विशिष्ट प्रकारचे कपडे घालण्याची प्रथा आहे. प्राचीन रोममध्ये काळे टोगे घातले जात. मध्ययुगीन व रिनेसाँकालीन युरोपमध्ये शोक व्यक्त करण्यासाठी काळे (किंवा कधी कधी पांढरे) कपडे घालण्याचा रिवाज होता. व्हिक्टोरियन युगात इंग्लंड व अमेरिकेत मृताच्या कुटुंबीयांना सविस्तर शोकविधी पाळावे लागत. शोककाळात त्यांच्या पेहरावावर व सामाजिक वावरावर बंधने असत. सुरुवात "पूर्ण शोका"ने होत असे. ह्यात बायकांना कडक काळ्या क्रेपचे कपडे घालावे लागत. त्यानंतर "अर्धशोका"चा काळ असे ज्यात करड्या व लॅवेन्डर रंगाच्या कपड्यांना परवानगी असे. हिंदूंमध्ये एखादा माणूस गेल्यानंतर बारा दिवसांपर्यंत मृताचे आप्तेष्ट त्याच्या घरच्यांच्या सांत्वनाला त्यांच्या घरी जातात व मृताच्या आत्म्यास मुक्ती मिळावी म्हणून मंत्रपठण करतात. ज्यूंच्या शिवाह (शब्दश: अर्थ - सात) ह्या आठवड्याभराच्या शोककाळात शोक करणारा एका बुटक्या खुर्चीवर बसतो व इच्छा असल्यास सांत्वनार्थ आलेल्यांना भेटतो. आपल्या आई-वडिलांच्या मृत्यूचा शोक करणारे अकरा महिन्यांपर्यंत इतर दहा जणांसोबत कड्डिशचे पठण करू शकतात. पाश्चात्त्यांच्या मरणाविषयी असलेल्या मनोवृत्तीवर लिहिलेल्या "द आर ऑफ अवर डेथ" (१९७७) ह्या पुस्तकात फिलिप अ‍ॅरिज म्हणतो की अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत एका माणसाचा मृत्यू त्याच्या सामाजिक गटावरच नव्हे तर संपूर्ण समाजावरही प्रभाव पाडू शके, त्यात बदल घडवू शके.

त्यानंतर पाश्चात्त्य जगातून शोकविधी हळूहळू गायब होऊ लागले. ह्याची कारणे स्पष्ट नाहीत. “डेथ, ग्रीफ, अ‍ॅन्ड मोर्निंग" (१९६५) लिहिणाऱ्या इंग्रज मानववंशशास्त्रज्ञ जेफ्री गोररचा तर्क आहे की इंग्लंडमध्ये पहिले महायुद्ध हे ह्याचे एक कारण होते. त्यात इतक्या प्रचंड संख्येने माणसे मारली गेली की समाजाला प्रत्येक मृतासाठी शोक करण्याचा रिवाज सोडून द्यावा लागला. शोकात अंत:प्रेरणेने काटकसर केली जाते हे नक्की. युद्धकाळात, महामारीत, मोठ्या आपत्तीच्या वेळी शोकविधींमध्ये काटछाट केली जाते किंवा ते सोडून दिले जातात. हल्ली आपण हेटीमध्ये हेच होताना पाहत आहोत. परंतु पहिल्या महायुद्धापेक्षा अमेरिकी यादवीत जास्त अमेरिकी नागरिक मारले गेले; ह्यावरून असे दिसते की व्यापक सामाजिक बदलही शोकविधी कमी होण्यास कारणीभूत होते.

एमिली पोस्टच्या मते पहिल्या महायुद्धाच्या आधीच शोक-काळात घालण्याचे खास पेहराव हे मृताच्या अगदी जवळच्या नातेवाईकांव्यतिरिक्त इतरांसाठी ऐच्छिक होत चालले होते. अधिकाधिक माणसे, अगदी बायकाही, कामानिमित्त घराबाहेर पडू लागल्या होत्या; घरी सांभाळणारे न राहिल्याने मृत्यू अधिकतर इस्पितळात होऊ लागले. जसे जसे मनोविश्लेषणाचे प्रमाण वाढू लागले तसे लक्ष सामूहिक अनुभवांकडून वैयक्तिक अनुभवांकडे वळू लागले. एमिल डुर्खाइमने शोकाला 'आवश्यक सामाजिक प्रक्रिया' म्हटल्याच्या केवळ दोन वर्षांनंतर फ्रॉइडने "मोर्निंग अ‍ॅन्ड मेलॅन्कोलिया"मध्ये त्यास ’मूलत: खाजगी व वैयक्तिक’ म्हटले. एका फटक्यात शोकाचे आंतरीकरण झाले. अ‍ॅरिज म्हणतो त्याप्रमाणे काही पिढ्यांत दु:खात मूलभूत बदल झाले होते: मृत्यू व त्याचे दु:ख हे सार्वजनिक क्षेत्रातून हद्दपार करण्यात आले होते. १९७३ साली "द डिनायल ऑफ डेथ"मध्ये अर्नेस्ट बेकरने असा युक्तिवाद केला की मरणाचा विषय टाळणे ही मानवी मनाची अंगभूत प्रवृत्ती आहे; आपण आपल्या मर्त्यपणाला तोंड देण्याऐवजी प्रतीकात्मक 'नायक पद्धती' निर्माण करतो, एक अमर आत्मारूपी स्व कल्पितो जो आपल्याला आपल्या शारीरिक अल्पजीवित्वाच्या पलीकडे जाऊ देतो. (अर्नेस्ट हेमिंग्वेच्या "इंडियन कॅम्प"च्या अंतिम ओळीत पहाटे वडिलांबरोबर सरोवरात होडीत बसलेल्या तरुण निक अ‍ॅडम्सला आपण कधीही मरणार नाही ह्याची खात्री वाटत असते.) गोररने असे निदान केले होते की शोक करणाऱ्यांना मूक केले जात आहे. “आज असे प्रामाणिकपणे खरे मानले जाते की विचारी व विवेकी माणसे इच्छाशक्तीच्या जोरावर शोक पूर्णपणे नियंत्रणात ठेवू शकतात. त्यामुळे त्याच्या जाहीर प्रदर्शनाची गरज नसून, शोक करायचाच असेल तर .... हस्तमैथुनाप्रमाणे खाजगीत व लपून छपून करावा.” एरिझ असेही म्हणाला की शोक करणार्‍यांची ही मूकता त्यांच्यात गांभीर्याचा अभाव असल्यामुळे नव्हे तर समाजाच्या निर्दय सक्तीमुळे आहे.

एड्सच्या गंडांतरानंतर व ९/११नंतर अमेरिकेत अधिक उघडपणे मृत्यूविषयी चर्चा होऊ लागली आहे. तरीही आपण असेच मानतो की शोक ही खाजगीत करण्याची गोष्ट आहे. शोक करण्याची एकच "योग्य" रीत नसेल, पण काही रिवाज इतरांपेक्षा आरोग्यदायी आहेत का हा प्रश्न बोनान्नोच्या संशोधनामुळे निर्माण होतो. ज्या पाश्चात्त्य देशांत शोकविधी कमी आहेत तेथील शोककर्त्यांत प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर एका वर्षाच्या काळात कायिक आजारांचे प्रमाण इतरांहून अधिक आहे.

आजच्या काळात जाहीर शोक केवळ धेंडांच्या व राजकारण्यांच्या मृत्यूनंतर केला जातो ह्याकडे लीडर अंगुलिनिर्देश करतो. इंग्लंडमध्ये काही समालोचकांनी डायनाच्या मरणानंतर जनतेने ढाळलेल्या "नक्राश्रूं"ना कुत्सितपणे नाके मुरडली होती. पण लीडरच्या मते पूर्वी जसे लोक जमा होऊन वैयक्तिक वियोग सामायिक शोकात विलीन करत त्याचाच हा आविष्कार होता. चीनच्या निम्न यान्ग्टझे दरीत व्यावसायिक शोक एके काळी सर्रास होत असे. तिथली एक म्हण आहे, ”आम्ही इतरांच्या अंत्यविधींचे निमित्त साधून वैयक्तिक दु:खे हलकी करतो.” लीडर म्हणतो मायकल जॅकसन किंवा टेड केनडीच्या अंत्ययात्रेचे प्रक्षेपण पाहण्याच्या प्रथेची नाळ इलियडमध्ये मृत पॅट्रॉक्लिससाठी शोक करणार्‍या अ‍ॅचिलीस व त्याच्या सैनिकांशी जोडलेली आहे. आपल्या शोकात मध्यस्थ जास्त असतात इतकेच. आंतरजालाच्या ह्या युगात काही शोककर्त्यांनी दु:खाला पुन्हा सामाजिक स्थान प्राप्त करून दिले आहे. ते जालावर शोकगट तयार करतात, आभासी स्मशाने, स्मारक पाने, व चॅट रूम्स निर्माण करतात. ह्या ठिकाणी वियोगदु:खाचे वर्णन केले जाते व ते वाटून घेतले जाते.

“ऑन डेथ अ‍ॅन्ड डाइंग"मध्ये कुब्लर-रॉसनेही मरणासन्न माणसांशी संवाद साधण्याला महत्त्व देऊन समूहावर भर दिला आहे. आपण मरताना एकटे असतो ह्या जुन्या विचाराला तिचा विरोध होता. तिच्या मते आपण माणसांच्या गराड्यात मरायला हवे. “ऑन डेथ अ‍ॅन्ड डाइंग"ने हॉस्पिस चळवळीला चालना दिली. मरणोन्मुख रुग्णावर फक्त उपचार करणे नव्हे तर त्याला भावनिक आधारही देणे अशी “चांगल्या मरणा"ची संकल्पना अद्ययावत केली. आपली शोक करण्याची रीत घडवली.

पण कुब्लर-रॉसचा स्वत:चा अंत मात्र एकाकी होता. अनेक आद्यप्रवर्तकांप्रमाणे तिच्या उत्कट धारणांनी तिच्यात व तिच्या आप्तमित्रांत दरी निर्माण केली. सत्तरच्या दशकात लेडीज होम जर्नलने तिला "वुमन ऑफ द डीकेड" घोषित केले. नंतर मुलांना नवर्‍याकडे सोडून ती विभक्त झाली. एस्कॉन्डिडो, कॅलिफॉर्नियामध्ये तिने घर घेतले, त्याला "शांती निलय" नाव दिले, आणि १९७७मध्ये तिथे मरणासन्न रुग्णांसाठी "वृद्धी व रोग निवारण केंद्र" स्थापन केले. ती पुनर्जन्माची कट्टर समर्थक झाली. ती म्हणत असे की कोशातून फुलपाखरू जसे बाहेर येते तसेच मरण हे पुढील, चांगल्या टप्प्याकडे नेणारे संक्रमण आहे. (दुसर्‍या महायुद्धानंतर युरोपमध्ये स्वयंसेविका म्हणून काम करताना माज्दानेक छळछावणीतील लहान मुलांच्या बराकीत भिंतींवर कोरलेली फुलपाखरे पाहून ती हेलावून गेली होती.)

१९९५ मध्ये तिला अर्धांगवायूचा झटका आला. डावी बाजू लुळी पडली. अ‍ॅरिझोनात अपंगाचे मर्यादित आयुष्य जगताना १९९७पर्यंत तिला औदासीन्याचा विकार जडला होता. सॅन फ्रॅन्सिस्को क्रॉनिकलच्या बातमीदाराला तिने सांगितले, “दिवसाचे पंधरा तास मी ह्याच खुर्चीवर बसून असते. एक कप चहासाठीही दुसऱ्यावर अवलंबून असते.” “मृत्यूवर अधिकारवाणीने लिहूनही स्वत:च्या मरणाची व्यवस्था न लावू शकणारी बाई" अशी तिची ख्याती झाली. "फेसिंग डेथ" (२००३) ह्या माहितीपटात तिचे एकटेपण पाहायला मिळते. अस्ताव्यस्त घरात राहणारी एकाकी कुब्लर-रॉस त्यात म्हणते, “मी टिव्ही कायम चालू ठेवते. त्यामुळे काहीतरी हलत असतं.” तिच्या बाजूला ठेवलेल्या ताटलीत एक इंग्लिश मफिन कडक होण्याच्या मार्गावर असतो. कदाचित नंतर भूक लागेल म्हणून तिला अन्न असे जवळ ठेवण्याची सवय लागली असावी. तिचा मुलगा केनेथ जवळच राहतो व "अधून मधून" येऊन जातो. तीस वर्षांपूर्वी ज्या रुग्णांच्या मुलाखती तिने घेतल्या होत्या त्यांच्याइतकीच ती आता एकटी भासते.

हॉस्पिस चळवळीत असे मानले जाते की बोलण्यासारखे काही राहिले असेल तर माणसे मृत्यूशी झुंज देतात. माहितीपटानंतर कुब्लर-रॉसने दु:खाविषयी आधी जे लिहिले होते त्यावर पुनर्विचार केला. टप्प्यांच्या सिद्धान्तामुळे दु:खाची संकल्पना खूप बंदिस्त होत आहे हे तिच्या लक्षात आल्यामुळे हॉस्पिसतज्ज्ञ डेविड केस्लरच्या सहयोगाने तिने "ऑन ग्रीफ अ‍ॅन्ड ग्रीविंग" हे पुस्तक लिहिले. आपल्या माजी पतीच्या निधनानंतर झालेल्या दु:खाबद्दल लिहिलेल्या प्रकरणाच्या शेवटी तिने म्हटले आहे, “आता मला कळून चुकलं आहे की माझ्या आयुष्याचं प्रयोजन ह्या टप्प्यांहून जास्त आहे. लग्न झालं, मुलं-नातवंडं झाली, पुस्तकं लिहिली, प्रवास केला. प्रेम केलं, गमावलं. मी त्या पाच टप्प्यांपेक्षा किती तरी अधिक आहे. आणि तुम्हीही आहात.”

"ऑन ग्रीफ अ‍ॅन्ड ग्रीविंग" हा आजारी कुब्लर-रॉससाठी एक प्रकारचा वैयक्तिक विजय होता. तरीही मृत्यू आणि शोक ह्यांबद्दल चर्चा घडवून आणण्याच्या तिच्या लढ्याचा शेवटी तिच्याच टोलवाटोलवीमुळे विपर्यास झाला. जी बाई मृत्यूला न डगमगता सामोरे जा असे सांगत होती तीच आता मृत्यू ही मागे राहिलेल्यांसाठी वैयक्तिक वाढीची संधी आहे असे सांगू लागली. “डेथ : द फायनल स्टेज ऑफ ग्रोथ" (१९९७) ह्या शोधनिबंधांच्या संग्रहातील एका निबंधात तिने लिहिले, “मृत्यूला सामोरे जाण्याने आपले आयुष्य समृद्ध होते, आपल्याला अधिक चांगला व दयार्द्र माणूस होता येते.” ह्या दृष्टिकोनामुळे — अन्‌ त्यात मिसळलेल्या "आम्ही ह्याहून चांगले करू शकतो" ह्या अमेरिकी तडफेमुळे — दु:ख सामाजिक होण्याऐवजी स्वत:ला सुधारण्याचे साधन झाले. शेवटी असे वाटते की कुब्लर-रॉस स्वत:च्या मरणानंतर तिच्या कुटुंबीयांना शोक करण्यास अधिक मदत करू शकली असती. अनेक अमेरिकी नागरिकांप्रमाणे तिनेही स्वत:च्या अंत्यविधीचा आराखडा तयार करून ठेवला होता. तिचा हट्ट होता की तिचा अंत्यविधी शोकाचे कारण न होता "आनंदोत्सव" असावा. “बिनशर्त प्रेमा"चे प्रतीक म्हणून डझनावारी "E.T." फुगे आकाशात सोडले गेले. ती आकाशातून सायकल चालवत निजधामाकडे जात आहे अशी आपण कल्पना करावी अशी कदाचित तिची अपेक्षा असावी.

फुग्यांच्या आड मात्र शोकाचे वेदनामय सत्य असतेच. “चांगले मरण" हे मागे राहिलेल्यांसाठी फार क्वचित चांगले असते. मृत्यू आपल्याला कसा समृद्ध करतो हे सांगणार्‍यांपेक्षा एमिली डिकिन्सनचे भावना दडवणारे बुद्धिचातुर्य व विनोद शोकाकुलांची वेदना कमी करण्यास जास्त कामी येतात. ह्या कवयित्रीचे “आय मेझर एव्हरी ग्रीफ आय मीट" ह्या कवितेतील इतरांच्या दु:खाबद्दलचे कुतूहल तिचे स्वत:चे दु:ख किती भारी आहे ते सांगते :

I wonder if It weighs like Mine—
Or has an Easier size.

I wonder if They bore it long—
Or did it just begin—
I could not tell the Date of Mine—
It feels so old a pain—

I wonder if it hurts to live—
And if They have to try—
And whether—could They choose between—
It would not be—to die.

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

उत्कृष्ट लेख आणि अत्यंत ताकदवान भाषांतर. मृत्यू या विषयावर सहसा चर्चा होत नाही. त्याला सामोरं जाणाऱ्यांचा, आणि त्याच्या आधी व नंतर होणाऱ्या दुःखाच्या तरंगांचा सांगोपांग अभ्यास केला आहे. इतका मोठा आवाका असलेल्या विषयाचा अगदी थोडक्यात मार्मिकपणे परिचय करून दिला आहे.

लेख आवडण्यासाठी त्यातले सगळे मुद्दे शंभर टक्के पटण्याची गरज नसते. तसंच या लेखाबाबत माझं झालं. पण लेखकाचा सर्वसाधारण योग्य दिशेने चाललेल्या विचारप्रवाहात स्वतःला सहज सोडून देता आलं.

भाषांतर इतकं सुंदर झालं आहे, की विचारता सोय नाही. हा लेख मूळ मराठी भाषेतच लिहिला आहे असंच वाटत होतं. काही संदर्भ पाश्चात्य आहेत म्हणूनच मूळ लेखक मराठी नसावा अशी शंका येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! एका वेगळ्या (-खरंतर नेहमीच्याच - शाश्वत वगैरे पण गद्यात जास्त बोलले न जाणार्‍या) विषयावरच्या लेखाचा अनुवाद उत्तम जमला आहे.
पद्यात या विषयावर त्या मनाने बर्‍याच रचना सापडतात, गद्यात धार्मिक ग्रंथ/पुराण कथा-प्रवचने वगैरे अपवाद वगळता इतके छान पेललेले दिसत नाही.

बाकी,

लेख आवडण्यासाठी त्यातले सगळे मुद्दे शंभर टक्के पटण्याची गरज नसते. तसंच या लेखाबाबत माझं झालं.

यास सहमती
लेख एकूणात आवडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

घासकडवींशी सहमत. अत्यंत ताकदवान अनुवाद. या अनुवादामागे किती सजगता आणि कौशल्य आहे ते जाणवूही नये अशी सहजता अनुवादात आहे. विषय आणि त्यावरची चर्चा तर रोचक आहेच, पण ही चर्चा इतक्या नेमक्या, प्रवाही मराठी भाषेत मिळाली नसती, तर मी ती वाचण्याची शक्यता फारच कमी होती.
अनुवादकाचे अनेकानेक आभार. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दु:खाची इतकी गंभीर मीमांसा वाचणं हे रोचक वाटलं.

मृत्यूच्या, वियोगाच्या दु:खाइतकीच जगतानाची दु:खंही महत्त्वाची असतात. त्याबद्दल काही चौकट मांडली गेली असल्यास ती आणि तिची समीक्षाही वाचायला आवडेल.

आपण एरवी बाकीच्या बाबतीत कसं जगतो याचा आपण वियोगाच्या किंवा इतर कुठल्याही दु:खाला कसं स्वीकारतो याच्याशी थेट संबंध असतो. त्याचा विचार टाळून फक्त दु:ख स्वीकृतीचा विचार कसा करता येईल हे समजलं नाही. थोडं वाचावं लागेल या विषयावर अजून.

अर्थात सगळ्या गोष्टी एका चौकटीत बसवायच्या आणि मग त्या चौकटीत स्वतःला बसवायची खटपट करायची हे फक्त धर्म करतो, करायला सांगतो असं वाटतं होतं. पण आधुनिक मानली जाणारी विचारप्रणाली पण वेगळ्या नावानं तेच करत असते हे लक्षात येऊन थोडं निराश वाटतं.

लेख वाचताना कुठंही अडखळले नाही. अनुवाद उत्तम झाल्याची ती एक खूण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुवाद आवडला. विषय गंभीर आहे, भावनांचा असा वस्तुनिष्ठ अभ्यास वाचायला आवडला.
धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम अनुवाद. मृत्यूसारख्या गंभीर विषयावरचं इतकं सुंदर विवेचन पहिल्यांदाच वाचनात आलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

हा लेख फार उशिरा वाचण्यात आला. मृत्यूनं आपल्यातलं चालंतं बोलतं माणूस जेव्हा अत्तराच्या वासासारखं उडून जातं.तेव्हा याविषयी ओढ निर्माण होते. या सगळ्याकडं अंगणात घटकाभर चालणार्या ऊन सावलीच्या खेळासारखं बघायला शिकतो माणूस आणि हे ही स्वीकारलं जातं की, मरण आहे म्हणूनच माणसाचं जगणं सुंदर आहे. लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घन तमी शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना बघ जरा तरी

ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळया वातावरणी
का गुदमरशी आतच कुढुनी
रे मार भरारी जरा वरी

फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल जळे बघ ज्योत पाजळे
का मरणि अमरता ही न खरी ?

मना वृथा का भिसी मरणा
दार सुखाचे ते हरि करुणा
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहु कवळण्या उरी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0