विज्ञानाचे बिनरहस्य - भाग १

२०१८ सालच्या 'अक्षर' दिवाळी अंकात मी एक लेख लिहिला. लेखाचं नाव होतं, 'विज्ञानाचे बिनरहस्य'. त्या लेखाचा हा पहिला भाग. पुढचे एक एक करून इथे देईन.

ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम

स्टीफन हॉकिंग याचं निधन झालं. एक मोठा वैज्ञानिक, मोठा विचारवंत गेला. त्यांच्यापाशी मर्म वेधण्याची आणि संवाद साधण्याची मोठी क्षमता होती. त्याचं A Brief History of Time हे एक थोर पुस्तक आहे. इतक्या कमी जागेत आणि इतक्या सोप्या शब्दांत केलेलं इतकं सुंदर विवेचन माझ्या वाचनात नाही. एका ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे, ॲरिस्टॉटलने समष्टीची विभागणी दोन भागात केली. चार द्रव्यं आणि त्यांवर काम करणारी दोन बलं. एक बल द्रव्यांना खाली खेचणारं (gravity) आणि दुसरं वर नेणारं (levity). मला हे खुळचट वाटलं. ॲरिस्टॉटलला जगाची, जग कसं चालतं याची फार कमी माहिती होती, पण लॉजिकची मोठी हौस होती; त्यामुळे बिचाऱ्याने त्याच्या अल्पमाहितीनुसार काहीतरी मांडणी केली, असं मला झालं होतं. पण हॉकिंग म्हणतात, हे असे दोन भाग पाडणे, यात ॲरिस्टॉटलची प्रतिभा दिसते. त्यांनी असं म्हटल्यावर मला जाणवलं, की आपण अतिपरिचयाने गोष्टी गृहीत धरतो. Matter आणि forces यांचा वेगळा विचार आता आपण आपोआप करतो. पण आता मळून गेलेल्या या वाटेवर पहिलं पाऊल ॲरिस्टॉटलने टाकलं. आणि ती वाट विज्ञानाची पायाभरणी करणारी ठरली.

असं म्हटलेलं न आवडणारे लोक आहेत. आपल्या प्राचीन पूर्वजांना हे सर्व ज्ञान होतं आणि त्यांनी ते लिहूनही ठेवलं आहे; आपण करंटे म्हणून तिकडे लक्ष देत नाही, असं त्यांना वाटतं. मग पायथोगोरसचा काटकोन त्रिकोणाचा नियम कसा आपल्या गणितींनी अगोदरच वापरलेला होता, डाल्टनच्या कित्येक शतकं अगोदर कणादाने ॲटमची थिअरी कशी मांडली होती हे ते सोदाहरण सांगू लागतात. अलीकडेच न्यूटनच्या गतिविषयक नियमांचं मूळ संस्कृतात सापडल्याचा दावा करण्यात आला. या दाव्याचा वेगळेपणा असा, की ते संस्कृतातलं इथून ब्रिटनमध्ये न्यूटनकडे कसं पोचवण्यात आलं, याची कहाणीसुद्धा त्या दाव्याला जोडण्यात आली होती. बिनतोड पुरावा. तत्त्वज्ञानात आणि अध्यात्मात आपण ‘त्यांच्या’ पुढे आहोतच; विज्ञानातही होतो, अशी एकूण मांडणी. आपली आपण पाठ थोपटण्याचा प्रकार.

या लोकांना विज्ञान म्हणजे काय हेच मुळात कळलेलं नाही. किंबहुना विज्ञानाविषयी पूर्ण आचरट कल्पना, हे आपल्या समाजाचं एक लक्षण आहे. ‘तुझं विज्ञानावर विश्वास आहे की धर्मावर?’ असा प्रश्न उभा करणे, हे या लक्षणाचं एक रूप. जणू काही एका बाजूला धर्मग्रंथ आहे आणि दुसरीकडे विज्ञानाचं पुस्तक. परमेश्वराने, प्रेषिताने, ‘ज्ञानी पुरुषां’नी लिहून ठेवलेली काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेली अमोघ वचनं एकीकडे आणि स्वतःच्या चुका सतत काढत बसलेलं वैज्ञानिक संशोधन दुसरीकडे. यातून निवड करायची आहे, असा हा चतुर पेच.

विज्ञान पुस्तकांत असतं काय? विज्ञानाला पूर्ण स्वीकारल्याशिवाय या जगात काहीही करणं कोणाला तरी शक्य आहे काय? आपण रोज जेवतो. आज जे खाल्लं, ते पचलं, अंगी लागलं; ते उद्या आपल्याला विषकारक ठरणार नाही, हा विश्वास धरून आपण अन्न खात राहतो. कुठल्या विश्वासावर? बाजारातून आपण भाजी आणतो. काल एका किलोत जितकी साखर बसली, तितकीच आजही बसणार, हे आपण गृहीत धरतो. कशाच्या आधारावर? ‘आज जिन्याने न उतरता देवाचं नाव घेत खिडकीतून उडी घेऊ; तो नक्की आपल्याला सुखरूप खाली पोचवेल,’ असा प्रयोग आपण करत नाही – अशा भाकडकथा कितीही ऐकलेल्या असल्या तरी. उलट बाजूने झोपडीपासून गगनचुंबी इमारतीपर्यंत केलेलं बांधकाम वादळ, भूकंप असल्या अघोरी शक्तिमान घटनांविना स्वतः होऊन, सहज उडून जात नाही वा ढासळत नाही, याचं आपल्याला नवल वाटत नाही. का? तसं झालं, तर त्याची कारणं शोधण्याची इच्छा आपल्याला होते, ती तरी का? विश्वाचे व्यवहार आपल्याला नित्य अनुभवास येणाऱ्या नियमांना धरून चालत राहतील या गृहितावर आपलं संपूर्ण जीवन आधारलेलं असतं. त्या नियमांचा भंग झाला, की आपल्याला पुन्हा कारणं शोधावीशी वाटतात. का म्हणून?

कारण जगाचे व्यवहार नियमांनी बांधलेले असतात, हे आपण सर्वजण धरून चालतो. झाडावरून तुटलेलं फळ खालीच पडणार, ते वर उडून जाणार नाही, हे ज्ञान काल चालायला लागलेल्या पोरालाही असतं.

हेच विज्ञान. ‘जगाचे व्यवहार नियमांनी बांधलेले असतात,’ ही जाणीव म्हणजे विज्ञानाची सुरुवात. व्याध हा तारा पहाटेच्या वेळी क्षितिजावर दिसू लागला, की उन्हाळा येण्याची वेळ आली, असं इजिप्तमधल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी व्याधाच्या दिसण्यावर त्याचं कॅलेंडर बांधलं. इथून विज्ञानाचा जन्म झाला, अशी एक थिअरी आहे. हे लक्षात येण्यासाठी अगोदर अनेक वर्षं त्या शेतकऱ्यांनी ते अनुभवलं असणार. गेल्या वर्षी झालं, तसं या वर्षी होईल का, ही उत्सुकता त्यांना वाटली असणार. तसं झाल्यावर त्यांचा विश्वास वाढला असणार. मग कोणीतरी त्यानुसार वागायचं ठरवून काही नियोजन केलं असणार. त्याचा आडाखा पुन्हा बरोबर ठरल्यावर इतरांनी त्याचं अनुकरण केलं असणार. वर्षानुवर्षं असं होत राहिल्यावर एका गावातून हे लोण दुसऱ्या गावात गेलं असणार. तिसऱ्या गावात पोचलं असणार. एक वैज्ञानिक नियम जन्माला आला, हे मात्र कोणाला सुचलं नसणार.

या साध्या सरळ साखळीचं रूपांतर आजच्या आपल्या समाजात थेट उलट कसं झालं, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. रोज सूर्य उगवतो, याला परमेश्वरी कृपा मानणारे आणि त्या कृपेमुळे उचंबळून येऊन कृतकृत्य होणारे अध्यात्मवादी सहज भेटू शकतात. आणि विज्ञान म्हणजे काहीतरी गहन, अवघड, अचाट; उदाहरणार्थ रॉकेट उडवणे, अणुबॉम्ब बनवणे, इंटरनेट, असं तर जवळपास सगळेच मानतात. निसर्गात नियम असतात, ते शोधता येतात, शोधून त्यांचा उपयोग करून घेता येतो, तसं करताना नियम अधिक पक्का सापडत जातो, त्या नियमाला एखादा फाटा फुटू शकतो, त्या फाट्याने पुढे गेल्यास असंख्य वाटा समोर येतात आणि शंभर वेळा रस्ता चुकल्यावर त्यातली एक वाट आपल्याला हवं तिथे घेऊन जाते. – हे विज्ञान! हेच विज्ञान. तुमच्या आमच्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेलं हेच तर विज्ञान. आपण हा सरळ रस्ता सोडून का दिला? कधी सोडला? ‘विज्ञान म्हणजे अद्भुत, विज्ञान म्हणजे बुद्धिमंतांचं काम, विज्ञानाचा आपला संबंध नाही, आपण गाय, बैल, शेळ्या आणि मेंढ्या यांच्याच सारखे आहोत, विचार करणं आपलं काम नाही, विचारांचा पाठपुरावा करणं तर नाहीच नाही;' असे बैलप्रकृतीचे स्वतःला आपण का मानतो?

वैज्ञानिक संशोधन करणारे कुणीतरी खास लोक असतात, आपल्यापेक्षा वेगळे असतात; असं मनात घट्ट बसलं, की प्राचीन संस्कृतात अमुक अगोदरच लिहून ठेवलेलं आहे, यावर विश्वास सहज बसतो. मुळात आपले पूर्वज आपल्यापेक्षा कितीतरी जास्त बुद्धिमान होते, ही आपली ठाम श्रद्धा. आणि विज्ञान हे बुद्धिमंतांचं काम, हे विधान त्या श्रद्धेला जोडलं की पुरे. आपण विज्ञानात जगतो आणि वैज्ञानिक शोध ही एक हळूहळू पुढे सरकणारी साखळी आहे, ही जाणीव आपल्या समाजातून कशी नष्ट झाली? बौद्धिक आळसातून झाली, की वस्तू आणि उत्पादनं यांवर अग्रहक्क सांगण्यासाठी सामान्य जनांना गाफील ठेवण्याच्या कावेबाज हितसंबंधातून झाली? की आपली भूमाता आपल्यावर कृपा करत राहिली आणि विचार करून, धडपडून नव्या वाटा शोधून जगणं सुसह्य करण्याची इथल्या बहुसंख्यांना गरजच पडली नाही, म्हणून?

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

लेख विचारप्रवर्तक आहे. विचार करण्यास उद्युक्त करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्कृष्ट..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचतोय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुसंख्यांचं राज्य असल्यामुळे आता गोमूत्र आणि शेणात विज्ञान शोधायला कोट्यवधी रुपये घालताहेत. एव्हाना तुम्हाला 'फुरोगामी' हे लेबल चिकटले असणारच. पुढच्या लेखांची वाट पहात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'शेण' म्हणजे काउडंग, की बुलशिट?

(फरक पडतो!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयुर्वेदासाठी काउडंग। अंगण सारवायला बुलशिट चालते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरोगामी लोक ही खरोखर विज्ञानवादी असतात.
आणि त्यांचे विज्ञान वर विश्वास आणि प्रेम असते हेच लोकांना पटत नाही.
लोकांचा हा गैरसमज दूर करणे गरजेचे आहे लोकांना वाटत फक्त टीका करणे हेच फक्त हे करू शकतात.
तर मला वाटत भारतातील पुरोगामी विचारधारा असलेल्या संशोधकांची ओळख जनतेला करून द्यावी.
ज्या पुरोगामी भारतीय संशोधकाने भारताच्या संशोधन क्षेत्रात विशेष कामगिरी केली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिवाळी बिवाळी अंकात अशा धाटणीचेच लेख लिहावे लागतात. छानच जमलय.
पण तुम्हाला खूप माहिती आहे आणि प्रत्यक्ष गप्पांत सर्वांचं चांगलं मनोरंजन कराल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे समाजाचे निरीक्षण खूप आहे.
खूप कष्ट पडले असतील ना घरा घरात जावून ,गावोगावी जावून अभ्यास करावा लागला असेल तुम्हाला.
तुमच्या बुध्दी चे तेज लेखात व्यक्त होत आहे.
अशीच समाज सुधारणा करत रहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शक्तीची विविध रूपे आणि निर्मिती हा एक विषय घेऊन लेख लिहणार का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे फक्त बकवास करत नव्हते तर त्याला कार्याची जोड होती.
लेखक चे कार्य 0 फक्त बकवास
त्या महान व्यक्तीचे छाया चित्र का वापरलं आहे .
त्यांची परवानगी घेतली होती का

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ3

सांगा बघू स्टीव्हन हॉकिंगचं कार्य काय ते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जगाचे ज्ञान तुम्ही च देवू शकता.
चुकीचं आहे की बरोबर ह्याच्या भानगडीत जो पडत नाही आपलेच खरे अस समजणारा व्यक्ती कोणत्याही विषयावर जगाला विज्ञान शिकवू शकतो.
ती कुवत आमच्यात नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2