मुंबई-पुणे रेल्वे
सुमारे १० वर्षांपूर्वी कृष्णशास्त्री भाटवडेकर-संपादित ’मुंबई ते ठाणे आगगाडी - १८५३ मधली’ ह्या विषयावरील १८५४ मध्ये छापण्यात आलेल्या पुस्तकाचा परिचय करून देणारा एक लेख मी ’उपक्रम’ नावाच्या संस्थळावर लिहिला होता. ते संस्थळ आता चालू नाही. अलीकडे ह्याच विषयाच्या मनोरंजक आठवणी प्रबोधनकार ठाकरेलिखित prabodhanakar.org येथे माझ्या वाचनात आल्या. त्या वाचल्यामुळे मला माझ्या जुन्या लेखाची आठवण झाली. वाचकांस मनोरंजक वाटतील अशा समजुतीने माझा लेख आणि प्रबोधनकारांच्या आठवणी येथे एकत्र देत आहे.
मुंबई ते ठाणे आगगाडी - १८५३ मधली.
आंतरजालावर भ्रमण करीत असतांना आणि गूगलमध्ये ’मराठी’ असा शोध घेत असतांना ’A Short Account of the Railways’ अशा नावाचे एका पुस्तकाचे नाव समोर आले. ह्या शोधामध्ये हे इंग्रजी पुस्तक कोठून शिरले अशा कुतूहलाने पुस्तक प्रत्यक्ष उघडले आणि असे आढळून आले की हे पुस्तक वस्तुत: मराठीत आहे. लॉर्डनर नावाच्या साहेबाच्या Railway Economy नामक पुस्तकातील काही मजकूराचे भाषांतर करून पुस्तक तयार करण्यात आले आहे. भाषान्तरकार कृष्णशास्त्री भाटवडेकर आणि मुद्रक गणपत कृष्णाजी असून Deccan Vernacular Society च्या विद्यमाने ते प्रकाशित करण्यात आले आहे. पुस्तकाचे प्रसिद्धिवर्ष १८५४ असे छापले आहे. (जिज्ञासूंना गूगल बुक्समधील हे पुस्तक http://tinyurl.com/3r6r3ja येथे पाहाता येईल.)
हे सर्वज्ञात आहे की भारतातील पहिली प्रवासी आगगाडी १६ एप्रिल १८५३ साली मुंबई ते ठाणे आणि परत अशी धावली. त्या प्रसंगानंतर एका वर्षाच्या आतबाहेरच हे पुस्तक छापण्यात आले. कोठल्याच बैल-घोडयासारख्या जनावराकडून न ओढताच धावू शकणारे हे अजब यंत्र हा एतद्देशीय नेटिवांना चमत्कारासारखाच वाटत होता. ती आगगाडी कशी धावते आणि तिच्या मागची व्यवस्था कशी आहे हे सोप्या भाषेत त्यांना समजावून सांगण्यासाठी ह्या पुस्तकाची निर्मिति झाली आहे
आगगाडीचे एंजिन कसे काम करते येथपासून गाडीचे तिकीट कसे काढावे आणि गाडीतून सामान कसे घेऊन जावे हे बाळबोध पद्धतीने समजावून सांगितलेले वाचण्यास आज मोठी मौज येते पण त्या काळातील साधाभोळया प्रवाशांना सगळेच नवीन असणार! ह्या वर्णनापैकी पुष्कळसे वर्णन नुकत्याच सुरू झालेल्या हिंदुस्तानी गाडयांना लागू दिसत नाही. ते इंग्लंड अथवा युरोपातील गाडयांबद्दल मुख्यत्वेकरून असावे असे दिसते. ह्या बाळबोध वर्णनामध्ये एकदोन मजेदार तपशील मिळतात. सर्व ठिकाणी ’गाडीची रांग’ असा शब्द train अशा अर्थाने वापरला आहे. गाडयांना ब्रेक लावून थांबवण्याची पद्धत नव्हती, त्याऐवजी गाडी स्टेशनात पोहोचण्याच्या अलीकडेच एंजिन आणि डबे ह्यामधील जोड काढून टाकून एंजिन वेगाने पुढे जाई आणि किल्लीवाला विशिष्ट स्थानी ते एंजिन पोहोचताच रूळ बदलून एंजिनाला शेडकडे पाठवी आणि लगेच किल्लीने रूळ पहिल्यासारखे करून त्यांवरून उरलेले डबे हळू वेगाने घरंगळत स्टेशनाकडे जात असे वर्णन आहे. शेडमध्ये एंजिनाच्या तोंडाची दिशा बदलण्यासाठी एका फिरत्या गोल प्लॅटफॉर्मवर एंजिनास आणून तो प्लॅटफॉर्म पुरेसा फिरवण्याची पद्धत होती. (अशी सोय मी फार वर्षांपूर्वी जुन्या MSM - Madras and Southern Maratha Railway च्या एका छोटया स्टेशनात पाहिल्याचे आठवते.) असे कित्येक मनोरंजक तपशील पुस्तक चाळल्यास वाचायला मिळतील.
पुस्तकाच्या शेवटाशेवटाला १६ एप्रिल १८५३ च्या पहिल्या प्रवासी गाडीच्या बोरीबंदर-ठाणे फेरीचे वर्णन आहे. ते मुळातून वाचण्यासारखे आहे. (ह्या वर्णनाच्या शीर्षकात वर्ष १८५४ असे पडले आहे ती मुद्राराक्षसाची चूक आणि निष्काळजी प्रूफ़रीडिंग आहे असे दिसते.)
पुस्तकात काही मनोरंजक चित्रे आहेत तीहि खाली देत आहे. प्रथम दोन पूल आहेत. पैकी पहिला कोणता असावा ह्याबाबत कोणी काही तर्क करू शकेल काय़? वर उल्लेखिलेल्या पहिल्या पहिल्या प्रवासाच्या वर्णनात माहीम आणि शीवच्या पुलाचा एक ओझरता उल्लेख आहे तोच हा असेल काय? तसे असेल तर शीवनंतरच्या खाडीवर तो असेल काय? अशी एक खाडी होती असे मी वृद्ध लोकांकडून ऐकल्याचे स्मरते. दुसरा पूल ठाण्यापलीकडचा खाडीवरील पूल दिसतो. मे १८५४ मध्ये गाडी कल्याणपर्यंत जाऊ लागली कारण खाडीवरचा २२ कमानींचा पूल बांधून तोपर्यंत पूर्ण झाला होता. पूल अद्याप उभा आहे पण लवकरच पाडला जाईल असे दिसते. (http://tinyurl.com/6z65yl6). ह्या पुलाचे सर्वत्र पाहायला मिळणारे चित्रच खाली देत आहे. हे चित्र पुस्तकातील नाही. सर्व ठिकाणी ह्या पुलाचे नाव Dapoorie Viaduct असे आढळते. हे नाव असे का असावे ह्याबाबत कोणी काही तर्क करू शकेल काय?
त्यामध्ये तिसरे चित्र एका छोटया बोगद्याचे चित्र आहे. ठाणे-कल्याणमधील लोकलच्या रुळांवरचा एखादा बोगदा तो असावा काय? कारण ठाण्यापर्यंतच्या प्रवासात बोगदा कोठेच असायचे कारण नाही.
त्या नंतरची बोरीबंदर आणि भायखळा स्टेशनांची चित्रे मजेदार आहेत. आजच्या तेथील स्टेशनांशी त्यांचे काही नातेगोते असेल असे वाटत नाही.
अखेरीस १८५३ मधल्या एंजिनाची दोन चित्रे आहेत. तेथेच तुलनेसाठी अलीकडच्या काळातील महाकाय वाफेच्या एंजिनाची दोन चित्रे जोडली आहेत.
पुस्तकाच्या अखेरीस एप्रिल १८५३ ते मे १८५४ ह्या काळातील महिनेवार उतारू संख्या आणि तिकिटाचे उत्त्पन्न असा तक्ता दिला आहे. त्यावरून असा तर्क निघतो एका प्रवासाचे दरमाणशी तिकीट ४ ते ६ आणे असावे आणि प्रत्येक दिवशी सरासरीने १००० मुंबई ते ठाणे हे प्रवास होत असावेत म्हणजेच ५०० प्रवाशांची रोज वाहतूक होत असावी.
फ्रबोधनकारांच्या आठवणी.
मुंबई प्रांतात रेलवे असावी असा ठराव मुंबईला प्रथम सर जमशेटजी जिजिभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेठ यानी केला. मूळजी जेठा, मोरारजी गोकूळदास, आदमजी पीरभाई. डेविड ससून वगैरे अनेक नामांकित नगरशेटजींचे अर्थातच त्यांना पाठबळ होते. सन 1853 त ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला. लोखंडी रुळावरून विंग्रज आगीन गाडी चालवणार, ही कल्पनाच लोकांना मोठी आचंब्याची वाटली. अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला. दिनांक 18 एप्रिल सन 1853 सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता आगगाडी मुंबईहून निघाली. पाना- फुलांचे हार, तोरणे, निशाणे लाऊन 10 मोठे खोलीवजा डबे शृंगारलेले. इंजिनावर आंग्रेजांचे मोठे निशाण फडकत आहे. डब्यांत गादीच्या खुर्च्या. कोच. त्यांवर रेलवेचे डायेरेक्टर, सर जमशेटजी जिजिभाई, नाना शंकरशेट आणि अनेक इतर नगरशेट जामानिमा करून बसलेले. बरोबर 5 वाजता आगगाडीने कूऽक शिटीचा कर्णा फुंकून आपल्या भकभक फकफक प्रवासला सुरुवात केली. मुंबई ते ठाणे दुतर्फा लाखावर लोक कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार पहायला आ वासून उभे होते, ना बैल, ना रेडा, ना घोडा आणि वाफेच्या जोरावर एक नाही दोन नाही नाही दहा डब्यांची माळका खुशाल चालली आहे झुकझुक करीत लोखंडी रुळांवरून! कमाल आहे बुवा या विंग्रेजांची! आधीच, आंग्रेज लोक म्हणजे सीता रामाच्या वरदानाने हिंदुस्थानावर राज्य करायला आलेली लाल तोंडाची वानरे. त्यांच्यापुढे कोणाचे काही चालायचे नाही, अशा थापा क्रिस्ती मिशनऱ्यानी चोहीकडे लोकांत फैलवलेल्या. आता तर काय? विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून विंग्रेजानी वाफेलाच गाडी ओढायला लावले! छे छे, विंग्रेज लोक खरोखरच देवावतार! बिचारा बहुजन समाज तर आश्चर्याने थक्कच झाला. चला, चला ममईला चला. मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली.
पण त्या वाफेच्या भुताटकीच्या गाडीत बसायचा लोकांना धीरच होईना. दुसऱ्या दिवसापासून लोकाना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या आणण्याची दौंडी पिटण्यात आली. रेलवेच्या काराभाऱ्यानी खूप आटापीट केली. पण लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते! वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती भुताटकी आहे. मुंबईला नव्या इमारती नि पूल बांधताहेत, त्यांच्या पायांत जिवंत गाडायला फूस लाऊन माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे. असल्या अफवांपुढे शहाणे प्रचारक काय करणार? एक दोन दिवस सरकारी कचेरीतले पांढरपेशी कारकुन, व्यापाऱ्यांना पेढीवरचे गुमास्ते याना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आणलेले लोकांना दाखवले. त्यानी आपले अनुभवहि सांगितले. तेवढयाानेहि कोणाचे समाधान होई ना. अखेर दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला. पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे घाटीलोक आगगाडीने जाऊ लागले का त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठाणठाण धाय मोकलयची. त्यांची समजूत पाडता पाडता रेलवेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे. एकदा का प्रवासी ठाणे मुंबईची सफर करून सुखरूप परत आले म्हणजे मग मात्र चौकशी करणारांचे घोळकेच्या घोळके त्यांच्याभोवती जमायचे. रुपयांचे इनाम पुढे आठ आण्यावर आले. नंतर चार आणे झाले. लोकांचा धीर चेपलासे पाहून इनामे बंद झाली नि सर्रास तिकिटे चालू केली.
एरवीचा ठाणे-मुंबईचा बैलांच्या खटारागाडीचा प्रवास म्हणजे तब्बल एक दिवस खायचा. पण आता काय, अवघ्या सव्वापांच आण्यात आणि अवघ्या सव्वातासात ठाण्याचा असामी मुंबईला येऊ लागला. मग मात्र लोकांची झुंबड लागली. सुरूवातीला सकाळ दुपार नि संध्याकाळ अशा तीनच गाडयाा मुंबईहून सुटायच्या नि परत यायच्या. मुंबईहून भायखळा, दादर, कुरला, भांडुप आणि ठाणे अशी पांचच 'टेसने' होती. (ही आठवण माझ्या आजीने मला सांगितली. त्यावेळी आमचे 'धोडपकर' कुटुंब ठाणे येथे राहत असे.)
आठरा तासांत मुंबईहून पुणे. ठाण्याचा फाटा एकदम कल्याणला नेऊन, तेथून पुढे तो खोपवलीला पुरा करण्याचे काम सन 1856 ला पुरे झाले. कल्याण ते खोपवलीच्या दरम्यान बदलापूर आणि नेरळ ही दोनच स्टशने. मऱ्हाठशाहीत बैलगाडीचा रस्ता जसा खोपवलीहून चढत चढत खंडाळयााला घाटमाथ्यावर गेला, त्याच मार्गाने रेलवेचा फाटा वर चढवण्याची पहिली योजना होती. पण पहाणी केल्यावर इंजनेरानी ती अशक्य ठरवली. इकडे इंजनेर लोक कर्जत पळसधरीपासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवीत असतानाच, खंडाळयााहून पुण्यापर्यंन्तचा सपाटीचा रेलवे रस्ता सन 1858 च्या फेब्रूवारीत पुरा झाला. त्याचाहि मोठयाा थाटामाटाने 'ओपनिंग शिरोमणि' करण्यात आला. खंडाळा पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगांव अशी दोनच स्टेशने ठेवण्यात आली. रस्ता एकेरीच होता.
बोरघाटाचे काम चालले असतानाच मुंबई पुण्याचा रेलवे प्रवास ज्यारीने चालू झाला. कसा ती मौज अैका आता, पुण्याची गाडी खंडाळयााला आली का सगळयाा पासिंजराना तेथून पालख्या, डोल्या, खुर्च्या नि बैलगाडयात बसऊन घाटाखाली खोपवलीला आणायचे. ठाकूर कातकरांच्या डोक्यांवर त्यांच्या सामानांची ओझी द्यायची.सगळा काफिल्ला खोपवलीला रवाना व्हायचे. प्रवाशांची ही घाट-उतरणीची सुखसोयी नि सरबराई पहाण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नांवाच्या एका पारशी व्यापाऱ्याने घेतलेले होते. घाटउतरणीचे चार तास धरून, पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या अठरा तासांत व्हायचा, याचेच ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे. 'पुढे जाता येत नाही? मागे जा' पालखी डोल्यांच्या मध्यस्थीचा पुणे मुंबई रेलवे प्रवास चालू असतानाच, कर्जत पळसधरी वरून बोरघाट खोदण्याचे काम होत होते. मुख्य इंजनेर मि. कुक नावाचा गोरा असामी होता. घाटमाथ्यावर रेलवे आल्यावर सध्या ती जशी 25 नंबरच्या छोटया बागद्यातून सरळ पुढे 26. 27 नि 28 बोगद्यातून थेट खंडाळयाला जाते, तशीच मूळ योजना होती. पण 25 आणि 26 नंबरच्या बोगद्यांच्या दरम्यान मधोमध दोन अडीच फर्लांग लांबीची एक भयंकर खोल दरी होती. दरीची खोली भयकंर, तेथले जंगल घनदाट भयंकर आणि वसतीला राहिलेले आस्वल लांडगे वाघदि प्राणीही भयंकर! (ही दरी पाहिलेले माझ्यासारखे हजारो लोक आज हयात आहेत.) या दरीच्या तोंडाशी रेलवे आंखणी आल्यावर मोठी पंचाईत झाली. दरी ओलांडून पुढे तीन बोगदे पाडल्या शिवाय खंडाळा गाठता येत नाही आणि दरी ओलांडता येत नाही! शिवाय रेलवे कंपनीजवळ आणखी तीन बोगद्यांचा खर्चहि सोसण्याची ताकद नाही. फार फार तर एकदा बोगदा पाडा नि कसेहि करून खंडाळा गाठा, अशी निकड लागली. बिचारा कुक इंजनेर कपाळाला हात लाऊन बसला. त्यांची प्रकृति बिघडत चालली. त्याचे अन्नहि तुटले. सबंध घाट आंखताना नि फोडताना त्याने शेकडो बिकट अडचणींची त्रांगडी सफाईत सोडवली. पण या दरीपुढे त्याने हात टेकले!' अलिकडे तुम्ही असे खंगत का चालला आहा? काय होत आहे तुम्हाला? वगैरे पुष्कळ खोदखोदून त्याला त्याच्या बायकोने विचारले. अखेर एक दिवस तो वैतागून म्हणला,-'त्यात तुम्हा बायकाना काय कळणार? आमच्या अडचणी आम्हाला माहीत.'' पण अडचण काय ती तर मला सांगा, 'ती म्हणाली. कुक मोठयााने ओरडून म्हणाला. ''मला पुढे जाता येत नाही'' ती सहज हासून सहज म्हणाली.- ''हात्तोच्या! एवढेच ना? पुढे जाता येत नसेल तर मागे जा.'' हा विनोद झाला खरा. पण कुक त्यावर गंभीरपणाने विचार करू लागला. त्याने सगळे प्लॅन आपल्यापुढे पसरले आणि एकदम उसळी मारून तो ओरडला,'' होय, बरोबर कोडे सुटले. पुढे जाता येत नाही. म्हणून ती आता मागेच जाणार.'' त्याने रेलवे अधिकाऱ्याना नवी आखणी दाखवली. ''हे पहा, दरी पडू द्या आहे तेथेच, उलट दिशेने फाटा मागे नेऊन, तुमच्या सुचनेप्रमाणे एका बोगद्याने मी खंडाळयााला जातो. पण एका अटीवर. दहापेक्षा अधिक डबे तुम्हाला घाटावर पाठवता येणार नाहीत. कबूल असल्यास हा माझा रिव्हरसिंगचा ( तोंडपरतावणीचा) नवा नकाशा.''
रिव्हसिंगचा मनोरम देखावा. इंजनेर कुकने बोरघाटात आणि पुढे थाळघाटातहि ही रिव्हरसिंगची कल्पना लढवून एक मोठा चमत्कार केल होता. दरीच्या तोंडाशी त्याने एक मोठा दगडी पूल बांधला. खालून किंवा वरून गाडी आली, का ती या पुलावर थांबायची. तिचे पुढचे इंजीन सोडून ते आगगाडीच्या मागल्या डब्याला जोडायचे. मागल्या बाजूला प्रचंड दगडी तट बांधून तेथून खंडाळयााच्या दिशेने आगगाडी उलट तोंडाने जाण्याचा रस्ता बांधला होता. वाटेत फक्त एकच मोठा बोगदा असे. त्यातून गाडी बाहेर पडली का एकदम खंडाळा स्टेशनात. पुण्याकडे तोंडे करून मुंबईहून निघालेल्या प्रवाशांना आपण उलट चाललो का काय, असे वाटायचे. रिव्हसिंग हे एक स्टेशन होते. तेथे सगळे प्रवाशी खाले उतरायचे. दरीचा देखावा. मावळतीला दूरवर दिसणारा समुद्राचा भाग आणि खाली दिसणारा खोपवली गांवचा पंचक्रोशीचा सुंदर निसर्गाचा नकाशा पाहिला म्हणजे प्रवासाचे सारे श्रम हरवून जायचे. ठाकूर कातकरी तेथे जंगली गोड फळे विकायला आणायचे. नव्या योजनेने सध्याची वीजगाडी हवे तेवढे लांबलचक डब्यांचे लचांड घेऊन सरळ धावा घेत खंडाळा गाठीत असली, तरी ते जुने रिव्हरसिंगच्या पुलावरचे रम्य निसर्गदर्शन आणि गाडीची तोंड परतावणीची कसरत कधीही न विसरता येण्याइअितकी आकर्षक होती खास! खंडाळा घाटात सहल करायला जाणारानी आजही तो कुक इंजनेरचा दगडी पूल आणि तेथून सरळ मागे परतवण्यासाठी बांधलेल्या प्रचंड उंचीचा दगडी तट पहाण्यासाठी आहे. मात्र पुढच्या बोगद्यांत प्रवेश करण्याच्या भागडीत कोणी पडू नये. कारण तो आता वहिवाटीत नसल्यामूळे तेथे अनेक क्रूर श्वापदानी आपली राजधानी स्थापन केलेली आहे.(रिव्हरसिंगच्या मार्गाने मी खूप वेळा प्रवास केलेला आहे.)
खंडाळयााहून खाली रिव्हरसिंगच्या पुलावर येताना मोठा घसरणीचा उतार लागत असे, अर्थातच वाटेतल्या मोठयाा बोगद्याच्या तोंडाशी गाडीला भक्कम ब्रेक लाऊन उभी राहिल, शिटी वाजवून तुला सलाम करील, असा नवस केल्यावर बोगद्याचे काम सुरळीत झाले इतकेच काय पण रेलवेच्या कामगारानी बोगद्याच्या तोंडावर एका जागी शेन्दूर फासून तेथे देवीहि निर्माण केली होती. गाडी सलामीला उभी राहिली का लोक 'पुंडलीक वरदा हारी विठ्ठल' चा गोंगाट करायचे.
खोल दरीवरचा हादरता पूल. सुरूवातीला 12 आणि 13 नंबरच्या बोगद्याच्या दरम्यान एक बरीच खोल दरी होती. तिच्यावर लोखंडी कमानीचा एकखांबी पूल बांधलेला होता. या पूलावरून गाडी अतिशय सावकाश न्यावी लागे. पुलावर गाडी चढली का तो विलक्षण हादरायचा. गोगलगाईच्या गतीने गाडी चालायची. पुलावर दोनी बाजूला पाच पाच फुटांच्या अंतराने पाण्याने भरलेली मोठमोठी पिंपे ठेवलेली असत. पुलाची हादरणी पिंपांतल्या पाण्याच्या हादरणीने अंदाजायला दोनी बाजूनी रेलवेचे पोर्टर नि अधिकारी हातात बावटे फडकवीत फूटबोर्डावर उभे असायचे.''आस्ते और आस्ते.'' असा त्यांचा ओरडा चालू असायचा. इकडे पूल तडाखेबंद हादरतो आहे, पिंपातले पाणी डचमळते आहे, खाली खोल दरीचा देखावा लोक पहाताहेत आणि 'पुंडलीक वरदा हारी विठ्ठल'चा जयघोष करीत आहेत. अशा या हादरत्या पुलावरची त्यावेळी मौज असे. आता ती दरी बरीच बुजली असून, पूलहि चांगला दगडी झालेला आहे.
पूर्वी तीन बावटे असत. पूर्वी पांढरा, हिरवा आणि तांबडा असे तीन बावटे असत. खांबावरची सिग्नलची फळीहि तीन प्रकारानी पडत असे. लाल बावटा म्हणजे 'एकदम सबूर' हिरवा म्हणजे' जा, पण जरा सावकाशीने जा.'पांढरा म्हणजे 'बेछूट जा. सब कुछ ठीक है. 'सिग्नलची ताठ फळी म्हणजे लाल बावटा. सध्या पडते तशी पडली म्हणजे हिरवा बावटा-'सावकाशीने जा. आणि खांबाबरोबर सपशेल लोबती पडली का पांढरा बावटा-' 'बेछूट जाना' पुढे पांढरा बावटा आणि सिग्नलफळीचे सपशेल पडणे बंद केले आणि हिरवा तांबडा या दोनच खुणा कायम राहिल्या.
खडक खोदणीतून वनस्पतीशास्त्र. हल्लीच्या सुधारलेल्या यंत्रयुगातल्या मंडळीना बोरघाटाच्या, खोदणीचे कार्य केवढे भयंकर कष्टाचे आणि प्राणहत्येचे झाले असेल, याची कल्पनाहि होणार नाही. सगळे पथ्थर पोखरणीचे काम नुसत्या साध्या पहारीने मजुरानी केलेले आहे. लाखावर मजूर सारखे खपत असत. दररोज शेकडो अपघात व्हायचे. कोणाचे हात तुटायचे तर कोणाचे डोके फुटायचे. जखमी लोकांची तर गणतीच नाही. आत्तााच्यासारखी 'फर्स्ट एड'ची साधने किंवा डॉक्टरांच्या पलटणी थोडयााच होत्या? दहा बारा डॉक्टर असायचे जेमतेम. पण मजूर बेटे मोठे डोकेबाज. जरा कोठे कोणाला काही जखम झाली, हात मोडला, पाय दुखावला, कोणी कोसळून पडला, का झटकन कोणीतरी आजूबाजूचा काही झाडपाला आणून उपचार करीत आणि तो रोगीहि थोडयााच दिवसात ठाकठिक होऊन कामावर रूजू व्हायचा. कंपनीच्या गोऱ्या डॉक्टराना या उपचाराचे नवल वाटायचे. इंजनेर कुकचेहि त्या विलक्षण वनस्पतीकडे लक्ष्य वेधले. एरवी कोठल्याही विलयती उपचाराने बऱ्या न होणाऱ्या जखमा नि निखळलेली किंवा पिचलेली हाडे वनस्पतींच्या लेपाने फटाफट बरी होतात कशी? काय चमत्कार आहे या वनस्पतींत असा? इंजनेर कुकाने वनस्पति संशोधन चालवले. त्याला धोंडी महार नावाचा एक मजूर मदतीला मिळाला. त्याने बोरघाटातल्या सगळयाा वनस्पतींची माहिती दिली. कुकने प्रत्येक वनस्पतिशास्त्रावर पायाशुध्द माहितीचा एक मोठा इंग्रजी ग्रंथ लिहिला. ''कुक्स फ्लोरा' * म्हणून बॉटनीवरचा त्याचा ग्रंथ आजहि आधारभूत म्हणून मानला जातो. तो त्याने धोंडी महाराला अर्पण केलेला आहे. एका इंजनराने वनस्पतीशास्त्रवर जेवढा मोठा ग्रंथ परिश्रमाने लिहावा, याचे नुसते कौतुक करण्यापेक्षा, आजच्या स्वातंत्र्ययुगात आमच्या भारतीय आणि मऱ्हाटी तरुणाना कुकच्या उद्योगापासून पुष्कळ चैतन्य मिळवता येण्यासारखे आहे.
बोरघाटाने दरिद्रयाना श्रीमंत केले. पेशवाईच्या अखेरीला लोकांची जी धावपळ उडाली, तेव्हा शेकडो लोकांनी आपापली मालमत्तेची डबोली बोरघाटाच्या निर्जन दऱ्याखोऱ्यात जागोजाग गाडून ठेवली. 'स्थिरस्थावर झाल्यावर नेऊ काढून' असा प्रत्येकाचा विश्वास! बोरघाटचे खणणी खोदणीचे राक्षसी काम चालू झाल्यावर, कुदळ पडे तेथे हंडे, पेटया नि पैसा दागिन्याची भरलेली गोणती भसाभसा बाहेर पडू लागली. ज्याला लग्गा लागला तो लांबवीत सुटला, हजारो मजूर, मिस्त्री नि छोटे इंजनेर सगळयांचे पांग बोरघाटाने फेडले.
(* प्रयत्न करूनहि जालावर मला हे पुस्तक मिळाले नाही. The flora of the presidency of Bombay अशा नावाचे Theogor Cooke लिखित एक पुस्तक archive.org येथे उपलब्ध आहे पण ते पुस्तक घाटवाल्या कुकसाहेबाचे नाही.
उपलब्ध पुस्तक https://archive.org/details/floraofpresidenc01cook/page/n11/mode/2up येथे पहा.)
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
+१
+१
चित्रतील पूल ठाणे खाडीवरील नसावाच. ठाणे खाडीवरील पूल सलग नाही. पुलाचा मधला काही भाग हा ओपन लोखंडी आहे. त्या भागात गाडी जाताना मोठा धडधड आवाज होतो.
आणि फोटो कोणत्याही बाजूने घेतला असला तरी पारसिकचा डोंगर किंवा मामा भाच्याचा डोंगर (आता त्याला येऊरचा डोंगर म्हणतात) चित्रात दिसायला हवा.
लेख आवडला.
लेख आवडला.
'लोखंडी रस्त्यावरचे रथ' असे आणखी एक पुस्तक आहे १८५४ मधलं.
आणखी एक पुस्तक
Engines of Change: The Railroads That Made India (Moving through History: Transportation and Society)
Ian J. Kerr
Download link
https://b-ok.asia/book/986172/1e0726
-----------
एंजीन जागच्याजागी १८०0 फिरवण्याचे हाइड्रोलीक रोटर अजूनही वाडीबंदर साइडिंगला ( सँढर्सट रोड येथे) नशिबाने दिसते. खूप गाड्या पार्क असतात.
दरीपाशी
दरीमुळे पुढे जाऊ शकत नाही तर मागे जाऊन किंवा रिव्हर्सींग......
खंडाळ्याकडून आल्यास दरीच्या अलिकडे वरतून खाली खोपोली दिसते तिथे एक साइडिंग डायवर्शन वर चढत जाणारे अजूनही आहे. म्हणजे उताराकडे जाणारी गाडी तिथे चढणीमुळे थांबत असेल. तिथे लोक पायउतार होऊन चालत दरीच्या दुसऱ्या टोकाला जात असतील. तिथे कर्जत कडून आलेली गाडी थांबून परत जात असेल. दोन्ही गाड्या रिवर्स जाण्यासाठी एंजिन पुढून मागे नेत असतील.
अप्रतिम लेख आणि माहिती!
गविंप्रमाणेच मलाही रिव्हर्सिंग ची कल्पना डोळ्यांसमोर आणता आली नाही.
मुंबईच्या पश्चिम रेल्वेवर लोअर परळच्या जवळ एक फाटा रेल्वेच्या दुरुस्ती भागात जातो, तिथे लोकलमधून जाताना, इंजिन पूर्णपणे गोल फिरवण्याची व्यवस्था दिसायची. मी अनेक वेळा पाहिली आहे. आता आहे की नाही, त्याची खात्री नाही.
रिव्हर्सींगचा मुख्य उपयोग अति
रिव्हर्सींगचा मुख्य उपयोग अति तीव्र चढ (ग्रेडियंट) टाळणे आणि कमी जागेत तीव्र वळण / दिशा बदल करु शकण्यासाठी ट्रेनबाबत करतात. खोल दरी टाळून तरीही पार जाण्यासाठी अथवा पुलाला पर्याय म्हणून नव्हे.
अर्थात इथे तसं नसावं. नेमकी काय स्थिती(प्रोब्लेम स्टेटमेंट) होती ते स्पष्ट झालेलं नाही इतकंच.
आत्ता जे २६ नं. वगैरे नवीन
आत्ता जे २६ नं. वगैरे नवीन बोगदे आहेत ते खणण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान त्या काळी उपलब्ध नव्हतं. प्रबोधनकारांनी म्हटलं आहेच की हे बोगदे हाती खणले आहेत.
जुन्या आणि नवीन अलाईनमेंट मधला फरक इथे पहा
या नकाशात टोपोग्राफी नीट समजत नाहीये, पण जुनी अलाईनमेंट सोप्या टोपोग्राफीला धरून, डोंगराच्या पल्याडच्या बाजूने आखलेली होती असे दिसते. उदा. चित्रात दाखवलेला टनेल ३ जुन्या अलाईनमेंटला जिथे छेदतो तिथे अवघड चढण सुरु होते. नवीन अलाईनमेंट अल्याडच्या बाजूने आहे. सध्या जिथे एक्स्प्रेसवे, जुना घाट आणि रेल्वे एकत्र येतात तो पॉईंट रिव्हर्सिंग स्टेशनच्या उताराला लागून आहे. आता हा उतार रिव्हर्सिंग स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावरचा आहे की त्याच्या कॅच सायडिंगचा आहे ते ठाऊन नै. जरा शोधायला हवे, पण असं म्हणतात की एक्स्प्रेसवे बराचसा जुन्या अलाईनमेंटच्या मार्गाने जातो.
मी म्हटलं ती जागा -
मी म्हटलं ती जागा - एक्स्प्रेसवे, जुना घाट आणि रेल्वे एकत्र येतात त्या जागेचा नकाशा
आणि हा रिव्हर्सिंग स्टेशनचा जुना फोटो
मूळ सायटीवरील फोटोचे कॅप्शन - "A 1024X768 scan of the Bhore ghat reversing station from the book \"Indian Railways - One Hundred Years 1853-1953\" Published by the Ministry of Railways 1953."
दोन्ही फोटो आणि वरचा नकाशा सौजन्य: इंडियन रेल्वे फॅन क्लब असोसिएशन यांचे संकेत स्थळ
National Rail Museum
दिल्लीमध्ये चाणक्यपुरीमध्ये National Rail Museum आहे. तेथे Reversing Station ची त्रिमिति प्रतिकृति आहे. ती पाहिल्यास Reversing Station चा कसा उपयोग होत असे हे कळते.
तसेच The Railway Engineer ह्या जुन्या नियतकालिकाच्या ह्या अंकात पान १४७ च्या पुढेमागे भोर घाटातील Reversing Station बाबत काही तान्त्रिक माहिती आहे. ती वाचून माहितगार मंडळींन अधिक बोध होऊ शकेल असे वाटते.
दौंड जंक्शन/पुणे जंक्शन (शंका)
दौंड जंक्शनला पुण्याहून एक रेल्वेमार्ग येतो, आणि पुढे दक्षिणेस कुर्डूवाडीकडे एक रेल्वेमार्ग जातो, तर आणखी एक रेल्वेमार्ग शार्प उत्तरेकडे मनमाडच्या दिशेने जातो. (तिन्ही ब्रॉडगेज - किंवा 'इंडियन गेज' - मार्ग आहेत.)
आता, कुर्डूवाडीच्या (म्हणजेच पुढे सिकंदराबाद किंवा मद्रासच्या) बाजूने येऊन मनमाडकडे जाणाऱ्या गाड्यांचे ठीक आहे. कुर्डूवाडी(/सिकंदराबाद/मद्रास)हून पुणेमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचेही ठीकच आहे. मात्र, पुण्याहून येऊन दौंड-मनमाडमार्गे भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या ज्या काही थोड्याफार गाड्या आहेत (उदा., दिल्ली/जम्मूकडे जाणारी झेलम एक्सप्रेस किंवा नागपूरकडे जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस), त्यांचे दौंड जंक्शनमध्ये रिव्हर्सिंग होत असावे काय?
अन्यथा पुण्याहून दौंडकडे दक्षिणेस जात असलेल्या गाडीचे शार्प हेअरपिन बेंड घेऊन उत्तरेस मनमाडकडे जाणे अंमळ कठीण वाटते. (शिवाय, असल्या हेअरपिन बेंडकरिता स्टेशनामध्ये किंवा स्टेशनाच्या जवळपास किती जागा वाया घालवावी लागेल, याचा विचार करवत नाही.)
तसेच, कोल्हापूरहून निघून उत्तरेस पुण्याकडे मिरजफाट्यामार्गे जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस. पुण्याहून पुढे दक्षिणेस दौंडफाट्यामार्गे नागपुरास जाण्याकरिता पुणे जंक्शनमध्ये रिव्हर्सिंग करावे लागत असावे काय?
(पाहा बरे खालील मानचित्र बरोबर जमले की नाही ते.)
हो रिव्हर्सिंग होते
देशभर अशी अनेक स्टेशने आहेत जेथे गाडी थांबल्यावर पुढचे इंजिन मागे लावून गाडी पुढे दुसऱ्या दिशेने जाते. झेलम नक्कीच करत असेल. हजरत-निजामुद्दिन गोवा एक्स्प्रेस ने दौंडला हे मी स्वत: अनुभवलेले आठवते. आम्ही पुण्याला उतरलो तेव्हा पण त्याकाळात ती गाडी मिरजमार्गे जात असल्याने पुण्यातही तसेच केले असेल. एकदा वाराणसीला गेलो होतो तेव्हाही उत्तर प्रदेशात कोठल्यातरी स्टेशनवर महानगरी एक्सप्रेसने तसे केल्याचे आठवते.
रिव्हर्सिंग न करता असे केल्याचे एकच उदाहरण मी पाहिले आहे - ते म्हणजे डोंबिवली च्या किंचित पुढे (मुंबईच्या बाजूला) आता नवीन कोपर स्टेशन झाले आहे तेथून एक मार्ग पूर्ण वळसा घालून कोपरस्टेशनच्याच वरून वसईकडे जातो. पुण्याहून तिकडे येणाऱ्या व पुढे पश्चिम रेल्वेच्या मार्गाने जाणाऱ्या अहिंसा एक्सप्रेस सारख्या गाड्या तो वळसा घालतात.
धन्यवाद!
वाटलेच मला.
रिव्हर्सिंग न करता असे केल्याचे एकच उदाहरण मी पाहिले आहे - ते म्हणजे डोंबिवली च्या किंचित पुढे (मुंबईच्या बाजूला) आता नवीन कोपर स्टेशन झाले आहे तेथून एक मार्ग पूर्ण वळसा घालून कोपरस्टेशनच्याच वरून वसईकडे जातो.
पण त्या वळश्याने त्या मानाने बरीच जागा व्यापली असणार.
अर्थात, एखाद्या थ्रू एक्सप्रेस गाडीने दिवा किंवा आता कोपर अशा बारक्या स्टेशनात केवळ रिव्हर्सिंगसाठी थांबण्यात वेळ घालविण्यापेक्षा निश्चित बरे. (ॲम आय करेक्ट?)
लांब कशाला?
पुण्यात सुद्धा होते की.....
महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी गोंदियाहून भुसावळ मार्गे मनमाडला येते आणि तेथून दौंडला येते. मग तुमच्या चित्रातल्याप्रमाणे रिव्हर्सिंग होऊन पुण्यास येते आणि तेथून पुन्हा रिव्हर्सिंग होऊन कोल्हापूर कडे जाते.
मात्र ष्टीम इंजिनला तांत्रिक कारणामुळे उलट दिशेस जाता येत नसे म्हणून टर्नटेबलच्या सहाय्याने त्याचे तोंड फिरवावे लागे. ते विजेच्या किंवा डीझेल इंजिनाला लागत नाही. ष्टीम लोकोमधील ष्टीम इंजिन(म्हणजे पिष्टन, सिलिंडर आणि कनेक्टिंग रॉड हा संच) हे थेट चाकांना जोडलेले असते. तसे डीझेल इंजिनात नसते. (पुन्हा तांत्रिक कारणाने डीझेल इंजिनात तशी थेट जोडणी करता येत नाही कारण त्याचा-अंतर्गत ज्वलन इंजिनाचा- चालण्यायोग्य किमान स्पीड बराच जास्त असतो).
धन्यवाद!
महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी गोंदियाहून भुसावळ मार्गे मनमाडला येते आणि तेथून दौंडला येते. मग तुमच्या चित्रातल्याप्रमाणे रिव्हर्सिंग होऊन पुण्यास येते आणि तेथून पुन्हा रिव्हर्सिंग होऊन कोल्हापूर कडे जाते.
नेमके हेच तर म्हणण्याचा प्रयत्न करतो आहे मी मघापासून! (फक्त, उलट्या दिशेने, कोल्हापूरहून नागपूरला जाताना.)
आभार.
शंका
मात्र ष्टीम इंजिनला तांत्रिक कारणामुळे उलट दिशेस जाता येत नसे म्हणून टर्नटेबलच्या सहाय्याने त्याचे तोंड फिरवावे लागे.
उलट दिशेने अजिबातच जाता येत नसे, की अंतराच्या/वेगाच्या/(कदाचित नॅव्हिगेबिलिटीच्या) प्रचंड मर्यादा येत?
अगदी थोड्या अंतराकरिता (जसे, काही-शे फूट, वगैरे) आणि अत्यंत कमी वेगाने उलट्या दिशेने जाणे शक्य नसावे काय? नसल्यास अनेक प्रॅक्टिकल उपशंका उद्भवतात.
हो थोड्या अंतराकरता जाउ शकत होते
अंतराच्या/वेगाच्या मर्यादा होत्या. थोडे अंतर व हळू वेगात जाउ शकत होते. ८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत पुणे स्टेशनवर ही इंजिने होती. तसेच एका मित्राकडे खडकीबजार भागात अनेकदा जायचो. तेथे दारूगोळ्याच्या फॅक्टरीज आहेत तेथून खडकीला मेन लाइनला जोडणारे अनेक ट्रॅक्स आहेत. तेथे मालाचे ने-आण करायला कोळशाची इंजिने असत. मित्राच्या घराजवळ ही इंजिने थोडेफार अंतर पुढे मागे करताना अनेकदा पाहिली आहेत. रेल्वेचे फॅसिनेशन असल्याने हा एकदम आवडता उद्योग होता. तेथील स्थानिक लोक त्या इंजिनातून गरम पाणी वगैरे नेत. कदाचित कोळसाही.
* सीन लक्शात असेल तर कोळशाचे इंजिन त्या शोले मधल्या सुरूवातीच्या सीनमधेही मागे उलटे जाताना दाखवले आहे. डाकू लोक मागे न्यायला लावतात व नंतर धर्मेन्द्र पुन्हा वेगात पुढे नेतो.
बरोबर आहे. दौंड स्टेशनचा
बरोबर आहे. दौंड स्टेशनचा लेआऊट काहीसा असाच आहे. फक्त तुम्ही कुर्डूवाडी/सोलापूर कडे जाणारी जी मेन लाईन दाखवली आहे त्यासोबत एक बारामतीकडे जाणारी ब्रँच लाईनही आहे. मनमाडकडे जाणाऱ्या गाड्यांना इंजिन एका टोकाचे काढून दुसऱ्या टोकाला लावावे लागते.
बोरघाटात पूर्वी २ प्रकारची रिव्हर्सिंग होत असत. एक गाडीच्या दिशेचे आणि दुसरे खुद्द इंजिनाचे, ज्याकरिता घाटातल्या रिव्हर्सिंग स्टेशनच्या शेवटी एक टर्नटेबल बसवलेले होते. यापैकी गाडीच्या दिशेचे रिव्हर्सल अजूनही बऱ्याच ठिकाणी होते उदा. दौंड. इंजिनाचे रिव्हर्सल आता डिझेल-इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रिक इंजिने (आता दौंडही इलेक्ट्रिक रेल्वेमार्गावर आले आहे) आल्यापासून करावे लागत नाही. ही इंजिने फॉरवर्ड आणि रिव्हर्स दोन्ही दिशांना एकसारखीच चालू शकतात (कधी कधी डिझेल-इलेक्ट्रिक इंजिनांत एका दिशेला चालण्याचा कमाल वेग उलट् दिशेपेक्षा ५ ते १० किमी/तासाने कमी असतो, मेकॅनिकल मर्यादांमुळे).
पुणे-दौंड-नागपूर
असे काही असण्याची गरज नसावी. छोट्या चित्रामध्ये हेअरपिन वाटणारे वळण प्रत्यक्ष जागेवर पुरेसे ऐसपैस असू शकते. माझे एक मेव्हणे रेल्वेचे एंजिन ड्रायवर होते आणि त्यांची नेमणूक काही काळासाठी दौंडलाच झाली होती. (त्यांच्याबरोबर पुणे-दौंड असा एक प्रवास मी एंजिनमधून केला होता.) त्यांच्या बोलण्यात कधीच दौंडला रिवर्सिंग असल्याचे मी ऐकलेले नाही. मी स्वत: लहानपणी पुणे - मनमाड दौंडमार्गे असा प्रवास दोनदा केला आहे पण तेव्हाहि दौंडला रिवर्सिंग झाल्याचे आठवत नाही.
चित्रातले स्केल आणि प्रत्यक्ष देखावा ह्यामधील तफावतीचे उत्तम उदाहरण मी कन्याकुमारीमध्ये पाहिलेले आहे. तेथे भारताचे दक्षिण टोक आहे आणि तीन समुद्र (अरबी, बंगालचा उपसागर आणि इंडियन ओशन) एकत्र मिळतात असे नकाशात दिसते आणि त्यामुळे तेथे पाण्याचे तीन रंग दिसतात असे छातीठोकपणे काहीजण सांगताना दिसतात. पण प्रत्यक्ष कन्याकुमारीला नकाशातील टोक कोठेच जाणवत नाही आणि तीन समुद्र एकत्र येतांनाहि जाणवत नाही
...
Trains from Pune going to Ahmednagar stops at Daund railway station and then reverse the direction to proceed to Ahmednagar. The railway engine has to get detached at one end and attached at the other end. This takes minimum 15 minutes at the station and the total time taken is almost half an hour.
रिव्हर्सिंग यालाच म्हणत असावेत काय? (पण पहिल्या बातमीनुसार जाणार म्हणताहेत... कदाचित गेलेही असेल. दौंडालाच फाटा देताहेत म्हटल्यावर...)
कोल्हापूरहून नागपूरला जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस, एकदा पुण्याला नि एकदा दौंडाला, अशी दोनदा दिशा बदलते म्हणताहेत.
नबा, गेल्या वर्षीपासून तुम्ही
नबा, तुम्ही म्हणता तसा दौंडला बायपास करणारा थेट पुणे-मनमाड (दौंड कॉर्ड लाईन) रेल्वेमार्ग गेले वर्षभर चालू झाला आहे. पण सध्या तेथून मुख्यत: मालगाड्या जातात.
रेल्वेप्रवासामध्ये रेल्वेच्या दृष्टीने दोन प्रकारचे थांबे असतात - व्यावसायिक (कमर्शियल) आणि तांत्रिक (टेक्निकल - झोन चेंज अथवा डिझेल-इलेक्ट्रिक/इलेक्ट्रिक-डिझेल अशा कारणांकरता इंजिन बदलणे, बँकर/ब्रेकर इंजिने जोडणे/काढणे, गाडीची दिशा बदलणे, तांत्रिक तपासणी, रेल्वे कर्मचाऱ्यांची ने-आण इ.). पूर्वीपासून दौंडला थांबणाऱ्या जवळपास सर्व जुन्या एक्स्प्रेस गाड्यांना दौंडला व्यावसायिक थांबा आहे. खरं तर त्यांची मूळ गरज तांत्रिक थांबा असण्याची होती, पण कालौघात त्याचे रूपांतर व्यावसायिक थांब्यात झाले असणार. अशा सर्व गाड्या दौंड बायपास करून जातील असे कळताच दौंड भागातील रेल्वे-राजकीय (रेल्वे युनियन्स, तिथल्या स्थानिक इंजिनियरिंग कर्मचाऱ्यांच्या लॉबीज वगैरे) आणि नुसत्याच राजकीय पब्लिकने आरडाओरडा करून तो प्ल्यान हाणून पाडला असे ऐकले. केवळ काही मूठभर, तुलनेने अलीकडे सुरु झालेल्या, एक्सप्रेस गाड्या आहेत ज्यांच्याकरता दौंड हा फक्त तांत्रिक थांबा होता त्या आता दौंड बायपास करून थेट मनमाडकडे वळतात. त्यामुळे कॉर्ड लाईन बांधूनही प्रवासी गाड्यांना त्याचा फारसा फायदा झाला आहे अथवा होईल असे वाटत नाही. कारण रिव्हर्सलला किमान अर्धा-पाऊण तास तरी जातोच.
दौंड घ्यावे का नाही?
>>मी स्वत: लहानपणी पुणे - मनमाड दौंडमार्गे असा प्रवास दोनदा केला आहे पण तेव्हाहि दौंडला रिवर्सिंग झाल्याचे आठवत नाही.>>
पुणे दौंड जाऊन तिथे दुसऱ्या गाडीत बसल्याने रिवर्सिंग झाले नसेल. त्याकाळी रिवर्सिंगपेक्षा गाडी बदलणे हीच योजना असावी. कारण एंजिने वेळच्या वेळी परत आली पाहिजेत किंवा हाताशी अधिक एंजिने हवीत. स्टीम एंजिनांना चालू करायलाही बराच वेळ लागतो.
दौंडचा satellite map पाहिल्यास पुण्याच्या दिशेने कॉर्ड लाइन फाटा बघता येतो. म्हणजे तांत्रिक दृष्ट्या पुणे - नागपूर - पुणे धावणाऱ्या गाड्या त्या फाट्यावरून दौंड स्टेशनला वगळून जाऊ शकतील आणि पाऊण तासापेक्षा अधिक वेळ वाचवू शकतील.
पण रेल्वेच्या रेवन्यु डिपार्टमेंटला पटणार नाही. केवळ वेळ वाया जातो म्हणून इतके जवळचे जंक्शन टाळणे आर्थिक नुकसानकारक आहे. दौंडचे platforms वाढवणे हाच उपाय आहे. दौंडच्या पुढे वळण टाकणे परवडणार नाही कारण तिथे भीम ( भीमा नदी )हात पसरून बसलेला आहे. नदीवर आणखी एक पूल टाकावा लागेल. म्हणजे मनमाडच्या 'अंकाइ'सारखे एक स्टेशन रिवर्सिंगचा प्रश्न सोडवेल.
कॉर्ड लाइनपाशी जमीन घेऊन platform बाधणे खर्चाचे आहे. वस्ती वाढल्यावर जागा मिळत नाही. तसा प्रकार मनमाडला झाला नाही. तिथे अगोदरच डावे उजवे रूळ टाकले गेल्याने कोणत्याही मार्गाकडून कोणत्याही मार्गाकडे जाणाऱ्या गाड्यांना मनमाड स्टेशन थांबून रिवर्सिंग न करता पुढे जाता येते.
मनमाडचा satellite map पाहिल्यास दक्षिणेस ^अंकाई^ स्टेशनकडे मनमाडहून जाणारे दोन मार्ग दिसतात. तिथून पुन्हा अंकाइ - येवला - - दौंड किंवा अंकाइ - नागरसोल - - औरंगाबाद आहे.
फोटोंसह पहा
गवि आणि इतर -
भोर घाट रेल्वे बांधत असतानाचे फोटो आणि रिव्हर्सिंग स्टेशन हा काय प्रकार होता ते इथे नीट पहायला मिळते-
https://www.livehistoryindia.com/snapshort-histories/2019/05/09/bhor-gh…
शंका (लॉजिष्टिक्स)
सर्वप्रथम मुंबई-खोपोली सेक्टर आणि पुणे-खंडाळा सेक्टर स्वतंत्रपणे बांधले, आणि घाटातला मार्ग नंतर बांधला. मधल्या काळात खंडाळा ते खोपोली (किंवा उलट) प्रवास हा बैलगाडी, पालखी आदि मार्गांनी होत असे.
प्रवाशांच्या दृष्टीने हे ठीक. मात्र, यात एक प्रश्न उद्भवतो.
मुंबई ते ठाणे (किंवा पुढे मुंबई ते खोपोली) प्रवासाकरिता लागणारी इंजिने, डबे वगैरे विलायतेहून मागवून मुंबईस जहाजातून उतरविली असतील, हे कल्पना करता येण्यासारखे आहे. (बंदरापासून स्टेशनापर्यंत काही तात्पुरती रूळव्यवस्था केली असणे शक्य आहे.) पुणे-खंडाळा सेक्टरकरिता लागणारा रोलिंग ष्टॉक सर्वप्रथम पुण्यास (किंवा खंडाळ्यास) कसा आणला असेल?
(सवांतर प्रश्न)
भारतीय रेल्वेचे अधिकृत वेळापत्रक (छापील आवृत्ती) - किंवा भारतीय रेल्वेखालील वेगवेगळ्या विभागीय रेल्वेंची अधिकृत वेळापत्रके (छापील आवृत्त्या) - अजून प्रकाशित होते/होतात काय?
'इंग्रजी फिक्शन' या सदराखाली आजवर प्रकाशित झालेल्या साहित्यात या ग्रंथमालिकेस तोड नाही/नव्हती. (अमेरिकन राज्यघटना ही फार फार तर दुसरा क्रमांक पटकावू शकेल, परंतु भारतीय रेल्वे वेळापत्रकांची सर नाही.)
भारतीय रेल्वेचे अधिकृत वेळापत्रक (छापील आवृत्ती)
हो. होतात. यातल्या माहितीवर मोबाइल apps अधिक्रमण ( उगाचच शब्द वापराला.) झाले तरीही काही वेळा पटापट तुलना करण्यासाठी उपयोगी पडते. मी अजूनही वेस्टन झोन नवीन घेतो. इतर झोनमध्ये गेल्यावर तिथले एक घेऊन ठेवले आहे. ती संदर्भासाठी आहेत. Map महत्त्वाचे कारण स्क्रीनवर सरकवून पाहावे लागतात तसे छापील प्रतीत होत नाही. मोबाइल apps कधीकधी प्यसेंजर ट्रेन्स गाळतात. कनेक्टिंग गाडी पाहता येते.
----------
'इंग्रजी फिक्शन' या सदराखाली आजवर प्रकाशित झालेल्या साहित्यात या ग्रंथमालिकेस तोड नाही/नव्हती
हे कळले नाही.
--------------
पूर्वी प्रत्येक कंपनीत अकाउंटसवाले 'ब्राडशॉ' नावाचे all India time table ठेवायचे. कर्माचाऱ्यांना सुटीसाठी तिकिट भरपाई देताना किमी आणि रकम त्यात पाहून तेवढेच रुपये वाउचर संमत sanction करायचे. Not a penny more not ......
----------------------------
बाकी मी पाहिलेल्या वेस्टन, नॉथ, सदन, झोनपैकी वेस्टन बेस्ट. सदन ठीक पण नॉथ एकदम बकवास. जे कोणी बनवले त्यात गाड्या शोधणे अवघड व हिरव्या पानांवर काळी अक्षरे किंवा आणखी काय म्हणजे डोळ्यांना त्रास.
...
हो. होतात.
अरे वा!
मी अजूनही वेस्टन झोन नवीन घेतो. इतर झोनमध्ये गेल्यावर तिथले एक घेऊन ठेवले आहे.
मी भारतात असताना (मोस्टली विद्यार्थिदशेत. त्यानंतर भारतात रेल्वेप्रवास असा फारसा झाला नाही.) कोठल्याही रेल्वेप्रवासात त्यात्या रेल्वेचे टाइमटेबल विकत घेत असे. उगाच. गंमत म्हणून. रद्दी वाढविण्याकरिता. त्यातली ती मार्गांची नि स्टेशनांची यादी, स्टेशनांच्या नावांपुढली ती VNSBkT वगैरे ॲब्रीव्हियेशने, झालेच तर क्वचित माफक जाहिरातीसुद्धा, वाचताना गंमत वाटत असे, नि वेळ छान जाई. व्हीलर ष्टालवरून एक रेल्वे टाइमटेबल, जमल्यास एखादे पी. जी. वुडहाउस, आणि एकदोन इंग्रजी वर्तमानपत्रे (शक्यतो टाइम्स आणि एक्स्प्रेस - ही केवळ क्रॉसवर्डांसाठी.), ही ठरलेली खरेदी असायची. प्रवासात वेळ घालवायला आणखी काय लागते?
मात्र, मागच्या एकदोन भारतभेटीत जेव्हा केव्हा रेल्वेप्रवास झाले (त्यालाही बरीच वर्षे झाली आता.), तेव्हा रेल्वे टाइमटेबल मिळाले नाही. म्हणून म्हटले छापतात तरी की नाही अजून, कोणास ठाऊक. पण छापत असले अजून, तर चांगले आहे. काही परंपरा जतन केल्याच पाहिजेत.
पूर्वी पुणे स्टेशनावर - किंवा फॉर्दॅट्मॅटर अनेक मोठ्या स्टेशनांवर - दोन प्रकारची उपाहारगृहे असत. खालच्या मजल्यावर एक कँटीनवजा, आत्यंतिक कळकट नि टंपडू असे मोस्टली शाकाहारी स्नॅक्स तथा कपातला उकळून न पिण्यालायक झालेला अत्यंत घाटी चहा सेल्फसर्व्हिस तत्त्वावर विकणारे एक उपाहारगृह असे. (VNSBkTपैकी हे V असावे की S, याबद्दल मला निश्चित खात्री नाही. बहुधा S असावे. किंवा कदाचित V आणि S दोन्ही असेल. असो.) याउलट, जिना चढून वर गेल्यास एक आतमध्ये काहीसा जुनाट डेकॉर असणारे परंतु जेथे पांढरेशुभ्र कपडे आणि डोक्यावर तुऱ्याची टोपी परिधान केलेले वेटर्स दिमतीला येत असे काहीसे कलोनियल छापाचे रेष्टारंट असे. तेथे पॉटमधला चहा, आम्लेट, टोस्ट आणि बटर, अंडाकरी तथा मांसाहारी जेवण उत्कृष्ट मिळत असे. (हे VNSBkTपैकी N.) ही परंपरा आता मला वाटते रेल्वेने पूर्णपणे मोडीत काढली असावी. त्याऐवजी मला वाटते आता वेगवेगळ्या बाह्य व्हेंडर्सना कंत्राटे दिली. त्याने वैविध्य आले असेलही, परंतु निदान वरच्या मजल्यावरचे रेष्टारंट चालू ठेवायला हवे होते. असो. कालाय तस्मै, इ.इ.
(व्हीलर ष्टाल असतो काय हो हल्ली?)
'इंग्रजी फिक्शन' या सदराखाली आजवर प्रकाशित झालेल्या साहित्यात या ग्रंथमालिकेस तोड नाही/नव्हतीहे कळले नाही.
तो आमचा एक विनोद असतो. (भिकार असतो, परंतु असतो.)
बोले तो, भारतीय रेल्वेचे वेळापत्रक हे इंग्रजी भाषेत आजतागायत प्रकाशित झालेल्या फिक्शनपैकी सर्वोत्कृष्ट फिक्शन आहे, असा आमचा दावा आहे. म्हणजे, टाइमटेबलात छापलेल्या वेळा आणि गाड्यांच्या जाण्यायेण्याच्या प्रत्यक्ष वेळा, यांचा एकमेकींशी काही म्हणजे काहीही संबंध नसतो, अशा अर्थाने. कधी झेलम नावाच्या गाड्याने प्रवास घडला असल्यास आपणांस हे विशेषेकरून पटावे.
एक विनोद सांगतात. एका महाभागाने म्हणे एकदा विचारले, की बुवा भारतीय रेल्वेच्या गाड्या कधीही वेळेवर जर नसतात, वाटेल तेव्हा येतात नि वाटेल तेव्हा जातात, तर मग ही वेळापत्रके छापतात तरी नक्की कशासाठी? तर त्याला उत्तर मिळाले, की बुवा 'आज गाडी इतकेइतके तास लेट आहे', असे म्हणता यायला काहीतरी संदर्भ राहायला हवा, म्हणून. निर्लज्जं सदा सुखी!
पूर्वी प्रत्येक कंपनीत अकाउंटसवाले 'ब्राडशॉ' नावाचे all India time table ठेवायचे. कर्माचाऱ्यांना सुटीसाठी तिकिट भरपाई देताना किमी आणि रकम त्यात पाहून तेवढेच रुपये वाउचर संमत sanction करायचे. Not a penny more not ......
पण... ब्रॅडशॉ हा तर इंग्रजांच्या जमान्यातला प्रकार होता ना?
असो.
चुकलेली बस
'आज गाडी इतकेइतके तास लेट आहे', असे म्हणता यायला काहीतरी संदर्भ राहायला हवा, म्हणून
मुंबईतील 'बेस्ट' ने बसच्या पुढील भागी असणारे मार्ग आणि क्रमांक दर्शवणारे कापडी फलक काढून इलेक्ट्रॉनिक बोर्ड लावले तेव्हा काही गाड्यांच्या मागच्या बाजूसदेखिल लावले गेले.
तेही बहुधा प्रवाश्याला आपली कुठली बस चुकली, हे लक्षात आणून देण्यासाठीच असावे!
तेही बहुधा प्रवाश्याला आपली
तेही बहुधा प्रवाश्याला आपली कुठली बस चुकली, हे लक्षात आणून देण्यासाठीच असावे!
मुंबईत मोठ्या संख्येने धावपटू प्रवासी बसच्या मागे जीव खाऊन धावत धावत (बस धावतीच असताना अथवा एखाद्या सिग्नलला क्षणभर थबकते तो क्षण साधून) तिला पकडून वर वेंधतात, त्यांचा विचार करुन ही "मागे पाटी" योजना असावी.
VNSBkTपैकी असे स्टेशनपुढे लिहिणे.
याबद्दल नॉथ झोन पुढे आहे. एखाद्या स्टेशनात B bookstall, C canteen, T tras talk वगैरे आहे का हे फारच निरुपयोगी झालंय आता. मोठ्या जंक्शन स्टेशनात सर्व असणारच. पण ते आताही छापून गोंधळ उडवतात.
IRCTC ची क्यांटिन्स आहेत कुठे कुठे. प्रथम धडाक्यात चालू करून नंतर फ्रान्चाइजीकडे पास केली की ' तू तेरा देख'. क्वालटी गंडते. ठाण्यात आहे. गंडलं. हुबळीत वेज नॉनवेज दोन सेप्रेट. उत्तम आहेत.
फिक्शन - कधी झेलम नावाच्या गाड्याने प्रवास घडला असल्यास लेटच असते हे दिल्ली ( आणि युपीकडच्या) क्रॉस करणाऱ्या डिसेंबरमध्ये सर्वच गाड्यांना लागू आहे. धुक्यामुळे फार वेळ लागतो.
ब्रॅडशॉ हा तर इंग्रजांच्या जमान्यातला प्रकार होता ना?
हो. पुढे इंडिअन रेल्वेचे संस्करण आले तरी वीलरवाल्यास " ब्रॅडशॉ आला का?" असंच विचारत.
वीलर बुकस्टॉल्स अजूनही आहेत खूप.
वेळापत्रके छापतात तरी नक्की कशासाठी? तर त्याला उत्तर मिळाले, की बुवा 'आज गाडी इतकेइतके तास लेट आहे
नाही. ९८% सुधारलेत. शिवाय अकाउंटबिलटी १००% म्हणू शकतो. ही डिजिटल कृपा. तुमची गाडीची स्थिती काय, कधी येणार, किती उशिरा, चार तासांपेक्षा लेट झाल्यास फुल रिफंड वगैरे . याउलट खाजगी बससेवा किती भंगार आणि बेफिकीर आहे. शिटा भरल्या नाही की जागोजागी फिरवून गोळा करतात. वेळ घालवतात.
झेलम...
फिक्शन - कधी झेलम नावाच्या गाड्याने प्रवास घडला असल्यास लेटच असते हे दिल्ली ( आणि युपीकडच्या) क्रॉस करणाऱ्या डिसेंबरमध्ये सर्वच गाड्यांना लागू आहे. धुक्यामुळे फार वेळ लागतो.
डिसेंबरच नव्हे. झेलमच्या बाबतीत कधीही जा; अगदी एप्रिल-मेमध्ये जरी गेलात, तरीही लेटच असते. (किंवा, निदान एके काळी तरी असायची. आणि लेट म्हणजे थोडीथोडकी नव्हे. ऑन ॲन ॲव्हरेज कधी दहा तास, कधी बारा तास, कधी चौदा तास, वगैरे. किंबहुना, कधी चार तासांहून कमी लेट झाल्यास ड्रायव्हरला बडतर्फ करीत असावेत.)
धुके हे कारण नसावे. (म्हणजे, हिवाळ्याच्या दिवसांत तो एक जास्तीचा काँट्रिब्यूटिंग फॅक्टर असू शकेलही, परंतु आवश्यक घटक नव्हे.) मला वाटते निदान त्या काळी तरी दौंड-मनमाड सेक्टर ही एकेरी लाइन असणे हा एक मोठा घटक असू शकेल. (आता ही लाइन दुहेरी केली आहे का, आणि, असल्यास, त्याने परिस्थितीवर कितपत फरक पडला आहे, याबद्दल कल्पना नाही.) कदाचित इतरही घटक असू शकतील. (चूभूद्याघ्या.)
अकाउण्ट्स आणि टाइम टेबल्
हो तो वापर पाहिला आहे आम्च्या पहिल्या कंपनीत. कोणीतरी दिल्लीहून मुंबईला येताना दादरला न उतरता मुंबई सेण्ट्रल ला उतरले (तेथील तिकीट होते). ती राजधानी नसून बहुधा ऑगस्ट क्रांती राजधानी होती - यातली ओरिजिनल राजधानी दादरला थांबत नाही पण ऑक्रां वाली थांबते असा काहीतरी प्रकार होता. अकाउण्ट वाले नग का कोणास ठाउक त्याची व्हॅलिडीटी बघत होते -कारण त्या व्यक्तीने ते कारण सांगून मुंबई सें पर्यंतचे तिकीट रीइम्बर्स करायला दिले होते. आता दिल्लीहून अंतर धरले तर या दोन्ही स्थानकांच्या तिकीटांच्या किमतीत किती फरक होता आणि त्यात ॲप्रूव्हलचा प्रॉब्लेम येण्याइतका तो होता का माहीत नाही. पण माझ्यासमोर ही चर्चा झाल्याचे आठवते.
त्याच सुमारास आमच्या कंपनीत बाहेरचे कन्सल्टंट लक्षावधी रूपये घेउन फारसे काही उपयोगी काम करत नव्हते. तेव्हा या चर्चेतच एकाने इथे तुम्ही १००-२०० रूपयांकरता हा उद्योग करताय, तेथे हे लोक दिवसाला प्रत्येकी काही हजार रूपये वाया घालवत आहेत ते बघा - वगैरे आर्ग्युमेण्ट्स केली होती.
प्रोफेसर अरोड़ा (अतिअवांतर)
बादवे, कोणाला प्रोफेसर अरोड़ा आठवताहेत?
एके काळी (१९८०च्या दशकात) दिल्लीहून सेंट्रल रेल्वे मार्गाने (व्हाया आगरा - ग्वालियर - झाँसी - भोपाल - इटारसी - भुसावळ) मुंबई किंवा पुण्याकडे आल्यास, रेल्वेमार्गाच्या कडेच्या भिंतींवर थोड्याथोड्या अंतरावर पांढऱ्या रंगात रंगविलेली 'रिश्ते ही रिश्ते! रिश्तों के लिए मिलें: प्रोफेसर अरोड़ा, 28 रैगड़पुरा, करोल बाग, नयी दिल्ली| ब्रांचेज़ इन अमरीका ऐंड कनाड़ा' ही जाहिरात पार महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पोहोचेपर्यंत पिच्छा सोडीत नसे. वेस्टर्न रेल्वे मार्गाने (व्हाया भरतपूर - कोटा - रतलाम - वडोदरा) मुंबईस आल्यास मात्र, दिल्लीहून मथुरेपर्यंतचा मार्ग हा सेंट्रल रेल्वेच्या मार्गाशी कॉमन असल्याकारणाने, मथुरेपर्यंत या जाहिरातीची साथ असे; मथुरेच्या पुढे मात्र, का कोण जाणे, परंतु, ही जाहिरात पाहिल्याचे आठवत नाही. (चूभूद्याघ्या.)
दिल्लीपासून ते पार इटारसी-खंडव्यापर्यंत ही जाहिरात रंगवीत जाणाऱ्या रंगाऱ्यांच्या फौजेला माझा सलाम!
तुम्ही म्हणताय तो...
...डा. अरोड़ा हा तुलनेने नवीन फेनोमेनॉन असावा. (आमच्या वेळेस पाहिलेला आठवत नाही.)
आमच्या वेळेस डॉ. विनोद सबलोक होता. (कदाचित अजूनही असेल.) परंतु तो रेल्वेमार्गाशेजारच्या भिंती रंगवीत नसे. त्याची अभिव्यक्तीची साधने निराळी होती. (ती कोणती, ते आता निश्चित आठवत नसले, तरीही.)
रेल्वे वर्णनं
या लेखानिमित्ताने पुस्तके शोधाशोध केली. अगोदर दिलेल्या(Kerr) पुस्तकांत काही गोष्टी कळल्या.
१) १८६३-६८ पासून हिंदुंचा धार्मिकपणा वाढला की काय असा संशय येण्यासारख्या तीर्थयात्रांचा धुमधडाका सुरू झाला.
२) पद्धतशीर चोरी करणारे भाम्पटे चार जिल्ह्यांतून असत ,पुणे त्यापैकी एक. त्यांनी रेल्वे प्रवाशांना लक्ष्य केले.
३) जेवण मागवणे सुरू झाले. फस्ट क्लासवाले अटेंडंटला सांगत. टेलिग्रामने पुढच्या स्टेशनला कळवले जाई आणि पुढील स्टेशनात जेवणाचे ताट दिले जाई.
४) रेल्वेच्या कामात भ्रष्टाचार होत होता आणि इंग्रज अधिकाऱ्यांना तुरुंगात जावे लागले.
-----
रस्किन बॉन्ड याने एका पुस्तकात रेल्वे लेखनाचे वेगवेगळ्या लेखकांचे उतारे दिलेत. जूल्स वर्नी ते खुशवंत वगैरेची.
सुंदर माहिती!
मस्त लेख! सहज उघडला आणि पूर्ण वाचल्याशिवाय थांबलोच नाही.
तो पूल दापोडीचा पूल वाटतो. दिसायला अगदी तसाच दिसतो. हा इतर एक दोन ठिकाणीही ठाण्याचा पूल म्हणून दिलेला पाहिला. पण या पुलाजवळून अनेक वर्षे बसने पिंपरीला गेलो आहे त्यामुळे तो बघताच ओळखीचा वाटला.
इंजिन फिरवायचे ते टेबल म्हणजे 'टर्न टेबल' - कोल्हापूरला शाहूपुरीमधे मी ८० च्या दशकात पाहिले होते. कोळश्याचे अजस्त्र ब्रॉडगेज इंजिन केवळ २-३ लोकांनी फिरवलेले पाहिले आहे. भारतात आता ती जतन केली आहेत की नाही माहीत नाही पण अमेरिकेत काही ठिकाणी आहेत. अनेक इंजिने शेड्स मधे पार्क केलेले 'राउण्डहाउस' व त्यातून निघणारे रूळ मधे एकत्र येउन तेथे असलेले टर्न टेबल इथल्या रेल्वे मधे कॉमन होते बहुधा पूर्वी.
तो बोगदा पारसिकचा असेल कदाचित . ठाणे व दिवा स्थानकांमधला. तो मेन लाइन वरचा आहे. लाँग रूट वाल्या गाड्या व फास्ट लोकल्स चा रूट. स्लो लोकल्स मुंब्रा व कळवा अश्या त्या डोंगराला वळसा घालून जातात.