फुरसद के कुछ पल

बालपणीचा काळ सुखाचा मागे पडून कित्येक वर्षं उलटलेली असतात. आपली मुलं जवळपास आपल्या उंचीला किंवा त्याही पार गेलेली असतात. वरच्या पिढीच्या संध्याछाया सुरू झालेल्या असतात आणि आपण खलील जिब्रानची मुलांविषयीची कविता नव्याने समजू लागलेले असतो. आईवडील मध्यमवयीन असताना आपल्या कानावर पडलेल्या कितीतरी गोष्टी आपण त्या वयाला पोहोचल्यावर नव्याने उमगायला लागतात. लहानपणी ऐकलेली गाणी आताशा आणखी आवडायला लागतात. आपण म्हणलं तर अनुभवी आणि म्हणलं तर शिकाऊ अशा दोन्ही गटात मोडत असतो. कित्येकांची लग्न मुरलेली असतात तर काहींची घडी विस्कटलेली असते. पण नित्याचं रहाट गाडगं काही थांबत नाही. त्या चक्रात फिरताना अचानक कानावर पडतात "दिल ढूँढता है फिर वही फुरसदके रात दिन..." च्या ओळी. आणि मग थोडं थांबून आपल्या फुरसदसके रात दिन चे क्षण घट्ट मुठीत पकडून ठेवावेसे वाटतात.

हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हात शाळासोबतींबरोबर तोंडातून काढलेली धुक्याच्या सिगारेटची वलयं, जोडीदाराची हरखून टाकणारी उबदार मिठी, तान्ह्या बाळाला कुशीत घेऊन अनुभवलेला त्याच्या जावळाचा वास, आपल्या घरातल्या मोठ्यांच्या हातात आल्याचा चहा दिल्यावरचं त्यांच्या नजरेतलं हसू आणि अशा कितीतरी गोष्टी!

उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीच्या गावी जाताना आईबाबांबरोबर अखंड गप्पा मारत केलेला प्रवास आणि ट्रेनच्या खिडकीतून दिसणारा चंद्र बघता बघता आईचा केसांतून फिरणारा हात, नवऱ्याला आईस्क्रीम खायला आत्ता घेऊन चल, म्हणून होणाऱ्या बाळाच्या नावे घातलेली गळ, मुलांवर अंगाअंगाशी करू नका या उकड्यात म्हणून करवादलेपण आणि अजूनही कटाक्षाने एसी न लावणाऱ्या आजोबांना तो आग्रहाने लावायला लावणाऱ्या नातवाचं कौशल्य ..

परदेशांत राहणाऱ्या आत्याकडून नवलाईने ऐकलेली तिथल्या हिमप्रपाताची वर्णनं, मग स्वतः अनुभवलेली ती जादुमयी, हुरहूर लावणारी बर्फीली गहिरी संध्याकाळ, कधी हिमालयाच्या कुठल्याशा उतारावर मुलांबरोबर एकमेकांवर भिरकावलेले बर्फाचे लाडू, आणि नाक पुन्हा गरम करून द्यायला नवऱ्याने घेतलेली चुकार पापी..

गुलजार साहेब आणि पंचमदा, तुमच्यामुळे फुरसदके रात दिनला नवीन परिमाण मिळतं, प्रत्येकाच्या विश्वात...प्रत्येक ऋतूत.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आठवतात आमच्याही आठवणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या गाण्याची जादूच तशी आहे! आणि सिनेमात संजीवकुमारही आपलं गतायुष्य पाहात असतोच...हा सिनेमा मात्र फार वाईट वाटायला लावतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0