"सिन सिटी"

पाडगावकरांनी म्हटले "एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून”, तसा प्रत्येकाच्याच मनात असतो एक जुगारी दडून. आयुष्यभर विविध संभाव्यता तोलून आपण निर्णय घेतो, संधींचा फायदा घेतो आणि त्या साधल्या किंवा नाही साधल्या तरी त्याला शेवटी दैवयोग म्हणून मनाची समजूत घालतो. खरे तर कसिनोमध्ये पैशांनी खेळण्याच्या कितीतरी पटीने ज्यास्त धोके आपण आयुष्याशी, जिवाशी, नैतिकतेशी खेळत असतो.

कौरव पांडवांचे द्युत तर लहानपणापासून आपल्या मनावर कोरले गेलेले आहे. “छे छे आपण नाही बुवा त्यातले” असे म्हणून सट्टाबाजाराला नाक मुरडणारे, अभावितपणे उद्या विकू गहू, आज जरा भाव कमी आहे हे सहजपणे ठरवून टाकतात. धोका, संभाव्य धोका, हेतुतः घेतलेला धोका, परिगणन करून घेतलेला धोका (calculated risk) हे सारे जगण्याचे अपरिहार्य मार्ग व साधने आहेत.

लास वेगसला गेल्यावर मात्र उफाळून येतो तो फक्त अनिर्बंधित,बेलगाम, पराकोटीचा तीव्र झपाटा. नकळत दडपलेल्या अभिलाषांचा ओघ कसा अनावृत्त होतो हे आकलनाच्या पलीकडे आहे. हॉटेलमधील लॉबीत पाऊल ठेवताच, अत्याधुनिक सजावटीने ऐश्वर्याची ऐट दाखवणारी धनाढय अप्रतिम बिलोरी झुंबरे आणि तत्पर कर्मचारी, तुमचा मुक्काम एक अविस्मरणीय अनुभव बनवायला उत्सुक असतात. प्रसन्न रचनेने (Décor) सुशोभित केलेल्या खोल्या स्वप्नातल्या मुक्कामी आलो हा आभास निर्माण करतात. जेवणखाण, मनोरंजन, खरेदी ह्याच्या अंतहीन पर्यायातून निवड करणे हे साधेसुधे काम नाही. स्वजनांमध्ये मतभेद, चर्चा, वादविवाद आणि अखेर भांडणात रुपांतर करू शकणे हे ह्या परिसराचे वैशिष्टय आहे. इथे आल्यावर भावना, उत्तेजना आधीच तीव्र शिखरावर असतात, मग तर एक छोटी असहमतता क्षोभाला कारणीभूत होऊ शकते. तुमच्या सह्प्रवाशांमध्ये खमका नेता नसेल तर सफरीची मजा संपलीच म्हणून समजा!
एकावर एक चढाओढ करणारी हॉटेल्स, बादशाही थाटाची चित्तवेधक, आकर्षक, भुरळ घालणारी वैभवी कसिनो तुमची जोरदार प्रतीक्षाच करत असतात. करणी केल्यासारखे, डोळे झरझर रांगेत असलेल्या हजारो स्लॉट मशीनींवर खिळतात. अनेक खेळांची टेबले, पोकरची (poker) टेबले, हवेत उडणारे फासे आणि भोवताली उभे असलेले खेळाडू आणि तेव्हढेच बघे हे विलक्षण दृश कुणालाही मोहिनी घालणारे आहे. मजा म्हणजे, अक्षरशः हजारो लोक तिथे उभे असतात, खेळत असतात, खेळण्याचा विचार करीत असतात, पण त्यांना दुसऱ्या कशाचेही, कुणाचेही भान नसते. आपल्याच तंद्रीत, झ़ाम्बिसारखे ह्या स्लॉट मशीनपासून तर दुसऱ्या मशिनकडे शून्यपणे ते चालत असतात.
मोफत, विविध, हवी ती आणि तितकी पेये ग्राहकांना पुरुवून त्यांचे खेळण्यातले, म्हणजेच पैसे लावण्यातले स्वारस्य राखून ठेवणे हा आपल्या कसिनो यजमानांचा मुख्य उद्देश असतो. सुंदर कपडे घालून गोड हास्य करीत पेय्यांची ऑर्डर घेणाऱ्या तरुणींना नाकारणे म्हणजे विश्वामित्रांशी स्पर्धा करण्यासारखे आहे. चतुराईने त्या पेय आणायला आपला जास्तीत जास्त छान वेळ घेतात. तोपर्यंत आणि कुठल्या मशीनची कशी खेळण्याची तऱ्हा आहे हे कळेकळेपर्यंत कमीत कमी पन्नास डॉलरचा चुराडा झालेला असतो! "अच्छा, इथे आहेस होय तू”, असे गोडपणे बोलून पेला पुढे येतो, तेव्हा त्याची नितांत गरज असते! ही तर किरकोळ गमतीसाठी खेळणाऱ्यांची स्थिती.
पलीकडच्या मोठ्या गोल टेबलावर तन्मयतेने पत्ते वाटणारा आणि विचारपूर्वक खेळणाऱ्यांची वेगळीच कथा! सर्वच खेळ कसिनोला शेवटी लाभदायक होतील अशाच तऱ्हेने संकल्पित केलेले असतात. ते सारे सरळसरळ गणितकृत्य आहे, ज्यात तुंम्ही कधीही जिंकू शकणार नाही हा ठराव पूर्ण निश्चित असतो. पण त्याचबरोबर खेळणाऱ्याला अल्पशा परतफेडीचे मधाचे बोट लावून खेळत ठेवायला चकवत ठेवण्यापुरते! बघ्यांचे उत्तेजन, चढलेले मद्यपान,जिंकण्याची आशा हा असुरी संयोग बघता बघता कंगाल करू शकतो. हास्याचे फवारे, मादक इशारे,धूम्रपानाचे धुवारे! लहानपणापासून सिनेमासृष्टीत बघितलेले हे दृश, एक साध्य न करता येणारे चित्र अनुभवायचे असेल तर ते ठिकाण आहे, लास वेगस. औट घटकेचा राजा होऊन ते फक्त पडद्यावरचे स्वप्न उपभोगायचे असेल तर जावे वेगसलाच..
यु एस ए तील नेवाडा ह्या राष्ट्रात, मोहावी (Mojave) वाळवंटाच्या एका दरीत वसलेले हे शहर. सहाशे स्क़्वेअर मैलांच्या ह्या खोऱ्यात ज्यास्तीत ज्यास्त लोकांचे संकेंद्रण आहे. वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये सध्या त्याची गणना आहे. "स्ट्रीप" म्हणून तो भाग प्रसिद्ध आहे. सिनेमा, टी व्ही जगात चित्रीकरणाचे हे लोकप्रिय ठिकाण आहे. हजारो खोल्यांची, अत्यंत आलीशानी हॉटेल्स हे इथल्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे आहे. ही हॉटेल्स आपापले वैशिष्ट्य स्थापून प्रवाशांची करमणूक करायला सज्ज. पैसे संपल्यावर किंवा घालवायचे नसतील तर नुसते "स्ट्रीपवर" भटकणे हेसुद्धा मोठेच मनोरंजन आहे.
बेलाजीओची कारंजी तुम्हाला तासंतास खिळवू शकतात. निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर पाणी, संगीत आणि प्रकाश-तरंगांची विलक्षण गुंफण घालून भुरळून टाकणारा, चैतन्न्याने भरलेला हा आविष्कार मोहून टाकणारा आहे हे निःसंशय! दर अर्ध्या तासाने विलोभनीय नृत्य करत शेकडो फूट उंच उडणारी बेलाजीओची ही कारंजी विख्यात आहेत.
कृत्रिम ज्यालामुखीचा रात्री आठ ते बारा दर तासाला केलेला उद्रेक ही "मिराज" हॉटेलची खासियत. हा रंगांचा धुमधडाका, थाटमाठ मोफत बघायला गर्दी असते. संगीताच्या तालावर हलणारे, हवेत उडणारे प्रचंड अग्निगोल ज्वलंत देखावा निर्माण करतात. धबधबा आणि भोवतालचे तळे ह्यामुळे तर ते दृश सुंदर तसेच चित्तथरारक होते. झाकीर हुसेनच्या अलौकिक, गहन रचनेने समृद्ध झालेली ही संगीत रचना एक आत्मिक आनंद देते. ज्वाला आणि ध्वनीच्या निकट सानिध्यात, ज्वालामुखीच्या मध्ये राहून इजा न होता हा अनुभव घेणे ह्यासारखे सुदैव नाही. धगधगणारे संगीत, अग्नी आणि पाणी ह्याची अभूतपूर्व युती ही "मिराजची" ज्योत बनली आहे.
जुन्या लास वेगसच्या फ्रीमांट रस्त्यावरचा अनुभव लक्षणीय आहे. ९० फूट उंचीवर १५०० फूट लांबीचे छत १२ मिलीअन संकलित केलेल्या झगझगीत दिव्यांचा ५५० वॉटच्या ध्वनिनी दणाणून टाकणारा हा ६ मिनिटांचा शो बघायला दररोज २५००० लोक येतात. अवाढव्य छताखाली उभे राहून ही वेगवान रपेट करणे हा एक विलक्षण अनुभव चित्तथरारक आहे ह्यात शंकाच नाही.
ह्या मायाजालात, मयसभेत तुम्हाला जास्तीत जास्त गुंतवून, वास्तवाची जाणीव न होऊ देणे हे ह्या गावाचे उद्दिष्ट नित्यनेमाने ते पार पडतात आहे. एका धुंद हवेत, जलशात, गर्दीचा एक भाग होऊन मस्तपणे रात्री विहरत असलेल्या झुंडी बघून आपोआपच नकळत तुम्हीही त्यात मिसळून जाता. अपरिमित उत्साह, चैतन्य, मनापासून हास्य, उत्सुक नजरा वेगासचे रस्ते दुमदुमून टाकतात. अत्याधुनिक शॉपिंग माल्स, विविध खेळ, अप्रतिम सुंदर स्वादिष्ट भोजनालय आणि अविरहत चालणारी नाच गाण्याचे क्लब ह्याच्या विपुलतेमुळे लास वेगस हे मनोरंजनाची राजधानी समजले जाते.
खाणे, पिणे नाच गाणे हे वेगस पद्धतीने एक वेगळीच कलाटणी घेऊन मेंदूत शिरते. अवैध व्यवहार, दुराचार, अवगुण खपवून घेणाऱ्या, किंबहुना त्यांना उत्तेजित करणाऱ्या ह्या गावाने "पातक शहर (सिन सिटी)" हे शीर्षक मिळवले आहे. लडीवाळीक स्वप्नासारखे चार दिवस घालवून पुंन्हा वास्तवाकडे परतणे हा लक्षावधी अमेरिकन लोकांचा छंद झाला आहे. फक्त अमेरिकनच नाही तर इतर देशवासीय प्रवासीही ह्या चमकणाऱ्या शहराचा आस्वाद घ्यायला जीवाचे रान करून येतात.
इतके म्हणणे पुरेसे आहे कि प्रत्येक दिवशी भरणारा हा अतिवास्तवाचा भास (surreal feel) देणारा मेळावा, नेवाडाचे (Nevada) हे शुष्क वाळवंट पेटवून, चेतवून, त्यात जळण घालून वर्षानुवर्षे अखंड भडकवत ठेवत राहणार आहे.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

"ऐसी अक्षरे" या संकेतस्थळावर स्वागत आहे. लेख वाचला. आवडला.
तुमचे असेच ललित लिखाण वेळोवेळी प्रकाशित करावे ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"ऐसी अक्षरे" वर मनःपूर्वक स्वागत!
लेख उत्तम आहे.

यावरून बरेच वर्षांपूर्वी लिहिलेल्या या लेखांची आठवण झाली:
अमेरिकायण! भाग १०: द्युतक्षेत्री आणि भाग २१ : कसिनोंच्या शहरात

तुम्ही म्हणताय ते खरे आहे.. अश्या शहरांमध्ये संयम ठेवणे अत्यंत कठीण असते.

येत रहा.. लिहित रहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख आवडला. सिन सिटीला भेट देण्याची उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'अतिवास्तवाचा भास' हे वर्णन आवडलं. कधीतरी लास व्हेगसही बघायचं आहे. लास व्हेगस हे कसिनो कॅपिटल कसं बनलं याबद्दल एक डॉक्यूमेंटरी पाहिली होती. तपशील आता लक्षात नाही, पण तो इतिहास रंजक वाटला.

एकेकाळी उत्सुकता म्हणून इंग्लिश प्रिमीयर लीग्मधे बेटींग करण्याची इच्छा झाली होती. आळशीपणामुळे ते काही केलं नाही. त्यापेक्षा स्थानिकांचा पाठींबा असणार्‍या टीमचा सामना असेल तेव्हा स्थानिक पबमधेच जाण्याइतपतच आमची कृती मर्यादित राहिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रत्यक्ष भेट देऊन आल्यामुळे, तुमच्या लेखाने जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. स्वागत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0