धारपलेले भागवत !

१. थोडे च-हाट अर्थात प्रस्तावना...

मी काही ‘भारावले’ला नाही. पण १९८० ते १९९० च्या दरम्यान जन्मलेल्या बहुतांश वाचणाऱ्या पोरांना भा.रा. भागवत या नावाला टाळून पुढे जाता येणे शक्य नव्हते. वाचनालयांतून त्यांची बहुतांश पुस्तके उपलब्ध होत होती. एकचॅनली दूरदर्शनवर ‘ये फास्टर फेणे है.... फास्टर.... फास्टर... फास्टर...’ अशा चटकदार चालीचे शीर्षकगीत असलेली मालिका लागत होती. अन् नॉस्टॅल्जियाची नस आणखी ताणायची झाली, तर दर सुट्टीनंतर वर्गातल्या मुलांमध्ये फास्टर फेणेच्या कोणत्या पुस्तकांना वाचले, यांची चर्चा व्हायची. एखाद्या पोरगा फास्टर फेणेचा पूर्ण संच संग्रही असल्यामुळे सोबतच्या अनेकांच्या असूयेचा विषय बनायचा. आम्ही आपले लायब्ररी आणि रद्दीवाल्यांच्या जीवावर वाचलेल्या फास्टर फेणेतल्या कथांच्या बाता वर्षभर मारत फिरायचो. भा.रा. भागवत यांच्या पुस्तकांची आवड रुजणे ही गोष्ट आमच्या आणि आधीच्या पिढीच्या मेंदूत ‘इनबिल्ट’ असल्यासारखी होती.

भा.रा. भागवतांनी प्रौढ आणि बाल अशा दोन्ही वाचकांसाठी स्वतंत्र आणि परभृत साहित्य प्रसविले. ‘भारावले’ल्या मंडळींनी त्या साहित्याची सूची त्यांच्या विकीपेजवर उपलब्ध करून दिली आहे. अन् त्या विकीपेजमुळे ही देखील माहिती उपलब्ध होते की ज्युल व्हर्नचे अनुवाद, शेरलॉक होम्सचा संच, बिपीन बुकलवारची सहा-सात पुस्तके आणि फास्टर फेणेचा संच या पलिकडे भा.रा.भागवत यांच्या नोंदल्या गेलेल्या १८१ आकड्यातील १०० हून अधिक पुस्तके आज वाचनालयांमध्ये पाहायला देखील उपलब्ध नाहीत.

फेझ आणि क्रेझ असलेल्या काळात गावोगावच्या वाचनालयांनी फास्टर फेणे आपापल्या बालवाचकांपर्यंत पोहोचवला. पण त्यांच्या पुस्तकांचे गडप होणे किती वर्षांतले, तर अवघ्या दोन अडीच दशकांमधले. म्हणजे १९९४ ते १९९७ नंतर काही पुस्तकांच्या आवृत्त्या पुन्हा आल्या नाहीत. त्यानंतर घटलेल्या बालसाहित्याच्या वाचनाची कारणे सर्वज्ञात असली, तरीही एका सर्वज्ञात असलेल्या लेखकाच्या पुस्तकांबाबत वाचकांनी किती कृतघ्नता दाखविली याचे ढळढळीत उदाहरण म्हणून भागवतांच्या पुस्तकांचे नाहीसे होण्याकडे पाहावे लागेल.

ब्रिटिश लेखक रोआल्ड डाल यांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत ५५ ते ६० पुस्तके लिहिली आहेत. त्यातील दीड डझन फक्त लहान मुलांची आहेत. आज जगभर आकर्षक स्वरूपात ही इंग्रजी पुस्तके केवळ उपलब्धच नाहीत, तर त्यांचे वाचन आणि चर्वण (आपल्याकडच्या शाळकरी मुलांमध्येही सारख्याच प्रमाणावर) होत आहे. गुगल न्यूजवर पडताळणी केलीत तर त्यांच्या सर्वोत्तम बालसाहित्याची क्रमवारी केल्याची बातमी गेल्या महिन्यातील आढळेल. त्यांच्या साहित्यावर प्रेरणा घेऊन काही खेळणी, वस्तू तयार झाल्याच्या नोंदी तेथे आढळतील.

रोआल्ड डाल यांचा मृत्यू १९९० चा आणि भा.रा.भागवत यांचा ऑक्टोबर २००१चा. इथे तुलनात्मक सांगण्याचा मुद्दा हा, की डाल यांच्या मृत्यूनंतरही या लेखकाची पुस्तके ज्या प्रेमाने दरवर्षी सुबक मुखपृष्ठ आणि आकारामध्ये येत आहेत, त्याच्या बरोबर उलट भा.रा. भागवतांच्या पुस्तकांवर विस्मृतीची पुटे चढत आहेत.

सांस्कृतिक आणि साहित्यिक संचिताबाबत कायम सामूहिक अज्ञान असलेल्या आपल्या राज्यात बालसाहित्यावर १९९०नंतर जे ग्रहण लागले, त्याला आपली वाचक पिढी सर्वार्थाने जबाबदार आहे. प्रकाशक-साहित्यिकांच्या पुस्तकाचे हक्क असलेले उत्तराधिकारी यांच्या नावे बोटे मोडण्याआधी आपल्या वाचनाची कक्षा आपण या काळात किती अरुंद केली, याचा आत्मविचार करायला हवा. म्हणजे आपण केलेल्या नुकसानीची मात्रा कळू शकेल.

अंतराळातील अग्निबाण, अलकनंदा आणि जादूगार जीन, इरावतीचा शोध, उडती छबकडी, काळा बाण, काशाची काशीयात्रा, किड्याने घातले कोडे, किल्ल्यातील कारस्थान, तोरणा कुणी जिंकला?, भाग्यशाली सिक्सर, खजिन्याच्या बेटावर संजू-राजू, गालफाटूचा पराक्रम, टिल्लू नावाचा विदूषक, झपाटलेला प्रवासी, शाळेतील भुताटकी, नंदूचे मनोरथ ही उत्तमोत्तम पुस्तके ज्यांनी लहानपणी चवचवीने वाचली असतील, त्यांना ती पुन्हा वाचायची आता कुठलीही सोय राहिलेली नाही. ज्या वाचनालयांमध्ये ती शिल्लक असतील, तीही फारच जिर्ण अवस्थेत धूळ शोषित अवस्थेत पाहायला मिळतील.

मागणीनुसार पुरवठा हा नियम कोणत्याही उद्योगामध्ये शाबूत असतो. बालसाहित्य प्रकाशित करणाºया कैक प्रकाशकांना दोन हजारच्या दशकामध्ये वाचक सापडेनासा झाला. ठकठक सारख्या एकेकाळी चाळीस हजारांच्या खपाचे मासिक काही शेकड्यांच्या वर्गणीदारांवर तगत होते, तर इतर बालमासिकांची अवस्था काय असू शकेल, याची कल्पनाच केलेली बरी. पालकांच्या डोक्यात गेलेले इंग्रजी माध्यमविषयक खुळ बालसाहित्याचा नवा मराठी वाचक घडवतच नव्हता. या इंग्रजी माध्यमशाळांचे वेड दूरवर ग्रामीण भागात झिरपल्यानंतर बालसाहित्याच्या प्रकाशकांना मुंबई-पुणे-नाशिक-नागपूर या प्रथम ग्राहकपेठांपलिकडे असणारा आसराही हळूहळू तुटू लागला.

भा.रा.भागवतांची पुस्तके एकेककरून दुर्मीळ होत गेली, ती याच काळात. ‘अक्काचे अजब इच्छासत्र’ ही आज दोन दशकानंतर आऊट ऑफ प्रिंट गटात जावे, हे आश्चर्य फक्त मराठी पुस्तकांबाबतच घडू शकते.

लीलावती भागवत यांचे ‘मराठी बालसाहित्य : प्रवाह आणि स्वरूप’ हे पुस्तक ६ सप्टेंबर १९९५ साली प्रकाशित झाले. पुण्यातील नवीन उद्योग प्रकाशनाच्या तब्बल ४३६ पृष्ठांच्या या ग्रंथामध्ये मराठी बालसाहित्याचा शंभराहून अधिक वर्षांचा इतिहासच नाही, तर लेखक आणि त्यांच्या पुस्तकांची माहिती मिळते. मराठी बालसाहित्याच्या आरंभकाळातील अंकांची तसेच पुस्तक-लेखकांची छायाचित्रेही या ग्रंथामध्ये सापडतात. फोर्टमधील पदपथावरच्या पुस्तकवाल्यांकडे मला तो ग्रंथ ‘कोणतेही पुस्तक २० रुपयांत’वाल्या गठ्ठ्यात काही वर्षांपूर्वी सापडला . त्यांत कृ.ना. आठवले यांनी डॉन क्विझोट (किहोटे, किशॉट, क्विशोट) १९२० च्या काळात ‘फाकडे तलवारबहाद्दर’ हे रुपांतर केल्याचा उल्लेख आहे. प्रेरणा देणाऱ्या-गुजगोष्टी करणाºया पंतोजी छापाच्या काळापासून अलिकडे जादुची चटई, उडता घोडा छापाच्या लघुपुस्तकांच्या नव्वदीपर्यंतच्या लेखकांच्या कामाच्या नोंदीसह या ग्रंथांत भरगच्च माहिती मिळते.

पहिल्या महायुद्धाच्या काळातच ‘अ‍ॅलिस इन वण्डरलॅण्ड’चे मराठीमध्ये वेगवेगळ्या लेखकांनी सुबोध रुपांतर केल्याच्या नोंदी यात आहेत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत ही रुपांतरे बाजारातून हद्दपार झालेली असणार. कारण खुद्द भा.रा. भागवतांनीच अ‍ॅलीस इन वण्डरलॅण्डचे ‘जाईची नवलकहाणी’ हे रुपांतर १९५२ साली केल्याची नोंद आहे. मध्यंतरी रहस्यकथांच्या शोधार्थ शहरे आणि गावागावांतील भटकंती सुरू असताना एका रद्दीवाल्याकडे ‘जाईच्या नवलकहाणी’ची पहिली आवृत्ती सापडली. या आवृत्तीचे पहिले वैशिष्ट्य त्याचे मुखपृष्ठ द.ग. गोडसे यांचे आहे. दुसरे वैशिष्ट्य भा.रा. भागवतांचे चार पानांचे मनोगत आहे. त्यातही ज्या अ‍ॅलिस लिडेल या चिमुकल्या मुलीवर ही कथा बेतली, तिचे चित्र आहे. मुंबईच्या रामकृष्ण बुकडेपो प्रकाशनाचे हे पुस्तक आज भागवतांची पुस्तके प्रेमाने जपणाºया कित्येक संग्रहकांकडे देखील नाही. अन् या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ‘नवलकहाणीची ओळख’ ही प्रकांड पंडित आचार्य अत्रे यांची तब्बल सात पानांची प्रस्तावना आहे. ‘जाईची नवलकहाणी’ पुस्तकाच्या कुणी आणि किती आवृत्त्या काढल्या हे मला माहिती नाही. पण सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या आणि साठोत्तरी नंतर आलेल्या या पुस्तकाच्या कोणत्याही आवृत्तीमध्ये द. ग. गोडसे यांच्या मुखपृष्ठासह अत्रेंची प्रस्तावनाही हरवलेली आहे. पाने कमी करण्याच्या नादामध्ये आपल्याकडे काय घडू शकते, याचे हे छान उदाहरण सांगता येऊ शकेल.
अ‍ॅलिस इन वण्डरलॅण्डवर हॉलीवूडमध्ये सिनेमा येण्याचे सत्र अद्याप थांबले नाही. २०१० साली ब्लॉकबस्टर चित्रपट आला. त्यानंतरही अनेक टीव्ही सिरियल्समध्ये रुपांतरे आली. सध्या डिझ्नेच्या नव्या प्रकल्पामध्ये अ‍ॅलिस इन वण्डरलॅण्ड पुन्हा अ‍ॅनिमेशनपटाद्वारे पाहायला मिळणार आहे. आपल्याकडे ‘जाईची नवलकहाणी’ आज कुणी वाचत नाही. त्यामुळे (नव्या आवृत्तीमधील) ते पुस्तकही लवकरच काळाच्या आड गडप होणार आहे.

लीलावती भागवत यांनी आपल्या ग्रंथांत भारांविषयी लिहिताना म्हटले आहे की, ‘‘भा.रा.भागवतांनी साहसकथांना एक वेगळे रूप दिले. अतिशयोक्ती नसली तरीही, थोडी असलीच तर तिचा दोष पत्करून असे म्हणावेसे वाटते की, स्वत:च्या बुद्धीने आणि कतृत्त्वाने चमकणारा ‘फास्टर फेणे’ हा मराठी किशोर-कुमार वाङ्मयात पहिलाच बालनायक ठरेल. इतक्या सातत्याने तो मुलांपुढे येण्याचे कार्यही फार महत्त्वाचे आहे. साहसकथांना हे ‘बालात्मक’ रूप देण्याचे तसेच मुलांना भरभरून दिलेल्या आपल्या साहित्यकृतींच्याद्वारे बालसाहित्याला वेगळी वाट दाखविण्यात आणि ते समृद्ध करण्यात भा.रा. भागवतांनी सिंहाचा वाटा उचलला आहे आणि आधुनिक काळात अग्रणी ठरण्याचा मान मिळविला आहे.’’

फास्टर फेणेवर आपल्याकडे मराठीत चित्रपट २०१७ साली आला. त्यानंतरचे काही महिने फास्टर फेणेचे संच जोमाने विकले गेले. चित्रपट पाहिल्यानंतर नव्वदीच्या दशकातील बालपणाचे अपरंपार कढ काढले गेले. आई-बापांनी आपल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये कठीण असलेल्या मराठी विषयात मदत व्हावी म्हणून पहिल्यांदा पूरक वाचन म्हणून फास्टर फेणेची पुस्तके फडताळ्यात मांडली. ती त्या पोरांसह आई-बापांंनी किती वाचली ते अलाहिदा. पण फास्टर फेणेला आणि भारांना पुनर्उजाळा मिळाला, हेही नसे थोडके.

फेणेच्या संचांची विक्री अजूनही उशिराने सिनेमा पाहणाºया व्यक्तींकडून अधूनमधून होत असते. २००९ पासून पुण्यातील उत्कर्ष प्रकाशनामध्ये उपलब्ध असलेले बिपीन बुकलवारच्या पुस्तकांचे संच अद्यााप मुबलक प्रमाणात शिल्लक आहेत. मागे ते संच खरेदी करताना ‘कुणासाठी नेताय, कुणी वाचत नाहीत हो आता.’ हा सूर त्याच दुकानामध्ये ऐकायला मिळाला होता.
एकूण काय, तर भा.रा. भागवत यांच्या साहित्याचे आपण सामूहिक विस्मरण करीत चाललो आहोत. त्यांची भाषिक क्षमता आज झेपणार नाही का?, त्यांची मराठी आज हरविली गेली आहे का? त्यांच्या सगळ्याच स्वतंत्र आणि अनुवादित पुस्तकांमध्ये वाचनगोडी निर्माण करणारे सारे घटक आहेत. विनोद, भाषिक लकबी आणि गुंतवून ठेवण्याची हातोटी, या सगळ्या गुणांनी युक्त असलेली त्यांची पुस्तके आणखी शंभर वर्षे वाचली, तरी जुनी वाटणार नाहीत. प्रश्न आहे, तोवर त्यांची किती पुस्तके आपण हरवून बसलेलो असू.

२. मुख्य विषय अर्थात सापडलेले पुस्तक...

साठोत्तरी काळात ज्या काही प्रवाहपतीत, नवविचारांच्या, नवकल्पनांच्या फुलबाज्या मराठी साहित्यप्रांत नामक घटकात नाचविल्या गेल्या, त्यातील कित्येकांची सद्दी आज सर्वार्थाने उतरली आहे. मराठी वाचनालयांमधून उरल्या-सुरल्या वाचकांच्या पिढीने सर्वच मुख्य धारेतील आज वाचल्या न जाणाऱ्या साहित्यिकांना बाद केले आहे. तरीही त्या काळात भयकथा हा प्रकार लिहून मुख्य प्रवाहात पुरेशी उपेक्षा मिळालेल्या अन् तरी वाचक गोतावळा उभारणाऱ्या नारायण धारप या लेखकाला अलिकडच्या काळात अधिक ‘कल्ट’ स्टेटस प्राप्त झाले आहे. गंमत म्हणजे त्याच्या रद्दीवाल्यांनाही त्यांच्या पुस्तकांना अधिक किंमत येते हे ठाऊक आहे. फेसबुकवर ‘नारायण धारप’ प्रेमींचा सर्वाधिक सक्रिय असलेला गट असून त्यामुळे त्यांच्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या येण्यास चांगली वाट मिळाली आहे.

धारपांनीही भा.रा.भागवत यांच्याप्रमाणे अट्टल वाचन केले. भागवत आणि धारप यांच्या लेखनकाळ काहीसा जवळपासचा आहे. १९३०-३२ काळापासून भा.रा.भागवतांची लेखणी भरधाव धावत होती. धारप यांनी १९५०च्या दशकात लिहिण्यास सुरुवात केली. धारपांआधी भयकथा आणि अनुवादित भयसाहित्य लिखाणात द. चिं. सोमण यांनी बरीच मजल मारली होती. अनोळखी दिशा या पहिल्या कथासंग्रहानंतर धारपांच्या ‘चंद्राची सावली’ या कादंबरीने त्यांना मोठे नाव मिळवून दिले. पुढल्या सत्तर ते ऐंशीच्या दशकामध्ये त्यांच्या कथा सत्यकथेपासून साºया महत्त्वाच्या नियतकालिकांमध्ये आढळतात. ‘अक्षर’च्या १९८३ च्या पहिल्या दिवाळी अंकामध्येही त्यांची कथा दिसते. धारपांच्या लिखाणानंतर भय-गूढ प्रकार हाताळणारे लेखक खूप झाले. रहस्यकथा लिहिणाऱ्या गुरुनाथ नाईकांनीही भयकथामाला लिहिल्या, पोलीस कथांनी लोकप्रिय झालेल्या श्रीकांत सिनकर यांनी भयकथा-कादंबऱ्या हाताळल्या. पण बालसाहित्यासाठी नावाजलेल्या भा.रा. भागवत यांच्या नावावर धारपांसारख्या शैलीतील भयकथा असल्याचे ऐकिवात नव्हते. मुलुंडमधील एका रद्दीवाल्याच्या दुकानात ‘घुमट’ या नावाचा त्यांचा संग्रह सापडेस्तोवर मला त्या पुस्तकाबाबत काहीही माहिती नव्हते. पण पुढे भागवत साहित्य रिचवून ‘भारावलेल्या’ लोकांकडे विचारणा केली असता, त्यांनाही त्या पुस्तकाबद्दल काहीही माहिती नसल्याचे समजले. भारांच्या साहित्याच्या सूचीत या पुस्तकाची नोंद नव्हती. इतर ठिकाणी विचारल्यानंतरही या पुस्तकाबद्दल काहीही हाती लागत नसल्यामुळे आपल्याला भारांचे अतीदुर्मीळ पुस्तक सापडल्याचा आनंद झाला.

पुस्तक माझ्या जन्माच्या आधीचे असले, तरी पुस्तक व्यवहाराच्या भाषेत १५ फेब्रुवारी १९७९ ही घुमटच्या प्रकाशन कालाची दिलेली तारीख फार काही जुनी नाही. पुण्याच्या इंद्रायणी प्रकाशनाच्यावतीने छापण्यात आलेले हे पुस्तक तातडीने गायब का झाले असावे, त्याच्याबद्दल माहिती सांगणारे मला (ही पोस्ट करेस्तोवर) कुणीच कसे सापडू नये याचे सर्वाधिक आश्चर्य वाटते. पुस्तकाला प्रस्तावना नाही. मात्र या कथा वीणा मासिकात प्रकाशित झाल्याचा उल्लेख सापडतो. ‘‘रसिक मित्र उमाकांत ठोंबरे यांस. या ‘घुमटात’ निनादणारे काही सूर पहिल्याने त्यांच्या ‘वीणा’मधून उमटले म्हणून...’ अशी अर्पणपत्रिका भारांनी लिहीली आहे.

‘घुमट’, ‘भयंकर एप्रिल फूल’, ‘कडुुनिंबावरचा लगन्या’, ‘गुलाबी रहस्य’, ‘टिचकी’ इतक्या १३६ पानांमध्ये सामावणाºया आणि एका बैठकीत वाचून होणाºया यातील कथा म्हणजे नारायण धारपांच्या शैलीत भय-रहस्य-चमत्कृतींनी भरलेल्या गोष्टी आहेत. भारांमधला उपजात विनोदी बाणा या भय-रहस्यकथांमध्ये डोकावतो, हा गंमतीशीर प्रकारही पुस्तकामध्ये येतो.
धारपांच्या कथांची मोहिनी या दशकांमध्ये इतकी होती की त्यांच्या समकालीन लेखकांनाही त्यांच्या पकडून ठेवण्याच्या शैलीची असूया वाटली असेल. द.पा.खांबेटे आणि हंस-नवलमधून सत्तर ते नव्वदच्या दरम्यान लिहिणाऱ्या कित्येक लेखकांनी धारपांच्या कथेसारखा भयआराखडा असलेल्या कथा लिहिल्या आहेत. त्यात परभृत कल्पनांना देशी साज चढवून वेगळ्याच प्रकारची कथा तयार झाली आहे.

‘घुमट’मध्ये नव्याने लग्न लागून लता नावाची नाईका मुंबईतील हिरेन मुजूमदार या जर्मन औषध कंपनीच्या एजन्सीचे काम करणाºया तरुणाच्या बंगल्यात राहायला येते. आपल्या नवºयाच्या पूर्वातिहास जाणून न घेता त्याच्याशी लग्न करणाºया लताला एकटेपणा खायला उठतो. नव-याच्या काहीशा विक्षिप्त स्वभावाची आणि त्याच्या कागदपत्र, पुस्तकांची झडती घेतल्यानंतर एका होऊ पाहणा-या खुनाच्या रहस्यापर्यंत ती पोहोचते. त्या नंतर रहस्याचा ताण अब्बास मस्तान यांच्या सिनेशैलीसारखे चकव्यांवर चकवे वाचकांभोवती तयार करतो. (रिबेका या अभिजात कादंबरीसारखे कथानक वाटत असले, तरीही ती तशी नाही.) ‘भयंकर एप्रिल फूल’ देखील याच वळणाने रहस्य-रंजन करते.

‘कडुनिंबावरचा लगन्या’ ही कथा धारपांच्या ‘कवठीचे वळण’ आणि ‘श्रद्धा’ या कथांची प्रकर्षाने आठवण करून देणारी. भुतं खरंच असतात का याविषयी रंगणाºया गप्पांमध्ये खरेच भूत आणि अनाकलनीय घटनांना सामोरे जाण्याचे आवाहन करून देण्याची धारपांच्या कथेमधील पार्श्वभूमी येथे आढळते.

‘सोडमुंज न झालेला म्हणजेच लग्नाशिवाय अकाली मरण पावलेला मुलगा त्याची इच्छा अतृप्त राहून तो पिंपळावरचा मुंजा बनून लोकांना त्रास देतो. ब्रह्मचर्यावरच खूष असणारा आणि इच्छेविरूद्ध लग्न झालेला इसमही मेल्यावर असाच भूत बनून आपल्या कडुलिंबाच्या झाडावर ठाण मांडून बसतात. या भुताच्या जातीला लगन्या म्हणतात.’’ हा लगन्या गावाला किडीसारखा लागलेला असतो. पेशाने डॉक्टर असलेल्या व्यक्ती आणि भूतावर विश्वास असलेल्या यातील प्रमुख व्यक्तिरेखा लगन्याला पाहायला जातात. त्याची ही भयविनोदी कथा आहे. भयविनोदी यासाठी की त्यात रहस्य गांभीर्याने ताणत नेले आहे. मात्र संधी मिळताच विनोदाची पेरणीही खुबीने केली आहे.

‘गुलाबी रहस्य’ ही भय-विज्ञान कथा आहे. कथेमध्ये इंग्रजी फॉण्ट्ससह वाक्य आहेत आणि कथा प्रचंड पकडूनही ठेवणारी आहे.

‘टिचकी’ या कथेमध्ये धारप भयरसाचा सर्वाधिक आढळ आहे. धारपांच्या कित्येक कथेमध्ये नायक हा आजारामुळे हवापालट घेण्यासाठी एखाद्या घरात, बंगल्यात, नव्या गावात दाखल झालेला दिसतो. या कथेमध्ये सोनाळकर नावाचा रहस्यकथा लेखक आहे. आपल्या आजारावरील सल्ल्यासाठी तो धारप आडनावाच्या डॉक्टरला भेटतो. त्यांच्या सल्ल्यानुसार लोणावळ्यामध्ये एका हवेशीर, टुमदार आणि शांतता असलेल्या हॉटेलामध्ये दाखल होतो. तेथे दाखल झालेल्या तुरळक व्यक्तींकडे हा सोनाळकर अत्यंतिक सूक्ष्म नजरेतून पाहतो. अन् या अशक्य शांत असलेल्या हॉटेलात एक अनपेक्षित रहस्यकथेचे त्याला साक्षीदार व्हावे लागते.

भागवतांची माझ्याकडे असलेली जुनी कथा बहुदा १९३७ च्या किर्लोस्करच्या संचामधली आहे. सर्वोत्कृष्ट मराठी विनोदी कथांचे राम कोलारकर यांनी केलेल्या माझ्या जवळ असलेल्या १५ खंडांमध्ये भारांच्या डझनांहून अधिक विनोदी कथा आहे. त्यात भुतांचा उल्लेख असणाऱ्या काही कथाही आहेत. पण घुमटमधल्या कथांसारखी भयमात्रा त्यात आढळत नाही.
कुतूहल आहे ते घुमट पुस्तक भागवतांच्या मोठ्या प्रमाणावर वाचकसंख्या असलेल्या कक्षेबाहेर का फेकले गेले त्याचे. इतक्या चांगल्या कथा असूनही त्या कोणत्या कारणांमुळे विसरल्या गेल्या हे देखील एक रहस्यच आहे.

भारांचे साहित्य पुर्नप्रकाशित व्हावे म्हणून प्रयत्न होणे गरजेचे आहे. हे साहित्य नफा-तोटा या व्यवहाराच्या पलिकडचे असून त्याचे साहित्यिक मूल्य आणि संस्कारक्षम वयातील मुलांना होणारी आणि वाटणारी वाचनाची गरज ह्याला पूरक आहे. पण हे सारे गांभीर्याने लक्षात येणे महत्त्वाचे आहे.

धारपांच्या कथांचे सध्या लोक नव्याने वाचन करीत आहेत. त्यांच्या कथांचे नवे वाचकही तयार होत आहेत. भा.रा.भागवत बालसाहित्यिक म्हणून सर्वाधिक प्रसिद्ध असले, तरी त्यांनी सर्व प्रकारचे साहित्य लिहिले होते. त्या लेखनाचा शोध घेण्यासाठी अजून तरी वेळ निघून गेली आहे, अशी परिस्थिती नाही. शेवटी वाचण्यासाठी चांगले टिकले, तरच वाचन टिकेल. अन्यथा नॉस्टेल्जिक हळहळीपलीकडे आपल्या हाती काही उरणार नाही.

(समाप्त)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

त्यांची "भुताळी जहाज" पण बर्यापैकी हॉरर होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय जाईची नवलकहाणी होतं माझ्याकडे. बाबांनी आवर्जून दिलं होतं. फार सुरेख भाषांतर होतं. उदाहरणार्थ जाई खोल खोल गर्तेत पडत असते तेव्हा तिला 'म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान .." कविता आठवते. अगदी मराठमोळं सुंदर भाषांतर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पंकज भोसले तुम्ही अतिशय महत्वाच्या विषयावर लिहिलंय त्याबद्दल अभिनंदन ... तुम्हाला जर आणखीन पुस्तकाबद्दल शोध घ्यायचा असेल तर मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या वाचनालयात सापडू शकतील... त्यासंदर्भात तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला फेबु वर DM केलात तरी चालेल , योगेश मोरे या नावाने आहे मी फेबूवर

थोडं अवांतर , भा रा बरोबरच , तुमच्या दुसऱ्या एका लेखात मी दिवाकर नेमाडेंचा उल्लेख वाचला आणि मला चटकन जयंत पवारांच्या एका कथेतला निशाचर दिवाकर आठवला... पवारांना तेच दिवाकर तर अभिप्रेत नसतील ना ?

भालबा केळकर यांचा टारझन पण खूप वेळा वाचलाय, असो आपण कधीतरी भेटू तेव्हा बोलूच अशी आशा करतो ... तुमच्या संशोधन कार्याला शुभेच्छा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0