मठ

ना गुणी गुणीनं वेत्ति गुणी गुणिषु मत्सरी ।
गुणीच गुणरागीच विरलः सरलो जन: ॥

अर्थ- गुण नसलेल्याला गुणी माणसाची परिक्षा होत नाही, जो स्वत: गुणी आहे तो दुसर्‍या गुणी माणसाचा मत्सर करतो. स्वत: गुणी असुनही दुसर्‍याच्या गुणावर प्रेम करणारा सरळ मनाचा माणूस विरळाच असतो.

एकदा सामाजिक, मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्तीस भेटायला गेलो. बोलता बोलता स्त्रीवादाचा विषय निघाला. मी मिळून सार्‍या जणींच कौतुक केल. विद्या बाळ, गीताली व इतर अशा या क्षेत्रात काम करणार्‍या लोकांविषयी आदर व्यक्त केला. बाई मनातून खवळल्या पण मोठ्या संयमाने पण तुच्छतेने मी त्यांच्यापैकी नाही असे निक्षून सांगितले. संयम व तुच्छता यांचे मिश्रण त्यांच्या चेहर्‍यावर लपवता येण्यासारखे नव्हते.
बरं काय काम आहे?

तसं काही काम नाही सदिच्छा भेट म्हणुन आलो होतो!

मी कौन्सिलिंग मधे बिझी असते! शिवाय इतरही कॉन्फरन्सेस असतात. अमुकवारी अमुक ठिकाणी मी असते. काही काम असेल तरच या! आणि फोन करुन या!

बरं! नमस्कार येतो!

पुण्यातल्या व्याख्यानमाला परिसंवाद परिषद यांना मी गेली बरीच वर्षे जातो. तिथेही याची ठळक पुसट झलक पहायला मिळते. माझ्यासारख्या अनेक मूक निरिक्षकांना ती जाणवत असणार. अनेक विद्वानांचे, मानस तज्ञांचे, साहित्यिक कवींचे, राजकारण्यांचे आपापल्या क्षेत्रात प्रत्यक्ष किंवा आभासी ’मठ’ असतात. आमच्यासारखे फुकटे ज्ञानपिपासू याही मठात जातात व त्याही मठात जातात. सगळीकडचे मठाधिपती आम्हाला आपापल्या गटात खेचायला बघतात. पण आम्ही हुषार ना! तेल लावलेल्या पहिलवानासारखे आम्ही त्यांच्या हातातून निसटून जातो. मग तेही संख्याबळाचा प्रश्न तर सोडवतोय ना असे माफक समाधान मानून घेतात. एखाद्या मठात गेलो की सारे जहॉंसे अच्छा ’तो’ मठाधिपती हमारा असे गुणगुणतो. दुसर्‍या मठात गेलो कि ’तो’ मठाधिपती म्हणायच. मठातल्या श्रोतृ वाचक प्रेक्षकांतल्या कुजबुजीतून आपल्याला मठातल्या बातम्या विनासायास मिळतात. पण मिळाल्या तरी त्या आपल्या जवळच ठेवण्यात शहाणपण असत हे तुम्हाला अनुभवातून कळत. काही मठाधिपत्यांच्या निष्ठावंतांना ( इथे पित्ते म्हणायचा मोह टाळायचा असतो) लक्षात येतेच की हा साला ’इकडे’ही असतो व ’तिकडे’ ही असतो. मग ते खोचकपणे विचारतात. मग आपणही ज्ञान हे यत्र तत्र सर्वत्र असते, ऐकावे जनाचे करावे मनाचे अशी वाक्ये फेकून विषय टाळावा. कधी कधी ’ते’ तर असं असं म्हणत होते असे सांगावे.

ह्यॅ! त्याला काय कळतयं? बोगस डिग्र्या आहेत त्याच्याकडे! प्रसिद्धी स्टंट त्यांना चांगला जमतो एवढंच! कुठलातरी ऑनलाईन पोस्टल कोर्स करुन तथाकथित डिग्र्या मिळवायच्या. बातमीदार पत्रकारांना खूष करून बातम्या छापून आणायच्या.लोकांना काय छापुन आल कि खर वाटतं.इथे विद्वान विद्वान म्ह्णुन मिरवायच आन तिकडे बायकांच्या भानगडी करायच्या! यांचे खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे! विदेशी देणग्या मिळवण्यासाठी संस्था काढायच्या. झगमगीत समारंभ करायचे, किरकोळ मदत देउन फोटोसेशन करायचे, तुमच्या सारख्या लोकांची गर्दी जमवायची, सोशल मिडियावर फोटो टाकायचे, बातम्या छापायच्या, गुळगुळीत मुखपृष्ठाचे अहवाल छापायचे अन प्रस्थापित व्हायचे. मग लोक तुम्हाला स्वत:हून देणग्या देतात.लोकांनाही आपल्या अपराधगंडाचे परिमार्जन करायचे असते. शिवाय दातृत्व मिरवताही येते. एकदम विन विन सिच्युएशन! शिवाय प्रबोधनपर कार्यक्रमातून क्रिमी लेयर लोकांमधे अपराधगंड तयार करण्याचे काम करत राहायचे. पुढचे देणगीदार तेच असतात. लोकांकडे पैसा भरपूर झालाय हो! उगीच आपला देश गरीब गरीब म्हणतात. तुम्हाला माहितीये का अशा संस्था या मोठमोठ्या धनदांडग्यांचे मनी पार्किंग लॉट असतात. इनकम टॅक्स वाचवण्याचे उद्योग! शिवाय कंपन्यांच्या सीएसआर मधे साटेलोटे असते. तिथेही फाळ्का मारतात. ज्याच त्याच नशीब म्हणा! अरे हा! नशीब वरुन आठवल. तुमचा ज्योतिष विषय नाही का?

हो!

फलज्योतिष चिकित्सा मंडळ बरोबर ना!

ब्लॉग आहे तो माझा !

पैसे मिळतात का काही?

नाही! पैशासाठी नाही काढला ब्लॉग! पेन्शन पुरेसे आहे.

ह्यॅ! तुमच्याजागी मी असतो तर फलज्योतिष चिकित्सा मंडळ संस्था रजिस्टर केली असती. लोकांच भविष्य सांगायच म्हणजे ज्योतिष मार्गदर्शन करायचं ! ते चिकित्सा बिकित्सा बाजूला ठेवा! लोकांना असल काही नको आहे! ज्योतिषाचा क्लास काढायाचा! लोकांना कुतुहल आ्हे शिकायचं!. येतात लोक! त्यातून तुम्ही काय रिकामटेकडेच की! व्हीआरएस घेतली म्हणून म्हणतोय. कधी घेतलीत व्हीआरएस?

2007 ला

ऑ! मग तेव्हापासून काय करताय?

काही नाही असेच नेटवर मुशाफिरी! व्याख्यान परिसंवाद असले की जाणे! पुस्तके वाचणे, कधी कधी पिक्चर नाटक बघणे तुमच्या सारखे हितचिंतक भेटतात त्यांच्याशी गप्पा मारणे, बर वाटतं गप्पा मारुन! बरं चाललय तसं!

अन चरितार्थ?

बायको आहे ना! रिअल इस्टेटची वकीली कामे, सल्ला एजंन्सी चा व्यवसाय आहे तिचा!

अच्छा म्हणून बर चाललयं म्हणायच?

हो!

बरं! मुलं मुली काय तुम्हाला?

एक मुलगी आहे.

काय करते ती?

लग्न झालयं तिच दोन अडीच वर्षांपुर्वी. कम्रर्शियल आर्टिस्ट आहे.

वा! चिंता मिटली म्हणायची!

कशाची?

मुलीच्या लग्नाची हो! जावई काय करतात?

मेजर आहे आर्मी मधे आहे.

वा वा! तुम्हाला सांगतो आपला देश मिल्ट्रीच्या ताब्यात दिला पाहिजे. त्या शिवाय सुधारणार नाही! सगळा भ्रष्टाचार बेशिस्त बोकाळली आहे. परवाच्या कार्यक्रमाला नक्की या बर का! आमच्या मठाधिपतींना तो अमुक तमुक पुरस्कार मिळाला आहे. तो पुरस्कार समारोह सोहळा आहे. जगदविख्यात विद्वान अमुकतमुक यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार आहे.

नक्की येईन!

असाच एकदा एका मानसशास्त्रावरच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो.मोहन आगाशे, विद्याधर वाटवे मंडळी होती. मोहन आगाशे मिष्कील बोलण्यात एकदम पटाईत. ते म्हणाले,"
महाराजांचे कसे मठ असतात.
तुमचे कुठले?
गोंदवलेकर महाराज
अच्छा आमचे स्वामी समर्थ!
तसे आता लोक म्हणून लागतील तुमचे कुठले?
डॉक्टर वाटवे
अच्छा आमचे आगाशे!"

त्यावर आख्खे सभागृह खळखळुन हसल होत. पण त्यातून एक संदेश होता. भविष्यातले बाबा बुवा हे सायकॉलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट व कौन्सिलर असणार आहेत. अर्थात आम्ही हे भविष्य केव्हाच वर्तवल होत.पाहिजे तर पुरावा म्हणुन लिंक देतो उपक्रमावरची.
मानसोपचारात दोन प्रमुख स्कूल ऑफ थॉटस आहेत. एक बायोमेडिकल ॲगल ने जाणारा व दुसरा थेरपी ॲगलनी जाणारा! दोन्हींचे महत्व आपापल्या जागी आहेच. मुद्दा येतो तो प्राधान्यक्रमाचा. मानसतज्ञ ही प्रथम माणसेच असतात. म्हणजे होमो सेपीयन सेपीयन! राग लोभ मद मत्सर मोह लोभ हे सगळच आलं त्यांचेही वैचारिक पिंड त्यांच्या व्यवसायात प्रतिबिंबित होत असतात. शिवाय मानसशास्त्रात अबस्ट्रॅक्ट गोष्टी फारच असतात. मानसशास्त्रात गेल्या दहा पंधरा वर्षात अनेक नवीन संशोधन मोठ्या प्रमाणात आली आहेत. त्यामुळे त्यातील वर्गीकरण ही थोडे बदलावे लागले आहे. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशी यांच्या पुस्तकाच्या अलिकडच्या आवृत्त्यांमधे त्याचा उल्लेख आहे. मानसोपचाराच्या या वेगवेगळ्या पंथाच्या मठाधिपतींनी एकमेकावर टीका करायची नाही असा अलिखित संकेत पाळला आहे. एकतर अगोदरच या क्षेत्राविषयी गैरसमज जास्त, सायकियाट्रिस्टची संख्या कमी त्यातून हे मतभेद जर लोकांसमोर इगो इश्यु म्हणून आले तर ते सर्वांच्याच व्यवसायाच्या दृष्टीने नुकसानीचे आहे. भोंदु बाबा बुवांच्या मठात जाण्यापेक्षा या मानसोपचार तज्ञ बाबा बुवांच्या मठात जाणे केव्हाही हितकारक. यांच्याकडे गेलो तर एक पुरोगामी, वैज्ञानिक प्रतिष्ठा तरी मिळते. तत्वज्ञान अध्यात्म या क्षेत्रातील मठाला तर संयुक्त अशी प्रतिष्ठा आहे. आम्हाला असे अनेक किस्से वेगवेगळ्य मठात ऐकायला पहायला मिळतात. शिवाय आता फेसबुक ट्वीटर वॉटसप,नेट सारखे सोशल मिडिया हा मोठ्ठा स्त्रोत आहेच. विन विन सिच्युएशनसाठी काही मठांच आपापसात टाय अप पण असते. परस्परं प्रशंसंति अहो रुपं अहो ध्वनीं। तत्वज्ञान,अध्यात्म, मानसशास्त्र, विज्ञान, समाजशास्त्र,राजकारण, व्यवस्थापनशास्त्र,अर्थशास्त्र,साहित्य, कला हे शेवटी एका वैश्विक ज्ञानकटाचाच भाग आहेत. मग कधी येताय आमच्या मठात?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाचलं.
पुन्हा वाचेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा आवडले Smile
मिष्किल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0